ग्लोबल फेनामेना : ‘ते’ विरुद्ध ‘आपण’
पडघम - राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय
सुनील देशमुख
  • प्रातिनिधिक चित्र
  • Mon , 29 July 2019
  • पडघम राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय आपण विरुद्ध ते Us vs Them सुनील देशमुख Sunil Deshmukh

उदारमतवादी लोकशाही, सेक्युलॅरिझम व जागतिकीकरण या त्रिसूत्रीवर उभारलेली जागतिक व्यवस्था अचानकपणे भर रस्त्यात बंद पडलेल्या गाडीप्रमाणे ठप्प झाली आहे. अमेरिका, ब्रिटन, पूर्व युरोप, टर्की, फिलिपिन्स, ब्राझील इत्यादी देश-प्रदेशांतील लोक या गाडीतील सहप्रवासी असून, यात नुकतीच भारताचीही भर पडली आहे, असे वाटते.

या उदारमतवादी लोकशाहीची जागा धर्म, वंश वा टोळी आधारित राष्ट्रवाद घेत आहे. तो आक्रमक आणि ‘आपण’ विरुद्ध ‘ते’ या मूलतत्त्वावर आधारित आहे. द्वेष, घृणा आणि हिंसक कृती ही त्याची शस्त्रे आहेत.

लोक आपल्या आर्थिक हितावर आधारित मते देतात (‘It's economy stupid!’ किंवा ‘People vote their poeketbook’ या अमेरिकेतील म्हणी!) ही संकल्पनाचा आता खोटी ठरली आहे. ‘Tribalism’ किंवा टोळीवादच खरा प्रमुख असतो आणि लोक स्वत:च्या आर्थिक हिताकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून टोळी, जमाव आणि ‘आपण’ या संकल्पनेतील ‘त्यांच्या’ विरुद्धची सुरक्षितता अधिक महत्त्वाची मानतात, हेही स्पष्ट झाले आहे.

तंत्रज्ञानाची भरारी, जागतिकीकरणाची लाट आणि त्यातील आदान-प्रदान यांमुळे सौहार्द, उदारमतवाद वाढतील, जग एक बनेल आणि विश्वबंधुत्व, ‘वसुधैव कुटुंबकम्’ या मूल्यावर आधारित एक सर्वसमावेशक, शांततापूर्ण व समंजस जग निर्माण होईल, ही भाबडी आशाच ठरली. प्रत्यक्षात समोर येणारे जग साशंक, थोडे भेदरलेले आणि द्वेषावर आधारित दिसते. म्हणजे केवळ भारतातच नव्हे, तर अमेरिकेसारख्या प्रगत व दोनशे वर्षे लोकशाही राबवलेल्या देशातसुद्धा ‘ethnic nationalism’ची लाट आली आहे. युरोपातही तेच. आता निमप्रगत देशांतही तसेच वातावरण दिसते. याचे दर्शनी स्वरूप म्हणजे उदार लोकशाही आणि सेक्युलॅरिझम यांचा निवडणूक मार्गाने पराभव. प्रत्येक जागी ‘strongman culture’- अगदी एकाधिकारी वा हुकूमशहा सदृश्य लोक निवडणुकीच्या मार्गाने राज्यावर आले. मग अमेरिकेत ट्रम्प, तर ब्राझील, टर्की इत्यादी अनेक देशांत त्यांच्या प्रतिकृती राज्यावर आल्या. या साऱ्यांचा पूर्वजाहीर अजेंडाच संकुचित वंशाधारित वा धर्माधारित राष्ट्रवाद हाच होता. म्हणजे लोकांनाही हेच हवे, असे चित्र निर्माण झाले.

.............................................................................................................................................

सोशल मीडियासंबंधी नवी दृष्टी व नवं भान देणाऱ्या मराठीतल्या या पहिल्याच पुस्तकाचं मन:पूर्वक स्वागत - प्रा. संजय तांबट, रानडे इन्स्टिट्यूट, पुणे.

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/4986/Social-Media?fbclid=IwAR1Fa3_2jO7gy5f-tvrrrGJupZCxtsVVHc_uhdIS608hrd2ufcEtxCP3nK0

.............................................................................................................................................

आताच्या लोकसभा निवडणुकीने तर जगातील सर्वांत मोठ्या लोकशाही देशाला धार्मिक राष्ट्रवाद हवा आहे असे अधोरेखित झाले. म्हणजे जीडीपी ग्रोथ सर्वांत कमी, तरुणांची बेकारी सर्वांत जास्त, वित्तीय घोटाळे व पलायने, शेती व रिअल इस्टेट इत्यादी व्यवसाय बंद, हे सर्व माहीत असूनही लोकांनी ‘ते’ विरुद्ध ‘आपण’ अशा संकुचित जहाल धार्मिक राष्ट्रवादाला कवटाळले. एकीकडे ‘वसुधैव कुटुंबकम्’ म्हणायचे व दुसरीकडे मॉब लिंचिंग आणि प्रज्ञा ठाकूरचे समर्थन करायचे, या वरकरणी विसंगत वर्तनाचे कारण काय?

या ग्लोबल फेनामेनाचे एक मुख्य कारण जागतिकीकरण, तंत्रज्ञान आणि लोकसंख्या वाढीचा वेग यात दडलेले आहे. वरकरणी हव्याश्या वाटणाऱ्या ग्लोबलायझेशनचा व तंत्रज्ञानाचा फायदा आणि उत्तम उपयोग करून घेऊनही त्याच वेळी त्याच्याशी कोप-अप करण्याची भीती, शंका व ‘स्वत्व’ गमावण्याची धास्ती, हे सर्व लोकांना बेचैन, कातर करणारे वाटते. वेगात एकत्र येणारे जग व निरनिराळ्या प्रकारच्या लोकांशी जमवून घेणे, आदान-प्रदान करणे त्यांना कठीण, नकोसे व थोडे भितीदायकही वाटते. अशा वेळी लागणारे ‘Security blanket’ हे त्यांना आपापल्या टोळीत, जातीत वा धर्मातच दिसते. मग आपापल्या धार्मिक, वांशिक वा जातीय कवचात जाणेच जास्त सुरक्षित वाटते, कम्फर्टेबल वाटते. ‘आपल्या’ लोकांबरोबर सुरक्षित आणि ‘परक्या’ किंवा ‘उपऱ्या’ लोकांबरोबर असुरक्षित अशी मानसिकता प्रबळ होते. अगदी अमेरिकेतील कित्येक उच्चशिक्षित एनआरआय बंधूसुद्धा अमेरिकेत कडक सेक्युलॅरिझमचा तर भारतात कडव्या धार्मिक राजवटीचा पुरस्कार एकाच वेळी करताना दिसतात ते याचमुळे. आपल्या ‘स्वत्वाची’ ही लढाई आहे, अशी मानसिकताही प्रबळ दिसते.

तंत्रज्ञानाच्या ‘exponential growth’ बरोबरच जगाची अफाट वाढणारी लोकसंख्या आणि त्या अनुषंगाने होणारी घुसळण आपोआपच ‘आपण’ विरुद्ध ‘ते’ असे जग विभागण्यास कारणीभूत होते. पुन्हा एकदा, ‘हे विश्वचि माझे घर’ म्हणायचे आणि आपापल्या वंशाच्या वा जातीच्या टोळीत वा गल्लीत सुरक्षित समजायचे ही विसंगती पावलोपावली दिसू लागते.

अशा असुरक्षित, अनिश्चित व दोलायमान अवस्थेतील लोक व समाज एका ‘त्रात्या’कडे झुकतात. यामुळे स्ट्राँगमन कल्चर फोफावते. अशा भेदरलेल्या किंवा अस्थिर समाजाची मानसिकता कशी ‘exploit’ करायची हे कौशल्य व त्याचे मार्केटिंग असे धूर्त स्ट्राँगमन बरोबर करतात. ‘ते’ किंवा ‘उपरे/परके’ यांचे भयानक व भडक चित्रण करून बहुसंख्य ‘आपण’च कसे ‘बिच्चारे’ आहोत आणि ‘त्यांच्या’ शारीरिक, सांस्कृतिक, आर्थिक आक्रमणाचे कसे बळी ठरणार आहोत, अशी हवा हे स्ट्राँगमन व त्यांच्यामागची कडव्या संस्थांची ‘silent’, ‘invisible’ आर्मी शिताफीने करत असतात. हिटलरच्या गोबेल्स नावाच्या प्रचारमंत्र्याने हे तंत्र पूर्णत्वास नेले आणि आज त्याला ‘व्हॉटसअ‍ॅप व ट्रोल’ आर्मीची जोड, म्हणजे हा विषारी वेलू किती जोमाने जगभर फोफावला आहे, याची कल्पना येईलच.

खरे म्हणजे टोळी, जमाव, जमात यांत सुरक्षितता आणि परके/उपरे यांपासून धोका ही संकल्पना माणसाच्या आदिकालापासून आहे. त्यामानाने उदारमतवादी लोकशाही, सेक्युलॅरिझम या संकल्पना गेली दोन शतकेच राबवल्या गेल्या. तेव्हा माणूस कितीही सुधारला, सुशिक्षित वा सुसंस्कृत झाला तरी मूळ प्रवृत्ती उफाळून वर यायला एखादा धक्का वा व्हॉटसअ‍ॅप मार्केटिग कॅम्पेनही पुरते हे जगभर दिसते. अगदी अमेरिकेसारख्या लोकशाही मूल्ये व सेक्युलॅरिझमचा उदो उदो करणारा देशही, ट्रम्प नावाचा स्ट्राँगमन ‘White Nationalism’च्या नशेत बुडवतो. तेव्हा भारत, ब्राझील, टर्की इत्यादी निमप्रगत देशांचे काय सांगावे? म्हणूनच भारतात आलेली ‘आपण/भूमिपुत्र/देशभक्त’ विरुद्ध ‘ते/परके/उपरे/देशद्रोही’ ही लाट आणि अगदी सुशिक्षित वर्गाचासुद्धा व्हॉटसअ‍ॅपवरील अतिउजव्या/कडव्या/हिंसक/धर्माधिष्ठित राष्ट्रवादाचा उन्माद हा केवळ भारतापुरता मर्यादित नसून, एका जागतिक फेनामेनाचा भाग आहे, हे लक्षात घेतले, तर यावरील उपाय व इलाज सुचतील.

उदार लोकशाहीवादी लोकांच्या केवळ सदिच्छा आणि महात्मा गांधींसारखी प्रतीके इत्यादी पुरेसे नाही. टेक्नॉलॉजी हे एक दुधारी शस्त्र आहे. ते कोणीही वापरू शकतो, त्यावर उजव्या वा कडव्या लोकांची मक्तेदारी नाही. तेव्हा जुन्या पठड्या वा पोथ्या सोडून, नवीन सोशल मीडिया तंत्रज्ञानाचा हिरिरीने वापर करून तरुण पिढीपर्यंत, त्यांना समजेल, भावेल अशा शैलीने पोहचणे फार महत्त्वाचे आहे. निराशा आणि आपापसातील भांडणे या रोगांवरही उपाय शोधणे आवश्यक. ध्येयवादी तरुण कार्यकर्ते (टगे नव्हे) तयार करणे, त्यांचे तात्त्विक व तांत्रिक प्रशिक्षण करणे हे पायाभूत काम आहे, नुसती भाषणे ठोकणे नव्हे, हेही कधी लक्षात आल्यास लोकशाही पुरस्कर्त्यांचे भले होण्याचा संभव आहे.

अर्थात, सारेच काही अंधारमय वा निराशाजनक आहे असे अजिबात नाही. आशेचे किरण आत्ताच दिसत आहेत. पश्चिम युरोपने वंशाधारित राष्ट्रवादाची लाट नुकतीच परतवली आहे. अमेरिकेतही डेमॉक्रॅटिक पक्षाने मरगळ झटकून वांशिक राष्ट्रवादाचा प्रतिकार करायला सुरुवात केली आहे. आम्ही उदारमतवादी आणि सेक्युलर आहोत, असे अभिमानाने सांगणारी तरुणांची व स्त्रियांची मोठी फळी अमेरिकेत पुढे सरसावली आहे. याचे परिणाम पुढील निवडणुकीत दिसतील, अशी आशा करू या.

आता भारताचे काय?

(‘साधना’ साप्ताहिकाच्या १५ जून २०१९च्या अंकातून)

.............................................................................................................................................

लेखक सुनील देशमुख गेली ४५ वर्षे अमेरिकेत वास्तव्य करत असलेले उद्योजक असून ते सामाजिक कार्यातही सक्रिय आहेत. ‘महाराष्ट्र फाउंडेशन’, अमेरिका यांच्या वतीने मागील २५ वर्षे मराठी साहित्य व महाराष्ट्रातील समाजकार्य या दोन क्षेत्रांतील व्यक्तींना व संस्थांना पुरस्कार देऊन गौरवले जाते, या पुरस्कारांचे प्रवर्तक अशी त्यांची ओळख विशेषत्वाने आहे.

sunild@aol.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

Post Comment

Gamma Pailvan

Mon , 29 July 2019

सुनील देशमुख, जेव्हा काश्मिरी हिंदूंना नेसत्या वस्त्रानिशी हाकलून देण्यात आलं होतं तेव्हा कुठे धडपडायला गेला होता तुमचा उदारमतवाद? जरा कुठे मोदींनी देशद्रोह्यांना ठोकायला सुरुवात केली की तुम्हांस तो स्ट्राँगमॅन वाटू लागतो. पण आज मोदींमुळेच काश्मिरात दहशतवादी कारवाया थंडावल्या आहेत, हे तुम्हांस का बरं दिसंत नाही? असो. मॉब लिंचिंग झालं म्हणून तुम्ही गळे काढता, आणि तुम्हाला भाजप व संघाच्या कार्यकर्त्यांच्या केरळातल्या हत्या दिसंत नाहीत? या हत्यांची एम.एम.मणी याने जाहीर कबुली दिली आहे. यूट्यूब वर जाऊन पहा व्हिडियो सापडतील. भारतीय मतदारांनी एकदा सोडून दोनदा मोदींना निवडून आणलेलं आहे ते उगाचंच का? मतदार व्यवहारी आहे. त्याला आपला कोण आणि परका कोण ते बरोब्बर कळतं. आपला नम्र, -गामा पैलवान


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा