गोपीनाथ गडावरचा कलकलाट!
पडघम - राज्यकारण
प्रवीण बर्दापूरकर
  • गोपीनाथ गडावर पंकजा मुंडे, एकनाथ खडसे
  • Sat , 14 December 2019
  • पडघम राज्यकारण भाजप BJP देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis पंकजा मुंडे Pankaja Munde एकनाथ खडसे Eknath Khadse

वास्तव विसरून भावनातिरेकानं भरभरून कितीही बोललं तरी तो निव्वळ कलकलाट ठरतो. म्हणूनच १२ डिसेंबरला गोपीनाथ गडावर जे काही बोललं गेलं, त्याचं वर्णन ‘कलकलाट’ याशिवाय दुसऱ्या शब्दांत करता येणार नाही. गोपीनाथ मुंडे जर आज हयात असते तर ते या म्हणण्याशी सहमत झाले असते. महत्त्वाचं म्हणजे ते मुळात भावनेच्या आहारी गेलेच नसते!

विधानसभा निवडणुकीत राज्यातील जनतेनं असा काही कौल दिला की, फासे उलटे पडले आणि भाजपच्या हातून सत्ता गेली. याला भाजप आणि शिवसेना हे दोन्ही पक्ष जबाबदार आहेत. या दोन्ही पक्षांनी जर परस्परांच्या किमान ३० जागा पाडल्या नसत्या, तर आकड्यांचा हा खेळ २००च्या आसपास असता आणि या दोन्ही पक्षांना एकमेकांसोबत राहण्याशिवाय पर्याय उरला नसता. कुरघोडीच्या या राजकारणात जर बहुमताचं स्वप्न साकार झालं असतं, तर तसंही भाजपनं नक्कीच शिवसेनेला सत्तेत सहभागी करून घेतलं नसतंच म्हणा. पण, बाजी उलटली आहे आणि सत्ता गेल्यानं त्याचे अपेक्षित जोरदार पडसाद भाजपमध्ये उमटू लागले आहेत. पंकजा मुंडे आणि एकनाथ खडसे यांचा कलकलाट त्याच प्रतिसादाचा एक भाग आहे.

भाजपत बहुजनांवर अन्याय झाला, बहुजनांना डावलण्यात आलं, हे जे काही सध्या सांगितलं जात आहे, त्यात तथ्य खरंच आहे का? विधानसभा निवडणुकीतील भाजपच्या विजयी १०५ उमेदवारांपैकी तब्बल ३७ बहुजन, ३५ मराठा, १८ एससी/एसटी तर केवळ ७ उच्चवर्णीय आहेत.  त्या ३७मध्ये नाही म्हणून बहुजनांवर अन्याय झाला असल्याचे उमाळे एकनाथ खडसे आणि पंकजा मुंडे यांना फुटले आहेत, असा त्याचा अर्थ आहे. हे दोघेही जर त्या ३७ मध्ये असते किंवा तेही विजयी होऊन हा आकडा ३९ झाला असता तर बहुजनांवर अन्याय झाला किंवा भाजपमध्ये बहुजनांना डावलण्यात येत आहे, असा नाराजीचा सूर त्यांनी लावला नसता.  

डावलाडावली आणि कुरघोडी यालाच ‘राजकारण’ म्हणतात. ती सर्वच पक्षात अव्याहत चालणारी प्रक्रिया आहे आणि राहीलही. देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ खडसे आणि पंकजा मुंडे यांना डावलले असेल तर तो राजकारणाचा एक भाग आहे आणि पक्षाच्या नेतृत्वाला विश्वासात घेतल्याशिवाय फडणवीस असं काही स्वबळावर करणार नाहीत हे स्पष्टच आहे. फडणवीस यांच्या जागी खडसे किंवा पंकजा असत्या तर त्यांनीही हे केलं असतं आणि त्याबद्दल त्यांची ‘मुत्सद्दी राजकारणी’ अशी वाखाणणी त्यांच्या समर्थकांनी केली असती. मुळात डावललं जाण्यासारखी स्थिती एकनाथ खडसे आणि पंकजा मुंडे यांनी निर्माणच का होऊ दिली गेली, हा मुद्दा आहे.

उमेदवारी देणार नाही, हे पक्षानं दोन महिनेच आधी सांगितल्याचं खडसे यांनीच सांगितलेलं आहे. याचा अर्थ डावललं जाण्याची पूर्वकल्पना खडसे यांना मिळालेली होती. खडसे यांनी पक्षासाठी खूप काही योगदान दिलं यात शंकाच नाही, पण त्या मोबदल्यात पक्षानं त्याना काहीच दिलेलं नाहीये का, यासंदर्भात अन्य कुणी नाही तर एकनाथ खडसे यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यानं भावनातिरेक बाजूला ठेवून आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. एकनाथ खडसे प्रदीर्घ काळ आमदार होते, दोन वेळा मंत्रीपद, विधानसभेतील विरोधी पक्ष नेतेपद,  (हेच खडसे या पदावर असतानाच विरोधी पक्ष नेते ‘तोडपाणी’ करतात, असा दावा ज्येष्ठतम नेते शरद पवार यांनी केला होता आणि आजवर त्याचं कुणाकडूनही खंडन झालेलं नाही!), एकनाथराव यांच्याच घरात खासदारकी, आमदारकी, अध्यक्षपद आणि त्यांना डावललं तर त्यांच्या कन्येला विधानसभेची उमेदवारी असा हा पक्षाकडून त्यांना मिळालेल्या सत्तेचा हिशेब आहे.

एकनाथ खडसे यांना मुख्यमंत्रीपद मिळायला नको होतं असा अर्थ होत नाही. तशी महत्त्वाकांक्षा त्यांनी बाळगण्यातही काहीच गैर नाही, पण सर्वोच्च स्थानी एकच माणूस विराजमान होऊ शकतो याचा विसर पडून संधीची वाट पाहत राहण्याचा संयम खडसे यांच्यात उरला नाही, असा त्यांच्या उद्वेगाचा अर्थ आहे.

शिवाय जे त्यांच्याच मतदारसंघातून कन्येला निवडून आणू शकले नाहीत, ते राज्याचं नेतृत्व करत असताना अन्य उमेदवार कसे निवडून आणतील, असा संभ्रम आता एकनाथ खडसे यांच्याविषयी निर्माण झालेला आहे. आणखी एक म्हणजे एकनाथ खडसे त्यांची अस्वस्थता गेली काही वर्षं सातत्यानं व्यक्त असूनही पक्ष नेतृत्वानं त्याची दाखल घेतलेली नाही, याचा अर्थ खडसे यांचं पक्षातील घटलेलं वजन लक्षात घ्यायला हवं. म्हणूनच पंकजा मुंडे यांच्या व्यासपीठावर जाऊन खडसे (आजवर ते कधी गोपीनाथ गडावर गेल्याचं स्मरत नाही!) यांनी कल्ला करून घेण्याची संधी साधली आहे. एकीकडे पक्ष निष्ठेची ग्वाही द्यायची आणि दुसरीकडे कोणत्याही क्षणी पक्ष सोडू शकतो असं म्हणायचं, हा पक्षनिष्ठेचा अजबच प्रयोग महाराष्ट्राच्या राजकारणात सादर करून खडसे त्यांचा ‘राजकीय टीआरपी’ आणखी कमी करून घेत आहेत.

गोपीनाथ मुंडे असते तर आपण मुख्यमंत्री झालो असतो, या खडसे यांच्या दाव्यातही काहीच तथ्य नाही. नितीन गडकरी यांनी दिल्लीत राहावं व राज्याच्या निवडणुका गोपीनाथ मुंडे यांच्या नेतृत्वाखाली लढवल्या जाव्यात आणि विजयानंतर गोपीनाथ मुंडे यांनीच मुख्यमंत्री व्हावं (म्हणूनच गोपीनाथ मुंडे यांना केंद्रीय मंत्रीमंडळात घेण्याऐवजी २०१४च्या विधानसभा निवडणुकीत प्रचारासाठी मोकळं राहू द्यावं, अशी पक्षाची इच्छा होती.), असा फॉर्म्युला भाजपत अमित मोदी-अमित शहा यांचं राज्य आल्यावर दिल्लीत ठरलेला होता. त्या काळात मी दिल्लीतच पत्रकारिता करत होतो म्हणून मला हे ठाऊक आहे आणि तशा बातम्याही दिलेल्या होत्या.

पंकजा मुंडे याही गोपीनाथ मुंडे यांचा वारसा भावनेच्या आधारेच पुढे चालवत आहेत, असं म्हणण्यासारखी एकूण स्थिती आहे. राजकीय मतभेद बाजूला ठेऊन सांगतो, गोपीनाथ मुंडे महाराष्ट्रात अफाट लोकप्रिय होते आणि अजूनही आहेत. त्यांच्यातील लोकनेतेपणाची मोहिनी महाराष्ट्रावर घनगर्द पसरलेली आहे. आकस्मिकपणे लोकनेता हरवल्याने सैरभैर झालेल्या त्यांच्या अनुयायांना शोकावेगातून बाहेर काढून पक्षाच्या यशाच्या मार्गावर चालण्यासाठी उद्युक्त करण्याची किमया करताना पंकजा मुंडे यांनी दाखवलेला संयम विलक्षण आणि वडिलांचा राजकीय वारसा पुढे नेण्याची जिद्द दृढ असल्याचं संघर्ष यात्रेच्या काळात दिसलं होतं. सर्वार्थाने लोकनेता असलेली पितृछाया आकस्मिकपणे नाहीशी झाल्यावर पंकजा यांनी केलेल्या त्या  संघर्षयात्रेचं वर्णन ‘परफेक्ट पॉलिटिक्स ऑफ इमोशन्स’ अशा शब्दांत करता येईल, पण नंतरची पाच वर्षं याच ‘इमोशन्स’मध्ये पंकजा मुंडे अडकल्या. सत्तेत असूनही ना त्या मराठवाड्याच्या नेत्या झाल्या, ना त्यांच्या नेतृत्वाची बीजं या काळात राज्यभर अंकुरली गेली. विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानं त्या परळी मतदार संघातही अद्याप स्थिर झालेल्या नाहीत असाच संदेश गेला आहे.   

अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत साडेतीन-चार दशके अविश्रांत श्रम घेतल्यावर गोपीनाथ मुंडे यांना ‘लोकनेते’पद प्राप्त झालेलं होतं. गोपीनाथ मुंडे यांनी राजकारणाची बाराखडी गिरवायला सुरुवात केली, तेव्हा राज्यातच नव्हे तर देशातही त्यांच्या भारतीय जनता पक्षाचं अस्तित्व नाममात्र होते. भटा-ब्राह्मणांचा पक्ष या प्रतिमेतून महाराष्ट्रात भाजपची मुक्तता करत मुंडे यांनी पक्ष वाढवला. सर्वार्थानं बहु म्हणजे अनेक जाती-उपजाती-पोटजाती आणि धर्मांचा पक्ष असं स्वरूप भाजपला मिळवून देण्याचं मुंडे यांचं काम अतुलनीय आहे. मुंडे यांनी समाजातील ज्या वर्गातील लोकांना राजकारणाच्या मुख्य प्रवाहात आणलं, जे लोक स्थानिक स्वराज्य मतदारसंघात किंवा आमदार, खासदार म्हणून निवडून येईपर्यंत त्या अनेक जाती-उपजाती अज्ञात होत्या, असं म्हणण्यासारखी स्थिती होती. अशा अनेकविध राजकीय चातुर्यामुळे गोपीनाथ मुंडे सर्वार्थाने लोकनेते झाले.

त्यांच्याप्रमाणे पंकजा यांचे संघटन कौशल्य, प्रशासकीय कर्तृत्व, राजकीय क्षमता आणि सर्व स्तरात होणारा स्वीकार सिद्ध झालाच नाही, हेच वास्तव आहे. तरी त्या ‘लोकांच्या मनातील मुख्यमंत्री’ झाल्या आणि हास्यापद ठरल्या! मंत्री म्हणूनही छाप उमटवणं लांबच राहिलं, त्यांना नाहक ‘चिक्कीताई’ व्हावं लागलं!

पंकजा मुंडे यांनी तीन वेळा विधानसभा निवडणूक लढवली. २००९ मध्ये त्यांना सुमारे ९७ हजार मते मिळाली आणि त्या सुमारे ३६ हजारांचं मताधिक्य घेऊन विजयी झाल्या. गोपीनाथ मुंडे यांच्या अपघाती मृत्यूमुळे निर्माण झालेल्या सहानुभूतीची लाट असूनही २०१४च्या निवडणुकीत पंकजा यांच्या विजयाचं मताधिक्य २६ हजारांवर आलं. २०१९च्या निवडणुकीत पंकजा मुंडे यांच्या मतांमध्ये सुमारे पाच हजारांनी घट झाली आणि त्यांचा सुमारे ३१ हजार मतांनी पराभव झाला. असं का घडलं आणि ते यापुढे घडू नये यासाठी खरं तर नियोजन करण्याऐवजी पुन्हा पंकजा भावनेच्या आहारी गेल्या.

विधानसभेची निवडणूक सुरू झाली, तेव्हाच पंकजा यांच्या पराभवाचे संकेत मिळण्यास सुरुवात झालेली होती. म्हणूनच पक्षानं परळी मतदारसंघात प्रचारासाठी दिग्गज उतरवले तरी उपयोग झाला नाही. पाच वर्षं मंत्री असूनही त्यांच्या मतदारसंघातील समस्या कायम राहिल्या, त्यांचा लोकांशी असलेला संपर्क (connect) तुटला, ही त्या मागची प्रमुख कारणं आहेत.

लोकांशी जोडलेलं असणं हे गोपीनाथ मुंडे याचं बलस्थान होतं आणि त्यामुळे अनेकदा त्यांना झोपण्यासाठी मध्यरात्र उजाडत असे हे पंकजा यांनी लक्षात घेतलं पाहिजे. या काळात परळी विधानसभा मतदारसंघात झालेल्या बहुतेक सर्व स्थानिक निवडणुकात भाजपला विजय मिळवून देण्यात पंकजा अयशस्वी ठरल्या, तर धनंजय मुंडे यांनी मात्र बाजी मारली. रस्ता असो की पाणी, लोक कामासाठी धनंजय मुंडे यांच्याकडे वळत आहेत, याची कल्पनाच पंकजा मुंडे किंवा त्यांच्या सल्ल्लागारांना आली नाही. 

एकनाथ खडसे आणि पंकजा मुंडे यांच्या भावनांचा गोपीनाथ गडावर झालेला भावनातिरेकी कथित राजकीय स्फोटाचा लेखाजोखा हा असा आहे. भावनेच्या लाटा प्रतिसाद मिळवून देतात पाठिंबा नाही आणि मतं तर मुळीच नाही (पक्षी : राज ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना!) हे लक्षात न घेता गोपीनाथ गडावरून नुसताच कलकलाट झाला आहे. पक्ष नेतृत्वाच्या मनातून उतरलेल्या एकनाथ खडसे यांना पंकजा मुंडे यांनी (काहीही कारण नसताना) एवढं मोठं व्यासपीठ उपलब्ध करून दिलं. त्यामुळे माध्यमांत जरी टीआरपी मिळाला असला तरी पक्षात मात्र तो कमीच झाला आहे, हे पंकजा मुंडे यांनी मुळीच न विसरलेलं बरं राहील.

शिवाय, भावनेच्या लाटा नव्हे तर कर्तृत्वाचं वास्तव जमिनीला खिळून असतं हे गोपीनाथ मुंडे यांनी सिद्ध करून दाखवलं. मगच त्यांना जनतेच्या हृदयात स्थान मिळालं आणि पक्षात त्यांच्या नेतृत्वाला वलय प्राप्त झालं. तसंच काम पंकजा यांना करावं लागेल. आधी लोकांत पाळंमुळं घट्ट करावी लागतील, मग पक्षच त्यांच्यामागे धावत येईल. वडिलांच्या पुण्याईनं मिळालेला प्रतिसाद पंकजा मुंडे यांच्याकडे आहे, तो त्यांनी (एकनाथ खडसे यांच्यासारख्यांची सोबत न घेता) पाठिंब्यात परावर्तित करुन घ्यावा. मग त्यांना गोपीनाथ गडावर जाऊन कलकलाट करण्याची कधीच गरज भासणार नाही.     

.............................................................................................................................................

लेखक प्रवीण बर्दापूरकर दै. लोकसत्ताच्या नागपूर आवृत्तीचे माजी संपादक आहेत.

praveen.bardapurkar@gmail.com

भेट द्या - www.praveenbardapurkar.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘जातवास्तव’ स्वीकारल्याशिवाय सत्ता आणि संसाधनांचा जातीय ‘असमतोल’ दूर करता येणार नाही. उमेदवारांची नावे जातीसकट जाहीर करणे, हा एक ‘सकारात्मक प्रयोग’ आहे

महायुतीच्या ३८ उमेदवारांपैकी १९ मराठा आहेत. विशेष म्हणजे हे सगळे श्रीमंत मराठे आहेत. महाविकास आघाडीच्या ३९ उमेदवारांपैकी २४ मराठा आहेत. वंचित बहुजन आघाडीच्या ३२ उमेदवारांपैकी ५ अनुसूचित जाती, १३ ओबीसी आणि ४ मराठा आहेत. यावरून एक गोष्ट लक्षात येते की, मविआ असो वा महायुती एका विशिष्ट समाजाकडेच सत्ताबळ झुकलेले दिसते. मात्र वंबआने उमेदवारी देताना जात समतोल पाळलेला दिसतो.......

स्वयंपाकघरात टांगलेल्या कॅलेंडरवरच्या चित्राइतकीच थरारकता वा जाहिरातीतून एखादं उत्साहवर्धक पेय विकणार्‍या म्हातार्‍या अमिताभ बच्चनइतकीच विश्वासार्हता, दहा वर्षं राष्ट्रीय व्यासपीठावर वावरलेल्या मोदींच्या व्यक्तिमत्त्वामध्ये उरली आहे...

प्रचारसभांमधून दिसणारे पंतप्रधान दमले-भागलेले, निष्प्रभ झालेले आहेत. प्रमाणापलीकडे वापरलेली छबी, अतिरिक्त भलामण आणि अतिश्रम, यांमुळे त्यांची ‘रया’ गेल्यासारखी वाटते. एखाद्या ‘टी-ट्वेंटी’ सामन्यात जसप्रीत बूमराला वीसच्या वीस षटकं गोलंदाजी करायला लावावी, तसं काहीसं हे झालेलं आहे. आक्रसत गेलेला मोदींचा ‘भक्तपंथ’ टिकून असला, तरी ‘करिष्मा’ उर्फ ‘जादू’ मात्र चाकोरीबद्ध झालेली आहे.......

भाजपच्या ७६ पानी ‘जाहीरनाम्या’त पंतप्रधान नरेंद्र मोदींची तब्बल ५३ छायाचित्रं आहेत. त्यामुळे हा जाहीरनामा आहे की, मोदींचा ‘छायाचित्र अल्बम’ आहे, असा प्रश्न पडतो

काँग्रेसच्या ४८ पानी जाहीरनाम्यात राहुल गांधींची फक्त पाच छायाचित्रं आहेत. त्यातली तीन काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासोबत आहेत. याउलट भाजपच्या जाहीरनाम्याच्या मुखपृष्ठावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीमागे बळंच हसताहेत अशा स्वरूपाचं भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचं छायाचित्र आहे. त्यातली ‘बिटवीन द लाईन’ खूप सूचक आणि स्पष्टता सूचित करणारी आहे.......

जर्मनीत २० हजार हत्तींचा कळप सोडण्याची धमकी एका देशाने दिली आहे, ही ‘हेडलाईन’ जगभरच्या प्रसारमाध्यमांमध्ये गाजतेय सध्या…

अफ्रिका खंडातील बोत्सवाना हा मुळात गरीब देश आहे. त्यातच एवढे हत्ती म्हणजे दुष्काळात तेरावा महिना. शेतांमध्ये येऊन हत्ती मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान करत असल्याने शेतकरी वैतागले आहेत. याची दखल बोत्सवानाचे अध्यक्ष मोक्ग्वेत्सी मेस्सी यांनी घेतली आहे. त्यामुळेच त्यांनी संतापून एक मोठी घोषणा केली आहे. ती म्हणजे तब्बल २० हजार हत्तींचा कळप थेट जर्मनीमध्ये पाठवण्याची. अनेक माध्यमांमध्ये ही ‘हेडलाईन’ गाजते आहे.......