गणेशोत्सव : काही (अधार्मिक) नोंदी 
पडघम - सांस्कृतिक
प्रवीण बर्दापूरकर
  • मिश्र धातूची वीणावादन करणारी गणेशाची मूर्ती
  • Sat , 07 September 2019
  • पडघम सांस्कृतिक सार्वजनिक गणेशोत्सव Sarvajanik Ganesh0tsav गणपती Ganpati

या आठवड्यात गणेशोत्सव सुरू असल्यानं बदल म्हणून अ-राजकीय, आत्मपर आणि काहीसं गतकातर आठवणींना उजाळा देणारं लिहितो आहे.

एक

५३-५४ त्रेपन्न वर्षांपूर्वी वयाच्या १२-१३ वर्षांचा असताना मी अतिधार्मिक होतो. तसंही, घरात जे काही चाललेलं असतं, तेच मनावर बिंबत असण्याचं ते वय असतं. त्यानुसार विशेषत: अण्णा म्हणजे वडिलांच्या धार्मिक असण्याला मी फॉलो करू लागलो. माई म्हणजे आई काही कट्टर धार्मिक नव्हती. उलट ज्या वयात भरपूर खावं-प्यावं, खेळावं त्या वयात मी असा कट्टर धार्मिक असणं तिला मंजूर नव्हतं. ती ते बोलूनही दाखवायची. तेव्हा एकुणातच मध्यमवर्गीय पांढरपेशा घरात असं धार्मिक वातावरण असेच. त्यात पूजा करताना अण्णांना घरात ‘पिन ड्रॉप’ शांतता लागे. तशी शांतता नसली आणि पूजेच्या तयारीत काही कमी-जास्त असलं की त्यांचा प्रचंड संताप होई. क्वचित ते हातातलं ताम्हणही भिरकावून देत. कदाचित पूजेच्या वेळी होणाऱ्या त्यांच्या या शीघ्रकोपी कृतीमुळेही मी त्या वयात धार्मिक झालो असावा. किती धार्मिक तर संकष्टी मी निर्जळी करत असे; इतकी कडक निर्जळी की आवंढाही गिळत नसे. इतरही बरच उपास वगैरे होत.

पण, हे भूत सातवी-आठवीत असताना उतरलं. त्याचं झालं असं- अण्णांना क्षयरोग झाल्याचं निदान झालं आणि उपचारही सुरू झाले. दरम्यान आम्ही औरंगाबादला शिफ्ट झालो आणि रोकडिया हनुमान कॉलनीत राहायला आलो. एका रात्री अण्णांची प्रकृती जास्तच बिघडली म्हणून त्यान कॉलनीतल्या डॉ. देवकर यांच्याकडे नेलं. त्यांनी उपचार केले, पण सर्व तपासण्या पुन्हा करायला सांगितल्या. कारण त्यांना रोगनिदान चूक असल्याचा संशय आला होता आणि त्यांचा संशय बरोबर ठरला. अण्णांना कर्करोगाचं निदान झालं. औषधोपचारासोबत जे अन्य उपाय सुरू झाले त्यात देवाचा धावा होता. ती जबाबदारी मी स्वीकारली. त्या दिवसात मी सहा-सात तास देवासमोर असे आणि सांगितलेली सर्व कर्मकांडे निर्जळी करत असे. कारण देवच अण्णांना वाचवेल अशी माझी ठाम समजूत होती. गणेशोस्तवाच्या धामधुमीतच अण्णांच्या निधनाची बातमी आली तेव्हाही मी देवासामोरच होतो. अण्णा वारल्याचं कळल्यावर रडू येणं किंवा दु:ख होण्याआधी देव कुणालाच वाचवू शकत नाही, ही भावना प्रबळ झाली. बसलेल्या पाटावरून उठलो, सर्व देव जमा केले आणि एका कपड्यात गुंडाळून माळ्यावर फेकले. तेव्हापासून मी अधार्मिक झालो.

दोन

अण्णांची एकच सुगंधित आठवण माझ्याकडे आहे आणि ती गणेशोत्सवाशी संबंधित आहे. अण्णा गणपतीची मूर्ती सुबक आणत. बीड जिल्ह्यातल्या नेकनुराला असताना त्यांनी औरंगाबादहून आणलेली प्लास्टर ऑफ पॅरिसची मूर्ती इतकी सुबक होती की, अर्धं गाव ती बघायला आमच्याकडे लोटलं होतं.

गणेशाच्या मूर्तीसोबत अण्णा केवड्याचे दोन कणसं आणत. अधूनमधून पिवळी छटा असलेल्या हिरव्या काटेरी पानातला तो केवडा नंतर अनेक दिवस आमच्या घरात सुगंध पसरवत असे. वरची पानं सुकून पिवळी पडली आणि मग सुकली की, त्या कणसांच्या आतला पांढुरका भाग आम्ही कपड्यात ठेवत असू. तो वास आमच्या घरात डिसेंबरपर्यंत वास्तव्याला असे. केवड्याचा सुगंधाकडे साप आकर्षित होतात असं बुजुर्ग सांगत. एका वर्षी आमच्या घरात खरंच सलग दोन वेळा साप निघाला. माईनं मग केवडा घरात आणू देण्यास टोकाचा ठाम विरोध केला आणि अखेर आमच्या घरातून तेव्हापासून केवडा हद्दपार झाला.

मला सेंट किंवा परफ्युमच आकर्षण नाही. ते आवडत नाहीत आणि मी ते वापरतही नाही. मात्र, देश-परदेश दौऱ्याच्या वेळी बेगमला आवडतात म्हणून आवर्जून वेगवेगळ्या ब्रँडचे परफ्युम्स मी आणत असे. अशात दौरे बंद झाल्यानं परफ्युम्सचे खरेदीही थांबली आहे. तरी एकदा, २८-३० वर्षांपूर्वी अत्तर बाजारात दिसलं म्हणून केवड्याचं अस्सल अत्तर घेतलं होतं. घरी आल्यावर मात्र त्या अत्तराला अण्णांच्या शीघ्रकोपाचा गंध येतो आहे, असं जाम फिलिंग आलं. त्यामुळे गांजलेली असूनही कायम सस्मित असणारी माई आठवली आणि ती महागामोलाची बाटली मी सरळ बाल्कनीतून बाहेर, मागच्या नाल्यात भिरकावून दिली.   

तीन

माझी बेगम- मंगला जाम धार्मिक आहे.  हे लग्नानंतर माझ्या लक्षात आलं. तिच्यासोबत आयुष्यात आणि घरात देव आले. तिच्या देवभक्तीत अवडंबर आणि कर्मकांडही नाही. देवांमुळे काय खावं प्यावं याची बंधनं आमच्यावर कधीच आली नाहीत. मीही अनेकदा बेगमला देवळात घेऊन जात असे आणि ती परत येईपर्यंत देवळाबाहेर पुस्तक वाचत बसे किंवा धुम्रपान करत असे. आता आम्हा दोघांच्याही जगण्याच्या संध्याकाळी देवाच्या संदर्भात माझ्या म्हणण्याशी तीही सहमत झालेली आहे, मात्र त्याला गणपती अपवाद आहे .

मंगलानं अनेक गणपती जमवले आहेत. कुठंही दौऱ्यावर गेलो की तिच्यासाठी मीही गणपतीची जरा हटके मिळाली तर मूर्ती घेऊन येत असे. माती, सोनं-चांदी, अन्य धातू, पोवळं, प्लास्टिकचे वेगवेगळ्या आकार आणि मुद्रेतले शंभरावर गणपती आमच्याकडे जमा झाले होते. बदल्या आणि सामान हलवण्याच्या धबडग्यात त्यातले काही भंगले, काही गहाळ झाले, काही आम्ही भेट म्हणून दिले तरी अजूनही बऱ्याच म्हणजे ४०-४५ तरी मूर्ती आहेत. 

कोणत्याही हस्तकला प्रदर्शनाला गेलो की, मंगला आणि माझी नजर वेगळ्या आकारातल्या गणपतीचा शोध घेत असे. २५-२६ वर्षांपूर्वी ओरिसा राज्याच्या हस्तकला प्रदर्शनात आम्ही एक मूर्ती हेरली. झाडाखाली बसून गणपती वीणा वादन करत आहे, झाडावर मोर आहेत वगैरे अशी ती मिश्र धातूची सुमारे साडेतीन-चार किलो वजनाची विलक्षण देखणी, डौलदार मूर्ती आहे. विक्रेत्यानं तिची किंमत ३५०० सांगितली. तेव्हाच्या आमच्या पगाराच्या मानानं ही किंमत खूपच होती. घासाघीस केल्यावरही विक्रेता पहिल्या दिवशी काही ३३०० रुपयांच्या खाली उतरायला तयार झाला नाही. आम्ही रिकाम्या हातानं परतलो, पण ती मूर्ती मनात ठाण मांडून बसली. नंतर पांच-सहा दिवस दररोज एकदा तरी जाऊन मी त्याच्याशी घासाघीस करण्याचा परिपाठ जारी ठेवला. प्रदर्शनाच्या शेवटच्या दिवशीही मी गेलो. तोपर्यंत ती मूर्ती विकली गेलेली नव्हतीच. मला पाहिल्यावर तो विक्रेता म्हणाला ‘साब धंदा बहोत मंदा है इस साल. आधा भी सेल नाही हुवा अभी तक. चलो १७०० रुपय्या दो और ये श्रीगणेश ले जाओ. शायद आपकेही घरमे रहना चाहते ही गणेशजी’. मी पैसे दिले आणि मूर्ती घेऊन घरी आलो. ती मूर्ती पाहिल्यावर बेगमच्या चेहऱ्यावर पसरलेला आनंद कातील होता. बेगम तेव्हापासून दरवर्षी गणेशोत्सवात त्याच मूर्तीची प्रतिष्ठापना करते, मनोभावे पूजा करते. आता तिची देवभक्ती त्या मूर्तीपुरतीच शिल्लक राहिली आहे.

या वर्षीही प्रकृती अस्वास्थ्य असूनही मंगलानं तिच्या वार्षिक रिवाजाला जागत त्या मूर्तीची पूजा केली. पूजा झाल्यावर तिचे डोळे ओलावलेले होते... खरं तर ती मला सर्व सांगते, पण यावर्षी  काय मागितलं गणपती बाप्पाकडे हे तिनं सांगितलं नाही.

चार

गणेशोत्सव आणि पारिजातकाच्या फुलांचं एक निर्भेळसर गंधित नातं आहे. ती नाजूक फुलं आणि तो गंध मलाही आवडतो. कधीमधी ती चार-सहा फुलं आणून मी लेखनाच्या मेजावर ठेवतो. पारिजाताची फुलं खूप नाजूक, पण इतकी अल्पायुषी का आहेत, हे काही आजवर समजलेलं नाही.

औरंगाबादला चाणक्यपुरीत तळमजला अधिक दोन मजले अशा एका टुमदार इमारतीत दुसऱ्या मजल्यावर आमचा फ्लॅट आहे. आमच्या खालच्या मजल्यावर अनिता आणि रवी वैद्य तर तळमजल्यावर सीमा आणि अनंत पंढरे हे डॉक्टर दाम्पत्य राहतं.

सध्या सकाळी बेडरुमची खिडकी सकाळी उघडली की, पारिजाताचा घमघमाट आत शिरतो. टेरेसवर जावं तर प्राजक्तासोबतच टेरेसवरच्या सोनचाफा, जास्वंद, गोकर्ण, जाईचा एक वेगळाच  परिमळ आपल्यावर गारुड करतो. हा सुगंध निसर्गाचं सर्वांशी समान वागणं आणि मानवी जगण्यातली त्या संदर्भातली विसंगती नेहमीच जाणवून देतो. माझं हे म्हणणं नीट स्पष्ट करतो-

हा पारिजात लावला आहे पंढरे कुटुंबीयांनी. पंढरे कुटुंबीय रा. स्व. संघाच्या विचारसरणीचं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सेवा धारणेने प्रभावित होऊन एकत्र आलेल्या डॉक्टर स्वयंसेवकानी औरंगाबादेत जे अत्याधुनिक हेडगेवार रुग्णालय उभारलं आहे, त्याच्या संस्थापकांपैकी अनंत पंढरे एक आहेत. अनंतच्या पत्नी सीमा याही याच रुग्णालयात काम करतात. इकडे आस्मादिक समाजवादी; महात्मा गांधी यांच्या विचारावर अढळ श्रद्धा असणारे. म्हणजे पंढरे आणि बर्दापूरकर यांची जगण्याची निष्ठा पूर्ण वेगळी. त्यामुळे विचार करण्याची पद्धत वेगळी, राजकीय विचारसरणीही स्वाभाविकपणे परस्परभिन्न. पण वेगळ्या विचारसरणीचे कट्टरपंथीय जसे तलवारी उगारून सतत एकमेकांवर धावून जातात तसे किंवा कडवट संबंध आमच्यात नाहीत. अर्थात गुळपीठही म्हणावं अशी जवळीकही नाही. असं असलं तरी डॉ. पंढरे यांनी लावलेलं ते प्राजक्ताचं झाड आम्हा समाजवाद्यांना सुवास देताना कोणताही भेदभाव करत नाही!

असं म्हणतात, प्राजक्ताचं झाडं कृष्णानं कुठं लावावं यावरून सत्यभामा आणि रुक्मिणी यांच्यात मोठा वाद झाला. कृष्णानं झाडं लावलं सत्यभामेच्या अंगणात आणि त्या झाडाच्या फुलांचा सडा मात्र रुक्मिणीच्याही अंगणात पडू लागला. या कथेकडे मी श्रद्धा म्हणून पाहत नाही तर विद्यमान राजकीय आणि सामाजिक जीवनात निर्माण झालेल्या टोकाच्या दूषित वातावरणात कट्टर भूमिका सोडून एकमेकाशी कसं वागलं पाहिजे याचा झाडांनी (व्यापक अर्थानं निसर्गानं) दिलेला आणि मानवानं त्याकडे दुर्लक्ष केलेला धडा म्हणून पाहतो.

झाडं माणसा-माणसांत जात-धर्म-लिंग असा कोणताच भेद करत नाहीत, सर्वांना सारखीच फुलं, फळ देतात. स्वत:च अस्तित्व शाबूत ठेवत बहुविध प्रकारची झाडं जंगलात गुण्यागोविंदानं राहतात. (निसर्ग कोपला की जात धर्म बघून किंवा श्रीमंत-गरीब असा भेद करुन फटका लगावत नाही.) जात-धर्म-राजकीय विचार जेवढ्यास तेवढे ठेवून आपण माणसंही झाडांसारखं सर्वांशीच समानतेनं, किमान सौहार्दानं वागायला शिकणार कधी, असा प्रश्न आजकाल दररोज सकाळी प्राजक्ताचा हा परिमळ आमच्या घरात दरवळत असताना मला पडतो.     

.............................................................................................................................................

लेखक प्रवीण बर्दापूरकर दै. लोकसत्ताच्या नागपूर आवृत्तीचे माजी संपादक आहेत.

praveen.bardapurkar@gmail.com

भेट द्या - www.praveenbardapurkar.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘जातवास्तव’ स्वीकारल्याशिवाय सत्ता आणि संसाधनांचा जातीय ‘असमतोल’ दूर करता येणार नाही. उमेदवारांची नावे जातीसकट जाहीर करणे, हा एक ‘सकारात्मक प्रयोग’ आहे

महायुतीच्या ३८ उमेदवारांपैकी १९ मराठा आहेत. विशेष म्हणजे हे सगळे श्रीमंत मराठे आहेत. महाविकास आघाडीच्या ३९ उमेदवारांपैकी २४ मराठा आहेत. वंचित बहुजन आघाडीच्या ३२ उमेदवारांपैकी ५ अनुसूचित जाती, १३ ओबीसी आणि ४ मराठा आहेत. यावरून एक गोष्ट लक्षात येते की, मविआ असो वा महायुती एका विशिष्ट समाजाकडेच सत्ताबळ झुकलेले दिसते. मात्र वंबआने उमेदवारी देताना जात समतोल पाळलेला दिसतो.......

स्वयंपाकघरात टांगलेल्या कॅलेंडरवरच्या चित्राइतकीच थरारकता वा जाहिरातीतून एखादं उत्साहवर्धक पेय विकणार्‍या म्हातार्‍या अमिताभ बच्चनइतकीच विश्वासार्हता, दहा वर्षं राष्ट्रीय व्यासपीठावर वावरलेल्या मोदींच्या व्यक्तिमत्त्वामध्ये उरली आहे...

प्रचारसभांमधून दिसणारे पंतप्रधान दमले-भागलेले, निष्प्रभ झालेले आहेत. प्रमाणापलीकडे वापरलेली छबी, अतिरिक्त भलामण आणि अतिश्रम, यांमुळे त्यांची ‘रया’ गेल्यासारखी वाटते. एखाद्या ‘टी-ट्वेंटी’ सामन्यात जसप्रीत बूमराला वीसच्या वीस षटकं गोलंदाजी करायला लावावी, तसं काहीसं हे झालेलं आहे. आक्रसत गेलेला मोदींचा ‘भक्तपंथ’ टिकून असला, तरी ‘करिष्मा’ उर्फ ‘जादू’ मात्र चाकोरीबद्ध झालेली आहे.......

भाजपच्या ७६ पानी ‘जाहीरनाम्या’त पंतप्रधान नरेंद्र मोदींची तब्बल ५३ छायाचित्रं आहेत. त्यामुळे हा जाहीरनामा आहे की, मोदींचा ‘छायाचित्र अल्बम’ आहे, असा प्रश्न पडतो

काँग्रेसच्या ४८ पानी जाहीरनाम्यात राहुल गांधींची फक्त पाच छायाचित्रं आहेत. त्यातली तीन काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासोबत आहेत. याउलट भाजपच्या जाहीरनाम्याच्या मुखपृष्ठावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीमागे बळंच हसताहेत अशा स्वरूपाचं भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचं छायाचित्र आहे. त्यातली ‘बिटवीन द लाईन’ खूप सूचक आणि स्पष्टता सूचित करणारी आहे.......

जर्मनीत २० हजार हत्तींचा कळप सोडण्याची धमकी एका देशाने दिली आहे, ही ‘हेडलाईन’ जगभरच्या प्रसारमाध्यमांमध्ये गाजतेय सध्या…

अफ्रिका खंडातील बोत्सवाना हा मुळात गरीब देश आहे. त्यातच एवढे हत्ती म्हणजे दुष्काळात तेरावा महिना. शेतांमध्ये येऊन हत्ती मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान करत असल्याने शेतकरी वैतागले आहेत. याची दखल बोत्सवानाचे अध्यक्ष मोक्ग्वेत्सी मेस्सी यांनी घेतली आहे. त्यामुळेच त्यांनी संतापून एक मोठी घोषणा केली आहे. ती म्हणजे तब्बल २० हजार हत्तींचा कळप थेट जर्मनीमध्ये पाठवण्याची. अनेक माध्यमांमध्ये ही ‘हेडलाईन’ गाजते आहे.......