हा कोणता काळ आहे, साधे झाडांविषयी बोलणेसुद्धा गुन्हा ठरतो! खरेच आम्ही काळोखाच्या काळात जगतो आहोत!
पडघम - साहित्यिक
वसंत आबाजी डहाके
  • महाराष्ट्र फाउंडेशन पुरस्कार सोहळ्यात ज्येष्ठ कवी वसंत आबाजी डहाके आपलं मनोगत व्यक्त करताना
  • Mon , 13 January 2020
  • पडघम साहित्यिक वसंत आबाजी डहाके Vasant Aabaji Dahake महाराष्ट्र फाउंडेशन Maharashtra Foundation's Award

महाराष्ट्र फाउंडेशनचा २०१९चा साहित्य जीवन गौरव पुरस्कार ज्येष्ठ कवी वसंत आबाजी डहाके यांना देण्यात आला. काल त्याचा सोहळा पुण्यात झाला. त्या वेळी डहाके यांनी केलेल्या भाषणाचा संपादित अंश...

.............................................................................................................................................

‘साहित्य’ या विभागातील अतिशय सन्मानाचा असा हा जीवनगौरव पुरस्कार देऊन आपण माझा गौरव करत आहात, हा अत्यंत आनंदाचा प्रसंग आहे, आणि माणसाच्या भावनांचा विचार करता तो स्वाभाविकच आहे. तथापि एखादा आनंदाचा प्रसंग स्वच्छ मोकळेपणाने स्वीकारता यावा, अशी परिस्थितीही असावी लागते. बर्टोल्ट ब्रेश्ट यांनी एका कवितेत म्हटले आहे - हा कोणता काळ आहे, साधे झाडांविषयी बोलणेसुद्धा गुन्हा ठरतो! खरेच आम्ही काळोखाच्या काळात जगतो आहोत! तर अड्रियन रिच या कवयित्रीने म्हटले आहे - या अशा काळात झाडांविषयी बोलणेसुद्धा आवश्यक असते.

नेहमीच राष्ट्राच्या इतिहासात प्रकाशाचे कालखंड असतातच असे नाही, काळोखाचेही असतातच. केवळ प्रकाशच प्रकाश, केवळ काळोखच काळोख, असेही नसते. आज अवतीभवती झाकोळून आलेले आहे. श्वासही नीट घेता येत नाही, घुसमटते आहे. मन भरून आत आत स्वच्छ हवा घ्यावी, अशी हवाच राहिलेली नाही की काय, असे वाटावे, असे वातावरण आहे. हे वातावरण कोणाच्याही आरोग्याला पोषक नाही. हे असेच वातावरण फार दिवस राहणार नाही, हे आपल्याला ठाऊक आहे, तसा विश्वासही आहे. घनदाट काळोख असला तरी ठिकठिकाणी दिवट्या पेटत असतात, त्याचेच रूपांतर अधिक प्रकाशात होत असते, याचा आपल्याला अनुभव आहे. वातावरण कुंद असले तरी मधूनच आल्हादक झुळूक येऊन जाते. तेवढ्यानेही आपले मन उल्हसित होते.

अलिकडच्या काळात आपण अस्वस्थ व्हावे असे बरेच काही घडलेले आहे. सध्याचा काळच स्थलांतरांचा, विस्थापनांचा आहे की काय अशी शंका यावी, असे सारे चाललेले आहे. आपली मुळेच उखडून टाकली जावीत, आणि कुठेतरी मुळे रुजवण्यासाठी भूमीचा एखादा तुकडा शोधत फिरावे लागावे अशी स्थिती अनेक जनसमूहांची झालेली आहे. भौतिक आणि राजकीय उलथापालथींमुळे या गोष्टी घडत असतात. हे ‘विश्वची माझे घर’, ‘जागतिकीकरण’ हे निव्वळ शब्द राहून जातात. ठिकठिकाणची माणसे आपली छोटीशी घरटी बांधून चिमुकले पण कष्टाचे जगणे जगत असतात, तर त्यांना तिथून खेचून हलवले जाते, आणि इतस्तत: फेकले जाते. सिरियामधले सामान्य लोक असोत, की म्यानमारमधले रोहिंग्या असोत- जायचे कुठे, आपली म्हणून काही जमीनच नाही अशा स्थितीत त्यांना ढकलले जाते.

भाषा, जात, धर्म, संस्कृती, प्रांत, देश- किती पातळ्यांवर माणसांच्या वाट्याला असह्य यातना येत असतात. नियतीच म्हणायची झाले तर ही आर्थिक-राजकीय नियती आहे. धर्मसत्तेचे राजसत्तेवर वर्चस्व असले किंवा अर्थसत्तेचे राजसत्तेवर वर्चस्व असले की अशा गोष्टी घडत असतात असे मी वाचले आहे. सध्या तर जगभरात धर्मसत्ता आणि/वा अर्थसत्ता अथवा या दोहोंचेही राजसत्तेवर वर्चस्व आहे असे दिसून येते. अशा स्थितीत सामान्यांच्या आयुष्याची परवड होते. या सामान्य नागरिकांना--मी कोण आहे, कुठून आलो, माझी ओळख काय असे प्रश्न पडू लागतात. हे प्रश्न आज आध्यात्मिक पातळीवरचे राहिलेले नाहीत, भौतिक वास्तवातले, प्रत्यक्ष जगत असताना पडणारे प्रश्न आहेत.

मराठी कादंबरीतले एक उदाहरण घ्यायचे तर, कृष्णात खोत यांच्या ‘रिंगाण’ या कादंबरीत स्थलांतरित, विस्थापित मानवसमूहाचे चित्रण आलेले आहे. तो समूह जिथून हाकलला गेला तिथे त्याचे काही राहिलेले नाही, जिथे तो वसवला गेला त्यांच्याशी संवाद साधला जात नाही. ही अशाच असंख्य स्थलांतरितांची, विस्थापितांची कहाणी असू शकते.

आपण जिथे उभे आहोत ती जागा हिरावून तर घेतली जाणार नाही ना, अशा भयाक्रांत अवस्थेत माणसे जगत असतात. आई-बाप, भाऊ-बहिणी, मुले, नातवंडे एकत्र राहू शकू की ताटातूट होईल, या अशुभ शंकेने लोकांची मने पोखरली जातात.

दुसरीही संकटे आपल्या मस्तकाभोवती गरगरत असतात. रोज शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत. हा कोणता काळ आपण अनुभवतो आहोत असे पुष्कळदा वाटते. या आत्महत्या आज थांबतील, उद्या थांबतील, शेतकरी उभारीने जगू लागतील असे वाटते. पण असा कोणताही उपाय कुणालाही अद्याप सापडलेला नाही. माणसाच्या जीविताला काही मोल आहे, असे राजसत्तेला, अर्थसत्तेला वाटते की नाही, असाच प्रश्न मनात घोंगावत असतो.

एक सर्वसामान्य माणूस म्हणून, आणि लिहिणारा एक माणूस म्हणून, या देशाचा नागरिक म्हणून मला हे प्रश्न पडतात.

साहित्यातून लेखकांनी असे प्रश्न विचारलेले आहेत. किंबहुना लेखकांचे ते कामच आहे. लेखक, कवी, कलावंत, पत्रकार, विचारवंत हे आपल्या भोवतीच्या समाजाला समजून घेतात, हा समाज कशाने त्रस्त आहे, कोणत्या कारणाने भयग्रस्त आहे, त्याला कोणत्या वेदना सोसाव्या लागतात, हे ते जाणून घेतात. त्याविषयी बोलतात, लिहितात. तोच त्यांचा धर्म आहे. हा मानवधर्म आहे. सबंध समाज शब्दांतूनच बोलतो असे नाही. तो सहस्त्र मुखांनी बोलतो. तो स्तब्ध असला तरी त्याचे बोलणे ऐकू येत असते. तो आतल्याआत घुसमटत असतो, तेव्हा त्याचे घुसमटणे ऐकू येत असते. लेखक, कलावंत, पत्रकार मूक समाजाच्या स्तब्धतेला वाचा देत असतात. त्यात समंजसपणा असतो, प्रगल्भता असते, कधी विद्रोह असतो, आक्रोश असतो, प्रतिरोध आणि निषेधही असतो.

आपण समाजात जगत असतो. त्यामुळे समाजाचे वागणे, बोलणे, किंचाळणे, आक्रोश करणे, आनंदाने चीत्कार करणे हे सगळेच ऐकू येत असते. त्याच्या स्थिती दिसत असतात. त्याचे थरकापणे जाणवते, भयभीत होणे जाणवते. त्याचे आनंदाने हसणे जाणवते, विपरीत स्थितींशी संघर्ष करणेही जाणवते, त्याचे मोडून पडणे जाणवते, तसेच खंबीर उभे राहणेही जाणवते. हे सगळे साहित्यातून येते तेव्हा ते समाज समजून घेण्यातून येते. अशा लिखाणातून कधी समाजव्यवस्थेतील, कधी राज्यव्यवस्थेतील, कधी अर्थव्यवस्थेतील दोष दाखवले जातील, त्रुटी सांगितल्या जातील. त्यामुळे कोणत्याही सत्तेने भयभीत होण्याचे कोणतेही कारण नसते.

मला तर पुष्कळदा वाटते की राज्यव्यवस्थेत, अर्थव्यवस्थेत काम करणार्‍यांनी साहित्य वाचावे, विविध कलांचा आस्वाद घ्यावा. म्हणजे त्यांची मने सतत मानवी संवेदनशीलतेने झंकारत राहतील. धर्मसत्तेत असणाऱ्यांनी उपनिषदे वाचावीत, संतसाहित्य वाचावे. त्यांची मने शांत असतील. शेवटी सगळी सत्तापदे जनहितार्थ असतात. जनतेच्या कल्याणाहून दुसरी कोणतीही गोष्ट मोठी नसते, महत्त्वाची नसते. उच्च पदावर ज्या व्यक्ती असतात, (किंबहुना, कोणत्याही पदावर कुणीही असो) त्यांच्यासाठी सारी माणसे सारखीच असतात. ते कुणातही भेद पाहत नसतात, भेद करत नसतात.

आपल्या संविधानात राज्य धोरणांची निदेशक तत्त्वे सांगितली आहेत. त्यात म्हटले आहे : राज्य, त्यास शक्य होईल तितक्या परिणामकारक रीतीने सामाजिक, आर्थिक व राजकीय न्यायाद्वारे राष्ट्रीय जीवनाच्या सर्व घटकांमध्ये प्रेरणा निर्माण करील अशी समाजव्यवस्था प्रस्थापित करून व तिचे जतन करून लोककल्याणाचे संवर्धन करण्यासाठी प्रयत्नशील राहील.

नागरिकांच्या कर्तव्यांविषयी सांगताना-धार्मिक, भाषिक व प्रादेशिक किंवा वर्गीय भेदांच्या पलीकडे जाऊन भारतातील सर्व जनतेमध्ये सामंजस्य व बंधुभाव वाढीला लावणे- असे म्हटलेले आहे. असा भेदाभेदरहित समाज लेखकांच्या, कलांवंतांच्या मनात असतो. जेव्हा तो प्रत्यक्षात दिसत नाही तेव्हा त्यांना क्लेश होतात. ते वर्तमानात जगतात, आणि वर्तमान जगतात. स्वत: क्लेश अनुभवत असतील, तरीही ते इतरांचे क्लेश दूर व्हावेत, दु:खांचे निवारण व्हावे यासाठी कलाकृतींची निर्मिती करतात. शेवटी मनुष्य असणे म्हणजे काय, तर मनुष्यत्वाला अर्थ देणे. एक माणूस म्हणून, एक नागरिक म्हणून माझे हेच काम आहे. शेवटी मी माझ्याच एका कवितेतल्या काही ओळी वाचतो :

मी प्रार्थना करतो

या ग्रहासाठी, पृथ्वी नावाच्या या ग्रहासाठी

या ग्रहावरील साऱ्याच जायबंदी प्राण्यांसाठी

मी प्रार्थना करतो

या माझ्या देशासाठी

अंगावरच्या जखमा सांभाळत

कण्हत पडलेल्या माझ्या देशासाठी

मी प्रार्थना करतो मायबहिणींसाठी, मुलांसाठी

मी प्रार्थना करतो तुमच्यासाठी, यांच्यासाठी, त्यांच्यासाठी

सार्‍यांसाठी

सारे सुखी होवोत, सारे निरामय होवोत

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘जातवास्तव’ स्वीकारल्याशिवाय सत्ता आणि संसाधनांचा जातीय ‘असमतोल’ दूर करता येणार नाही. उमेदवारांची नावे जातीसकट जाहीर करणे, हा एक ‘सकारात्मक प्रयोग’ आहे

महायुतीच्या ३८ उमेदवारांपैकी १९ मराठा आहेत. विशेष म्हणजे हे सगळे श्रीमंत मराठे आहेत. महाविकास आघाडीच्या ३९ उमेदवारांपैकी २४ मराठा आहेत. वंचित बहुजन आघाडीच्या ३२ उमेदवारांपैकी ५ अनुसूचित जाती, १३ ओबीसी आणि ४ मराठा आहेत. यावरून एक गोष्ट लक्षात येते की, मविआ असो वा महायुती एका विशिष्ट समाजाकडेच सत्ताबळ झुकलेले दिसते. मात्र वंबआने उमेदवारी देताना जात समतोल पाळलेला दिसतो.......

स्वयंपाकघरात टांगलेल्या कॅलेंडरवरच्या चित्राइतकीच थरारकता वा जाहिरातीतून एखादं उत्साहवर्धक पेय विकणार्‍या म्हातार्‍या अमिताभ बच्चनइतकीच विश्वासार्हता, दहा वर्षं राष्ट्रीय व्यासपीठावर वावरलेल्या मोदींच्या व्यक्तिमत्त्वामध्ये उरली आहे...

प्रचारसभांमधून दिसणारे पंतप्रधान दमले-भागलेले, निष्प्रभ झालेले आहेत. प्रमाणापलीकडे वापरलेली छबी, अतिरिक्त भलामण आणि अतिश्रम, यांमुळे त्यांची ‘रया’ गेल्यासारखी वाटते. एखाद्या ‘टी-ट्वेंटी’ सामन्यात जसप्रीत बूमराला वीसच्या वीस षटकं गोलंदाजी करायला लावावी, तसं काहीसं हे झालेलं आहे. आक्रसत गेलेला मोदींचा ‘भक्तपंथ’ टिकून असला, तरी ‘करिष्मा’ उर्फ ‘जादू’ मात्र चाकोरीबद्ध झालेली आहे.......

भाजपच्या ७६ पानी ‘जाहीरनाम्या’त पंतप्रधान नरेंद्र मोदींची तब्बल ५३ छायाचित्रं आहेत. त्यामुळे हा जाहीरनामा आहे की, मोदींचा ‘छायाचित्र अल्बम’ आहे, असा प्रश्न पडतो

काँग्रेसच्या ४८ पानी जाहीरनाम्यात राहुल गांधींची फक्त पाच छायाचित्रं आहेत. त्यातली तीन काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासोबत आहेत. याउलट भाजपच्या जाहीरनाम्याच्या मुखपृष्ठावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीमागे बळंच हसताहेत अशा स्वरूपाचं भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचं छायाचित्र आहे. त्यातली ‘बिटवीन द लाईन’ खूप सूचक आणि स्पष्टता सूचित करणारी आहे.......

जर्मनीत २० हजार हत्तींचा कळप सोडण्याची धमकी एका देशाने दिली आहे, ही ‘हेडलाईन’ जगभरच्या प्रसारमाध्यमांमध्ये गाजतेय सध्या…

अफ्रिका खंडातील बोत्सवाना हा मुळात गरीब देश आहे. त्यातच एवढे हत्ती म्हणजे दुष्काळात तेरावा महिना. शेतांमध्ये येऊन हत्ती मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान करत असल्याने शेतकरी वैतागले आहेत. याची दखल बोत्सवानाचे अध्यक्ष मोक्ग्वेत्सी मेस्सी यांनी घेतली आहे. त्यामुळेच त्यांनी संतापून एक मोठी घोषणा केली आहे. ती म्हणजे तब्बल २० हजार हत्तींचा कळप थेट जर्मनीमध्ये पाठवण्याची. अनेक माध्यमांमध्ये ही ‘हेडलाईन’ गाजते आहे.......