जॉर्ज फ्लॉइडच्या हत्येच्या निमित्ताने...
पडघम - विदेशनामा
अशोक राजवाडे
  • ‘ब्लॅक लाईव्ज मॅटर’ या चळवळीची काही छायाचित्रं
  • Sat , 04 July 2020
  • पडघम विदेशनामा जॉर्ज फ्लॉयड George Floyd अश्वेत Black man वंशवाद Racism

वर्णद्वेषाविरुद्ध अमेरिकेच्या समाजजीवनात अनेक आंदोलनं झाली असली; अनेक कायदे संमत झाले असले तरी वर्णद्वेषाच्या घटना तिथे पुन्हापुन्हा घडताना दिसतात. या देशावर आपलं वर्चस्व असलं पाहिजे आणि तिथे असलेले गोरेतर उपरे आहेत अशी भावना अनेक गोऱ्या अमेरिकन माणसांच्या डोक्यात असते. वास्तविक पाहता अमेरिकेतले मूळ रहिवासी वगळले तर गोऱ्यांसकट बाकीचे सगळेच तिथे उपरे आहेत. पण गोरे वंशवादी याकडे साफ दुर्लक्ष करतात. अशा विवेकहीन गोऱ्यांचे अतिरेकी गट अमेरिकेत आढळून येतात.

अमेरिकेतल्या मिनिसोटा राज्यातल्या मिनीआपोलिस शहरात २५ मे ला एका कृष्णवर्णियाची हत्या झाली. हत्या करणारा गोरा पोलीस अधिकारी होता. अगदी अनपेक्षित पद्धतीने ही हत्या झाली. जॉर्ज फ्लॉइड नावाचा एक कृष्णवर्णीय इसम सिगारेटी खरेदी करण्यासाठी तिथल्या एका दुकानात गेला; पैसे देताना त्याने वीस डॉलरची खोटी नोट दिली. दुकानातल्या एका नोकराने त्यावर पोलिसांना फोन केला. तिथे चार पोलीस अधिकारी आले आणि त्या इसमाला बेड्या ठोकण्याचा प्रयत्न करू लागले. पोलिसांच्या म्हणण्याप्रमाणे फ्लॉइडने बेड्या ठोकून घ्यायला विरोध केला. त्यावर त्यांतल्या डेरेक शोविन नावाच्या एका पोलीस अधिकाऱ्याने फ्लॉइडला जमिनीवर पाडलं; आपल्या गुडघ्याखाली त्याची मान दाबली. त्याबरोबर फ्लॉइड विव्हळू लागला आणि नंतर ‘मी गुदमरतो आहे’ (आय कॅनॉट ब्रीद) असं म्हणून ओरडू लागला; गयावया करू लागला. आजूबाजूला माणसं जमा झाली; पोलीस अधिकाऱ्याने आपला गुडघा जॉर्ज फ्लॉइडच्या मानेवरून बाजूला करावा, अशी विनवणी जमलेले लोक करू लागले. पण डेरेक शोविनने काही न ऐकता आपला गुडघा त्या माणसाच्या मानेवर तसाच दाबून ठेवला. सुमारे सहा मिनिटं हा प्रकार सुरू होता. हळूहळू फ्लॉइडचा आवाज बंद झाला; त्याचा श्वास थांबला आणि सुमारे नऊ मिनिटांनी त्याचा मृत्यू झाला.

दरम्यान हे सारं बघणाऱ्या एका व्यक्तीने या प्रकाराचं - एकूण नऊ मिनिटांचं - चित्रण केलं होतं. ते चित्रण थोड्याच वेळात समाजमाध्यमांत सर्वदूर पसरलं आणि पोलिसी क्रौर्याचा हा भीषण प्रकार साऱ्या दुनियेला पहायला मिळाला. या घटनेनंतर केलेल्या तपासात पोलिसांनी जेव्हा त्या दुकानाच्या सीसीटीव्हीचं चित्रण पाहिलं, तेव्हा फ्लॉइडने बेड्या ठोकून घ्यायला विरोध केला होता, असं कुठे त्यात दिसलं नाही. त्यामुळे लोक अधिकच चिडले.

या प्रकारानंतर घडलेल्या गोष्टी अमेरिकेतल्या जनतेत - त्यात विशेषतः कृष्णवर्णीयांमध्ये - चीड उत्पन्न करणाऱ्या होत्या. शोविन आणि इतरांना नोकऱ्यांतून काढून टाकण्यात आलं; पण कोणाला तातडीने अटक झाली नाही. जनक्षोभ उफाळून आल्यानंतर शोविनला अटक करण्यात आली. त्याच्यावर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला. शोविन बरोबरच्या तीन अधिकाऱ्यांवर या गुन्ह्याला मदत करण्यावरून गुन्हे दाखल करण्यात आले.

साक्षात शासनाचा भाग असलेल्या पोलीस खात्याकडून असा प्रकार घडलेला होता. त्यामुळे जनतेत संतापाची जी लाट उसळली, ती लवकर शमली नाही. कृष्णवर्णीयांच्या मनातला संताप उफाळत राहिला. अमेरिकेच्या अनेक शहरांतून निदर्शनं झाली. अशा निदर्शनांत काही ठिकाणी लाखो व्यक्तींनी भाग घेतला.

जुलै २०१४ मध्ये एरिक गार्नर नावाच्या कृष्णवर्णीय माणसावर असाच प्रसंग ओढवला होता. पोलिसांनी गार्नरला क्षुल्लक गुन्हा करण्यावरून पकडलं होतं. तेव्हाही गार्नरचा गळा एका पोलिसाने दाबला होता. ‘मी गुदमरतोय’ हेच शब्द गार्नरच्या तोंडी तेव्हा होते. या गुदमरण्याने गार्नरचं मरण ओढवलं होतं. दरम्यान ‘ब्लॅक लाईव्ज मॅटर’ (अर्थ : ‘काळ्यांच्या जीवनालासुद्धा काही अर्थ आहे’) या नावाची एक चळवळ अमेरिकेत आकार घेत होती. गार्नरच्या मरण्याने ही चळवळ अधिक फोफावली. अमेरिकेत अनेक ठिकाणी निदर्शनं झाली होती. याखेरीज आणखी काही ठिकाणी हत्या झाल्या; तसंच काही कृष्णवर्णीयांचे पोलीस कोठड्यांत मृत्यू झाले. त्यामुळे अमेरिकेच्या सुरक्षा यंत्रणा कृष्णवर्णीय व्यक्ती, गोरगरीब आणि तत्सम इतर अल्पमतातल्या (दुर्बळ) व्यक्तींवर जाणीवपूर्वक बळाचा वापर करत आहेत, असे पोलीसदलावर आरोप होऊ लागले. याविरुद्ध होणाऱ्या निषेधांनीसुद्धा अशा तऱ्हेच्या घटनांना काही आळा बसला नाही.

जॉर्ज फ्लॉइडच्या हत्येनंतर झालेल्या निदर्शनांविषयी सावध आणि सुजाण वक्तव्यं करण्याऐवजी निदर्शक ‘ठग’ असल्याचा उल्लेख अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्पनी केला. जॉर्ज फ्लॉइडच्या हत्येची घृणास्पद घटना अमेरिकेत घडली असली तरी तिच्याबद्दल अध्यक्ष ट्रम्प यांची प्रतिक्रिया एखाद्या देशाच्या प्रमुखाला न शोभणारी होती. अख्ख्या जगाने त्या व्हिडिओद्वारे या घटनेतील क्रौर्य पाहिलं होतं. त्याविषयी एखादं जुजबी आणि वरवरचं काहीतरी ते बोलले. त्यांची वक्तव्यं एखाद्या संवेदनशील नेत्यासारखी नव्हती. त्यांच्या बोलण्यात हळहळ किंवा त्यातल्या क्रौर्याबद्दल व्यथित झाल्याची भावना कुठे जाणवत नव्हती. ‘आपण अमेरिकेतली बेरोजगारी १३.५ टक्क्यांपर्यंत खाली आणली हे पाहून आकाशातून जॉर्ज फ्लॉइड अमेरिकन अर्थव्यवस्थेची तारीफ करत असेल’ असं हास्यास्पद विधान करून डोनाल्ड ट्रम्पनी पुन्हा एकदा आपल्या संवेदनाहीनतेचं जगाला दर्शन घडवलं.

जो बायडेन हे नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत डेमोक्रेटिक पक्षातर्फे ट्रम्प यांचे प्रतिस्पर्धी असतील. ट्रम्प यांच्या वक्तव्यावर त्यांनी तिखट प्रतिक्रिया दिली. ‘मी गुदमरतो आहे’ हे फ्लॉइडचे अखेरचे शब्द जगाने ऐकले आहेत. तेव्हा त्याच्या तोंडी दुसरे काहीतरी शब्द घालणं, हे निंदनीय आहे, असं जो बायडेन म्हणाले.

जॉर्ज फ्लॉइडच्या हत्येनंतर अमेरिकेत मोठ्या प्रमाणात निदर्शनं झाली. डोनाल्ड ट्रम्पनी फक्त त्यातल्या जाळपोळीवर बोट ठेवलं आणि भविष्यात लष्कराचा वापर करायलासुद्धा आपण मागेपुढे पाहणार नाही असा इशारा दिला. हे बोलणं अमेरिकेतल्या जनसंघटना आणि विरोधी पक्षातल्या सर्वांना खटकल्याशिवाय राहिलं नाही.

अशी एखादी घृणास्पद घटना आपल्या देशात घडली तर त्या वेळी राष्ट्रप्रमुख जनतेला एकत्र येण्याचं आवाहन करतो; देशात शांतता नांदायला हवी हे पाहतो; आणि गुन्हेगाराला शासन होईल असं म्हणून जनतेला आश्वस्त करणारी वक्तव्यं करतो. पण असा कोणताही प्रयत्न ट्रम्प यांच्या वक्तव्यांत दिसला नाही. उलट या घटनेचं निमित्त करून आपल्या स्वतःच्या हातातल्या सत्तेचा आणि आपल्या कर्तृत्वाचा डांगोरा पिटण्याचं काम ट्रम्पनी केलं. लष्कराचा वापर करून जनतेत आपण कशी जरब निर्माण करू शकतो, हे सांगण्यावर त्यांनी भर दिला. एका देशाचे प्रमुख म्हणून जबाबदारीने बोलण्याऐवजी डेमोक्रेटिक पक्षावर दोषारोप करण्यासाठी त्यांनी या प्रसंगाचा वापर केला. मिनीआपोलिस शहराचे महापौर जेकब फ्राय हे (पक्ष : डेमोक्रेटिक फार्मर लेबर) डावे असून ते दुर्बळ आहेत आणि त्यांनी जर वेळेवर तिथली परिस्थिती आटोक्यात आणली नाही तर आपल्याला नॅशनल गार्डना तिथे पाठवून परिस्थिती काबूत आणावी लागेल, असा इशारा त्यांनी दिला.

२०१६च्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांना विजय मिळवून देण्यामागे गोऱ्या वर्णाच्या व्यक्तींचा मोठा मतदारवर्ग होता. कृष्णवर्णीयांनी अमेरिकेतल्या आपल्या रोजगाराच्या संधी हिरावून घेतल्याची भावना या वर्गात होती. येत्या नोव्हेंबरमध्ये या वर्गाचा पाठिंबा पुन्हा एकदा ट्रम्प यांना मिळवायचा असल्याने अशा वर्णद्वेषाच्या घटनांबद्दल त्यांनी विशेष काही केलं नाही; उलट कृष्णवर्णीय जनतेत जरब निर्माण करणारी वक्तव्यं आपण केली तर गौरवर्णीयांची मतं पुन्हा आपल्याकडे येतील, असा ट्रम्प यांचा हिशोब असल्याची अशी टीका त्यांच्यावर झाली.

अमेरिकेला कृष्णवर्णीयांच्या हत्यांचा इतिहास आहे. असं घडल्यावर तिथे अनेक वेळा निदर्शनंही झाली आहेत. १९६८ साली मार्टिन ल्यूथर किंग या प्रसिद्ध अमेरिकन कृष्णवर्णीय नेत्याची एका माथेफिरूने हत्या केली होती. त्या वेळीही अमेरिकेत अशीच निदर्शनं झाली होती आणि दंगली उसळल्या होत्या. नंतर १९९२ मध्ये रॉडनी किंग नावाच्या एका व्यक्तीला काही पोलिसांनी मारहाण केली होती. त्यानंतर त्या पोलीस अधिकाऱ्यांवर खटले भरले गेले. ते पोलीस अधिकारी त्या खटल्यात निर्दोष म्हणून सुटले, तेव्हाही असाच प्रक्षोभ उसळला होता.

मग पूर्वीच्या काळी जे प्रक्षोभ झाले, त्यांत आणि आजच्या प्रक्षोभात साम्यस्थळं कोणती आणि फरक कोणता? पूर्वीच्या काळातल्या निदर्शनांत आणि आजही मुख्यत्वेकरून गोरेतरांचा आणि त्यात पुन्हा कृष्णवर्णीयांचा प्रमुख सहभाग होता / आहे हे यातलं साम्य आहे. ते समजण्यासारखं आहे. पण मुख्य फरक असा की, आज गोऱ्या वर्णाच्या व्यक्तींचासुद्धा यांतल्या निदर्शनांत वाढत्या प्रमाणात सहभाग आहे. किमान यातल्या वर्णभेदाविरुद्ध अनेक गौरवर्णीयांनीसुद्धा ठाम भूमिका घेतली.

अमेरिकेतल्या सर्व म्हणजे पन्नास राज्यांत याविरुद्ध किमान निदर्शनं तरी झाली हा एक विशेष इथे नोंदवण्यासारखा आहे. आणि या पन्नासपैकी काही राज्यं गोऱ्या लोकांच्या प्रभावाखाली आहेत, असं असूनही हे घडलं हे विशेष.

आणखी एक महत्त्वाची घटना अमेरिकेत गेल्या दशकात आकार घेते आहे. ती म्हणजे अमेरिकेत डाव्या विचारांच्या व्यक्तींचा काही प्रमाणात वाढलेला प्रभाव. बर्नी सँडर्स यांनी गेल्या दोन निवडणुकांत आपले स्वतःचे नव्या दमाचे पाठीराखे मैदानात आणले आहेत. पर्यावरणापासून ते वर्णभेदांपर्यंत अनेक मुद्द्यांवर त्यांनी स्पष्ट भूमिका घेतली आहे. त्यामुळे गोरेतर डाव्या मतदारांचा एक हिस्सा त्यांच्यामागे उभा आहे. त्यांच्या पाठीराख्यांत अनेक गोरेतर व्यक्ती आहेत. हा मतदारसमूह छोटा असला तरी दुर्लक्षणीय नाही. जॉर्ज फ्लॉइडच्या हत्येनंतर बर्नी सँडर्स यांनी आपली सर्वसमावेशक आणि डावी भूमिका स्पष्टपणे मांडली आहे.

दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जॉर्ज फ्लॉइडचा गळा पोलीस अधिकाऱ्याच्या गुडघ्याने दाबला जाण्याच्या घटनेचं एकूण नऊ मिनिटांचं संपूर्ण चित्रण केलं गेलं आणि ते अनेक माध्यमांतून जगाला कळलं. जे दिसत होतं ते भीषण होतं. आणखी एक गोष्ट म्हणजे बहुतांशी जग करोना लॉकडाउनच्या अवस्थेत असल्यामुळे जास्तीत जास्त लोक हे चित्रण पाहू शकले. ‘ ‘ब्लॅक लाइव्ज मॅटर’ या चळवळीला आमचा मुळात पाठिंबा होताच; पण टीव्हीच्या पडद्यावर जे क्रौर्य आम्हाला दिसलं त्यामुळे आम्ही घरात गप्प बसू शकलो नाही’ असं यातल्या काही तरुण निदर्शकांनी बीबीसीला सांगितलं.

खुद्द अमेरिकेत याविरुद्ध सर्वाधिक प्रमाणात निदर्शनं आणि दंगली घडल्या हे खरंच. पण एकूणच पश्चिमी जगात वर्णभेदाला आपला सक्त विरोध आहे असं अनेकांनी दाखवून दिलं. त्यामानाने इंग्लंडवगळता गौरवर्णीयांच्या सत्तेचा उदोउदो करणाऱ्या संघटनांनी विशेष काही केलं नाही. त्यांच्याजवळ काही मुद्दाच नव्हता. शिवाय अमेरिकेत बेरोजगारीचं प्रमाण १३.५ टक्के झाल्याने आणि करोनाच्या लॉकडाऊनमुळे रस्त्यावर येणाऱ्या कोणाला कामावर जाण्याची घाई नव्हती.

जॉर्ज फ्लॉइडच्या हत्येच्या संदर्भात एबीसी वृत्तसंस्था आणि इप्सॉस पोल यांनी मिळून अमेरिकेत एक जनमत चाचणी केली. तिच्यात आलेली टक्केवारी लक्षात घेण्यासारखी आहे. कायदा सुव्यवस्थेचे राखणदार आणि कृष्णवर्णीय या दोहोंच्यामध्ये काही व्यवस्थात्मक दरी आहे काय, हा प्रश्न त्यात नागरिकांना विचारण्यात आला. त्यामध्ये अशी दरी असल्याचं कबूल करणाऱ्यांची टक्केवारी अशी :

गोरे : ७० टक्के,

कृष्णवर्णीय : ९४ टक्के,

हिस्पॅनिक्स * : ७५ टक्के,

डेमोक्रेटिक पक्षाला पाठिंबा देणाऱ्या व्यक्ती : ९२ टक्के,

रिपब्लिकन पक्षाला पाठिंबा देणाऱ्या व्यक्ती : ५५ टक्के,

कोणत्याही पक्षाला न मानणाऱ्या स्वतंत्र व्यक्ती : ७१ टक्के

(*हिस्पॅनिक्स म्हणजे अमेरिका खंडाच्या दक्षिण आणि मध्य भागातून अमेरिकेत - म्हणजे यूएसएमध्ये - स्थलांतरित झालेले लोक. या भागांत मुख्यत्वेकरून स्पॅनिश भाषा प्रचलित आहे. त्यांच्यात बहुसंख्येने गोरेतर आहेत.)

हे पाहिल्यावर वर्णभेदाला किती व्यापक प्रमाणात विरोध होतो आहे हे लक्षात येतं. अगदी रिपब्लिकन पक्षाचे पाठीराखेसुद्धा बऱ्यापैकी प्रमाणात याला विरोध करताना दिसून आले आहेत. मिनीसोटा राज्यातल्या पोलीसदलात व्यापक आणि दूरगामी बदल करण्यात येतील, असं तिथल्या गव्हर्नरांनी जाहीर केलं आहे. भविष्यात असे प्रकार पुन्हा घडू नये म्हणून विशेष काळजी घेतली जाईल, असं त्यांनी म्हटलं आहे.

हे सारं अमेरिकेत घडलं, पण अमेरिकेबाहेर याच्यावर काय प्रतिक्रिया उमटल्या?

ओटावा ही कॅनडाची राजधानी. तिथले पंतप्रधान जस्टिन ट्रृडो यांनी तिथल्या ‘ब्लॅक लाइव्ज मॅटर’च्या निषेध सभेत स्वतः होऊन भाग घेतला; इतर अनेकांप्रमाणे एक गुडघा जमिनीवर टेकवून ते बसले आणि वर्णवर्चस्वाला आपला विरोध त्यांनी जाहीर केला. जमिनीवर एक गुडघा टेकवून बसण्याची ही नवी पोझ आता जगभर अशा निषेधाची सर्वमान्य देहबोली झाली आहे. अमेरिकेतही अनेक ठिकाणी वर्णवर्चस्वाला विरोध करण्यासाठी अशी पोझ निदर्शकांनी घेतली होती.

विविध देशातल्या निषेधांत तिथल्या वास्तवाचं प्रतिबिंब उमटणं अटळ होतं. सीरियातल्या इडलिब शहरातल्या एका चित्रकाराने बॉम्बिंग झालेल्या एका इमारतीवर जॉर्ज फ्लॉइडचं चित्र काढून वर्णवर्चस्वाला आपला विरोध प्रगट केला. त्यातून सीरियामधलं भयाण वास्तव समोर येत होतं. ब्राझीलमधल्या निदर्शनांना तिथले कट्टर उजवे अध्यक्ष जाइर बोल्सोनारो यांच्या विरोधाचं स्वरूप येणं अपरिहार्य होतं. कारण ब्राझीलमधल्या अॅमेझॉनच्या प्रचंड मोठ्या वर्षावनांत वास्तव्य करून राहणाऱ्या आदिम टोळ्यांविरुद्ध आणि इतर कृष्णवर्णीयांबद्दल जाइर बोल्सोनारोंना वाटणारा तिरस्कार त्यांच्या वक्तव्यांतून आणि कृतीतून सतत डोकावत असतो.

ब्रिटनमध्ये काही ठिकाणी गुलामांचा व्यापार करणारांचे पुतळे आहेत. या वेळच्या निदर्शनांत ब्रिस्टॉलमध्ये एडवर्ड कोल्स्टन नावाच्या एका व्यापाऱ्याचा पुतळा उखडून निदर्शकांनी समुद्राच्या पाण्यात टाकला. सदर एडवर्ड कोल्स्टनने १६७२ ते १६८९ या काळात हजारो कृष्णवर्णीय गुलामांचा व्यापार करून पैसे कमावले होते. कृष्णवर्णीयांच्या मोर्चानंतर तिथल्या चर्चिल यांच्या पुतळ्याखाली कुणीतरी ‘तो वर्णवर्चस्ववादी होता’ अशा अर्थाचा मजकूर लिहिला होता. गोऱ्या ‘राष्ट्रवादी’ मंडळींना हे फारच झोंबलं. चर्चिल आणि इतर ‘राष्ट्रभक्त महानायकां’च्या पुतळ्यांची होणारी विटंबना त्यांना पाहवली नाही. त्यांनी अशा राष्ट्रीय स्मारकाचं संरक्षण करण्यासाठी पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्या निवासस्थानासमोर एक प्रतिमोर्चा काढला. त्यात ‘इंग्लंड, इंग्लंड’ अशा घोषणा ते देत होते. गोरे निदर्शक आणि पोलीस यांच्यात चकमकी झाल्या. काही ठिकाणी पोलिसांना लाठीमार करावा लागला.

हाँगकाँगमध्ये चीनच्या वर्चस्वाविरुद्ध निदर्शनं सुरू आहेत. तिथे निदर्शक अमेरिकन वकिलातीसमोर जमले आणि त्यांनी ‘ब्लॅक लाईव्ज मॅटर’ चळवळीचे फलक हातात घेऊन घोषणा दिल्या.

ऑस्ट्रेलियाला एक वेगळाच इतिहास आहे. तिथल्या मूळनिवासी जमातींनी ब्रिटीश साम्राज्यवाद्यांकडून बराच काही त्रास सोसला होता. त्यात हिंसाचारदेखील होता. त्यामुळे तिथे वर्णद्वेषाविरुद्ध झालेल्या निदर्शनांत ऑस्ट्रेलियामधल्या वर्णद्वेषाचा मुद्दा येणं अपरिहार्य होतं.

विविध देशांतल्या प्रचलित राजवटींनी जॉर्ज फ्लॉइडच्या संदर्भात आपल्या भूमिका स्पष्ट केल्या. बऱ्याच जणांनी ‘आपल्याकडे वर्णभेदाला थारा नाही’ असं म्हणून आनुषंगिक हिंसाचार सहन केला जाणार नाही असा इशारा दिला.

आता या सगळ्या गदारोळात आपण भारतीय कुठे आहोत?

अमेरिकेत राहणाऱ्या काही भारतीयांनी तिथे आपले निषेध नोंदवले असले तरी त्यांचं अस्तित्व सामूहिक पातळीवर कुठे जाणवण्याजोगं दिसलं नाही.

मोदी आणि ट्रम्प यांच्यात दूरध्वनीवर तीन जूनला जे संभाषण झालं, त्यात मुख्यतः भारत आणि चीन यांच्यातल्या आताच्या तणावाचा उल्लेख आहे. अमेरिकेत वर्णभेद-विरोधकांतल्या वाढत्या अस्वस्थतेचा तिथे जाता-जाता केलेला उल्लेख आहे. मोदींनी वर्णभेदाच्या मुद्द्याला त्यापेक्षा अधिक महत्त्व दिलं नाही. वर्णवर्चस्वाला आपला ठाम विरोध आहे, असं कोणतंही विधान यात दिसलं नाही, हे लक्षात ठेवण्यासारखं आहे.

भारतात असलेले वंशभेदाचे आविष्कार आपल्याला परिचित आहेत. त्यांच्या गुंतागुंतीत जाणं इथे अस्थायी ठरेल. एकीकडे हिंदू समाजातल्या जातीभेदांचा आविष्कार आपल्याला माहीत आहे. त्याविषयी एका वेगळ्या पद्धतीचं नवं राजकारण इथे सुरू आहे. बुद्ध आणि आंबेडकरांचा वापर करून दलितांना जवळ करायचं आणि मुस्लिमांना दूर लोटायचं असा हा ‘समरसते’चा नवा फंडा आहे. पण स्थानिक पातळीवर वेगळं दृश्य दिसतं. दलितांना त्रास देण्याच्या घटनांमागे अनेकदा संघपरिवारातल्या व्यक्ती असतात अशीही दृश्यं दिसतात. धर्मासारख्या जन्माधारित गोष्टीच्या आधारे माणसांत भेदाभेद करणारी व्यवस्था अधिक बळकट करणं हा आपल्या आजच्या सत्ताधीशांच्या व्यवस्थेचा स्थायीभाव आहे. अमेरिकेतल्या वर्णवर्चस्वाच्या विरोधात बोलल्यामुळे त्यांची गैरसोय होते - कारण लगेच देशाच्या आत चाललेल्या भेदाभेदाच्या राजनीतीबद्दल गैरसोयीचे प्रश्न विचारले जातील ही त्यांना भीती आहे - त्यामुळे वर्णवर्चस्वाविरुद्ध अमेरिकेत चाललेल्या लढ्यांकडे सरळसरळ दुर्लक्ष करण्याचा मार्ग आपल्या शासकांनी स्वीकारला आहे.

जगातल्या विविध देशांतल्या संघटनांत दोन प्रकार स्थूलमानाने दिसतात.

एकीकडे काही संघटना जन्मजात भेदांवर आधारित राजनीतीचा अवलंब करतात. हे भेद वापरून त्यातल्या एकाची बाजू घ्यायची; त्या गटाला काही विशेष अधिकार आहेत असं मानून त्यांना उच्च स्थानी बसवायचं आणि दुसरे गट त्यामानाने दुय्यम स्थानावर आहेत, असं मानायचं अशा पद्धतीने त्यांचं अस्मितेचं राजकारण चालतं.

दुसरीकडे सगळ्या माणसांना समान अधिकार असतात असं मानणाऱ्या, सर्वसमावेशक अशा संघटना किंवा पक्ष जगातल्या प्रत्येक देशात असतात. जातीभेद, धर्मभेद, लिंगभेद, भाषाभेद अशा गोष्टींना तिथे वाव नसतो. पहिल्या प्रकारचे लढे स्थूलमानाने उजव्या शक्ती देत असतात, तर दुसऱ्या प्रकारचे लढे डाव्या संघटना देतात. अर्थात हे फरक स्थूल आहेत. प्रत्यक्षात राजकीय वास्तव अधिक गुंतागुंतीचं असतं. पण एखाद्या प्रश्नाबाबत आपली भूमिका ठरवण्यासाठी हे भेद समजणं महत्त्वाचं आहे. कारण त्या दोन प्रकारांतून वेगळ्या आणि विरोधी मूल्यव्यवस्था सूचित होत असतात.

ताजा कलम : हा लेख लिहीत असताना पुन्हा एकदा अमेरिकेत निदर्शनांची नवी लाट आली आहे. कृष्णवर्णीयांपैकी दोन तृतीयपंथीय व्यक्तींच्या हत्या चोवीस तासांच्या आत अमेरिकेत झाल्या. समाजातल्या पूर्वग्रहांमुळे हत्येला बळी पडण्याची शक्यता तृतीयपंथीयांमध्ये इतरांपेक्षा नेहमी अधिक असते. अशा व्यक्तींच्या हक्क-संरक्षणासाठी ओबामांच्या काळात केलेले उपाय हे ट्रम्प यांनी पुन्हा काढून टाकून घड्याळाचे काटे उलटे फिरवले आहेत. त्यामुळे अशा व्यक्तींचे समूह पुन्हा आपल्या हक्कांची मागणी करत आहेत. ‘ब्लॅक लाइव्ज मॅटर’ या घोषणेऐवजी ‘ऑल ब्लॅक लाइव्ज मॅटर’ ही आताच्या नव्या निदर्शनांतली घोषणा आहे. प्रचलित चौकटीत न बसणाऱ्या अनेक समूहांना आपण कोणता न्याय देणार आहोत, असा प्रश्न सगळ्या जगभर या निमित्ताने पुन्हा विचारला जातो आहे. तृतीयपंथीय हा स्त्री आणि पुरुष या दोन कोटींच्या (म्हणजे कॅटेगरींच्या) बाहेर असणारा मानवसमूह आहे. आणि त्यातही कृष्णवर्णीय म्हणजे वाईट अवस्था. आपल्याकडे तृतीयपंथी वा तत्सम इतर समूहांचा मुळात जगण्याचाच प्रश्न भीषण आहे. या वर्गाला निव्वळ पूर्वग्रहांमुळे संधी उपलब्ध नाहीत. मग अशा सगळ्यांना सामावून घेणारा विचार आपण मानतो की, आपल्या पूर्वग्रहांवर आधारित जळमटं तशीच डोक्यात बाळगून अशा माणसांना त्रासाला सामोरं जायला लावतो असा प्रश्न इथे आहे. हा प्रश्न जसा मानवी मूल्यांचा आहे, तसाच तो विचारप्रणालींचाही आहे. त्यांच्या सोडवणुकीतूनच आपलं राजकारण सिद्ध होत असतं.

(‘अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र’च्या जुलै २०२०च्या अंकातून साभार)

..................................................................................................................................................................

लेखक अशोक राजवाडे आंतरराष्ट्रीय राजकारणाचे अभ्यासक आहेत.

ashokrajwade@gmail.com

..................................................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

Post Comment

Vivek Date

Sun , 12 July 2020

I live in the USA and completely agree with the analysis in this article. We Indian Americans should be ever grateful to Martin Luther King and his Civil Rights Movement for opening the doors of USA for Indians who were prohibited until then. Unfortunately the Indian Americans are one of the worst racist group in the USA who routinely refer to the African Americans as 'kallu' they do not care to read and understand the US history of slavery and brutal torture of hapless poor who have been denied any opportunity for better life and are condemned to poverty, The current uprising was overdue and frustrations of Covid 19 are expressed in protest in which poor white, Asians, Latinos have joined in large numbers.


Gamma Pailvan

Tue , 07 July 2020

अशोक राजवाडे,
तुम्ही कधी BoBV ही संज्ञा ऐकलेली दिसंत नाही. BoBV म्हणजे Black on Black Violence. तुम्ही ज्या BLM ला वर्णभेदविरोधी म्हणता, ती संघटना गुन्हेगारांना आश्रय देणारा अड्डा आहे. थोडीफार सज्जन लोकं असतीलही त्यांत, पण ती केवळ दाखवण्यापुरती आहेत.
४ जुलैला अमेरिकेचा स्वातंत्र्यदिन असतो. त्या सप्ताहात दरवर्षी काळू एरियात प्रचंड हिंसाचार होतो. काळूंच काळूंना ठार मारतात. BLM ने कधीतरी याविरुद्ध आवाज उठवला आहे काय? या वर्षी ४ जुलैच्या सुट्ट्यांमध्ये शिकागोत ७७ गोळीबार झाले त्यापैकी १४ मरण पावले. त्यात काही निष्पाप बालकंही आहेत. या सर्व हत्या काळू लोकांनी केल्यात, हे तुम्हाला माहीत आहे का?
अमेरिकी जनता असल्या थोतांडाच्या आरपार बघायला शिकलीये. तुम्ही कधी शिकणार?
आपला नम्र,
-गामा पैलवान


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा