या अमानुष, माणुसकीला कलंक लावणाऱ्या घटनांचा जाहीर निषेध. गुन्हेगारांना कायद्यानुसार कठोर शासन झालेच पाहिजे.
पडघम - राज्यकारण
एक निवेदन
  • अरविंद बनसोड आणि विराज जगताप
  • Mon , 15 June 2020
  • पडघम राज्यकारण अरविंद बनसोड Arvind Bansod विराज जगताप Viraj Jagtap बौद्ध Baudha मराठा Maratha सोशल मीडिया Social Media

गेल्या चार-पाच दिवसांत महाराष्ट्राच्या प्रगतीशील समजल्या गेलेल्या परंपरेला काळिमा फासणाऱ्या दोन घटना घडल्या. नागपूर जिल्ह्याच्या नारखेड तालुक्यातील अरविंद बनसोड या बौद्ध युवकाची राजकीय-जातीय वैमनस्यातून हत्या करण्यात आली. त्याचप्रमाणे पुण्याच्या पिंपरी-चिंचवड भागातील पिंपळे-सौदागर गावातील विराज जगताप या २० वर्षे वयाच्या बौद्ध युवकाची मराठा मुलीवरील प्रेम प्रकरणातून निर्घृण हत्या करण्यात आली. या दोन्ही अमानुष, माणुसकीला कलंक लावणाऱ्या घटनांचा आम्ही जाहीर निषेध करत आहोत. या दोन्ही निर्घृण हत्यांना जबाबदार असलेल्या गुन्हेगारांना कायद्यानुसार कठोर शासन झालेच पाहिजे, अशी आम्ही महाराष्ट्र शासनाकडे मागणी करत आहोत.

सोशल मीडियावरील दोन्ही समाजाच्या प्रतिक्रिया अत्यंत प्रक्षुब्ध व स्फोटक असल्याचे दिसून येते. त्या अधिक प्रक्षुब्ध करून राज्यात फार मोठ्या प्रमाणावर सामाजिक-राजकीय अस्थिरता निर्माण करण्याचा काही समाजविरोधक हितसंबंधी शक्ती प्रयत्न करत आहेत. त्यांना कोणत्याही परिस्थितीत यश येणार नाही आणि राज्यात अस्थिरता निर्माण होणार नाही, हे पाहणे आवश्यक आहे. याची जबाबदारी दलितांवर असली, तरी बहुसंख्याक असलेल्या मराठा समाजावर ती अधिक मोठी आहे. दोन्ही समाजात कष्टकरी वर्ग प्रचंड संख्येने आहे. दलित समाजाने ‘जशास तसे’ उत्तर देण्याच्या भूमिकेत असणे हितावह नाही, तसेच मराठा समाजाने भ्रामक सामाजिक प्रतिष्ठा जोपासणे अयोग्य आहे. सामाजिक अभिसरण व विचारांची देवाणघेवाण यातूनच सामाजिक प्रगती व स्थैर्य साध्य होते, असा आमचा दृढ विश्वास आहे.

छ. शिवाजीमहाराजांच्या समतावादी विचारांचा फार मोठा वारसा महाराष्ट्राला लाभलेला आहे. म. जोतीराव फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राजर्षी शाहू यांनी सामाजिक सुधारणांसाठी केलेल्या अथक प्रयत्नांचा परिणाम म्हणून गेल्या काही वर्षांत दोन्ही समाजात एक मोठा प्रगतीशील वर्ग निर्माण झाला आहे. त्यामुळे सामाजिक अभिसरण व विचारांची प्रक्रिया अधिक गतिमान करण्यासाठी सतत प्रयत्न करणे, ही या प्रगतीशील वर्गाची फार मोठी जबाबदारी आहे आणि त्यांनी ती पार पाडलीच पाहिजे. त्याचप्रमाणे, अशा गंभीर सामाजिकदृष्ट्या संवेदनशील घटनांबाबत सोशल मीडियातून व्यक्त होताना प्रत्येकाने अतिशय जबाबदारीचे भान ठेवणे अपेक्षित आहे.

- पी. बी. सावंत, भालचंद्र मुणगेकर, एन. डी. पाटील, बाबा आढाव, प्रेमानंद गज्वी, जयसिंगराव पवार, प्रताप आसबे, प्रवीण गायकवाड, प्रज्ञा दया पवार, श्रीमंत कोकाटे, जयंत पवार, मधु कांबळे, सुभाष लोमटे, मधु मोहिते

..................................................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.      

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा