लॉकडाउनच्या काळात खिडक्या माणसांच्या आयुष्यात आनंद निर्माण करू लागल्या आहेत!
पडघम - सांस्कृतिक
बेनिता फरनँडो
  • प्रातिनिधिक चित्र
  • Sat , 02 May 2020
  • पडघम सांस्कृतिक करोना विषाणू Corona virus करोना Corona करोना व्हायरस Coronavirus लॉकडाउन Lockdown

गेल्या पंधरवड्यात मला आपणाला शेजारीही आहेत याचा साक्षात्कार झाला. लॉकडाऊनमुळे घरात अडकून पडल्याने, आणि घरातूनच ऑफिसचे काम सुरू असल्यामुळे दिवसातल्या ठराविक वेळी हे शेजारी त्यांच्या खिडकीपाशी येतात. खिडकीपाशी येताना त्यांच्या हातात कधी कॉफीचा मग असतो, कधी एखादं तान्हुलं असतं, कधी कुंडीतल्या झाडांना त्यांना पाणी घालायचं असतं, तर कधी चोरून एखादा झुरका ओढायचा असतो. पण बऱ्याचदा त्यांना फक्त बाहेरच्या जगात डोकावून पाहायचं असतं. आताशा हे चेहरे माझ्या परिचयाचे झाले आहेत. या दरम्यान चुकून जर आमची नजरानजर झालीच तर अतिशय सभ्यपणे आम्ही एकमेकाला टाळण्याचा प्रयत्न करत असतो.

जेव्हापासून जगभर पसरणाऱ्या कोव्हीड-१९चा प्रसार रोखण्यासाठी कठोर अशा लॉकडाऊनची काटेकोर अंमलबजावणी सुरू झाली आहे, तेव्हापासून सारे रस्ते आणि शहरातील चौक सुनसान झाले आहेत. किराणामालाच्या दुकानांमध्ये दिसणारी, आपल्या लाडक्या कुत्र्यांना घेऊन फिरायला जाणारी किंवा दैनंदिन कामकाजासाठी धावणारी ही सारी मंडळी सध्या आहेत तरी कुठं? अर्थातच ही सारीजण आहेत त्यांच्या खिडक्यांच्या शेजारी. मुंबईसारख्या शहरामध्ये तुमच्या बेडरूममधून दिसणारा नजारा म्हणजे अगदी ५० मीटरवर खेटून उभी असणारी दुसरी एखादी इमारत जिथल्या खिडकी आणि बाल्कनींमधून सुरू असते मानुषतेचे नाट्य.

या साऱ्यातून ध्वनित होत राहते ती शहरांमधून जाणवणारी काहीशी प्रखर अशी तुटलेपणाची जाणीव. यातून सुटकेचा एकच मार्ग उरतो तो म्हणजे ग्रील किंवा जाळी लावलेल्या खिडक्यांमध्ये येऊन उभे राहणे. आणि मग इराण आणि इटलीमधील बाल्कनींमधून समूहस्वरात म्हटलेली गाणी, घरामध्ये अडकलेल्यांच्या स्वास्थ्यासाठी हँबर्गच्या रस्त्यामध्येच एका फिटनेस ट्रेनरने सुरू केलेला प्रशिक्षण वर्ग, न्यूयॉर्कमधल्या चौथ्या मजल्यावरच्या खिडकीमधून फादरनी लावून दिलेले लग्न, आणि हो अर्थातच प्रधानमंत्र्यांच्या सूचनेबरहुकूम भारतीयांनी केलेला घंटानाद आणि थाळीनाद - या साऱ्या घटनांवरून आपणाला नुकतेच हेही उमगून चुकते की, ही खिडकी म्हणजे एकमेकांना अचानकपणे जोडणारा प्रदेश असतो.

लॉकडाऊनमुळे उभ्या करण्यात आलेल्या तटबंद्यांनी आपणा सर्वांना ‘खिडकीशेजारील जगाचे नागरिक’ बनवले आहे. ‘दि अलीपोर पोस्ट’ या कला आणि कवितेला वाहिलेल्या ऑनलाईन जर्नलने त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरती या साऱ्या भावना पॉल गुस्ताव्ह फिशर या चित्रकाराच्या एका चित्राद्वारे पकडल्या आहेत. फिशर हा विसावे शतक उलगडताना उदयास आलेला एक डॅनिश कलाकार. फिशरने आपल्या चित्रकलेतून प्रामुख्याने शहरी जीवन चितारले आहे. मग कधी ती थिएटरबाहेरील संध्याकाळ असेल, कधी नेपल्समधील मार्केट असेल, तर कधी कोपनहेगनमधील रस्त्यावरील दृश्ये असतील. पण याचबरोबरीने त्याने शहरांचे अंतरंगही चितारले आहे, ज्यामध्ये दिसते खिडकीशेजारी उभी असणाऱ्या एका स्त्रीची व्यक्तिरेखा. उपरोक्त ऑनलाईन जर्नलच्या बेंगलोरस्थित असणाऱ्या संस्थापिका रोहिणी केजरीवाल यांनी फिशरच्या त्या चित्राची निवड केली आहे, ज्यामध्ये त्याची पत्नी एका खिडकीतून बाहेर डोकावते आहे, खिडकीतील कुंड्यांमध्ये गुलाब आहेत, तिच्या नजरेवरून ती फार दूरचे न्याहाळत असल्याचा भास होतो आहे आणि तिच्या मांडीवर अर्धवट वाचून सोडून दिलेले पुस्तक दिसते आहे. तिने नुकत्याच व्यतीत केलेल्या दिवसांची झलक चित्रामध्ये नेमकेपणाने पकडलेली आहे.

नागर जीवनामध्ये या नुकत्याच वृद्धिंगत झालेल्या परात्मभावाच्या जाणीवेने अनेक जण एडवर्ड हॉपर या अमेरिकन कलाकाराकडे वळले आहेत. हॉपर याने गतशतकाच्या मधल्या कालखंडातली अमेरिका चितारली आहे. याच्या बव्हंशी चित्रातून दिसतात त्या रिकाम्या खोल्या, ओसाड शहरं आणि खिडकीतून डोकावणारा स्वान्त स्वगतामध्ये मग्न असणारा एकाकी मनुष्यप्राणी. सध्या त्याच्या कलाकृतींच्या सोशल मीडियावरील नोंदयादीसोबत असे नमूद केले आहे की, “आज आपण सारे एडवर्ड हॉपरच्या चित्रांप्रमाणे बनलो आहोत”. मात्र ‘दि गार्डियन’ चे समीक्षक जोनॅदन जोन्स यांच्या मतानुसार, “परात्मभाव जोपासणाऱ्या कस्पटासमान मानवाचे दर्द्नाक चित्रण करणाऱ्या हॉपरला आव्हान देण्याची आणि एकसंघ समुदाय म्हणून तगून राहण्याची आपण आज सारे जण मनीषा बाळगून आहोत. पण यातील विरोधाभास म्हणजे आपणाला हे सारे एकमेकाशी अंतर ठेवूनच करावयाचे आहे ...”

आणि इकडे आपल्याकडे आहेत सुधीर पटवर्धन. ठाणे-स्थित हा चित्रकार मुख्यत्वे त्याच्या शहरी चित्रिकरणासाठी प्रसिद्ध आहे. मात्र यांची चित्रे काही हॉपरच्या न्यूयॉर्कसारखी नाहीत. इथे टोलेजंग इमारती आणि बकाल चाळी एकमेकाला खेटून उभ्या राहिलेल्या दिसतात. ‘स्ट्रिट कॉर्नर’ (१९८५) या कलाकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे त्यांच्या चित्रात रस्ते आणि घरं एकमेकांत मिसळून गेलेली दिसतात. अंतरंगांचे दर्शन घडवणाऱ्या चित्रांमध्ये पटवर्धनांची माणसं ही त्यांच्या घरातील खोल्यांमध्ये किंवा निरनिराळ्या कोपऱ्यांमध्ये वावरताना दिसतात आणि या खोल्यांच्या खिडक्यांमधून शहर आत डोकावताना दिसते. पटवर्धनांच्या २००९ मधील ‘इनसाईड’ या कलाकृतीमध्ये कुर्ता घातलेला, पाठीमागे हाताची घडी घातलेला एक माणूस खिडकीतून बाहेर डोकावताना दिसतो आहे आणि आपल्या खिडकीतून तो बाहेरील खिडक्या आणि बाल्कनी न्याहाळतो आहे, तर समोरील बाल्कनीतून अजून एक व्यक्ती डोकावताना दिसते आहे. या चित्राबद्दल बोलताना पटवर्धन ‘दि इंडियन क्वार्टरली’ मध्ये असे म्हणतात की, “एक व्यक्ती स्वतःच्या सुरक्षित अवकाशातून बाहेरचे अवकाश न्याहाळत आहे... हा एक अंतर्बाह्य जाणिवांचा, अंतर्भाव आणि बहिष्कृती प्रस्थापित करण्याचा खेळ आहे.”

गेली कित्येक शतके कलेमध्ये आणि साहित्यामध्ये खिडकीचा एक माध्यम म्हणून, प्रतीक म्हणून, किंवा प्रतिभेचा स्त्रोत म्हणून वापर केला गेलेला आहे. खिडकी म्हणजे खरे तर एक उंबरठ्यासारखे अवकाश असते, इथे आतले आणि बाहेरचे किंवा घरातले आणि भवतालचे असे काही नसते. खिडकी असते एक सीमाप्रदेश, ती असते एक वाट पाहण्याची खोली. आणि इतर सर्व उंबरठ्यांप्रमाणेच तिच्यातही असते बदल घडवून आणण्याचे सामर्थ्य.

तत्त्वचिंतक अॅलन डी बॉटन यांच्या ‘दि स्कूल ऑफ लाईफ’ या भावनिक निरामयतेसंदर्भात असणाऱ्या ऑनलाईन संदर्भ संसाधनातील एका प्रकरणाचे शीर्षक आहे – ‘दि इम्पॉर्टन्स ऑफ स्टेअरिंग आउट ऑफ विंडो’ (‘खिडकीतून बाहेर डोकावून पाहण्याचे महत्त्व’). यातून हेच सूचित होते की, सुदृढ समाजासाठी ‘उत्तम दिवसाचा’ उत्कर्षबिंदू म्हणजे “स्टेअरिंग आउट ऑफ विंडो”. उत्पादकतेच्या हव्यासाने बजबजलेल्या समाजामध्ये नेमक्या याच गोष्टीची आज उणीव आहे. त्यामुळे अनेकार्थाने मोठ्या प्रमाणात दुर्लक्षित राहिलेल्या खिडकीतून न्याहाळण्याची घटना आज मात्र आपल्या त्रस्तपणाशी जोडली गेलेली आहे.

सकाळी योगा करणे, आपल्या आवडत्या ठिकाणी कॉफी पिणे, मुलांना शाळेत सोडायला जाणे, पार्कमध्ये फेरफटका मारणे, संध्याकाळचा चहा घेणे – अशा प्रकारचे आपले सारे दैनंदिन जीवन केवळ लॉकडाऊनमुळेच नव्हे तर एक प्रकारच्या अनिश्चिततेने अगदी नेस्तनाबूत झाले आहे.

घरांमध्ये दीर्घकाळ अडकून पडल्यामुळे नको असलेला किराणा आणण्यासाठी बाहेर पडण्याचे आपण बहाणे शोधत आहोत. प्रत्येक वेळी आलेली खोकल्याची उबळ ‘अरे पुढचा नंबर माझा तर नाही ना!’ या विचाराने आपल्याला अस्वस्थ करून सोडत आहे. परंतु अशा अगतिकतेवरती जेव्हा आपण मात करत असतो, तेव्हाच आपले मूलगामी असे चिंतन फुलून येत असते.  

डी बॉटन यांच्या मते तत्काळ उफाळून येणाऱ्या दबावाविरुद्ध ‘खिडकीचे दिवास्वप्न’ हे एक ‘सुनियोजित बंड’ असते. झपाट्याने पसरणाऱ्या दबावांच्या बदल्यात न कळलेल्या अंतर्मनाचे उत्खनन करणाऱ्या ‘खिडकीचा शोध’ हे निश्चितच गंभीर स्वरूपाचे बंड असते.  

खिडक्या आणि बाल्कनी या माझ्या बालपणाच्या अगदी जिव्हाळ्याच्या जागा होत्या. त्रास देण्यासाठी म्हणा किंवा सोबत खेळण्यासाठी म्हणा मला कोणी भावंडं नसल्यामुळे घराच्या या भागामध्ये मी माझ्या आवडीची सगळी कामं केली. इथूनच मी कबुतराची अंडी चोरली होती आणि त्यातलं एक आईला फ्रायसुद्धा करायला सांगितलं होतं. इथूनच मी साबणाचे फुगे फुगवले होते आणि प्लास्टिकच्या पिशव्या पतंगासारख्या हवेत उडवल्या होत्या. इथे मी एकदा सोयाबीन लावलं होतं आणि त्याला बहर आल्यावर ते सांबारमध्ये वापरलंही होतं.

माझ्या आई-बाबांनी बाल्कनीच्या भिंती तर मला आंदणच देऊन टाकल्या होत्या, जिथे मी माझ्या क्रेयॉन्सनी मनसोक्त गिरगिटायचे. या भिंतींना नवीन व्हाईटवॉश मिळेपर्यंत माझ्या वाढत्या वयाबरोबर या कॅनव्हासचीदेखील उंची वाढत गेली. उन्हाळ्याच्या सुटीचा काळ हा माझ्या सर्वात आवडीचा काळ. त्यावेळी मग मी इथे बसून ढग न्याहाळत असे, गाड्या पहात असे आणि चिमण्या मातीत आंघोळ का बर करत असतील याचा विचार करत असे. तांबूस झाडावर उमलून आलेला पिवळाजर्द बहर पाहण्याचा तो काळ असे. बाहेर न्याहाळत राहण्याइतका निर्भेळ आनंद इतर कशातही नाही. बाहेरचे जग न्याहाळत राहण्याची सवय मी आजही जोपासली आहे.

आज मात्र खिडक्या तुमचे आयुष्य अधिक निरसवाणे बनवण्यासाठी एखादा निरर्थक खेळ खेळण्याच्या जागा बनून गेल्या आहेत आणि तुम्ही तो रटाळपणा दुरुस्तही नाही करू शकत. तुम्ही त्याला फक्त काळावरती सोपवू शकता. खिडकी ही एकप्रकारे परात्मभावाचे प्रतिक असल्याने १८व्या शतकातील ज्याँ शिमॉन शॉरदें या पॅरीसमधील चित्रकारालाही खिडक्यांनी भुरळ घातली होती. त्याच्या काही कलाकृतींमध्ये किशोरवयीन मुलं ही खिडक्यांमध्ये साबणाचे फुगे फुगवताना दिसतात. त्याची ही चित्रे एका बाजूला विरंगुळ्याच्या अधिकाराचे एक भाष्य प्रकट करतात तर दुसऱ्या बाजूला क्षणभंगुर आयुष्य आणि मोहाबद्दलची निरर्थकता याचेही कथन करताना दिसतात. या चित्रांमध्ये स्ट्रॉच्या एका टोकाला हे फुगे थरथरताना दिसतात. या लोभसवाण्या फुग्यांचे प्राक्तन हे काही क्षणांपुरतेच चकाकण्यासाठी मर्यादित असते.

समाजातील एका मोठ्या वर्गासाठी खिडकीचा आसरा घेण्याखेरीज अन्य कोणताच पर्याय उपलब्ध नसतो. अशीच एक खिडकी ही आल्फ्रेड हिचकॉकच्या ‘रिअर विंडो’ (१९५४)चा भवताल आहे. या चित्रपटात सातत्याने खिडकीतून नजरेस पडणाऱ्या शेजाऱ्यांमुळे व्हीलचेअरला खिळून असलेला एक फोटोग्राफर एका खुनाचे गूढ उकलण्याचा प्रयत्न करतो. नव्याने उदयाला आलेले लॉकडाउन्स आता आपणासाठी सर्वसामान्य बनत चालले आहेत. मात्र वयस्कर लोक, दीर्घकाळ आजारी असणारे, गंभीर आजाराने ग्रासलेले, अपंग, तीव्र स्वरूपाचे मानसिक आजार असणारे, आणि अशा सर्वांची घरी थांबून शुश्रुषा करणारा सेवक वर्ग यांच्यासाठी लॉकडाउन्स पहिल्यापासूनच सवयीचे आहेत. मॉल्स आणि खाऊगल्ल्यांनी फोफावलेल्या शहरांना दिवसाचा बहुतांश वेळ घरातच अडकून पडलेल्या या रहिवाशांचा कित्येकदा विसर पडत आला आहे.

नितेश मोहंती हे एक व्हिज्युअल आर्टिस्ट आहेत आणि अहमदाबादच्या ‘मायका’ या संस्थेमध्ये अध्यापक म्हणून कार्यरत आहेत. त्यांची पत्नी दिया ही सुमारे ८-१० वर्षे कॅन्सरसारख्या दुर्धर आजाराने त्रस्त होती. २०१८ मध्ये तिचे निधन झाले. हे मोहंती असे म्हणतात की, “हे आताचे लॉकडाऊन प्रकरण माझ्यासाठी काही नवे नाही. माझ्या पत्नीची शुश्रुषा करताना गेली कित्येक वर्षे ‘सोशल डिस्टन्सिंग’ माझ्यावरती समाजाने लादले आहे. या अशा प्रकारच्या अवकाशात गुंतून राहणाऱ्या कित्येक लोकांसाठी हेच त्यांचे जग असते, हाच त्यांचा कॅनव्हास आणि हेच त्यांचे रणांगण असते.”

या आजाराविरुद्ध दोघेजण जेव्हा एकत्रपणे लढा देत होते, तेव्हा मोहंती यांनी एक व्हिज्युअल जर्नल चालवले होते. यामध्ये त्यांनी त्यांच्या मुंबईच्या घरातील क्लांत जगण्याचे पण तरीही अर्थपूर्ण असणारे फोटोग्राफ्स एकत्र केले होते. सुकलेली फुले, अर्धवट खाल्लेली फळे, दियाचे विसावणारे हात, बेडशीट्स वगैरे साऱ्या गोष्टी या जर्नलचा अविभाज्य घटक होत्याच, पण त्याहीपेक्षा ठळकपणे लक्षात राहणारी गोष्ट म्हणजे खिडक्यांचे निरनिराळे फोटो. हॉस्पिटल वॉर्डमधल्या खिडकीतून दिसणारे दृश्य, खिडकीच्या ग्रीलवर बसून चिवचिवाट करणाऱ्या चिमण्या, अशुभ वाटणारा एक कावळा, व हॉपरच्या चित्रातल्या व्यक्तीरेखेसारखी दिसणारी खिडकीशेजारील दिया - या साऱ्या प्रतिमा आता मोहंती यांच्या नव्याने येऊ घातलेल्या पुस्तकाचा एक भाग आहेत. या साऱ्यातून ध्वनित होतो तो मोहंती यांचा शुश्रुषा घेतानाचा सगळा प्रवास.

या अनुषंगाने मोहंती असे म्हणतात की, “या दरम्यान मी सातत्याने खिडक्यांच्या शोधात होतो. माझ्यासाठी खिडकी म्हणजे जणू प्रकाश, संगीत आणि वायुतत्व बनून गेले होते. जेव्हा आतील सगळे वातावरण हे कष्टप्रद, नैराश्याने ग्रासलेले, सुटकेचा कोणताही पर्याय नसलेले असे बनले होते, तेव्हा माझ्यासाठी खिडकी म्हणजे आशेचे एक रूपक बनून गेली होती. काहीतरी मिळावं यासाठी मी खिडकीकडे कधीच धाव घेत नव्हतो. खिडकीने मात्र त्याबदल्यात मला पुरेपूर एकांतवासाचे क्षण बहाल केले हेही तितकेच खरे.”

आज आपल्या सर्वांची अवकाशे ही आकसत चालली आहेत हे खरे आहे, पण जोपर्यंत आपल्या या जगात ‘खिडकी’ आहे तोपर्यंत आशा जिवंत आहे. अमेरिकेतील ब्रुकलीनमधल्या आणि इंग्लंडमधील सॉमरसेटमधल्या रहिवाशांमध्ये इंद्रधनुष्य चितारण्याची किंवा त्याचे विणकाम करण्याची आणि मग ते खिडक्यांवर टांगून ठेवण्याची एक स्थानिक स्वरूपाची चळवळ सुरू झाली आहे. मुलांच्यासाठी तर “चला इंद्रधनुष्य शोधूया”सारखा एक मजेशीर खेळ उदयाला आला आहे. या सगळ्याच्या केंद्रस्थानी आहे ती फेसबुक पोस्ट किंवा टेक्स्ट मेसेजच्या पल्याड जात एकमेकांशी जोडले जाण्याची सहजसुलभ निकड.

बॉन्ग ज्युन हॉ यांच्या ‘पॅरासाईट’ (२०१९) या चित्रपटात दाखवल्याप्रमाणे ‘खिडकी’ एका वैभवसंपन्नतेचेही प्रतीक बनून जाते. या चित्रपटात निम्नवर्गीय किम कुटुंबीय हे एका बेसमेंटमध्ये रहात आहेत. या बेसमेंटला रस्त्याच्या उंचीवर खिडक्या आहेत. अशा प्रकारच्या खिडक्या या कुटुंबासाठी कमालीच्या त्रासदायक ठरत आहेत. परंतु त्यांचे आयुष्य हे गेऊन साये या दुसऱ्या एका व्यक्तिरेखेपेक्षापेक्षा त्यातल्या त्यात सुसह्य आहे, कारण गेऊन साये राहतो अशा एका बेसमेंटमध्ये ज्याला खिडक्याच नाहीत. सांडपाण्यातल्या एखाद्या उंदरासारखे तो आपले आयुष्य जगतो आहे. बगीच्याचा नयनरम्य नजारा आणि आपला खाजगीपणा याचे खरे लाभार्थी आहेत अर्थातच उच्चभ्रू पार्क्स कुटुंबीय. यांच्या अपार्टमेंटमध्ये जमिनीपासून छतापर्यंत मोठाल्या खिडक्या आहेत. इथे जणू काही सूर्यनारायण स्वतःहून ठरवत आहे की, आपण कुणासाठी चमकायचे आहे.

खिडक्यांवरून तुमचा सामाजिक स्तर ठरत असतो यात नवे असे काहीच नाही. १६९६मध्ये इंग्लंडच्या संसदेने दहापेक्षा जादा खिडक्या असणाऱ्या घरांसाठी ‘विंडो टॅक्स’ लागू केला होता. यामागे धारणा अशी होती की, इतक्या खिडक्या असणारी घरे ही उच्चभ्रू लोकांचीच असणार. त्यांच्यासाठी हा अशा प्रकारचा कर परवडण्याजोगा आहे. मात्र हा कर म्हणजे “सूर्यप्रकाश आणि हवा” यांच्यावरील कर आहे, असा निषेधाचा सूर काढत लोकांनी आपल्या खिडक्या झाकून टाकणे पसंत केले. परिणामी घरांच्या दर्शनी भागावर केवळ रंगवलेल्या खिडक्यांच्या बाह्यरेषा दिसू लागल्या. आणि मग अर्थातच अशा खिडक्याविरहित खोल्यांमध्ये नोकर लोकांची रवानगी होऊ लागली.              .         

सुमारे ७३,००० प्रति चौरस मैल लोकसंख्येची घनता असणाऱ्या घुसमटून टाकणाऱ्या मुंबईमध्ये लोक खिडक्या आणि बाल्कनींचा सदुपयोग नेमकेपणाने करून घेताना दिसतात. इथल्या खिडक्या आणि बाल्कनी म्हणजे मानवी जीवनाशी जुळवून घेण्याच्या प्रयत्नांचे एक शिखर मानता येईल. इथल्या बाल्कनी या किशोरवयीन मुलांच्या बेडरूम बनून जातात, खिडक्यांखालची जागा सायकली ठेवायची जागा बनून जाते. झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या इमारतीतील खिडक्यांच्या पॅरापिटमध्ये अभ्यासाला बसलेल्या शाळकरी मुलांचे दृश्य तर नेहमीचेच. १ बीएचके किंवा त्याहूनही लहानशा अशा सहा जणांच्या घरामध्ये मुलांना हमखास मिळणारी ही एक स्वतःची अशी खाजगी जागा असते. त्यामुळेच प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी २२ मार्चला सायंकाळी ५ वाजता बाल्कनीत येऊन टाळ्या वाजवण्याचे ज्यावेळी आवाहन केले, त्या वेळी बऱ्याचशा मुंबईकरांनी तक्रारीचा सूर लावला होता. मध्यमवर्गीय मुंबईकरांकडे थेट त्यांच्या बाल्कनीचीच मागणी करणे हे जरा अति झाले.

खिडकीने एकीकडून बहाल केलेली प्रायव्हसी ही दुसरीकडून हिसकावून घेतलेली असते. लॉकडाऊनमुळे खिडक्या आणि बाल्कनींमधून आत डोकावून पाहणाऱ्यांची भीड आता चेपली आहे. आता खिडकीशेजारी बसून आपण निवांतपणे वाचत बसू शकत नाही. आपणाकडे सतत कोणीतरी पाहत आहे या भावनेने आपण घेरलेले असतो. आणि ज्यावेळी प्रत्यक्ष सरकारच लोकांना दिवे घालवून खिडक्या आणि बाल्कनींमध्ये मेणबत्त्या आणि पणत्या लावायला सांगत असते, त्यावेळी आपणावरती सतत कुणाचेतरी लक्ष आहे ही भावना अधिकच वाढीला लागते. अशा वेळी तुमच्यासमोर एकच पर्याय उरतो – एकतर तुम्ही ‘आतल्या’ गोटाचे तरी व्हा किंवा ‘बाहेरच्या’ तरी.

खिडक्यांची ही अशी अवस्था यापूर्वी कधीच नव्हती. खिडक्या या खरे तर प्रेमीजनांच्या प्रदेशासारख्या असतात. इथे उभे राहणारे हे प्रदीर्घ काळासाठी तिष्ठत वाट पाहणारे असतात. खिडकी म्हणजे नियतीने फारकत घेतलेल्या प्रेमीजनांसाठी भिंतीमधला एक छेद असतो. ही खिडकी असते ‘पडोसन’ (१९६८) मधला ‘चाँद का टुकडा’, ती असते ‘दिल एक मंदिर’ (१९६३)मधील उदासवाणी चांदरात, तिच्यातूनच डोकावत असतो तो बंगाली चित्रपट ‘आशा जाओर माझ्ये’ (२०१४) मधील प्रत्येक सकाळी नोकरीसाठी बाहेर पडणाऱ्या आपल्या पत्नीला पहात राहणारा पतीराज. आजमितीस हे खरे आहे की, आपण बेकेटच्या त्या भटक्यांप्रमाणे वाट पहात आहोत, आपणास ठाऊक नाही की, लॉकडाऊनच्या पल्याडचे जग कसे असेल. तरीही वर सांगितलेल्या आणि त्यासारख्या असंख्य उदाहरणांमधून आपणाला जाणवत राहते ती मात्र निश्चित स्वरूपाची आश्वासकता. त्यामुळे यादरम्यान आता आपण खिडक्यांशी येऊन थांबूया, आकाशातील ढग पाहत राहूया, आपल्या शेजाऱ्यांकडे पाहून हात हलवूया, आणि उज्ज्वल भविष्याची आशा करूयात.       

मराठी अनुवाद - नितिन जरंडीकर

nitin.jarandikar@gmail.com

..................................................................................................................................................................

हा मूळ इंग्रजी लेख ‘indian express’ या दैनिकाच्या १९ एप्रिल २०२०च्या Eye या रविवार पुरवणीत प्रकाशित झाला आहे. मूळ लेखासाठी क्लिक करा -

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा