सब घोडे बारा टक्के
पडघम - साहित्यिक
विंदा करंदीकर
  • विंदा करंदीकर
  • Thu , 07 November 2019
  • पडघम साहित्यिक विंदा करंदीकर Vinda Karandikar सब घोडे बारा टक्के

महाराष्ट्रातील सत्तास्थापनेसाठी चाललेला सत्ताकांक्षेचा (पोर)खेळ पाहून विंदा करंदीकर यांची कविता ‘सब घोडे बारा टक्के’ ही कविता कुणाला आठवल्यास नवल नाही. सत्तेसाठी विद्यमान राजकीय सुंदोपसुंदी पाहिली की, ही कविता किती समकालीन आहे, याचे लख्ख दर्शन होते. आज ना उद्या काहीतरी होईल, कुणाचे तरी सरकार येईल, कुणाच्या तरी तोंडचा घास पळवला जाईल, पण महाराष्ट्रीय जनता मात्र आहे तिथेच राहील. म्हणून या कवितेचे वाचन अनिवार्य आहे...

............................................................................................................................................................

जितकी डोकी तितकी मते 
जितकी शिते तितकी भूते;
कोणी मवाळ कोणी जहाल 
कोणी लठ्ठ कोणी मठ्ठ
कोणी ढिले कोणी घट्ट; 
कोणी कच्चे कोणी पक्के
सब घोडे बारा टक्के!

गोड गोड जुन्या थापा 
(तुम्ही पेरा तुम्ही कापा)
जुन्या आशा नवा चंग 
जुनी स्वप्ने नवा भंग;
तुम्ही तरी काय करणार? 
आम्ही तरी काय करणार?
त्याच त्याच खड्ड्या मधे 
पुन्हा पुन्हा तोच पाय;
जुना माल नवे शिक्के 
सब घोडे बारा टक्के!


जिकडे सत्ता तिकडे पोळी 
जिकडे सत्य तिकडे गोळी;
(जिकडे टक्के तिकडे टोळी) 
ज्याचा पैसा त्याची सत्ता
पुन्हा पुन्हा हाच कित्ता; 
पुन्हा पुन्हा जुनाच वार
मंद घोडा जुना स्वार; 
याच्या लत्ता त्याचे बुक्के
सब घोडे बारा टक्के!

सब घोडे! चंदी कमी; 
कोण देईल त्यांची हमी?
डोक्यावरती छप्पर तरी; 
कोण देईल माझा हरी?
कोणी तरी देईन म्हणा 
मीच फसविन माझ्या मना!
भुकेपेक्षा भ्रम बरा; 
कोण खोटा कोण खरा?
कोणी तिर्ऱ्या कोणी छक्के; 
सब घोडे बारा टक्के!

............................................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा