रशिया, फ्रान्स आणि इंग्लंडने जर्मनीसारख्या प्रगत राष्ट्राच्या आकांक्षांकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केले. जमेल तेवढे त्याला दाबण्याचे, एकटे पाडण्याचे राजकारण केले!
सदर - पहिले महायुद्ध... १०० वर्षांनंतर
आदित्य कोरडे
  • १९०७सालचा एक नकाशा
  • Wed , 19 February 2020
  • सदर पहिले महायुद्ध... १०० वर्षांनंतर पहिले महायुद्ध First World War रशिया फ्रान्स इंग्लंड जर्मनी कैसर विल्हेल्म दुसरा Kaiser Wilhelm II

दुसरा मोरोक्कन पेच आणि फेज करार

जुलै १९११मध्ये मोरोक्कोमधील काही टोळ्यांनी सुलतानाविरुद्ध बंड केले आणि चक्क सुलतानाला त्याच्या राजवाड्यातच कैद केले. त्यांना तशी फूस फ्रान्सनेच दिली होती हे उघड होते. मोरोक्कोत गृहयुद्ध-सदृश परिस्थिती निर्माण झाली, तेव्हा तेथील फ्रेंच लोकांचे, व्यापाऱ्यांचे, अधिकाऱ्यांचे संरक्षण करण्यासाठी आणि फ्रान्सचे व्यापारी हितसंबंध सांभाळण्यासाठी, तसेच कायदा आणि सुव्यवस्था, शांतता पुनर्स्थापित करण्यासाठी फ्रान्सने चक्क २० हजार सैनिक तेथे उतरवले. हा सरळ सरळ १९०६च्या अल्जेसिरास कराराचा भंग होता.

झाले!, जर्मनीने परत डोळे वटारले आणि आपली पँथर ही युद्धनौका अगादिर या मोरोक्कन बंदरात पाठवली. त्यामागे त्यांनी कारण दिले कि, फ्रान्सने मोरोक्कोत सरळ सरळ सैन्य पाठवणे हा १९०६च्य अल्जेसिरास करारातील मोरोक्कोच्या सार्वभौमत्वाचे संरक्षण करण्याच्या कलमाचा भंग होता आणि त्यांनाही मोरोक्कोतील जर्मन लोकांचे, व्यापाऱ्याचे, अधिकाऱ्यांचे संरक्षण करणे प्राप्त आहे.

प्रत्यक्षात तिथे एकही जर्मन माणूस तैनात नव्हता. खरे तर अशी चाल करण्याआधी विशेषत: १९०५-६चा अनुभव लक्षात घेता, त्यांनी इतर सहकारी देशांशी तरी विचारविनिमय करायला हवा होता, मोर्चेबांधणी करायला हवी होती. पण तसे न केल्याने उलट जर्मनीचेच हे कृत्य मवालीपणाचे, गुंडगिरीचे समजले गेले. फ्रान्सच्या सैन्य पाठवण्यामुळे खरे तर इंग्लंड नाराज झाले होते, पण जर्मनीच्या या आततायी कृत्याने त्यांना नाईलाजाने फ्रान्सला पाठिंबा जाहीर करावा लागला. त्याहून पुढे जाऊन त्यांनी चक्क त्यांच्या नाविक दलाच्या जहाजांचा एक ताफा जिब्राल्टर इथे पाठवला. रशियानेही परत एकदा फ्रान्सला पाठिंबा आणि मदत देणार असल्याचे जाहीर केले.

आता पुन्हा एकदा युद्धसदृश परिस्थिती निर्माण झाली आणि या वेळीही जर्मनी एकटाच पडला होता, हे उघड झाले. इतर युरोपीय देश गप्प होते किंवा त्यांच्या विरोधात तरी होते. याचा अर्थ जर्मनीला मोरोक्कोसारख्या देशाच्या स्वातंत्र्याची फार काळजी होती असा नव्हे, तर या निमित्ताने त्यांना युरोपात आपला दबदबा निर्माण करता आला तर हवा होता. ‘आमच्या मतालाही किंमत आहे. आम्ही आता काही लिंबूटिंबू नाही राह्यलो.’ असे सांगण्याचाच हा प्रयत्न होता. असो.

तर आता १९०५ प्रमाणेच पेचप्रसंग उत्पन्न झाला आणि तणाव वाढून युद्ध सुरू होते की, काय असे वाटू लागले. जर्मन जनता याला तयार नव्हती म्हणा किंवा हे फ्रान्सने घडवून आणले असा जो आरोप जर्मनीने केला होता, त्यात तथ्य होते म्हणा, पण जर्मन शेअर बाजार कोसळला. इतका कोसळला की, लोकांनी आपला पैसा शेअर बाजाराबरोबर बँकेतूनदेखील काढून घ्यायला सुरुवात केली. एका महिन्यात शेअर बाजार ३० टक्के इतका कोसळला आणि जर्मन बँकेतला सोन्याचा साठा एक तृतीयांशाने कमी झाला. जर्मन जनता, सरकार, लष्कर, स्वत: कैसर याला तोंड द्यायला तयार नव्हते. जर्मन जनमतही विरोधी बनू लागले. एका आफ्रिकन देशाच्या स्वातंत्र्यासाठी एवढा त्याग? काही गरज आहे का? काय फायदा त्यातून? असे प्रश्न जर्मन वृत्तपत्रांतून विचारले जाऊ लागले. 

अखेर नोव्हेंबर १९११मध्ये फ्रान्सची राजधानी पॅरिस इथे जर्मनीने फ्रेंचांशी समझोता केला. अल्जेसिरास येथे केलेला करार मोडून जर्मनीने दिलेल्या आश्वासनाची पायमल्ली केली म्हणून त्यांना कामेरून इथे वसाहतींचे हक्क फ्रान्सने दिले आणि मोरोक्को हे फ्रेंचांच्या संरक्षणाखाली राहील म्हणजेच तिथे कायमच फ्रेंच फौजा असतील, हे जर्मनीने मान्य केले. म्हणजेच फ्रान्सने मोरोक्कोचा घास घेतलाच, अगदी जर्मनीच्या नाकावर टिच्चून! (एकदा पाठवलेल्या फौजा परत बोलावयाचा तसाही फ्रान्सचा अजिबात इरादा नव्हताच म्हणा!) 

या कराराला ‘फेज करारम्हणून ओळखले जाते. या एकंदर प्रकरणात जर्मनीला पुन्हा एकदा नामुष्कीची हार (डावपेचात्मक) पत्करावी लागली!

युद्धानंतर उघड झालेल्या कागदपत्रांवरून हे सिद्ध झाले की, १९०५ आणि १९११ मधल्या दोन्ही प्रसंगी जर्मनीचा चान्सेलर प्रिन्स फोन ब्युलो आणि परदेश सचिव यांनी कैसरला, तसेच जर्मन सैन्य यंत्रणेला, जनतेलाही अंधारात ठेवून ही आगळीक केली होती. नाईलाजाने कैसरला दोन्ही वेळेस त्यांना साथ द्यावी लागली आणि युरोपात त्याची प्रतिमा त्यामुळे डागाळली. शिवाय शेपूट घालून परत यावे लागले. त्याचे हसे झाले ते वेगळेच!

१९०८ साली म्हणजेच या दोन पेचप्रसंगांच्या मध्ये अजून एक मोठा पेचप्रसंग घडला होता. त्या वेळीदेखील जग युद्धाच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचले होते. इतिहासात हा पेच प्रसंग ‘बोस्नियन तिढा’ म्हणून प्रसिद्ध आहे.

बोस्नियन पेचप्रसंग

१९०८च्या सुमारास बोस्नियाचा पेचप्रसंग उद्भवला. जुनाट आणि खिळखिळ्या झालेल्या ओट्टोमान साम्राज्यातल्या जहाल राष्ट्रवादी लष्करी अधिकाऱ्यांच्या गटांनी ‘यंग टर्क्स या नावाची एक संघटना उभारून ओट्टोमान साम्राज्यात, त्यांच्या राज्य शासनात काही मूलभूत बदल व्हावेत म्हणून चळवळ उभारली. इतर युरोपीय राष्ट्रांप्रमाणे त्यांनाही जनतेला मताधिकार, लोकनियुक्त सरकार, संविधान, कायदेमंडळात लोकांचे प्रतिनिधित्व अशा गोष्टी हवा होत्या. त्याला अर्थातच राजेशाहीने नकार दिला आणि गृहयुद्ध सुरू झाले. त्यामुळे ओट्टोमान साम्राज्यात बरीच अनागोंदी माजली. त्याचा फायदा त्यांच्या जुन्या प्रतिस्पर्धी अशा दोन मोठ्या साम्राज्यांनी घ्यायचा प्रयत्न केला नसता तरच नवल! हे दोन देश होते ऑस्ट्रिया आणि रशिया. त्यापैकी ऑस्ट्रियाचा डोळा होता त्यांना अगदी खेटून असलेला पण तुर्की साम्राज्याचा एक भाग असलेला बोस्निया-हर्जेगोवानिया या प्रांतावर (हे एकाच प्रांताचे नाव आहे, दोन वेगळे प्रांत नाहीत!), तर रशियाला अनेक शतकांपासून काळ्या समुद्रातून इस्तंबूलच्या जवळच्या बास्पोरास, दार्दानेल्स आणि गालीपोली इथल्या खाडीतून भूमध्य समुद्रात प्रवेश करायचा अधिकार हवा होता.

तसे पाहू जाता १८७८पासूनच ऑस्ट्रियाचा बोस्निया-हर्जेगोवानियावर लष्करी अंमल होता, पण त्यांनीनी अजून अधिकृतपणे त्याभागावर आपला मालकी हक्क सांगितला नव्हता. पण ‘यंग टर्क्स चळवळीने थोडा घोळच झाला. अजून अधिकृतरीत्या हा बोस्निया-हर्जेगोवानियाचा भाग ओट्टोमान साम्राज्यात येत असल्याने तेथील लोकांनाही तुर्कस्तानच्या नव्याने स्थापन होणाऱ्या संसदेत प्रतीनिधित्व मिळणार होते. १८७८पासून बोस्निया-हर्जेगोवानियामध्ये ऑस्ट्रियाने बराच खर्च आणि गुंतवणूक केली होती. आता काहीतरी त्वरेने करणे भाग होते.

तसा हा भाग स्लाव वंशीयांचे प्राबल्य असलेला होता. त्या भागावर १८३० पासून स्वतंत्र झालेला आणि सर्व स्लाव वंशीयांचे एक संघराज्य उभारून त्याचे नेतृत्व करायची मनीषा बाळगून असलेला सर्बियादेखील नजर ठेवून होता. रशिया त्यांचा पाठीराखा. त्यामुळे काही गडबड केली तर ओट्टोमान साम्राज्य डिवचले जाऊन युद्ध प्रसंग उत्पन्न होऊ शकतो, ही भीती होतीच. पण सर्बिया आणि मुख्य म्हणजे रशियासुद्धा चवताळून अंगावर येऊ शकतो, ही भीती असल्याने ऑस्ट्रिया शांत होता. पण आता ‘यंग टर्क्स’च्या चळवळीने माजलेल्या अनागोंदी/ गोंधळाचा फायदा घ्यायचे ऑस्ट्रिया आणि रशिया दोघांनीही ठरवले.

सप्टेंबर १९०८मध्ये रशियाचा परराष्ट्र सचिव अलेक्झांडर इझ्लोव्स्की आणि ऑस्ट्रियाचा परराष्ट्रमंत्री अल्वा अरेन्थाल यांच्यात मोराविया इथल्या बुख्लोवील राजवाड्यात (सध्या हा झेक रिपब्लिक मध्ये येतो.) गुप्त करार झाला. त्याप्रमाणे रशियाच्या इस्तंबूल जवळच्या बास्पोरस आणि दार्दनेल्स खाडीतून भूमध्य समुद्रात मुक्त संचाराला (व्यापारी आणि लष्करी जहाजांच्या) ऑस्ट्रिया हरकत घेणार नाही अन त्याबदल्यात रशिया ऑस्ट्रियाने आपल्या साम्राज्यात सामील करून घेतलेल्या (म्हणजे  बळकावलेल्या) बोस्निया-हर्जेगोवानिया प्रांताला तो त्यांच्याच साम्राज्याचा एक भाग आहे म्हणून मान्यता देईल, असे ठरले. अर्थात अलेक्झांडर इझ्लोव्स्कीला त्यांचा मुख्य सहकारी आणि बोस्निया-हर्जेगोवानियाचा ध्यास धरून बसलेल्या सर्बियाची समजूत काढायला वेळ हवा होता. तसेच त्याला रशियातही यासाठीची मोर्चेबांधणी करावी लागणार होती. त्याकरता त्याला थोडा वेळ हवा होता.

इथपर्यंत सगळे ठीक चालले होते. पण तुर्कस्तानमध्ये चालू असलेल्या गृहयुद्धाचा/अनागोदीचा फायदा घेत ५ ऑक्टोबर १९०८ रोजी बल्गेरियाने ओट्टोमान साम्राज्यापासून आपले स्वातंत्र्य घोषित केले अन बल्गेरियाप्रमाणे बोस्निया-हर्जेगोवानियामध्ये गडबड सुरू होऊ शकते किंवा सर्बिया काही गडबड करू शकतो, अशा गुप्तचर विभागाच्या खबरा मिळाल्याने ऑस्ट्रिया उतावीळ झाला. (खरे तर बोस्निया-हर्जेगोवानियाचा लष्करी ताबा त्यांच्याकडे होता.) त्यामुळे त्यांनी ६ ऑक्टोबर १९०८ रोजी कुणाला कुठलीही पूर्वसूचना न देता बोस्निया-हर्जेगोवानिया अधिकृतरीत्या आपल्या साम्राज्यात सामील करून घेता असल्याची घोषणा केली. यामुळे सगळ्यांनाच धक्का बसला. अगदी त्यांचा साथीदार जर्मनीलाही. रशियात तर याची तिखट प्रतिक्रिया उमटली. इझ्लोव्स्कीची सगळी योजना धुळीला मिळाली. सर्बियाने तर युद्धाची तयारी करून रशियाकडे पाठिंब्याची मागणी केली आणि रशियाने तो त्यांना दिला.

कैसर विल्हेल्मला खरे तर ऑस्ट्रियाच्या या आततायीपणाचा रागच आला होता, पण युरोपात ऑस्ट्रिया त्यांचा एकमेव साथीदार होता. त्यामुळे रशियाने सर्बियाला पाठिंबा देताच त्यांनी ऑस्ट्रियाला आपला पाठींबा दिला आणि रशियाला धमकावले की, ऑस्ट्रियावर कोणतीही कारवाई केली तर युद्धच सुरू होईल. ज्यांच्या साम्राज्याचे लचके कुणी तोडून घ्यायचे यावर वादंग चालू होते, तो तुर्कस्तान मात्र हतबल होता. एकीकडे तो सैन्य आणि इतर लष्करी तंत्रज्ञानात मागे होता, गृहयुद्धाने गांजला होता आणि बल्गेरीयाच्या बंडाळीचे पारिपत्य करण्यात गुंतला होता. तसेही बोस्निया-हर्जेगोवानिया आता त्यांच्याकरता बराच दूरचा भाग होता. त्यामुळे दोन-चार निषेध खालिते पाठवण्यापलीकडे तो फार काही करू शकला नाही.

जर्मनीच्या धमकीमुळे रशिया सटपटला. नुकताच १९०४-५ च्या सुमारास जपानबरोबरच्या युद्धात त्यांनी मानहानीकारक पराभव स्वीकारला होता आणि नंतर झालेल्या क्रांतीमुळे शासनाची अवस्था नाजूक होती. त्यातून घटना इतक्या अनपेक्षितपणे घडल्या की, त्यांचा सहकारी फ्रान्सदेखील गडबडला. त्यांनीही रशियाला फक्त तोंडी पाठिंबा दिला. तात्काळ त्यापेक्षा जास्त काही मदत् करायला असमर्थता दर्शवली. तसाही बोस्निया-हर्जेगोवानियाचा प्रश्न त्यांना तितका महत्त्वाचा वाटत नव्हता. इंग्लंडही त्याच्या आशियातल्या साम्राज्याला किंवा आरमारी हितसंबंधाला यातून काही फार धोका नसल्याने फार खळखळ न करता शांत बसले. शेवटी रशियाला चक्क शेपूट घालून गप्प बसावे लागले आणि त्यामुळे सर्बियादेखील चडफडत गप्प बसला.

अशा प्रकारे मोरोक्कोच्या १९०५ आणि १९११च्या वेळी फ्रान्स-इंग्लंड आणि रशियाच्या दादागिरी आणि कुटील सामंजस्याने जर्मनी गप्प बसला, तर १९०८च्या बोस्निया-हर्जेगोवानियाचा पेचावेळी जर्मनीच्या मवालीपणापुढे रशिया गप्प बसला. अर्थात रिवाजाप्रमाणे आंतरराष्ट्रीय परिषद बोलावली गेली, ऑस्ट्रियाने बोस्निया-हर्जेगोवानियाचा ताबा घेणे बिनबोभाट मान्य केले गेले, रशियाने आपली इस्तंबूल-बस्पोरस आणि दार्दानेल्समधून भूमध्य समुद्रात प्रवेश मिळवण्याची इच्छा जाहीर केली, पण तुर्कस्तानने कडाडून विरोध केला म्हणून ती मान्य झाली नाही.

अशा प्रकारे या तीनही घटनांच्या वेळी युद्ध भडकले असते, पण ऐनवेळी कुणीतरी एकंदर परिस्थिती पाहता नाईलाजाने का होईना, पण माघार घेण्याचे शहाणपण दाखवले. त्यामुळे युद्ध टळले.

या बाल्कन पेचप्रसंगाची एवढीच फलश्रुती सांगणे मात्र चूक होईल.

जर्मन राजकारणी आणि मुत्सद्द्यांवर कैसर विल्हेल्म कमालीचा नाराज झाला आणि त्याने इथून पुढे जर्मन राजकारण्यांवर भरवसा न ठेवता सैन्य व सेनापतीवर तो ठेवायचा अशी खूणगाठ बांधली. १९०५ आणि १९११च्या वेळेसही खरे तर युद्ध पेटायचे, पण जर्मनीने माघार घेतल्यामुळे ते दोन्ही वेळेस टळले. हा जर्मनीचा समजूतदारपणा नव्हता, तर आपण एकटे पडलो आहोत, हे ओळखून आणि पूर्णतयारी केल्याशिवाय असे वेडे धाडस करायचे नाही, हे तो शिकला.

युरोपात रशिया, फ्रान्स आणि इंग्लंड हे आता आपले शत्रू असून ते आपल्या विरुद्ध एकत्र येऊन कट-कारस्थान करताहेत, ही त्याची धारणा आता अगदी पक्की झाली. आता रशिया, इंग्लंड आणि फ्रान्स अशा तीन बलाढ्य शत्रूंशी एकाच वेळी अनेक आघाड्यांवर लढायची तयारी त्यांनी सुरू केली. इजा झाला, बिजा झाला, इथून पुढे माघार नाही, ही खूणगाठ जर्मनीने मनाशी बांधली.

आपल्याला जर्मनीपासून धोका नको असेल तर आपण फ्रान्स आणि इंग्लंडच्या पंगतीला बसले पाहिजे, अशी खूणगाठ रशियाने बांधली. सर्बियासारख्या आपल्या युरोपातल्या एकमेव सहकाऱ्याला अजून दुखावून चालणार नाही, हे रशियाने ताडले; तर जर्मनीला आपल्याशिवाय कुणी सहकरी नसल्याने आपले कसलेही वेडे साहस पाठीशी घालून जर्मनी आपल्याबरोबर उभा राहणार, असा अर्थ ऑस्ट्रियाने काढला. म्हणजे एकंदरीत पुन्हा असा पेचप्रसंग उभा राहील, तेव्हा कुणीतरी माघार घेईल आणि गोष्टी हाताबाहेर जाणे टळतील याच्या शक्यता धूसर झाल्या.

या उलट...

रशिया, फ्रान्स आणि विशेषत: इंग्लंडनेही नव्यानेच उदयाला येऊ घातलेल्या जर्मनीसारख्या प्रगत राष्ट्राच्या आकांक्षांकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केले. जमेल तेवढे त्याला दाबण्याचे, एकटे पाडण्याचे राजकारण केले. असे वारंवार करून आपण हवे ते साध्य करू शकतो आणि त्याने काही फरक पडणार नाही, असा इंग्लंड-फ्रान्सचा आत्मविश्वास दुणावला. अशा गोष्टी तात्कालिक फायदा करून देतात, पण शेवटी त्याची जबर किंमत द्यावी लागते, हे त्यांना लवकरच समजणार होते, अगदी भयानक रीतीने.

पुढील भागात - ऑस्ट्रिया आणि या बाल्कन राष्ट्रांबद्दल थोडी अधिकची माहिती. नंतर जो महायुद्धाचा भडका उडाला, त्याला सुरुवातीला दारूगोळा पुरवण्याचे काम इथूनच झाले.

.............................................................................................................................................

या सदरातील आधीच्या लेखांसाठी पहा -

१) २०१८ साली ११ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता पहिले महायुद्ध संपल्याला १०० वर्षे पूर्ण झाली!

https://www.aksharnama.com/client/article_detail/3952

२) पहिल्या महायुद्धाची कारणे शोधताना आपल्याला कमीत कमी १०० वर्षे तरी मागे जावे लागते!

https://www.aksharnama.com/client/article_detail/3977

३) बिस्मार्कची भविष्यवाणी खरी ठरली! जुलै १८९८मध्ये बिस्मार्क वारला आणि नोव्हेंबर १९१८मध्ये पहिले महायुद्ध संपले. त्यात जर्मनीचा नामुष्कीकारक पराभव झाला.

https://www.aksharnama.com/client/article_detail/3992

४) कैसर विल्हेल्म दुसरा हे पहिल्या महायुद्धातले सगळ्यात जास्त प्रसिद्ध पात्र असेल!

https://www.aksharnama.com/client/article_detail/4007

५) जर्मनी अब्रू वाचवून बाहेर पडला. युद्ध टळले आणि बाकीच्यांनी सुटकेचा नि:श्वास टाकला. पण नाटक संपले नव्हते, फक्त पहिला अंक पार पडला होता!

https://www.aksharnama.com/client/article_detail/4022

.............................................................................................................................................

लेखक आदित्य कोरडे टाटा मोटर्स, पुणे इथं डिझाईन इंजिनिअर म्हणून कार्यरत आहेत.

aditya.korde@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

जर नीत्शे, प्लेटो आणि आइन्स्टाइन यांच्या विचारांत, हेराक्लिट्स आणि पार्मेनीडीज यांच्या विचारांचे धागे सापडत असतील, तर हे दोघे आपल्याला वाटतात तेवढे क्रेझी नक्कीच नाहीत

हे जग कसे सतत बदलते आहे, हे हेराक्लिटस सांगतो आहे आणि या जगात बदल अजिबात होत नसतात, हे पार्मेनिडीज सिद्ध करतो आहे. आपण डोळ्यांवर अवलंबून राहण्यापेक्षा आपल्या बुद्धीवर अवलंबून राहिले पाहिजे, असे पार्मेनिडीजचे म्हणणे. इंद्रिये सत्याची प्रमाण असू शकत नाहीत. बुद्धी हीच सत्याचे प्रमाण असू शकते. यालाच बुद्धिप्रामाण्य म्हणतात. पार्मेनिडीज म्हणजे पराकोटीचा बुद्धिप्रामाण्यवाद! हेराक्लिटस क्रेझी वाटतो, पण.......