जे घडतेय त्याची गती लेखनाला नाही आणि लेखनात जे घडतेय त्याची गती समीक्षेला व अभ्यासाला नाही!
पडघम - साहित्यिक
कविता महाजन
  • प्रातिनिधिक चित्र
  • Fri , 27 September 2019
  • पडघम साहित्यिक कविता महाजन Kavita Mahajan भारतीय लेखिका Bhartiya Lekhika स्त्रीवाद Feminism स्त्रीवादी साहित्य Feminist literature

प्रसिद्ध कवयित्री, कादंबरीकार, चित्रकार आणि बालसाहित्यिका कविता महाजन यांचा आज पहिला स्मृतिदिन. त्यानिमित्ताने ‘अक्षरनामा’ प्रकाशित करत असलेल्या विशेषांकातील हा एक पुनर्मुद्रित लेख...

.............................................................................................................................................

१.

धुळ्यामधील महिला महाविद्यालयातर्फे होत असलेल्या ‘स्त्रीवादी साहित्या’विषयीच्या या परिसंवादासाठी मला एक लेखिका म्हणून आमंत्रण दिले, त्याबद्दल मी आयोजकांची आभारी आहे. मी समीक्षक नाही आणि मराठीतील काही समीक्षकांच्या मते माझे लेखन कधीच ‘स्त्रीवादा’ला ओलांडून पुढे गेलेले आहे; तरीही स्त्रीवाद हा एक अभ्यासाचा दृष्टिकोनही आहे, या जाणीवेतून मी आजचे बीजभाषण करणार आहे. यात समीक्षकी पारिभाषिकतेची बहुधा उणीव असेल.

स्त्रीवाद म्हणजे काय इत्यादी परिभाषेत मी जात नाही. गेली बरीच वर्षं ही सर्व मांडणी तज्ज्ञांनी करून झालेली आहे. १९७०पासून स्त्रीवादी वाचन, स्त्रीवादी समीक्षा आणि स्त्रीअभ्यास विद्यापीठांमधून सुरू झाला. हे शब्द नसले तरीही स्त्रीवादी वाचनासारख्या गोष्टी त्याआधीच पार १७व्या शतकापासून जगात सुरू झालेल्या दिसतात. आपल्याकडे ताराबाई शिंदेंनी ‘स्त्रीपुरुषतुलना’त असे वाचन केलेले दिसते. दुर्दैव हे आहे की, हा अभ्यास, वाचन न करता अनेकदा ढोबळमानाने ‘स्त्रीवाद म्हणजे स्त्रीमुक्तीसारखेच काहीतरी’ असे मानण्याची अनेक तथाकथित अभ्यासकांची वृत्ती दिसते. स्त्री म्हणजे नेमके काय याचा अंदाज नसला तरी ‘स्त्री’ हा शब्द परिचित आहे आणि ‘वाद’ हा शब्दही परिचित आहे. त्यामुळे ‘स्त्रीवाद म्हणजे स्त्रीविषयक जे काही असेल ते’, असाही एक ढोबळ समज आढळून येतो. स्त्री हा काही स्त्रीवादाचा एकमेव विषय नाही, हे असे उथळ विचार करताना ध्यानात घेतले जात नाही.

या पार्श्वभूमीवर आजचा हा परिसंवाद मला महत्त्वाचा वाटतो. तरीही सुरुवात करताना काही नेमके सांगितलेले बरे म्हणून पुष्पा भावे यांचे म्हणणे नोंदवते. पुष्पाबाईंच्या मते ‘स्त्रीवाद ही एक नवी परिदृष्टी आहे. स्त्रियांच्या ऐतिहासिक दमनाचा इतिहास स्त्रीवादी शोधत असले तरीही केवळ स्त्री हा वादाचा विषय नाही. लिंगभेदावर अधिष्ठित विषमतेमुळे ढळलेला समाजाचा तोल सावरतानाच जग बदलण्याची प्रतिज्ञा करणारा हा वाद आहे.’

त्यामुळे साहित्याकडे पाहताना स्त्रियांनी केलेले लेखन म्हणजे स्त्रीवादी साहित्य किंवा अजून बारकाईने सांगायचे तर स्त्रियांनी केलेले केवळ स्त्रीप्रश्नांवरचे लेखन म्हणजे स्त्रीवादी साहित्य, अशी जी ढोबळ समजूत सरसकट दिसते, ती अपुऱ्या माहितीच्या आणि अनाभ्यासाच्या आधारावर बनलेली आहे, असे म्हणता येईल. स्त्री-अभ्यास हा स्त्रीवादातील केवळ एक भाग आहे, तो संपूर्ण स्त्रीवाद नव्हे. विद्युत भागवत यांच्या मते, ‘स्त्री अभ्यास ही एक नव्याने घडत असलेली, आंतरशाखीय स्वरूपाचा आशय विकसित करू पाहणारी अशी ज्ञानशाखा आहे. स्त्री अभ्यास हे आंतरविद्याशाखीय विद्यापीठीय क्षेत्र आहे, ज्यात स्त्रीवादी दृष्टिकोनातून समाजाचा राजकीय, आर्थिक, सामाजिक इतिहासाचा बहुसांस्कृतिक अभ्यास केला जातो; आणि ज्यात लिंगभाव, वर्ण, वर्ग, जात, लैंगिकता आणि इतर सामाजिक विषमतांची स्त्रीवादी चिकित्सा केली जाते.’

अनेकविध अभ्यासविषयांमध्ये सहभाग नोंदवत असताना स्त्रीवादाने साहित्याकडे वळणे, हे स्वाभाविक होतेच; कारण आहे तेच जग एका नव्या दृष्टीने, स्त्रीच्या दृष्टीने वाचून पाहायचे, तर त्यासाठी साहित्य ही एक महत्त्वाची शाखा आहे. स्त्रीत्व ही पुरुषत्वाप्रमाणेच एक जैविक गोष्ट असली, तरी समाजाच्या चौकटीत तिला बसवताना तिचा पुरुषांहून वेगळा विचार केला गेला आणि सांस्कृतिक इतिहास पाहता हे ध्यानात येते की, त्यासाठी मिथकांचा आणि साहित्याचा वापर पुरेपूर केला गेला. म्हणून या सर्वच साहित्याची समीक्षा नव्या दृष्टीने करणे स्त्री व पुरुष अभ्यासकांसाठी गरजेचे बनले. म्हणून केवळ स्त्रियांचेच नव्हे, तर पुरुषांचेही लेखन या दृष्टीने अभ्यासून पाहता येऊ शकते, हे प्रथम ध्यानात घेतले पाहिजे.

स्त्री-पुरुषांचे हे सर्वच लेखन पडताळून पाहण्यासाठी जे मापदंड वापरले गेले, ते पुरुषी होते आणि त्यामुळे एकांगी व मर्यादितही होते. स्त्रियांच्या दृष्टीने पाहणे म्हणजे पुरुषांची दृष्टी पूर्णपणे बाद ठरवणे किंवा त्यांनी जे मांडले आहे, त्याला सरसकट विरोध करणे असे नव्हे, तर त्या सगळ्या प्रवाहात अजून एक मोठा व मुख्य प्रवाह मिसळणे होय. हा प्रवाह मिसळल्यानंतर आपसूकच आधीच्या काही गोष्टी बाद होतील, काहींचा पुनर्विचार करावा लागेल, हे गृहीत होते. त्यामुळे स्त्रीवादाची मांडणी करणाऱ्यांनी सुरुवातीला विविध पद्धती वापरल्या. कुणी आहेत त्या ज्ञानशाखांचा आपल्या दृष्टिकोनातून अभ्यास केला, कुणी आपल्या पद्धतीने अनेक गोष्टींचे अन्वय लावले, कुणी आधीच्या चौकटींची मोडतोड केली, कुणी प्रस्थापित परिभाषा नाकारून आपल्या भाषेत मांडणी केली.  

समता आणि समानता या दोन्ही गोष्टी निराळ्या आहेत. सम असणे निराळे आणि समान मानणे निराळे. वेगळेपणा आणि विषमता हे दोन शब्द पाहिले की, ते नीट ध्यानात येते. पारंपरिक पितृसत्ताक विचारधारेत विषमता दिसते, वेगळेपणा नव्हे. त्यात स्त्री आणि पुरुष दोहोंकडे त्यांना वेगळे करून नव्हे, तर त्यांचे विभाजन करून पाहिले जाते आणि त्यातून स्त्रीला पुरुषापेक्षा कमी लेखून तिचे दमन व शोषण करणे सुरू होते.

समाजात प्रत्यक्ष आणि मनात काल्पनिकरीत्या जे काही घडते आणि प्रत्यक्षात घडावे असे वाटते, ते साहित्यात उमटते. त्यामुळे स्त्रीची विशिष्ट प्रतिमा, स्त्रीच्या व्यक्तिगत व सामाजिक आचारविचारांचे नियम, चांगली स्त्री व वाईट स्त्री याबाबतच्या कल्पना हे सगळे जे समाजात होते आणि पुरुषांच्या मनात होते, त्याचे प्रतिबिंब साहित्यात, अर्थातच समीक्षेत व अभ्यासातही उमटत गेले.

स्त्रियांचे लेखनच मुळात पुरुषांनंतर बरेच उशिरा व कधी पुरुषांच्या प्रोत्साहनाने, तर कधी विद्रोहातून सुरू झाले. दरम्यानच्या काळात त्यांचे साहित्य हे मौखिक रूपात होतेच. तिथे त्यांचे स्वत:चे रूपबंध होते, स्वत:ची भाषा होती, स्वत:चे विषय होते आणि स्वत:चे प्रतिमाविश्व होते. पण त्यांच्या मनात काही संभ्रम होते व आजही आहेत... की, हे असे लिहायचे असते की नाही? हे लिहावे की लिहू नये? असेच लिहावे की लिहू नये? त्यामुळे सुरुवातीच्या काळात बहुतेक स्त्री लेखकांनी पुरुष लेखकांचेच रूपबंध, विषय, भाषा आणि प्रतिमा वापरून लेखन केले. प्रोत्साहनाची भूमिका असणाऱ्यांकडून त्या लेखनाचे कौतुक झाले आणि बाकीच्यांनी त्याची टिंगलटवाळी केली. हे आजदेखील होते आहेच.

या लेखनाची जी समीक्षा झाली, याचे जे वाचन झाले, तेही पुरुषांच्या पारंपरिक दृष्टीतूनच झाले. त्यामुळे त्या चष्म्यातून या लेखनाच्या मर्यादा वारंवार अधोरेखित केल्या गेल्या. उंबरठ्यातले जग नोंदवणाऱ्या स्त्रिया आणि उंबरठ्यातले जग हे अर्थातच मर्यादित व संकुचित असते असा विचार, त्यामागे होता. (जे जग मर्यादित व संकुचित कधीच नव्हते व नसते, पण ते मानणे ही पुरुषसत्ताक विचारधारेची देन.) याच सोबतीने पुरुष लेखकांचे लेखनही याच मापदंडांनी मोजले गेले. त्यासाठीदेखील वेगळे चष्मे वापरले गेले नाहीत. स्त्रीवादाने या पारंपरिक समीक्षेच्या निकषांना आव्हान दिले. अनुल्लेखाने मारले गेलेले स्त्रियांचे लेखन व अनुल्लेखाने बाजूला फेकल्या गेलेल्या लेखिका यांना समोर आणण्याचे प्रयत्न सुरू केले. त्यांच्या लेखनाचा ऐतिहासिक पद्धतीने अभ्यास सुरू झाला. आणि या स्त्रीवादी परंपरेची मांडणीही करून पाहण्यास सुरुवात झाली.

या सगळ्याचा आपल्या देशाच्या संदर्भात विचार करायचा, तर देशातील जाती, धर्म, प्रांत, भाषा इत्यादींच्या विविधतेचा विचार आधी करावा लागतो. देशाबाहेरही हळूहळू का होईना, पण ऐतिहासिकता, वर्ग, वंश, कातडीचा वर्ण इत्यादी अनेक विविधतांचा विचार स्त्रीवादाने केला.  Elaine Showalter  यांच्या  A literature of their own या पुस्तकात स्त्रियांच्या लेखनाच्या तीन अवस्था नोंदवण्यात आल्या होत्या : एक- स्त्रीत्व (१८४०-८०), दोन- स्त्रीवादी (१८८१-१९२०) आणि स्त्रीविशिष्ट (१९२१पासून पुढचे). या सगळ्या मांडणीत साहित्याचा पारंपरिक प्रवाह तो मुख्य व स्त्रियांच्या लेखनाचा प्रवाह हा उपप्रवाह असे मानले गेल्याने पुन्हा काही पेच उदभवले होतेच. सीमॉन द बोवाचे विचारदेखील पुढे काही स्त्रीवादी गटांनी नाकारले. पुरुषांप्रमाणेच गोऱ्या युरोपीयन स्त्रियांनीही प्रभुत्व गाजवले आणि मर्यादित व्याख्या निर्माण केल्या, असे म्हटले गेले. हा सगळाच विचारांचा प्रवास अभ्यासकांना ज्ञात आहेच. या सगळ्यातून आता आज आपल्याला पुढचा विचार करायचा आहे की, स्त्रीवादी साहित्याच्या पुढील दिशा कोणत्या असणार आहेत आणि त्यासमोरील आव्हाने कोणती असणार आहेत.

२.

‘स्त्रीवाद’ हा दृष्टिकोन आहे, अभ्यासपद्धती आहे; कोणत्याही साहित्याला ते एक सोपे लेबल लावून मोकळे होणे मला स्वत:ला एक लेखिका म्हणून आणि एक वाचक म्हणूनही चुकीचे वाटते. ज्या स्त्रियांनी आधी स्त्रीवादी भूमिका घेऊन लेखन केले, त्या लेखनाला अर्थातच मर्यादा आल्या आणि त्यात काही त्रुटीही स्पष्टपणे जाणवू लागल्या, ज्या कोणत्याही वैचारिक भूमिका आधी निश्चित करून मग त्या चौकटीत स्वत:ला कोंबून केलेल्या साहित्यात जाणवतात. असे आधी स्वत:ला स्त्रीवादी म्हणवून मग लेखन करणाऱ्या लेखिका मराठीत मोजक्याच दिसतात आणि त्याच्या लेखनाला निश्चितच मर्यादा असल्याचे जाणवते. फक्त त्यांचाच विचार मी इथे करणार नाही. स्त्रीवादी दृष्टिकोनातून ज्या साहित्याकडे पाहिले जाते आहे आणि ज्या साहित्याचा अभ्यास केला जातो आहे, त्या समग्र साहित्याबद्दल मी बोलते आहे, त्यात या मोजक्या लेखिकाही येतीलच. खेरीज स्त्रीवादी दृष्टिकोनातून ज्या साहित्याकडे पाहिले जावे आणि ज्या साहित्याचा अभ्यास केला जावा, असे मला वाटते, त्याबद्दलही मी बोलणार आहे. वर उल्लेख केल्याप्रमाणे जर १९२० सालीच पाश्चात्य जगतात ‘स्त्रीवादाची अवस्था’ ओलांडली जाऊन त्यानंतर ‘स्त्रीविशिष्ट अवस्था’ आल्याचे मांडले गेले आहे, तर आपल्याकडे याबाबत नेमकी काय स्थिती आहे, तेही या निमित्ताने तपासून पाहिले पाहिजे.

‘स्त्रीमुक्ती’ हा शब्द ७०च्या दशकात आपल्याकडे आला आणि कालांतराने तो ओलांडून ‘स्त्रीवाद’ हा शब्द रुळला; तथापि तो ओलांडून आपण अद्याप ‘स्त्रीविशिष्ट’ या शब्दापर्यंतचा प्रवास नीटपणे सुरू केलेला नाही. म्हणजे प्रत्यक्षात तो सुरू झालेला असला, तरी अभ्यासात आणि समीक्षेत अद्याप त्याचा विचार केलेला नाही.

१९७५पासून पुरुषसत्तेविरोधात लढण्यापासून या परिभाषेतल्या विचारांची सुरुवात झाली; त्याही आधी लढा होता, प्रश्नांची जाणीव होती व प्रश्नांच्या सोडवणुकीचे प्रयत्नही सुरू होते; मात्र त्याला निश्चित चौकट या काळात मिळाली. मात्र पुरुषसत्तेला विरोध म्हणजे पुरुषांनाच विरोध, स्त्रीमुक्ती म्हणजे स्वैराचार असा अपप्रचार झाला. या चळवळींचे फायदे-तोटे साधारणपणे नव्वदोत्तर काळात दिसू लागले. वैचारिक बदलाचा प्रवास सुरू होताच. समानतेच्या मुद्द्यावर लक्ष केंद्रित केले जाऊन पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करण्याचा व स्त्री ही पुरुषाहून कुठल्याही बाबतीत कमी नाही, हे अट्टहासाने दर्शवण्याचा प्रयत्न सुरू झाला. त्यातून ‘सुपर वुमन’ची आचरट कल्पना समोर आली आणि स्त्रिया या कल्पनेच्या बळी ठरू लागल्या. पुरुषी अनुकरण वरवरच्या गोष्टींमध्ये सुरू झाले. उदाहरणार्थ- वेषभूषा, केशभूषा, व्यसने इत्यादी. हे अर्थात विशिष्ट आर्थिक, शैक्षणिक, जातीय स्तरांमध्येच होते.

त्यानंतर ‘युनिसेक्स’ हा शब्द पुढे आला. त्याने हळूहळू स्त्रीविशिष्टता समोर आणण्यास सुरुवात केली. आपली तुलना सातत्याने पुरुषांशी करून बघण्याची आणि आपण त्यांच्याहून कमी नाही आहोत किंवा बरोबरीच्या आहोत किंवा काही बाबतीत वरचढ आहोत, असे दर्शवण्याची गरज नाही, हे स्त्रियांच्या ध्यानात येऊ लागले. पुरुष म्हणून पुरुषांची जशी काही वैशिष्ट्ये असतात, तशीच स्वतंत्रपणे स्त्री म्हणून आपलीही काही खास वैशिष्ट्ये आहेत. ती जपली, जोपासली व वाढवली पाहिजेत, हे त्यांना जाणवू लागले. पण या स्तरातल्या स्त्रिया चळवळींकडे, लेखनाकडे, कलांकडे क्वचितच वळल्या. त्यामुळे त्यांचे असे खास अनुभव व विचार इतर स्तरांवर जगण्याची धडपड करणाऱ्या स्त्रियांच्या अनेक वर्तुळांपर्यंत पोहोचलेच नाहीत. आजही अनेक क्षेत्रांमध्ये धडाडीने कार्यरत असणाऱ्या स्त्रियांचे वाईट आणि चांगलेही अनुभव शब्दबद्ध झालेले आपल्याला दिसत नाहीत. बँकिंग, आर्किटेक्चर, इंजीनिअरिंग, राजकारण, विविध उद्योग-व्यवसाय, पत्रकारिता, शेती अशी असंख्य क्षेत्रे स्त्रियांनी व्यापली असूनही त्याबाबत क्वचितच काही लिहिले गेलेले दिसते.

मुळात लिहिणाऱ्या स्त्रियांची संख्या लिहिणाऱ्या पुरुषांच्या संख्येच्या तुलनेत आजही कमी आहे. महानगरी व दलित साहित्यात ती थोडीशी दिसते, पण ग्रामीण आणि आदिवासी साहित्यात नसल्यातच जमा आहे. त्यात आता चळवळी क्षीण होणे आणि आयुष्य बाजारपेठेने व्यापून टाकणे, यामुळे एकूणच जगण्यात प्रचंड बदल होताहेत. बदल तर आधीही होतच होते, पण आता होणाऱ्या बदलांचा वेग अफाट आहे. जुने प्रश्न अद्याप सुटलेले नाहीत आणि नवीन प्रश्न वेगाने येऊन दाखल होताहेत अशी अवस्था आहे.    

दोन वर्षांपूर्वी हैदराबाद इथे झालेल्या स्त्रीवादी चळवळीच्या कार्यकर्त्यांच्या शिबिरात जी चर्चा झाली, त्यातील काही मुद्दे छाया दातार यांनी नोंदवले आहेत, ते असे :

१) स्त्रीचळवळ म्हणजे नेमकी कोणाची आणि कशासाठीची चळवळ आहे? एवढेच नव्हे तर स्त्रीचळवळ ही एकच आहे की तिची विविध रूपे आहेत? स्त्रियांचे सगळे झगडे, उठाव यांना स्त्रीचळवळ म्हणता येते का? कोणत्या मुद्द्यांवरील चळवळीला स्त्रीचळवळ म्हणता येईल? जमिनीचे प्रश्न, विस्थापितांचे प्रश्न, नैसर्गिक साधनांची हानी, अणुभट्ट्यांतून मिळणारी वीज हे सगळे प्रश्न स्त्रियांचे आहेत का? तसेच स्त्रियांच्या अस्मितेचा प्रश्न, राष्ट्रवाद आणि दुय्यम नागरिकत्वाची मिळणारी वागणूक या प्रश्नांची चिकित्सा कोणी करायची?

२) आजपर्यंत कोणत्या स्त्रियांसाठी लढे दिले गेले? आपल्या कल्पनेत नेमकी कोणती स्त्री होती? कोणत्या स्त्रिया त्या लढ्यांच्या अग्रभागी होत्या? कोण परिघाबाहेर होत्या? कोण मागे पडल्या? त्यांना बहीणभावाची वागणूक मिळाली नाही म्हणून त्या मागे पडल्या का? की त्यांना दुसरी कोणती तरी ‘अस्मिता’ खुणावत होती म्हणून त्या जवळ आल्या नाहीत? उदाहरणार्थ कौंटुबिक हिंसा या प्रश्नाला जास्त महत्त्व दिले गेले आणि त्यामुळे जातीयवादाच्या हिंसेला कमी लेखले गेले का? वेगवेगळ्या स्थानांवर असलेल्या स्त्रियांनी हे प्रश्न उपस्थित केले आहेत आणि म्हणून आता प्रत्यक्ष जगलेल्या अनुभवावर आधारित वास्तवाची अधिक सखोल चिकित्सा करून आपल्याला अधिक घट्ट व शाश्वत एकजूट करणे शक्य आहे. आपल्यापुढे हे आव्हान आहे.

३) जात आणि स्त्रीवाद यांचे नेमके नाते काय आहे? अशी टीका ऐकू येते की, आतापर्यंत जातीय विषमतेचे मुद्दे पुरेशा प्रमाणात घेतले गेलेले नाहीत.

४) गेल्या काही वर्षांमध्ये बाजारपेठ आणि त्यासाठी केल्या जाणाऱ्या उत्पादनपद्धती यामध्ये खूप बदल झाला आहे. स्त्रियांच्या कोणत्या चळवळीने स्त्रीकामगारांच्या प्रश्नांविषयी काम केले आहे? यामध्ये सर्व प्रकारचे मुद्दे अभिप्रेत आहेत : उत्पादनाच्या साधनांवर नियंत्रण मिळवणे, उपजीविकेचे हक्क मिळवणे, अन्नधान्य सुरक्षा, कामगारविषयक हक्क... नव्या प्रकारची श्रमव्यवस्था तयार होत आहे आणि त्यामध्ये वेगळ्या तऱ्हेने अ‍ॅप्रोच घेण्याची आवश्यकता आहे याचे भान राखले गेले आहे का? आपण अशा एखाद्या चौकटीचा विचार केला आहे का की, ज्यामध्ये घरगुती श्रम, पुनरुत्पादनाचे श्रम आणि लैंगिक श्रम या तिन्हीचा एकत्रित विचार होऊ शकतो? एखादा सामाजिकदृष्ट्या कलंकित पण आर्थिकदृष्ट्या फायदेशीर असा व्यवसाय जर त्यातल्या त्यात बरी निवड म्हणून कोणी स्वीकारत असेल तर आपण ते श्रम कसे समजू शकतो?

५) स्त्री ही संकल्पना समजून घेताना ‘शरीर’ या भौतिक वास्तवाला भिडण्याचा प्रयत्न स्त्रीवादाने नेहमीच केला आहे. आपण ज्या अनुभवातून जगतो ते शरीर, सामाजिक नजरेतून समजून येणारे शरीर, जीवशास्त्रीयदृष्ट्या आणि वैद्यकशास्त्र सांगते ते शरीर आणि प्रत्येक व्यक्ती स्वत:च्या शरीराची मनात एक प्रतिमा उभी करते ते शरीर, अशी विविध रूपे आज आपल्यासमोर उभी आहेत आणि त्यांचा एकमेकांशी एक प्रकारचा झगडा चालू असतो. एकाच व्यक्तीमध्येसुद्धा ही अनेक रूपे एकाच वेळी वसत असतात. म्हणूनच आजच्या स्त्रीवादाने हे सत्य समजावून घेऊन या विषयाबद्दल विचार करणे आणि विश्लेषण करणे आवश्यक आहे. या विषयांतर्गत शरीराची रचना, लैंगिकता, प्रतिष्ठा, पोलिसिंग (सततचा पहारा), सेन्सॉरशिप, मीडियामध्ये घडवल्या जाणाऱ्या प्रातिनिधिक प्रतिमा, हिंसा, शारीरिक छळ आणि अपंगत्व असे सर्व मुद्दे येणार आहेत. एवढेच नव्हे तर जैवशास्त्रीय की तंत्रज्ञान यावर आधारित व्यक्तीची ओळख आवश्यक, याही मुद्द्याची चर्चा व्हावी हा उद्देश आहे. याच्या जोडीला सकारात्मक गोष्टींची चर्चाही होऊ शकते. प्रेम, रोमान्स, सौंदर्य, आभूषणांची आवश्यकता, प्रतिरोध, संघर्ष, संवादातून प्रश्न सोडवणे वगैरे.

६) स्त्रीचळवळीची शासनसंस्थेशी कशा प्रकारचे नाते राहिले आहे? विशेषत: या नव्या उदारीकरणाच्या नव्या जमान्यात, जेव्हा कल्याणकारी भूमिका सोडून शासनसंस्थेने सुरक्षेच्या कारणांखाली पहारेदार, पोलीस हे रूप धारण केले आहे आणि नागरिकांच्या मूलभूत अधिकारांवर आक्रमण सुरू केले आहे. चळवळीची भूमिका सहकार्याची राहिली आहे की, संघर्षाची राहिली आहे? आपण जेव्हा सर्व व्यवस्था बदलली पाहिजे असे म्हणतो, तेव्हा आपल्या डोळ्यांसमोर नव्या समाजासंबंधी नेमके कोणते दर्शन आहे, हेही निश्चित करणे आवश्यक आहे.

७) आजकाल ‘पुरुषसत्ता’ हा शब्द टाळण्याकडे प्रवृती दिसते. जणू काही उत्तरस्त्रीवादी पर्व आले आहे, असे पुष्कळदा प्रतीत केले जाते. हे योग्य आहे का? कोणत्या पद्धतीने आज स्त्रिया संघटित होत आहेत? नव्या पद्धती वापरल्या जात आहेत का? वेगवेगळ्या छोट्या-मोठ्या संघटनांचे मिळून काही नेटवर्क आहे का? आपण व्यक्तीवादी पद्धतीने आपापल्या संघटना किंवा गट चालवतो की, सामुदायिक म्हणून काम करतो, ज्यामध्ये कोणतीही उतरंडीची रचना नाही? मुद्दाम जरा विस्तृत पद्धतीने प्रश्नांची ही मांडणी केली आहे, ज्यामुळे स्त्रीवादाच्या कक्षा किती रुंदावल्या आहेत, याची जाणीव व्हावी.

छाया दातार यांनी नोंदवलेले हे मुद्दे इथे सविस्तर देण्याचे कारण हेच की, त्यातून स्त्रीवादाची आजची अवस्था आपल्याला स्पष्ट समजून येते आणि चळवळ व विचार कोणत्या दिशेने चालले आहेत, याचे आकलन होते.

देशातील परिस्थिती पाहता एकाच रस्त्यावर जिथे मर्सिडिज व बैलगाडी चालताना दिसतात, असा आपला देश आहे. त्यामुळे इथे स्त्री म्हटल्यानंतर ती एकाच स्तरात दिसेल अशी अपेक्षाच करणे चुकीचे आहे. आदिवासी स्त्रिया, भटक्या-विमुक्त जातींमधील स्त्रिया, इतर जातीजमातींच्या स्त्रिया, विविध धर्मांच्या स्त्रिया, विविध व्यवसायांमधल्या आणि नोकरदार स्त्रिया, थेट अर्थार्जन न करणाऱ्या गृहिणी... इत्यादी अनेक गटांमध्ये विभागून असलेल्या स्त्रियांकडे पाहावे लागते. गेल्या काही शतकांमधल्या साहित्याचा अभ्यास करायचा म्हटला तर त्यात ठरावीक जातींच्या व ठरावीक आर्थिक स्थितीतल्या स्त्रियांचेच उल्लेख आढळतात, इतरांचे नाही. स्त्रियांच्या स्थितीबाबत आणि स्त्रीप्रश्नांबाबत जो काही विचार झालेला आहे, तोही असाच ठरावीक जातींच्या व ठरावीक आर्थिक स्थितीतल्या स्त्रियांचाच झालेला दिसतो आहे. त्यामुळे जर जातनिहाय व धर्मनिहाय अभ्यास झाला, तर आजवरच्या अभ्यासकांनी नोंदवलेल्या अनेक मतांचा पुनर्विचार करावा लागेल, असे जाणवते आहे.

मुळात दोन-चार तज्ज्ञ व्यक्तींची, अभ्यासकांची नावे वगळता विद्यापीठीय पातळीवर जे शोधनिबंध, प्रबंध व त्या प्रबंधांवर आधारित पुस्तके गेल्या काही वर्षांमध्ये लिहिली गेली आहेत, त्यांचा दर्जा अत्यंत सुमार आहे. लेखनाची शिस्त नाही, स्वतंत्र विचार नाही, दहा जागांहून मजकूर कॉपी-पेस्ट करून अकरावे काहीतरी सिद्ध करणे आणि त्यातून केवळ आपला बायोडेटा अपग्रेड करणे, अशा मर्यादित हेतूंनी केली गेलेली कामे पाहून खेद वाटावा अशी परिस्थिती आहे. ज्या फुले, आंबेडकर, आगरकर इत्यादींची नावे आपण घेतो, त्यांचे स्त्रीविषयक विचार कोणते आहेत, हे तरी या अध्यापक-प्राध्यापक मंडळींनी त्यांचे मूळ लेखन वाचून समजून घेतले आहे काय? — असे प्रश्न त्यांनी स्वत:ला विचारून पाहिले पाहिजेत. ठरावीक उदधृतेच हे लोक पुन:पुन्हा वापरतात. त्यावरून हे सहज ध्यानात येते की, ती उदधृते त्यांनी कुठल्या तरी सहज उपलब्ध झालेल्या पुस्तकांमधून, शोधनिबंधांमधून किंवा इंटरनेटवर गुगलून उचललेली आहेत. विषयांच्या निवडींपासूनच अनेक जण कल्पना दारिद्र्याच्या रेषेखाली पार तळाशी आहेत, हे ध्यानात येऊ लागते.

आजच्या या चर्चासत्रातून निदान अशा काही अभ्यासविषयांची एखादी यादी तयार केली जावी, अशी अपेक्षा मी व्यक्त करते. अभ्यासकांसाठी हे एक प्राथमिक आव्हान आहे, असे समजण्यास हरकत नाही. आपल्याला असलेल्या मेंदूचा वापर न करणे वा त्याला शॉर्टकटचे वळण लावणे, हा माणूस म्हणून केलेला गुन्हाच आहे आणि शिक्षकी पेशात असलेल्या माणसांसाठी तर या गुन्ह्याची तीव्रता अधिकच जाणवते.

दुसरे आव्हान मला जाणवते ते अभ्यासविषयांच्या निवडींचे. साहित्याच्या इतिहासात अनुल्लेखाने मारलेल्या लेखिकांचा शोध घेणे; ज्यांच्या साहित्याचे कुठेतरी तळटीपांमध्ये वा चुकार उल्लेख आलेले आहेत, त्या साहित्यकृतींचा शोध घेऊन अभ्यास करणे आज गरजेचे आहे. तिसरा मुद्दा म्हणजे सर्वच लेखिका स्त्रीवादी आहेत, असे समजून त्यांना स्त्रीवादाच्या चौकटीत कोंबण्याचा अट्टहास न करणे. स्त्री म्हणून जन्म झालेला असला, तर स्त्रीवाद हा विचारांमधून पुढे स्वीकारला वा नाकारला जातो. तो जैविक नसतो. स्त्रीच्या दृष्टीने अभ्यास करणे, वाचणे, पाहणे स्त्रीवादात अपेक्षित असले, तरी साहित्य म्हणून त्याला निराळे निकष लावून तपासलेच पाहिजे. केवळ स्त्रीवादी आहे म्हणून एखादे लेखन चांगले वा वाईट ठरवता येणार नाही. आत्मभान आणि विश्वभान यांची सांगड त्यात कशी घातली गेली आहे, हे पाहणे महत्त्वाचे असते.

चौथा मुद्दा असा की, केवळ स्त्रियांचेच लेखन स्त्रीवादी दृष्टिकोनातून अभ्यासले जाते आहे, तेही बदलले पाहिजे. पुरुषांचे लेखनही स्त्रीकेंद्री आणि स्त्रीवादी असू शकते. उदाहरणार्थ पूर्णचंद्र तेजस्वी या कन्नड लेखकाच्या कथा वाचताना मला ध्यानात आले की, इतके स्त्रीवादी लेखन तर भारतीय लेखिकांनीही क्वचितच केले आहे. खेरीज पुरुषांचे लेखन हे स्त्रीकेंद्री वा स्त्रीवादी नसले, तरी त्यातून जे स्त्रियांचे चित्रण केले जाते व स्त्रीविषयक जो विचार व ज्या भावना दिसतात, तोही एक स्त्रीवादी अभ्यासाचा विषय असू शकतो.

स्त्री लेखकांच्या भाषेचा अभ्यासही कैक वर्षांमध्ये नीटपणे व स्वतंत्ररीत्या झालेला दिसत नाही. साधे लिहिताना ‘काळी कपिला’ किंवा ‘पिवळे पितांबर’ अशी पुनरुक्ती केल्याप्रमाणे आपण ‘स्त्री-लेखिका’ हा शब्द सरसकट डोळे-कान झाकून वाचतो-लिहितो-ऐकतो-बोलतो, तर मग भाषेचा विचार करण्याच्या आपल्या क्षमता इथपासूनच विकसित करण्याची वेळ आहे, असे म्हणावे लागेल. हा पाचवा मुद्दा.

सहावा मुद्दा स्त्री-लेखनातील तुटी व उणिवा दाखवून देण्याचा आणि प्रस्थापित लेखिकांकडून कोणत्या दिशेचे लेखन अपेक्षित आहे, याबाबत वैचारिक मांडणी करण्याचा. उदाहरणार्थ जळगाव येथे झालेल्या कवयित्री संमेलनाच्या अध्यक्षीय भाषणात पुष्पा भावे यांनी मराठीतील स्त्री-कवितेबाबत काही प्रश्न उपस्थित केले होते. समकालीन मराठी कवितेतील संदर्भसंपन्नता स्त्रियांच्या कवितेत काही मिथकांचा अपवाद वजा करता कमी का दिसते? त्यांच्या कवितेतून नवी मिथके निर्माण होत आहेत का? आपल्या अनुभवासाठी आविष्काराची नवी रूपे त्यांना सापडतात का? काव्यभाषेचे संकेत आणि स्त्रीभाषेचे संकेत यांना ओलांडत आपल्या अनुभवाच्या तीव्रतेला - वेगळेपणाला झेलेल असा अर्थगौरव गेल्या पन्नास वर्षांत निर्माण झाला का? — असे त्यातले काही प्रश्न आहेत. किंवा साहित्याच्या बाजारपेठेत प्रचलित असणाऱ्या लोकप्रिय रूपांचाच पाठपुरावा काही लेखिका करत आहेत, असा एक उचित आरोपही त्यांनी केला आहे. अशा दिशांनी स्त्रीसाहित्याची काटेकोर व कठोर समीक्षा होणे आज अत्यावश्यक आहे.

आव्हानांबाबत बोलून झाल्यानंतर आता दिशेचा विचार करूया. सत्तरच्या दशकात आलेल्या स्त्रीवादी वाचन, स्त्रीवादी समीक्षा आणि स्त्रीअभ्यास याच तीन पातळ्यांवर आजही आपल्याला आखणी करावी लागेल. फक्त वर नोंदवलेल्या आव्हानांना आणि बदलत्या काळाच्या संदर्भांना ध्यानात घेऊन मगच तो विचार सुरू करणे आवश्यक ठरेल. मुळात स्त्रीवादी वाचन ज्या पद्धतीने ताराबाई शिंदेंनी सुरू केलेले दिसते, तो पायंडा अधिक विस्ताराने पाडला गेला पाहिजे. स्त्री लेखक व पुरुष लेखक दोहोंनीही जे काही लिहिले आहे, ते स्त्रीवादी वाचनातून मांडले गेले पाहिजे... जे आपल्याकडे अद्यापही फारसे व पुरेसे झालेले दिसत नाही. समीक्षेबाबतचा व स्त्री अभ्यासाबाबतचा विचार मी वर आव्हानांमधून मांडलेला आहेच. स्त्रीवादानंतरच्या टप्प्यातील स्त्रीविशिष्टता साहित्यातून कशी दिसते, याचा अभ्यासही आता सुरू केला पाहिजे. जे घडतेय त्याची गती लेखनाला नाही आणि लेखनात जे घडतेय त्याची गती समीक्षेला व अभ्यासाला नाही... अशी आजची दूरवस्था आहे. ती काहीअंशी तरी बदलणे आपल्याच हाती आहे.

.............................................................................................................................................

कविता महाजन यांच्या पुस्तकांच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/client/search/?

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा