ज्या गोष्टीत आनंद मिळत नाही, ती करायची नाही, असं मी ठरवलं!
पडघम - माध्यमनामा
भक्ती चपळगावकर
  • भक्ती चपळगावकर
  • Sat , 01 June 2019
  • पडघम माध्यमनामा टीव्ही पत्रकारिता TV Journalism वृत्तवाहिन्या News Chanels भक्ती चपळगावकर ‌Bhakti Chapalgaonkar

माझ्या हक्कांसाठी भांडायला मी कधी मागेपुढे बघितलं नव्हतं. पण इथं मुळात मला हे करायचं आहे का हाच प्रश्न होता. स्वतःचा विकास करायचा असेल, तर आपल्यापेक्षा हुशार लोकांच्या संगतीत राहणं फायद्याचं. पण मग जिथं ‘मिडियोक्रिटी’ला उत्तेजना मिळत आहे, अशा वातावरणात काम करावं का, असा प्रश्न मी स्वतःला विचारला. ही मिडियोक्रिटी किंवा सामान्यपणा सगळीकडे कमी-जास्त प्रमाणात होता. माझ्या समोर फारसे पर्याय नव्हते. थोडक्यात मी पूर्णपणे ‘burn out’  झाले होते. ज्या गोष्टीत आनंद मिळत नाही, ती गोष्ट करायची नाही, असं ठरवलं! आधी सुटी घेतली, नंतर नोकरी सोडली!!

.............................................................................................................................................

रिपोर्टर्सच्या चेहऱ्यावरचा आवेश, आत्मविश्वास आणि स्मार्टनेस सामान्य प्रेक्षकांना आकर्षित करतो. टीव्हीच्या पडद्यावरून ते एका क्षणात दिवाणखान्यात प्रवेश करतात. त्यांच्या आयुष्यातला थरार तुमच्यापर्यंत पोहचवतात. याच कारणांमुळे अनेक तरुण-तरुणी या क्षेत्रांत येण्यासाठी धडपडत असतात. बातमी सादर करताना तुम्हाला त्या घटनेबद्दल संपूर्ण माहिती असणं आवश्यक असतं. पण कित्येकदा ती नसते आणि त्यातून काही गंमतीही होतात. अशा गंमती बहुतेक सर्व टीव्ही रिपोर्टर्सनी - अगदी मीसुद्धा- कमी-जास्त प्रमाणात केलेल्या असतील. त्यामुळे एखाद्या पत्रकाराला वेगळं करण्याचं कारण नाही. एकाच बातमीचा माग घेण्याची सोय आणि वेळ टीव्ही रिपोर्टरला नसतो आणि हेच कारण या गंमतींमागे असतं.

फार वर्षांपूर्वी माझ्या एका सहकारी मैत्रिणीला गोदरेज कंपनीच्या पीआरओनं फोन करून आमच्या परिसरात फ्लेमिंगोज आले आहेत, असं सांगितलं. खरं तर ही प्रत्येक वर्षी ठराविक काळात होणारी बातमी. पण तिने या आधी ही बातमी केली नव्हती. ती ठरल्याप्रमाणे कॅमेरामनला घेऊन बातमीसाठी गेली. ती दिसायला अतिशय सुंदर आणि पी टु सी करण्याकडे तिचा जास्त कल होता. निसर्गरम्य वातावरणात चांगला पी टु सी करता आल्यामुळे ती आनंदी होती.

आमचं प्रक्षेपण दिल्लीहून होत असे. बातमी पाठवायच्या आधी बातमीची क्षणचित्रं पाठवण्याची पद्धत होती. म्हणजे त्यांचा वापर हेडलाईनमध्ये करता येऊ शकत असे. आमच्या ऑफीसचा तंत्रज्ञ ती पाठवत असे. तो फुटेज पाठवत असताना जोरात ओरडला, ‘अरे, ये क्या है, इधर आओ. इधर आओ.’ त्याचा आरडाओरडा ऐकून आम्ही त्याच्याकडे पळत गेलो. जिनं बातमी केली तिच्याकडे बघत तो खदाखदा हसायला लागला. म्हणाला, “अरे, तुमने ये क्या शूट किया, ये फ्लेमिंगो नहीं, बगुला है, बगुला. भैंस के पीठ पे बैठता हैं, वो बगुला.”

त्या दिवशी आमची फारच करमणूक झाली. पण ब्युरो छोटा होता. एकमेकांच्या चुका सांभाळून घेण्याची सवय होती. त्याची फारशी चर्चा झाली नाही. सांभाळून घेण्याबरोबरच या चुका आपल्याकडूनही घडू शकतात याची कल्पनाही होती. फॅशन रिपोर्टरला पोलिटिकल कव्हरेजला जावं लागलं किंवा पोलिटिकल रिपोर्टरला स्पोर्टस् रिपोर्टिंग करायला भाग पाडलं तर आणखी काय होणार! पण कोणत्याही प्रकारचं रिपोर्टिंग करताना विषयाची थोडीफार माहिती असणं तेवढंच महत्त्वाचं. चोवीस तास रिपोर्टरनं आमच्या चाकरीत असावं अशी चॅनल्सची अपेक्षा असते. त्यात मग काही जण स्वतःच्या आवडीनिवडी जोपासतात. कारण ऐवीतेवी तुम्हाला काही वेगळं आयुष्य नसतं, मग कामाच्या काळात आपापले छंद, आवडीनिवडी जोपासा किंवा घरच्या जबाबदाऱ्या पार पाडा अशा गोष्टी सुरू होतात. यात काही गैर आहे असं मला बिलकूल वाटत नाही. माझा एकेकाळचा बॉस आम्हाला सांगे, ‘काम लवकर संपवा. कारण, लक्षात ठेवा, तुम्हाला तुमचं आयुष्य आहे.’ आता आम्ही आमच्या आयुष्याला काही वेळ दिला तर मग काम कसं होईल, असं त्याला सांगण्याची हिंमत कोणाला नव्हती!

पण काही बीट्स किंवा बातम्यांचे प्रकार असे आहेत, ज्या बातम्यांना नेहमीच मागणी असते. उदाहरणार्थ क्राईम किंवा मनोरंजन. अशा क्षेत्रांत काम करणारे अनेक पत्रकार अतिशय चोख काम करतात. त्यांच्या बातम्यांना नेहमीच मागणी असल्यानं त्यांना स्वतःचे सोर्सेस तयार करायला वेळ मिळतो. मी काम करत असताना माझ्या आजुबाजूला या बीटमध्ये काम करणारे अतिशय हुशार बातमीदार होते. त्यांना त्यांच्या क्षेत्रातले अचूक ज्ञान होते. ते ब्रेकिंग न्यूज देण्यात पटाईत होते आणि कामाबद्दल सिन्सिअर होते.

.............................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/4808/Surely-Your-Joking-Mr-Feynman

.............................................................................................................................................

राजकीय पत्रकारितेला फारशी मागणी नसल्यानं मी नागरी समस्या, ह्युमन इंटरेस्ट स्टोरीज, अपघात, रेल्वे, विकासाची कामं अशा प्रकारच्या बातम्या करायला सुरुवात केली. त्यात काही सुसूत्रता नव्हती. रिपोर्टिंग नेहमीच मनाप्रमाणे करता येई असं नाही. बऱ्याचदा अमुक अमुक ठिकाणी जा तिकडे तमुक तमुक व्यक्ती येणार आहे, आपल्या ढमुक ढमुक ठिकाणहून येणाऱ्या बातमीसाठी त्याचं मत हवं आहे, अशा प्रकारचं काम असे. माझी असं काम करायला मनाई नसे. आपण ज्या माध्यमात काम करतो, त्याची ती गरज आहे, याची जाणीव मला होती, पण फार कंटाळा येई. त्यात अनेकदा मला माझ्या प्रवृत्तीच्या फार विरोधात जाऊन काम करावं लागे. उदाहरणार्थ विमानतळावर जा, तिकडे क्रिकेटपटू येणार आहेत, त्यांच्यापुढे माईक धर, अशी सूचना देणारा फोन आला की, माझा रागानं तिळपापड होई. मी इतकी वर्षं काम करून जी प्रतिमा तयार केली आहे, त्याच्या विरोधात आता कसं काम करू असा प्रश्न मला पडे. त्यात अचानक वेगळ्याच विषयावर लाईव्ह चॅटसाठी उभं राहण्याचे प्रसंग वारंवार येऊ लागले. लाईव्ह चॅट रिपोर्टरसाठी पर्वणी असते, कारण त्यात तिला किंवा त्याला पडद्यावर बराच वेळ झळकता येते. पण माझा प्रॉब्लेम वेगळा होता, अचानक वेगवेगळ्या विषयांवर बोलावं लागलं तर त्याची तयारी नसे, मग त्यात काही चुका झाल्या की, मी कित्येक दिवस कुढत बसे.

एकीकडे माझं करिअर आणि दुसरीकडे एका लहान मुलाचं संगोपन अशा दोन्ही गोष्टी सुरू होत्या. या दोन्ही पातळीवर मी फार समाधानी नव्हते. माझा मुलगा खूप समजूतदार. त्यामुळे आई आपल्याजवळ नसते अशी त्याची तक्रार नव्हती. उलट तो रात्री झोपल्यावर मी घरी येई आणि मी सकाळी झोपेतून उठायच्या आधी तो शाळेत जाई. त्यामुळे दिवसेंदिवस त्याची-माझी मनमोकळी भेट होत नसे. तो कधी माझी फार आठवण करत नसे, पण मला त्याची फार आठवण येई.

असाच एकदा फोन आला. मी काम संपवून माझ्या मुलाला घेऊन शिवाजी पार्कात बसले होते. फोनवर ब्युरो चीफ होता- “भक्तीजी आपको गोरेगाव जाना पडेगा. वहाँ पर ++++ (item girl) रहती है. उनका लाईव्ह चॅट है. कॅमेरामन नया है. उसके साथ जाईएगा.” त्याच क्षणी आपण हे काय करतो आहोत, हा प्रश्न मी स्वतःला विचारला. कामाबद्दल तक्रार मी आधीही केली होती. पण हे सगळं किती व्यर्थ किंवा असलंच तर आपली अधोगती करणारं आहे, याची तीव्र जाणीव झाली. बरं मी हे काम करणार नाही असं म्हणणं चुकीचं होतं, कारण काम सांगणारा काही मुद्दामहून मला सांगत नव्हता. कारण कोणत्या प्रकारची बातमीदारी करायची आहे आणि कोणत्या प्रकारचे कार्यक्रम करायचे आहेत, याचं गणित आधीच ठरलेलं होतं. मी स्वतःहून या पीत पत्रकारितेचा एक भाग बनले होते. मुलाखत, मग ती कोणाचीही घ्यायची माझी तयारी होती, पण आरडाओरडा करणाऱ्या, द्वयर्थी बोलणाऱ्या व्यक्ती आणल्या की, ती बातमी होते, अशी बातमीची ‘व्याख्या’ झाली होती! या सर्कसचा हिस्सा बनणं किंवा न बनणं माझ्या हातात होतं.

त्याच काळात आमच्या वाहिनीनं प्रादेशिक क्षेत्रात प्रवेश करण्याचं ठरवलं. माझ्यासाठी ही सुवर्णसंधी होती. एकेकाळी राष्ट्रीय वाहिनीत प्रवेश करायला धडपडणारी मी आता पुन्हा मराठी पत्रकारितेत यायला उत्सुक होते. तुझ्या अनुभवाचा आम्हांला फायदा होईल आणि मुख्य म्हणजे ही नवी वाहिनी ब्रेकिंग न्यूज पॅटर्नने चालणार नाही, याची ग्वाही मला देण्यात आली. वाहिनी सुरू होण्याच्या आधीचा ट्रेनिंगचा काळ फार छान गेला. माझ्या आजुबाजूला काम करायला उत्सुक असलेली नवखी मुलं-मुली होती. त्यांना ट्रेनिंग देत असताना मला पुन्हा शिक्षक म्हणून काम करायला मिळालं. मुलं-मुली अगदी रॉ होती आणि शिकायला उत्सुक होती. मी काही बुलेटिन्सची निर्मिती करावी असं ठरलं.

चॅनल सुरू झालं आणि माझ्या लक्षात आलं की, लाईव्ह बुलेटिनची निर्मिती करण्यासाठी जी एकाग्रता आवश्यक आहे, ती आपल्यात नाही. त्यात माझ्या काही नव्या पुरुष सहकाऱ्यांनी असहकार आंदोलन पुकारलं. एका बाईला आम्ही रिपोर्ट करणार नाही, असा त्यांचा सूर होता. ही फालतू वागणूक मी यापूर्वी (किंवा नंतर) बघितली नव्हती. या पूर्वी वर्षानुवर्षं मी महिला सहकाऱ्यांबरोबर कमी आणि पुरुष सहकाऱ्यांबरोबरच जास्त काम केलं होतं. त्यामुळे हा प्रकार मला सुरुवातीला कळलाच नाही. स्टुडिओमध्ये निर्माता बसलेला असताना त्याच्याशी बाहेरच्या डेस्कवरून सतत संपर्क होत असतो. बातम्यांबद्दलचे अपडेट देणारे एक-दोघं जण मला संबोधित न करता माझ्यापेक्षा ज्युनिअर असलेल्या माझ्या पुरुष सहकाऱ्याशी बोलत असत. हे असं होऊ शकतं, हे माझ्या कल्पनेच्याही पलीकडे होतं.

बरं असं वागणारे महाभागही एक-दोनच होते. हा काय प्रकार आहे, अशी चौकशी मी संपादकांकडे केल्यावर, ‘जाऊ दे गं, ते तुझ्याच मराठवाड्यातले आहेत. बायकांना ‘बॉस’ म्हणून बघण्याची त्यांना सवय नाही.’ असं सांगण्यात आलं. आधीच मी वैतागलेले होते. त्यात निर्मिती क्षेत्रात फार विचार न करता प्रवेश केला होता. आणि त्यात हे असे अनुभव म्हणजे वैतागाचा कडेलोट होता. माझ्या हक्कांसाठी भांडायला मी कधी मागेपुढे बघितलं नव्हतं. पण इथं मुळात मला हे करायचं आहे का, हाच प्रश्न होता.

स्वतःचा विकास करायचा असेल तर आपल्यापेक्षा हुशार लोकांच्या संगतीत राहणं फायद्याचं असतं. पण मग जिथं ‘मिडियोक्रिटी’ला उत्तेजना मिळत आहे, अशा वातावरणात काम करावं का, असा प्रश्न मी स्वतःला विचारला. ही मिडियोक्रिटी किंवा सामान्यपणा सगळीकडे कमी-जास्त प्रमाणात होता. माझ्या समोर फारसे पर्याय नव्हते. थोडक्यात मी पूर्णपणे ‘burn out’  झाले होते. ज्या गोष्टीत आनंद मिळत नाही, ती गोष्ट करायची नाही, असं ठरवलं! आधी सुटी घेतली, नंतर नोकरी सोडली!!

आज इतक्या वर्षांनंतर मला माझा निर्णय योग्य वाटतो का, तर हो! इतक्या वर्षांत कधी एकदाही मला पुन्हा त्या वाटेला परत फिरकावंसं वाटलं नाही. एका गोष्टीची कमतरता मला जाणवते, ती म्हणजे मी मुळात माणसांत रमणारी आहे. घरी एकटं राहणं मला फारसं आवडत नाही. कामानिमित्त भेटलेले लोक आठवतात. त्यांच्याशी झालेल्या गप्पा आठवतात. इतर रिपोर्टर्स-कॅमेरामनबरोबरही खूप काळ घालवला. त्यांचे डबे खाल्ले, त्यांच्याबरोबर प्रवास केला, हेही आठवतं.

मी नोकरी सोडली तरी माझा स्वभाव रिपोर्टरचाच आहे. मला आजुबाजूच्या घटनांबद्दल रस आहे. मला लोकांना भेटायला, त्यांच्याबद्दल जाणून घ्यायला आवडतं. मला जे वाटतं, ते मी लिहिते. काही वेळा ते कुठेतरी प्रकाशित होतं, बऱ्याचदा माझ्या कम्प्युटरवर राहतं. मी फारसा केबल टीव्ही बघत नाही. त्यावरच्या बातम्या तर नाहीच. त्या मला आकर्षित करत नाहीत. बातम्या मी फक्त वेबसाईट्सवर वाचते- काही न्यूज चॅनल्सच्या, तर काही वर्तमानपत्रांच्या. हे मात्र मी दिवसांतून चार-पाच वेळा तरी करते.

मी टीव्ही पत्रकारिता का सोडली हे मला सांगावंसं वाटलं. कारण गेल्या काही महिन्यांत माध्यमांबद्दल पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. विशेषतः निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर न्यूज चॅनल्स आणि त्यांच्या कार्यपद्धतीवर वेगवेगळी मतं व्यक्त होत आहेत. या चर्चेत भाग घेण्यापेक्षा मला आलेले अनुभव मला सांगावेसे वाटले. न्यूज चॅनल्सची कार्यपद्धती हा फार मोठ्या अभ्यासाचा विषय आहे. माझी त्याबाबत काही मतं आहेत, पण अभ्यास नाही. त्यामुळे इथं त्यावर मी चर्चा करणार नाही. न्यूज चॅनल्समध्ये काम करणं सोडून दिल्यापासून एक गोष्ट प्रकर्षानं जाणवतं. मला मुलाखती घ्यायला आवडतात. कधी तरी मी माझ्या मनाप्रमाणे मुलाखती घेईन. मी निवडलेल्या व्यक्ती आणि मी ठरवलेले प्रश्न...

(समाप्त)

.............................................................................................................................................

‘मी टीव्ही पत्रकारिता का सोडली?’ या मालिकेतील इतर लेख वाचण्यासाठी लेखिकेच्या नावावर क्लिक करावे.

.............................................................................................................................................

लेखिका भक्ती चपळगावकर मुक्त पत्रकार आहेत.

bhaktic3@hotmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

Post Comment

Gamma Pailvan

Sat , 08 June 2019

भक्तीताई, प्रांजळ कथन आवडलं. प्रत्ययी आहे. हिंदी सिनेमातल्या हिरोच्या जागी स्वत:ला ठेवून पब्लिक पिक्चर पाहतं. तसंच 'मी जर पत्रकार असतो तर ....' असं काहीसं तुमची लेखमाला वाचल्यावर वाटतं. हे तुमच्या लेखनाचं यश आहे. पुढील वाटचालीस शुभेच्छा. आपला नम्र, -गामा पैलवान


Bhagyashree Bhagwat

Sun , 02 June 2019

अतिशय सुंदर, सरळसोट आणि unbiased लेख!


Alka Gadgil

Sat , 01 June 2019

फ्लेमिंगोची नाही, बगळ्यांची नाही मूर्खांची माळ फुले


Alka Gadgil

Sat , 01 June 2019

फ्लेमिंगोची नाही, बगळ्यांची नाही मूर्खांची माळ फुले


Praveen Bardapurkar

Sat , 01 June 2019

भक्ती , मला तुझी ही लेखमाला आवडली ; त्याची कारणं - -काय सांगायचं आहे त्याबद्दल स्पष्टता आणि सूत्रबद्धता . -छान मराठी ; आजकाल असं व्यवस्थित आणि वाचताना आनंद मिळेल असं मराठी अपवादानं वाचायला मिळतं . -स्वत:च्या अटींवरची तुझी पत्रकारिता . पत्रकारितेच्या सुरुवातीच्या दिवसात तुला पहिलं असल्यानं तुझं हे लेखन मला तरी फारच मॅच्युअर्ड वाटलं , छान ! -प्रवीण बर्दापूरकर


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा