मजकूर अपमानकारक असतो, तेव्हा ‘यू-ट्युब’ सर्वदूर पोहोचलेले असते!
पडघम - माध्यमनामा
मॅथ्यू इनग्रम
  • ‘यू-ट्युब’चा लोगो
  • Sat , 25 January 2020
  • पडघम माध्यमनामा यू-ट्युब YouTube फेक न्यूज Fake news फेसबुक Facebook ट्विटर Twitter सोशल मीडिया Social Media

सोशल मीडियानामक गोष्टींमध्ये फेसबुक, ट्विटर, गुगल यांच्याबरोबरीने यू-ट्युब हे माध्यमही आघाडीवर आहे. किंबहुना हे पूर्णपणे व्हिडिओ माध्यम असल्याने त्याचा जनमानसावर जास्त परिणाम होतो, ते लवकर जनमानसाला आकर्षित करते. मात्र या माध्यमाच्या काही उण्या बाजूही आहेत. प्रस्तुत लेख हा ‘Columbia Journalism Review’ या ऑनलाईन माध्यम चिकित्सा करणाऱ्या पोर्टलवर प्रकाशित झालेला आहे. हा मूळ इंग्रजी लेख ६ जून २०१९ रोजी प्रकाशित झालेला असला आणि त्यातील सर्व उदाहरणे पाश्चात्य असली तरी या लेखातून यू-ट्युब या माध्यमाबद्दलची बरीच माहिती मिळू शकते. त्यामुळे जवळपास सहा महिने उलटले असले तरी त्याचा हा मराठी अनुवाद मुद्दाम प्रकाशित करावासा वाटला.

.............................................................................................................................................

फेसबुकच्या अधिकाऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला असेल. अनेक आठवडे चुकीची माहिती आणि त्रास देणे यावर कसलीही कृती न करण्याबद्दल हे प्रचंड समाज माध्यम काही टीकाकारांकडून चर्चेत होतं. त्या ऐवजी या आठवड्यात प्रकाशझोत यू-ट्युबवर आला आहे. गूगलची मालकी असलेल्या व्हिडिओ शेअर करणाऱ्या साईटने सुट्टीच्या आठवड्याची सुरुवातच चुकीची केली. याचे कारण यू-ट्युबचा निर्माता स्टीवन क्राउडर हा सातत्याने समलैंगिक लोकांची निंदानालस्ती करत होता आणि त्याच्यावर कसलीही कारवाई केली जात नव्हती. त्याचा रोख वॉक्सचा पत्रकार कार्लोस माझावर होता आणि तो कार्लोसच्या म्हणण्यानुसार गेले अनेक महिने होता. जेव्हा यू-ट्यूबने म्हटले की, क्राउडरच्या व्हिडिओने कोणतेही नियम तोडलेले नाहीत आणि म्हणून ते काढून घेतले जाणार नाहीत, तेव्हा ‘काहीही कारवाई न करण्याबद्दलच्या’ रागात भर पडली. “आम्हाला भाषा उघडच अपमानकारक वाटली तरी पोस्ट केलेले व्हिडिओ आमच्या नियमांचा भंग करणारे नाहीत.” यू-ट्यूबने ट्विटरवर म्हटले.

या निर्णयानंतर जेव्हा टीकेचा जोरदार मारा सुरू झाला, तेव्हा कंपनीने काहीसे सौम्य होत बुधवारी घोषणा केली की, क्राउडरच्या चॅनलचे ती ‘निश्चलीकरण’ करेल, म्हणजे त्याचे व्हिडिओ यू-ट्यूब दाखवून ज्या जाहिराती मिळतात, त्यातला महसूल त्याला मिळणार नाही. कंपनीचे बहुसंख्य टीकाकार (माझा सकट) यामुळे शांत झाले नाहीत. कारण त्याला ब्रँडेड वस्तू विकून बरेच पैसे मिळत असतात. त्या वस्तूत टी शर्ट्सही असतात. ज्यावर लिहिले असते- ‘socialism is for F*gs. मात्र यू-ट्यूबच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर केलेल्या ट्वीट्सवरून सुरुवातीला असे दिसले की, क्राउडरने जर ते टी शर्टस् विकायचे थांबवले तर त्याच्या चॅनलला पैसा मिळेल. शिवाय पुढे असेही स्पष्टीकरण होते की, तो आपल्या चॅनलमध्ये बदल करेपर्यंत (ज्यात ते टी शर्टस् विकायचे थांबवणे याचाही अंतर्भाव असेल) त्याला ‘निश्चलीकरणा’चा सामना करावा लागेल.

हे सगळे चालू असताना यू-ट्युबनेही त्याच वेळी घोषणा केली की, ते ‘नव नाझी’ आणि ‘गोऱ्यांच्या श्रेष्ठत्वाची’ भलामण करणाऱ्या, तसेच सँडी हूक शाळेतील गोळीबारासारख्या ऐतिहासिक घटनांबद्दल शंका घेणाऱ्या व कट सिद्धांताचा पुरस्कार करणाऱ्या व्हिडिओवर कडक कारवाई करतील. ही वेळ साधणे हेतुपुरस्सर होते की नाही, (म्हणजे यू-ट्युबला वाटले की, अशी चाल खेळून क्राउडरवरील टीकेच्या वादळावर उतारा मिळेल) ते माहीत नाही. पण त्या घोषणेने हे निश्चित दाखवून दिले की, जरी तसे पुरावे दिसत नसले तरी समस्याजनक मजकूराच्या संदर्भात यू-ट्युब प्रश्न प्रभावीपणे हाताळते. जेव्हा ‘माझा प्रकरणा’तील धरसोडही लक्षात आली, तेव्हा खरे तर काही बाबतीत ‘नव नाझी’ आणि ‘कट सिद्धांताची’ घोषणा याने अपमानकारक मजकुराबद्दल असलेला कंपनीचा दृष्टिकोन हा उलट अधिकच गोंधळलेला वाटला. जोपर्यंत नव नाझीसंबंधी मजकूर उघडउघड नियमाविरुद्ध धरला जाईल, पण समलैंगिकांना झोडणे नियमाविरुद्ध धरले जाणार नाही, तोपर्यंत केवळ ‘निश्चलीकरण करणे’ एवढेच होईल. पण तरी काही बाबतीत आक्षेपार्ह मते मांडणे हे वाईटच. नाही का?

बाकी काही नाही, तरी गेले ४८ तास यू-ट्युबने हेच दाखवून दिले की, अपमानकारक मजकूर हाताळण्यात ते किती गोंधळून गेले आहेत. हे तर यू-ट्युबच्या जुन्या प्रेक्षकांना चांगलेच माहीत आहे. फेसबुक आणि ट्विटरला येणाऱ्या समस्यांसारख्या समस्यांचा सामना गुगलला करायला लागत नाही, हा दावा गुगलला करायला आवडतो! (उदा. काँग्रेशनल सुनावण्यांच्या वेळची संतप्त वादावादी) कारण ते सोशल नेटवर्क नाही. पण समजा, अमेरिकेच्या २०१६ च्या निवडणुकांवर गैरमार्गाने ताबा मिळवण्याच्या उद्देशाने रशियन ट्रोलर्सनी चुकीची माहिती पसरवण्यासाठी जर फेसबुकचा वापर केला असेल, तर यू-ट्युबचा गणनविधी (algorithm) असा आहे की, जो केवळ लोकांना बनावट आणि प्रक्षोभक मजकुराकडेच नेत नाही, (जिथे काही अतिरेकी त्यांना कट्टर बनवण्याचे श्रेय नेटवर्कला देतात), तर एकुणात लहान मुलांच्या अश्लील मजकुरापर्यंत येतो.

ट्विटरसारखेच यू-ट्युबही आपला ‘अभिव्यक्ती स्वातंत्र्य’ आणि ‘कशालाही परवानगी आहे’चा झेंडा  घट्ट धरून आहे. आणि म्हणूनच दोन्ही कंपन्या उघडउघड द्वेषमूलक किंवा अपमानकारक मजकुरावर कठोर कारवाई करण्यास अनुत्सुक असतात. (फेसबुक प्रमाणे) दोन्ही कंपन्या त्यांच्याकडे ‘अपारंपरिक आहेत’ असा ग्रह करून बघण्याबद्दल जरा जास्तच संवेदनशील आहेत. त्यांच्याबद्दलचा हा ग्रह पुढे येत राहतो, ते त्यांच्याकडे अनुकूलतेने बघावे या प्रयत्नातून, पण त्याने या तीनही कंपन्या गलितगात्र झाल्यासारख्या झाल्या आहेत. क्राउडर हा उजव्या बाजूने बोलणारा आहे, हा केवळ योगायोग नाही आणि यू-ट्युबने त्याच्याविरुद्ध केलेल्या कारवाईचा वापर त्याच्या तत्त्वप्रणालीबद्दल होत असलेल्या छळाचा पुरावा म्हणून तो करत आहे. यू-ट्युब जोपर्यंत एक सुसंगत तत्त्वप्रणाली बनवून तिला बांधील राहत नाही, तोपर्यंत अशा प्रकारच्या युक्तिवादाचा प्रभाव पडत राहील.

यू-ट्युब अवमानकारक मजकूर कसा हाताळत आहे, त्याबद्दल आणि शिवाय अधिक काही

गलथानपणा : क्राउडरकडून सतत होणारा छळ आणि त्याबद्दल यू-ट्युबने काही न करणे, हे सीजेआरच्या जस्टीन रे यांना सांगताना माझाने ‘प्राईड मंथ’च्या सोहळ्यातील व्हिडिओ शेअरिंगमधील नेटवर्कच्या सहभागाबद्दल आणि त्याबद्दल यू-ट्युबने कसलीही कारवाई न करणे, हे अधिकच असमर्थनीय ठरते हे सांगितले. “यू-ट्युबला यापैकी कसल्याचीही पर्वा नाही. हे  दाखवण्याचे ढोंग करून ते पैसे कमावत आहेत, कारण त्यांना खरोखरच कसलीही पर्वा नाहीये.” माझा म्हणतो, “ते आपल्याला पर्वा नसल्याचे दाखवतायत, जेणेकरून कॉर्पोरेट ब्रँड्सना हे कळू नये की, यू-ट्युब किती कमालीचे गलथान आहे.”

‘उबर’सारखे : गार्डियनची तंत्रज्ञानविषयक लेखक जुलिया कॅरी वाँग म्हणतात की, यू-ट्युबची तुलना नेहमी फेसबुक आणि ट्विटरशी केली जाते, पण खरं तर ते उबरसारखे अधिक आहे. यू-ट्युबचे निर्माते किंवा क्राउडरसारखे ‘तारे’ हे केवळ नुसते अचानक काही पोस्ट करून ते व्यासपीठ  वापरत नाहीत, तर त्या म्हणतात की खरे तर त्यांना यू-ट्युबने कामावर ठेवले आहे. यू-ट्युब त्यांच्याबरोबर त्यांचा मजकूर पोस्ट करण्यासाठी भागीदारी करते आणि बदल्यात जाहिरातींतून मिळणारा पैसा आणि इतर फायदे मिळवते. आणि तरी यू-ट्युब त्यावरच्या मजकुराची कसलीही जबाबदारी घेत नाही.

जनसंपर्काची खेळी : ‘Data & Society’ येथील संशोधक रेबेका लुईस ज्यांनी यू-ट्युबवरील अतिरेकी मजकुराच्या समस्येविषयी लिहिले आहे. त्यांनी ट्विटरवर म्हटले की, कंपनीने द्वेषजनक भाषणावर कठोर कारवाईचे दिलेले आश्वासन कंपनी खरोखरच पाळेल की नाही याबद्दल त्या साशंक आहेत. त्या म्हणतात, “माझाने सहन केलेल्या छळाबद्दल काही भूमिका घेण्यास दिलेल्या नकाराच्या पार्श्वभूमीवर, नकारात्मक जनसंपर्क बदलण्याचा मार्ग म्हणून यू-ट्युबची नवीन धोरणे न बघणे कठीण आहे. ही व्यासपीठे प्रस्तावित बदलांची जनसंपर्काची विधाने करण्यात फार हुशार असतात ज्या बदलांचा फारसा प्रभाव पडत नाही.”

जाळ्यात सापडणे : अतिरेकी मजकुराबद्दल यू-ट्युबने केलेल्या घोषणेनंतर काही मिनिटांतच मुक्त पत्रकार फोर्ड फिशर म्हणाले की, अतिरेकीपणा आणि चळवळींची नोंद ठेवणाऱ्या यू-ट्युब चॅनलचे  निश्चलीकरण झाले. फिशरने म्हटले आहे की, त्यांचे काम डझनावारी लघुपटात आले आहे. त्यांना यू-ट्युबकडून इमेलने नोटीस आली. ज्यात म्हटले होते की, त्यांच्या चॅनलवरील ‘बराच भाग’ यू-ट्युबच्या धोरणाशी सुसंगत नव्हता म्हणून जाहिरातीतून मिळणाऱ्या मिळकतीतील त्यांचा सहभाग कापण्यात आला.

इतर लक्षणीय गोष्टी : ‘क्रेग्जलिस्ट’चे संस्थापक क्रेग न्यूमार्क यांनी घोषणा केली की, ‘कन्झुमर रिपोर्ट मॅगझीन’ला डिजिटल युगात ग्राहक हिताकडे लक्ष देण्यासाठी नवी संशोधन प्रयोगशाळा निर्मितीस त्यांची धर्मादाय संस्था सहा लाख डॉलर्स देत आहे (न्यूमार्क हे CJRच्या बोर्डवर आहेत आणि त्यांनी कोलंबिया जर्नालिझम स्कूलला नवीन ‘एथिक सेंटर’साठी १० लाख डॉलर्स दिले आहेत). त्या मासिकाने म्हटले आहे की, त्यांच्या नवीन प्रयोगशाळेत “लोक ज्या डेटाच्या खाजगीपणा आणि सुरक्षिततेच्या मुद्द्यांना सामोरे जात आहेत, ते सुलभपणे समजावले आणि सोडवले जातील तसेच न्याय्य बाजार स्पर्धा, पारदर्शकता आणि ग्राहक निवड या विस्तारित विषयांचेही परीक्षण होईल.”

डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘टोरँटो स्टार’ला सांगितलेल्या असंख्य असत्यांना आव्हान देणारा म्हणून प्रसिद्ध झालेला पत्रकार डॅनियल डेल हा सीएनएनच्या वॉशिंग्टन ब्युरोमध्ये पत्रकार म्हणून जात आहे. त्याच्या म्हणण्यानुसार तो “१७ जूनपासून सत्याची तोफ डागत राहील. ट्रम्प, डेमोक्रेटिक उमेदवार आणि इतरांच्या अप्रामाणिकपणाचे विच्छेदन करत राहील. सप्टेंबर २०१६ पासून त्याने राष्ट्राध्यक्षांच्या कथानांची सत्यासत्यता पडताळून पाहण्याचे काम सुरू केले. कारण मोहिमांबद्दल जे दाखवले जात होते त्यात काय खरे खोटे आहे हे दाखवण्यात कोणालाच रस नव्हता आणि ते  मला उद्वेगजनक वाटत होते.”

कॅलिफोर्नियातील पूर्वीच्या कौटुंबिक मालकीची अनेक वृत्तपत्रे कसे फारशी माहीत नसलेल्या कॅनडाच्या ‘आल्बर्टा न्यूजपेपर ग्रुप’ने पट्कन खरेदी केली याबद्दल एल. ए. टाइम्सने लिहिले आहे. ही कंपनी डेविड रॅड्लर चालवत आहे. माजी माध्यम सम्राट कॉनरॅड ब्लॅक यांचा ते उजवा हात होते. मात्र त्यानंतर त्यांच्या या माजी बॉसविरुद्ध फसवणुकीच्या खटल्यात महत्त्वाचे साक्षीदार म्हणून प्रसिद्धी पावले. (ज्यांच्याबद्दल ब्लॅक यांनी पुस्तक लिहिले होते, त्या डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकतीच त्यांना क्षमा केली!)

‘पिउ रिसर्च सेंटर’च्या नवीन अभ्यासानुसार हवामान बदल ही समस्या आहे, असे म्हणणाऱ्यांपेक्षा बनावट बातम्या ही समस्या आहे असे म्हणणारे खूप अमेरिकन लोक आहेत. या पाहणीतल्या उत्तरात ५० टक्के लोकांनी ‘बनावट बातम्या’ ही समस्या असल्याचे सांगितले, तर ४६ टक्के लोकांनी ‘हवामान बदल’ ही समस्या असल्याचे सांगितले. डेमोक्रॅट्सपेक्षा रिपब्लिकन लोकांनी या समस्येबद्दल खूप गंभीर चिंता व्यक्त केली आणि ही समस्या निर्माण केल्याबद्दल जास्त दोष त्यांनी पत्रकारांना दिला.

मुख्य धारेतील अनेक माध्यमांनी डच किशोरवयीन मुलीला (जी मुलगी देशाच्या कायदेशीर ‘इच्छामृत्यु’ कार्यक्रमाचा भाग होती) इच्छामृत्यु दिल्याची खोटी बातमी पसरवली, याकडे ‘पोलिटिको युरोप’च्या पत्रकार नेओमी ओ लिअरी यांनी ट्विटरवर लक्ष वेधले. सत्य तपासताना त्यांना केवळ १० मिनिटांत या निष्कर्षाप्रत येता आले की, त्या किशोरवयीन मुलीने कायदेशीर इच्छामरण मागितले होते, पण तिला ते नाकारण्यात आले. नंतर ती अनेक आठवडे अन्नपाण्याचा त्याग केल्यामुळे मरण पावली.

जे पत्रकार आपली कारकीर्द इतरत्र घडवल्यानंतर आपल्या गावच्या घरी कामासाठी परतले आहेत. त्याबद्दल सीजेआरमध्ये मॅथ्यू कॅसल लिहितात. या पत्रकारात कॅटलीन डुई याही आहेत. ‘वॉशिंग्टन पोस्ट’साठी डिजिटल संस्कृती आणि अन्न धोरण याविषयी त्या आधी लिहीत असत. त्यानंतर त्या ‘बफेलो न्यूज’साठी काम करण्यासाठी परतल्या. ख्रिस्तोफर रिकेट सध्या त्यांच्या गावातील ‘इंडियाना पोलीस स्टार’ या वृत्तपत्राचे शासन आणि राजकारण विषयाचे संपादकीय काम करत  आहेत. त्याआधी ते बाल्टिमोर, शिकागो, आणि डेनवर येथे प्रकाशनाच्या कामात होते.

पूर्वी तारण दलाल असलेल्या हर्ब सँडलर या परोपकारी व्यक्तीने ‘प्रो पब्लिका’साठी पहिले भांडवल दिले होते. ते ८८ व्या वर्षी वारले. त्या कंपनीचे सहसंस्थापक पॉल स्टायगर यांनी २००६मध्ये ते ‘वॉल स्ट्रीट जर्नल’ला व्यवस्थापकीय संपादक असताना कसा सँडलर यांच्याकडून फोन आला, हे सांगितले. तेव्हा सँडलर यांनी आपली ‘गोल्डन वेस्ट फायनान्शियल’ ही कंपनी वाकोवियाला २५० लाख डॉलर्सना विकली होती. त्यांनी सांगितले की, त्यांना पत्रकारितेतील नवीन उपक्रमाला काही निधी द्यायचा आहे आणि दर वर्षी १ लाख डॉलर्स खर्च करायची त्यांची तयारी आहे. स्टायगर यांनी जमवाजमव केली. त्याचे नंतर ‘प्रो पब्लिका’ झाले.

‘द इलेक्ट्रॉनिक फ्रंटीयर फाउंडेशन’ने एक नवीन रिपोर्ट प्रकाशित केला आहे. त्यात दाखवून दिले आहे की, फेसबुक सारखे व्यासपीठ अति उत्साही मजकूर सौम्य करण्याची काही तंत्रे वापरते. उदा.  मजकुराचे अतिरेकी स्वरूप नसले तरी ज्यात वादग्रस्त राजकीय मुद्दे असतात ते काढून टाकणे. यामध्ये चेचेन आणि कुर्दिश यांच्या स्वयंनिर्णयाच्या भाषणाचे समर्थन, ‘हिजबुल’च्या महत्त्वाच्या व्यक्तीबद्दल विडंबनात्मक भाषण आणि सिरीया, येमेन व युक्रेन येथे चालू असलेल्या संघर्षांच्या नोंदी यांचा अंतर्भाव आहे.

मराठी अनुवाद - माधवी कुलकर्णी

.............................................................................................................................................

मूळ इंग्रजी लेखासाठी पहा -

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा