करोना व्हायरस आणि भारतीयांचा मूर्खपणा
पडघम - देशकारण
रुचिर जोशी
  • २२ मार्च रोजी संध्याकाळी पाच वाजता अहमदाबादमधील लोक टाळ्या, थाळ्या, ढोल बडवताना. छायाचित्र सौजन्य, द टेलिग्राफ, पीटीआय
  • Fri , 27 March 2020
  • पडघम देशकारण जनता कर्फ्यु Janta curfew नरेंद्र मोदी Narendra Modi विषाणू Corona virus करोना Corona करोना व्हायरस Coronavirus

गेल्या रविवारी संध्याकाळी ५ वाजता या देशाच्या पंतप्रधानांनी आम्हाला आणि जगाला हे सिद्ध करून दाखवले की, हा मूर्खांचा देश आहे किंवा लोकसंख्येच्या वरच्या आर्थिक टोकाला अत्यंत मूर्ख लोक असलेला हा देश आहे. भविष्यात ज्या काही चांगल्या-वाईट गोष्टींसाठी नरेंद्र मोदी यांचे नाव घेतले जाईल, त्यातील एक उल्लेखनीय गोष्ट म्हणजे साडेपाच वर्षांच्या अगदी अल्प कालावधीत त्यांनी आपल्या समाजातील विशेषत: पश्चिम आणि उत्तरेकडील समाजातील वैशिष्ट्ये ठळकपणे समोर आणून दाखवली, जी साधारणत: इतर देश लपवू इच्छितात. वेगाने पुढे जाणाऱ्या आपल्या देशात धर्मांधता खोलवर पसरली आहे, भोळा आणि चटकन भूलणारा आपला समाज आहे.

आपल्याकडील श्रीमंत वर्गाला समाजातील गरिबांची-कमनशिबवानांची पर्वा नाही आणि आता तथाकथित सुशिक्षित वर्ग सर्वांत मोठ्या प्रमाणावर विघातक अशा अंधश्रद्धेने ग्रस्त आहे. मोदींनी हे कोणत्याही आपभावनेने केले नाही, तर अंधारात दबून ठेवलेली आमची ही गुणवैशिष्ट्ये त्यांनी कढईखाली जाळ लावण्यास उत्तेजन दिल्यामुळे पृष्ठभागावर आली आहेत. त्यांनी एकाच वेळी हे दाखवून दिले की, आपण (तथाकथित सुशिक्षित वर्ग) आपल्या चुकांबाबत कठोर पावले तर उचलत नाही, शिवाय आपल्या मतलबासाठी असा वर्ग संधीसाधूपणा करत असतो.  

कोविड-१९ ही महामारी जगभरात सर्वत्र पसरल्याने वेगवेगळ्या गोष्टी जगासमोर आल्या. करोना या विषाणूच्या वाढत्या धोक्यामुळे आपल्याला आधीच माहीत असलेल्या काही गोष्टी अधोरेखित झाल्या, तर अनेक माहीत नसलेल्या गोष्टीही समोर आल्या. एकंदरीत जगाचे खरे रूप समोर आणण्यासाठी हा विषाणूदेखील तेवढाच जबाबदार आहे.

नेतृत्वाचा मुद्दा अधोरेखित करायचा, तर डोनाल्ड ट्रम्प यांच्यासारख्या वेडसर व्यक्तीच्या फ्लिप फ्लॉपवर नजर टाका. कोविड-१९ या विषाणूचा प्रतिकार करण्याच्या देशाच्या क्षमतेला केवळ पैसे वाचवण्यासाठी या व्यक्तीने दुर्बल करून सोडले. कोविड-१९ हा विषाणू म्हणजे त्यांचे अध्यक्षपद धोक्यात आणण्यासाठी करण्यात आलेली लोकशाही पद्धतीची लबाडी आहे, असे ते आज सांगत आहेत. इतर देशांप्रमाणेच हा विषाणू अमेरिकेच्या दारावर उभा राहिल्यावर अशा प्रकारचा धोका आपल्याकडे (अमेरिकेत) शिरू पाहत असून आपले त्याकडे लक्ष असल्याचा दावा त्यांनी केला. असा दावा करतानाच कोविड-१९ चा सामना आम्ही चांगल्या प्रकारे हाताळल्याचेही ते सांगतात.

बोरिस जॉन्सन यांच्यासारख्या एखाद्या व्यक्तीचे परीक्षण करा, ज्याचे वर्णन एका ब्रिटिश लेखकाने ‘मनोरंजन करणारा पंतप्रधान’ म्हणून केले आहे. ब्लफ, ब्लस्टर, बॉम्बस्फोटाच्या कॉकटेलसह हा माणूस निवडणूक जिंकतो आणि त्याच्या प्रतिस्पर्ध्याबद्दल मतदारांना गंभीर शंका वाटते. परंतु आता जगाबरोबरच या देशासमोरही उभ्या राहिलेल्या कोविड-१९ संकटाचा सामना करताना हे अकार्यक्षम असे नेतृत्व असल्याचे देशावासियांच्या समोर येत आहे.

या विषाणूचा सामना कसा करावा याबाबत जॉन्सन प्रशासनाचे मत म्हणजे समूह प्रतिकारशक्ती तयार होऊ देणे, कोविड-१९ हा विषाणू अधिकाधिक ब्रिटिश लोकांर्पंयत पोहचू दे जेणेकरून आपोआप समूह प्रतिकारशक्ती (herd immunity) तयार होईल आणि विषाणूचा सामना करणे शक्य होईल. जगातील एक श्रीमंत राष्ट्र असणारा देश अशा प्रकारचा बीभत्स ‘डार्विनवाद’ सध्याच्या भयावह परिस्थितीत अवलंबू पाहत आहे. या परिस्थितीत पंतप्रधान जॉन्सन आपल्या प्रशासनाच्या शब्दांकडे दुर्लक्ष करतात. तर उर्वरित देश, विविध संस्था सरकारच्या या अजब तर्कापुढे अस्वस्थ होऊन सरकारवर ताशेरे ओढतात. मात्र हे सगळे बाजूला ठेवत राष्ट्रीय आरोग्य सेवा, महाविद्यालये आणि विद्यापीठे यांनी सरकारच्या सूचनांची वाट पाहत न थांबता खबरदारीचे उपाय योजण्यास सुरुवात केली आहे. जॉन्सन सरकारच्या या मूर्खपणामुळे ब्रिटनमध्ये करोनाबाधितांच्या मृत्यूचे प्रमाण वाढत असतानाच ब्रिटनवासियांचे जीव वाचवले जात आहेत.

सरतेशेवटी इंग्लंडचे नवीन चान्सलर अर्थात अर्थमंत्री रिषी सुनाक यांच्यामध्ये ते नेतृत्व दिसून आले आहे, जे ब्रिटनचे पंतप्रधान जॉन्सन आणि त्यांचे जिवलग मित्र ट्रम्प यांच्यात दिसायला हवे होते. जॉन्सन आणि ट्रम्प यांच्या प्रशासनाने जी पावले उचलून सामान्यजनांना आवश्यक ती मदत पुरवायला हवी होती, ती कामगिरी सध्या सुनाक करताना दिसत आहेत.  

जगातील महत्त्वाची राष्ट्रे असणाऱ्या या देशप्रमुखांच्या अगदी उलट आणि ठोस, ठाम भूमिका जर्मनीच्या प्रमुख (चान्सलर) अँजेला मर्केल घेताना दिसतात. इंटरनेटवर त्यांची सध्याची भाषणे पाहा, इंग्रजी शीर्षकांसह त्यांची भाषणे उपलब्ध आहेत. आपल्या भाषणात मर्केल यांनी वापरलेले शब्द सोपे आणि थेट आहेत. त्या सदर परिस्थिती समजून घेतात. या संकटामुळे उद्भवलेल्या प्रचंड अडचणी, निर्माण झालेल्या आव्हानांबद्दल सहानुभूती आणि ही समस्या सोडवण्यासाठी त्या व त्यांचे सरकार काय पावले उचलत आहेत, हे आपल्या भाषणातून त्या नेमकेपणाने मांडतात. तसेच ज्या जनतेला त्या संबोधित करत आहेत, त्या जनतेकडून त्यांना काय अपेक्षित आहे, हेसुद्धा त्या आपल्या भाषणातून स्पष्ट करतात.

या भाषणातून सुरुवातीपासून शेवटपर्यंत सामूहिक एकतेची प्रखर भावना आणि एक दृढ संकल्प त्या व्यक्त करतात. तेथे कोणतीही शाब्दिक कसरत नाही, ना आध्यात्मिक वा वैचारिक जुमला, ना निष्फळ बडबड वा आत्मस्तुती, ना छुपे किंवा खुले असत्य.

“आमची सर्वसामान्य आणि सार्वजनिक जीवन व सामाजिक एकात्मतेची भावना आजपर्यंत कधीही नव्हती, तेवढी कसोटीला लागली आहे…” मर्केल आपल्या भाषणात सांगतात. कोणताही विचार आपल्या भाषणातून स्पष्टपणाने सांगण्यापूर्वी त्यांना आणि त्यांच्या सरकारला या महामारीबद्दल जशी शंका आणि भीती आहे, तसेच संकटादरम्यान पडतात असे अनेक प्रश्नही आपल्याला पडल्याचे त्या मान्य करतात. आपल्याला सर्व काही माहीत असल्याची बतावणी त्या करत नाहीत, ना सर्व परिस्थिती नियंत्रणात असल्याचा खोटेपणा. जर त्यांनी असे काही केले असते, तर कोणत्याही सुज्ञ व्यक्तीला त्या खोटे बोलत असल्याचे समजले असते. याऐवजी त्यांनी जनतेला केलेले हे संबोधन म्हणजे सरकारी निर्णयांसाठी त्यांनी आखून दिलेली मार्गदर्शक तत्त्वे असल्याचे दिसून येते. “मुक्त लोकशाहीचा हा एक भाग आहे. आम्ही पारदर्शक राजकीय निर्णय घेतो आणि त्यांचे स्पष्टीकरणही देतो, जेणेकरून जनतेला ते समजतील,” मर्केल सांगतात.

कोणताही जर्मन समकालीन नेता हा गंभीर परिस्थिती असल्याशिवाय खोटे बोलणार नाही, असे म्हणत त्या परिस्थितीचे गांभीर्य विशद करतात. “जर्मन पुनर्एकीकरण झाल्यापासून, नव्हे दुसऱ्या महायुद्धानंतर आमच्या देशासमोर कोणतेही तसे आव्हान नव्हते, जिथे आमच्यासाठी ऐक्य भावनेने कृती करणे महत्त्वाचे होते.” या लहानशा आत्मसुधारणेतून त्या युद्धाच्या महाशोकांतिकेच्या पुनरुक्तीकरणाचा संदेश प्रौढ किंवा किशोरवयीन मुलांना देतात.

आपल्या १२ मिनिटांच्या भाषणात मर्केल जर्मनीतील आरोग्य यंत्रणा ही जगातील सर्वोत्तम आरोग्य यंत्रणा असल्याचे सांगतात. पण तत्क्षणी त्या पुढे नमूद करतात की, करोना विषाणूने संक्रमित लोकांच्या त्सुनामीचा सामना करावा लागल्यास ही यंत्रणाही कोलमडून जाऊ शकते. म्हणूनच आपल्या भाषणातील त्यांचा मुख्य संदेश आहे, “एखाद्या करोनाबाधित रुग्णाने आपल्यामुळे दुसऱ्याला संसर्ग होण्याचा धोका मर्यादित केला पाहिजे. शक्य तितकी काळजी आपण घ्यायला पाहिजे.”

दुसऱ्या बाजूला आपल्याकडे भारतात जगातील सर्वांत खराब अशी आरोग्य यंत्रणा आहे. २०१४च्या सुरुवातीला सार्वजनिक आरोग्य यंत्रणेसह काम करणाऱ्या सामाजिक संस्था सार्वजनिक आरोग्य क्षेत्राचा जीडीपी २.५ टक्क्यांवरून किमान ४ टक्क्यांवर नेण्याचा प्रयत्न करत होता. मोदी यांनी ‘सबका साथ, सबका विकास’ म्हणत जेव्हापासून पंतप्रधानपदाचा कार्यभार स्वीकारला, तेव्हापासून सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवर होणारा खर्च दोन टक्क्यांपेक्षाही खाली आला आहे. भाजप- रा. स्व. संघाच्या ‘Subsurface Safety Valve’ (SSSV-missile) क्षेपणास्त्रामुळे आपले पर्यावरण, अर्थव्यवस्था आणि सामाजिक एकता यांचे झालेले नुकसान विचारात घेता आपल्या देशाला बसलेला महामारीचा हा फटका गेल्या २० वर्षांतील सर्वांत वाईट क्षण आहे.

बलाढ्य जहाज टायटॅनिकचा विचार करा, एखाद्या पाणतीराचा (टॉर्पेडो) हल्ला झाल्यामुळे नाही, तर हिमनगामुळे भोक पडल्याने हे जहाज बुडाले. कल्पना करा की, अशा वेळी बुडणाऱ्या जहाजाच्या वर फिरणाऱ्या हेलिकॉप्टरमध्ये बसून जहाजाचा कप्तान जहाज बुडण्यापासून थांबवण्यासाठी लोकांना थाळ्या, घंट्या, टाळ्या वाजवायला सांगतोय.

टीव्हीवरून पंतप्रधानांनी केलेल्या आपल्या भाषणात आवर्जून सांगितल्यामुळे हजारो लोकांनी रविवारी संध्याकाळी पाच वाजता थाळ्या, ढोलताशे वाजवले. कुणी शंखनाद केला, तर कित्येकांनी आपला तिरंगा फडकावत एका लयीत टाळ्यांचा कडकडाट केला. भाजपमधील कित्येक मंत्र्यांनी जणू करोना हा इंग्रजी बोलणारा जीव आहे असे गृहित धरून ‘गो करोना गो’चा मंत्रोच्चारही केला. अहमदाबादमध्ये तर लोकांनी रस्त्यावर उतरून नवरात्रीतील रास-गरबा किंवा उत्तरायणात पतंग उडवावे, तशा प्रकारे ‘सेलिब्रेशन’ केले! थाळ्या-टाळ्यांचा हा विजयोन्माद म्हणजे जणू काही आपण एखादा विश्वचषक जिंकलो आहोत की काय, अशी भावना निर्माण करणारा होता. कदाचित मूर्खपणातील विश्वविजेतेपद!

नरेंद्र मोदी यांच्यावर ते एक खुजे व्यक्तिमत्त्व असल्याचा आरोप निश्चितच करता येत नाही. मोदी म्हणजे एक असा धूर्त माणूस आहे, जो सर्वसामान्यांना मूर्ख बनवून त्यांची मजा घेतो आणि मग या सर्वांचे उठणारे पडसाद पाहून आनंद लुटतो. त्यांच्या हास्यास्पद आवाहनामुळे कोविड-१९ विषाणूच्या संक्रमणाचा धोका कित्येक पटींनी वाढला, परंतु मोदींनी त्यांना हवे तेच केले. या संकटाच्या भीतीपोटी लोकांना आपल्या तालावर नाचवू शकतो की नाही, याची चाचणी त्यांनी घेतली आणि त्यात ते यशस्वीही झाले. संकटकाळात लक्ष विचलित करण्याची त्यांची कृती त्यांनी एखाद्या सराईताप्रमाणे पार पाडली.

दिवसअखेरीस हजारो लोक रस्त्यावरून फिरत असताना, काही लोक विचारत होते की, आपली आरोग्याची पायाभूत सुविधा इतकी भयानक का आहे? काही लोक विचारत होते की, सर्व राज्यांच्या (सरकारांच्या) सहाय्याने परिणामकारक सिद्ध होऊ शकणारा लॉकडाऊन देशभरात आठवडाभर आधीच का राबवण्यात आला नाही?

इराणमध्ये कोविड-१९ महामारीने थैमान घालण्यापूर्वी क्योम (Qom, इराणमधील एक मोठे शहर) मधील एका मुल्लाने गुदद्वारात लव्हेंडर ऑईलचा वापर करण्याचा आग्रह धरला होता. असे केल्याने कोविड-१९च्या संसर्गापासून वाचता येते, असे त्याने सांगितले. पण आता उपग्रहांनी घेतलेल्या छायाचित्रांमधून क्योमभोवती कित्येक एकर खोदलेल्या भूमीत करोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्या लोकांच्या सामूहिक कबरी उघड होत आहेत. उपग्रहांवरून स्मशानभूमी शोधणे कठीण असले, तरी आपण आशा आणि प्रार्थना करू या की, रविवार हा आपला लव्हेंडर ऑईलचा क्षण नव्हता!

अनुवाद - मिताली तवसाळकर

.............................................................................................................................................

हा मूळ इंग्रजी लेख ‘द टेलिग्राफ’ या दैनिकामध्ये २४ मार्च २०२० रोजी प्रकाशित झाला आहे. मूळ लेखासाठी पहा -

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा