करोनाकाळात खरं तर गावातलं काहीच थांबलेलं नाही. तरीपण गावाच्या जगण्याचं ‘लॉकडाऊन’ झालं हे मात्र निश्चित.
पडघम - राज्यकारण
हंसराज जाधव
  • प्रातिनिधिक चित्र
  • Tue , 02 June 2020
  • पडघम राज्यकारण करोना विषाणू Corona virus करोना-१९ Corona-19 करोना व्हायरस Coronavirus लॉकडाउन Lockdown

खरं तर गेल्या दहा वर्षांत दहा दिवसांपेक्षा जास्त दिवस गावाकडे राहण्याचा योग आला नाही किंवा रहावंसं वाटलं नाही. करोनानं मात्र ते साधलंय. भर उन्हाळ्या गाव गोड लागतोय, हा करोनाचा महिमा आणखी काय? या काळात कुलर, टीव्ही, फ्रीज, वाचन असलं काहीच नसताना गाव समजून घेणं महत्त्वाचं ठरलं.

अफवांचं पीक आणि गैरसमजाचं तण

गावामध्ये करोनाबाबतचे अनेक गैरसमज पसरलेत. अफवांचे पीक माजवण्यास खेड्याची भूमी अगदीच सुपीक. या पिकांत गैरसमजाचे तण तर जोमात वाढते. करोनाची लक्षणं काय? तो कशामुळे होतो? दोन माणसांतलं अंतर किती? या कुठल्याच गोष्टीची नीट माहिती न घेता केवळ ऐकीव आणि व्हॉट्सअ‍ॅपवरून फिरणाऱ्या माहितीच्या आधारावर गावातल्या लोकांचे व्यवहार चाललेत. ना कुणाकडे मास्क, ना सॅनिटाझर! आता प्रात:विधीसाठी बाहेर जाणाऱ्यांचं प्रमाण अत्यल्प झालं असलं तरी शौचाहून आल्यावर साबणानं हात धुणाऱ्यांचं प्रमाण पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त नाही. विशेषत: महिलांमधून हा समज दुर्दैवानं वाढला नाही. ही मंडळी संसर्ग होऊ नये म्हणून वारंवार साबणानं हात धुतील ही अपेक्षाच भ्रामक आहे.

‘फलान्या गावात करोनाचा पेशेंट आला अन् बिस्तान्याला करोना झाला’ या चर्चेचा तर अगदी सुळसुळाट झालाय. माणसामाणसांतलं अंतर तीन फुटाचं की पाच फुटाचं? अमुक जिल्हा ग्रीनमध्ये आहे की ऑरेंज झोनमध्ये? उन्हाच्या येळंला दुकानाजवळ बसून पत्ते खेळत सर्रासपणे केल्या जाणाऱ्या या चर्चा. शहरातून विशेषत: पुण्या-औरंगाबादहून आलेल्यांकडे बघण्याची नजरच बदलून गेली. कुणीही आला तरी ‘करोनाचा पेशेंट आला… करोना आला… हातपाय कसे बारीक झालेत. डोकं मोठं झालंय!’ अशा अफवा पसरवून येणाऱ्याला तंग करून सोडलं जातंय. त्या घरापासून जाणं टाळलं जावू लागलं. घरापासून जाताना बाया तोंडाला पदर लावून जाऊ लागल्या. संबंधातले लोकंही घरी येण्यास टाळू लागले.

बाहेरच्यांविषयी आधी आपुलकी, आता उपेक्षा!

गावातून शिकूनसवरून नोकरी लागलेल्या, शहरात स्थायिक झालेल्या भुमिपुत्रांना गावात आल्यावर सन्मान मिळायचा. आपुलकीने विचारपूस केली जायची. ‘आपला माणूस’ मोठा झाल्याचा अभिमान वाटायचा. नोकरदारानं ‘काय चल्लंय जिज्या, दादा?’ असं सहज जरी विचारलं तरी अगदी सुरुवातीच्या काळात तरी ‘आमचं काय चलनार बाबा शेतकऱ्याचं! तुमची मज्या हाय कर्मचाऱ्याची… म्हयन्याला खळं!’ असं म्हणत नोकरदाराची तारीफ केली जायची. त्यात ना आकस होता, ना पोटदुखी; प्रेम होतं, अभिमान होता.

करोनानं चार-दोन महिन्यांकरता का होईना, पण हे सारं बिघडवून टाकलं. शहरातला वाढता धोका पाहून नोकरदार, कामगार, मजूर गावाकडे निघाले, पण गावांनी त्यांना नाकारलं. काही गावांनी प्रवेशबंदी असल्याचे बोर्ड गावाच्या वेशीवर लावले. प्रशासनाची परवानगी घेऊन कुणी आलंच, तर त्या घरांना वाळीत टाकलं गावानं. लोक आपल्याच गावात परके झाले. आपण गावात जायचं अन् गावानं नाक मुरडायचं ही भीती लक्षात घेऊन अनेकांनी गावी जायचं टाळलं. गाववाल्यांची झंझट नको म्हणून घरच्यांनीही त्यांना यायला विरोध केला.

गावचं राजकारण

गावातली कोणतीही गोष्ट राजकारणाशिवाय संपत नाही. करोना तरी त्यातून कसा सुटेल? गावात कोणाला घ्यायचं नि कोणाला नाही याच्यावरूनही राजकारण झालं. गोरगरिबांना शेतात ठेवलं. खमक्यांनी आडमुठेपणा घेत ‘आम्ही आमच्या घरी आलोय. तुम्ही तुमच्या घरी बसा’, असं विरोध करणाऱ्यांना बजावलं.

मुसलमानांनीच करोना आणल्याचा पक्का समज

मरकजवाल्या मुसलमानांनीच करोना भारतात आणल्याचा पक्का समज खेड्यापाड्यांतून पसरलाय. त्यामुळे गावात असणाऱ्या एखाद-दुसऱ्या मुसलमानाच्या घराला टोमणे ऐकावे लागतात. रोजच्या बसण्या-उठण्यातल्या मुसलमानाला ‘तुमच्याच लोकांनी आणलंय हे. जवळ येऊ देऊ नका कडूच्याला!’ हे गमतीनंच का होईना पण त्यांना ऐकावं लागतंय.

कष्टात ना सूट, ना कसूर

नोकरदारांना करोनानं कामात मोठी सूट दिली. पोलीस, डॉक्टर्स यांचा अपवाद वगळला तर बाकी बहुतेकांचे ‘वर्क अ‍ॅट होम’ सुरू आहे. काहींचे ‘वर्क फॉर होम’ सुरू आहे. शहरातल्यांचे घरात बसून कंटाळल्याचे गमतीदार व्हिडिओज व्हायरल होतायत. लॉकडाऊन काळातले पांढरपेशाचे मनोरंजनाचे उपक्रम आपलं मनोरंजन करतायत.

शेतकऱ्यांना मात्र ना ‘वर्क अ‍ॅट होम’ आहे, ना कष्टात सूट. त्यांचे कोणतेच व्यवहार बंद नाहीत. कामाचा अगदी सपाटा सुरू आहे. ‘उन्हाळपाळ्या’ घालून वावरं तयार करण्याची लगबग सुरू आहे. कुणाचे हळदीचे ढोल करणं सुरू आहे. कुणाचं लाईटच्या रातपाळीला ऊसाला पाणी देणं सुरू आहे. कुणीच कामात कसूर सोडत नाहीयत. त्यांचं नेहमीप्रमाणं सुरू आहे.

शेतमालाचे भाव पडले, महागाई कुठल्या कुठे!

शेतकऱ्याची मरमर आहे तशीच सुरू आहे. पण मालाचे भाव मात्र कमालीचे पडले. सोयाबीन ४५०० रुपयांवरून ३८००वर आली, हळद ७००० रुपयांवरून ५५००वर, केळी १६०० रुपयांवरून ८००वर आलीय.

एकीकडे शेतमालाचे भाव पडलेले असताना महागाई मात्र प्रचंड वाढलीय. जीवनावश्यक वस्तूंपेक्षाही व्यसनाच्या वस्तूंचे भाव गावकऱ्यांच्या चिंतेचा विषय झालाय. ५ रुपयांचा सूर्यछाप तंबाखू तोटा ३५ रुपयाला मिळू लागलाय. ५ रुपयाची गुटखा पुडी १५ रुपये देऊनही मिळेना. रोज पावशेरी मारणारे परेशान आहेत. २५ रुपयाची देशी क्वार्टर १०० रुपयाला झाली. एकमेकांना तंबाखू देण्याघेण्यातला ‘सुसंस्कृतपणा’ कधीच लयास गेलाय. रोगाच्या रूपाने शेतकऱ्याचा एक नवा शत्रू उभा राहिलाय. त्याचा राग त्याने कुणावर काढावा?

धंदेवाले पोरं परेशान

गावात पानटपरी चालवणारे, टमटम चालवणारे, आठवडी बाजारात शेतातलं माळवं नेणारे, दूध नेणारे, जिल्ह्याच्या ठिकाणी कपड्याच्या दुकानात, सराफा दुकानात कामाला जाणारे घरीच बसलेत दोन अडीच महिन्यांपासून. त्यांना आता शेतातलं कामही नको वाटतंय. ते सारेच परेशान आहेत.

सुशिक्षित घाबरलेले अन् अडाणी बिनधास्त

थोडेफार शिकून गावातच असलेले, गावचं राजकारण करणारे, रोज तालुका, जिल्ह्याला जाण्याची सवय असणारे करोनामुळे प्रचंड धास्तावलेले दिसतायत. गेल्या दोन महिन्यांपासून घराचा दरवाजा कायमच लावून ठेवत शेजारपाजारच्या बायकांशी बोलणाऱ्या बायकोच्या हातची भाकर न खाणारेही काहीजण गावात आहेत. करोनाच्या भीतीनं ते एकलकोंडे बनलेत.

अगदी याउलट अडाणी मात्र बिनधास्त आहेत. ‘अं… आपल्याकड थोडंच येतंय ते! कवाबी एकदाच जायाचंच हाय…’ असं म्हणत त्यांचं जगणं आहे तसंच सुरू आहे. ‘म्हातारेच जास्त मरायलेत’ ही चर्चा ऐकून म्हातारेकोतारे घाबरून गेलेत. ते मरणाच्या भीतीनं दचकून उठतायत.

शिक्का मारणं अप्रतिष्ठेचं

बाहेरून गावात आलेल्यांची नोंद ठेवणं, त्याच्या हातावर होम क्वारंटाईनचा शिक्का मारणं आणि त्या घरातील व्यक्तींना घराबाहेर न पडण्याविषयी जागृत करणं, ही कामं शासनाने तलाठी, ग्रामसेवक आणि गावपातळीवर अंगणवाडी सेविका, मदतनीस यांच्यावर  सोपवलीत. ती कामं त्यांनी प्रामाणिकपणे पार पाडली. पण गावात येणाऱ्यांपैकी अनेकांनी हातावर शिक्का मारून घेण्यास टाळाटाळ केली. शिक्का मारला तरी तो पटकन पुसून टाकण्याचा प्रयत्न केला. हातावरचा शिक्का म्हणजे करोना झाल्याची खूण असल्याचा चमत्कारिक गैरसमज गावकऱ्यांनी करून घेतल्यामुळे शिक्क्याची अप्रियता निर्माण झाली.

सुशिक्षित मागासवर्गीयांची सामाजिक बांधीलकी परंतू प्रस्थापित फिरकेनात

नोकरीनिमित्त गावाबाहेर स्थायिक झालेल्यापैकी तथाकथित मागासवर्गीय समाजातल्या काहींनी जन्मगावाविषयी आपुलकी दाखवत करोनाकाळात गावाविषयी काहीतरी करण्याची तळमळ बाळगली. काहींनी हात धुण्यासाठी गावभर साबण वाटले. काही ठिकाणी मजुरांसाठी धान्य वाटलं. दुर्दैवानं गावातल्या प्रस्थापित कुटुंबातल्या नोकरदार सदस्यांनी मात्र ना गावाकडे येण्याची तसदी घेतली, ना विचारपूस करण्याची! बऱ्याच जणांनी गावाकडच्या कुटुंबापासून फटकून राहणंच पसंत केलं.

करोनाची किमया आणि  लगीन‘घाई’

करोना हे खरं तर संकटाचं नाव. एक छुपा दुश्मन. आपल्याच नातलगांच्या, मित्रांच्या आधाराने  येणारा. पण एका मर्यादित अर्थानं का होईना, पण एक सकारात्मक गोष्ट या काळात घडली. जी गोष्ट शिक्षणानं घडली नाही, महापुरुषांच्या प्रयत्नांनी घडली नाही ती एका रोगानं, करोनाच्या भीतीनं घडली. अद्भुत किमया घडवून आणलीय. ‘लग्ना’तला ‘सोहळा’च उद्ध्वस्त करून टाकलाय.

शेतकरी समूहातल्या लग्नाची एक न्यारीच तऱ्हा असते. लेकीचं लग्न थाटामाटात व्हावं आणि ती सुखात राहावी यासाठी, धनदांडग्यांची बरोबरी करण्यासाठी, प्रतिष्ठा राखण्यासाठी लग्नाचा बार उडवून देण्याची जणू एक छुपी स्पर्धाच खेड्यात लागलेली असते. जेवढा हुंडा मोठा तेवढंच लग्नही दणक्यात झालं पाहिजे, हे एक समीकरणच झालेलं. बँड (आता डी.जे.), घोडा, फटाके, फेटे, जेवणावळी, मूळवाटी, पत्रिका वाटप, भांडीकुंडी, सोफासेट, फ्रीज, राजाराणी कपाट (या कपाटात पुढे अनेकांनी बैलाच्या झुली, गाडीच्या खिळ्या, जुवाच्या सापत्याही ठेवल्या) इत्यादी वस्तूंपासून ते चमचा, पोळपाटापर्यंतच्या छोट्या वस्तू देऊन लेकीचा पुरा संसार उभा करून देण्याची बापाची केविलवाणी धडपड पाहून कोणालाही कीव यावी, अशी त्याची स्थिती झालेली असते. त्याच्या या स्थितीचं वर्णन करण्यासाठी ‘ढुंगणाचं कातोडं काढून करणं’ असा वाक्प्रचार आजही वापरला जातो.

करोनानं ते सगळं मोडीत काढलं. ‘लग्नावर होणारा अनावश्यक खर्च टाळा’, ‘हुंडा घेणं बंद करा’ असं अनेक सुधारकांनी ओरडून सांगितलं. कायदे केले गेले, पण ना ते बंद झालं, ना कमी. उलट त्यातली भंपकबाजी वाढतच गेली. वर्षानुवर्षं चालत आलेला हा भपका करोनानं फटक्यात निकाली काढला. ‘जमलेलं’ लग्न करोनाच्या धास्तीनं होईल की नाही, याची भीती जशी मुलीच्या बापाला वाटू लागली तशीच नवरदेवालाही. मोठं लग्न करण्याची इच्छा ठेवणाऱ्या हौसी जोड्यांना त्यासाठी वर्षभर थांबण्याची शिक्षा परवडणारी नव्हती. लग्न आणि मौतीसाठी दहा-वीस लोकांची परवानगी देण्याची भूमिका शासनानं तिसऱ्या टप्याच्या लॉकडाऊनपासून घेतली. पण त्याच्याआधीच पोलिसांच्या सल्ल्याप्रमाणे पहाटे, रात्रीच्या वेळी लग्न उरकण्याचा सपाटाच सुरू झाला. नवरदेवाच्या घरची मंडळी, मामा (पाठीमागे उभा राहण्यासाठी लागतो म्हणून), भावकीतले एक-दोन जण. संपलं वऱ्हाड. काहींनी तर मोटरसायकलीवर जाऊन नवरी घेऊन आल्याच्या ‘ना भुतो ना भविष्यती’ अशा घटना घडल्या. ना मुहूर्त, ना मानापमान, ना रुसवेफुगवे. आलेल्या वऱ्हाडाला बऱ्याच लग्नात जेवणही नशीब झालं नाही. चहा-मुरमुरे किंवा चहा-पोह्यावर बोळवण केली गेली. रात्री-अपरात्री आणि पहाटे होणारी लग्नं पाहून पिढ्यानपिढ्यांपासून शेतकरी समाजाला ‘मुहूर्त’ सांगणारी पंचांगे कुठे दडून बसली? बिनामुहुर्ताचे लग्न टिकेल का? असे प्रश्न कुणाही शहाण्या माणसाला पडणं साहजिक आहे.

खरं तर ‘लगीनघाई’ हा शब्द करोनामुळेच सार्थक झाला असं म्हणावं लागेल. आजपर्यंत कोणतीच लग्न इतक्या ‘घाई’नं पार पडली नाहीत. पहाटे पाच-सहाला लग्न लागलेला नवरदेव नऊ वाजेस्तोर नवरीला घेऊन घरी! दोन-तीन घंट्यात जिकडच्या तिकडं.

या सगळ्या प्रकरणात खऱ्या अर्थानं वाचला तो नवरीचा बाप! आणि ते महत्त्वाचं होतं. या वर्षातले वधुपिता एकार्थानं सुदैवीच म्हणावेत. त्याचे पैसे वाचले, कष्ट वाचले, भावभावकीची हांजीहांजी करणं वाचलं. लगीनसराईत प्रत्येक गावात चार-दोन तरी ‘बैनामे' (शेताची रजिस्ट्री) दरवर्षी व्हायचे. ते यंदा वाचले. लग्नाच्या कर्जानं आत्महत्या करणारा शेतकरी सुदैवानं या वर्षी तरी सापडणार नाही. हा सिलसिला खरं तर असाच सुरू राहिला पाहिजे.

टोपणनावे

कोणतीही नवी गोष्ट आली की, त्याला चांगला वाईट प्रतिसाद खेड्यांतून दिला जातो. टोपणनावं बहाल करण्याची मोठीच हौस गावांतून पुरवली जाते. ही टोपणनावे कधी त्या व्यक्तीच्या तोंडावर तर कधी पाठीमागे लावली जातात. सिनेमातील पात्रांची, राजकीय पुढाऱ्यांची किंवा इतिहास-पुराणातली गौरवपूर्ण नावे किंवा एखादा अवगुण शोधून दिलेली विक्षिप्त नावे गावकऱ्यांचं मनोरंजन करतात. गोपीनाथ नाव असेल त्याला ‘मुंडे’ म्हणणं, शंकरचा ‘चव्हाण’ करणं किंवा बळीला ‘राजाबळी’ म्हणणं, हे मराठवाड्यातल्या कोणत्याही गावात ऐकायला मिळतं. करोनाचा काळही त्याला अपवाद नाही. पोरांना ‘लॉकडाऊन’ आणि पोरीला ‘करोना’ म्हटलं जातंय. ‘करुणा’ नाव असणाऱ्या पोरींच्या नावाचा तर जाणीवपूर्वक ‘करोना’ असा उल्लेख केला जातोय. अर्थात हे सगळं गमतीनंच मात्र!

कालगणनेची नवी पद्धत येईल

गावामध्ये आता आतापर्यंत महत्त्वाच्या घटनेच्या आधारे कालगणना केली जायची. स्वातंत्र्य युद्धाच्या धामधुमीचा संदर्भ देत ‘जयहिंद’मध्ये तुहा बाप झाल्याची’ आठवण आजी सांगायची. ‘रझाकारात हीर खंदल्याची’ नोंद काहीजण ठेवतात. आता ‘करोनात मी सहावीला होतो’, ‘करोनात मव्ह लगन झालं, प्हाटं पाचलाच!’ अशी नवी पद्धत पुढे रूढ होईल.

नवे कवी, नवी कविता

करोनानंतर मराठी कवितेत मोठे बदल होतील. नवे कवी जन्माला येतील. लॉकडाऊनचा अनुभव घेणारे काही शेतकरीपुत्र पुढे मोठे झाल्यावर शिकूनबिकून कवीबिवी वगैरे झाले तर लॉकडाऊनमुळे झालेले शेतकऱ्यांचे हाल, करोनाविषयीचे समज-गैरसमज याचे चित्रण करणारी ‘करोनातला गाव माझा!’सारख्या नव्या कविता लिहून खड्या आवाजात मंचावरून सादर करतील. ‘करोनानंतरची कविता’ हा नवा कालखंड अभ्यासला जाईल.

थांबलं काहीच नाही तरी ‘लॉकडाऊन’ जबाबदार…

या करोनाकाळात खरं तर गावातलं काहीच थांबलेलं नाही. सगळे व्यवहार नेहमीप्रमाणे सुरू राहिले. तरीपण गावाच्या जगण्याचं ‘लॉकडाऊन’ झालं हे मात्र निश्चित. गावकऱ्यांच्या बोलण्यातली ‘लॉकडाऊन’ शब्दाची वारंवारिता इतकी वाढली की, तो उठताबसता, खातापिता ‘लॉकडाऊन’ बोलतोय.

लॉकडाऊनमुळे झालेल्या शेती आणि शेतकऱ्याच्या नुकसानीला भरून काढण्याचा कोणताही पर्याय त्याच्याकडे नाही. ‘करोना’, ‘लॉकडाऊन’ या शब्दांचा दैनंदिन जगण्यातला वावर मोठ्या प्रमाणात वाढलाय. नवरा-बायकोतल्या संबंधाविषयी कुणी थट्टेनं जरी विचारलं तरी ‘नाही हो, सध्या लॉकडाऊन सुरू आहे’ असे उत्तर हसत हसत दिले जाते.

वर्षभर आता गावाला उकल पडंल की नाही, ते सांगता येत नाही. खरं तर ‘लॉकडाऊन’ आता गावात रुतून बसलाय!

..................................................................................................................................................................  

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

..................................................................................................................................................................  

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा