मी कशाला आरशात पाहू ग, मीच माझ्या रूपाची राणी ग
पडघम - माध्यमनामा
जयदेव डोळे
  • प्रातिनिधिक चित्र
  • Sat , 18 April 2020
  • पडघम माध्यमनामा गोदी मीडिया Godi Media मोदीबिंदू Motibindu देेवेंद्र दल Devendra Dal लष्कर-ए-देवेंद्र lashkar-e-Devendra

‘गोदी मीडिया’ हा शब्दप्रयोग आता जगप्रसिद्ध झालेलाय. ‘मोदीबिंदू’ हाही जुना झालाय. ‘देवेंद्रदल’ हा मात्र अजून तेवढा लोकप्रिय झालेला नाहीय. किंबहुना तो अगदी लपतछपत उच्चारला जाई, एखाद्या गँगच्या संकेतासारखा. मराठी पत्रकारितेत गेली पाच वर्षे ‘देवेंद्रदल’ नुसता उच्छाद घालत होते. कोणतेही बडे वर्तमानपत्र घ्या, कुठलीही वृत्तवाहिनी घ्या, मरतुकडी आकाशवाणी अन वयोवृद्ध दूरदर्शन घ्या, जिकडे तिकडे ‘देवेंद्रदल’ तैनात! आत काय शिरू द्यायचे व बाहेर काय जाऊ द्यायचे यावर ते कटाक्ष ठेवणारे. इतकेच काय, संपादक कोणाला नेमायचे आणि चर्चेसाठी कोणता विषय ठरवून कोण्या ‘डाव्याला’ वगळायचे हेही ‘देवेंद्रदला’चे काम असे.

कोणी देवेंद्र फडणवीस यांच्या हुशारीवर लट्टू, तर कोणी त्यांच्या वाकचातुर्यावर. कोणी त्यांना ‘आपला’ माणूस म्हणून चाहू लागला, तर कोणी ‘अभाविप’मधला जुना भाऊ म्हणून कवतिक करत सुटली. पण ‘एलइडी’ अर्थात ‘लष्कर-ए-देवेंद्र’ असा एक वर्णनपर शब्दप्रयोग मराठीत रूढ होतो ना होतो, तोच सारा सारीपाट उधळला गेला!

मग काय मनात खट्टू झालेला, आपली सत्ता गेल्याने हळहळणारा आणि पुन्हा देवेंद्राची सेवा करायला आतूर झालेला या दलाचा एकेक शिपाई नव्या सत्तेशी जुळवून घेऊ लागला. पण हाय, जुन्या दिवसांचा तो तोरा गेलेला. एकीकडे जळफळाट तर दुसरीकडे तंबी : करा, काहीतरी करा. सरकार पाडा. पाडायला संधी मिळेल अशी काही सबब शोधा. खाल्ल्या मिठाला जागा…!

आता गंमत अशी की, हे मराठी पत्रकार बिचारे सारे नोकरदार. म. फुले यांच्या भाषेत पोटबाबू! त्यांचे मालक कधीचेच भाजपभक्त होऊन ‘मोदीमहिमा’ गाऊ लागले होते. यांना तटस्थपणाचा अन नि:पक्षपातीपणाचा विषाणू डसलेला. आपण कोणाची बाजू घ्या कशाला उगाचच, असा आजार जडलेला.

मग ‘देवेंद्रदला’चे संस्थापक समजावायला सरसावले. झाले! दलाची भरती सुसाट आरंभली. हिंदुत्ववादी असा की नसा, ब्राह्मण असा की नसा, सत्तेला ‘आपली’ म्हणा असा आग्रह सुरू झाला. सर्वत्र या दलाला अॅक्सेस मिळाला. सत्ताकेंद्र एसेमेसच्या कक्षेत आले. प्रत्यक्ष साहेब फोनवर माहिती देऊ लागले. फ्लॅट, प्लॉट, एजन्सी, कंत्राट, कमिशन, नोकरी, संस्था, शिफारस, जाहिराती, फेसबुक अकाउंट, बेवसाईट डिझाईन, आयात-निर्यात, व्हिसा, अॅडमिशन, रेस्तराँ… जे हवे ते मिळू लागले. हे सारे अर्थातच तटस्थ, नि:पक्ष आणि स्वतंत्र राहून बरे का!

मैत्रीत साहेब गणपतीच्या दर्शनाला घरी येऊ लागले, मुलीच्या लग्नात हजेरी लावू लागले, परदेशी जाणाऱ्या मुलाला शुभेच्छा देऊ लागले. आता यात वावगे ते काय? कोणीही मानवी पातळीवर करतोच हे सगळे… ना? हो, खरेय. पण त्या बदल्यात केवढ्या तरी बातम्या दाबल्या गेल्या, त्या कोणाला माहीत! शिवाय दल काय, परिवार काय, एकच! एकदा ‘परिवारा’त दाखिला मिळाला की, काय शामतंय इकडचे तिकडे काही व्हायची? ‘देवेंद्रदल’ पाहता पाहता ‘देवेंद्र परिवार’ होऊन गेला आणि परिवार आपले नियम, अटी, शर्ती, शिस्त अन व्यवस्था या बंधूभगिनींना आवळत राहिला. खूप तडफड झाली, पण करता काय! पुरते विकले गेले होते सारे. चारित्र्य, बुद्धी, कौशल्य, नाव, प्रतिष्ठा…

अशा वातावरणात वाधवान कुटुंबाला महाबळेश्वरला जायला ना हरकत प्रमाणपत्र देणारी ती बातमी साधार, सप्रमाण सांगा की कोंडमारा सोसणाऱ्या श्रमिकांना रेल्वे घेऊन जाणार त्याची हवाल्यानिशी वार्ता द्या, सरकारला धक्का द्यायची ही ‘देवेंद्रदला’ची आणखी एक उतावीळ धडपड अशीच ती पाहिली गेली. बस्स! सापडले कुलकर्णीच. संशयाला पुष्टीच पुष्टी. खडसे, तावडे, मुंढे, मेहता, लोढा, सोमय्या वगैरे स्वपक्षियांना या दलामार्फत धडा शिकवणाऱ्याला आता थेट दणका दिलाच पाहिजे, असा विचार अमलात आणला गेला.

हा, प्रश्न असाय की पत्रकारावर अन्याय, बातमी देण्याच्या हक्कावर गदा किंवा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गळा दाबला अशी ओरडाओरड करायची की चौथी सत्ता झालेल्यांना बसलेला सत्तेच्या राजकारणातलाच हा एक तडाखा होता? गेली पाच-सहा वर्षे भाजपने अवघी माध्यमे सत्तेत आणली. त्यात दबाव किती, आमिषे केवढी वा समविचारी कोणती हा मुद्दाच नाही.

‘इंडियन एक्सप्रेस’, ‘टेलिग्राफ’, ‘एनडीटीव्ही’, ‘हिंदू’, ‘वायर’, ‘न्यूजक्विक’, ‘पीपल्स पोस्ट’ आदींचा अपवाद वगळता अखिल भारतीय पत्रकारिता सत्तेत मदमस्त (मोदीमस्त) झालेलीय. तुमच्या राजकारणातला एक डाव तुमच्यावर उलटला व तुमचा एक गडी गटला एवढाच काय तो मुद्दा! पत्रकारितेच्या सर्वस्वाचे अपहरण तुमच्या संमतीने मोदी व संघ परिवार यांनी कधीचेच केलेय. त्याविरुद्ध बोलणेही एक कांगावा ठरू शकतो. कारण परतफेडीच्या बोलीवर ही कणाहीन व अनैतिक झालेली माध्यमे स्वत:ला मोकळी करवून घेतीलही. मांडी मोदींची असू द्या की दादांची. तिथेच बसणाऱ्यांना बाहेरच्यांची भलामण का लागावी?

रिझर्व्ह बँक, निवडणूक आयोग, सर्वोच्च न्यायालय, संसद, प्रसारभारती, राष्ट्रीय संख्याशास्त्र संस्था, जवाहरलाल नेहरू विद्यापीठ, भारतीय चित्रपट प्रशिक्षण संस्था, नॅशनल बुक ट्रस्ट, भारतीय वृत्तपत्र परिषद आणि कित्येक संस्था या परिवाराने खिळखिळ्या करून टाकल्या. खाजगी हातात असणाऱ्या माध्यमांच्या संस्था त्या पुढे कितीशा टणक?

खाजगीकरण व उदारीकरण यांसह जागतिक झालेल्या माध्यमांना आपली प्रगती पारतंत्र्यात असल्याचा उलगडा तर झालाच, पण भाजपव्यतिरिक्त कोणताही राजकीय विचार देशात राहायला अपात्र असल्याचाही साक्षात्कार झाला. माध्यमे स्वत:ला लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणवून घेण्यापेक्षा चौथी राजसत्ता असण्यात गौरव मानू लागली.

‘BEG, BORROW, OR STEAL’ असे एक सूत्र बातमीदारांसाठी बातमी मिळवण्याबाबत फार काळापासून प्रचलित आहे. परिवाराने काय केले? ही वेळच येऊ दिली नाही. राष्ट्र, धर्म, चारित्र्य, सेवा, शिस्त, संघटन, ऐक्य, भक्ती या गोष्टींना पृच्छा करायची नसते. सबब त्या गोष्टी जिथे जिथे असतील तिथे तिथे बातम्याच नसतात, असा भ्रम पैदा केला गेला. माध्यमांच्या डोक्यात तो भरवला. सरकार म्हणजे राष्ट्रभक्त, पवित्र, चारित्र्यवान व नैतिक लोकांचे राज्य!

ते कसे काय माध्यमांच्या संशयाला कारण ठरू शकते असा प्रेमळ दमही दिला. मालकांना जे हवे असते, ते सरकारकडून मिळेल यासाठी सरकारमध्ये म्हणजे राष्ट्रसेवेत सामील व्हा, असा दंडकही घालून ठेवला. मालकांना स्वार्थ, फायदा पाहिजेच होता. त्यांनी तो आनंदाने चाखायला सुरुवात केली. ज्यांना कारकुनी व पत्रकारिता यांमधला फरक समजत नव्हता, तेही या राष्ट्रसेवेत उत्फुल्ल अन पुढे उन्मादी बनले. त्यांना आपलीच थोरवी वाटू लागली. देशाचे भले करायचे असेल तर भलेच चिंतिले पाहिजे व बोलले पाहिजे, असा दृष्टान्त त्यांना झाला.

त्यानुसार महाराष्ट्र निर्विघ्न वाटचाल करू लागला. महाराष्ट्राला कुठे दुखणार नाही, खुपणार नाही असे वर्तन पत्रकार करत सुटले. तो नादान, दुष्ट व कृतघ्न विरोधी पक्ष; ते पातकी व पाताळयंत्री विचारक; ती स्वैराचारी, आत्मकेंद्री कलावंत मंडळी; ते आपल्यातीलच बेताल व बेदरकार वागळे, शर्मा, वाजपेयी, सरदेसाई, खांडेकर, रवीश, अंजुम, उर्मिलेश, फाये डिसूझा, वरदराजन… या तमाम नतद्रष्टांनी केवढा मोठा राष्ट्रघात केलाय. बरे झाले, त्यांना देशाने बघून घेतले. राष्ट्रभक्तांच्या बातम्या देता काय, राष्ट्रवाद्यांचा प्रतिवाद करता काय… हा देश हुकूमशाहीशिवाय सुधारणार नाही अन नव्हताच. हे असले काटे वाटेवरून दूर केले ते बरेच झाले.

तेव्हा महान राष्ट्रभक्त राहुल कुलकर्णी आणि राष्ट्रीय सेवा संस्था ‘एबीपी माझा’ यांना आमच्यासारख्या द्रोही लोकांचा पाठिंबा कशाला हवा?

.............................................................................................................................................

लेखक जयदेव डोळे माध्यम विश्लेषक आहेत.

djaidev1957@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा