माझे बाबा : जिव्हाळ्याचा पूल
पडघम - साहित्यिक
कविता महाजन
  • कविता महाजन वडील स. दि. महाजन यांच्यासह
  • Fri , 27 September 2019
  • पडघम साहित्यिक कविता महाजन Kavita Mahajan भारतीय लेखिका Bhartiya Lekhika स. दि. महाजन S. D. Mahajan

प्रसिद्ध कवयित्री, कादंबरीकार, चित्रकार आणि बालसाहित्यिका कविता महाजन यांचा आज पहिला स्मृतिदिन. त्यानिमित्ताने ‘अक्षरनामा’ प्रकाशित करत असलेल्या विशेषांकातील हा एक लेख... महाजन यांनी त्यांचे वडील प्रा. स. दि. महाजन यांच्या पंचाहत्तरीनिमित्त लिहिलेला...

.............................................................................................................................................

माणसं जितकी जवळची तितकं त्यांच्याविषयी लिहिणं अवघड. आर्ट स्कूलमध्ये आम्ही पोर्ट्रेट करायचो, तेव्हा समोर मॉडेल म्हणून बसवलेल्या व्यक्तीपासून विशिष्ट अंतर राखून दूर उभं राहूनच चित्र काढावं लागायचं; तसं अलिप्ततेचं अंतर व्यक्तींविषयी लिहिताना हवं असतं आणि जवळच्या माणसांमध्ये असं अंतर नसतंच. नांदेड सोडून आता तब्बल ३० वर्षं झाली, भौगोलिक अंतर वाढलं; लग्नानंतर ‘आपलं घर’ हे सुट्टीत चार दिवस येऊन राहण्यापुरतं ‘माहेर’ बनलं; तरीही ‘नात्यातलं अंतर’ कमी झालं नाही; शरीरानं कुणी कितीही दूर राहिलं, तरी मनातले जिव्हाळ्याचे पूल कायम जोडलेले असतातच. खेरीज रक्ताच्या नात्यांमध्ये जनुकीय साखळ्याही असतात; ज्या माणसांत अनेक पिढ्यांचा जिव्हाळा तमाम मतभेदांसह राखून ठेवत असतात. माहेर हे एक विस्तृत, आयुष्याचा दीर्घ भाग व्यापणारं चित्र आहे; बाबा या चित्रातला एक मुख्य घटक.

अगदी लहानपणात जाऊन आठवलं की, बाबांची पहिली आठवण कोणती आहे? तेव्हा आम्ही गुजराथी गल्लीतल्या एका चाळीत राहत होतो. आईही नोकरी करत होती; त्यामुळे मला आजोळी ठेवलेलं होतं. ते घर होळीवर आणि बाबांचं घर वजिराबादला. सायकल रिक्षांचा जमाना होता. आई सुट्टीच्या दिवशी मला घरी घेऊन येई, तशी मी आलेली होते. एका मोठ्या खोलीचं घर. एका कोपऱ्यात स्वयंपाक, दुसऱ्या कोपऱ्यात लहान आडवी भिंत घातलेली न्हाणी, तिसऱ्या कोपऱ्यात अंथरून, चौथ्या कोपऱ्याला लागून दरवाजा. समोरचा व्हरांडा बंदिस्त करून त्याचीही एक लहानशी खोली बनवलेली. तिच्यात एक लाकडी सोफा होता. त्या सोफ्यावर व्याघ्राजिन म्हणजे वाघाचं कातडं अंथरलेलं होतं. बाबांनी ते नुकतंच, नवीन आणलेलं असावं. घरात शिरताच ते कातडं पाहून मी घाबरले आणि आतल्या खोलीत दडून बसले. मी आहे तेवढा वेळ ते काढून ठेवावं असं आईला वाटत होतं; पण बाबांनी शांतपणे मला उचलून घेतलं आणि त्यांच्याजवळ सोफ्यावर बसवलं. “हा वाघ नाही, हे नुसतं कातडं आहे; याच्यात घाबरण्यासारखं काही नाही आणि पाहून त्याची सवय झाली की भीती निघून जाईल…” असं समजावलं.

बाबा नांदेडमध्ये आले ते हदगावहून. पुढे एकदा हदगावला गेले असताना त्यांचा जुना वाडा, तो कुणालातरी विकलेला होता अर्थात, मी पाहून आले होते. शिक्षणासाठी ते अजून दोन-तीन मित्रांसोबत वजिराबादमध्ये खोली शेअर करून राहिले. मग नोकरी आणि शिक्षण समांतर केलं. जिल्हा परिषदेत नोकरी मिळाल्यानंतर त्यांचे वडीलही नांदेडला त्यांच्यासोबत राहण्यास आले. बाबा त्यांना ‘तात्या’ म्हणून संबोधत. आई रेणुकाबाई, त्यांच्या लहानपणीच वारली होती; तिचा एखादा फोटोही उपलब्ध नाहीये. पण त्यांची आजी आणि मावशी यांना आम्ही पाहिलंय, त्यावरून ती किती देखणी असेल याचा अंदाज आम्ही काढत असू. बाबांची आजी, जिजी कधीतरी आमच्याकडे दोन-तीन महिने राहण्यास येई. आईचं आणि जिजीचं गुळपीठ जमे. फार सौम्य, मऊ स्वभावाच्या होत्या जिजी आणि आईही तशीच. आजोबांचा मात्र एक फोटो घरात आहे. त्यांच्या अखेरच्या आजारपणात बाबांनी त्यांची किती काळजी घेतली, सेवा केली, हे मी इतर नातेवाइकांकडून ऐकलेलं आहे. आजोबा उत्तम स्वयंपाक करत आणि आजी वारल्यानंतर सणावारांच्या खास मेन्यूसहित संपूर्ण स्वयंपाक करून मुलांना, आलेल्या नातेवाइकांना व्यवस्थित जेऊखाऊ घालत, त्यात कधी शिळंपाकं वा तडजोडीचं करणं – खाणं त्यांना चालत नसे; अशी आठवण बाबांनी सांगितलेली आहे.

गावातच माहेर असल्याने आई परगावी जाण्याचा प्रसंग क्वचित यायचा, पण अशावेळी बाबांनी कधी एखादी भाजी, फोडणीचं वरण केलं, तर ते अत्यंत खमंग आणि चवदार होई; म्हणजे आजोबांच्या हाताची चव बाबांच्या हातात उतरली होती, असं म्हणायलाही हरकत नाही. आजोबांचा एक मोठा पाट आणि आजीचा एक खलबत्ता अशा दोनच वस्तू घरात ‘चालत आलेल्या’ शिल्लक होत्या; बाकी सर्व संसार आई-बाबांनी स्वकमाईतून उभा केला. मी माध्यमिक शिक्षण घेत होते, तेव्हा बाबांनी एम. ए. पूर्ण केल्याचं आठवतंय.

माझ्या लहानपणातल्या बाबांच्या बाकी आठवणी या बहुतेककरून त्यांच्या ‘छंदां’च्या आहेत. बागकाम, प्राणी पाळणे आणि बांधकाम हे त्यातले मुख्य. घरी दोन-तीन वेळा ससे पाळले होते. एकदा एक गाय आणलेली. ती सांभाळता येतेय हे ध्यानात आल्यावर एक म्हैस आणली. मग अजून दोन म्हशी आणल्या. चार जनावरांचं करणारा माणूस पळून गेल्यावर मग सगळीच विकून टाकली. पुढे पामेरियन कुत्रीही आणली. या खूप गमतीच्या गोष्टी वाटत लहानपणी. चारा कापण्याचं एक यंत्र आणलेलं होतं, ते वापरून चारा कापायला त्यांनी मला शिकवलंही होतं. त्यांच्यासारखंच बागकाम करायला आवडायचं, पण मला खुरपणी जमायची नाही; तेव्हा माझ्यासाठी एक लहानसं खुरपं आणून खुरपणीही शिकवली होती.

ते पुण्या-मुंबईला गेले की विविध देशीविदेशी फुलझाडांच्या बिया आणत. पुढच्या अंगणात फुलांचे अत्यंत सुंदर ताटवे त्यांनी बनवले होते; इतकी सुंदर बाग की, उन्हाळ्यात कधी संध्याकाळी पोहे-मुरमुरे तिखट-मीठ लावून घेऊन खायला आई आम्हा तिघा मुलांना घेऊन या बागेत बसायची. एक उन्हानुसार रंग बदलणाऱ्या फुलाचं झाड त्यांनी आणलं होतं; ते मुद्दाम बघायला लोक येत असत. त्याची फुलं सकाळी पांढरी, दुपारी गुलाबी आणि संध्याकाळी लाल होत. फळझाडं, भाज्यांचे ताटवे मागच्या अंगणात. त्यात त्यांना आवडणारी आणि घरात दुसरं कुणीच खात नसे ती शेपूची भाजीही असायची. हादग्याच्या झाडावर अगणित पोपट यायचे. मोगऱ्याची टोपलीभर फुलं निघायची रोज.

चिंचेचा चिगुर, हादग्याची फुलं, शेपू अशा जुन्या भाज्या; पानगे, दशमी असे पारंपरिक पदार्थ असलेलं ताजं, गरम जेवण बाबांना प्रिय. परसातल्या कोवळ्या मेथीसारख्या भाज्या खुडून त्यांची तोंडीलावणं, तिखटजाळ मीठभुरका अशा फर्माइशी जेवायला बसल्यावर हमखास होत. आई हे सारं निगुतीने करे. तिच्या हाताला छान चव होती. पारंपरिक जेवणाखेरीज वेगळे काही प्रयोग केले की, ते मात्र बाबांना फारसे आवडायचे नाहीत; पण त्या काळात गाजत असलेलं ‘रुचिरा’ वाचून मी ‘वाट्टेल ते’ बनवत असे आणि त्याची चेष्टा करत का असेना, ते कौतुकानं खाणं त्यांना भाग पडे.

सकाळ – संध्याकाळ बाबांची बागेत फेरी असे. कधी झाडांना आळी करणं, कधी पाण्यासाठी वाटा काढणं… असं सुरू राही. कधी सणक आली की, ते चांगलं वाढलेलं अख्खं झाडही इकडचं उखडून तिकडे लावत. मग ते नीट जगतंय की नाही, याच्या काळजीत काही दिवस जात. हे ‘बदला’चं वेड बांधकामात जास्त दिसे. आजही मी नांदेडला गेले की, एखादी नवी भिंत वा खिडकी दिसतेच; एखाद्या भिंतीत दरवाजा काढणे, एखादी भिंत पाडून लहान खोली मोठी करणे, फरशा नव्या लावणे, एखादी नवी खोली बांधणे असं काहीतरी ते प्रचंड हौशीनं करत असतात. व्यवस्थितपणा आणि स्वच्छता देखील तितकंच प्रिय. त्यांच्या अभ्यासिकेत कधीही मी पसारा पाहिलेला नाही की, पुस्तकं, फायली, कागदपत्रं वेडीवाकडी पडलीत; हरवलीत असं कधी दिसलं नाही.

आईलाही घर स्वच्छ, सुंदर ठेवण्याची आवड असल्यानं आमचं घर कायम नेटकं दिसे आणि हॉटेलच्या खोल्यांसारखी कृत्रिम झकपक त्यात नसे, तर सहज, नैसर्गिक सौंदर्य असे. आर्ट आणि क्राफ्ट यातला फरक चित्रकलेच्या शिक्षणानं तिला चांगलाच माहीत होता. तिची मोजकी चित्रंही घरात लावलेली होती. बाबांना स्वयंपाकघरातली नवी यंत्रं आणण्याचीही हौस होती. मुंबईहून नांदेडमध्ये न मिळणाऱ्या अशा अनेक चिजा ते आणत. माझ्यासाठी एकदा त्यांनी निळ्या डोळ्यांची, डोळे उघडमीट करणारी बाहुली आणली होती; तशी माझ्या एकाही मैत्रिणीकडे नसल्यानं मी पुष्कळ भाव खात असे.

एकदा बाबांनी कुठेतरी वाचून पानविड्यात खाण्याचा सुगंधी चुना घरी बनवता येतो का याचाही प्रयोग केला होता आणि दोन महिने तो बादलीभर चुना त्यांच्या बेडरूममध्ये प्रयोगाखातर टिकून होता. त्यांचे मित्र त्यांच्या या छंदांची मजेत चेष्टाही करत; पण कुतूहल सगळ्यांच्याच मनात असतात, प्रत्यक्ष कृती करून पाहण्याची धमक क्वचित कुणात असते, हेही जाणून असत.

त्यांचा गोतावळा मोठा होता; आता थोडा फरक पडलाय, पण आधी जोडलेली माणसं असंख्य होती. मदत करताना आपले नातेवाईक वा मित्रपरिवार यांना प्राधान्य देणारे खूप लोक असतात; बाबांनी या चौकटीबाहेर जाऊन नातंगोतं, जातधर्म न पाहता मदती केल्या. मी बालवाडीत असताना एक भिक्षुकी करणारे गृहस्थ त्यांच्याकडे मदतीसाठी आले होते; तेव्हा त्यांना देता येण्याजोगे काहीच काम नव्हतं, तर ‘मुलांना अक्षरओळख शिकवा’ म्हणून त्यांनी शिकवणीचं काम त्यांना दिलं; पाटीपेन्सिल घेऊन आम्ही त्यांच्यासमोर अक्षरं गिरवत बसलेले असू. घरात वर्षाचं धान्य भरलेलं असे; त्यातून कैकदा त्यांनी या गृहस्थाला धान्य काढून दिलेलंही मला आठवतं. पाहुणे वेळीअवेळी, अगदी मध्यरात्री आले तरीही आई, नंतर तिच्यासोबत मी उठून स्वयंपाक बनवत असू. घरातली माणसं आम्ही पाचच; पण जेवायच्या वेळी घरी आलेला माणूस जेवूनच जाणार हे गृहीत असे. पाहुणचाराला त्या दोघांनीही कधी काही कमी केलं नाही. कुणाच्या शैक्षणिक अडचणी, कुणाला नोकऱ्यांचे सल्ले… सतत माणसं येत – जात. चहा, कॉफी दिवसातून अनेक वेळा होई. नोकर-चाकर घरात खूप नंतर आले; आपली नोकरी सांभाळून हे सारे कष्ट आईने उपसले. एका साध्या चाळीच्या खोलीतून सुरू झालेला संसार मोठ्या तीनमजली बंगल्यात आला, त्याची एकेक वीट दोघांच्याही कष्टाची आहे.

घरात भरपूर पुस्तकं होती; अनेक मासिकं येत; यातून माझं वाचन अगदी सहजपणे सुरू झालं. माझी ‘ठकी आणि मर्यादित पुरुषोत्तम’ ही कादंबरी मी बाबांना अर्पण केली, तेव्हा अर्पणपत्रिकेत लिहिलं – “भिंतभर पुस्तकांची पार्श्वभूमी आणि समोर पुस्तक वाचत बसलेले बाबा, हे आमच्या घरातलं माझं एक आवडतं दृश्य आहे.”

बाबांचं वाचन अफाट, स्मरणशक्ती चांगली आणि वक्तृत्वही उत्तम. वाचनात मराठी, हिंदी, इंग्लिश आणि उर्दू या चार भाषांमधली पुस्तकं असतात. लहानपणी थोडे दिवस शिकलेलं उर्दू विसरलं म्हणून त्यांनी लिपी शिकायची ठरवली. त्यांना शिकवायला एक शिक्षक येत, ही मी एम.ए. पूर्ण करून प्राध्यापक बनले त्या काळातली गोष्ट आहे. त्या वयातही त्यांची शिकण्याची आवड शिल्लक होती, याचं मला मोठं नवल वाटलं होतं. त्यांचा टायपिंगचा वेगही उत्तम होता; अनेक कामं ते स्वत:च झटपट टाइप करून हातावेगळी करून टाकत. खूप वर्षं आमच्याकडे त्यांचा तो टाइप रायटर होता. अनेक विषयांमध्ये रस असल्याने पुस्तकं म्हणजे केवळ कथा-कादंबऱ्या नव्हे; तर संशोधनपर, वैचारिक लेखनही ते पुष्कळ वाचतात. अनेक संदर्भ त्यांना सहज आठवतात; तरीही गरज भासली की कोश काढून अचूक संदर्भ शोधण्याची त्यांना सवय आहे. त्यामुळे घरात विविध प्रकारचे कोशही असतात. बी.ए.ची पहिली दोन वर्षं मी त्यांची विद्यार्थिनीही होते; त्यामुळे त्यांचं शिकवणं आणि वक्तृत्व यांचा अनुभवही मला लाभला. मी बी.ए.च्या शेवटच्या वर्षाला असताना ते प्राचार्य झाले आणि मराठीचे त्यांचे तास घेणारे नवे, नवखे प्राध्यापक नीट शिकवू शकत नव्हते म्हणून प्रतिभा निकेतन महाविद्यालय सोडून मी शेवटचे वर्ष पिपल्स महाविद्यालयात पूर्ण केले. पण घरीही परीक्षेच्या वेळी बाबांनी माझे ‘तास’ घेऊन अडलेल्या गोष्टी शिकवल्या आहेत. मी बारावीला असताना नारायण कुलकर्णी कवठेकर यांची ‘नंदीबैल’ ही कविता त्यांनी खूप वेगवेगळे अर्थ उलगडून दाखवत शिकवली होती, ते आठवते. महाभारतातील काही पात्रांवर त्यांनी दिलेली व्याख्यानेही आठवतात.

त्यांचं वाचन कायम सुरू राहिलं असलं, तरी त्याचं त्यांनी ‘अभ्यासा’त रूपांतर केलं नाही आणि एम. ए. झाल्यानंतर पीएच.डी. केलं नाही; तसं झालं असतं तर कुलगुरूपदापर्यंत ते निश्चित पोहोचले असते. उत्तम अॅडमिनिस्ट्रेटर म्हणून प्राचार्यपदाच्या काळात त्यांचा लौकिक होताच. अखिल भारतीय साहित्य संमेलनाचं आयोजन नांदेडमध्ये त्यांनी केलं, तेव्हा त्यांच्या या क्षमता शिक्षणक्षेत्रापलीकडच्या लोकांच्याही ध्यानात आल्या. शिकवताना त्यांनी केलेली अनेक ग्रंथांची समीक्षा मी विद्यार्थी या नात्यानं ऐकली आहे; त्यांचं आकलन बरेचदा खूप निराळं असे आणि सोपी मांडणी करून ते विषय छान समजावून सांगत. त्यांची भाषाही बोजड नसे. तरीही लिहिण्याचा मात्र त्यांनी काहीसा कंटाळाच केला; अन्यथा मराठी साहित्यक्षेत्राला अजून एक चांगला समीक्षक लाभला असता. मात्र कुरुंदकर गुरुजींच्या सावलीत असलेल्या बहुतांश विद्यार्थ्यांची अशी वाढ झाली नाही, त्यातले बाबाही एक होते. ते शैक्षणिक राजकारणाकडे वळले नसते, तर कदाचित त्यांच्या हातून बरंच लेखन झालं असतं, असंही मला वाटतं. आता तर त्यांना काहीही लिहा म्हटलं की, “तू लिही, मी सांगतो…” असं म्हणून ते मोकळे होतात.

जनरेशन गॅप, सामाजिक आंदोलनं व स्त्रीमुक्ती चळवळीतल्या नव्या विचारांनी भारावून बनत जाणारी स्वतंत्र मतं यांमुळे बाबांच्या आणि माझ्या अनेक विचारांमध्ये पुष्कळ मतांतरं झाली. ते आस्तिक आहेत, मी नास्तिक. कर्मकांडं, सत्यनारायणाची पूजा असल्या गोष्टी मला अमान्य; त्या त्यांना आवश्यक वाटतात. अशा अनेक मतभेदांच्या लहान-मोठ्या गोष्टी आहेत. तरीही आमचे थेट वाद, भांडणं कधी झाली नाहीत; कारण घरात त्या काळात एकमेकांशी थेट बोलण्याची पद्धतच नव्हती. आज आम्ही मुली बाबांशी पुष्कळ गोष्टी थेट बोलतो; पण बाबा मात्र अजूनही क्वचित थेट काही विचारतात. अगदी माझी मुलगी दिशा काय शिकतेय वा तिने कुठला व्यवसाय निवडावा याविषयी ते तिच्याशी न बोलता मला सांगतात किंवा माझे काय, कसे चालले आहे, हे दिशाला विचारतात. संवादाच्या या अभावाचे तोटे आम्ही लहानपणी अनुभवले आहेत. त्यामुळे आता मौनाला मोडता घालून मी सरळ गप्पांना सुरुवात करते आणि हळूहळू बाबाही आता पुष्कळ गोष्टी शेअर करायला लागले आहेत. त्यांच्या लहानपणाच्या अनेक आठवणी ते अशात सांगत असतात. काळ आणि परिस्थिती माणसांना पुष्कळ बदलवते; तसे बदल आम्हां दोघांमध्येही झाले आहेत आणि या चांगल्या बदलातून एक सुसंवाद सुरू झाला आहे.

प्रत्येक व्यक्ती स्वतंत्र असते, स्वत:चे निर्णय घेण्याचा अधिकार प्रत्येकाला असतो आणि मुलांना निर्णयक्षम बनायला शिकवणं व मग त्यांना त्यांच्या आभाळात मोकळं उडू देणं ही पालकांची भूमिका असावी असं माझं मत आहे. माझ्या मुलीबाबत मी ते अमलातही आणलं आहे. असे विचार बाबांना कधी खटकतात, कधी पटतात; पण आजकाल ते फारशी मतभिन्नता दर्शवत नाहीत. त्या अर्थी ते आता आम्हांला आमचं स्वातंत्र्य घेऊ देताहेत, अशी सोयीस्कर समजूत मी करून घेते. त्यांनी कधी अविश्वास दाखवला किंवा लोकांनी सांगितलेलं काहीतरी ऐकून आमची बाजू ऐकून न घेताच ते रागावले तर मला वाईट वाटायचं. आज मी ‘माझी बाजू ऐकून घ्या, मग रागवायचं तर रागवा’ असं म्हणू शकते; पण तेव्हा हे म्हणण्याची हिंमत नव्हती. मुलांनी वडिलांना घाबरायचं असतं, हीच नात्याची तऱ्हा योग्य मानणारा तो काळ होता. भीतीयुक्त आदर, भीतीयुक्त प्रेम हेच वडील – मुलांच्या नात्याचं स्वरूप असे. त्यामुळे आज त्यांची नातवंडं जेव्हा त्यांच्याकडून हक्कानं प्रेम करवून घेतात; तेव्हा ते दृश्य फार विलोभनीय वाटतं. “असं नसतं हो आबा, तुम्हाला नाही माहीत…” म्हणत दिशा त्यांच्याशी वाद घालते; आणि “तुला काय कळतं ग, मी कॉलेजमध्ये इतक्या विद्यार्थ्यांना शिकवलेलं आहे…” म्हणत बाबा तिला समजावत राहतात; तेव्हा हा ‘संवाद’ ऐकणं खूप आनंदाचं असतं.

मी दहावी पास होऊन कॉलेजमध्ये जाणार म्हटल्यावर बाबा परस्पर माझ्यासाठी तीन नवे ड्रेस घेऊन आले होते आणि ते माझ्या हाती देत आनंदानं म्हणाले होते की, “आपल्या घराण्यातली पहिली मुलगी ग्रॅज्युएट होणार आहे.”

मी पोस्ट ग्रॅज्युएशनही पूर्ण केलं; प्राध्यापक झाले; सामाजिक कार्यकर्ती बनले आणि मग लेखिका म्हणून स्थिरावले. बाबांसारखेच खूप चढ-उतार आयुष्यात अनुभवले आणि त्यांच्याइतकीच खंबीर राहिले. आम्ही दोघेही सिंह राशीचे आहोत, यावरून आमच्या घरात भरपूर विनोद होत असतात; आता माझी मुलगीही सिंह राशीची असल्यानं घरात तीन सिंह आहेत असं आम्ही गमतीनं म्हणतो. आमचा दोघांचाही स्वभाव डॉमिनेटिंग, महत्त्वाकांक्षी, जिद्दी, हट्टी; आणि ‘मी म्हणेन ती पूर्व’ अशी आमची ठाम वृत्ती. याचे फायदे आणि तोटेही व्यक्तिगत आणि सार्वजनिक जीवनात आम्ही अनुभवले आहेत. तरीही शिस्त, अभ्यासातून मांडलेले ठाम विचार, चालताना थांबून मागे वळून बघून मग पुढचा अंदाज घेऊन वाटचाल सुरू ठेवण्याची ‘सिंहावलोकना’ची सवय, उपाशी राहू पण गवत खाणार नाही, अशी आढ्यता या समान गुणदोषांसह आम्ही समांतर वाटचाल करत इथवर आलो आहोत. बाबा नाबाद पंचाहत्तर होतील आणि पाठोपाठ मी पन्नाशीत येईन.

“पोकळ कातड्यांना घाबरायचं नाही; मग ती वाघासारख्या हिंस्त्र श्वापदाची असोत वा गैर वर्तन करणाऱ्या माणसांची…” – हे पुढच्या पिढ्यांना सांगण्याइतकी आज मी विचारांनी आणि कृतीनेही निर्भीड बनले आहे. बाबांकडून घेतलेल्या या निर्भीडतेसोबत माझ्यात आईच्या कलादृष्टीचा व संवेदनशीलतेचाही अंश आहे. आईशिवाय फक्त वडिलांचा सुटा विचार करणं कोणत्याच मुलांना शक्य होत नसतं. त्यामुळे बाबांविषयी लिहिताना तिचीही आठवण अस्तरासारखी असणं स्वाभाविक वाटलं.

बाबांचा शंभरावा वाढदिवस आम्हांला साजरा करता यावा इतकं उदंड आणि आरोग्यपूर्ण आयुष्य, त्यांना लाभो; त्यांचे आशीर्वाद त्यांच्या पतवंडांनाही मिळोत; अशी सद्भावना या निमित्तानं व्यक्त करते.

.............................................................................................................................................

कविता महाजन यांच्या पुस्तकांच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/client/search/?

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा