‘जिनके लिए’ : प्रतारणा आणि उपेक्षा यांचा एक सुरेल निषेध…!
पडघम - देशकारण
जयदेव डोळे
  • ‘जिनके लिए’ या गाण्यातील एक दृश्य
  • Thu , 30 April 2020
  • पडघम देशकारण जिनके लिए Jinke Liye नेहा कक्कड Neha Kakkar करोना विषाणू Corona virus करोना Corona करोना व्हायरस Coronavirus लॉकडाउन Lockdown

कोविड-१९चा धुमाकूळ आवरायला पंतप्रदान नरेंद्र मोदी यांनी कोणाला न विचारता, कोणाला विश्वासात न घेता, एकतर्फी असा विहारबंदी (Lockdown)चा निर्णय जाहीर करताच देशभर खळबळ उडाली. नोटबंदीही मोदींनी अशीच लहरी आणि गुप्त पद्धतीने केलेली होती. नोटबंदीवेळी फार प्रतिक्रिया, लोकक्षोभ वगैरे उमटला नाही. यंदा मात्र मोदींनी अतिरेक केला हे लोकांनी मुखावाटे कमी पण पावलावाटे सांगून टाकले! लाखो कष्टकरी रस्ते तुडवत गावी निघाले तो पायी निषेधाचाच प्रकार होता. हातात सामान व मुले होती. डोक्यावर गाठोडी अन डोक्यात एक चीड, पश्चाताप आणि फसवणूक झाल्याची भावना गरगरा फिरत होती. परंतु ती व्यक्त करायला ना कोणापाशी वेळ होता, ना उसंत! पण एक गाणे या विहारबंदीवेळीच जन्मले अन ते या लाखो जिवांच्या भावना व्यक्त करू लागले. ते गाणे ना कष्टकऱ्यांचे, ना गरिबांचे, ना रस्त्यावरचे! तसे गाण्याचे शब्दही यथातथाच आहेत. गाण्यावर अभिनय करणाऱ्यांचा वकुबही माफक आहे. पण गाण्याचा आशय, त्याची चाल अन त्याचा शेवट असा काही उत्कट अन धक्कादायक आहे की, त्याने लाखो लोकांना पुन:पुन्हा ते गाणे व त्याचा व्हिडिओ पाहायला प्रेरित केले. जणू विद्यमान परिस्थितीवर सबंध भाष्यच एका गाण्याच्या व्हिडिओमधून उमटत होते.

ते गाणे म्हणजे नेहा कक्कड हिने गायलेले आणि अभिनित केलेले ‘जिनके लिए’…! पाहिलेत कधी? ऐकलेत कधी? टीव्हीवरच्या सांगीतिक वाहिन्यांनी ते दाखवून दाखवून राष्ट्रगान करून टाकलेय. एफ.एम. वाहिन्यांनीही त्याची पुनरुक्ती करून स्पर्धेत आपण मागे नसल्याचे जाहीर करत तेही गाणे जुने करून टाकले. मी तर आमच्या शहराच्या कचरा गोळा करणाऱ्या वाहनातल्या टेपरेकॉर्डरवरही ते एके सकाळी ऐकले. एरवी कचरा, स्वच्छता यांवर एक गाणे ही वाहने ऐकवून आपल्या आगमनाची वर्दी रहिवाश्यांना देत असतात.

पण या वाहनानेच माझे कान टवकारले. प्रेमभंग, प्रतारणा, उपेक्षा, फसवणूक, परित्याग आदी भावना एक उत्कट, कातर व विकल आवाजात गाणारी नेहा कक्कड प्रथमच ऐकू येत होती. चार-पाच मिनिटांच्या त्या व्हिडिओत नवरा-बायको यांच्या नात्याची गोष्ट जरा बटबटीत, पण पुरेशी करुणा उत्पन्न होईल अशा पद्धतीने सांगितली आहे. आपल्या बदफैली पतीला त्याच्या प्रेयसीसमक्ष आपले फाटलेले हृदय उलगडून सांगणारी ती पतिव्रता भारतीय नारी खूप रडून त्याला थोपवायचा प्रयत्न करते. पण तो तिला नाकारतो. अखेर तो व प्रेयसी यांच्या समक्ष ही पत्नी उंच इमारतीवरून खाली उडी मारून आत्महत्या करते. गाणे संपते अन धाडकन आवाजात ती भारतीय पत्नी खाली उभ्या मोटारीवर पडते, तेव्हा तो आणि प्रेयसी प्रचंड हादरतात. आपण बघणारेही थरकापतो.

मार्चचा शेवटचा आठवडा व एप्रिलचा पंधरवडा ‘जिनके लिए’ने कित्येक मनांचा ठाव घेतला. गाण्यातली प्रतारणा विद्यमान राज्यकर्त्यांच्या वर्तनाला चिकटू लागली. आपल्याला एकाएकी रस्त्यावर आणून सोडणारा हा राज्यकर्ता आणि जीव देण्याशिवाय दुसरा मार्गच न राहिलेले आपण भारतीय कष्टकरी यांची सांगड नेहा कक्कडच्या त्या व्याकूळ अन अपमानित स्वरांशी घातली जाऊ लागली… किती प्रेम केले आपण? आपले काय चुकले? का असे एकाकी सोडून दिले आपल्याला? मत दिले अन प्रेम केले या क्रियाही एकवटल्या, पण काय मिळाले बघा, मतदान करून असाही विचार घोंगावू लागला मनामनात. पायाखालचा तापलेला महामार्ग, विनाकारण क्वारंटाइन झालेले जगणे, रोजगारासकट साऱ्या भविष्याची झालेली आपदा, गावी अडकून पडलेले आपले प्रिय जीव… असे सारेच डोक्यांत तरळू लागले अन एक प्रकारची विफलता, फसवणुकीची जाणीव गडद होत चालली.

तसे पाहिल्यास कोणतीही कलाकृती अगदी त्या काळावर आपले म्हणणे मांडणारी असतेच असे नाही. तसे कोणी ठरवून काळावर भाष्य क्वचितच करतो. भारतीय मनोरंजन उद्योग तर तसे कधीही करत नाही. पण कित्येकदा नकळत एखादी कलाकृती प्रचलित काळाशी सुसंगत काही सांगते असे वाटू लागते आणि लोकही तीत आपल्या भावना आणि विचार बघू लागतात. १९८० साली जनता पार्टीचे सरकार कोसळले. मोठ्या उत्साहाने भारतीयांनी हा पक्ष सत्तेवर बसवला होता. अंतर्गत मतभेद व कारस्थाने यांमुळे तो पुरता मनातून उतरला. त्यावेळी ‘निकाह’ नावाच्या चित्रपटातील ‘दिल के अरमां आसूओं में बह गए’ हे सलमा आगाचे गाणे प्रचंड गाजले. जणू तिच्या गाण्यामधून भारतीयच बोलत आहेत!

पी. व्ही. नरसिंहराव यांच्या सरकारने १९९१मध्ये जागतिकीकरण, उदारीकरण, खाजगीकरण यांची अर्थव्यवस्था मोठ्या दडपणाखाली स्वीकारली. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी व जागतिक बँक यांनी भारताला नवे वळण दिले. त्या काळी ही परिस्थिती आणि ‘तू हा कर या ना कर, तू हैं मेरी किरण’ हे गाणे प्रचंड लोकप्रिय झाले. नाईलाज, निरुपाय या भावनांसह जबरदस्ती, सक्तीही या गाण्यांतून व्यक्त झाली. भारत तेच अनुभवत होता.

स्वातंत्र्यानंतर दहा वर्षांनीही भारत सुधारेना याचे प्रतिबिंब ‘जिन्हें नाज है हिंदपर वो कहाँ है’ (‘प्यासा’) या गाण्यामधून प्रकटले होते. ‘मेरे अपने’ हा विनोद खन्ना व शत्रुघ्न सिन्हा यांचा पहिला चित्रपट. त्यातील ‘हालचाल ठीकठाक है, सबकुठ ठीकठाक है, बीए किया है, एमे किया’ हे गाणे त्यावेळच्या वाढत्या बेकारीचे राष्ट्रगीतच बनले होते. कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (सीपीआय) फुटली १९६४च्या नोव्हेंबरात आणि ‘संगम’ हा राज कपूरचा चित्रपट आला जूनमध्ये. त्यातील ‘दोस्त दोस्त ना रहा’ हे गाणे डाव्यांमध्ये व कामगारांमध्ये खूप लोकप्रिय झाले. माकप व भाकप यांचे अनेक कार्यकर्ते असे या गाण्याने एकत्र आणले होते!

भाजपचे राज्य देशावर आल्यापासून तर हिंदी चित्रपट उद्योगाने आजपर्यंत किमान ३०-३५ चित्रपट दहशतवाद, इस्लाम, हेरगिरी, पाकिस्तान, हिंदू-मुस्लीम, राष्ट्रवाद, हिंदुत्व, धर्म इत्यादी विषयांवर तयार केले आहेत. ‘पॅडमॅन’, ‘सुई-धागा’, ‘टॉयलेट – एक प्रेमकथा’, ‘पोखरण’, ‘एअर लिफ्ट’, ‘उरी’, यांसारखे चित्रपट तर उघड भाजपच्या कार्यक्रमांशी संबंधित होते.

तेव्हा नेहा कक्ड हिचे ‘जिनके लिए’ हे गाणे या सरकारवरचा प्रेमभंग व्यक्त करणारे आणि ते गरिबांपेक्षा कोटा येथील विद्याथी, गुजरातमधील भाविक यांच्या काळजीत आपल्याशी प्रतारणा करणारे वाटले तर त्यात नवल काय?

..................................................................................................................................................................

लेखक जयदेव डोळे माध्यम विश्लेषक आहेत.

djaidev1957@gmail.com

..................................................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा