गांधींचे ‘महात्मा’पण कसे घडले, कसे आकाराला आले, याची चित्तवेधक कहाणी
ग्रंथनामा - शिफारस\मराठी पुस्तक
राम जगताप
  • ‘गांधी : भारतात येण्यापूर्वी’ या पुस्तकाचे मुखपृष्ठ
  • Sat , 02 May 2020
  • ग्रंथनामा Granthnama झलक महात्मा गांधी Mahatma Gandhi रामचंद्र गुहा Ramachandra Guha

प्रसिद्ध इतिहासकार रामचंद्र गुहा यांनी आपण म. गांधींचे द्वि-खंडात्मक चरित्र लिहीत असल्याची घोषणा २०११मध्ये केली, तेव्हापासूनच त्यांच्या या चरित्राविषयी जाणकारांमध्ये उत्सूकता निर्माण झाली होती. त्यानुसार त्यांच्या गांधी-चरित्राचा पहिला भाग ‘Gandhi Before India’ या नावाने २ ऑक्टोबर २०१३मध्ये प्रकाशित झाला, तर दुसरा भाग ‘Gandhi : The Years That Changed the World, 1914-1948’ हा २७ सप्टेंबर २०१८मध्ये प्रकाशित झाला. यातील पहिल्या भागाचा मराठी अनुवाद प्रसिद्ध अनुवादक शारदा साठे यांनी ‘गांधी : भारतात येण्यापूर्वी’ (मे २०१९) या नावाने केला आहे. मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊसने या पुस्तकाची देखणी निर्मिती केली आहे.

भारतात गांधींचे सतत मूल्यांकन चालू असते. त्याचबरोबर गांधींविषयी भारतात गैरसमजही खूप आहेत. गांधींनी भारताची फाळणी केली, त्यांची आंदोलनांची कुठलीच आयडियॉलॉजी नव्हती वगैरे वगैरे. गांधींविषयी भारतीयांची ‘लव्ह अँड हेट रिलेशनशिप’ आहे. त्यामुळे भारताचे आजच्या घडीला सर्वांत प्रसिद्ध इतिहासकार म्हणून नावाजल्या जाणाऱ्या रामचंद्र गुहा यांनी गांधींचे चरित्र लिहिणार असल्याची घोषणा केली, तेव्हाच काही वाचकांना असा प्रश्न पडला होता की, यात नवीन ते काय आणि किती असणार? त्यामुळे या चरित्राकडे वळण्याआधी या चरित्राकडे कसे पाहावे, याकडेच वळायला हवे. कारण त्यातूनच या चरित्राचे वेगळेपण, त्याचे मोठेपण आणि त्यातील नावीन्य चांगल्या प्रकारे समजून घेता येईल.

तसे पाहिले तर गांधींविषयी आणि गांधींचे आजवर कितीतरी लेखन प्रकाशित झाले आहे. वेगवेगळ्या व्यक्तींनी, स्नेह्यांनी आणि त्यांच्या नातेवाईकांनीही त्यांची चरित्रे लिहिली आहेत. पण गांधी यांची आजवर लिहिली गेलेली जेवढी म्हणून चरित्रे आहेत, त्या सर्वांमध्ये त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे, कार्याचे काहीच पैलू उलगडले गेले आहेत. त्या प्रत्येक चरित्राचा भरही एका विशिष्ट पैलूपुरताच मर्यादित आहे. शिवाय त्या वेळच्या जागतिक परिस्थितीच्या संदर्भात आणि भारतीय जनमानसाच्या संदर्भात गांधी यांच्या समग्र योगदानाचा वेध घेणारे परिपूर्ण असे चरित्र म्हणून कुठल्याही चरित्राला मान्यता मिळालेली नाही.

त्यामुळे गुहा यांच्यासारख्या नावाजलेल्या इतिहासकाराचे गांधीचरित्र आधीच्या सर्व चरित्रांपेक्षा वेगळे असणार हे उघड होते. शिवाय कुठल्याही ऐतिहासिक व्यक्तीचे पुन्हा पुन्हा मूल्यांकन करणे हे विचारवंतांचे कामच असते. त्यामुळे त्या ऐतिहासिक व्यक्तीचे योगदान नेमकेपणाने जाणून घेता येते, तिच्याबाबत काळाच्या ओघात निर्माण झालेले गैरसमज दूर होऊ शकतात. आधीच्या चरित्रकारांकडून कळत-नकळत झालेले अन्याय दूर होऊ शकतात. भारतात तर गांधींविषयी इतके गैरसमज आहेत की, तसे गैरसमज आणि परस्परविरोधी मते आहेत की, तितके इतर कुणाहीबद्दल असतील असे वाटत नाही. बहुधा हेही कारण गुहा यांना या चरित्रासाठी उद्युक्त करणारे असू शकेल.

गांधींवर आजवर पुष्कळ लिहिले गेले असले आणि त्यांची अनेकांनी विविध प्रकारची चरित्रे लिहिली असली तरी गांधींनी आपल्या आयुष्याचा सुरुवातीचा काळ ज्या आफ्रिकेमध्ये घालवला, तेथेच गांधींची ‘महात्मा’ म्हणून खऱ्या अर्थाने जडणघडण झाली होती. मात्र हा कालखंडच सविस्तरपणे आजवर कुठल्याही चरित्रकाराने नोंदवलेला नव्हता. गुहा यांनी आपल्या द्वि-खंडी चरित्राच्या पहिल्या भागात नेमका याच कालखंडावर भर दिला आहे. त्यामुळे या चरित्राच्या निमित्ताने गांधी-चरित्रातली एक मोठी उणीव दूर झाली आहे, असे मानायला हरकत नाही. कारण आफ्रिकेमधील गांधींच्या कामाविषयीची कितीतरी कागदपत्रे, वर्तमानपत्रे, लेख, माहिती आदी दस्तावेज आजवरच्या अनेक चरित्रकारांनी मुळातून पाहिला नव्हता. तो गुहा यांनी पहिल्यांदाच तिथे जाऊन पाहिला. त्यामुळे आजवर अप्रकाशित राहिलेल्या अस्सल कागदपत्रांच्या आणि विश्वसनीय पुराव्यांच्या आधारे गुहा यांनी हे चरित्र लिहिले आहे.

या चरित्रात गांधींच्या १८९३ साली आफ्रिकेला प्रयाण करण्यापर्यंत आणि तिथपासून १९१५ साली भारतात कायमस्वरूपी परतण्यापर्यंतची जीवनकहाणी आहे. गांधींच्या सर्व संकल्पना या काळात तयार झाल्या. त्यामुळे हा काळ गांधीजींच्या आयुष्यातला सर्वांत महत्त्वाचा काळ मानला जातो. या चरित्रासाठी गुहा यांनी अतिशय मेहनत घेतली आहे. आजवर पाहिले न गेलेले दस्तावेज, पत्रे, वर्तमानपत्रे, नियतकालिके यांचा त्यांनी तब्बल चार खंडांमध्ये फिरून शोध घेतला. त्यामुळे हे चरित्र गांधींच्या जडणघडणीचा काळ समजून घेण्यासाठीचा सर्वांत विश्वसनीय दस्तावेज झाले आहे.

या पुस्तकात एकंदर २२ प्रकरणे आहेत. ‘सर्वांगीण दृष्टिकोनातून गांधी’ या १६ पानांच्या उपोदघाताने चरित्राची सुरुवात होते, तर २३ वे प्रकरण ही तब्बल ७० पानांची संदर्भसूची आहे. याशिवाय ‘ऋणनिर्देश’ आणि ‘संदर्भांविषयीचे टिपण’ अशी दोन प्रकरणे सुरुवातीला आहेत. या प्रकरणांतून गुहा यांनी गांधीचरित्राकडे आपण कसे वळलो इथपासून ते त्यासाठी काम करायला सुरुवात केल्यानंतर कुणाकुणाची कसकशी मदत झाली, कुठे कुठे जाऊन कुठकुठले दस्तावेज कशा प्रकारे पाहिले, याची माहिती दिली आहे. गांधींसारखा मोठा विषय असल्याने गुहा यांना प्रचंड प्रमाणात कागदपत्रे, वर्तमानपत्रे, इतिवृत्ते, संदर्भग्रंथ पाहावे लागले आहेत. ते कुठे कुठे कशा प्रकारे मिळाले, त्यासाठी कुणी कशी मदत केली, याचा माहिती वाचतानाच आपल्याला दडपण येते.

उपोदघातामध्ये गुहा यांनी एक फार महत्त्वाचे विधान केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, ‘‘रुझवेल्ट, चर्चिल, द गॉल हे सारे त्या त्या देशाचे महान राष्ट्रीय नेते होते. पण तुम्ही जेव्हा त्या देशांच्या सीमा ओलांडून जास्त जास्त दूर जाता तेव्हा त्यांचे आकर्षण कमी कमी होत जाते. स‌र्व आधुनिक राजकारणी आणि मुत्सद्द्यांमध्ये फक्त गांधी ही एकच अशी जागतिक व्यक्ती आहे, तिच्याबद्दल वाटणारे आकर्षण कमी झालेले नाही.’’ नेमक्या याच गांधी-गारुडाची उकल गुहा यांनी प्रस्तुत चरित्रात केली आहे.

हे चरित्र २ ऑक्टोबर १८६९पासून सुरू होते. आणि जुलै १९१४मध्ये गांधींनी द. आफिका सोडला, तिथे संपते. गांधींनी जेव्हा १८९३मध्ये द. आफ्रिकेमध्ये पहिल्यांदा पाऊल ठेवले, तेव्हा आफ्रिका, विशेषत: नाताळ आणि ट्रान्सवाल यांची एकंदर स्थिती कशी होती, याचा गुहा यांनी या उपोदघातात आढावा घेतला आहे. या प्रकरणाचा शेवटही अतिशय उत्तम प्रकारे गुहा यांनी केला आहे. ते म्हणतात – “गांधींचा आफ्रिकेतील वास्तव्याचा काळ हेच दर्शवितो, की जागतिकीकरणाचे पहिले पर्व स्वेच्छेने किंवा काही वेळा अनिच्छेने का होईना पण स्थलांतर करणाऱ्या गटांच्या वा जनसमूहांच्या अडचणी आणि असंतोष यांनी भरलेले आहे आणि वर्तमानकाळातील अधिकाधिक जागतिकीकरणाने जगातही तशाच प्रकारच्या अडचणी व असंतोष अस्तित्वात आहेत.”

गांधींमुळे केवळ द. आफिक्रेतच मन्वतर घडले असे नाही तर ब्रिटिशांच्या आणि इतरांच्या अधिपत्याखाली असलेल्या अनेक देशांमध्ये नंतर हे मन्वतर गांधींच्या प्रेरणेमुळे घडून आले. तब्बल तीन खंडांत गांधींचा प्रभाव पडला. तोही इंटरनेट, सोशल मीडिया, मोबाईल नसतानाच्या काळात. त्यामुळे गांधी नावाचा माणूस कसा घडला, याची ही कहाणी आजही अनेकांना नव्या मन्वतरासाठी तितकीच प्रेरणादायी ठरू शकते.

गांधींचे व्यक्तिमत्त्व अतिशय भिन्न संस्कृतींमधून आणि जीवनांतून उभे राहिले आहे. त्यामुळे या संस्कृतींचा परिचय करून देत गुहा यांनी आपल्या चरित्रनायकाच्या व्यक्तिमत्त्वाचा एकेक पैलू उलगडून दाखवला आहे. ‘मध्यम जात, मध्यम स्तर’ या पहिल्या प्रकरणात गुहांनी काठियावाड, पोरंबदर येथील तत्कालीन समाजव्यवस्था, संस्कृती, जातव्यवस्था यांचे चित्रण उभे केले आहे. तसेच गांधी घराण्याचाही थोडक्यात इतिहास सांगितला आहे. गांधीघराण्यातला पहिला मुलगा मोहनदासने वकिलीचे शिक्षण घेण्यासाठी इंग्लंडला जाण्याचे ठरवले, तेव्हा जातीतील काहींनी त्याच्यावर बहिष्कार टाकला होता. त्याच्या आई-वडलांनाही मुलगा परदेशात जाऊन बिघडेल, याची धास्ती होती. पण गांधींनी आईला मांसाहार न करण्याचे, मद्य न पिण्याचे आणि परस्त्रीसुखापासून लांब राहण्याचे वचन दिले. ते त्यांनी शेवटपर्यंत कधी मोडले नाही. उलट इंग्लंडला गेल्यावर गांधी शाकाहाराचा पुरस्कार करणाऱ्या चळवळीत सामील झाले. त्याची माहिती ‘शाकाहारी लोकांच्या सान्निध्यात’ या दुसऱ्या प्रकरणात आली आहे. इंग्लंडहून वकील होऊन परतल्यावर गांधींनी मुंबई आणि पोरबंदर या ठिकाणी वकिली करण्याचा प्रयत्न केला. पण त्यात त्यांना फारसे यश आले नाही. त्यांची खटपट चालू असतानाच त्यांना द. आफ्रिकेत स्थायिक असलेल्या गुजरातमधल्या मुस्लीम गृहस्थाने मार्गदर्शनासाठी बोलावले. आणि ती संधी साधून गांधींनी द. आफ्रिकेला प्रयाण केले. ‘या किनाऱ्याकडून त्या किनाऱ्याकडे’ आणि ‘दरबानमधील वकील’ या अनुक्रमे तिसऱ्या व चौथ्या प्रकरणांत गांधींच्या आफ्रिकेच्या प्रवासाच्या सुरुवातीपासून त्यांच्या दरबानमधील भारतीयांच्या लोकप्रिय वकिलापर्यंतच्या प्रवासाची हकिकत आहे.

गुहा यांनी या प्रकरणात चौथ्या प्रकरणात गांधींना पीटरमारित्झबर्ग स्टेशनवर आलेल्या पहिल्या वंशभेदाच्या अनुभवाला फारसे महत्त्व दिलेले नाही, हे आवर्जून नमूद करण्यासारखे आहे. कारण तेव्हा गांधींनी आपल्यावरील अन्यायाविरुद्ध दाद मागितली असली तरी त्यांच्या मनातील विद्रोहाची ठिणगी या प्रसंगातून पुरेशी पेटली नव्हती, असेही गुहांनी दाखवून दिले आहे. द. आफ्रिकेतील नाताळमध्ये भारतीय व्यापारी, कामगार यांचे खटले चालवताना, त्यांच्यासाठी अर्ज-विनंत्या करताना हळूहळू वंशभेदाविरुद्ध गांधींचे मानस घडू लागले. वकिलीतही चांगला जम बसू लागला. तेव्हा गांधींनी जून १८९६मध्ये भारतात परतून आपल्या कुटुंबाला आफ्रिकेला घेऊन जाण्याचे निश्चित केले.

आठेक महिने भारतात व्यतीत करून गांधी फेब्रुवारी १८९७मध्ये नाताळला परतले, तेव्हा त्यांच्यासाठी परिस्थिती संघर्षाची आणि त‌णावाची बनली होती. याचे वर्णन ‘प्रवासी कार्यकर्ता’ या पाचव्या प्रकरणात आले आहे. गांधी पहिल्यांदा आफ्रिकेला आले तेव्हा पीटरमारित्झबर्ग स्टेशनवर त्यांना केवळ वंशभेदाचा अनुभव आला होता, पण गांधी १८९७मध्ये परत आले तेव्हा नाताळमधील ज‌वळजवळ सर्व गौरवर्णियांचे गांधी लक्ष्य कसे ठरले, इथे हे प्रकरण संपते.

 ‘वकील-निष्ठावंत’ या सहाव्या आणि ‘गौरवर्णी विरुद्ध ताम्रवर्णी’ या सातव्या प्रकरणांचा एकत्रित परिचय करून देणे जास्त योग्य राहील. १९०२मध्ये गांधी पुन्हा भारतात परतले. त्यांनी मुंबईत उच्च न्यायालयात वकिली करायला सुरुवात केली. पण इथे ते अगदी नवखे वकील होते. त्यांना फारसे यश मिळत नव्हते. दरम्यान तिकडे संपूर्ण दक्षिण आफ्रिका ब्रिटिशांच्या अधिपत्याखाली आला होता. त्यामुळे नाताळ इंडियन काँग्रेसने गांधींना परतण्याची विनंती केली. ती गांधींनीही तात्काळ मान्य केली. या वेळी गांधी जोहान्सबर्गला स्थायिक झाले. तेथून काम करू लागले. त्यांनी इथे कितपत आपला जम बसतो ते पाहावे असे ठरवले आणि त्यानंतर भारतात परतायचे की पत्नी-मुलांना इथे बोलावून घ्यायचे, याचा निर्णय घ्यायचा ठरवले. पण गांधी तेथील भारतीयांच्या प्रश्नांच्या, त्यांच्या न्याय हक्कांसाठीच्या संघर्षात गुंतत गेले. १९०३मध्ये त्यांनी ‘इंडियन ओपिनयन’ हे साप्ताहिक सुरू केले. १९०४मध्ये कस्तुरबा मुलांसह द. आफ्रिकेला आल्या.

‘सर्वसमावेशक आणि सनातनी’ या आठव्या प्रकरणात गुहांनी १९०६पर्यंतच्या गांधींच्या जीवनाचे सहा वेगवेगळे पैलू नोंदवले आहेत. व्यावसायिक करिअर, राजकीय मोहिमा करण्याचे कार्य, एक प्रचारक, भारतीय समाजातील भेदाभेद नष्ट करून एकसंध समाज निर्माण करणे, स्वत:च्या कुटुंबाप्रती असलेले उत्तरदायित्व आणि गांधींची स्वत:च्या आत्मशोधाची प्रक्रिया. या सहा पैलूंचे दर्शन गुहांनी इथेवर अनेक तपशील, उदाहरणे, प्रसंग यांतून घडवले आहे.

‘ट्रान्सवालमधील असंतोष’ या नवव्या प्रकरणांपासून गांधींच्या राजकीय संघर्षाच्या धामधुमीला सुरुवात होते. ‘आफ्रिकेला निरोप’ या २१व्या प्रकरणांपर्यंत तो टप्प्याटप्प्याने गुहांनी उलगडून दाखवला आहे. हा या चरित्राचा खरा गाभा आहे. त्यामुळे खरे तर या प्रत्येक प्रकरणाविषयी लिहायला हवे. पण तसे केल्यास ती केवळ घटना-प्रसंगांची जंत्री होऊ शकेल. आणि कितीही सविस्तर लिहिले तरी गुहांनी ज्या खुमारीने, अभ्यासपूर्ण तपशीलांनी आणि बहारीने ही प्रकरणे रंगवली आहेत, ती त्यात येणे शक्य नाही. त्यामुळे त्यांचा साधारण गोषवारा सांगणे अधिक श्रेयस्कर राहील.

याच काळात कौटुंबिक पातळीवर वयाच्या विशीत प्रवेश करू पाहणाऱ्या हरिलाल या ज्येष्ठ मुलासोबतचे गांधींचे संबंध दिवसेंदिवस तणावाचे होते गेले, तो आपला मुलगा नाही, इथपर्यंत गांधी गेले. कस्तुरबा गांधी यांच्यावरही प्रसंगोपात गांधींकडून अन्याय झाला. पण याच काळात आफ्रिकेत नव्या संघर्षाला सुरुवात झाली. ११ सप्टेंबर १९०६ रोजी तेथील ब्रिटिश सरकारने नवा वटहुकूम काढून ट्रान्सवालमध्ये भारतीयांना प्रवेशबंदी करण्यासारखे कडक निर्बंध लादले. ही नव्या संघर्षाची नांदी होती. तोवर गांधी पत्रे, अर्ज-विनंत्या, न्यायालयीन खटले, शिष्टमंडळे या मार्गांनी दडपणूक करणाऱ्या कायद्यांचा विरोध करत होते. हा वटहुकूम मात्र त्यांनी धुडकावून लावत त्याविरोधात तुरुंगात जाण्याची धमकी दिली.

खरे तर गांधींना वा त्यांच्या आफ्रिकेतील भारतीय समर्थकांना ना ब्रिटिशांना आव्हान द्यायचे होते, ना त्यांची सत्ता उलथवून टाकायची होती. त्यांना फक्त निवासाचे, अस्तित्वाचे, प्रवासाचे आणि व्यापाराचे स्वातंत्र्य यांचे रक्षण करायचे होते. पण ब्रिटिशांना भारतीयांवर कडक निर्बंध लादून त्यांना गुलामीत ठेवायचे होते. गांधींनी या धोरणांविरुद्ध संघर्ष करायला सुरुवात केली. १९०७ ते १९११ या काळात ट्रान्सवालमध्ये आणि १९१३मध्ये नाताळमध्ये गांधींनी भारतीयांच्या न्याय्य हक्कांसाठी अनेक सत्याग्रह केले. अन्याय्य कायदे, कर, संचार व व्यापाराचे स्वातंत्र्य यांसाठी संघर्ष केला. अहिंसक मार्गाने हरताळ पुकारत असताना, सविनय कायदेभंग करत असताना गांधी त्यामागील विचारही घडवत होते. आणि अतिशय काटेकोरपणे मोहिमा आखून त्या पारही पाडत होते.

याच संघर्षाच्या काळात गांधींचा राजकीय विचार घडत गेला. माणसे घडवण्याचा स्वत:च्या क्षमतेवरील त्यांच्या आत्मविश्वासही दृढ होत गेला. याच काळात गांधी एक उत्तम, कुशल संपादक आणि लेखक म्हणून नावारूपाला आले. याच काळात गांधी एक समाजसुधारक, धार्मिक विचारवंत आणि राजकीय कार्यकर्ता म्हणून घडले. या काळात त्यांनी टॉलस्टॉयपासून कुराण-बायबलपर्यंतचा अभ्यास केला. या काळात ख्रिस्ती, मुस्लीम, पारशी, चिनी, तामीळ अशा विविध धर्माचे मित्र-समर्थक त्यांना मिळाले. या मित्रांच्या, समर्थकांच्या पाठिंब्याच्या जोरावर गांधींनी विविध संप, हरताळ, सविनय कायदेभंग या मार्गांचा अवलंब करत ब्रिटिशांना अनेक सुधारणा करायला भाग पाडले.

१९१३मध्ये ‘इंडियन रिलीफ बिल’ संमत होणे, ही गांधींच्या संघर्षाचा सर्वांत मोठी उपलब्धी होती. आणि गांधींचे आफ्रिकेतील अवतारकार्यही एक प्रकारे संपल्याची ती ग्वाही होती. जून १९१४मध्ये गांधी दक्षिण आफ्रिकेतून कायमस्वरूपी भारतात येण्यासाठी निघाले तेव्हा त्यांनी म्हटले होते – ‘कदाचित सत्याग्रह हे पृथ्वीतलावरील सर्वांत सामर्थ्यवान साधन आहे.’ हे परमोच्च साधन घेऊन गांधी भारतात परतले. त्यानंतरची कहाणी या चरित्राच्या दुसऱ्या भागात आली आहे. ‘महात्मा असा घडला’ हे बावीसावे आणि शेवटचे समारोपाचे प्रकरणही गुहा यांनी उत्कटतेने लिहिले आहे. त्यातून ‘गांधींचे महात्मापण’ ठसठशीतपणे अधोरेखित होते.

गांधींनी १८९३ साली दक्षिण आफ्रिकेला पहिल्यांदा प्रयाण केले, तेव्हा ते २३ वर्षांचे होते. त्यानंतरची तब्बल दोन दशके त्यांनी आफ्रिकेत घालवली. या काळात मोहनदास करमचंद गांधी या तरुणाचा वकील, राजकीय कार्यकर्ता, अहिंसक मार्गाचा प्रवर्तक, सविनय कायदेभंगाचा उदगाता, ते ब्रिटिश सत्तेला नमवणारा राजकीय नेता असा प्रवास झाला. इथेच गांधींनी आपल्या सत्याग्रहाची मुहूतमेढ रोवली. सविनय कायदेभंगाच्या माध्यमातून जुलमी सत्तेलाही नमवता येते हे दाखवून दिले. याच काळात गांधी खऱ्या अर्थाने घडले. गांधींच्या ‘घडत्या व्यक्तिमत्त्वा’चा एकेक पैलू गुहा यांनी अतिशय बारकाईने, जाणकारीने आणि अलवारपणे उलगडून दाखवला आहे. त्यामुळे गांधी ‘महात्मा’ झाले कसे, याचे उत्तर या चरित्रातून मिळते.

द. आफ्रिकेतील वास्तव्याच्या काळातच गांधींना साम्राज्यवाद, वंशवाद यांचे आकलन झाले. त्यांच्याविरुद्ध उभे ठाकत, त्यांचा सामना करण्याचे, इतकेच नव्हे तर त्याला आव्हान देत ते नेस्तनाबूत करण्याचे डावपेच आणि तत्त्वज्ञान साकार करणारी ‘द. आफ्रिका प्रयोगशाळा’ इथेच उदयाला आली. ती समजून घेतल्याशिवाय गांधींना खऱ्या अर्थाने समजून घेता येत नाही. गांधींचे ‘महात्मा’पण कसे घडले, कसे आकाराला आले, याची ही कहाणी अतिशय चित्तवेधक आणि प्रेरणादायी आहे.

..................................................................................................................................................................

'गांधी : भारतात येण्यापूर्वी' हे पुस्तक विकत घेण्यासाठी क्लिक करा - 

https://www.booksnama.com/book/5018/Gandhi-Before-India

.............................................................................................................................................

लेखक राम जगताप ‘अक्षरनामा’चे संपादक आहेत.

editor@aksharnama.com

..................................................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

Post Comment

Ram Jagtap

Sat , 02 May 2020

@ Sanjay Pawar - नाही, तो दीर्घ स्वरूपात 'ललित'मध्ये प्रकाशित झाला आहे.


Sanjay Pawar

Sat , 02 May 2020

हा लेख अक्षरनामात आधीही प्रकाशित झाला होता?


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

कित्येक वेळा माणूस एकटेपणाच्या फटकाऱ्यांनी इतका वैतागतो की, आपणच आपले प्रेत आपल्याच खांद्यावर घेऊन चाललेलो आहोत, असे त्याला वाटते

मन मरून गेलेले, प्रेतवत झालेले असते. पण शरीर जिवंत असते म्हणून वाटचाल सुरू असते. इतकेच! मागून आपल्याला छळणारे लोक कोल्ह्या-कुत्र्यासारखे आपल्याला त्रास द्यायला येत असतात. अशा वेळी स्वतःच स्वतःचा हा प्रवास संपवावा असे वाटते. आपण गेलो, तर केवळ आपल्या शरीराला खाणाऱ्या मुंग्यांना आपल्यात रस राहील. आणि त्यांनी खाऊन आपण संपलो, म्हणून फक्त त्यांना आपल्या संपण्याचे वाईट वाटेल. तेच मुंग्यांनी आपल्यासाठी गायलेले शोकगीत!.......

‘एच-पॉप : द सिक्रेटिव्ह वर्ल्ड ऑफ हिंदुत्व पॉप स्टार्स’ – सोयीस्करपणे इतिहासाचा विपर्यास करून अल्पसंख्याकांविषयी द्वेष-तिरस्कार निर्माण करणाऱ्या ‘संघटित प्रचारा’चा सडेतोड पंचनामा

एखाद्या नेत्याच्या जयंती-पुण्यतिथीच्या निमित्तानं रचली जाणारी गाणी किंवा रॅप साँग्स हा प्रकार वेगळा आणि राजकीय क्षेत्रात घेतल्या जाणाऱ्या निर्णयांवर, देशातील ज्वलंत प्रश्नांवर सातत्यानं सोप्या भाषेत गाणी रचणं हे वेगळं. भाजप थेट अशा प्रकारची गाणी बनवत नाही, पण २०१४नंतर जी काही तरुण मंडळी, अशा प्रकारची गाणी बनवतायत त्यांना पाठबळ, प्रोत्साहन आणि प्रसंगी आर्थिक साहाय्य मात्र करते.......

या स्त्रिया म्हणजे प्रदर्शनीय वस्तू. एक माणूस म्हणून जिथं त्यांना किंमत दिली जात नाही, त्यात सहभागी होण्यासाठी या स्त्रिया का धडपडत असतात, हे जाणून घेण्यासाठी मी तडफडत होते…

ज्यांनी १९७०च्या दशकाच्या अखेरीला मॉडेल म्हणून काम सुरू केलं आणि १९८०चं संपूर्ण दशकभर व १९९०च्या दशकाच्या सुरुवातीचा काही काळ, म्हणजे फॅशन इंडस्ट्रीच्या वाढीचा आलेख वाढायला सुरुवात झाली, त्या काळापर्यंत काम करत राहिल्या आहेत, त्यांना ‘पहिली पिढी’, असं म्हटलं जातं. मी जेव्हा त्यांच्या मुलाखती घेतल्या, तेव्हा त्या पस्तीस ते पंचेचाळीस या दरम्यानच्या वयोगटात होत्या. सगळ्या इंग्रजी बोलणाऱ्या.......

निर्मितीचा मार्ग हा अंधाराचा मार्ग आहे. निर्मितीच्या प्रेरणेच्या पलीकडे जाणे, हा प्रकाशाकडे जाण्याचा, शुद्ध चैतन्याकडे जाण्याचा मार्ग आहे

ही माया, हे विश्व, हे अज्ञान आहे. हा काळोख आहे. त्याच्या मागील शुद्ध चैतन्य हा प्रकाश आहे. सूर्य, उषा ही भौतिक जगातील प्रकाशाची रूपे आहेत, पण ती मायेचाच एक भाग आहेत. ह्या अर्थाने ती अंधःकारस्वरूप आहेत. निर्मिती ही मायेची स्फूर्ती आहे. त्या अर्थाने माया आणि निर्मिती ह्या एकच आहेत. उषा हे मायेचे एक रूप आहे. तिची निर्मितीशी नाळ जुळलेली असणे स्वाभाविक आहे. निर्मिती कितीही गोड वाटली, तरी तिचे रूपांतर शेवटी दुःखातच होते.......