करोना व्हायरसची समस्या आपण टाळू शकत नाही. म्हणून त्याला धैर्याने सामोरे जाण्यातच शहाणपण आहे.
पडघम - देशकारण
स्वप्निल पांगे
  • प्रातिनिधिक चित्र
  • Tue , 31 March 2020
  • पडघम देशकारण करोना विषाणू Corona virus कोविड-१९ Covid-19 करोना Corona करोना व्हायरस Coronavirus

२०२०ची सुरुवात झाली, तेव्हा आपल्यापैकी कोणालाही पुसटशीदेखील कल्पना आली नसेल की, दोन महिन्यात आपण सारे आपल्या घरात स्थानबद्ध होणार. खरं तर लॉकडाऊन होऊन आठ दिवसही झाले. सुरुवातीला आपण सगळेच एका संभ्रमावस्थेत होतो. “छे! आपल्याला काही होणार नाही इथंपासून” ते “अरे बापरे, आता आपलं कसं होणार?” या प्रश्नापर्यंत आपण सगळेच येऊन पोहोचलोय.

जगाच्या कानाकोपऱ्यात करोना नावाच्या विषाणूने नुसता कहर माजवला असताना प्रत्येक देशाचे प्रशासन आपापल्या परीने या संकटाशी मुकाबला करण्यासाठी प्रयत्न करतेच आहे. परंतु नागरिक म्हणून आपण सर्वांनी प्रशासनाने दिलेल्या सूचना पाळणे जरुरीचे आहे. त्यासाठी मनावर संयम ठेवून स्वतःसाठी काही मर्यादा आखून घेणे सर्वांत महत्त्वाचे.

आता कुठे आपण या एकांतवासाशी हळूहळू जुळवून घ्यायला लागलोय. मनाच्या कोपऱ्यात हेही दिवस जातील असं म्हणून आपण एकमेकांना धीरही देतोय. पण आपण सगळेच थोडेफार ग्रस्त आहोत. समोर एक आव्हान आहे, ज्याची मुदत कधी संपणार, हेही आपल्याला माहीत नाही आणि त्याच्यावर सध्या पूर्णपणे मात करता येणे अशक्य दिसत आहे. एकंदरीत आपल्या मनातील आतापर्यंत सुप्त निद्रित असलेल्या चिंतासुराला जाग येण्यासाठी आणि कार्यरत होण्यासाठी पोषक वातावरण तयारही आहे. त्यामुळे भीती किंवा चिंता ही भावना जोरदार उफाळून येऊ शकते.  अशा वेळेस आपले मानसिक स्वास्थ्य जपणे खूप महत्त्वाचे आहे.

सुरुवातीला जाणून घेऊयात चिंता किंवा भीती म्हणजे नेमके काय?

मनुष्याकडे काळाच्या पुढचा विचार करून भविष्याबद्दल तर्क करण्याची एक विलक्षण क्षमता आहे. या क्षमतेमुळे संभाव्य धोके टाळण्यासाठी काय काय उपाययोजना करता येतील, याचा एक अंदाज बांधणे शक्य आहे. उदाहरणार्थ- वारंवार हात धुवून किंवा सामाजिक अंतर ठेवून करोनापासून होणारा संसर्ग आपणास टाळता येईल. म्हणजेच “या संकटावर मी मात करू शकतो” हा  विचार आला की, थोडीशी भीती कमी होइल. “परंतु वारंवार हात धुऊन किंवा योग्य ती काळजी घेऊनसुद्धा मला करोना झाला तर” हा जास्तीचा विचार माझी चिंता वाढवेल. त्यात भरीस भर म्हणून “एकदा का जर मला करोना झाला, म्हणजे संपले सगळे” हा टोकाचा विचार मला भीतीच्या ऊंच झोक्यावर घेऊन जाईल, जिथे मला माझ्या रोगमुक्त होण्याच्या काहीच शक्यता दिसणार नाहीत. एकदा का या चिंतेच्या जाळ्यात अडकलो की, आपल्याला आपल्या प्रतिकार शक्तीबद्दल (शारीरिक तसेच मानसिकही) भरवसा वाटणार नाही.

बरे, हे विचार नुसते मनात येऊन थांबतात असेही नाही. एका मागोमाग एक समुद्राच्या लाटांसारखी  टोकाच्या, तीव्र नकारात्मक विचारांची शृंखलाच आपल्या मनात उसळत असते. ती “घाबरू नको, काही होणार नाही तुला” अशा वरवर मलमपट्टी करणाऱ्या दिलाश्यांना आवरत नाही. भरीस भर म्हणून डोळ्यासमोर अनेक नकारात्मक दृश्ये येतात आणि त्यांना आपले करोनाबद्दलचे टोकाचे नकारात्मक विचार अगदी भडक करतात.

अशा अनुभवातून जाताना आजारा बद्दलची भीती आणखी गडद होते आणि सगळे आपल्या नियंत्रणाबाहेर आहे, अशी आपल्याला खात्रीच पटते. उदाहरणार्थ, जराशी शिंक किंवा थोडा सततचा खोकला आल्यावर “मला करोना झाला तर नाही ना” असा एक विचार मनाला शिवून जातो. तसे वाटणेसुद्धा स्वाभाविकच आहे. कारण २४ तास आपण तेच ऐकतोय, पाहतोय त्यावर बोलतोय.

पुढे जाऊन “मी करोना चाचणीमध्ये पॉझिटिव्ह आढळलो तर?”, “मी कित्येक जणांना संसर्ग दिला असेन आतापर्यंत”, “अरे देवा, मी माझ्या प्रिय व्यक्तींपासून आता दुरावणार”, “मला हे खूप असह्य होतंय” या सगळ्या विचारांची गुंतागुंत होऊन शेवटी भीती एकदाची आपल्या मनात घर करून राहते.

हे भीतीदायक विचार मनात जरी उमटले असले, तरी त्याचे पडसाद हे शरीरावर पण दिसू शकतात. जर आपण सतत ह्या चिंताग्रस्त अवस्थेत राहिलो तर हळूहळू शरीरावर त्याचा ताण येऊन डोके दुखत राहते किंवा अंगदुखी, पूर्ण थकवा आल्यासारखे वाटते. सतत मन अस्वस्थ राहते. अभ्यास किंवा काम करताना एकाग्रतेत अडथळा येतो. झोप आणि भूक यावर परिणाम होतो.

करोनाची भीती वाटण्याचे एक कारण म्हणजे हे आव्हान मुळातच जैविक म्हणजे जीवावर बेतणारे आहे. तसेच त्याबद्दल कमालीची अस्पष्टता आहे. अशा प्रकारच्या वैश्विक संकटाला आपली पिढी प्रथमच सामोरी जात आहे. त्यामुळे त्याचा सामना करण्यासाठी पुरेशी सजगता आधीपासूनच नाही. बरे, त्याबाबतीत काही पुढचा अंदाजही लावता येई नाहीये. सारेच काही अकल्पित आणि अस्पष्ट. त्यामुळे चिंताग्रस्त होण्यास पोषक वातावरण आहे.

मग या ‘अस्मानी’ संकटाला सामोरे कसे जाणार?

एक गोष्ट लक्षात ठेवुयात की, जो सशक्त असेल आणि या बदलाशी जुळवून घेईल तोच टिकेल. त्यामुळे आपल्याला आपल्या शारीरिक तसेच मानसिक रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यावर भर दिला पाहिजे. 

सर्वप्रथम आपल्या नियंत्रणमध्ये काय आहे, त्यावर लक्ष केंद्रित करूयात. या साथीच्या रोगात आपण काय काळजी घेतली पाहिजे, ती सगळी घ्यायलाच हवी. घरी बसून काय काय करता येईल, ते आपण सगळे जण करत आहोतच. हे झाले आपल्या नियंत्रणाखालचे घटक.

‘आज मी घरी बसलो तर उद्या माझं कसं होईल?’, ‘लॉकडाउन कधी संपणार?’, ‘आर्थिक सुबत्ता परत कशी येणार?’ हे आता तरी आपल्या नियंत्रणाबाहेरचे घटक आहेत. त्यांना थोडा वेळ बाजूला ठेवूयात. पण हे सगळे निवळल्यावर काय करायचे ही भविष्याबद्दलची आखणी मात्र मी आता नक्कीच करू शकेन. 

दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे आपल्याला भेडसावत असलेली भीती कितपत ‘वास्तव’ आणि कितपत ‘अवास्तव’ याच भान येणे महत्त्वाचे.

म्हणजे जर चिंता ही खऱ्याखुऱ्या समस्येबद्दल असेल तर त्याबद्दल तात्काळ उपाय योजना करता येते. म्हणजेच त्या समस्येवर उकल शोधणे शक्य असते. आता आपल्यासमोर असलेल्या विषाणूच्या समस्येवर उपाय काय तर वारंवार हात धुणे, मास्क वापरणे, गर्दी टाळणे आणि लक्षणे दिसताच वैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधणे.

मुळातच भीती ही आपल्यामध्ये अनादी काळापासून नैसर्गिकरित्या पूर्वनियोजित आहे. ही भावना खरे तर आपल्या जगण्यासाठी खूप गरजेची आहे. जीवाची भीती वाटलीच नाही तर समोर दिसत असलेल्या हिंस्त्र पशुंपासून किंवा इतर टोळ्यांपासून स्वतःचा बचाव कसा करता येईल?

पण जर का चिंता भविष्यात घडणाऱ्या घटनांबद्दल असेल आणि त्यावर जर आपण आता काहीच करू शकत नसू, तर ती चिंता अपायकारक होऊ शकेल. कारण त्यात आपण एखाद्या संभाव्य धोक्याला (मला हा आजार होणारच किंवा अगदी टोकाचा म्हणजे मरणाबद्दलची शक्यता) १०० टक्के होणारच असे मानून चालतो.

जे होणार आहे ते फार भयंकर असेल आणि ज्याला मी काहीच करू शकणार नाही, अशा विचारांमधून उत्पन्न होणारी चिंता ही नक्कीच हानिकारक. कारण त्यात आपण फक्त अमूक एक घडेल आणि तमूक एक होईल, असे फक्त अंदाजच बांधत राहतो. त्यावर उपाय शोधत नाही. आणि गमत म्हणजे ‘मला हा त्रास नकोच’ असे केवळ म्हणण्यामुळे ती गोष्ट घडणारच नाही, याची शाश्वतीसुद्धा नाही.

अशा अवास्तव चिंतेमुळे आपल मन पोखरून निघते आणि वर्तमानामध्ये ज्या उपाययोजना करत येण्यासारख्या आहेत, त्यांचादेखील विसर पडतो.

मग नक्की करायचे काय? या भीतीवर मात कशी करायची? त्यासाठी स्वतःला आधी काही प्रश्न विचारायचे आणि त्याची वास्तविक उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करायचा.

सर्वांत प्रथम माझ्यासमोर उभी असलेली समस्या ही अडचण, आपत्ती की प्रलय? अडचण म्हटली की, मी त्यावर काहीतरी उपाय शोधण्याचा प्रयत्न करेन. माझ्या नियंत्रणाखाली असलेल्या सर्व घटकांचा योग्य तो वापर करून समस्या सोडवण्यावर भर देईन. त्या समस्येकडे मी मानवनिर्मित एक आव्हान म्हणून बघेन. सध्याच्या ‘करोना’मय परिस्थितीमध्ये मी घराबाहेर पडून काम-धंदा नक्कीच करू शकत नाही. पण काहीतरी लिखाण, वाचन करेन, माझे छंद जोपासेन.

‘आठवड्यातून रविवार येतील का रे दोनदा?’ असे आपण लहानपणी भोलानाथला गमतीने विचारले होते. तेव्हा थोडंच वाटलं होतं की, अशी वेळ येईल जेव्हा रोजच रविवार असेल! तर मग आता माझ्याकडे उपलब्ध असलेल्या वेळेचा मी सदुपयोग करून त्याचा माझ्या भविष्य बांधणीसाठी कसा उपयोग करून घेईन, हे ठरवले पाहिजे.

जर करोनाकडे एक प्रचंड आपत्ती किंवा अस्मानी संकट म्हणून बघितले तर, मी त्या प्रलयाखाली दडपून जाईन. त्या अवस्थेत गेलो तर मला माझ्या हातातल्या गोष्टींवर काहीच काम करता येणार नाही. फक्त मी नशिबाला आणि चीनला दोष देत बसेन. बरे या दोषारोपाने काय साध्य होणार आहे?

दुसरी गोष्ट म्हणजे या समस्येकडे बघताना ती अशक्य, कठीण की, सोपी, हे मी कसे बघणार हा चॉईस माझा असू शकतो.

अशक्य म्हटले तर मग प्रयत्न कशाला करायचे, हा निराशेचा सूर येतो. कठीण म्हटले तर कदाचित काही तरी उपाययोजना करण्याचे निदान प्रयत्न  तरी करू. “त्याचे काय एवढे. साधा ताप आहे तो. बरा होईल” असा फाजील आत्मविश्वास पण टोकाचा आणि धोकादायकच नाही का?

तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे एखादी अप्रिय घटना घडण्याची शक्यता आहे की दाट शक्यता? की, सद्य परिस्थितीमध्ये करोनाची लागण झाली म्हणजे मृत्यु अटळच, असे मी स्वतःलाच सांगू लागलो तर मी सततच्या भीतीने उदध्वस्त होत जाईन. प्रत्येक प्रसंगी तेच तेच विचार येऊन दुसरे काहीच विधायक घडणार नाही. अशा गोष्टीची अवास्तविक खात्री बाळगल्यामुळे पुढे एखादे संकट उभे ठाकले असता जीवाच्या भीतीने समाज एकदम सैरावरा धावू लागतो. त्यामुळे सगळेच अडचणीत येत आहेत. गेल्या काही दिवसांत आपण हेच चित्र बघतोय ना!

जे टाळणे अशक्य, ते शक्ती दे सहाया

जे शक्य साध्य आहे, निर्धार दे कराया

मज काय शक्य आहे, आहे अशक्य काय

माझे मला कळाया, दे बुद्धी देवराया...

करोना व्हायरसची समस्या आपण टाळू शकत नाही. म्हणून त्याला धैर्याने सामोरे जाण्यात शहाणपण आहे. जे जे आपल्या हातात आहे, ते सर्व करण्याच्या निर्धार आपण करूयात. आपल्याला काय शक्य आहे आणि काय अशक्य आहे, हे ओळखण्यासाठी लागणार शहाणपण आपल्या सगळ्यांना येवो.

.............................................................................................................................................        

लेखक स्वप्नील पांगे समुपदेशक आणि चिकित्सालयीन मानसतज्ज्ञ आहेत

manaswapnil20@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

Post Comment

Nutan Soparkar

Thu , 02 April 2020

खूप छान लेख स्वप्नील !!! वास्तविक आपण खरंच धैर्याने वस्तुस्थिति लक्षात घेऊन वागले पाहिजे हा बोध तुझ्या विचारांनी स्पष्ट होतो त्याबद्दल तुझे आभार


Nutan Soparkar

Thu , 02 April 2020

खूप छान लेख स्वप्नील !!! वास्तविक आपण खरंच धैर्याने वस्तुस्थिति लक्षात घेऊन वागले पाहिजे हा बोध तुझ्या विचारांनी स्पष्ट होतो त्याबद्दल तुझे आभार


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा