अण्णा भाऊ साठे यांचे उभे आयुष्य म्हणजे साम्यवादाने झपाटलेली एक जळती चूड होती!
पडघम - साहित्यिक
विंदा करंदीकर
  • अण्णा भाऊ साठे
  • Thu , 01 August 2019
  • पडघम साहित्यिक अण्णा भाऊ साठे Anna Bhau Sathe विंदा करंदीकार Vinda Karandikar

मराठी साहित्यात आपल्या वेगळेपणाने उठून दिसणारे, स्वत:ची स्वतंत्र आणि ठसठशीत नाममुद्रा उमटवणारे लोकशाहीर, कथा-कादंबरीकार, पटकथाकार अण्णा भाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सुरुवात आज, १ ऑगस्टपासून होते आहे. त्यानिमित्ताने त्यांच्याविषयीचा हा एक खास पुनर्मुद्रित लेख...

.............................................................................................................................................

अण्णा भाऊ आठवले की, प्रथम मला अपराध्यासारखे वाटते. प्रतिकूल परिस्थितीत अण्णा भाऊंनी केलेले एकूण कार्य आणि अनुकूल परिस्थितीत आम्ही जोपासलेली निष्क्रियता ही समोरासमोर ठाकली की, पृथ्वीच्या पोटात गडप व्हावेसे वाटते. नंतर आठवते ती अण्णा भाऊंची शेहेचाळीस सालच्या सुमाराला पाहिलेली शाहिरी मुद्रा. त्या वेळी अण्णा भाऊ, दत्ता गव्हाणकर आणि अमर शेख हे तिघे ब्रह्मा-विष्णू-महेशाच्या तेजाने तळपत होते. अंगाला हात लावला तर भाजून निघेल असे वाटायचे. ते दिवस आठवले म्हणजे अण्णा भाऊंच्या वाङ्मयाचा विचार क्षणभर बाजूला राहतो, अंगावर कोसळते ती या माणसाची कडवी जिद्द.

‘फकिराचा’ हा भाचा आपले संबंध आयुष्यच जिद्दीने जगला. वाळवे तालुक्याचा वारसा त्याला पाळण्यात भेटायला आला. जन्माला दोनचार दिवस झाले नाहीत, तोच फकिरा इंग्रजांचा खजिना लुटून, घोडदौड करत वाटेगावला अण्णा भाऊंच्या झोपडीपुढे दत्त झाला आणि घोड्यावरून न उतरताच दोन ओंजळी सुरती रुपये बाळबाळंतिणीसाठी देऊन पुढे गेला. त्या टापांची लय अण्णा भाऊ पुढे कधीच विसरले नाहीत.

अण्णा भाऊ दोन दिवस शाळेत गेले; पण तिसर्‍या दिवशी मास्तरांनी अंगावर रूळ फेकल्याबरोबर तिडकेसरशी शाळेतून चालते झाले. अण्णा भाऊंचे पुढील सर्व शिक्षण अनुभवाच्या शाळेत झाले. अण्णा भाऊंनी अनेक कामे केली. कल्याणला त्यांनी बापाबरोबर कोळसे भरले; मुंबईला फेरीवाल्यापाठोपाठ त्यांचे गाठोडे घेऊन ते हिंडले; बापू साठेच्या तमाशात लुगडे नेसून नाचले; मोरबाग गिरणीत ते प्रथम झाडूवाले झाले (अल्पवयीन असल्यामुळे इन्स्पेक्टरने पाहिले तर काम जाईल या भीतीने संडासात अनेकदा लपून बसले); पुढे त्रासन डिपार्टमेंटमध्ये कसबी कामगार बनले; त्याच सुमारास पायाच्या बँडेजमध्ये पत्रे लपवून संदेश पोचवणारे कम्युनिस्ट कार्यकर्ते म्हणून वावरले.

या सर्व धडपडीमध्ये दोन ओंजळी सुरती रुपये देणारा फकिरा अण्णा भाऊंना पुन्हा कधीच भेटला नाही. अण्णा भाऊंचे काही दोस्त पुढे थोडेफार दुरावले; संसार दुभंगला; शरीर कोसळू लागले; पण दारिद्रयाशी त्यांनी केलेली दोस्ती शेवटपर्यंत टिकली. आयुष्याची ही सर्व परवड त्यांनी ज्या कलंदरी वृत्तीने व जिद्दीने झेलली त्याला तोड नाही. त्यांचे उभे आयुष्य म्हणजे साम्यवादाने झपाटलेली एक जळती चूड होती. त्यांचे वाङ्मय म्हणजे त्या चुडीतून उडालेल्या काही ठिणग्या; काही पेटवणार्‍या, काही डागणार्‍या, काही झोंबणार्‍या, काही झोंबता झोंबता हसवणार्‍या.

त्यांच्या वाङ्मयाचा स्थायिभावसुद्धा जिद्द हाच आहे; जिद्द आणि एकलक्षीपणा. फेरीवाल्यामागोमाग हेलकरी म्हणून फिरायला लागण्यापूर्वी थोडेच दिवस त्यांना अक्षरओळख घडलेली होती. अण्णा भाऊ फेरीवाल्यामागोमाग पुढे न जाता मुंबईच्या रस्त्यावरील पाट्या वाचत ठिकठिकाणी उभे राहत. फेरीवाला कंटाळला. ‘ह्ये पोरगं येडं व्हनार’ असे आपले भविष्यही त्याने अण्णा भाऊंच्या बापाला सांगितले. आणि ते भविष्य खोटे ठरले नाही.

अण्णा भाऊंना एकाऐवजी दोन वेडे लागली; एक साम्यवादाचे आणि दुसरे वाङ्मयाचे. मात्र अण्णा भाऊंच्या दप्तरी ती दोन्ही वेडे वेगवेगळी नव्हती. कम्युनिस्ट होत असतानाच ते स्टॅलिनग्राडचा पवाडाही त्रासन विभागात मिळणार्‍या कागदाच्या चिर्‍होट्यावर लिहू लागले होते. बहुधा लढाई आधी आणि पोवाडा नंतर असा मामला असतो; पण अण्णा भाऊंचा हा पवाडा अगदी वेगळ्या पद्धतीने घडत होता. लढ्याची सुरुवात झाली तेव्हा पोवाड्याला सुरुवात झाली; लढ्याला जोर चढू लागला तसा रचनेचा वेग वाढू लागला; आणि लढा संपला तेव्हाच पोवाडाही संपला. अण्णा भाऊंनी आपल्या पुढच्या हयातीत दहा-बारा कादंबर्‍या, शे-दीडशे गोष्टी, पुष्कळ तमाशे व अनेक शाहिरी गाणी लिहिली. ते झपाट्याने व झपाटल्यासारखे लिहीत गेले. या सर्वांमध्ये संघर्षशील जिद्दीला त्यांनी मुख्य रसाचे स्थान दिले; बाकीचे चिल्लर रस म्हणजे नाटकातील दुय्यम पात्रे. सूत्ररूपाने बोलावयाचे तर त्यांनी जन्मभर पुन्हा ‘फकिराच’ लिहिला.

आणि म्हणूनच अण्णा भाऊंच्या वाङ्मयाचा विचार करू लागले की, माझे मन अस्वस्थ होते. या माणसाने जे लिहिले त्यापेक्षा हा माणूस जे लिहू शकला असता त्याचा विचार टाळता येत नाही. अण्णा भाऊंच्या प्रतिमेला जीवनाचा वेग होता; भाषेची मुळे मातीत होती; सृजनशीलतेला साथ देणारा उद्योगीपणा होता. इतके असूनही चिरंतन असे वाङ्मयीन मूल्य त्यांच्या निर्मितीला लाभले आहे असे मला वाटत नाही. ते मूल्य निर्माण होण्यासाठी जीवनाची व वाङ्मयाची जी व्यापक व मूलगामी समज पाहिजे ती अण्णा भाऊंच्या प्रकृतीत नाही. ती येण्यासाठी शक्तीला संयम भेटावा लागतो, भावनेला चिंतन भेटावे लागते आणि तिडिकेला तटस्थता भेटावी लागते.

अण्णा भाऊंच्या वाङ्मयात या गाठीभेटी क्वचितच घडतात. त्याची कारणे अनेक असू शकतील; कोणी त्याची जबाबदारी साम्यवादी विचारधारेवर ढकलून मोकळे होतील; कोणी त्यांच्या आयुष्याची जी परवड निघाली तिच्यावर टाकतील; कोणी आपल्या ग्रंथाची भारतीय व परकीय भाषांमध्ये भाषांतरे झाली या जाणिवेतून निर्माण होणार्‍या अण्णा भाऊंच्या आत्मसंतुष्ट वृत्तीवर टाकतील. या सर्वातील सत्याचा अंश गृहीत धरूनही अण्णा भाऊंच्या प्रतिभेचा मनुष्य या बाबतीत इतका कसा चुकला याचे कोडे मला उलगडत नाही.

कदाचित, त्यांनी आपले वाङ्मयीन पूर्वग्रह सोडून समकालीन मराठी वाङ्मयात दिसणार्‍या नव्या प्रेरणांची, प्रवाहांची व वाङ्मयीन क्रांतीची दखल घेण्याचा प्रयत्न केला असता तर ही स्थिती टळली असती. आपला मूलभूत राजकीय व सामाजिक दृष्टिकोण न बदलताही त्यांना ही गोष्ट करणे अशक्य नव्हते.

पण प्रतिगामी राजकीय विचारांचे पुरोगामी वाङ्मयीन दृष्टिकोनाशी असलेले साहचर्य व पुरोगामी राजकीय विचारांचे प्रतिगामी वाङ्मयीन विचारांशी असलेले साहचर्य या नव्या मराठी सारस्वतातील घटनेने ती शक्यता दुरावली गेली. प्रत्यक्षात एक फार मोठी शक्ती एका सापेक्षत: मर्यादित अशा हेतूसाठी राबवली गेली. अर्थात त्या हेतूशी सुसंगत असे यश त्यांना जरूर मिळाले. त्यांचे वाङ्मय पुष्कळ लोकांनी आवडीने वाचले; त्यातील काही रसिकांनी त्यांच्या वाङ्मयाची वारेमाप स्तुतीही केली; आणि कदाचित, त्याच हेतुपरतेमुळे त्यांच्या वाङ्मयाची अनेक भाषांमध्ये भाषांतरेही झाली, पण या प्रकारच्या वाङ्मयीन यशाला माझ्या दृष्टिकोनात दुय्यम स्थान आहे. अण्णा भाऊंना वाङ्मयीन श्रेय गाठता आले नाही.

पण गंमत अशी की अण्णा भाऊंना मी म्हणतो त्या वाङ्मयीन श्रेयाची चिंता कधीच वाटली नाही. पाच-पंचवीस वेळा त्यांना भेटण्याचा, चार-पाच वेळा त्यांच्याबरोबर थोडीफार चर्चा करण्याचा, आणि दोन-तीन वेळा त्यांच्या पंक्तीला जेवण्याखाण्याचा योग मला आला. त्यात ही निकड मला कुठेही जाणवली नाही. त्यांच्या निष्ठा ठाम होत्या; आपल्याला आपला सूर सापडला आहे ही घट्ट कल्पना आत कुठेतरी दडलेली होती. माझे हे असले जडजाद्य त्यांना यत्किंचितही हलवू शकले नसते. ते फक्त गमतीने हसले असते! त्यांच्याइतक्याच संघर्षशील व त्यांच्याहून अधिक प्रत्यक्ष कार्य करणाऱ्या एखाद्या झुंजाराच्या तोंडून ते त्यांनी ऐकले असते तर कदाचित काही परिणाम झाला असता. कारण कृतिशील शब्द हे त्यांचे श्रद्धास्थान होते. महाराष्ट्रातील कृतिशील शब्दांच्या उपासकांत अण्णा भाऊंचे स्थान फार वरचे आहे.

.............................................................................................................................................

अण्णा भाऊ साठे यांच्या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/client/search/?

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा