महाराष्ट्रातील औटघटकेच्या ‘राजकीय कॉमिक-ट्रॅजेडी’विषयी आजच्या मराठी वर्तमानपत्रांचे संपादक काय म्हणतात?
पडघम - माध्यमनामा
टीम अक्षरनामा
  • लोकमत, दिव्य मराठी, सामना, सकाळ, लोकसत्ता आणि महाराष्ट्र टाइम्स यांच्या अग्रलेखांची शीर्षके
  • Wed , 27 November 2019
  • पडघम माध्यमनामा लोकमत Lokmat दिव्य मराठी Divya Marathi सामना Saamana सकाळ Sakal लोकसत्ता Loksatta महाराष्ट्र टाइम्स Maharashtra Times राष्ट्रवादी काँग्रेस NCP काँग्रेस Congress शिवसेना Shivsena उद्धव ठाकरे Uddhav Thackeray भाजप BJP अजित पवार Ajit Pawar शरद पवार Sharad Pawar देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis

२३ नोव्हेंबर रोजी सकाळी आठ वाजता सुरू झालेल्या महाराष्ट्राच्या नव्या फार्सची अवघ्या चार दिवसांत ‘कॉमिक-ट्रॅजेडी’ झाली! त्याआधी जवळपास महिनाभर भाजप-सेना यांचा ‘संगीत मानापमाना’चा खेळ सुरू होता. तो संपून सेना-काँग्रेस-राष्ट्रवादी हा सत्तेचा नवा ‘संगीत संशयकल्लोळ’ आकार घेत असतानाच देवेंद्र फडणवीस-अजित पवार यांचा फार्स सुरू झाला. त्याने चार दिवस महाराष्ट्रातील जनतेची यथेच्छ करमणूक केली. आणि शेवटी या फार्सची ड्रॅमॅटिक पद्धतीने ‘कॉमिक-ट्रॅजेडी’ झाली. योगायोगाने काल ‘संविधान दिन’ होता आणि कालच हे सगळे घडल्यामुळे भारतीय लोकशाही, संसदीय परंपरा, सर्वोच्च न्यायालयाची विश्वासार्हता, महाराष्ट्र म्हणजे बिहार किंवा कर्नाटक नसल्याचा निर्वाळा आदी गोष्टी उगाळल्या जात आहेत. अजून काही दिवस जातील. पण आजची महाराष्ट्रातील प्रमुख दैनिके काय म्हणतात? त्यांनी आपल्या अग्रलेखांतून काय मांडलं आहे? क्रमाक्रमानं पाहू.

दै. ‘महाराष्ट्र टाइम्स’च्या आजच्या अग्रलेखाचे शीर्षक आहे – ‘फसलेल्या बंडाची कहाणी!’ अग्रलेख वाचल्यावर लक्षात येते की, त्याला शीर्षक पुरेसा न्याय देत नाही. कारण त्यात फसलेल्या बंडाची कहाणी सांगण्यावर फारसा भर दिलेला नाही. त्यात सुरुवातीला म्हटले आहे – “गेल्या चार दिवसांत महाराष्ट्राच्या राजकारणात घडलेल्या घडामोडींमुळे महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचे पुरते धिंडवडे निघाले आहेत.” त्यानंतर म्हटले आहे – “हंगामी सभापतींच्या अधिकाराचा वापर करून बहुमत चाचणी जिंकण्याचे भाजपचे मनसुबे होते. परंतु सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश आणि पाठोपाठ अजित पवार यांच्या राजीनाम्यामुळे त्या मनसुब्यांना सुरुंग लागला. विधानसभेत बहुमत चाचणी झाली असती तर विधानसभेत जे काही घडले असते त्यामुळे महाराष्ट्राच्या संसदीय परंपरेची लक्तरे देशाच्या वेशीवर टांगली गेली असती. अजित पवार यांच्या राजीनाम्यामुळे संसदीय परंपरेची अब्रू थोडीफार वाचली आहेच शिवाय त्यांची स्वत:ची झाकली मूठही सव्वा लाखाची राहिली आहे.” अजून पुढे म्हटले आहे -  “आम्हाला घोडेबाजार करायचा नव्हता, असे भाजपचे नेते कितीही सांगत असले तरी त्याला तसा अर्थ नव्हता. त्यांची भिस्त आमदार फोडाफोडी आणि खरेदीवरच अवलंबून होती. अजित पवार यांची सोबत केवळ दिखाव्यासाठी होती. त्यांच्यासोबत येतील तेवढे आमदार सोबत घेऊन शिवसेना आणि काँग्रेसचेही काही आमदार फोडायचे किंवा सभागृहात गोंधळ घालून बहुमत सिद्ध करायचे आणि सरकार चालवायचे असा डाव होता. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे तो डाव यशस्वी होणार नाही हे स्पष्ट झाले.” शेवटी म्हटले आहे – “राष्ट्रवादी काँग्रेस आणि पवार कुटुंबीय या दोहोंसाठी हा नाजूक विषय होता. परंतु अजित पवार यांची गद्दारी ही केवळ शरद पवार किंवा राष्ट्रवादी काँग्रेसविरोधात नव्हती, तर भाजपविरोधात मैदानात उतरलेल्या शरद पवार यांच्या पाठिशी उभ्या राहिलेल्या लाखो लोकांशी केलेली गद्दारी होती. दरम्यान आघाडीचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार म्हणून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नावाची अधिकृत घोषणा झाली आहे. अजित पवार यांच्या बंडामुळे त्यांना थोडी अधिक प्रतीक्षा करावी लागली असली तरी, ज्याचा शेवट गोड ते सर्वच गोड या धारणेने भूतकाळ मागे टाकून भविष्याकडे दमदारपणे वाटचाल करतील, ही अपेक्षा!”

अलीकडच्या काळातल्या ‘म.टा.’च्या सपक, सामान्य अग्रलेखाची परंपरा याही अग्रलेखात ठसठशीतपणे दिसून येते. त्यापलीकडे त्यात काहीही नाही. संसदीय परंपरा, सर्वोच्च न्यायालयाचा दाखला आणि मतदारांशी अजित पवारांनी केलेली गद्दारी इत्यादी शब्दप्रयोग आहेत, पण ते तोंडी लावण्यापुरते.

दै. ‘सामना’ हे शिवसेनेचे मुखपत्र. त्यामुळे त्यातील अग्रलेख हे इतर वर्तमानपत्रांपेक्षा वेगळे असतात. त्यातील भाषा आक्रमक, जहाल, विखारी, प्रसंगी बेलगाम अशा स्वरूपाची असते. शिवाय शिवसेनेचे इतिहासप्रेम दांडगे! त्यामुळे ‘सामना’च्या अग्रलेखांची एक विशिष्ट शैली असते. आरोप-प्रत्यारोप, इतिहासप्रेम आणि आक्रमता यांनी ही शैली परिलुप्त असते. आजचा अग्रलेखही ‘मस्तवाल हैदोस थांबला, आता शुभ घडेल!’ या शीर्षकापासून या परंपरेला साजेसाच आहे. त्यात विचार, तत्त्वज्ञान, काही नाही. कारण त्यात शिवसेना ‘पुन्हा पुन्हा, तेच ते’ छापाचं जे सांगत असते, तेच परत सांगितलं आहे. अग्रलेखाचा शेवटचा परिच्छेद या दृष्टीनं पाहण्यासारखा आहे. त्यात म्हटलं आहे – “महाराष्ट्र ही शिवरायांची भूमी. येथे स्वाभिमानाचा ज्वालामुखी सदैव उसळत असतो. या स्वाभिमानाला डिवचण्याचा प्रयत्न जेव्हा जेव्हा झाला, तेव्हा तेव्हा महाराष्ट्राने पाणी दाखवले. महाराष्ट्रात भाजपने सत्तेसाठी इतके अगतिक का व्हावे? इतके अनैतिक व तत्त्वशून्य वागण्याची वेळ त्यांच्यावर यावी हे दीनदयाळ उपाध्याय, अटलबिहारी वाजपेयी यांच्या आजच्या वारसदारांचे दुर्दैव! आम्ही १६२चा आकडा दाखवूनही तो खोटा ठरवण्याचा घृणास्पद प्रयत्न त्यांनी केला. आता बहुमत चाचणीला सामोरे न जाताच फडणवीसांचे सरकार पळून गेले. इतकी नाचक्की महाराष्ट्रात कोणत्याच सरकारची व राजकीय पक्षाची झाली नव्हती. अजित पवार यांनी शेवटच्या टप्प्यात आपले वस्त्रहरण थाबंवले, पण भाजपा पुरती नागडी झाली. महाराष्ट्रातील एक मस्तवाल हैदोस थांबला. आता सर्व शुभ घडेल!”

केवळ सेना-काँग्रेस व राष्ट्रवादी यांचे संयुक्त सरकार सत्तेत आल्याने आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्याने किंवा महाराष्ट्राला पहिल्यांदाच दोन उप-मुख्यमंत्री मिळाल्याने, हे ‘शुभ’ घडेल? घडू शकेल? यापुढे महाराष्ट्रात ‘शुभ’ घडवण्याची सर्व जबाबदारी सत्ताधारी शिवसेनेची आणि मुख्यमंत्रीपदी विराजमान होत असलेल्या उद्धव ठाकरे यांची असणार आहे. त्याबाबत या अग्रलेखात काहीही नाही. त्यामुळे प्रत्यक्षात जे घडेल ते लवकरच आपल्याला पाहायला मिळेलच.

दै. ‘लोकमत’चा ‘भाजपची फसलेली खेळी’ हा अग्रलेख गेल्या दोन-तीन दिवसांत घडलेल्या घटना आणि त्यांच्या वर्तमानपत्रांत आलेल्या बातम्या यांचाच वेगळ्या भाषेत आणि संक्षिप्त स्वरूपात लिहून काढलेला सारांश आहे. तटस्थ भूमिका घेण्याच्या नादात आणि नि:पक्ष राहण्याच्या धडपडीत ना कुठले विश्लेषण केले आहे, ना घडलेल्या घटनांचा अन्वयार्थ सांगण्याचा प्रयत्न केला आहे. अग्रलेखाच्या शेवटच्या परिच्छेदात नव्या सरकारपुढील आव्हानांविषयी लिहिले आहे. ते असे – “काँग्रेस-राष्ट्रवादी व शिवसेनेतील काही नेत्यांना सरकारमधील कामाचा अनुभव आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व नंतर उद्धव ठाकरे हे मात्र रिमोट कंट्रोलच्या भूमिकेत असायचे. आता उद्धव यांच्या हातीच सत्ता येणार आहे. दोन्ही काँग्रेस व इतर पक्ष यांना न दुखावता कारभार हाकणे सोपे नाही. विरोधी बाकांवर १०५ आमदार असलेला भाजप असल्याने सतत सत्तासंघर्ष होतच राहील. तरीही विरोधी पक्षाचे महत्त्व जाणून त्यांचा सन्मान करणे, निर्णय घेताना विश्वासात घेणे हे उद्धव ठाकरे यांना करावे लागेल. भाजपने या सरकारला आवश्यक ते सहकार्य करण्याचे आश्वासन दिले असले, तरी ते मिळणे वाटते तितके सोपे नाही, पण भाजपनेही विरोधासाठी विरोध न करता राज्याच्या हितासाठी सकारात्मक भूमिका घ्यायला हवी.”

इतकी सामान्य, सपक आणि खरं तर निरर्थक अपेक्षा व्यक्त करत हा अग्रलेख संपतो.

देवेंद्र फडणवीस-अजित पवार यांच्या सरकार स्थापनेच्या निमित्ताने जे काही रामायण घडले, तसे आजवर महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात कधी घडले नसल्याचा उल्लेख करत दै. ‘दिव्य मराठी’च्या ‘नवे पर्व’ या अग्रलेखात एके ठिकाणी म्हटले आहे - “अजित पवार आणि शरद पवार या काका- पुतण्यातील शक्तिपरीक्षण अटळ होते. आता ते झाकल्या मुठीत राहिले.” हा अग्रलेख भाजप-सेना ही युती संपुष्टात आल्यानंतर आणि फडणवीस-पवार यांचे सरकार औटघटकेचे ठरल्यानंतर सेना-काँग्रेस-राष्ट्रवादी यांच्या संयुक्त सरकारच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या राजकारणात सत्तेचे जे नवे समीकरण अस्तित्वात येऊ घातले आहे, त्याचे ‘नवे पर्व’ असे वर्णन करतो. अग्रलेखाच्या शेवटी म्हटले आहे - “महाराष्ट्रातल्या राजकारणावर शरद पवारांची पकड या घडामोडींमु‌ळे पुन्हा पक्की झाली. शिवसेनेला पाठिंबा देण्यास सोनिया गांधींचे मन वळवण्यासाठी केलेल्या खटपटीनंतर पुतण्याच्या गोंधळामुळे तेच अडचणीत आले होते. त्यांचा दिल्ली, मुंबईतला राजकीय विश्वास व प्रतिष्ठा पणास लागली होती. आजच्या सांगतेने ती सांभाळली गेली. नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी व विश्वासदर्शक ठराव, ही औपचारिकताच बनली आहे. मात्र यामुळे महाराष्ट्रात एका नव्या आघाडीच्या राजकीय पर्वाची सुरुवात झाली आहे, हे नक्की.”

महाराष्ट्रात होऊ घातलेल्या नव्या सत्तासमीकरणाला ‘नवे पर्व’ असे नक्कीच म्हणता येईल. कारण भाजप-सेना युतीचा काडीमोड आणि देवेंद्र फडणीस- अजित पवार युतीची अपयशी खेळी आणि सेना-काँग्रेस-राष्ट्रवादी यांचा नवा घरोबा, या काहीशा धक्कादायक घटना महाराष्ट्रात घडल्या आहेत. येऊ घातलेलं नवं सरकार या नव्या पर्वाला कसं सामोरं जातं, ते ‘नवे पर्व’ घडवणारं ठरतं की, नाही, हे येत्या काळात स्पष्ट होईल. पण आजघडीला तरी नवं सरकार ही महाराष्ट्राच्या राजकारणातील नव्या पर्वाची सुरुवात आहे हे नक्की!

(‘दिव्य मराठी’चे राज्य संपादक संजय आवटे यांनी पहिल्या पानावर सुरू होऊन संपादकीय पानावर संपलेल्या ‘स्टेटमेंट’ या आपल्या सदरात ‘शरद पवारच सेनापती, नव्या स्वातंत्र्यसंग्रामाचे’ हा लेख लिहून पवारांना ‘हिरो’ करण्याचा प्रयत्न केला आहे.)

दै. ‘सकाळ’ने पहिल्या पानावर सुरू होऊन संपादकीय पानावर संपणारे ‘विशेष संपादकीय’ लिहिले असून त्याचे शीर्षक आहे – ‘खेचून आणलेला विजय!’ ‘सकाळ’चा उल्लेख कधी कधी चेष्टेने ‘पवारांचा पेपर’ असा केला जात असला, ‘सकाळ’ची भूमिकाही पवारांच्या फार विरोधात नसली तरी ते काही राष्ट्रवादी काँग्रेस किंवा ‘शरद पवारांचं ‘मुखपत्र’ नाही. ‘सकाळ’ची भूमिका तशी कधीच नव्हती आणि नाही. आजचा अग्रलेखही तसा नाही, पवारांची त्यात स्तुती असली तरी. पण गेल्या तीन-चार दिवसांतील वर्तमानपत्रे वाचून किंवा वृत्तवाहिन्या पाहून कुठल्याही समंजस व विवेकी माणसाचे मत असेच होईल की, भाजपने अजित पवार यांना गळाला लावून जो खेळ सुरू केला होता, तो शरद पवारांनी उधळून लावला आहे. म्हणूनच या अग्रलेखात म्हटले आहे - “महाराष्ट्राच्या राजकीय रंगमंचावर गेले महिनाभर सुरू असलेल्या सत्तानाट्याच्या शेवटच्या अंकाचा शेवटचा प्रवेश सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार खरे तर बुधवारी विधानभवनातील विधानसभेच्या सभागृहात सादर व्हायचा होता. मात्र त्या आधीच्या २४ तासांत या नाट्याला कलाटणी देणाऱ्या धक्कादायक घटना घडल्या आणि अवघ्या ७९ तासांत देवेंद्र फडणवीस यांची दुसरी राजवट संपुष्टात आली! हा अर्थातच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा मोठा विजय आहे. पवार यांच्यासाठी ही लढत अत्यंत प्रतिष्ठेची होती. एकीकडे कौटुंबिक कलह, तर दुसरीकडे प्रतिष्ठेचे राजकारण, असा हा दुहेरी संघर्ष होता. प्रकृतीच्या तक्रारींची तमा न बाळगता अथक प्रयत्नांनी त्यांनी हे यश खेचून आणले आणि खरा ‘तेल लावलेला पहिलवान’ कोण, हे केवळ फडणवीस तसेच अजित पवार यांनाच नव्हे, तर भारतीय जनता पक्षाच्या नव्या ‘राजनीतीचे चाणक्य’ म्हणून गाजावाजा झालेले अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांनाही दाखवून दिले.”

या अग्रलेखात शेवटी म्हटले आहे की - “आता खरा प्रश्न भाजपने हा औटघटकेचा डाव मांडून नेमके काय साध्य करण्याचा प्रयत्न केला, हा आहे. फडणवीस यांनी स्थिर सरकार आणि जनतेचे प्रश्न तातडीने सुटावेत म्हणून विधिवत सरकार आणले, आदी बहाणे पुढे करत या प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न पत्रकार परिषदेत केला. मात्र तेव्हाही त्यामधील फोलपणा त्यांच्या देहबोलीतून जाणवत होता. आणखी एक प्रश्न हा की, अजित पवार यांनी सर्वस्व पणाला लावून फेकलेल्या या फाशांमधून त्यांच्या हाती नेमके काय लागले, हा आहे. त्यांचे आततायी वागणे अवघ्या महाराष्ट्राने गेल्या काही दिवसांत पाहिले आहे. त्यांच्या या मनमानी वर्तनामुळे एकीकडे भाजपची सत्ता गेली आणि दुसरीकडे ‘राष्ट्रवादी’ची प्रतिष्ठा. अर्थात त्यांनाही आपले काका काय काय करू शकतात, हा धडा पुनश्च एकवार शिकायला मिळाला.”

अजित पवारांच्या आकस्मिक बंडाने शरद पवारांचं आजवरचं राजकारण, त्यांची प्रतिष्ठा, विश्वासार्हता पणाला लागली होती. शिवाय त्यांनी शिवसेनेसोबत जाण्याचा जो त्यांच्या आजवरच्या राजकारणाला वेगळं वळण देणारा निर्णय घेतला होता, तिथेही त्यांची विश्वासार्हता पणाला लागली होती. या गोष्टी एकीकडे तर दुसरीकडे अजित पवार हे त्यांचे पुतणे. त्यामुळे काही पत्रकार-संपादकांनी ‘खंजीर रिटर्न’सारखी प्रतीकं वापरून या घटनाक्रमाचं वर्णन केलं असलं तरी या प्रकरणात सर्वाधिक कोंडी शरद पवारांची झाली होती. त्यांचा पक्ष, घर आणि राजकारण फुटीच्या उंबरठ्यावर पोहोचलं होतं. त्यामुळे पवारांनी सर्व शक्ती पणाला लावून हे वादळ परतवून लावलं. त्यामुळे पवारांचं वर्णन करायचंच झालं तर ‘अवकाळी वादळात स्वत:ला, स्वत:च्या विश्वासार्हतेला आणि स्वत:च्या पक्षाला आणि त्याच्या उर्वरित प्रतिष्ठेला वाचवणारा धुरंधर राजकारणी’ असं करावं लागेल. पवारांनी विजय वगैरे काहीही खेचून आणलेला नाही, तर त्यांनी ‘पराजय परतवून लावला’ इतकंच!

अलीकडच्या काळात दै. ‘लोकसत्ता’चे अग्रलेख हेच केवळ वाचण्यासारखे असतात, असा लौकिक पसरलेला आहे. त्या लौकिकामुळे किंवा तसा लौकिक पसरावा यामुळे अनेकदा ‘लोकसत्ता’च्या अग्रलेखात अनेकदा मूळ प्रश्न काय आहे, यापेक्षा ‘उपदेशामृत’ पाजण्याची खुमखुमी अधिक जोरावर असल्याचे दिसते. ‘आत्ममग्न पक्षाची लक्षणे!’ हा आजचा अग्रलेखही त्याला अपवाद नाही. कारण या अग्रलेखात भाजपवर दुगाण्या छाडण्याशिवाय दुसरं काहीही नाही. भाजपने अजित पवार यांना फोडून सत्तास्थापनेचा जो खेळ केला, त्यात तसं पाहिलं तर संसदीय राजकारणाच्या दृषिटकोनातून वावगं काहीही नव्हतं. असलीच एकच गडबड होती की, ही खेळी पुरेशा तयारीनिशी केलेली नव्हती आणि अजित पवारांची धडाडी यावर सर्व काही रेटून नेण्याचा प्रयत्न होता. किंवा त्यांच्या निमित्ताने फोडाफोडीचे राजकारण करण्याचा मनसुबा होता. ही धक्कादायक खेळी धोकादायक ठरून अंगलट येण्याची शक्यता होती आणि तशी ती आलीही. पण त्याला केवळ भाजप जबाबदार नव्हता, अजित पवारही तितकेच जबाबदार होते. त्यामागची कारणे वैयक्तिक असोत की, सत्तेच्या महत्त्वाकांक्षेची असोत. मात्र या निमित्ताने शरद पवारांची राजकीय विश्वासार्हता पूर्णपणे पणाला लागली होती, हा खरा मुद्दा आणि कळीचा मुद्दा होता. पवार स्वत:, त्यांचा पक्ष आणि त्यांनी जुळवलेलं नवं सत्तासमीकरण, असं सगळंच पणाला लागलं होतं. पण यापैकी कशावरही भर न देता ‘लोकसत्ता’च्या अग्रलेखात केवळ भाजपवर तोंडसुख घेतलेलं आहे.

या अग्रलेखाची सुरुवात अशी आहे – “सत्तेचा मद, सलगच्या विजयांमुळे आपणास अडवतो कोण ही घमेंड आणि सहकारी पक्षांविषयी ‘जाऊन जाऊन जाणार कोठे,’ ही भावना या तीन दुर्गुणांचा समुच्चय झाला की काय होते याचे उत्तर म्हणजे भारतीय जनता पक्षाची महाराष्ट्रात झालेली अवस्था. ‘विजयातून पराजय खेचून आणणारा संघ’ असे वर्णन अगदी अलीकडेपर्यंत भारतीय क्रिकेट संघाचे केले जात असे. ते आता भाजपस लागू पडेल. अगदी काही महिन्यांपर्यंत अजेय भासणारा हा पक्ष बघता बघता केविलवाणा झाला आणि मैदानाकडे पाठ करून माघार घेण्याची वेळ त्याच्यावर आली. जे काही झाले त्यासाठी अन्य कोणाकडेही बोट दाखवण्याची मुभा त्या पक्षास नाही. हे सर्वच्या सर्व स्वनिर्मित होते. आता ते का झाले याचे विश्लेषण होईलच, पण महाराष्ट्रातील घडामोडी या माघारी जाऊ लागलेल्या लाटेच्या निदर्शक तर नाहीत, याचाही विचार भाजपस करावा लागेल. हा विचार त्या पक्षाच्या नेतृत्वाने करावाच. नपेक्षा भक्तांच्या नादी लागून गैरसमज होण्याची शक्यता अधिक.

तर शेवट असा आहे - “आपण इतरांच्या तुलनेत अधिक नैतिक आहोत असे वाटू लागले की अशांची घसरगुंडी सुरू होते. भाजपसाठी हा धोक्याचा इशारा आहे. ज्या प्रमाणात आणि ज्या गतीने भाजप आपल्या मित्र वा सहयोगी पक्षांचे रूपांतर शत्रू वा प्रतिस्पर्ध्यात करू लागला आहे त्यातून हाच इशारा मिळतो. हेदेखील काँग्रेसप्रमाणेच म्हणायचे. त्या पक्षाने ज्या ज्या चुका केल्या, त्या त्या चुका अधिक व्यापक प्रमाणात भाजप करताना दिसतो. मनमोहन सिंगांसारख्या नेत्यांचे महत्त्व कमी करून काँग्रेसने जे केले तेच भाजप देवेंद्र फडणवीस, रमण सिंग, शिवराज सिंग चौहान आदींचे करत आहे. ही आत्ममग्न पक्षाची लक्षणे. अशा आत्ममग्नतेत रममाण झालेल्यांचे काय होते, हा इतिहास आहेच. त्याची पुनरावृत्ती होणारच नाही, असे नाही.”

भाजपविरोधकांना या अग्रलेखांना बरं वाटू शकतं, तर भाजपसमर्थकांना वाईट वाटू शकतं. पण अशा कुठल्या तरी एका टोकाला जाण्याचं पर्यवसान असंच होऊ शकतं. असो.

शेवटी असं म्हणावं लागतं की, मराठी वर्तमानपत्रं आपल्या वाचकांचं योग्य प्रबोधन करण्यात कमी पडत आहेत. इतकंच नव्हे तर त्यांना नीट माहिती देण्यातही कमी पडत आहेत. घटना, वास्तव आणि सत्य यांची पारख करून देण्यातही कमी पडत आहेत. आपल्या वाचकांना औटघटकेच्या ठरलेल्या ‘कॉमिक-ट्रॅजेडी’कडे कसं पाहायचं हे सांगण्यात कमी पडली आहेत. त्याचा अर्थ, अन्वयार्थ सांगण्यात किंवा त्याचं यथायोग्य विश्लेषण करण्यातही कमी पडली आहेत. विचार देण्यात, दृष्टिकोन देण्यात आणि मतं बनवण्यातही कच खात आहेत. राजकारणाविषयी नाहक तुच्छता आणि राजकीय नेत्यांविषयी नकारात्मकता मात्र निर्माण करत आहेत. आणि हे नक्कीच भूषणावह नाही!

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

Post Comment

ramesh shinde

Wed , 27 November 2019

अक्षरनामाचे संपादक वाचकांचे प्रबोधन करायला मोठे उत्सुक दिसतात. परंतु त्यांच्या लेखांमध्येही लोकसत्ताकारांसारखी पोकळ भाषा अन् मटाकारांसारखा सपक आशय यांचीच रेलचेल असते. आशयघन विश्लेषणाचे त्यांनाही वावडे असावे. त्यामुळे त्यांनी सदरहू लेखातही फुटकळ शेरेबाजी तेवढी केली आहे. आता या संपादकांचे लाडके विनय हर्डिकर यांचा एखादा लेख साधनेतून पुनर्मुद्रित करा, म्हणजे होईल महाराष्ट्राचे 'प्रबोधन'!


Sourabh suryawanshi

Wed , 27 November 2019

झालेल्या घटनेवर टीम अक्षरनामा योग्य लेख लिहणार असेल तर वाचायला आवडेल...


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा