ऑस्ट्रिया-हंगेरी, सर्बिया आणि इतर बाल्कन राष्ट्रे
सदर - पहिले महायुद्ध... १०० वर्षांनंतर
आदित्य कोरडे
  • ९व्या शतकाच्या सुरुवातीला युरोपात प्रबळ अशी चार साम्राज्यं नांदत होती
  • Tue , 25 February 2020
  • सदर पहिले महायुद्ध... १०० वर्षांनंतर पहिले महायुद्ध First World War फ्रान्स ऑस्ट्रिया- हंगेरीचे संयुक्त साम्राज्य रशियाची झारशाही तुर्कस्तानचे ओट्टोमान साम्राज्य

१९व्या शतकाच्या सुरुवातीला युरोपात प्रबळ अशी चार साम्राज्यं नांदत होती. फ्रान्स, ऑस्ट्रिया- हंगेरीचे संयुक्त साम्राज्य (घराणे हाप्स्बर्ग), रशियाची झारशाही आणि तुर्कस्तानचे ओट्टोमान साम्राज्य. (इंग्लंड आणि इंग्लिश लोकांना यातून मुद्दाम वगळले आहे. कारण या काळात त्यांची मुख्य युरोपात इंचभरही जमिनीवर सत्ता नव्हती, अन्यथा तेव्हा जगात सगळ्यात मोठे, प्रबळ साम्राज्य त्यांचेच होते.)

आपण जरी याला ऑस्ट्रो-हंगेरियन साम्राज्य म्हणून ओळखत असलो, तरी ते होते युरोपातील हाब्सबर्ग या एका पुरातन घराण्याचे साम्राज्य. १५व्या-१६व्या शतकात म्याक्सिमिलीयन (पहिला) याने या साम्राज्याची स्थापना केली. त्यांची राजधानी विएन्ना हे युरोपातील एक अत्यंत महत्त्वाचे शहर आणि युरोपची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाते, अगदी आजही. फ्रेंच राज्यक्रांतीच्या वेळी गिलोटीनवर चढलेली राणी आंत्वानेट ही त्यांचीच राजकन्या. पुढे नेपोलियनने त्यांच्या साम्राज्याची अगदी धूळधाण केली. पण लवकरच १८१५ साली नेपोलियनचा पराभव झाल्यावर त्यांनी परत एकदा आपले राज्य उभे केले.

फ्रान्झ जोसेफ

१८ ऑगस्ट १८३० साली जन्माला आलेला फ्रान्झ जोसेफ हा ऑस्ट्रीयन साम्राज्याच्या गादीवर आला १८४८ साली. त्या सुमारास युरोपचा आसमंत समाजवादी आणि राष्ट्रवादी चळवळी आणि राजेशाहीविरोधी बंडाळ्यांनी दुमदुमलेला होता. फ्रान्समध्ये या बंडाळ्या झाल्या, तशाच प्रशियातही झाल्या. त्या सैन्याच्या मदतीने मोडून काढत तिथे परत राजेशाही कायम झालेली तरुण फ्रान्झ जोसेफने पाहिली. त्यांच्या ऑस्ट्रो-हंगेरिअयन साम्राज्यातही हे लोण पसरले. तिथेही ते लष्कराच्या मदतीने मोडून काढले गेले. लष्कराच्या मदतीने आपण निरंकुश सत्ता राखू शकतो, ती मिळवू, वाढवू आणि गाजवूही शकतो, अशी त्याची धारणा झाली असल्यास नवल नव्हते!

फ्रान्झ जोसेफ

मात्र या धारणेला १८५९ साली फ्रान्सबरोबर झालेल्या युद्धाने धक्का बसला. हे युद्ध तो हरला आणि मग साम्राज्य वाचवण्यासाठी आणि भक्कम करण्यासाठी त्याने पूर्वेकडील नाराज गालेशिया आणि हंगेरी या भिन्न वांशिक गटांशी समझोता केला. त्याच्या काळातच ऑस्ट्रियाचे साम्राज्य ऑस्ट्रो-हंगेरियन साम्राज्य बनले आणि त्याचा बराच भूविस्तारही झाला.

पण १९व्या शतकातली झपाट्याने बदलत चाललेली परिस्थिती त्याने कधी समजून घेतली नाही. औद्योगिक क्रांती, भांडवलशाही, जागतिक व्यापार, आंतरराष्ट्रीय संबंध, नव्याने आलेले समाजवाद, साम्यवाद, लोकक्रांत्या यामुळे पारंपरिक राजसत्तेसमोरील आव्हाने किती बिकट होत चालली आहेत, हे त्याच्या लक्षात आले नाही. ज्या लष्कराच्या जीवावर आपण हे सगळे उलथून टाकू असा विश्वास त्याला वाटत होता, त्या लष्कराच्या आधुनिकीकरणासाठी त्याने काहीही केले नाही.

तरीही तो एक नृशंस आणि दमनकारी शासक नव्हता. त्याने साम्राज्याताल्या इतर भाषा वंश आणि मूळ वेगळे असलेल्या समाजगटांना बरेच स्वातंत्र्य आणि अधिकार दिले. इतर कुणीही नाही, पण युरोपात ज्यू लोकांना प्रथम त्यानेच नागरिकत्वाचे अधिकार दिले.  त्यामुळे त्याच्या प्रदीर्घ अशा ६८ वर्षांच्या कारकिर्दीत त्याला जनतेचे प्रेम बरेच लाभले.

पण याबरोबरच त्याचे साम्राज्य हे भाषा, वंश, चालीरीती, धर्म अशा अनेक बाबतींत भिन्नता असलेल्या दहा-एक समाजगटांचे कडबोळे बनले. त्याच्या वैयक्तिक आयुष्यात बरीच शोकांतिका झाली. त्याची बहीण आणि दोन भाऊ तरुणपणीच वारले, तर बायको सीसी (बवेरियाची राजकन्या एलिझाबेथ) हिचा इटलीतील क्रांतिकारकाने खून केला. त्याचा मुलगा रुडोल्फने आत्महत्या केली आणि त्यानंतर युवराज व सिंहासनाचा उत्तराधिकारी बनलेला फ्रान्झ फर्डीनंडचाही खून झाला. तो जिवंत असतानाही त्याचे आंतरराष्ट्रीय संबंध आणि साम्राज्यातील प्रजेचे अधिकार याबाबत फ्रान्झ फर्डिनंडशी पराकोटीचे मतभेद होते.

जर्मनभाषक असूनही त्याचे प्रशिया आणि बिस्मार्कशी कधी जुळले नाही. १० समाजगटांचे कडबोळे घेऊन राज्य करणाऱ्या आणि लष्करीदृष्ट्या कर्तृत्वहीन असलेल्या पण आकाराने, संख्येने मोठ्या अशा ऑस्ट्रो-हंगेरियन साम्राज्याचा जर्मन राष्ट्रात अंतर्भाव व्हावा, असे बिस्मार्कला वाटत नव्हते आणि त्याने कुटीलपणाने ऑस्ट्रो-हंगेरियन साम्राज्याला खड्यासारखे बाहेर काढले. यावर उपाय म्हणून फ्रान्सशी संगनमत करून तो जर्मनीवर दबाव टाकू शकला असता, पण फ्रान्सविषयी वाटणारी घृणा आणि संशय त्याच्यामध्ये आली. नाहीतर युरोपचा इतिहास काही वेगळा असता.

त्याचा डोळा तुर्कस्तानच्या जोखडातून मुक्त होत असलेल्या बाल्कन देशावर होता. त्यांना चुचकारून धमकावून हरप्रयत्नाने साम्राज्यात समावून घेऊन दक्षिण युरोपात प्रबळ असे ऑस्ट्रो-हंगेरियन साम्राज्य उभे करण्याची मनीषा शेवटी त्याच्याकरता आणि साम्राज्याकरता घातक ठरली. लोकांचे त्याच्यावर असलेले प्रेम हेच खरे तर ऑस्ट्रो-हंगेरियन साम्राज्याला एकत्र बांधून ठेवत होते आणि ही बाब त्याच्या लक्षात आली नाही. त्यामुळे जेव्हा महायुद्ध ऐन भरात असताना १९१६ साली वयाच्या ८६व्या वर्षी तो वारला. तेव्हा ती त्याच्या ऑस्ट्रो-हंगेरियन साम्राज्याचीही मृत्यूघंटा ठरली.

तुर्कस्तानचे ओट्टोमान साम्राज्य आणि बाल्कन राष्ट्रं

 तुर्कस्तानचे ओट्टोमान राज्यकर्ते मूळचे युरोपबाहेरचे, पण त्यांच्या साम्राज्याचा बराचसा भाग पूर्व आणि दक्षिण युरोपात पसरलेला होता, अगदी पश्चिमेला स्पेनच्या मघरेबपर्यंत. तुर्की राजा उस्मान पहिला याने १४व्या शतकाच्या आरंभी स्थापन केले म्हणून हे ओट्टोमान साम्राज्य. उस्मानचा अपभ्रंश उथमान आणि मग ओट्टोमान. पण एकेकाळी ताकदवान आणि त्यांनी जिंकलेल्या प्रदेशावर पोलादी पकड असलेले हे साम्राज्य आता जवळपास ५०० वर्षे झाल्यानंतर कमकुवत आणि खिळखिळे झालेले होते. समकालीन इतिहासात त्याचे वर्णनच मुळी ‘युरोपातला आजारी म्हातारा’ असं केलेलं आपल्याला आढळून येतं. फ्रान्स, ऑस्ट्रिया अगदी रशिया, इंग्लंडसारखी राष्ट्रं त्याच्या नाकाशी सुत धरून बसली होती की, कधी हा म्हातारा गचकतो आणि आपण त्याच्या भूभागाचे लचके तोडतो.

युरोपच्या मुख्य भूमीला ओट्टोमान साम्राज्य इस्तंबूलपाशी जमिनीने जोडले गेले आहे. त्यापुढचे युरोपचे समुद्रात घुसलेले भूशीर किंवा द्वीपकल्प म्हणजे बाल्कन प्रदेश. हा आग्नेय युरोपचा भूभाग. बाल्कन हा शब्द मूळ तुर्की. त्याचा अर्थ डोंगराळ प्रदेश. बल्गेरियापासून सर्बियापर्यंत पसरलेल्या पर्वतराजीला ‘बाल्कन’ असे नाव आहे. त्यावरून हा ‘बाल्कन प्रदेश’ म्हणून ओळखला जातो.

सर्बिया, रोमानिया, मोन्टेनेग्रो, बोस्निया, हर्जेगोविनिया, बल्गेरिया, ग्रीस असे अनेक देश यात येतात. १९व्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत हा भुभाग तुर्की ओट्टोमान साम्राज्याच्या अधिपत्याखाली येत होता, पण जसजसे तुर्की साम्राज्य कमकुवत होऊ लागले, तसतसे त्यांच्या सत्तेचे जोखड झुगारून देऊन ग्रीस, रोमानिया, सर्बिया असे देश स्वतंत्र होऊ लागले. सर्बिया, मोन्टेनेग्रो, बोस्निया, हर्जेगोविनिया, बल्गेरिया आणि दक्षिण ऑस्ट्रिया या प्रदेशांत प्रामुख्याने स्लाववंशीय लोक राहत. त्यामुळे ऑस्ट्रियाने सुरुवातीला तुर्की अमलापासून मुक्त होण्यात या देशांना भरपूर मदत केली, पण १९०८ साली ऑस्ट्रियाने नुकतेच स्वतंत्र झालेले बोस्निया आणि हर्जेगोविनिया हे देश आपल्या साम्राज्याला जोडले. (तसा त्यावर लष्करी ताबा त्यांनी आधीच मिळवला होता.) त्याला कारणही तसेच होते. ऑस्ट्रियाच्या साम्राज्याच्या या भागात स्लाववंशीय जनता बहुसंख्येने असल्याने आपला हा घास आपण सहज पचवू असे त्यांना वाटले. तसेच बोस्निया आणि हर्जेगोविनिया पादाक्रांत करून त्याना जवळपास ३७० मैल लांबीची किनारपट्टी लाभली. ज्याचा व्यापार आणि संरक्षणासाठी त्यांना मोठा उपयोग होणार होता. पण ऑस्ट्रियाच्या या कृतीमुळे सर्बिया कमालीचा नाराज झाला.

सर्बिया हा अगदी नुकताच म्हणजे १८७८ साली तुर्की जोखडातून मुक्त झालेला देश. बाल्कन भागात राहणारे बहुसंख्य लोक स्लाव वंशाचे, त्यातून सर्बिया, बोस्निया, हर्जेगोविना, मोन्टेनेग्रो, बल्गेरिया आणि ऑस्ट्रियन साम्राज्याचा दक्षिण भाग हे विशेष करून स्लाववंशीयांचे. त्यामुळे एड्रीयाटीक समुद्रापासून काळ्यासमुद्रापर्यंत एक सलग अशी स्लाववंशीयांची सत्ता असलेल्या देशांचे राज्यसंघ निर्माण करून आपण त्यातील प्रमुख राष्ट्र व्हायची त्याला मनीषा होती. (प्रशिया- जर्मनीप्रमाणे) पण यावर ऑस्ट्रियाने पाणी फिरवले. तुर्कस्तानच्या जोखडातून मुक्त झालेले भूभाग जर ऑस्ट्रियाच्या प्रभावाखाली न येता या नवीनच जन्माला आलेल्या सर्बियन राष्ट्राचे नेतृत्व स्वीकारू लागले, तर ते कुणाला आवडणार होते? उत्तरेला जर्मनी होता म्हणजे दक्षिणेला असे एक प्रबळ राज्य तयार झालेले ऑस्ट्रियाला तर नक्कीच नको होते. अर्थात आतापुरता आणि वरकरणी  सर्बिया शांत बसला, कारण ऑस्ट्रियाला एकट्याने भिडायची काही त्याची ताकद नव्हती. (अर्थात म्हणून ते हातावर हात चोळत गप्प बसले नव्हते.)

अगदी तीस वर्षापूर्वीच (१८७८) अस्तित्वात आलेल्या सर्बियाची युरोपात पतही तशी काही फार चांगली नव्हती. सर्बिया हा जहाल स्लाव राष्ट्रवादी होता आणि अशा जहालपणात इतर अल्पसंख्याकांचे हाल होतातच. त्याप्रमाणे सर्बियातल्या एकेकाळच्या राज्यकर्त्या असलेल्या अल्पसंख्य मुसलमान समाजावर अन्याय आणि दडपण होऊ लागल्याच्या बातम्यांनी, तसेच तुर्कस्तानच्या जोखडातून इतर देशांना स्वतंत्र होण्यासाठी मदत करताना हिंसा, जाळपोळ, राजकीय खून असल्या कृत्यांना पाठिंबा दिल्याने सर्बियाबद्दल एकूणच युरोपात संशयाचे वातावरण होते.

त्यात सतत चालू असलेल्या असल्या हिंसक कारवायांनी हा एकंदर बाल्कन राष्ट्रांचा समूह म्हणजे मवाली, भांडकुदळ लोकांचा रानटी गट आहे आणि या भागात खून-मारामाऱ्या म्हणजे रोजचेच रडगाणे आहे, अशीच उर्वरीत युरोपची भावना होती. (त्यामुळेच अशाच एका बाल्कन प्रदेशात ऑस्ट्रियाच्या युवराजची हत्या झाल्याने महायुद्ध पेटेल याची कुणाला स्वप्नातही कल्पना आली नसणार!)

१९०३ साली ऑस्ट्रिया धार्जिणा असलेला सर्बियाचा राजा अलेक्झांडर ओब्रेनोविक आणि राणी ड्रेगा यांची सर्बियाच्या काही लष्करी अधिकाऱ्यांनी त्यांच्याच राजप्रासादात गोळ्या घालून हत्या केली. एवढे करून ते थांबले नाहीत तर त्याच्या शरीराची विटंबना करून आणि अर्धनग्नावस्थेत असलेले राजा-राणीचे मृतदेह त्यांनी खिडकीतून खाली फेकले. खुनानंतर दाखवले गेलेलं हे क्रौर्य फार काही भूषणावह नव्हते. या कटाचा सूत्रधार आणि म्होरक्या  होता- द्रागुतीन देमित्रीवीच उर्फ ‘एपिस’. या खुनाच्या वेळीच तो राजाच्या शरीररक्षकाशी झालेल्या झटापटीत किरकोळ जखमी झाला होता, पण त्यामुळेच त्याला अगदी सर्बियाचे राष्ट्रीय नायकत्व मिळाले होते. द्रागुतीन देमित्रीवीच उर्फ एपिस हा ‘The Black Hand’ या अत्यंत कुप्रसिद्ध आणि क्रूर संघटनेचा संस्थापक आणि चालक होता.

द्रगुतीन दिमित्रीवीच उर्फ एपिस आणि त्याच्या The Black Hand संघटनेचे चिन्ह शिक्का, सह्या इ. 

‘The Back Hand’ या नावावरून ही संघटना काही धर्मादाय किंवा सार्वजनिक काम करणारी संस्था नव्हती, हे कळते. माफिया आणि दहशतवादी संघटना ही नावे प्रचलित व्हायच्या खूप आधी, तसलीच कामे करणारी ही एक गुप्त संघटना होती. राजकीय हत्या, सरकारविरोधी हिंसक कारवाया, बंडखोर/क्रांतिकारकांना प्रशिक्षण देणे व रसद पुरवणे असली कामे ते करत. त्यांचा मुख्य उद्देश होता ऑस्ट्रियाच्या जोखडातून स्लावबहुल भाग मुक्त करून एक मोठे स्लाववंशीयांचे राष्ट्र स्थापन करणे. सर्बियाच्या राजा-राणीचे शिरकाण किंवा ऑस्ट्रियाच्या युवराज-युवराज्ञीचा खून हे त्यांचेच कारस्थान .

तर १९०५ ते १९११ दरम्यान उद्भवलेल्या तीन महत्त्वाच्या पेचप्रसंगांत युरोप कसा युद्धाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपला होता, हे आपण पहिले. त्याचप्रमाणे १९१२ आणि १९१३ मध्ये बाल्कन प्रदेशात दोन अत्यंत महत्त्वाची युद्धं झाली. त्यात रक्तपात, जीवितहानी, तह, वाटाघाटी सर्व काही झाले. पण या युद्धाचे पडसाद सर्व युरोपभर तितक्या तीव्रतेने उमटले नाहीत. पण महाविनाशक युद्धाची नांदी ही दोन युद्धे ठरली यात शंका नाही. त्यांच्याविषयी पुढील भागात...

.............................................................................................................................................

या सदरातील आधीच्या लेखांसाठी पहा -

१) २०१८ साली ११ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता पहिले महायुद्ध संपल्याला १०० वर्षे पूर्ण झाली!

https://www.aksharnama.com/client/article_detail/3952

२) पहिल्या महायुद्धाची कारणे शोधताना आपल्याला कमीत कमी १०० वर्षे तरी मागे जावे लागते!

https://www.aksharnama.com/client/article_detail/3977

३) बिस्मार्कची भविष्यवाणी खरी ठरली! जुलै १८९८मध्ये बिस्मार्क वारला आणि नोव्हेंबर १९१८मध्ये पहिले महायुद्ध संपले. त्यात जर्मनीचा नामुष्कीकारक पराभव झाला.

https://www.aksharnama.com/client/article_detail/3992

४) कैसर विल्हेल्म दुसरा हे पहिल्या महायुद्धातले सगळ्यात जास्त प्रसिद्ध पात्र असेल!

https://www.aksharnama.com/client/article_detail/4007

५) जर्मनी अब्रू वाचवून बाहेर पडला. युद्ध टळले आणि बाकीच्यांनी सुटकेचा नि:श्वास टाकला. पण नाटक संपले नव्हते, फक्त पहिला अंक पार पडला होता!

https://www.aksharnama.com/client/article_detail/4022

६) रशिया, फ्रान्स आणि इंग्लंडने जर्मनीसारख्या प्रगत राष्ट्राच्या आकांक्षांकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केले. जमेल तेवढे त्याला दाबण्याचे, एकटे पाडण्याचे राजकारण केले!

https://www.aksharnama.com/client/article_detail/4039

.............................................................................................................................................

लेखक आदित्य कोरडे टाटा मोटर्स, पुणे इथं डिझाईन इंजिनिअर म्हणून कार्यरत आहेत.

aditya.korde@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

जर नीत्शे, प्लेटो आणि आइन्स्टाइन यांच्या विचारांत, हेराक्लिट्स आणि पार्मेनीडीज यांच्या विचारांचे धागे सापडत असतील, तर हे दोघे आपल्याला वाटतात तेवढे क्रेझी नक्कीच नाहीत

हे जग कसे सतत बदलते आहे, हे हेराक्लिटस सांगतो आहे आणि या जगात बदल अजिबात होत नसतात, हे पार्मेनिडीज सिद्ध करतो आहे. आपण डोळ्यांवर अवलंबून राहण्यापेक्षा आपल्या बुद्धीवर अवलंबून राहिले पाहिजे, असे पार्मेनिडीजचे म्हणणे. इंद्रिये सत्याची प्रमाण असू शकत नाहीत. बुद्धी हीच सत्याचे प्रमाण असू शकते. यालाच बुद्धिप्रामाण्य म्हणतात. पार्मेनिडीज म्हणजे पराकोटीचा बुद्धिप्रामाण्यवाद! हेराक्लिटस क्रेझी वाटतो, पण.......