‘चौथी औद्योगिक क्रांती’ : आव्हानांचा पूर्णपणे नव्याने विचार करण्याची गरज
पडघम - अर्थकारण
विजय तांबे, प्रदीप खेलूरकर
  • प्रातिनिधिक चित्र
  • Tue , 07 July 2020
  • पडघम अर्थकारण चौथी औद्योगिक क्रांती Fourth Industrial Revolution 4IR लॉकडाउन Lockdown करोना Corona

‘सेवाग्राम कलेक्टिव्ह’चे काम करता करता चौथ्या औद्योगिक क्रांतीचा विषय आमच्यासमोर आला. काही आकडेवारी, पुस्तके उपलब्ध झाली. या विषयावरील अनेक लेख, आमच्या दोघांची निरीक्षणे, टिपणे, आयआयटी मुंबईमधील आयटी क्षेत्रातील तज्ज्ञ, औद्योगिक क्षेत्रात ‘Fourth Industrial Revolution’ (4IR) प्रकल्प राबवणारे अधिकारी, 4IR भारतात लागू करण्यासाठी नेमलेल्या कन्सल्टिंग कंपनीचा अहवाल, आणि काही ज्येष्ठ मित्रांबरोबर केलेल्या चर्चेतून हे लेखवजा टिपण साकार झाले.

अंतिमतः या लिखाणाचा नेमका उद्देश काय? आम्हाला या दीर्घ टिपणातून नक्की काय अपेक्षित आहे? कोणता वाचक अपेक्षित आहे? हे प्रश्न आम्ही स्वतःलाच विचारले. तेव्हा असे जाणवले की, वंचितांबद्दल तळमळ असणाऱ्या, काही बदल व्हावा म्हणून झिजणाऱ्या कार्यकर्त्यांनी, संवेदनाक्षम व्यक्ती आणि वैचारिक क्षेत्रात काम करणाऱ्यांनी हा लेख वाचायला हवा. त्या मंडळींनी पुढे काय होईल याचा विचार करावा. विविध विचारधारांच्या मंडळींनी एकत्र येऊन आपल्या मार्गांची तपासणी करावी, जमल्यास फेरमांडणी करावी हा या लेखाचा उद्देश आहे.

..................................................................................................................................................................

१.

सध्या करोनाचा लॉकडाऊन काळ सुरू आहे. रोजगार देणारी शहरं सोडून हजार-पंधराशे किलोमीटरवरील आपल्या गावाच्या दिशेने लाखोंच्या संख्येने मजुरांचे तांडे निघाले आहेत. बिस्किटं आणि पाण्यावर गुजराण करत ही मंडळी मार्गक्रमण करत आहेत. रस्त्यात अपघात, उष्माघात आणि अन्न-पाण्याविना मुले, महिला, पुरुष मृत्युमुखी पडत आहेत; तरीही मजुरांचे तांडे गावाच्या दिशेने जात आहेत. इथे शहरात रोजगार मिळतो, बंधुभाव नाही- हा प्रचंड असुरक्षिततेचा धक्का मिळाल्याचा परिणाम आहे. आपल्या गावच्या घरातील जगणं सुखकारक मुळीच नाही, याची पूर्ण कल्पना असूनही त्यांना काहीही करून घर गाठायचे आहे. रात्री-बेरात्री खिडकीबाहेर डोकावले तर नि:शब्दपणे मान खाली घालून परप्रांतीय मंडळींचा जत्था हे शहर सोडून जाताना दिसतो. हे करोनाप्रकरण लवकर संपेल, असे दिसत नाही. काही महिन्यांनी सगळं सुरळीत झालं तरी लस येत नाही, तोपर्यंत आपण सर्व जण भयग्रस्त राहणार आहोत. सारखे हात धुणार आहोत, मास्क लावणार आहोत. परस्परांपासून अंतर राखण्याचा प्रयत्न करणार आहोत. बाजारात मिळणाऱ्या वस्तू निर्जंतुक व अस्पर्शित आहेत ना, याची खात्री करणार आहोत. सध्या टीव्हीवर ‘आमच्या कारखान्यात सगळं कसं निर्जंतुक वातावरणात अंतर राखून काम केलं जातं,’ याच्या जाहिराती सुरू झालेल्या आहेत.

काही अर्थतज्ज्ञ आणि तंत्रज्ञांच्या मते, पुढील पंधरा-वीस वर्षांनी येणारी चौथी औद्योगिक क्रांती उद्यापासून सुरू होऊ शकते. मोठ्या प्रमाणात स्थलांतर, कारखान्यात मनुष्यबळाचा अभाव, साथीची भीती या वातावरणात कारखाना चालवायचा असेल तर रोबोंशिवाय पर्याय नाही, असा सूर आळवला जात आहे. आपण एका विचित्र स्थितीत सापडलेले आहोत. बाजारात वस्तुमालाला उठाव नाही, कारण खर्च करायला ग्राहकाकडे पैसे नाहीत. दुसरीकडे ऑटोमेशनचा आग्रह आणि स्थलांतरामुळे मोडकळीस आलेल्या ग्रामीण अर्थव्यवस्थेवर स्थलांतरित मजुरांचा ताण पडलेला आहे. आपण सगळेच ही स्थिती विषण्णतेने हतबल होऊन बघ्याच्या भूमिकेतून पाहत आहोत.

चौथी औद्योगिक क्रांती किंवा आय.आर.फोर हे प्रथमच ऐकलं तेव्हा ‘असेल काही तरी परदेशी खूळ’ असं झटकन वाटलं. मात्र जसजशी माहिती मिळू लागली तशी ही मंडळी आपल्या उंबरठ्यावर उभी आहेत, असं जाणवलं. ‘वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’ ही चौथ्या औद्योगिक क्रांतीची प्रणेती. ‘चौथी औद्योगिक क्रांती’ हे नाव ठसवण्याचे काम वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने केले. या फोरमच्या दिल्ली ऑफिसच्या उद्घाटनप्रसंगी आपले पंतप्रधान मोदी काय म्हणाले, ते समर्पक आहे. ते म्हणाले, “आय.आर. एक व दोनच्या वेळी आम्ही पारतंत्र्यात होतो. आय.आर. तीनच्या वेळी आम्ही समाजवादाच्या जोखडात होतो. आता आय.आर. फोरच्या काळात भारत जोमाने विकसित होत आहे.” म्हणजे, आपण चौथ्या औद्योगिक क्रांतीसाठी पायघड्या घालायचं काम करतोय.

चौथी औद्योगिक क्रांती असं म्हटलं की ‘पहिल्या तीन कोणत्या?’ असा प्रश्‍न येणं स्वाभाविक आहे. या तीनही क्रांत्या गेल्या अडीचशे वर्षांत झाल्या. पहिल्या औद्योगिक क्रांतीमध्ये १७८४च्या आसपास वाफेचे इंजिन आणि तंत्रज्ञान यांच्या वापरातून उत्पादनाला वेग मिळाला. विजेचा शोध लागल्यावर खूप बदल झाले. वेगाने वस्तू निर्माण करण्यासाठी उत्पादनसाखळ्या तयार झाल्या. ही दुसरी औद्योगिक क्रांती १९२३च्या आसपास घडली. कालांतराने यामध्ये सातत्याने विकास आणि सुधारणा होत गेल्या. तिसऱ्या औद्योगिक क्रांतीची सुरुवात साधारणपणे १९६९च्या आसपास झाली. यामध्ये संगणकाचा वापर सुरू होऊन क्रमाक्रमाने ती डिजिटलायझेशन आणि रोबोटिक्सपर्यंत येऊन ठेपली. वेगवान इंटरनेटने चौथ्या औद्योगिक क्रांतीची सुरुवात २०१४मध्ये झाली. त्या अनुषंगाने क्लाऊड तंत्रज्ञान, बिग डाटा अ‍ॅनालिटिक्स, ब्लॉक चेन तंत्रज्ञान यामध्ये प्रगती होत आहे. अ‍ॅप आणि वेबवर आधारित बाजार वाढत आहे, तर दुसरीकडे तंत्रज्ञानात प्रच्छन्नपणे प्रगती होईल, अशा शक्यता वर्तवल्या जात आहेत. तंत्रज्ञानाचा संबंध आपल्या दैनंदिन जीवनाशी निगडित असल्याने आय.आर. फोरमधील तंत्रज्ञानाचे प्रातिनिधिक रूप म्हणून सध्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स (ए.आय.) म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता, थ्री डी प्रिंटर आणि इंटरनेट ऑफ थिंग्ज (आय.ओ.टी.) हे आहेत. याबद्दल आपण थोडक्यात माहिती करून घेऊ म्हणजे पुढे काय काय होऊ शकते, याचा आपण विचार करू शकतो.

२.

कोणतेही यंत्र विचार करून निर्णय घेत असेल तर ते ए.आय. आहे. त्यांच्या आज्ञावलीत त्या प्रकारे सुधारणा करून निर्णय घेण्याची क्षमता निर्माण केली आहे. अगदी सोपं उदाहरण घेऊ. आपल्या घरात कचरा काढायला एक रोबो ठेवलाय. त्याची दोन कामं आहेत. एक आहे कचरा काढणे आणि दुसरे म्हणजे जो कचरा नाही, त्या वस्तू घरात परत ठेवून द्यायच्या. कचरा म्हणजे काय आणि वस्तू म्हणजे काय, याचा तपशील या रोबोच्या आज्ञावलीत आहे. एक दिवस कचरा काढताना अचानक एक घुबडाचे पिल्लू त्याच्यासमोर येऊन बसलं. अशा वेळी रोबो काय करेल? आपला तपशील तपासेल. दोन्ही याद्यांमध्ये घुबडाचा तपशील नाही. मग ही नवी वस्तू दोन्ही याद्यांतील कोणाशी मिळती-जुळती आहे का, ते रोबो तपासेल. मग त्याला वस्तूंच्या यादीतील लहान मूल आणि घुबडाचे पिल्लू यात साम्य आढळेल. मग तो रोबो ते घुबडाचे पिल्लू उचलून टेबलावर ठेवेल. त्याच वेळी आपल्या आज्ञावलीत बदल करून ती अद्ययावत करेल. म्हणजे जेवढी अधिक माहिती किंवा डाटा, तेवढे नंतर अद्ययावत. जसा आपला कचरा उचलणारा रोबो आहे, तसेच कारखान्यात रोबो स्वरूपातील ए.आय. काम करत असतात. येणाऱ्या अडचणीवर मात करून उत्पादन निरंतर ठेवू शकतात. पॅनासॉनिक कंपनीमध्ये दर महिन्याला वीस लाख प्लाझ्मा स्क्रीन तयार होतात. या कारखान्यात फक्त १५ कर्मचारी काम करतात. प्रोटिन फोल्डिंग प्रॉब्लेम या विषयावर आंतरराष्ट्रीय निबंध स्पर्धा झाली. जैवरसायनशास्त्रातला हा महत्त्वाचा विषय आहे. या स्पर्धेत बक्षीस मिळवले ते गुगलच्या डीप माइंड या ए.आय.ने!!

भावी काळाच्या संकेताची ही दोन उदाहरणे आहेत.

आपण थ्रीडी प्रिंटिंगबद्दल ऐकलेले असेल. युट्यूबवर त्याचे अनेक व्हिडिओ बघायला मिळतील. त्याचा आता औद्योगिक वापर होऊ लागला आहे. त्यामुळे कारखान्यातील उत्पादनसाखळीतील अनेक टप्पे गाळता येतात. कामगारांशिवाय उत्पादन वेगात होते. मोठ्या उद्योगाला लागणारे छोटे-छोटे साहित्य वेगवेगळ्या छोट्या-मध्यम किंवा असंघटित क्षेत्रातील कारखान्यातून तयार होते. या सर्वांच्या बदली ती कामे एक थ्रीडी प्रिंटर करू शकेल. जर्मनीच्या सिमेन्स कंपनीत कंबरेचे आणि गुडघ्याचे नकली सांधे बनवतात. प्रत्येक ग्राहकाचे माप वेगळे असते. म्हणजे हे व्यक्तिगत उत्पादनच म्हणू. प्रत्येक ग्राहकाच्या ऑर्डरप्रमाणे हे नकली सांधे बनवायला इंजिनिअर्सना पूर्वी काही दिवस लागायचे. आता थ्रीडी प्रिंटरला ग्राहकाचा तपशील पुरवला की, तीन ते चार तासांत हे सांधे इंजिनिअरशिवाय उपलब्ध होतात.

इंटरनेट ऑफ थिंग्ज म्हणजे वस्तूंनी एकमेकाशी संपर्क करणे किंवा जोडून घेणे. उत्पादनसाखळीत एका माणसाकडून दुसऱ्या माणसाकडे माल जात असे. नंतर एका यंत्राकडून दुसऱ्या यंत्राकडे माल पोचवण्यासाठी माणसाची गरज होती. आता यंत्रांना आज्ञा द्यायला संगणक आहे. संगणक चालवायला माणसे आहेतच. आता ए.आय.मुळे माणूस गरजेचा राहिलेला नाही. सिनेमातील हीरो एका नंबरवर एसएमएस करतो की, मी घरी यायला निघालो आहे. घरातील एसी आपोआप सुरू होतो. कॉफीमेकरमधील पाणी उकळू लागतं. एक यंत्र दुसऱ्या यंत्राला कामाचा निरोप देते. दुसरे यंत्र कामाला सुरुवात करते. याच तत्त्वावर सगळ्या यंत्रांच्या कामाच्या आज्ञावलीसह ती कामे करताना निर्माण होणाऱ्या अडचणी आणि त्यावरील उपायांचा डाटा ए.आय.ला पुरवल्यास कारखान्यातील उत्पादनाच्या साखळीत एक मशीन दुसऱ्या मशीनला निरोप पोचवेल. कामाचे सातत्य राखायला ए.आय. असेल. रोबो निर्माण करणारी FANUC कंपनी दर दिवशी पन्नास रोबो तयार करते. हा कारखाना तीन शिफ्टमध्ये चालतो. मात्र या कारखान्यातील दिवे सहसा बंद असतात, कारण उत्पादनासाठी सजीवाची इथे गरज नाही.

औद्योगिक क्रांतीच्या प्रत्येक टप्प्यावर तंत्रज्ञानात आमूलाग्र बदल झाले. उत्पादनाचा वेग वाढला. मालाचा दर्जा सुधारला. त्यातून संस्थात्मक आणि राजकीय बदल झाले. याचबरोबर विषमतेमध्ये वाढ होत गेली. सर्व औद्योगिक क्रांत्या या पाश्‍चिमात्य देशांत निर्माण होऊन तिथे रुजल्या. त्या देशांमध्ये मुबलक भांडवल, कमी लोकसंख्या, लोकसंख्यावाढीचा दर कमी असल्याने तंत्रज्ञानाच्या साह्याने कमी श्रमात भरघोस उत्पादन हा फायदेशीर मामला ठरला. उत्पादित माल लोकसंख्येच्या मागणीच्या प्रमाणापेक्षा खूप जास्त असल्याने नव्या बाजारपेठांचा शोध घेणे क्रमप्राप्त झाले. अगदी पहिल्या औद्योगिक क्रांतीपासून ही प्रक्रिया निरंतर सुरू आहे. साम्राज्यविस्तार ते जागतिकीकरण असा हा सलग आलेख आहे. या पृथ्वीतलावर आपण सृजनात्मक नवनिर्मिती करू शकतो, या भवतालातून काही तरी वेगळे निर्माण करण्यासाठी आपल्याला श्रम करायचे आहेत, निर्माण झालेल्या साधनांचा आपण आनंदाने उपभोग घ्यायचा आहे- या तीन महत्त्वाच्या भूमिकांतून मानवी समाजाचा भविष्यकाळ घडत गेला.

३.

पहिल्या तीन औद्योगिक क्रांत्यांमध्ये नवे तंत्रज्ञान आले आणि उत्पादनाचे तंत्र विकसित झाले. त्या प्रमाणात अनेकांचे रोजगार गेले. त्याचबरोबर नवे रोजगार निर्माण झाले. उदाहरणार्थ विजेच्या शोधामुळे कमी मजुरांकडून अधिक उत्पादन करता येऊ लागले. त्याच वेळी वायरमन, इलेक्ट्रिशियन यांसारखे नवे रोजगार निर्माण होणार याचा अंदाज येऊ लागला. प्रशिक्षण देऊन नवे प्रशिक्षित मजूर तयार झाले. प्रत्येक वेळी नवे तंत्रज्ञान राबवण्यासाठी कशाची गरज लागणार याचा अंदाज येत गेला. त्याप्रमाणे प्रशिक्षण, नवे रोजगार असे सुरू राहिले. या तीनही औद्योगिक क्रांत्यांमध्ये विकसित झालेले तंत्रज्ञान क्रमाक्रमाने वेगवान, अधिक काटेकोर, बिनचूक आणि मानवी श्रमाची गरज कमी करणारे होते. मात्र या तंत्रज्ञानाचे नियंत्रण माणसाकडेच राहिले. हे तंत्रज्ञान वापरून निर्णय घेण्याचे कार्य माणूस करत होता. त्यामुळे तंत्रज्ञान कितीही विकसित झाले, तरीही मनुष्य सर्व भूमिका पार पाडत राहिला.

चौथ्या औद्योगिक क्रांतीमध्ये रोजगारासंदर्भात अडचण निर्माण झालेली आहे. तंत्रज्ञान अतिशय झपाट्याने विकसित होत असल्याने कोणते रोजगार कायमचे भूतकाळात जातील याची यादी मोठी आहे, मात्र नवे रोजगार कोणते निर्माण होतील हे खूपसे अंधुक आहे. मागील वर्षी ‘इकॉनॉमिक टाइम्स’तर्फे ‘टेक्नॉलॉजी टॅलेंट इक्विलिब्रियम’ या कार्यक्रमात नेक्स्टवेल्थ आंत्रप्रूनरचे संस्थापक, इंटेलचे भारतातील प्रमुख आणि विप्रोचे उपाध्यक्ष यांच्या चर्चेचे सार असे आहे की- ए.आय.मुळे १०० नोकऱ्या जातील आणि जेमतेम १० नव्या नोकऱ्या निर्माण होतील आणि त्यासुद्धा तातडीच्या गरजेच्या नसतील. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचे अध्यक्ष क्लाऊज श्लोफ यांनी ‘फोर्थ इंडस्ट्रियल रेव्होल्युशन’ या पुस्तकात मांडले आहे की, एकसारखे आणि साचेबद्ध काम असलेल्या ५२ टक्के ते ६९ टक्के नोकऱ्या जातील, ३७ टक्के कामांमध्ये बदल होईल आणि ९ टक्के नव्या नोकऱ्या निर्माण होतील. ही आकडेवारी नेमकी आणि काटेकोर नाही असं जरी समजलो, तरीही बहुतांश कामे संपतील हा अंदाज आपल्याला येतोच. ज्यांच्या कामात बदल होईल, ती किती दिवस टिकतील? कारण तंत्रज्ञानात सतत प्रगती होत राहणार आहे.

एखादा शेतकरी थोडीशी कौशल्ये शिकून ट्रॅक्टर चालवू शकेल, उदरनिर्वाहासाठी अधिक कौशल्ये शिकून ट्रकही चालवायला शिकेल; मात्र कुठल्याही यंत्राचे अत्याधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करणे त्याच्या आवाक्याबाहेरचे असेल.

थोडक्यात, उच्च तंत्रज्ञान न येणारा आणि त्यामुळे निरुपयोगी झालेला एक मोठा समूह अस्तित्वात येईल. प्रत्येक कारखान्यात किंवा कचेरीत तोचतोपणा आणि साचेबद्ध असलेली किती टक्के कामे असतात, हा प्रश्‍न स्वत:लाच विचारू या. यापुढे तोचतोपणा व साचेबद्ध असलेली कामे ए.आय. करेल. जेव्हा माणसे कामावर ठेवण्यापेक्षा ए.आय. किफायतशीर होईल, तेव्हा माणसाचे काम संपलेले असेल. नवनिर्मितीचा विचार करणारे, चौकटीबाहेरचा विचार करणारे विश्लेषक, इंजिनिअर्स आणि प्रोग्रामर्स यांचे महत्त्व वाढेल. एखाद्या विषयात स्पेशलायझेशन करण्यापेक्षा आंतरविद्या शाखांमध्ये रस असणाऱ्या मिश्र सांस्कृतिक क्षमतांना अधिक मागणी असेल. मात्र तंत्रज्ञानात सतत बदल होत असल्याने माणसाला स्वत:चे अस्तित्व टिकवण्यासाठी नवनवीन प्रशिक्षण सातत्याने घेऊन अद्ययावत राहणे गरजेचे बनेल आणि त्यातून प्रचंड मानसिक तणाव निरंतर राहील.

जेवढा वैविध्यपूर्ण माहितीचा साठा अधिक तेवढा ए.आय. प्रगत असेल. ए.आय.साठी वेगवेगळ्या प्रकारची अधिक माहिती उपयुक्त होत राहणारच. त्या माहितीचे विश्लेषण ए.आय. करेल. भावी काळात माहिती म्हणजे डाटाचे मोल सर्वाधिक राहील. डाटा हेच भांडवल ठरेल. म्हणूनच विविध प्रकारचा डाटा भरण्यासाठी स्पेशलायझेशनपेक्षा मिश्र सांस्कृतिक जाण असणे अधिक महत्त्वाचे ठरेल. या सगळ्यामध्ये महत्त्वाची आणि खरी मेख ही आहे की, अधिकाधिक डाटा भरणे म्हणजे पुढचे रोजगार बंद होणे होय. डाटा भरल्यावर मानवाचे काम संपेल. सुधारित प्रगत ए.आय. ते काम करू लागेल. निवृत्त झालेल्या माणसाच्या जागी ते काम करायला दुसरा माणूस नेमण्याची गरज राहणार नाही.

तंत्रज्ञानाचा परिणाम फक्त उद्योगधंद्यावर होणार नाही, तर शेतीतही होणार आहे. अमेरिकेत आयारोनॉक्स नावाची कंपनी सेन्सर्स वापरून संपूर्ण शेती करते. त्यांना ३० पट अधिक फायदा मिळतो. अमेरिकेत दोन टक्के जनता शेतीवर अवलंबून आहे, तर भारतात ५० टक्क्यांपेक्षा जास्त लोक शेतीवर अवलंबून आहेत. खते, रसायने वापरून आपण शेती करत असलो तरी अशा प्रकारचे तंत्रज्ञान इथं नसल्याने भरपूर रोजगार देणारे हे क्षेत्र आहे. कापूस वेचायचे काम करणारे रोबो तयार करण्याचे काम सुरू आहे. किफायतशीर रोबो बाजारात उपलब्ध झाल्यावर कापूस वेचणी करणाऱ्या शेतमजुरांचे भवितव्य काय असेल याचा आपल्याला विचार करावा लागेल.

पहिल्या तीन औद्योगिक क्रांत्यांमध्ये माणसापेक्षा वेगाने काम करणारी यंत्रे होती. संगणकासह विविध यंत्रे हे काम चोखपणे बजावत होती. आता ए.आय. माणसाच्या विविध कौशल्यांपेक्षा, निर्णयक्षमतेपेक्षा श्रेष्ठ ठरण्याची चिन्हे दिसत आहेत. माणसाच्या कार्यक्षमतेवर आधीच मात करून झाली होती, आता बुद्धीवरही मात होत आहे. निर्मिती, श्रम आणि उपभोग या मानवाच्या तीन भूमिकांवर स्वत:च्या तंत्रज्ञानाच्या साह्याने मानवानेच प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. यापुढे माणसाने काय करावे, हा प्रश्न आ वासून उभा राहणार आहे.

कामगारांची अकुशलता त्या-त्या काळातील तंत्रज्ञानानुसार ठरते. तंत्रज्ञानामुळे जे परिघाच्या बाहेर फेकले जातील, ते कितीही शिक्षित किंवा उच्चविद्याविभूषित असले तरी ते अकुशल कामगारच होणार. अस्तित्वातील बेरोजगार आणि अकुशल कामगार यांचे प्रश्न सोडवण्याचे काम चौथ्या औद्योगिक क्रांतीचे नाही. स्वयंचलित तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता इत्यादी आधुनिक तंत्रज्ञानाद्वारा बिनारोजगार उत्तम, सुबक, नेटकी व वेगवान वस्तुनिर्मिती आणि त्याच अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित विक्री व विपणन करणे हे आहे. फोर जी तंत्रज्ञानानंतर आता फाइव्ह जी तंत्रज्ञान येऊ घातले आहे. अ‍ॅपवर आधारित विक्री आणि सेवांचा विस्तार फोर जीच्या काळात झाला. फाइव्ह जीनंतर अजून मोठ्या प्रमाणावर बदल अपेक्षित आहेत. मात्र यासाठी निरंतर व मुबलक ऊर्जा आणि सक्षम-दणकट इंटरनेट गरजेचे होणार आहे. सध्या देशातील मोजकी शहरे सोडली तर लोडशेडिंग सर्वत्र आहे आणि ही स्थिती झटपट सुधारणे शक्य नाही. त्यामुळे समृद्धीची बेटे तयार होतील आणि त्या बेटांवर श्रीमंतीची अजून छोटी बेटे असतील. ही बेटे टिकवता यावीत म्हणून अख्खा देश राबेल. यातूनच पराकोटीची विषमता निर्माण होईल.

४.

गेल्या काही वर्षांत ‘जॉबलेस ग्रोथ’ हा वाक्प्रचार आपल्या कानांवरून अनेकदा गेलेला असेलच. ही ‘जॉबलेस ग्रोथ’ काय आहे, हे पुढील आकडेवारीवरून स्पष्ट होईल. सकल राष्ट्रीय उत्पादन म्हणजे जीडीपी. अधिक श्रम खर्च केल्याशिवाय अधिक उत्पादन कसे मिळणार, हा साधा तर्क असल्याने जेव्हा जीडीपी वाढतो तेव्हा रोजगारात वृद्धी होते हे गृहीत धरतात. जीडीपी तीन टक्के वाढतो, त्या वेळी बेरोजगारी एक टक्का कमी होते, असा सर्वसाधारण ठोकताळा आहे. भारताच्या आकडेवारीचे कोष्टक पुढीलप्रमाणे आहे :

ही आकडेवारी अजीम प्रेमजी विद्यापीठाच्या ‘सेंटर फॉर सस्टेनेबल एम्प्लॉयमेंट’ने सप्टेंबर २०१८ प्रकाशित केली आहे. खरं तर जीडीपी वाढीचे आणि रोजगारनिर्मितीचे दर एकमेकाला पूरक हवेत, मात्र या आकडेवारीत ते एकमेकांविरोधी आहेत. जीडीपी वाढत असताना रोजगारनिर्मिती घटत गेलेली आहे. ही तर ऑटोमेशनची सुरुवात आहे. या कामाला गती मिळाली की, ग्रोथचे वाटेकरी मोजकेच असतील आणि जॉबलेसचे तांडे आपल्याला सर्वत्र दिसतील. आजही पुणे, लातूर या ठिकाणी खेड्या-पाड्यांवरून आलेली हजारो तरुण मुले-मुली एमपीएससी आणि यूपीएससीत यशस्वी होण्यासाठी वर्षानुवर्षे अभ्यास करताना आढळतात. हा त्या जॉबलेस ग्रोथचाच ‘साईड इफेक्ट’ आहे.  

जसजसे तंत्रज्ञान बदलते, रोजगाराचे स्वरूप बदलते, त्याप्रमाणे शिक्षणव्यवस्थेतही बदल अपेक्षित असतात. बदलत्या स्थितीला अनुरूप अशी शिक्षणव्यवस्था घडवावी लागते. आतापर्यंत कुशल कामगारांचा पुरवठा इंजिनिअरिंग कॉलेजातील पदवीधरांमधून होत असे. मर्यादित कुशल किंवा अर्धकुशल कामगार हे जिल्हा पातळीवरील आयटीआयमधून तयार होत. आजघडीला ही सर्व प्रकारची कामे टिकून राहतील, याबद्दल आपण साशंक राहावे अशी स्थिती आहे.

अजीम प्रेमजी विद्यापीठाच्या ‘सेंटर फॉर सस्टेनेबल एम्प्लॉयमेंट’च्या दुसऱ्या अभ्यासात असे मांडले आहे की- एकंदर बेरोजगारांमध्ये शिक्षण आणि रोजगार यांचे प्रमाण व्यस्त आहे. बेरोजगारांमध्ये पदविका, पदवीधर आणि पदव्युत्तर मंडळींचे प्रमाण सर्वाधिक आहे. उच्च शिक्षितांमध्ये बेकारीचे प्रमाण जास्त असताना ग्रेट लर्निंग कंपनीच्या पाहणीनुसार डेटा सायन्स, मशीन लर्निंग आणि ए.आय. या क्षेत्रात आंतरराष्ट्रीय पातळीवर पन्नास हजार जागा प्रतिभा व कौशल्याअभावी रिक्त आहेत. नव्या तंत्रज्ञानासाठी निर्माण होणाऱ्या नव्या नोकऱ्यांना कोणती कौशल्ये लागतील? त्या कौशल्यशिक्षणाचा आपल्या अभ्यासक्रमात कसा अंतर्भाव करावा? कोणते नवे अभ्यासक्रम आखावेत? यासाठी राष्ट्रीय पातळीवर विचारमंथन झाल्याचे दिसत नाही. आपल्या देशात अक्षरशः गावोगावी इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत, मात्र भारतातल्या आयटी क्षेत्रात ए.आय.साठी काम करणारी माणसे मिळत नाहीत. याचा परिणाम एवढाच होईल की, नव्या तंत्रज्ञानातील अकुशल कामगारांचा निरुपयोगी समूहात जुनाट शिक्षण घेतलेल्या इंजिनिअरांचा आणि तंत्रज्ञांचाही समावेश होईल.

जागतिकीकरणानंतर अनेक परदेशी कंपन्यांनी भारतात उत्पादन सुरू केले. त्यांनी भारतात कारखान्यांच्या माध्यमातून गुंतवणूक केली. इथे त्यांना काही सवलती मिळाल्या. ही गुंतवणूक दीर्घ मुदतीची असते, कारण त्यांनी इथे येण्याची दोन मुख्य कारणे म्हणजे- स्वस्त मजूर आणि मोठी बाजारपेठ. मात्र जलद, बिनचूक उत्पादन ए.आय.तर्फे करता येऊ लागले, तर स्वस्त मजुरांची गरजच लागणार नाही. त्यामुळे दोन पर्याय दिसतात. एक तर कारखाने मूळ देशात घेऊन जाणे. (कोविड-१९ नंतर चीनमधून कारखाने मूळ देशात नेण्याची चर्चा सुरू झाली आहे.) किंवा, बाजारपेठेच्या मिषाने इथे राहिले तरीही ते बिनमजुरांचे कारखाने असतील. त्यातून रोजगारनिर्मिती अत्यल्प असेल. यापुढे वित्त बाजारात परदेशी गुंतवणूक अधिक होईल, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. वित्त बाजारातील गुंतवणूक ही अतिशय जोखमीची, अस्थिर आणि अधिक परतावा देणारी असते. चमकणाऱ्या विजेची उपमा या गुंतवणुकीला देता येईल. आपल्या वित्त बाजारात परदेशी गुंतवणूक यावी, आंतरराष्ट्रीय बाजारात पत राखली जावी यासाठी वित्त बाजार चांगला परतावा देणारा आणि चढा असावा लागतो. यातून महत्त्वाचा एक धोका असा उद्भवतो की, सरकार वित्त बाजार चढा राहावा म्हणून आंतरराष्ट्रीय वित्त गुंतवणूकदारांच्या सोयीचे निर्णय घेईल.  

५.

नोटाबंदी व पाठोपाठ जीएसटी लागू झाला. आपली कोलमडून पडलेली अर्थव्यवस्था अजूनही सावरलेली नाही. जीडीपीची मोजणी करताना असंघटित क्षेत्रातील उत्पादकता मोजली जाते का, याबद्दल साशंकता आहे. नोटाबंदीनंतर असंघटित क्षेत्रातील छोट्या उद्योगांचे कंबरडेच मोडले. ते उद्योग अजूनही नीट उभे राहिलेले नाहीत. बदलत्या पर्यावरणाचा शेतकऱ्यांना फटका बसला आहे. विकासाचा दर घसरणीला लागला होता. मालाचे उत्पादन सुरू होते, पण उठाव नव्हता. लोकांकडे खर्च करायला पैसा उरलेला नव्हता. विषमता वेगात वाढली होती.

मध्यंतरी डॉ.रघुराम राजन यांनी एका मुलाखतीत सांगितले की, ‘भांडवलशाहीने सर्वसामान्यांचा हात सोडला तर परिस्थिती कठीण होईल. कुठल्याही व्यवस्थेत एका मर्यादेनंतर विषमता वाढणे हे संपूर्ण व्यवस्थेसाठी घातक असते.’ डॉ.रघुराम राजन यांचा इशारा नेमके हेच सूचित करत होता. आज ग्राहकोपयोगी वस्तू बनविणाऱ्या कंपन्या आपले उत्पादन ग्राहकांनी विकत घ्यावे म्हणून कर्ज देत आहेत. जवळजवळ प्रत्येक ग्राहकोपयोगी वस्तू बनविणाऱ्या कंपनीने आपली फायनान्स कंपनी काढली आहे. म्हणजे विनोद असा आहे की, मी उत्पादन करायचे माल घेऊन आपल्याकडे यायचे आणि सांगायचे की, हे उत्पादन चांगले आहे. तुमच्या गरजेचे आहे. समजा तुला परवडत नसेल तर घाबरू नकोस, मी तुला कर्ज देतो ना. म्हणजे माझाच माल ग्राहकाने खरेदी करावा म्हणून मीच पैसे देतो. बाजारातील खरेदीची क्षमता मंद झाली असून मालाला उठाव नसल्याचे हे लक्षण आहे. प्रगत तंत्रज्ञानातून वस्तुवैपुल्य निर्माण होईल, पण ग्राहकाची खरेदीची क्षमता नसेल तर काही उपयोग नाही. तंत्रज्ञानाच्या प्रत्येक बदलाला सामावून घेत भांडवलशाहीने टिकून राहण्यासाठी कल्पक मार्ग काढले. जेव्हा तंत्रज्ञान मोकाट सुटते आणि स्पर्धात्मक वातावरणात त्याचा अंगीकार करावा लागतो, तेव्हा निर्माण केलेल्या मालासाठी मागणी कशी निर्माण करणार या प्रश्नाचे उत्तर चौथ्या औद्योगिक क्रांतीचे प्रवर्तक देऊ शकलेले नाहीत.

बाजाराचे आणि पर्यायाने समाजाचे चक्र सुरळीत चालण्यासाठी मागणी निर्माण करायला लागेल. जनतेच्या हाती पैसा द्यावा लागेल. ‘जॉबलेस ग्रोथ’च्या काळात जनतेच्या हाती पैसा देणे म्हणजे काय? २०१९च्या लोकसभा निवडणुकीवेळी यूबीआयची चर्चा पुढे आली. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी जाहीर केले की, सत्तेवर आलो तर यूबीआय देऊ. भाजप सत्तेवर आला आणि त्यांनी प्रथमच मर्यादित पातळीवर यूबीआय सुरू केले. आम्ही तुम्हाला रोजगार देऊ शकत नाही, तुमचे जीवनमान उंचावायला आम्ही अक्षम आहोत; पण आम्ही तुम्हाला हलाखीत बघू शकत नाही आणि ठारही मारू शकत नाही, म्हणून कृपया हे पैसे घ्या अन् मरेपर्यंत जगा- हा यूबीआयचा सोपा अर्थ आहे.

चौथी औद्योगिक क्रांती इथे अवतरल्यावर रोजगारनिर्मिती शून्याच्या आसपास राहील, अशी भीती व्यक्त होत आहे. मग हा गाडा चालवायला, कोंडी फोडायला यूबीआयशिवाय पर्याय नाही, असे तज्ज्ञांचे मत आहे. सरकारने सरसकट यूबीआय द्यावा की निवडक कुटुंबांना द्यावा, जीडीपीच्या किती प्रमाणात द्यावा, ही सगळी अर्थशास्त्रीय चर्चा करता येईल. मात्र यूबीआय घेणारा माणूस काय विचार करेल? म्हणजे माणसाच्या मनुष्यपणाला कधी अर्थ प्राप्त होतो? तो समाजात काही तरी योगदान करत असतो, त्याच्या श्रमातून काही तरी निर्मिती होत असते, त्याचा त्याला मोबदला मिळत असतो; या सगळ्या व्यवहारातून त्याच्या जीवनाला अर्थपूर्णता प्राप्त होते. त्याला आत्मसन्मान मिळतो. मात्र यूबीआयचा लाभार्थी म्हणजे ज्याचं समाजात काहीच योगदान नाही, त्याच्या श्रमाची-कौशल्याची समाजाला गरज नाही. त्याच्या अस्तित्वाचा अर्थ म्हणजे तो मरत नाही म्हणून जगतोय. लाभार्थी हा आत्मसन्मानशून्य बनणार. अशा व्यक्तीला रसरसून जगण्याची इच्छा होईल का? पूर्ण रिकाम्या वेळेत त्याला सर्जनात्मक काम करावेसे वाटेल का? त्याच्या आत्मसन्मानाची किंमत कवडीमोल असेल, तर तो विध्वंसक वृत्तीने वागण्याची शक्यता जास्त आहे.  

बीड जिल्ह्यातून जवळजवळ दीड लाख उसतोडणी कामगार दर वर्षी पश्चिम महाराष्ट्रात येतात. मोसमात उसतोडणी करतात, मोबदला घेतात आणि घरी परततात. ते मजूर आहेत आणि कायम गरीब अवस्थेतच आहेत. कष्टाने मिळविलेल्या पैशांचा आत्मसन्मान त्यांच्याकडे आहे. ही लाख-दीड लाख मजूरमंडळी चोर्‍या, दरोडे किंवा गुंडगिरी या मार्गाद्वारा अधिक कमाई करू शकतात. पण तसं करण्याचा विचारच त्यांच्या मनाला शिवत नाही, कारण त्यांचा आत्मसन्मान त्यांना ही कामे करू देत नाही. अगदी तळातल्या श्रमिकापासून सर्वांना आत्मसन्मान असतो. समाजात त्या-त्या पातळीवर याचा मान ठेवला गेला, तरच समाजाचं गाडं नीट चालतं. चौथ्या औद्योगिक क्रांतीतून आत्मसन्मान जपला जाईल, याची शाश्वती वाटत नाही.

चौथ्या औद्योगिक क्रांतीतून कोणकोणते तंत्रज्ञान जन्माला येईल, असा प्रश्न विचारलात तर- रस्त्यावर ड्रायव्हरशिवाय गाड्या धावतील, मोठमोठे थ्रीडी प्रिंटर पटापट घरे बांधतील... अशा अनेक सुरस, रंजक आणि दिपवून टाकणाऱ्या कहाण्या आपल्याला आढळून येतील. मात्र ‘वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’चे माजी अध्यक्ष आणि चौथ्या औद्योगिक क्रांतीचे जन्मदाते क्लाऊज श्लॉफ हे रोजगारनिर्मितीबाबत साशंक आहेत. कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीज आणि रोलँड बर्जर कन्सल्टंट यांनी मिळून भारतातील चौथ्या औद्योगिक क्रांतीसंदर्भात एक अहवाल तयार केला आहे. त्यामध्ये रोजगारनिर्मिती आणि पर्यावरणावरील परिणाम याबद्दल मांडणी नाही. देशात प्रवेश करणारे तंत्रज्ञान वाजत-गाजत येत नसते. कारखाने नवे तंत्रज्ञान आणतात, त्याचा कुठेही गाजावाजा होत नसतो. ते मीडियाला माहीतही नसते. फक्त अत्याधुनिक कारखाने आपली भरती हळूच बंद करून टाकतात. ‘आम्ही नोकऱ्या देत नाही’ हे कोणीही प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगत नाही. त्याची बातमी होत नाही. महाराष्ट्रातील मोठ्या उद्योगातील पाच वर्षांपूर्वी असलेली कामगारांची संख्या आणि आजची संख्या याची माहिती काढल्यास तफावत लगेच कळून येईल. यापासून शेतीउद्योग जास्त दूर नाही. थोडक्यात, आपल्याला भावी काळात काही सुखाचे दिवस येतील, हे विसरण्याची वेळ आलेली आहे. समाजात ढोबळमानाने दोन वर्ग राहतील. सर्जक, कल्पक आणि रचनाकार वर्ग- जो आपले उत्पन्नाचे साधन टिकवून ठेवण्यासाठी बदलत्या तंत्रज्ञानाशी सतत मिळते-जुळते घेत प्रचंड तणावग्रस्त अवस्थेत राहील.

दुसरा वर्ग राहील निरुपयोगींचा. म्हणजे- अशिक्षित, शेतमजूर, शहरातील अकुशल कामगार आणि त्यांच्याबरोबर असतील तंत्रज्ञानाने घरचा रस्ता दाखविलेले अनेक उच्च विद्याविभूषित, पदवीधर. अशा हताश, थकलेल्या तणावग्रस्तांची आणि निरुपयोगींची संख्या सातत्याने वाढविणारा समाज असेल. आज आपल्या जीवनाला साहित्य, संगीत, कला, क्रीडा, गप्पा, कहाण्या असे अनेकानेक पैलू आहेत. हे सगळे पैलू टिकून राहतील का? हे चित्र निराशाजनक वाटत असेल, पण अतिरेकी नाही. जगात या विषयावर अनेकांनी याहीपेक्षा जास्त लिहून ठेवले आहे.  

..................................................................................................................................................................

लवकरच प्रकाशित होत आहे...

प्रकाशनपूर्व नोंदणीसाठी क्लिक करा - 

https://www.booksnama.com/book/5201/Maay-Leki-Baap-Leki

..................................................................................................................................................................

६.

आपणच हे बदलू शकतो, हा आत्मविेशास आपल्यात का नाही? स्वातंत्र्यपूर्व काळात खादीसारखी कामे ही आदर्श बिझिनेस मॉडेल होती. खादीसोबत त्या काळात अनेक प्रयोग केले गेले. अगदी आजही मुंबईच्या लोकल स्टेशनवर मिळणारे ‘नीरा’ हे आरोग्यदायी पेय हजारो वंचितांना रोजगार मिळवून देते. त्या काळातील हे सर्व सर्जक, कल्पक आणि चौकटीबाहेरचे आविष्कार होते. याचा अर्थ तेच प्रयोग आंधळेपणाने आज करावेत, असा होत नाही. असे आविष्कार करण्याची विजीगिषा आपल्यात होती, हे आपण विसरलोय का? प्रत्येक देशातील माणसे, त्यांची कौशल्ये, लोकसंख्या, पर्यावरण, संस्कृती, समाजरचना सर्वस्वी वेगळी असते. प्रत्येकाची खास वैशिष्ट्ये आणि खास प्रश्‍नही असतात. इतरांपेक्षा भारत म्हणून आपले काही वेगळेपण असते. सर्वांनी सरसकट एकच यंत्रसंस्कृती मानली पाहिजे, असा आग्रह धरण्याची गरज नाही.

चौथ्या औद्योगिक क्रांतीचे नवे तंत्रज्ञान आपल्या जीवनशैलीशी-संस्कृतीशी जुळवून घेऊन आपल्या गरजांनुसार आपल्यासाठी उपयुक्त करून घेऊ शकतो का? आतापर्यंतच्या सगळ्या औद्योगिक क्रांत्या आपल्या जमिनीवर तयार झाल्या नाहीत, त्या लादल्या गेल्या किंवा आपण काळाबरोबर राहायचे म्हणून बळजबरीने स्वीकारल्या. त्यामुळे सखोल विचार न करता आपण प्रतिकृती तयार करण्यात धन्यता मानली. यातूनच समृद्धीची बेटे आणि बाकी मागास- असे चित्र तयार झाले. लोकशाही व्यवस्थेत सगळी कामे सरकारनेच करायची असल्याने विरोधी पक्ष किंवा पीडिताने सरकारकडे मागणी करणे आणि दबावाने ती मान्य करून घेणे, ही भूमिका सर्वमान्य झाली. सरकार पक्ष, विरोधी पक्ष व पीडित यांनी आपापली कार्ये ठरवून घेतली आणि या पद्धतीने देशाचा गाडा चालेल, यावर तिघांचेही एकमत झाले. त्याचा परिणाम असा झाला की, सर्जकता आणि चौकटीबाहेरचे विचार करणे विसरले गेले.

सर्जनात्मक नवनिर्मिती, श्रम आणि निर्माण होणाऱ्या साधनांच्या उपभोगातून आनंद घेणे याचबरोबर याचीही जाण हवी की- मी हे सर्व का करत आहे? आपल्या कृतीमागील मूल्ये कोणती? थोडक्यात, आपल्या जीवनाचे श्रेयस काय, यावरही मानवाने सातत्याने चिंतन केले आहे. या चिंतनातून भारतीय दर्शने असोत की भांडवलशाही किंवा मार्क्सवाद असो की गांधीवाद; असे परस्परविरोधी किंवा पूरक अनेक विचारप्रवाह निर्माण झाले. मात्र ‘श्रेयस निश्चित करून त्या दिशेने जाणाऱ्या समाजरचनेची मांडणी’ करणे हे या सर्व विचारपद्धतींमधील साम्य आहे. मानवाने विकसित केलेले तंत्रज्ञान मानवाला फक्त उपभोगापुरतेच सीमित करून ठेवणार आहे. त्याचा सर्जनाचा आणि निर्मितीचा आनंद लोप पावत जाणार आहे. उपभोगापुरता उरलेला मनुष्यप्राणी श्रेयसाचा विचार करू शकणार नाही आणि तंत्रज्ञानाच्या अफाट वेगाबरोबर जुळवून घेत रचनेला बदलत राहावे लागणार आहे.

सर्वांत महत्त्वाचा धोका हा आहे की, माणसाच्या मनुष्यत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण होईल आणि ‘श्रेयस व त्या दिशेने जाणारी समाजरचना’ ही मांडणीची पद्धत नष्ट होऊन तंत्रज्ञानासोबत फरफटत जाणारी समाजरचना तयार होत राहील. नजीकच्या काळातील हे आव्हान पूर्णपणे नवे आहे. उद्या मनुष्याचे मनुष्यत्व नक्की कशात आहे, या प्रश्‍नाचे उत्तर आपल्याला प्रथमच द्यावे लागणार आहे.

आपल्या देशातील कुठलाही प्रश्न धर्म आणि जातीशिवाय नसतो. या वेळीही धर्म आणि जातीच्या ताणतणावांमुळे नव्या आव्हानांतील व्यामिश्रता वाढणार आहे. या आव्हानांना समर्थपणे तोंड द्यायचे असेल तर, आजवर चालत आलेले मार्ग आपल्याला बदलावे लागतील आणि आपल्या विचारसरणींना थोडे बाजूला ठेवून स्वच्छ नजरेने त्यांना सामोरे जावे लागेल. पूर्णपणे चौकटीबाहेरचा विचार नव्याने करायला पीडितांशी तादात्म्य पावलेल्या कार्यकर्त्यांसोबत अर्थतज्ज्ञ, वैज्ञानिक, संस्कृती अभ्यासक, कलाकार, संगणकतज्ज्ञ यांसारख्या अनेकांना त्यात सामील व्हावे लागेल. या सर्वांच्या सखोल चर्चेतून आपल्या जमिनीवरील बहुसांस्कृतिक वैविध्याचा आणि सहिष्णुतेचा गाभा जपत, भावी काळाचा वेध घेऊन नव्या रचना उभ्या कराव्या लागतील.

(‘साधना’ साप्ताहिकाच्या ४ जुलै व ११ जुलैच्या अंकातून साभार)

..................................................................................................................................................................

विजय तांबे

vtambe@gmail.com

..................................................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

पुस्तक फक्त वाचण्यासाठी ही संकल्पनाच बदलली आहे? आता ते केवळ प्रदर्शन, दिखावा करण्यासाठी, अभिमानाने मिरवण्यासाठी आणि लोकांचे आणि माध्यमांचेही लक्ष स्वतःकडे वेधून घेण्यासाठी वापरण्यात येते!

सर्व जगाचीच प्रवृती, संस्कृती आता ‘पैसाक्रेंद्रित’ झाली आहे. तेथे ‘वाचकांचा वापर’ हा केवळ बुद्धिवंतांची गर्दी तेथे होते, हे दाखवण्यासाठी करण्यात येतो. त्याचबरोबर अनेक प्रेक्षकांकडून, प्रामुख्याने समाजमाध्यमांवर आपण किती मोठे आहोत, हे दाखवण्यासाठी करण्यात येतो. आता केवळ प्रदर्शन, दिखावा करण्यासाठी, अभिमानाने मिरवण्यासाठी आणि लोकांचे आणि माध्यमांचेही लक्ष स्वतःकडे वेधून घेण्यासाठी वापरण्यात येते.......

सरदार पटेल यांचा भव्य पुतळा उभारणार्‍या मोदींनी सोमनाथ मंदिराविषयी लेख लिहिण्याआधी त्याच्या जीर्णोद्धाराचा इतिहास माहीत करून घ्यायला हवा होता…

इतरांच्या धार्मिक संवेदनशीलतेला खोल जखमा करणे, हाच आपला मार्ग आहे, असे एखाद्या जनसमुदायाला वाटत असेल, तर ते देशावर भविष्यात येऊ घातलेल्या भयानक अरिष्टाचे दुश्चिन्ह आहे. धर्मश्रद्धेचे प्रश्न कायद्याच्या कक्षेत सोडवता येत नाहीत. देशातील विविध धर्मांतील लोकांच्या मनात द्वेष भावना वाढीस लागून देशात अराजक निर्माण होण्याची आणि देशाचे शतखंडित तुकडे होण्याची शक्यता वाढते, हे आपल्या केव्हा लक्षात येईल? .......

जेव्हा जेव्हा भाषेवर, राष्ट्रावर आणि संस्कृतीवर संकट येते, तेव्हा तेव्हा सामाजिक नेतृत्वाची आणि प्रसंगी राजकीय पुढाकाराची भूमिकासुद्धा साहित्यिकांनी उचललेली आहे!

जेव्हा जेव्हा भाषेवर, राष्ट्रावर आणि संस्कृतीवर संकट येते, तेव्हा तेव्हा सामाजिक नेतृत्वाची आणि प्रसंगी राजकीय पुढाकाराची भूमिकासुद्धा साहित्यिकांनी उचललेली आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनावेळी मोरारजी देसाईंनी आचार्य अत्रे यांना सत्तर दिवस तुरुंगात टाकले. तसेच एका वगनाट्य लेखनाच्या कारणावरून त्याच मोरारजीने आमच्या शाहीर अण्णाभाऊ साठेंना हद्दपार केले होते. त्यांनी तुरुंगवासही भोगला होता.......

कोकणासारख्या पिटुकल्या प्रदेशाचे झाले थोडेफार नुकसान, झाली काही माणसे व्याधीग्रस्त, मोडले काहींचे संसार, तर… विकासासाठी हे सहन करायलाच हवे!

इटलीतील त्या गावाप्रमाणे लोटे परशुरामचीही स्थिती होणार की काय, हे आता सांगता येणे कठीण. कदाचित होणारही नाही. आशेवर राहायला काय हरकत आहे? यातील इटलीचे नुकसान आणि भारताचा लाभ तेवढा सुजाण नागरिकांनी ध्यानी घ्यावा. त्या युरोपियन महासंघाची एक एजन्सी आहे - ‘युरोपियन केमिकल एजन्सी’. ती सुमारे दहा हजार फॉरेनर केमिकल्सवर बंदी लादण्याचा विचार करत आहे. तसे झाल्यास आपण अशी रसायने तयार करणारी आशियातील एक बलाढ्य शक्ती असू.......

पं. नेहरू आणि मोदी यांच्यातील अंतर हे ‘आयडिया ऑफ इंडिया’मधील आहे. आजचे भारतीय तरुण, बुद्धिजीवी-बुद्धिवादी आणि सजग नागरिक कोणत्या ‘आयडिया ऑफ इंडिया’चे वारसदार म्हणून स्वत:कडे पाहतात?

नेहरूंचा भारत आधुनिकतेकडे, विज्ञानाकडे, लोकशाहीकडे आणि विद्याशाखांच्या विकासाकडे जाणारा होता; तर मोदींचा भारत धार्मिक प्रतिमांभोवती केंद्रित, भावनिक भाषणांवर अवलंबून आणि प्राचीन गौरवाच्या काल्पनिक कथांमध्ये रमणारा आहे. राष्ट्राची शक्ती विज्ञान, शिक्षण, रोजगार, उद्योग, आणि तर्कसंगत विचारात असते. आणि म्हणूनच धार्मिक-ध्रुवीकरणावर आधारित राजकारण घातक असते.......