ही ‘भारतीय संस्कृती’ नाही, ‘भयाची संस्कृती’ आहे!
सदर - #जेआहेते
अमेय तिरोडकर
  • प्रातिनिधिक चित्र
  • Tue , 07 January 2020
  • सदर #जेआहेते अमेय तिरोडकर Amey Tirodkar नरेंद्र मोदी Narendra Modiमोहन भागवतMohan Bhagwat संघ RSS भाजप BJP

बॅरी ग्लासनर हे अमेरिकेतले नामांकित समाजशास्त्रज्ञ आहेत. त्यांनी एक संज्ञा सतत वापरून अमेरिकन चर्चाविश्वाच्या मुख्य प्रवाहात आणली – ‘The Culture of Fear’ (भयाची संस्कृती!). अमेरिकन समाजात भयाची जी कारणं आहेत, त्यातली बहुतांशी कशी बिनबुडाची आणि कुणाच्यातरी राजकारणाची कशी परिणती आहेत, हे अगदी सप्रमाण त्यांनी दाखवून दिलंय. ‘The Culture of Fear’ याच नावाचं त्यांचं पुस्तकही आहे.

आज भारतात जे काही सुरू आहे, ते बघताना ग्लासनर यांच्या या संज्ञेची आणि कामाची आठवण होणं साहजिक आहे. आपल्या देशात ‘भयाची संस्कृती’ रुजवण्याचा आणि पसरवण्याचा आटोकाट प्रयत्न सत्ताधारी भाजपकडून सुरू आहे. 

मी भाजप म्हणतोय तेव्हा उजव्या कट्टर हिंदुत्ववाद्यांचा सगळा परिवारच त्यामध्ये मला अपेक्षित आहे. त्याचं कारण स्पष्ट आहे. संघ परिवारातल्या इतर संघटनांना भाजपपासून वेगळं काढून परिस्थितीकडे बघण्याचा बावळटपणा देशात अनेक जण करत आलेत. आणि त्यामुळेच भाजपच्या सत्तेच्या साहाय्याने या विखारी संघटना गेल्या ३० वर्षांत अतोनात फोफावल्या आहेत. 

आज देशात हिंसेचं आणि भीतीचं जे थैमान सुरू आहे, ते भाजपच्या केंद्रातील सत्तेच्या जीवावर सुरू आहे. या देशाच्या मूलभूत जाणिवांना हात घालून इथं मनुवादी व्यवस्था आणायचा हा कट आहे. या कटाचा आधार आहे, ती ही भयाची संस्कृती! भय आणि त्या जोरावर द्वेष पसरवत आपली सत्ता टिकवत व वाढवत न्यायची ही रणनीती समजून घेणं, या लढाईत गरजेचं ठरणार आहे.

मानसशास्त्रानं हे सिद्ध केलं आहे की, माणसाच्या मनात जो एखाद्या व्यक्ती, समाज किंवा विभागाबद्दल द्वेष असतो, त्याच्या मुळाशी पराकोटीची भीतीच असते. महात्मा गांधींनीही म्हणूनच ‘निर्भीडता ही प्रेमातून येते आणि द्वेष करणारे ही मुळात भित्रे असतात’ असं म्हटलं होतं. भाजपच्या वाढीत ही अशी भीतीची बीजं आहेत.

गेली ७० वर्षं एक भय या देशातल्या हिंदुत्ववाद्यांनी सतत पसरवलं, ते म्हणजे मुस्लीम लोकसंख्यावाढीचं. एक ना एक दिवस मुस्लीम समाज हिंदूंपेक्षा जास्त संख्येचा होईल, हा अत्यंत बोगस प्रचार संघ परिवार करत राहिला. यातून इथल्या बहुसंख्य हिंदूंच्या मनात भीती आणि त्यातून मुस्लीम समाजाबद्दलचा द्वेष पसरवायचा हा हेतू यामागे होता.

खरं तर मुस्लीम लोकसंख्या वाढीचा वेग आणि हिंदू लोकसंख्या वाढीचा वेग यात फारसा फरक नाही, किंबहुना मुस्लीम लोकसंख्या वाढीचा वेग काहीसा कमीच आहे, हे अनेकदा अनेक जणांनी लिहून, मांडून दाखवलं आहे. पण खोटं सतत बोलत रहायचं आणि तेच लोकांच्या मनावर ठसवायचं, हे जगातल्याच सगळ्या फॅसिस्ट मंडळींचं तंत्र आहे. 

या भीतीची मग एक किंवा एकमेव गरज असते, ती म्हणजे मुस्लीम लोकसंख्या ही कंट्रोलमध्ये आहे आणि हिंदू वाढत आहेत असं पसरवत राहणं. आपण जेव्हा सरसंघचालकसुद्धा हिंदूंनी चार चार मुलांना जन्म दिला पाहिजे, असं विधान करताना बघतो, त्यामागे हिंदू समाजाची कणव नसते, तर संख्येनं आपण नेहमीच कसे पुढे राहू याबद्दलची भीती समाजाच्या मनात कायम ठेवण्याची चाल असते! याच रणनीतीचे वेगवेगळे पदर म्हणजे गेल्या काही काळात भाजपकडून सुरू असलेलं ‘अजेंडा राजकारण!’

काय केलं भाजपनं सत्तेत आल्यावर? ट्रिपल तलाकचा निर्णय घेतला! हिंदू समाजात मुस्लीम लोकसंख्येवरून ज्या अनेक गैरसमजांना पसरवलं गेलं. त्यातला एक गैरसमज म्हणजे मुसलमानांना चार बायका करायचा अधिकार त्यांचा कायदा देतो, त्यांना खूप मुलं होतात आणि तीन वेळा तलाक  म्हटलं की घटस्फोटही देता येतो, म्हणजे त्या मुलांची जबाबदारीही नाही. आपण सगळ्याच जणांनी या प्रकारचे मॅसेजेस वाचलेले आहेत. ट्रिपल तलाकचा निर्णय घेताना त्यामुळेच तो मुस्लीम महिलांना दिलासा म्हणून घेण्यापेक्षा या हिंदू समाजात आपणच पसरवलेल्या अफवेला आणखी खतपाणी घालणं आणि बघा ‘आपलं सरकार कसं मुस्लीम लोकसंख्येला काबूत ठेवत आहे’ असं म्हणणं ही मूळ भावना यामागे होती. त्याचाच परिणाम म्हणून संसदेत आणि बाहेर विरोध असतानाही मुस्लीम पुरुषांसाठी यामध्ये अत्यंत चुकीच्या अशा क्रिमिनल तरतुदी केल्या गेल्या. ‘आता मुसलमान बरोबर दहशतीत राहतील’ अशी ‘भयाची संस्कृती’च यानिमित्तानं वाढवली गेली!! 

काश्मीर हे भारतातील मुस्लीमबहुल राज्य. त्याचं मुस्लीमबहुल असणं हाच या इतकी वर्षं न सुटलेल्या प्रश्नाचा मूळ अडचणीचा मुद्दा आहे, असंच संघ परिवार आजवर कुजबुजत आला. यातूनच काश्मीरमध्ये बघा मुसलमानांचे कसे लाड सुरू आहेत, हे सांगितलं गेलं. कलम ३७० रद्द करण्याचा निर्णय हा या प्रचाराच्या राजकारणाशी जोडून बघितला पाहिजे. ३७० रद्द करत असताना काश्मीरची फोड भाजपने केली आणि त्या राज्याचा राजकीय नकाशा बदलला. एकप्रकारे उर्वरित भारतातल्या हिंदूंना आता काश्मिरात मुसलमानांचा अप्पर हँड नसेल, असं सांगण्याचा हा धूर्त प्रकार होता. यातून काश्मीर प्रश्न सुटला नाहीच, तो असा सुटणारच नव्हता, पण उर्वरित भारतात जे भीतीच्या जीवावर राजकारण करायचं होतं, ते करणं भाजपला शक्य झालं! 

नागरिकत्वाचा मुद्दा हा असाच पुढे आणला गेलाय. CAAमुळे यायचेच म्हटले तर पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानमधून साधारण किती हिंदू किंवा बौद्ध किंवा जैन भारतात येऊ शकतील? याचा अभ्यास सरकारच्या पातळीवरून केला गेलेला आहे. जेमतेम १० हजार लोकंच इथं येऊ शकणार आहेत. पण वातावरण असं बनवलं गेलंय की, कोट्यवधी हिंदू आता भारतात येण्याच्या तयारीत आहेत. आणि त्यामुळे मुसलमानांना आणखी चपराक बसणार आहे. यालाच भयाची संस्कृती म्हणतात!! 

या सगळ्यातून हिंसा पसरवण्याची सुरुवात या वेळी कुठे केली गेली? एक जामिया मिलिया या विद्यापीठात आणि दुसरी अलिगढ मुस्लीम विद्यापीठात! मी दिल्लीत राहिलोय. असंख्य वेळा जामियामध्ये गेलोय. पण मला माहितीये की दिल्लीतही अनेक लोकांना असं सिरियसली वाटतं की, जामियामध्ये फक्त मुस्लीम शिकतात. ज्या दिवशी जामियामध्ये पोलीस घुसले, असे व्हिडिओज समोर आले, त्या दिवशी एका मुलीचा बाईट दाखवला जात होता. मी शिक्षण सोडून परत गावाला चालली असं म्हणत होती ती मुलगी. दुसरी एक मुलगी पोलिसांवर आणि केंद्र सरकारवर टीका करत गरिबांचा शिक्षण घेण्याचा हक्क का काढून घेता असं विचारत होती. या दोन्ही मुली हिंदू होत्या! 

आता जेएनयुमध्ये हल्ला झाला. अगदी दिल्ली पोलिसांच्या छुप्या संरक्षणात आणि तिथल्या प्रोक्टरपासून ते काही प्रोफेसरांना याची पूर्ण कल्पना असताना हा हल्ला झालाय, हे समोर आलं आहे. आणि नेमक्या दुसऱ्याच दिवशी दिल्लीच्या निवडणुका जाहीर झाल्या! 

सतत काही ना काही हिंसा होईल अशा घटना घडवत ठेवायच्या किंवा द्वेषाचे मुद्दे पुढे येतील अशी तजवीज करायची आणि विशेषतः निवडणुका आल्या की, हे अधिक जोरजोरानं करायचं, असा हा पॅटर्न आहे. बिहार २०१५च्या निवडणुका होत्या तेव्हा दादरीच्या अखलाकला गोमांसच्या संशयावरून मारलं गेलं, तेव्हापासून दर निवडणुकीत हे असं सुरू आहे.

सोशल मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या या काळात यामुळे सातत्याने हिंसेचे, द्वेषाचे मुद्दे लोकांच्या स्क्रीनवर जातात. प्रचारात परत तेच दिसतं. आणि त्यामुळे ‘भीती’ पसरायला, वाढायला मदत होते. बॉब वुडवर्ड या जगप्रसिद्ध पत्रकारानं डोनाल्ड ट्रम्प यांच्या पहिल्या म्हणजे २०१६च्या निवडणुकीत आणि नंतरच्या अध्यक्षीय काळात ‘भीती’ या भावनेचा कसा वापर केला गेला, हे सांगणारं पुस्तकच लिहिलंय. ‘FEAR’ असंच नाव आहे त्याचं. भारतात तोच प्रकार सुरू आहे. 

या पुस्तकात भीती पसरवण्यासाठी सोशल मीडिया कंपन्या कशा मदत करतात याचंही सविस्तर विवेचन आहे. आपल्याकडे सोशल मीडिया फिडमधून अल्गोरिदमच्या नावाखाली जो सतत विखारी कंटेंट लोकांच्या समोर फेकला जातोय, तो याच भयाच्या प्रचाराचा भाग आहे. 

आपल्याला आठवत असेल की, मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर वर्षभरातच ‘घरवापसी’ची चर्चा झाली होती. त्या घरवापसीपासून ते या देशात सगळे हिंदूच राहतात, असं मोहन भागवतांनी अधूनमधून म्हणणं ते थेट नागरिकत्व ही सगळी राजकारणाची अशी तीक्ष्ण आणि विखारी रेघ आहे. 

संघ परिवार वारंवार ही भीती दाखवून राजकारण करू शकतो, कारण भीतीचे जे मुद्दे आहेत ते चिकाटीने सतत खोडून काढून वस्तुस्थितीची प्रभावी मांडणी करणारी व्यवस्था उभी करता येत नाही, हे आहे. यातूनच मग सामान्य हिंदूंना फसवणारे असे हे भयकारी मुद्दे पसरत जातात आणि त्यातून भाजपचं राजकारण आकार घेतं. 

सांस्कृतिक राष्ट्रवादाचा प्रसार हे आमचं उद्दिष्ट आहे, असं संघानं सरदार वल्लभभाई पटेल यांना लिहून दिलेलं आहे. पटेलांनी ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने जे वातावरण तयार केले त्यातूनच गांधीजींचा खून झाला’ असं स्पष्टपणे लिहून ठेवलं आहे. संघाला आणि परिवाराला हेच वातावरण देशात कायम रहावं असं वाटतं. सत्तेच्या जीवावर अशा सतत घडवल्या जाणाऱ्या पूरक घटनांतून हा ‘भयाच्या संस्कृतीचा भारतीय चेहरा’ मग आपल्यासमोर येतो आहे! 

.............................................................................................................................................

हेही पहा, वाचा

‘भीती’ हाच भारतीय राजकारणाचा आधार झाला आहे! - अमेय तिरोडकर

aksharnama.com/client/article_detail/2943

.............................................................................................................................................

लेखक अमेय तिरोडकर राजकीय पत्रकार आहेत. 

ameytirodkar@gmail.com

ट्विटर - @ameytirodkar 

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

Post Comment

Sanju Ghayal

Tue , 07 January 2020

पहिला पॅराग्राफ वाचूनच कळतेय कि लेखक काय लायकीचा आहे ते......येडा


Satish Bendigiri.

Tue , 07 January 2020

काश्मिरी पंडितांची झालेली अवस्था याबद्दल तुम्ही काहीच लिहिलं नाही. अजमल कसाब याचा उल्लेखच नाही. मुस्लिम लोक दंगा करतच नाहीत असं म्हणायचं आहे का तुम्हाला? मुंबई बॉम्ब स्फोट हिंदूंनी घडवला काय? आज संपूर्ण जग मुस्लिमांना दारात उभा करत नाही आणि हिंदू जिथे जातो तिथे आपल्या कामाशी आणि त्या देशाशी एकनिष्ठ राहतो. सुंदर पिचाई हे एवढं एकच नाव पुरेसं आहे. फक्त हिंदूच भीती पसरवतात असं वाटतं असेल तर तुमचा लेख एकांगी आहे असं वाटतं. दोन्ही बाजूचा विचार करा.


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

जर नीत्शे, प्लेटो आणि आइन्स्टाइन यांच्या विचारांत, हेराक्लिट्स आणि पार्मेनीडीज यांच्या विचारांचे धागे सापडत असतील, तर हे दोघे आपल्याला वाटतात तेवढे क्रेझी नक्कीच नाहीत

हे जग कसे सतत बदलते आहे, हे हेराक्लिटस सांगतो आहे आणि या जगात बदल अजिबात होत नसतात, हे पार्मेनिडीज सिद्ध करतो आहे. आपण डोळ्यांवर अवलंबून राहण्यापेक्षा आपल्या बुद्धीवर अवलंबून राहिले पाहिजे, असे पार्मेनिडीजचे म्हणणे. इंद्रिये सत्याची प्रमाण असू शकत नाहीत. बुद्धी हीच सत्याचे प्रमाण असू शकते. यालाच बुद्धिप्रामाण्य म्हणतात. पार्मेनिडीज म्हणजे पराकोटीचा बुद्धिप्रामाण्यवाद! हेराक्लिटस क्रेझी वाटतो, पण.......