ट्रम्प आणि मोदी तर येत-जात राहतील, माध्यमांना जिवंत राहायचंय, मोकळ्या हवेत श्वास घ्यायचाय!
पडघम - माध्यमनामा
आशुतोष
  • प्रातिनिधिक चित्र
  • Thu , 15 August 2019
  • पडघम माध्यमनामा बातम्या फेक न्यूज Fake news वर्तमानपत्र Newspaper टीव्ही वाहिन्या वृत्तवाहिन्या TV channels पंतप्रधान मोदी PM Modi डोनाल्ड ट्रम्प Donald Trump सोशल मीडिया Social media मीडिया Media ट्विटर ट्रेंड Twitter Trends

काही क्रांत्या गुपचूप येतात आणि काही तुफान घेऊन येतात. १९१७ची रशियन क्रांती आपल्यासोबत हिंसेचा असा वणवा घेऊन आली की, संपूर्ण जग हादरलं. साम्यवादी क्रांत्या अशाच असतात, अफरातफर माजवणाऱ्या, खूनखराबा करणाऱ्या! पण मागच्या काही दिवसांत जी क्रांती माध्यमांमध्ये झाली आहे, तिचा फार काही जोर दिसला नाही. पण जेव्हा परिणाम समोर आले तेव्हा प्रत्येक जण हैराण आणि परेशान झालेला आहे.

ही क्रांती गुपचूप आलेली आहे. ती कधी आपल्या घरात घुसली, काहीच कळलं नाही. आपल्या जीवनाचा भाग बनली, आपल्याला काहीच सुगावा लागू न देता. ही क्रांती बंदुकीच्या नळीतून निघाली नव्हती. एक अदृश्य अशी दुनिया आपल्या अवतीभवती तयार होत गेली आणि आपण झोपा काढत राहिलो! अचानक एक दिवस कळलं की, फेसबुक, ट्विटर, यू-ट्युब आणि व्हॉटसअ‍ॅप यांच्याशिवाय एक मिनिटही श्वास घेणं मुश्किल होऊन बसलं आहे.

आता वर्तमानपत्रं आणि टीव्ही मागच्या रांगेत जाऊन बसण्याच्या मार्गावर आहेत. आता सकाळी वर्तमानपत्राची वाट पाहिली जात नाही आणि रात्री टीव्ही अँकरचीही. आता बातम्या गाडी चालवता चालवता सिग्नलच्या दरम्यान पाहिल्या जातात आणि कमोडवर बसल्या बसल्या सारी टीव्ही चर्चा पचवली जाते वा ऐकली जाते. बस, फक्त हातामध्ये मोबाईल फोन असायला हवा आणि कानात इअरफोन. मिटिंग चालू असताना एखादं नोटीफिकेशन येतं आणि गुपचूप आपल्याला समजतं की, जगाच्या कुठल्या कोपऱ्यात कुठली तरी मोठी घटना घडलीय. सकाळी उठल्याबरोबर व्हॉटसअ‍ॅप ग्रूप तुमचं स्वागत करतो. दहा प्रकारचे व्हिडिओ आणि मजकूर तुम्हाला बातम्या द्यायला आतुर असतात. आता हे तुमच्यावर अवलंबून असतं की, तुम्ही ते पाहू इच्छित आहात की नाही.

मोबाईल शरीराचं एक अभिन्न अंग झालं असेल तर मोबाईल चिप एक अतिरिक्त मेंदू झालेला आहे, जो सतत चालू असतो आणि प्रत्येक सूचना पटकन देतो. आता आपण गोष्टी विसरायला लागलो आहोत आणि कम्प्युटर बाबा प्रत्येक विस्मरणात गेलेल्या गोष्टीची आठवण करून देतो. तो प्रत्येक समस्येवरचा उपाय झाला आहे. कधी खेड्यापाड्यातला किंवा शहरातला माणूस वर्तमानपत्रातल्या बातम्यांना धर्मग्रंथ मानून त्यावर विश्वास ठेवतो. आता हे त्यालाही माहीत की, कुणावर भरवसा ठेवावा आणि कुणावर नाही. बातम्यांचे इतके पर्याय उपलब्ध झालेले आहेत की, सगळं काही अदभुत वाटायला लागलं आहे. बातमीऐवजी फेक न्यूज चर्चेत आहे. आणि वर्तमानपत्र, न्यूज पोर्टल्सपेक्षा जास्त माहिती ट्विटर आणि फेसबुकवर मिळू लागली आहे. या खेळाला डोनाल्ड ट्रम्पसारख्या खेळाडूंनी अजूनच रंगतदार बनवलं आहे, जे प्रत्येक पारंपरिक बातम्याच्या साधनांना नेस्तनाबूत करण्याच्या मागे लागले आहेत.

आता बातमी मिळवण्याच्या आणि ती वाचण्याचे मार्गही बदलले आहेत. आता प्रत्येक जण वार्ताहर आहे. फेसबुक लाइव्ह आणि यू-ट्युब लाइव्हने लाइव्ह नावाच्या भूताची हवा काढून टाकली आहे. आता प्रत्येक जण फेसबुक लाइव्ह करतो आणि आपला व्हिडिओ बनवून यू-ट्युबवर शेअर करतो. गावागावातून, गल्लीबोळातून लाइव्ह होत आहेत. लोक यू-ट्युबवर स्वत:चं चॅनेल बनवून लाखो सबस्क्राईबर मिळवत आहेत. म्हणजे बातम्यांचा परिप्रेक्ष्य पूर्णपणे बदलून गेला आहे, त्यांचं चरित्रही बदललं आहे आणि बातमी देण्याची पद्धतही. बातमी आता अभिजन वर्गाच्या हातातून निसटून सर्वसामान्यांकडे जाऊ लागली आहे.

जेवढ्या तत्परतेनं बातमी येते, तेवढ्याच तत्परतेनं ती बातमी भ्रष्ट करण्याची मोहीम सुरू होते. राजकीय खेळाडूंच्या हातात एक असं खेळणं आलं आहे की, ते त्याच्याशी दिवस-रात्र खेळत राहतात. ‘ट्विटर ट्रेंडिंग’ हा एक नवीन सैतान आहे, जो हे ठरवतो की, कुठली बातमी इतर बातम्यांपेक्षा जास्त लोकप्रिय आहे. आधी ते आपलं आपण ट्रेंड करत असे, आता नामांकित योद्धे आले आहेत. जसे पूर्वी भाडेकराराच्या बोलावर युद्ध लढणारे शिपाई असायचे, तसे आता भाडेकरारावरचे सोशल मीडियाचे योद्धे आले आहेत. ते काही मिनिटांत कुठलाही मजकूर ट्रेंडमध्ये आणतात.

नुकतीच झोमॅटोच्या मुस्लीम मुलाकडून मागवलेलं जेवण घ्यायला नकार देणाऱ्या एका हिंदूची बातमी आली आणि झोमॅटोच्या बाजूने शेकडो लोक उभे राहिले. त्यांनी जेवण घ्यायला नकार देणाऱ्या व्यक्तीला सळो की पळो करून सोडलं. थोड्या वेळानं झोमॅटोच्या विरोधात लोक उभे राहू लागले आणि पाहता पाहता झोमॅटोच्या विरोधात हॅश ट्रेंड करू लागला. आता हे कसं कळावं की, कोण बरोबर आहे आणि कोण जास्त लोकप्रिय? वर्तमानपत्रांची आणि टीव्हीची संध्याकाळची मिटिंग संपादकीय बैठकीपेक्षा ट्विटर ट्रेंडिंग ठरवू लागला आहे. संपादक आणि अँकर गोंधळलेले दिसू लागले आहेत. कुणी सांगावं, केव्हा कुठली बातमी ट्रेंड करायला लागेल आणि चर्चेचा विषय बदलायला लागेल.

तंत्रज्ञान बदलल्यामुळे माध्यमांच्या ग्राहकांचा दिमाखच बदलला आहे. त्याच्या वर्तन-व्यवहारात बदल झाल्यामुळे बातम्यांची संपूर्ण संस्कृतीच बदलली आहे. पूर्वी तो टीव्हीकडे जायचा. २००७मध्ये अ‍ॅपलचा आयफोन आला. हळूहळू स्मार्टफोन आपल्या जगण्याचा भाग बनला. कम्प्युटर बाबा घराच्या चार भिंतीतून तळहातावर आला. फेसबुक आणि ट्विटरची ताकद सर्वांत आधी बराक ओबामांनी ओळखली आणि निवडणुकीत प्रतिस्पर्ध्यांना हरवण्यासाठी साऱ्या शक्तीनिशी प्रयत्न केले. भारतात नरेंद्र मोदी या जिनच्या ताकदीला ओळखणारे पहिले नेते होते.

२०१३नंतर सोशल मीडियानं आपले रंग दाखवायला सुरुवात केली. आता मतदार किंवा ग्राहक यांच्यापर्यंत थेट पोहचणं सोपं झालं आहे. नरेंद्र मोदी असोत वा राहुल गांधी, ते आपलं म्हणणं मांडण्यासाठी टीव्ही वाहिन्या किंवा वर्तमानपत्रांकडे जात नाहीत. मोदींचे करोडो फॉलोअर्स आहेत, तर राहुल गांधीचे लाखो. ट्विटर त्यांनी एक शब्द लिहिला तरी ती टाकोटाक राष्ट्रीय बातमी होते. सोशल मीडियाच्या टीम त्याला शेकड्यांनी पसरवण्याचं काम करतात आणि मग बातमीचं कथन बदलण्यासाठी व्हर्च्युअल माध्यमांमध्ये युद्ध पुकारलं जातं. हे युद्ध हळूहळू न्यूज रूममध्ये प्रवेश करतं. ट्रेंडिंगची शर्यत मोठमोठ्या संपादकांचे विचार बदलवते आणि झोमॅटोचा प्रश्न देशातला सर्वांत मोठा प्रश्न बनतो. मग देशाची ढासळती अर्थव्यवस्था मागे पडते. मोदींच्या टीम यात आघाडीवर आहेत आणि विरोधी पक्षाच्या पिछाडीवर.

टीव्हीमध्येही मोदी टीमचे लोक बसलेले आहेत. ते देशाचं कथन एका खास दिशेनं नेण्याचा प्रयत्नात गढून गेले आहेत. मग अर्थव्यवस्थेचे समीक्षक निराशावादी आहेत किंवा देशाच्या साऱ्या समस्यांना खान मार्केट गँग जबाबदार आहे, असं सांगितलं गेलं की, विरोधी पक्ष कोड्यात पडतात. त्यांना कटघरात उभं करून सुनावणीशिवाय गुन्हेगार म्हणून घोषित केलं जातं. कार्यक्रम संपता संपता न्यायाधीश अँकर आपल्या पत्रकार असण्यावर गर्व करत मेकअप रूमच्या आरशात स्वत:चा चेहरा पाहतो, तिथं त्याला बातम्या सोडून बाकी सगळं काही दिसतं. ही बातम्यांची नवी दुनिया आहे. या दुनियेत मंत्री पत्रकारांना ‘प्रेस्टीट्यूट’ म्हणतो आणि पत्रकार गौरी लंकेशची हत्या योग्य ठरवणाऱ्याला पंतप्रधान फॉलो करतात, त्याच्यासोबत छायाचित्र काढून घेतात.

माध्यमांना भरपूर शिव्या दिल्या जाऊ लागल्या आहेत. गमतीची गोष्ट म्हणजे माध्यमांच्या स्वरूपात आणि स्वभावात भयानक परिवर्तन घडत असताना त्यांची विश्वासार्हता मात्र रसातळाला पोहचली आहे. अमेरिकेमध्ये तर डोनाल्ड ट्रम्प उघडपणे पारंपरिक माध्यमांना ‘फेक न्यूज’ म्हणतात. भारतात अजून तेवढी वेळ आलेली नाही. पण एखादाच असा संपादक किंवा अँकर असेल जो सत्ताधाऱ्यांच्या ‘हो’ ला ‘हो’ म्हणत नसेल. अशा वेळी ‘वॉशिंग्टन पोस्ट’चे नवे मालक आणि जगातले सर्वांत श्रीमंत व्यक्ती जेफ बेजोच्या तोंडून हे ऐकायला बरं वाटतं की, ‘माध्यमांना सैतान म्हणणं धोकादायक आहे. तो जनतेचा शत्रू आहे असं म्हणणं धोकादायक आहे. कारण तो लोकशाहीचा अविभाज्य भाग आहे.’

काही माध्यमांनी आपला मार्ग स्वत:च सोडून दिला आहे, तर काही माध्यमांच्या बदललेल्या स्वरूपामुळे नुकसान सोसावं लागत आहे. त्यावर जर लोकशाहीचा चौथा स्तंभ टिकून राहायचा असेल तर त्याला स्वत:विषयी लोकांमध्ये नव्यानं विश्वास निर्माण करावा लागेल. ट्रम्प आणि मोदी तर येत-जात राहतील, माध्यमांना जिवंत राहायचंय, मोकळ्या हवेत श्वास घ्यायचाय!

मराठी अनुवाद - टीम अक्षरनामा

.............................................................................................................................................

हा मूळ हिंदी लेख https://www.navjivanindia.com या पोर्टलवर १३ ऑगस्ट २०१९ रोजी प्रकाशित झाला आहे. मूळ लेखासाठी पहा -

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

Post Comment

Gamma Pailvan

Thu , 15 August 2019

लेखातलं हे वाक्य महत्त्वाचं आहे : >>संपादक आणि अँकर गोंधळलेले दिसू लागले आहेत.>> याचं कारण की संपादकांच्या गळ्यात मालकाचा पट्टा आहे, पण वाचक मात्र स्वतंत्र आहे. भंपादक भले गोंधळलेले असोत, माझ्यासारखे कट्टर हिंदुत्ववादी मात्र आजिबात गोंधळलेले नाहीत. मेकॉलेछाप शिक्षणामुळे निष्ठांचा गोंधळ उत्पन्न होतो व संपादक मालकापुढे लाचार कुत्र्यासारखी शेपूट हलवू लागतो. -गामा पैलवान


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘जातवास्तव’ स्वीकारल्याशिवाय सत्ता आणि संसाधनांचा जातीय ‘असमतोल’ दूर करता येणार नाही. उमेदवारांची नावे जातीसकट जाहीर करणे, हा एक ‘सकारात्मक प्रयोग’ आहे

महायुतीच्या ३८ उमेदवारांपैकी १९ मराठा आहेत. विशेष म्हणजे हे सगळे श्रीमंत मराठे आहेत. महाविकास आघाडीच्या ३९ उमेदवारांपैकी २४ मराठा आहेत. वंचित बहुजन आघाडीच्या ३२ उमेदवारांपैकी ५ अनुसूचित जाती, १३ ओबीसी आणि ४ मराठा आहेत. यावरून एक गोष्ट लक्षात येते की, मविआ असो वा महायुती एका विशिष्ट समाजाकडेच सत्ताबळ झुकलेले दिसते. मात्र वंबआने उमेदवारी देताना जात समतोल पाळलेला दिसतो.......