शिकणारे विद्यार्थी आणि शिकवणारे शिक्षक कुठे गेले?
पडघम - कोमविप (कोकण, मराठवाडा, विदर्भ, प.महाराष्ट्र)
प्रवीण बर्दापूरकर
  • मराठवाड्याचा नकाशा आणि ‘मराठवाडा मुक्ती दिन’ बोधचिन्ह
  • Sat , 28 September 2019
  • पडघम कोमविप मराठवाडा Marathwada मराठवाडा मुक्तिसंग्राम Marathwada Mukti Sangram मराठवाडा मुक्ती दिन Marathwada Mukti Din

ज्या विद्यापीठात आपण शिकलो, वावरलो, त्याच विद्यापीठात प्रमुख पाहुणा म्हणून येणं, हा मला फार मोठा सन्मान वाटतो. इथं येताना मला आनंद झालेला आहे आणि मी काहीसा गांगरलोही आहे. हमरस्त्यालगतच्या कमानीतून या सभागृहापर्यंत येताना विद्यापीठाचा झालेला विस्तार डोळ्यात भरत होता. तो बघताना मी मात्र आमच्या काळातील जुना चिंचोळा रस्ता, दुतर्फा असलेली गुलमोहोराची झाडं, गेस्ट हाऊसजवळचा पूल अशा ओळखीच्या जुन्या खुणा शोधत होतो. त्यावेळी इयत्ता चौथीत असताना वाचलेल्या कवी वा. भा. पाठक यांच्या कवितेच्या-

खुणा गावच्या दिसू लागल्या स्पष्ट मला लोचनी

उडे किती खळबळ माझ्या हृदयातुनी

या ओळी आठवल्या.

या परिसरात मी खूप बागडलो. नेहरू युवक केंद्रात काम करत असताना तेथे येणारे पाहुणे विद्यापीठाच्या गेस्ट हाऊसमध्ये मुक्कामाला असत. त्यामुळे या परिसरात नेहमी यावं लागे. तेव्हा हा परिसर निवांत होता. या परिसरातली अनेक झाडं माझी मित्र झालेली होती. त्या झाडांखाली बसून मी अनेकदा वाचन करत बसत असे. गेस्ट हाऊसच्या त्या पुलावर बसूनच श्रावणातल्या एका पावसाळी दुपारी ‘संध्याकाळच्या कविता’ या कवितासंग्रहातून माझी कविश्रेष्ठ ग्रेस यांच्याशी ओळख झाली. त्या संग्रहातील-

पाऊस कधीचा पडतो झाडांची हलती पाने

हलकेच जाग मज आली दु:खाच्या मंद सुराने

या ओळी माझ्या आवडत्या. गंमत बघा, पुढे माझी ग्रेस यांच्याशी दाट ओळख झाली. असाच एकदा गप्पा मारताना माझी-माझी पहिली भेट कुठे झाली हे त्यांना सांगितलं तेव्हा ते मंदसे हसले. आज जी सहा पुस्तकं मी कृतज्ञता म्हणून विद्यापीठाला भेट म्हणून कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांच्या स्वाधीन केली आहेत. त्यात ग्रेस यांच्यावरचं संपादित केलेलं माझं ‘ग्रेस नावाचं गारुड’ हेही पुस्तक आहे. या विद्यापीठानं मला शिक्षण दिलं, आत्मविश्वास दिला, एक माणूस म्हणून कसं जगावं याची प्रेरणा दिली. म्हणूनच इथं येण्याचं आमंत्रण जेव्हा आवडता कवी दासू वैद्य आणि डॉ. मुस्तजीब खान यांनी दिलं, तेव्हा मी भारावून गेलो आणि नम्र भावनेनं ते आमंत्रण स्वीकारलं.

मुख्य विषयाकडे वळण्याआधी एक तुम्हाला आवर्जून आणि बजावून सांगतो. प्रशासकीय शिस्त, कामाचा वकूब असलेला आणि महत्त्वाचं म्हणजे स्वच्छ प्रतिमेचा व चारित्र्याचा कुलगुरू या विद्यापीठाला खूप वर्षांनी डॉ. प्रमोद येवले यांच्या रूपात मिळाला आहे. एक पत्रकार म्हणून मी शिक्षण किंवा विद्यापीठ हे बीट काही फार वर्ष केलेलं नाही, तरी डॉ. येवले यांनी एक प्राचार्य आणि प्र-कुलगुरू म्हणून बजावलेली कामगिरी मला चांगली ठाऊक आहे. त्यांनी वर्ध्याचं फार्मसी महाविद्यालय राज्यात नंबर एकचं करताना घेतलेले श्रम, त्या महाविद्यालयाला लावलेली शिस्त मी बघितली आहे. त्या महाविद्यालयात मी प्रमुख पाहुणा म्हणूनही दोन-तीन वेळा गेलेलो आहे, म्हणून मला हे सर्व ठाऊक आहे. कुलगुरूपदावर ते कुणाच्या मेहेरबानीनं किंवा वशिल्यानं नव्हे तर मेरीटवर कसे आलेले आहेत याची खातरजमा मी केलेली आहे. म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील सर्व प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी, व्यवस्थापन समिती तसंच विद्वत सभेचे सर्व सदस्य आणि चळवळ्या विद्यार्थ्यांना माझं कळकळीचं आवाहन आहे की, डॉ. प्रमोद येवले यांना कुलगुरू म्हणून काम करताना अडथळे निर्माण करू नका. त्यांना सहकार्य करा आणि या विद्यापीठाला पूर्ववैभव प्राप्त करून देण्यास मदत करा. 

‘मराठवाडा कुठं कमी पडतो’ या विषयावर मी माझ्या स्वभावाला साजेसं स्पष्ट बोलणार आहे. या मराठवाड्यात मी शालेय ते पदवीपर्यंतचं शिक्षण घेतलं, ग्रंथालय शास्त्रात प्रमाणपत्र आणि पुढचं शिक्षण घेतलं. या शिक्षणानं मला भाषा दिली, त्यातून येणारा  आत्मविश्वास दिला, उडण्यासाठी पंख दिले. मग मी पत्रकारितेत गेलो आणि गेली चाळीस तिथेच वर्षं रमलो. ‘लोकसत्ता’ आणि ‘लोकमत’सारख्या वृत्तपत्राच्या संपादकपदापर्यंत पोहोचलो, मराठीसोबतच हिंदी आणि इंग्रजीत लेखन केलं. अनेक पुस्तकं प्रकाशित झाली. आंतरराष्ट्रीय अभ्यासवृत्ती मिळाली. वृत्तसंकलन आणि व्याख्यानांच्या निमित्तानं ४०-४२ देश फिरून झाले. अनेक पुरस्कार आणि मोठे सन्मान मिळाले. हे सगळं या मराठवाड्याच्या भूमीत मिळालेल्या शिक्षणामुळेच शक्य झालं, अशी माझी नम्र धारणा आहे.

एकेकाळी जालना रेल्वे स्टेशनवर ओरडून वृत्तपत्र आणि साप्ताहिकं विकणार्‍या, रोजगार हमी योजनेवर काम केलेल्या माझ्यासारख्या, ग्रामीण भागातून आलेल्या मुलाला पत्रकारिता आणि लेखनाच्या आघाड्यांवर बर्‍यापैकी मजल मारता आली, कारण मराठवाड्यात घेतलेल्या शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षणानं, माझ्यातला विद्यार्थी घडवतानाच मला आत्मविश्वास दिला, माझ्यातला माणूस घडवला. नुसता माणूस नाही तर मूल्यनिष्ठ माणूस घडवला. या पार्श्वभूमीवर वैद्यक, अभियांत्रिकी, व्यवस्थापन असे काही मोजके अभ्यासक्रम वगळता, आधी विद्यार्थी आणि मग माणूस म्हणून घडवणं, त्याला आत्मविश्वास देणं, उडण्यासाठी पंख देणं याबाबत आज मराठवाड्यातील शिक्षणाची अवस्था कशी आहे? याचं उत्तर किंचित आशादायक आणि खूपसं निराशादायक चित्र आहे, हेच मिळतं.

माझं म्हणणं स्पष्ट करण्यासाठी दोन अनुभव सांगतो. पहिला आहे सत्तरीच्या दशकात या विद्यापीठाचे कुलगुरू असलेल्या डॉ. आर. पी. नाथ यांचा. डॉ. नाथ एकदा एका केश कर्तनालयाच्या उद्घाटनासाठी गेले. कुलगुरू, म्हणजे शिक्षकांचे गुरू, त्या कार्यक्रमाला गेले म्हणून तेव्हा ‘मराठवाडा’, ‘अजिंठा’, ‘लोकविजय’ या वृत्तपत्रांतून खूप टीका झाली. त्यावर ‘एक शिक्षक म्हणून मला केवळ शिकवायचं नाही, तर विद्यार्थी घडवायचा आहे, तर त्याला त्याच्या पायावर उभं करायचं आहे, त्याच्यातला माणूस घडवायचा आहे. शिक्षक म्हणून ते माझं कामच आहे’, असं उत्तर आर. पी. नाथ यांनी दिलं होतं.

असे शिक्षक आता मराठवाड्याच्या शिक्षण क्षेत्रात आहेत का? बहुसंख्य शिक्षक माणूस घडवणं तर सोडाच, पण विद्यार्थी तरी किमान नीट घडवत आहेत का? न शिकवणारे बहुसंख्य शिक्षक, न शिकणारे बहुसंख्य विद्यार्थी आणि कोचिंग क्लासेसमधे गर्दी, असं आजचं चित्र आपल्या देशात सर्वत्रच आहे, पण मराठवाड्यात ते जास्त भीषण आणि अगदी गाव स्तरापर्यंत व बजबजपुरीचं आहे.

दुसरी आठवण पण अशीच जुनीच आहे. १९७० ते ८०च्या दशकात तेव्हाच्या नागपूर विद्यापीठाच्या शिक्षणाच्या दर्जाची अवस्था अतिशय वाईट होती. नोकर्‍यांच्या जाहिरातीत ‘नागपूर विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी अर्ज करू नयेत’ असे उल्लेख असत, इतकी तेव्हाच्या नागपूर विद्यापीठाची प्रतिमा रसातळाला गेलेली होती. पुढे डॉ. वि. भि. कोलते कुलगुरू झाल्यावर ती प्रतिमा बदलली. आपल्या मराठवाड्याच्या शिक्षणक्षेत्राची अवस्था तेव्हाच्या नागपूर विद्यापीठासारखी आज झालेली आहे, हे नमूद करताना मला अतिशय खेद वाटतो. शिक्षण क्षेत्रातील सर्वोच्च संस्था म्हणून ही प्रतिमा बदलण्यासाठी पुढाकार घेण्याची जबाबदारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाची आहे, असं माझं मत आहे.

मी नागपूर, मुंबई, दिल्लीत पत्रकारिता केली. अनेक देशांत फिरलो. या भटकंतीत काम संपलं की, तिथलं विद्यापीठ आणि ग्रंथालयांना भेटी देणं हा माझा आवडता उद्योग असायचा. अगदी दुबईला प्रथम गेलो तेव्हाही काम संपल्यावर मी ‘गोल्ड सूक’ म्हणजे सोन्याच्या बाजारात न जाता विद्यापीठात गेलो! अलीकडची दोन वर्षं वगळता अनेक ठिकाणी मी शिकवायला जातो. या अनुभवांती सांगतो, सगळ्याच विद्यापीठात थोडं बहुत कुरघोडीचं राजकारण असतं, स्पर्धा आणि हेवेदावे असतात. आपल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात मात्र अति राजकारण आहे. त्यातही जास्त वाईट बाब म्हणजे या राजकारणाला जाती, उपजाती, पोटजाती तसंच धर्माचे पदर आहेत. आणि पक्षीय हेव्यादाव्याचे दाट रंगही त्याला आहेत.

हेच चित्र एकूण मराठवाड्याच्या शिक्षणक्षेत्राचं आहे. शिक्षण मागे पडलंय, विद्यार्थ्यांना माणूस म्हणून घडवणं बाजूला पडलं आहे, हे मला अनेक वर्षं बाहेर राहून आल्यावर तर जास्त जाणवलं. त्यामुळे मी विषण्ण झालो. आपला मराठवाडा यातून बाहेर पडणार कसा, हा प्रश्न मला छळतो आहे.

मुळात सुलभीकरण आणि सार्वत्रिकीकरण करण्याच्या नादात आपल्या शिक्षणातून ज्ञान हद्दपार झालं आणि शिक्षण माहितीवर आधारित झालं. त्यामुळे कोणत्याच विषयाचं मूलभूत ज्ञान शिक्षणातून मिळत नाही, हे खरं असलं तरी आपली मराठवाड्यातली बहुसंख्य मुलं शुद्ध भाषेच्या बाबतीतही फारच कमी पडतात, असा माझा अनुभव आहे. त्यांच्यावर शाळा आणि महाविद्यालयात भाषा संस्कार झालेला आहे की नाही, असा प्रश्न पडावा अशी ही स्थिती आहे. एक लक्षात घ्या, भाषा म्हणजे केवळ काही अक्षरांचे पुंजके नव्हे. प्रत्येक शब्दाला जन्म असतो, अर्थ, भाव आणि गंध असतो. संवादाचं माध्यम भाषा असते. भाषा म्हणजे संस्कृती, आपलं संचित. माणसाची ओळखच मुळी त्याच्या बोलण्यातून म्हणजे त्याच्या भाषेतून निर्माण होते. म्हणजे एका अर्थानं भाषा माणूसही असते. कवी आरती प्रभू म्हणतात-

जीभ झडली तरी जे गात असतात

शब्द शब्द शाबूत ठेऊन

त्यांना मरण म्हणजे

एक अफवा वाटत असते   

ही त्यांची एक शेवटची कविता समजली जाते. त्यातून आरती प्रभू यांचं भाषेवरचं अव्यभिचारी प्रेम दिसतं. असं प्रेम आपण भाषेवर केलं पाहिजे असा संस्कार करणारे शिक्षक माझ्या पिढीला याच मराठवाड्यात शिक्षण घेताना शाळा आणि महाविद्यालयात लाभले. आज मात्र कुठे गेले तसे शिक्षक, असा प्रश्न मला पडलेला आहे.

मराठीचे कट्टर पुरस्कर्ते डॉ. वि. भि. कोलते यांच्या नेतृत्वाखाली मराठीसाठी झालेल्या आंदोलनात हिरिरीनं सहभागी झालेलो असलो तरी मला कोणताही भाषेचा वाद निर्माण करायचा नाही. भाषेबाबत माझ्या मनात ‘राज’ किंवा ‘अबू’ मुळीच नाही. भाषेची समज कमी असेल, दुबळी असेल तर माणूस प्रभावशून्य होतो, मुका होतो म्हणून स्पष्टपणे सांगतो, मराठवाड्यातील बहुसंख्य विद्यार्थी तर मातृभाषा मराठीतही मार खातात असा माझा अनुभव आहे.  

भाषेचा संस्कार आधी घरात होतो आणि त्याला पैलू शालेय शिक्षणात पडतात. म्हणजे पाडले जावेत अशी अपेक्षा असते. आमच्या काळात तरी असं घडत असे. पण भाषाविषयक मूलभूत ज्ञान घेण्यात विद्यार्थी आणि देण्यात, भाषा संस्कार करण्यात मराठवाड्यातील बहुसंख्य शिक्षकही कमी पडलेले आहेत, असं आजचं चित्र आहे. त्यामुळे भाषा विषयक जागरूकता आणि ज्ञान या दोन्ही बाबतीत मराठवाड्यातील बहुसंख्य विद्यार्थी कच्च मडकं झालेले आहेत. 

हे माझ्या लक्षात आलं ते माझे प्राचीन मित्र आणि कम्युनिस्ट पक्षाचे आता एक राष्ट्रीय नेते असलेले डॉ. भालचंद्र कानगो यांच्यामुळे. मराठवाड्यातील पत्रकारांना काही तरी संधी मिळावी म्हणून डॉ. कानगो यांनी तीन-चार वेळा पत्रकारितेचा अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या काही मुलांना वेगवेगळ्या वेळी मुंबई आणि नागपुरात माझ्याकडे पाठवलं. त्यांच्याशी बोलताना सर्वप्रथम ही बाब माझ्या लक्षात आली. त्यापैकी साहित्याच्या क्षेत्रात काही तरी करू इच्छिणार्‍या दोघांना (त्यातला एक तर कवी होता!) कवी आरती प्रभू आणि लेखक चिं. त्र्यं. खानोलकर यांच्यात काय नातं आहे, हे माहिती नव्हतं. ‘प्रक्षेपण’ हा शब्द त्यांनी ‘प्रकशेपन’ असा लिहिला. फार तपशीलात जात नाही, पण नंतर मराठवाड्यातून आलेल्या मुलांच्या भाषेची तपासणी करण्याची सवयच मला लागली. औरंगाबादला स्थायिक झाल्यावर तर हा छंदच जडला. नंतर मी मराठवाड्यात ठिकठिकाणी फिरताना चाचपणी केली, तेव्हा परिस्थिती अतिशय भयावह असल्याचं लक्षात आलं. 

मराठवाड्यातील माध्यमात आणि शिक्षण संस्थांच्या जाहिरातीतही ‘बीड बायपास रोड’ किंवा  ‘मृतक मोटर सायकलवरून जात असताना’ असे उल्लेख दिसतात. अशी असंख्य उदाहरणं सांगता येतील. त्यामागे भाषाविषयक अज्ञानच आहे. त्याचं कारण हे अज्ञान शिक्षण घेताना/देतांना दूर झालं नाही हेच आहे. ‘बायपास’ आणि ‘रोड’ हे समानार्थी शब्द आहेत, मृतक म्हणजे मेलेला माणूस वाहन कसे चालवेल? असे प्रश्न मराठवाड्यातील शिक्षक, संपादक आणि वाचकांनाही पडत नसले तरी उमेदवार नाकारण्यासाठी या चुका पुरेशा असतात.

दिल्ली सोडल्यावर आम्ही औरंगाबादला स्थायिक झाल्यावर पत्रकारितेची मास्टर्स पदवी घेणार्‍या इंग्रजी माध्यमातील विद्यार्थ्यांसमोर बोलण्यासाठी मला आमंत्रित करण्यात आलं. त्यांचं माध्यम इंग्रजी असल्यानं मी स्वाभाविकपणे इंग्रजीत बोलायला सुरुवात केली तर आठ-दहा मिनिटांतच मुलांची चुळबुळ सुरू झाली. मी कारण विचारलं तर एक विद्यार्थी म्हणाला, ‘मराठीत ब्वोला की. मराठीतच सोपं पडतं आम्माला’. हे मी जशाला तसं ‘कोट’ करतोय, कारण ते रेकॉर्ड केलेलं व्याख्यान मी नंतर अनेकदा इतरांना ऐकवलं होतं. वास्तववादी लेखन म्हणून साहित्यात ही भाषा ठीक असू शकेल, पण माध्यमात किंवा अन्य कोणत्याही नोकरीत कशी चालेल?

मराठीची बोंब, ज्ञानभाषा इंग्रजीचीही बोंबाबोंब अशी परिस्थिती असल्यावर मराठवाड्यातला बहुसंख्य विद्यार्थी मराठवाड्याबाहेरच्या आणि स्पर्धेच्या जगात आत्मविश्वासानं उभा कसा राहू शकेल याचा विचार शिक्षणक्षेत्राला करावाच लागेल. यासाठी शिक्षणाची सर्वोच्च संस्था म्हणून या विद्यापीठाची जबाबदारी मोठी आहे.

बहुसंख्य विद्यार्थ्यांचं भाषाज्ञान वाढवण्यात, माणूस म्हणून स्वबळावर त्यांना उभं करण्यात मराठवाड्याचं शिक्षण क्षेत्र कमी पडलं, अशा वेळी साहित्यिक जगताची जबाबदारी मोठी होती, पण ती पेलण्यात बहुसंख्य साहित्यिकही कमीच पडले. बोलण्यासोबतच शिक्षणात प्रमाणऐवजी बोली भाषा हा दुबळा युक्तीवाद त्यांनी केला आणि मराठवाड्यातील भाषिक अज्ञान दूर करण्याच्या यज्ञात आहुती टाकली नाही.

हेही कमी की काय म्हणून मराठवाड्यातील बहुसंख्य लेखकू प्रेमाचं मुळूमुळू लेखन किंवा विद्रोहाचे फुसके हुंकार टाकण्यात आणि त्यातून मिळणार्‍या टाळ्यांच्या सापळ्यात अलगद अडकले. बदलत्या जगाचा वास्तववादी वेध घेण्यातही मराठवाड्याचे बहुसंख्य साहित्यिक कमी पडले आहेत. जागतिकीकरण आणि खुल्या अर्थव्यवस्थेमुळे, विकास कामांच्या रेट्यामुळे समाजातले अनेक घटक उदध्वस्त झाले, पण ते उदध्वस्तपण, उजाडपण, त्यांचे उसासे, अश्रू साहित्यात व्यक्त झालेच नाहीत.

हे व्यासपीठ राजकीय बोलण्याचं नाही याचं भान मला निश्चितच आहे तरी ओझरता उल्लेख करायलाच हवा, कारण राजकारणानं आपलं जीवन व्यापून टाकलेलं आहे, शिवाय या विद्यापीठात खूपच राजकारण चालतं, हे काही आता लपून राहिलेलं नाहीये. त्यामुळे मीही एखादी तरी कमेंट करायला हरकत नसावी. अर्थसंकल्पात तरतूद झालेलाही निधी पळवला जात असल्यानं महाराष्ट्राच्या विविध भागात विकासाचे आणि विकासाच्या अनुशेषाचे प्रश्न निर्माण झाले. याचं एक कारण प्रादेशिक स्तरावरील विविध पक्षांच्या राजकीय नेत्यांची एकजूट नसणं हेच आहे. विकास आणि विकासाच्या अनुशेषाच्या बाबत भरपूर बोललं जात असतांना एक लक्षात घ्या, आपल्या देशातील राजकारणाचा बाज अलीकडच्या कांही वर्षात झपाट्याने बदलला आहे. एकदा निवडणुका संपल्या की, विकासाच्या कामांसाठी राजकीय मतभेद बाजूला ठेवण्याचा ट्रेंड आता प्रस्थापित झालाय. आधी हे पश्चिम महाराष्ट्रात दिसलं आणि आता विदर्भात दिसतं आहे.

अलीकडच्या काळातील मराठवाड्यातील नेते विकासाचं राजकारण करण्यात कायमच कमी पडतात, हे मला राज्याच्या राजधानी आणि उपराजधानीत, तसंच देशाच्या राजधानीत पत्रकारिता करताना जाणवलेलं आहे. मराठवाड्यातील नेते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, राज्याचे मंत्री होतात, पण ते मराठवाड्याचे प्रश्न सोडवू शकत नाहीत, हे वास्तव आहे आणि तेच माझं शल्यही आहे.

अशा अनेक आघाड्यांवर मराठवाडा कमी पडतो आहे. या सर्व कमी पडण्यातून बाहेर पडून मराठवाडा सुजलाम सुफलाम होवो, अशी आशा तसंच सदिच्छा ‘मराठवाडा मुक्ती दिनी’ व्यक्त करतो आणि थांबतो.

(‘मराठवाडा मुक्ती दिना’च्या कार्यक्रमात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात प्रस्तुत लेखकानं मराठवाडा इथं कमी पडतो या विषयावर दिलेल्या व्याख्यानाचा संपादित अंश.)

.............................................................................................................................................

लेखक प्रवीण बर्दापूरकर दै. लोकसत्ताच्या नागपूर आवृत्तीचे माजी संपादक आहेत.

praveen.bardapurkar@gmail.com

भेट द्या - www.praveenbardapurkar.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘जातवास्तव’ स्वीकारल्याशिवाय सत्ता आणि संसाधनांचा जातीय ‘असमतोल’ दूर करता येणार नाही. उमेदवारांची नावे जातीसकट जाहीर करणे, हा एक ‘सकारात्मक प्रयोग’ आहे

महायुतीच्या ३८ उमेदवारांपैकी १९ मराठा आहेत. विशेष म्हणजे हे सगळे श्रीमंत मराठे आहेत. महाविकास आघाडीच्या ३९ उमेदवारांपैकी २४ मराठा आहेत. वंचित बहुजन आघाडीच्या ३२ उमेदवारांपैकी ५ अनुसूचित जाती, १३ ओबीसी आणि ४ मराठा आहेत. यावरून एक गोष्ट लक्षात येते की, मविआ असो वा महायुती एका विशिष्ट समाजाकडेच सत्ताबळ झुकलेले दिसते. मात्र वंबआने उमेदवारी देताना जात समतोल पाळलेला दिसतो.......

स्वयंपाकघरात टांगलेल्या कॅलेंडरवरच्या चित्राइतकीच थरारकता वा जाहिरातीतून एखादं उत्साहवर्धक पेय विकणार्‍या म्हातार्‍या अमिताभ बच्चनइतकीच विश्वासार्हता, दहा वर्षं राष्ट्रीय व्यासपीठावर वावरलेल्या मोदींच्या व्यक्तिमत्त्वामध्ये उरली आहे...

प्रचारसभांमधून दिसणारे पंतप्रधान दमले-भागलेले, निष्प्रभ झालेले आहेत. प्रमाणापलीकडे वापरलेली छबी, अतिरिक्त भलामण आणि अतिश्रम, यांमुळे त्यांची ‘रया’ गेल्यासारखी वाटते. एखाद्या ‘टी-ट्वेंटी’ सामन्यात जसप्रीत बूमराला वीसच्या वीस षटकं गोलंदाजी करायला लावावी, तसं काहीसं हे झालेलं आहे. आक्रसत गेलेला मोदींचा ‘भक्तपंथ’ टिकून असला, तरी ‘करिष्मा’ उर्फ ‘जादू’ मात्र चाकोरीबद्ध झालेली आहे.......

भाजपच्या ७६ पानी ‘जाहीरनाम्या’त पंतप्रधान नरेंद्र मोदींची तब्बल ५३ छायाचित्रं आहेत. त्यामुळे हा जाहीरनामा आहे की, मोदींचा ‘छायाचित्र अल्बम’ आहे, असा प्रश्न पडतो

काँग्रेसच्या ४८ पानी जाहीरनाम्यात राहुल गांधींची फक्त पाच छायाचित्रं आहेत. त्यातली तीन काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासोबत आहेत. याउलट भाजपच्या जाहीरनाम्याच्या मुखपृष्ठावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीमागे बळंच हसताहेत अशा स्वरूपाचं भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचं छायाचित्र आहे. त्यातली ‘बिटवीन द लाईन’ खूप सूचक आणि स्पष्टता सूचित करणारी आहे.......

जर्मनीत २० हजार हत्तींचा कळप सोडण्याची धमकी एका देशाने दिली आहे, ही ‘हेडलाईन’ जगभरच्या प्रसारमाध्यमांमध्ये गाजतेय सध्या…

अफ्रिका खंडातील बोत्सवाना हा मुळात गरीब देश आहे. त्यातच एवढे हत्ती म्हणजे दुष्काळात तेरावा महिना. शेतांमध्ये येऊन हत्ती मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान करत असल्याने शेतकरी वैतागले आहेत. याची दखल बोत्सवानाचे अध्यक्ष मोक्ग्वेत्सी मेस्सी यांनी घेतली आहे. त्यामुळेच त्यांनी संतापून एक मोठी घोषणा केली आहे. ती म्हणजे तब्बल २० हजार हत्तींचा कळप थेट जर्मनीमध्ये पाठवण्याची. अनेक माध्यमांमध्ये ही ‘हेडलाईन’ गाजते आहे.......