तुम्हाला मुस्लीम म्हणून भारतात कसे वाटते?
पडघम - सांस्कृतिक
शफाअत खान
  • शफाअत खान
  • Thu , 15 August 2019
  • पडघम सांस्कृतिक शफाअत खान Shafaat Khan नाटक Theatre भारताची फाळणी Partition of India हिंदू Hindu मुस्लीम Muslim

मूळ इंग्रजीत लिहिले गेलेले हे निवेदन तन्वी पारेख यांनी शब्दबद्ध केले आहे. ‘बाबरी मस्जिद, 25 इयर्स ऑन’, कल्पाझ पब्लिकेशन, नवी दिल्ली, २०१७ या पुस्तकात हा लेख समाविष्ट आहे.

.............................................................................................................................................

ही १९९५ ची गोष्ट आहे. हे वर्ष वाघाचे वर्ष म्हणून ओळखले गेले आणि ‘बॉम्बे’चे याच वर्षी ‘मुंबई’ म्हणून नामकरण झाले. १९९२ची दंगल आणि पुढच्याच वर्षी १९९३मध्ये झालेले बॉम्बस्फोट हल्ले- यामुळे मुंबई कशीतरी उभी राहण्याचा प्रयत्न करत होती. माफिया लोकांच्या हिंसेमुळे मुंबईची ओळख बदलत चालली होती; जमातवादी दंगली होणारे महानगर अशी नवी ओळख मुंबईला प्राप्त झाली होती आणि यातून तिची सुटका होणे जवळपास अशक्य झाले होते. हे सारे भयंकर होते, क्रूर होते. दंगली आणि बॉम्बस्फोट हल्ल्यांच्या कहाण्या घरोघरी उदधृत केल्या जात होत्या; त्या पुन:पुन्हा सांगितल्या जात होत्या. कोपर्‍याकोपर्‍यांवर, नुक्कडवर त्या सांगितल्या जात होत्या. चंदेरी पडद्यावर दाखवल्या जात होत्या. रंगमंचावर सादर केल्या जात होत्या.

ही १९९५ची गोष्ट आहे. ‘राहिले दूर घर माझे’ हे नाटक मी याच वर्षी सादर केले. असगर वजाहत यांच्या ‘जिस लाहौर न देख्या ओ जम्माइ नइ’ या हिंदी नाटकाचे हे रूपांतर होते. मुस्लीम कुटुंबाला मध्यवर्ती ठेवून हे नाटक लिहिले गेले होते. मराठी व्यावसायिक नाटकात व महाराष्ट्रात प्रथमच असे घडत होते. मुस्लीम म्हणून भारतात राहणे हा अनुभव या नाटकाचे मुख्य कथासूत्र आहे आणि तुम्ही कोणीही असा, तुमच्या हृदयातला अनुभव तोच राहतो. नाटककार आणि या देशाचा नागरिक म्हणून हे रूपांतर मी केले होते. यातून हिंसेच्या विरुद्ध उभे राहण्याचा मुख्य उद्देश होता. इथे मी उघडपणे आणि धाडसाने हेच सांगत होतो की, ‘तुम्हाला हिंसेच्या विरुद्ध राहायला हवे. तुम्ही हे केले नाही, तर तुम्ही टिकणार नाही.’

पार्श्वभूमी

वरवर पाहता सारे काही व्यवस्थित वाटत होते; पण हेही लक्षात येत होते की, काही तरी गोंधळ आहे, कुठे तरी चुकते आहे. हिंदू राष्ट्रवाद्यांप्रीत्यर्थ भाजप नेते लालकृष्ण अडवानी यांनी अयोध्येकडे रथयात्रेचा प्रारंभ केला होता. हातात तलवारी धरून राजकारण्यांचे दिमाखदार फोटो वृत्तपत्रांतून झळकत होते. ६ डिसेंबर १९९२ रोजी बाबरी मशीद उद्ध्वस्त करण्यात आली होती. ही एक भयंकर अशी घडलेली घटना होती, याची कल्पना आम्हाला आली होती. आम्हाला दंगलींचा व्यापक अनुभव होता, पण ही दंगल काही वेगळी होती. याची तयारी खूप आधीपासून केली गेली होती. बाबरी मशीद पाडण्याची कृती सुरू झाली होती. सगळीकडे अस्वस्थता पसरली होती. असहायतेच्या भावनेने आम्हाला घेरले होते. आपण दुर्बल आहोत, हतबल आहोत, ही भावना प्रत्येकात घर करताना दिसत होती. भीती, क्रोध, शंका, उलटसुलट अंदाज, निराशा अशा भावनांनी प्रत्येकजण ग्रस्त होता.

बाबरी मशीद उद्ध्वस्त झाल्यानंतर, पाठोपाठ मुंबईत दंगली सुरू झाल्या. यामुळे लोकांचे लक्ष बाबरीकडून दुसर्‍या दिशेला वळले गेले. हिंसा ही काही गुंड आणि राजकीय नेते घडवून आणतात, हा आमचा विश्वास या क्षणापर्यंत होता. शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सामान्य माणूस या दंगलीत विनाशकारी कृत्ये करताना आम्ही प्रथमच पाहत होतो. सारा समाज या हिंसेत सहभागी होताना दिसत होता आणि त्यांचा हा विश्वास ढळढळीत दिसत होता की, आता आम्हाला उत्तरेही मिळाली आहेत. लेखक म्हणून मला हे अस्वस्थ करणारे वास्तव दिसत होते. एक लेखक म्हणून माझी काय जबाबदारी आहे, याची मला या वेळी जाणीव झाली. कोणालाही ही दंगल थांबवता येत नव्हती आणि म्हणूनच या दंगलीबाबत कोणीही एखादी कविता किंवा कादंबरी लिहिताना आम्हाला दिसत नव्हते. आणि काहीच घडलेले नाही, या भ्रमात सगळे जण वावरत होते. पण एक सृजनात्मक कलाकार म्हणून आजूबाजूला काय काय घडत आहे, याचा एक अदमास घेणे, हे माझे कर्तव्य आहे, असे मला वाटत होते. माझ्या आजूबाजूला काय घडत आहे, यासंबधी लिहिण्याची मला गरज भासू लागली.

काही संवाद मी लिहिले- काही पात्रे, एक-दोन अंक-कसा तरी हा माझा प्रयत्न सुरू होता. सत्याचा ठाव घेण्याचा हा माझा प्रयत्न मला फारसा पुढे नेता आला नाही. मग लेखणी बाजूला ठेवून दिली. हा माझा भयंकर भवताल मला काहीही लिहू देता नव्हता, हेच खरे हेाते. मग, काहीही लिहायचे नाही, असे मी ठरवून टाकले. पण सारे काही शांत होत आहे असे दिसत असतानाच, मार्च १९९३मध्ये मुंबईत बॉम्बस्फोट झाले. काही लेखन होईल असे वाटत असताना परत एकदा चिंता आणि भीतीने गाठले. याबद्दल काही लिहायला हवे, ही भावनाच अंधुक होत गेली आणि मग मी ठरवून टाकले की, आता नाटक नाही, कुठले मत नाही; आता काहीच लिहायचे नाही. मी हातावर हात ठेवून दहा दिवस माझ्या घाटकोपरच्या घरी बसून राहिलो.

याच दरम्यान नाट्यदिग्दर्शक वामन केंद्रे यांनी मला बोलावले. वजाहतच्या ‘जिस लाहौर न देख्या ओ जम्माइ नइ’ या नाटकाचे वाचन सुरू होते. हे कथानक १९४७च्या पार्श्वभूमीवर बेतलेले होते. लाहोरमध्ये राहणारी एका वृद्ध हिंदू स्त्रीची ही कथा होती. या महिलेचा मुलगा फाळणीच्या दंगलीत नाहीसा झाला आहे. फाळणीमुळे भारतातून विस्थापित झालेले लखनौचे एक मुस्लीम कुटुंब तिच्याकडे आसरा मागायला येते, पण आपल्या मुलाच्या विरहामुळे त्यांना आसरा देण्याचे ही हिंदू स्त्री नाकारते. फाळणीच्या वेदनेने भयग्रस्त झालेले हे मुस्लीम कुटुंब हैराण झाले आहे आणि ते स्थानिक राजकीय गुंडांपासून कटाक्षाने दूर राहण्याच्या प्रयत्नात आहे. तरीदेखील हे गुंड घरात शिरतातच, परिस्थितीचा ताबा घेतात; शक्य तो फायदा उठवतात. त्यांना मानवी करुणा आणि दया यांच्याशी काही देणे-घेणे नसते. हे सारे अनुभवत असताना मी स्वतः लिहिलेले, मला माझे मराठी नाटक ठळकपणे दिसायला लागले. यावर आधारित मी एक मराठीत रूपांतर लिहितो आणि मला तशी परवानगी मिळावी, अशी विनंती मी जवाहत यांना केली.

थोडे बदल

जेव्हा केव्हा मी एखादी कथा, कविता, नाटक किंवा इतिहास वाचतो; तेव्हा अमेरिकन कवी ऑडगन नॅश (१९०२-१९७१) याच्या पुढील ओळी माझ्या मनात रुंजी घालायला लागतात - शाळेतल्या मुलासारखे प्रेम करणे हे कुठल्याही मूर्खाला शक्य असते, पण द्वेष करणे, माझ्या राजा ही एक कला असते (‘…For any kiddie from school Can love like a fool. But hating, my boyIs an art.’) अशा काळात, मला वाटते की, कलाकाराची जबाबदारीही वाढत जाते. त्याला युद्धभूमीतून पळ काढता येत नाही. कलेच्या माध्यमातून सत्याला पुढे आणण्याची जबाबदारी त्याला पेलावी लागते.

हे नाटक मराठीत रंगमंचावर आणताना दोन-पदरी अडचणी होत्या. भाषिक आणि प्रेक्षकांच्या हे गळी कसे उतरवावे- या दोन्हीही समस्या भेडसावत होत्या. मूळ नाटकात तीन भाषांचा प्रयोग केला होता- हिंदी, लखनौची उर्दू आणि लाहोरची पंजाबी. या सार्‍या भाषांना मराठीत समावून घेणे, त्याचे रूपांतर करणे हे एक आव्हान होते. याचबरोबर, महाराष्ट्रातला मुख्य धारेतला मध्यमवर्गीय प्रेक्षक हा कौटुंबिक नाटके पाहण्यासाठी सरावलेला होता. त्यांना हसवणारी नाटके पाहायला आवडत होती, त्यात त्यांना अधिक स्वारस्य होते. त्यांच्या जगातील-जगण्यातील त्यांच्या चुकांवर बोट ठेवणे, त्याबद्दल त्यांना जबाबदार धरणे, त्यासाठी त्यांच्यात बदल किंवा परिवर्तन घडावे म्हणून काही आग्रह धरणे- या गोष्टी त्यांना अस्वस्थ करणार्‍या होत्या. खरे पाहता, या त्यांना नकोच होत्या. आणि या नाटकातून मला हेच नेमके करायचे हेाते. आपण कोणत्या वातावरणात राहत आहोत, आपला भोवताल काय आहे, याचे विश्लेषण लोक करत नाहीत. त्यांचे वास्तव काय आहे हे पाहण्यास मी त्यांना भाग पाडतो. म्हणून मला वाटते की, ‘राहिले दूर घर माझे’ यासारखे नाटक हे प्रायोगिक रंगभूमीच्या पलीकडे जाणारे आहे. हे एक व्यावसायिक नाटक म्हणून उभे राहायला हवे, असे मला वाटते. एक प्रायोगिक प्रयत्न म्हणून तुम्ही परंपरेला छेद देणे, सरळ जाणार्‍या पायवाटेला फाटा देणे किंवा फॉर्ममध्ये विपुल असे प्रयोग करणे हे तुम्ही करू शकता, हे खरे आहे. पण मग तुम्हाला ५० टक्के प्रेक्षकांना मुकावे लागते, हेही खरे आहे. बाबरी मशीद उद्ध्वस्त करणारे दंगलखोर, या दंगलीचे समर्थन करणारा समाजातला एक मोठा गट आणि या घटिताला बळ देणारे रस्त्यावरचे लोक यांच्यासाठी हे नाटक लिहिले होते. तुम्हाला जर तुमचे नाटक हे व्यापकरीत्या प्रेक्षकांपर्यंत घेऊन जायचे असेल, तर तुम्हाला नाटकाच्या मुख्य धारेत जावे लागेल.

नाटकाचा शेवट मी बदलला होता, त्याला एक ट्विस्ट दिली होती. दंगलीत मी लोकांना बाहेर येताना पाहिले होते. आपल्या गावांतून बाहेर जाताना पाहिले होते. कॉलनीच्या कॉलनी भयग्रस्त होऊन रित्या-रिकाम्या होताना मी पाहिल्या होत्या. हे सारे ‘धर्माच्या नावाखाली’ झाले होते; होत होते. अल्पसंख्याकांचा मृत्यू, निःपात यातून मला काय सांगायचे आहे, ते लोकांपर्यंत पोचणार नाही, हे माझ्या लक्षात आले होते. अल्पसंख्याकांना मी मरू दिले नाही, त्यांना जिवंत ठेवले. हा जिवंत राहिलेला अल्पसंख्याक आपल्या तरुण पिढीला मेसेज देतो, आपला भयकंपित अनुभवाचे कथन करतो. या सार्‍या भयातून मुक्त होताना हे अल्पसंख्याक तरुण, धर्म आणि जातीच्या पलीकडे जाऊन लोकांकडे-समाजाकडे पाहण्याचा संदेश देतात. एक वृद्ध स्त्री, आजी आणि तरुण मुलगी गुंडांना निर्भयतेने सामोरे जाताना हवेलीचा दरवाजा उघडतात, या प्रसंगाने मी नाटकाचा शेवट केला होता. अशा वेळी आजीचा अनुभव, त्या तरुणीची निष्पाप मनोवृत्ती अधोरेखीत करावी, असे मला वाटले. मनुष्यता हीच सर्वांत मोठी शक्ती आहे, तिचे अधिष्ठान सर्वोच्च आहे, हे मला यातून जोरकसपणे प्रतिबिंबित करता आले.

दंगलखोर लोकांनी हे नाटक पहिले. त्यांना हे सारे पाहून निश्चितच त्रास झाला, पण कालांतराने त्यांना हे नाटक आवडले. या नाटकाने हिंसा आणि दंगली थांबवण्याची काही भूमिका बजावली नाही; पण ज्यांनी हे नाटक पाहिले होते, त्यांनी या क्रूर आणि पाशवी कृती करण्याअगोदर किंवा त्यात साह्यभूत ठरण्याअगोदर दोनदा नक्कीच विचार केला असता, अशी आशा नक्कीच वाटत होती.

परकेपणाचा आशय

‘जिस लाहौर न देख्या ओ जम्माइ नइ’ हे नाटक एका मुस्लीम कुटुंबाचे कथानक सांगते. फाळणीच्या काळात हे मिर्झा कुटुंब लखनौहून लाहोरला स्थलांतरित होते. इथे हिंदूंनी रिकामी केलेली एक हवेली यांना दिली जाते. जसे ते या घरात प्रवेश करतात तशी त्यांना इथे एक हिंदू वृद्ध स्त्री राहत असलेली आढळते. ही स्त्री आपल्या घरावरच्या हक्काचा दावा करते आणि हवेली सोडून जायला नकार देते. आपल्या खर्‍या-खुर्‍या प्रेमातून लखनौहून आलेले, विस्थापित झालेले मुस्लीम कुटुंब या वृद्ध हिंदू स्त्रीची काळजी घेते आणि कालांतराने मिर्झा कुटुंब इथे स्थिरावत जाते. नंतर ते या वृद्ध स्त्रीला हवेली सोडून जाण्याबद्दल कधीही बोलत नाहीत. पण यादरम्यान, पहेलवान व आजूबाजूचे मुस्लीम यांच्यात सतत कुरबुरी आणि वाद होत राहतात. ज्येष्ठ मौलवी आणि हिदायत हुसेनी हे रतन की माँ- म्हणजे ती हिंदू वृद्ध स्त्री- या हवेलीत एका मुस्लीम कुटुंबाबरोबर कशी काय राहत आहे; हे कुटुंब तिची सेवा कशी काय बरे करत आहे, याबद्दल चुगल्या सुरू होतात. लाहोर सोडायचे नाही, आपले घर-आपली हवेली तर कशी सोडायची आणि पहेलवान व त्याचे इतर मुस्लीम सगेसोयरे यांच्याद्वारे पसरवले गेलेले विष पचवण्याच्या या द्वंद्वात रतन की माँचा अचानक उदास मृत्यू होतो. मौलवी, हिदायत हुसेन आणि अजून बरेच जण रतन की माँ हिचे अंत्यविधी-संस्कार करतात. बर्‍याच गोष्टी लक्षात न घेता, पहेलवान धक्कादायकरीत्या मौलवीला ठार मारतो. यातून आपण कसे खरे मुस्लीम आहोत. हा अभिनिवेश त्याला व्यक्त करायचा असतो.

आता महाराष्ट्रात म्हणावी तेवढी फाळणीची झळ पोचली नव्हती, जी होती ती तुलनात्मकदृष्ट्या फारच मर्यादित स्वरूपात होती. मराठीत फाळणीवर आधारित साहित्य हे म्हणूनच म्हणावे तेवढे निर्माण झाले नाही. फाळणीनंतर माझे मामा (काका) आणि माझा बराच गोतावळा भारत सोडून कराचीला गेला. ते अधेमधे आम्हाला भेटायला भारतात येत असत. भारतातल्या गतस्मृती आणि नव्या देशातल्या गमतीजमती सांगताना ते आम्हाला हेच सांगत असत की, या नव्या देशात त्यांना कसे सामावून घेतले जात नाही. आपण भारत सोडून तिकडे गेलो, ही आपली चूकच झाली आहे, हे त्यांना आता कळून चुकले होते. हा प्रत्यय त्यांच्या बोलण्यातून येत असे.

बाबरी मशीद उद्ध्वस्त केली गेली, ही घटना बिगर मुस्लीमांनाही डोळे उघडायला लावणारी होती. मी मुस्लीम असल्याची भेदक जाणीव मला यामुळेच झाली. अर्थात, मी एक पराया आहे; बाहेरचा-परका आहे, हे काही मला आताच समजले होते अशातला भाग नव्हता. लहानपणी मला याची सतत जाणीव असायची आणि मला मराठी समाजाने स्वीकारावे हीच भावना, नाटक लिहिणे या माझ्या कृतीतून व्यक्त होत होती. माझा जन्म हा सावंतवाडीचा. पण नोकरीमुळे माझ्या वडिलांच्या बदल्या होत असत. म्हणून महाराष्ट्राच्या सीमा ओलांडून देशाच्या अनेक भागांत राहण्याची संधी मला मिळाली. याबद्दल वडिलांचे मला आभारच मानावे लागतील. प्रत्येक दोन किंवा तीन वर्षांनंतर बदली होत असे आणि आम्ही एका नव्या गावात जात असू. कुठल्याही एका ठिकाणी न रमण्याची ही वृत्ती माझ्यात यामुळेच आली असावी. परकेपणाचा हा आशय माझ्यात असा कायम राहिला.

मला माहीत होते की- मी वेगळा आहे; परका आहे. मी मुस्लीम आहे. तथापि, मी मुस्लीम कॉलनीमध्ये कधीच राहिलो नाही. त्यामुळे मी सुरक्षित असल्याची भावना माझ्यात कधीच रुजली नाही किंवा जे मुस्लीम त्यांच्या कॉलनीत राहायचे आणि त्यांच्यात एक सुरक्षित असल्याची भावना मला दिसायची, तशी भावना माझ्यात कधीच निर्माण झाली नाही. मुस्लीम कुठेही असोत, जिथेही ते जावोत- त्यांना दुष्ट, खलनायक वगैरे समजले जाते. आजही ही गोष्ट आपणास दिसते. म्हणूनच मी जिथे जिथे जाई, तिथे तिथे माझी स्वतःची प्रतिमा बनवण्याचा मी प्रयत्न करू लागलो. कदाचित म्हणूनच फार्स (खूप हास्य निर्माण करणारे नाटक) हा माझ्या नाटकाचा एक अविभाज्य भाग बनला.

जसा मी मोठा होत होतो, तसे माझ्या हे लक्षात येत गेले की, आपल्या देशात इतिहास एका विशिष्ट पद्धतीने शिकवला जातो. इतिहासाच्या पुस्तकात मुस्लीम नायकांची कमतरता दिसते. निर्भय शिवाजी आणि अफझलखान यांची लढाई मुलांना त्याच्या वर्गात सांगितली जाते, तेव्हा बहुतेक मुलांना शिवाजी व्हायचे असते. माझ्याही वर्गात हेच होते; यापेक्षा काही वेगळे नव्हते. माझ्या वर्गात शिवाजी खूप होते, म्हणून अफझलखानची भूमिका वठवण्याची जबाबदारी माझ्या छोट्या खांद्यावर येऊन पडत असे. मला कोणती भूमिका करायची आहे, हे मला कोणीही विचारत नसत. शिवाजी अफझलखानला मारतो, इथे ही लढाई प्र्रत्यक्षात संपत असे; पण इतिहासातील हे प्रकरण शाळेच्या मधल्या सुट्टीतही माझ्या बाबतीत सुरूच राही.

मला वाटते की, मुस्लीम-पार्श्वभूमीमुळेच मी नाटकात काम करू लागलो, मी नाटक लिहू लागलो. मी जेव्हा शाळकरी मुलगा होतो, तेव्हा माझे सवंगडी मला स्वीकारत नसत. हे केवळ माझ्या धर्मामुळे होत होते. अदृश्य अशा भिंती उभ्या केल्या जात असत. त्या मुलांना घरातून दम भरला जात असे की, मुस्लीम मुलांबरोबर खेळायचे नाही म्हणून. तुम्ही दुसर्‍यांना स्वीकारार्ह कसे होणार? आणि तुम्ही स्वतःला सिद्ध कसे करणार? त्यापेक्षा रंगभूमी काय वाईट? जेव्हा तुम्ही नाटक पाहता, तेव्हा समोरच्या माणसाला तुम्हाला स्वीकारावेच लागते. मला मुस्लीम अस्मिता लपवण्याची सवय लागली. माझे मराठी दिसणे आणि माझे अपारंपरिक असणे याही गोष्टी मला साह्यभूत ठरल्या असाव्यात. माझ्या नाटकात ही मास्कची प्रेरणा परत-परत उगवत असते यात आश्चर्य वाटण्यासारखे काहीच नाही. मी खोलवर विचार करतो आणि मला हे तथ्य स्पष्टपणे दिसते की, मी माझा धर्म लपवतो आहे आणि अधिकाधिक मित्र गोळा करतो. एकाकीपणा व संप्रेक्षण न होण्याच्या किंवा चुकीच्या पद्धतीने होण्याच्या क्षमता या न-नाट्याचा (थिएटर ऑफ अ‍ॅब्सर्ड) थोडाच भाग आहेत!

कोकणात दशावतार (विष्णूचे दहा अवतार) नावाचे लोकनाट्य खूप लोकप्रिय आहे. सणासुदीला ही लोकनाट्ये देवळासमोर सादर केली जातात. यातील सर्व पात्रे ही देवांची असतात. पण ही पात्रे दैवी वगैरे न वाटता खूप मानवी वाटतात, आपल्या जवळची वाटतात. ही पात्रे म्हणजे सर्वसामान्य लोकांच्या जीवनात येणारे लोक वाटतात. साधारणतः धर्म समाजाचे दमन करत असतो. धर्माच्या या दमन करणार्‍या भावनांचे मामुलीकरण करता येते, ही गोष्ट मला या नाटकांमुळे लक्षात येत गेली. नाटकात याचा एक परिणामकारक शस्त्र म्हणून आपणास वापर करता येईल, हे मला समजत गेले.

यानंतर आम्ही गोवा येथे गेलो. इथे नाटक हा एक धार्मिक विधी होता. ती गावातल्या जत्रेत सादर केली जायची. सणासुदीला किंवा पवित्र दिवसांच्या निमित्ताने नाटक हे सक्तीचे होते. याचा जनसमूहावर विलक्षण असा प्रभाव पडत असे. उदाहरणार्थ- पुरुषांनी वर्णन केलेले स्त्रियांचे दुःख (मंदिरासमोर सादर केलेल्या या प्रयोगात स्त्रीपात्र नसायचे) हे ढोंगी आणि उथळ होते. मला हे पाहताना मजा यायची. या प्रयोगामुळे वास्तवापासून दूर जायला मला मदत होत असे. मराठी नाटकाचा हाच तर गाभा आहे.

गोव्यात संगीत नाटकेही होत असतात. ही नाटके एका छोट्या वर्कशॉपमध्ये तयार केली जात असत आणि हे वर्कशॉप माझ्या शाळेपासून जवळच होते. मोठमोठे रंगवलेले पडदे या नाटकांसाठी लागत असत. तशी ती प्रथा होती. मला या ठिकाणी फार मोठ्या क्षमतेचे पेन्टर्स पाहायला मिळाले. या पडद्यांवर ते मोठमोठे राजवाडे रंगवत असत; कधी घनदाट जंगले, तर कधी महानगरे. ही चित्रे रंगवली जात असताना मी तिथे हे तासन्तास पाहत बसे. हे पाहताना माझ्या मनात अनेक कथा रुंजी घालत. दुसर्‍या एका जवळच्याच ठिकाणी गणपतींच्या मोठमोठ्या मूर्ती बनवल्या जात. तिथेही मी तासचे तास वेळ घालवत असे. भिजवलेल्या मातीतून चमकदार फर्निचर हे कारगीर निर्माण करत असत. गणेशोत्सव सण अजून काही आठवडे तरी दूर असायचा.

या सार्‍या गोष्टी माझ्यात दडून राहिल्या आणि त्या खूप नंतर माझ्या जाणिवेच्या पृष्ठभागावर अवतरल्या.

हीच तर नाटकाची जादू असते.

.............................................................................................................................................

‘साधना’ साप्ताहिकाच्या १० ऑगस्ट २०१९च्या अंकातून साभार.

अनुवाद - डॉ. दीपक बोरगावे

deepak.borgave7@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

Post Comment

Gamma Pailvan

Thu , 15 August 2019

शफाअत खान, मन उघडं करायला धाडस लागतं. ते दाखवल्याबद्दल तुमची दाद द्यावीशी वाटते. लेखातलं हे वाक्य कळीचा मुद्दा वाटलं : >> मी खोलवर विचार करतो आणि मला हे तथ्य स्पष्टपणे दिसते की, मी माझा धर्म लपवतो आहे आणि अधिकाधिक मित्र गोळा करतो. >> यावर माझं म्हणणं असं की तुम्ही हिंदू का होत नाही? समजा तुम्ही इस्लाम सोडला तर तुम्हाला असुरक्षित वाटेल काय? असल्यास का? नसल्यास का नाही? तुमच्याकडे चिंतनक्षमता आहे. तेव्हा या विषयावर विचार करून पहाच म्हणून सुचवेन. घरवापसी हा वाटतो तितका घातक पर्याय नाही. आता हेच बघा ना, खान हे तुमचं आडनाव आहे. हे इलामिक नाही. हे तुर्क-मंगोल्यांचं बिरूद आहे. इस्लामशी त्याचा काडीमात्र संबंध नाही. तुम्हाला नाव बदलायचीही गरज नाही. ज्याप्रमाणे खान या संज्ञेचा इस्लामशी संबंध नाही अगदी त्याच प्रमाणे बाबरी मशिदीचा इस्लामशी संबंध नाही. कारण की बाबरी नामे कोणतीही मशीद तिथे नव्हती. जे होतं ते जुनं बाटवलेलं राममंदिर होतं. गैरइस्लामी प्रार्थनास्थळी मशीद बांधणे हा इस्लामचा भयंकर अवमान आहे. बाबर क्रूर असेल, पण मूर्ख नक्कीच नव्हता. कोणत्याही सच्च्या मोमीनाने ( = मुस्लिमाने) रामजन्मभूमीवर मशीद उभारायला कडाडून विरोध करायला पाहिजे. प्रत्यक्षात कोणी दिसतो का? बाबरीचं थोतांड पुढे रेटाणारे कोण आहेत? इस्लामच्या नावाखाली स्वत:च्या तिजोऱ्या भरण्यात कोणीतरी थेरडे मग्न आहेत ना? त्यांना चाप लावायचा कोणी? तुमच्यासारख्या विचारी लोकांनी असल्या थोतांडी इस्लामचा त्याग केला की मग तुम्हांस तुमची मूळ ओळख प्राप्त होईल. शिवाय त्या थेरड्यांचे डोळे उघडतील हा बोनस आहेच. बघा विचार करून. आपला नम्र, -गामा पैलवान


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा