आपल्याला ‘पंख’ आहेत, आपण ‘गरुड’ आहोत, याची जाणीव होते, त्याच क्षणी ‘पिल्ला’चा ‘गरुड’ होतो. आजच्या तरुणांनाही अशीच जाणीव व्हावी!
पडघम - देशकारण
भाऊसाहेब नन्नवरे
  • प्रातिनिधिक चित्र
  • Mon , 13 January 2020
  • पडघम देशकारण राष्ट्रीय युवक दिन National Youth Day

काल, १२ जानेवारी रोजी ‘राष्ट्रीय युवक दिन’ होता. त्यानिमित्तानं हा विशेष लेख...

.............................................................................................................................................

मानवी आयुष्यातल्या बाल्यावस्था, तारुण्यावस्था, प्रौढावस्था व वृद्धावस्था यातील सगळ्यात महत्त्वाची आहे ती तारुण्यावस्था. कारण याच काळात माणूस म्हणून आपल्यातल्या अनेक गोष्टींना तावून-सुलाखून बघण्याची संधी मिळते. आपण कोण आहोत आणि आपल्याला काय बनायचं आहे, याची जिद्द डोळ्यासमोर ठेवून स्वयंप्रेरणेने स्वतःला घडू शकतो.

दृढ आत्मविश्वास हवा

स्वामी विवेकानंद म्हणतात, “आत्मविश्वासासारखा दुसरा मित्र नाही. तुमचा साऱ्या जगावर विश्वास असून उपयोग नाही. स्वतःवर दृढ विश्वास नसेल तर कोणतेही कार्य आपण करू शकणार नाही.” म्हणून आजच्या युवा वर्गाने आयुष्याच्या भावी वाटचालीसाठी कोणतंही क्षेत्र निवडलं तरी त्यात यशस्वी होण्यासाठी आवश्यक आहे, तो दृढ आत्मविश्वास. मी हे करू शकतो. माझ्यात ते करण्याची क्षमता आहे. कितीही अडचणी आल्या तरीही आत्मविश्वासानं त्याला सामोरं जाईन. अपयश आलं तरी त्यावर मात करून यशाचे उंच शिखर गाठण्यासाठी मी शेवटपर्यंत प्रयत्न करत राहीन, असं वाटणं म्हणजे युवावस्था!

आजच्या तरुणाईत प्रचंड शक्ती आहे, ताकद आहे. कलात्मकता आणि सर्जनशीलताही आहे. शिक्षणापासून विज्ञान-तंत्रज्ञान, कला, क्रीडा, समाजसेवा व राजकारणातही तरुण पिढी यशाला गवसणी घालू पाहते आहे. तुमच्याकडून घडणाऱ्या उत्तम कार्यासाठी गरज आहे, ती दृष्टिकोन बदलण्याची. ‘विचार बदला जीवन बदलेल’ हे सूत्र आजच्या पिढीनं लक्षात घ्यायला हवं. बऱ्याचदा आपल्यामध्ये बरंच काही करण्याची क्षमता असते. परंतु ‘तुज आहे तुजपाशी, परी तू जागा चुकलाशी’ अशी काही अवस्था आपली होते. मग क्षमता असूनही आपल्याला ते प्राप्त करता येत नाही. योग्य आणि सकारात्मक दृष्टिकोनच आपल्याला यशापर्यंत घेऊन जाऊ शकतो, हेच खरं.

गरज दृष्टिकोन बदलण्याची

ज्येष्ठ संगणकतज्ञ डॉ. विजय भटकर म्हणतात, “भारत हा जगात सर्वांत मोठी युवाशक्ती असलेला देश आहे. स्वामी विवेकानंदांनी भारत भविष्यात मोठं वैभव आणि समृद्धी मिळवेल, असं भाकीत केलं होतं. त्यांचं हे स्वप्न प्रत्यक्षात उतरावयाचं असल्यास शिक्षणाच्या माध्यमातून चारित्र्यवान, ध्येयानं प्रेरित व आदर्श युवा पिढी घडवावी लागेल, तर आणि तरच विचारवंतांचं, समाजसुधारकांचं स्वप्न पूर्ण होईल.” खरं तर कोणत्याही देशाची युवाशक्ती ही त्या देशाची खरीखुरी साधन संपत्ती असते. देशाचं मनुष्यबळ महाविद्यालयं आणि विद्यापीठांतून घडलं जावं, अशी रास्त अपेक्षा असते.

महाविद्यालयीन शिक्षण म्हणजे उज्ज्वल भविष्याला आकार आणि दिशा देण्याचा काळ. चार भिंतीतल्या पुस्तकी शिक्षणाबरोबरच पुढील वाटचालीसाठी मूल्यात्मक अशी शिदोरी पदरात पाडून घेण्याचा हा ‘सुवर्णकाळ’ म्हटला पाहिजे. तुमच्यातूनच उद्याचा आदर्श नागरिक घडावा, उत्तम माणूस म्हणून तुमची जडणघडण व्हावी, यासाठी महाविद्यालयीन शिक्षणाचा कालखंड आपण योग्य पद्धतीनं नियोजित केला पाहिजे. शिक्षण व करिअर क्षेत्र याबाबत कोणतंही निवडलं तरी त्यात तज्ज्ञ बनण्याची, परिपूर्णतेकडे जाण्याचा आपला सातत्यानं प्रयत्न असायलाच हवा. ज्याचा वर्तमान काळ प्रयत्नवादी आहे, त्याचा भविष्य काळही उत्तम असतो असं म्हटलं जातं. त्यामुळे आपण आयुष्यात ‘कोण बनायचं?’ हे शेवटी आपल्यालाच ठरवायचे आहे. एक संधी निसटली असं वाटतं, तेव्हा दुसरी संधी आपली वाट पाहत उभी असते. फक्त तिला शोधण्याकरता दृष्टी सजग हवी आणि विश्वास दृढ हवा.

विचारविवेक जागा ठेवू या

स्वतःच्या प्रयत्नाने, पालक आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनानं सहकारी मित्रांच्या मदतीनं आपणाला जीवनाची योग्य वाट शोधता आली पाहिजे. त्यासाठी वेळेचं व्यवस्थापन हवं. कारण कोणतीही गोष्ट उशिरानं केली तर ती कधीच फलदायी ठरत नाही. बऱ्याचदा वेळ नाही अशी कारणं सांगून अनेक चांगल्या गोष्टी या तारुण्याच्या काळात करायच्या राहून जातात. आपला अग्रक्रम चुकतो आणि मग पुढच्या काळात पश्चाताप करत आपल्या जीवनाची दिशाच बदलून जाते. त्यासाठी महत्त्वाचा आहे, तो आपला ‘विचारविवेक’. कारण तुमचा विचारच तुम्हाला रसातळाला नेतो किंवा यशाच्या शिखरावर पोहोचतो. मोठं होण्यासाठी विचारही मोठेच हवेत, हे कायम ध्यानात ठेवायला हवं.

आजच्या अनेक सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, राजकीय  प्रश्नांबाबत  तुमच्यामध्ये असणारी जागृती ही खरंतर वाखाणण्याजोगी आहे. आजच्या अनेक गोष्टींबाबत तरुणाई जागरूक आहे, हेही महत्त्वाचं आहे. पण तरीही योग्य-अयोग्यतेच्या संभ्रमात कधीतरी आपल्या विचारांची दिशा चुकते, पाय घसरतो आणि अनवधानानं काही गोष्टी करून जातात. त्यासाठी ‘सजगता’ हवी. योग्य योग्यतेचा नेमका विचार हवा.

माणसा समर्थ तू...  

कोण कुठे जन्माला येईल हे आपल्या हाती नसलं तरी पुढचा सगळा काळ मात्र आपल्यासाठी असतो. प्रचंड आत्मविश्वास, अखंड परिश्रम, आंतरिक उर्मीच्या जोरावर अनंत अडचणींवर मात करत आयुष्य जगता येतं, हेही तुम्हा तरुणाईनं दाखवून दिलंय. ही जिद्द घेऊन तुम्हा युवा वर्गाला भविष्याची वाटचाल करायची आहे. उद्याचा भारत खुणावतोय तुम्हाला. परीक्षेत कमी मार्क मिळाले म्हणून खचून न जाता ‘सगळ्याच झाडांच्या फळावर नसतेच लिहिलेलं आपलं नाव’ हा विश्वास कायम जपायचा. तुमच्यातच दडलेला असतो एखादा सृजनशील कवी-लेखक, चित्रकार आणि महागायकही. काहींच्या गळ्यात जादू असते तर काहींच्या बोटात. कोणी शारदेच्या दालनात शब्दसृष्टी निर्माण करतो, तर कोणी आपल्याच कुंचल्यानं जगाचं नवं चित्रही साकारतो. अर्थात तुमच्यातील या सर्वच कला कौशल्यांना सामर्थ्याला संधी मिळणं महत्त्वाचं. मिळालेल्या संधीचं सोनं करतो तो नक्कीच भावी आयुष्यात उत्तुंग शिखर गाठू शकेल, हा विश्वास आहेच. प्रचंड आत्मविश्वास, मेहनत, आणि सकारात्मक दृष्टिकोनातून हे सहजसाध्य आहे.

“चाल, टाक पाऊले उचल उभय हात तू, कार्य जे पुढे उभे तयास हात लाव तू, माणसा समर्थ तू...” असं म्हणत ज्येष्ठ गीतकार गदिमा यांनी माणसाच्या ठिकाणी असलेल्या सामर्थ्याचं वर्णन केलं आहे. तुम्हा तरुणाईत तर हे सामर्थ्य भरलेलं असतंच. स्वतःला कोण बनवायचं हे सर्वस्वी अवलंबून आहे आपल्यावरच. त्यासाठी केवळ आणि केवळ आपणच महत्त्वाचं. ध्यास, आत्मविश्वास, कयास आणि अभ्यास ही चतुःसूत्री स्वतःला घडवण्यात खूप मोलाची ठरते. स्वतःला घडवताना आधी स्वतःला पारखण, ओळखलं जास्त महत्त्वाचं. आपले गुण, क्षमता आणि जमेच्या बाजू आणि त्याचबरोबर मर्यादा कोणत्या आहेत, याची शहानिशा करत स्वतःला घडवता येतं.  

अनंत आमुची ध्येयासक्ती

महाविद्यालयीन शिक्षणाचा काळ हा खऱ्या अर्थानं आपल्यासाठी फुलण्याचा, बहरण्याचा काळ असतो. सारे काही प्राप्त करण्याची नामी संधी इथंच आपल्याला मिळते. मिळालेला प्रत्येक क्षण सार्थकी लावता येतो.

समन्वय : विचार व कृतीचा

सध्याची पिढी खूप हुशार व चाणाक्ष आहे. काळाबरोबर आवश्यक असे स्वतःचे निर्णय स्वतः घेणारी ही पिढी आहे. त्यामुळे समाज या नव्या पिढीकडून मोठी अपेक्षा करतोय. अनेक महत्त्वाचे प्रश्न आणि मोठी आव्हानही आज आपल्यासमोर उभी आहे. देशात भ्रष्टाचार वाढतोय. त्याला पायबंद कसा घालता येईल, याचा विचार तरुण पिढीनं करायला हवा. महिलांवरील अत्याचार वाढत आहेत, त्याबद्दलची जनजागृती करण्याचीही गरज आहे. पर्यावरणाचे प्रश्न आहेत. पायाभूत सुविधा शेवटच्या माणसापर्यंत पोहोचण्यासाठी लोकचळवळ व जनजागृतीची गरज आहे. तुम्हा युवकांमध्ये आजच्या या प्रश्नांबद्दलची जागृती वाढत असली तरी विचार आणि कृती यांच्या समन्वयातून योग्य दिशेनं कार्य हाती घ्यावं लागेल.

आपल्याला पंख आहेत, आपण गरुड आहोत, याची जाणीव गरुडाच्या पिलाला होते, त्याच क्षणी ‘पिला’चा ‘गरुड’ होतो. आपणालाही अशीच जाणीव व्हावी, यासाठी युवक दिनाच्या निमित्तानं शुभेच्छा!

.............................................................................................................................................

लेखक भाऊसाहेब नन्नवरे खोपोलीच्या के.एम.सी. महाविद्यालयात मराठीचे प्राध्यापक आहेत.

bmnannaware363@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा