काँग्रेसला गांधी परिवाराच्या बाहेर जाऊन विचार करावा लागेल. त्यातच पुनरुज्जीवनाची बीजे आहेत.
पडघम - देशकारण
शास्त्री रामचंद्रन
  • काँग्रसचे बोधचिन्ह
  • Wed , 29 May 2019
  • पडघम देशकारण काँग्रेस Congress राहुल गांधी Rahul Gandhi सोनिया गांधी Soniya Gandhi नेहरू Nehru नरेंद्र मोदी Narendra Modi भाजप BJP

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, जनरल सेक्रेटरी प्रियांका गांधी यांनी आपल्या पदांचे राजीनामे देण्याची योग्य वेळ आता आली आहे. राजीनामा का द्यावा, याबाबतची सबळ कारणेदेखील त्यांच्यापाशी आता आहेत. कर्णधारामुळेच बोट बुडत आहे की, सदोष बोटीमुळे कर्णधाराचे नुकसान होते आहे, हा मुद्दा गौण आहे. ही योग्य वेळ आणि संधी आहे, ज्यावेळी पक्षाच्या पुनरुत्थानासाठी काहीतरी सकारात्मक करता येईल. भारतातील पहिला परिवार म्हणून ओळख असणाऱ्या गांधी परिवाराची ही जबाबदारी आहे. पक्ष संघटनेत मूलभूत बदल घडवून आणणे, पुनरुज्जीवन करणे, यासाठी पहिली अट आहे, ती म्हणजे काँग्रेस संघटनेपासून या परिवाराने आपली नाळ तोडली पाहिजे. (म्हणजे पदांवरून दूर व्हावयास हवे.) यामुळे लोकांमध्ये योग्य तो संदेश जाईल. 

अभिजात साहित्याच्या माध्यमातून परिवाराला सोडून जाणाऱ्या आणि स्वत:चा शोध घेऊन परत येणाऱ्या नायकांचा आपल्याला बोध झालेला आहे. असे नायक यशस्वी ठरल्याचेही आपणास ठाऊक आहे. ही काँग्रेसने आचरावयाची गोष्ट आहे. यामुळे लोक त्यांच्या सोबत राहतील.

कॉग्रेस पक्ष गेल्या पाच वर्षांत मोठ्या चार आणि इतर काही छोट्या परीक्षांना सामोरा गेला आहे. २०१४ च्या सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेसचे केवळ ४४ खासदार निवडून आले. जिथे सत्ता होती त्या दिल्लीत दारुण पराभव झाला. उत्तर प्रदेशमध्येही निराशा वाट्याला आली. थोडाफार अपवाद वगळता गठबंधन करूनही काही उपयोग झाला नाही. मागील वर्षी झालेल्या तीन राज्यांच्या विधानसभा निवडणुकांत थोडीफार चांगली कामगिरी करता आली.

...............................................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/4874/Deshbhakt-ani-andhbhakt

...............................................................................................................................................................

नुकत्याच झालेल्या सतराव्या लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसचे केवळ ५२ खासदार निवडून आले आहेत. त्यापैकी २३ खासदार केवळ केरळ आणि तमिळनाडून राज्यातील आहेत. म्हणजे देशाच्या उर्वरित भागात काँग्रेसची कामगिरी सुमार आहे. एक डझनहून अधिक राज्ये अशी आहेत, जिथून काँग्रेसला एकही उमेदवार निवडून आणता आलेला नाही. लोकसभा सदस्य संख्येच्या दृष्टीने सर्वांत मोठ्या राज्यात म्हणजे उत्तर प्रदेशमध्ये रायबरेली मतदारसंघातून केवळ सोनिया गांधी या एकमेव उमेदवार विजयी झाल्या आहेत. केरळ सोडून इतर कुठल्याही राज्यात काँग्रेसला दोन आकडी जागा मिळवता आलेल्या नाहीत. तामीळनाडूमध्ये आठ जागा जिंकता आल्या. तिथे डीएमकेच्या स्टॅलिन यांनी निवडणुकीपूर्वी राहुल यांना ‘युपीएचे पंतप्रधानपदाचे उमेदवार’ असे संबोधले होते. पंजाबमध्ये काँग्रेसला बऱ्यापैकी यश मिळवता आले. बाकी ठिकाणी ‘मोदी लाटे’त कुठेच टिकाव लागू शकलेला नाही.

या परिस्थितीत काँग्रेस पक्षाच्या धुरिणांना जर असे वाटत असेल की, आम्ही सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा लढू आणि पूर्वस्थिती प्राप्त करू, तर हा एक गैरसमज ठरेल. असे कदापि होणे शक्य नाही. काँग्रेस पक्ष सॉफ्ट हिंदुत्वाचे कार्ड वापरत आहे. ही त्यांची भूमिका वेळोवेळी दिसून आली आहे. ही भूमिका त्यांना अजिबात यश मिळवून देणारी ठरणार नाही. पक्ष जेव्हा आत्मपरीक्षण करायला बसेल, तेव्हा त्यांना गंभीर विचार करून अत्यंत कठोर निर्णय घेण्यावाचून पर्याय नाही. त्यांना प्रत्येक पाऊल सावधानपणेच टाकावे लागेल, अशी परिस्थिती आहे.

इथून पुढे हे विसरून जायला हवे की, आपला पक्ष सर्वस्वी परिवाराच्या हाती आहे. पक्षाची विद्यमान संरचनाच बदलून टाकावी लागेल. सदस्य संख्या वाढवावी लागेल. वेगवेगळे मुद्दे घेऊन युवा पिढीपर्यंत पोचावे लागेल. हाती घेतलेले मुद्दे जनतेपर्यंत पोचवावे लागतील. देशभरामध्ये सर्वत्र आपली उपस्थिती दाखवून द्यावी लागेल. नव्या चेहऱ्यांना पुढे आणून त्यांना प्रतिनिधित्व द्यायला हवे. प्रयत्नशील कार्यकर्त्यांना प्रोत्साहित करायला हवे. या गोष्टी करूनच त्यांना नव्या राजकारणात टिकता येईल.

काँग्रेस पक्षाने हा विचार करायला हवा की, लोकशाही मूल्यांना आपण कशा पद्धतीने उजागर करू शकू, यशस्वी करू शकू? केवळ निवडणुका लढवणारा पक्ष, इतक्या मर्यादेत राहून आता चालणार नाही. सामाजिक बदल घडवून आणण्यासाठी ज्या गोष्टी कराव्या लागतील, त्या करण्यासाठीचे एक साधन बनून पक्षाला प्रयत्न करावे लागतील. सामाजिक बदलासाठी झटणारा, लोकोपयोगी पडणारा पक्ष असा आकार स्वत:ला द्यावा लागेल. यासाठी गांधी परिवाराच्या पलीकडे जाऊन विचार करावा लागेल. समोर आव्हानांचा डोंगर आहे. त्याला सामोरे जायचे असेल तर सातत्याने प्रयत्न करावे लागतील. नव्या विचारांच्या आविष्कारातूनच पक्षाला पुनरुज्जीवित करता येईल. नाहीतर इथून पुढच्या प्रत्येक निवडणुकीमध्ये हार पत्करावी लागेल. एखाद्याकडे अंतीम विधीसाठीसुद्धा पैसे नसतात, त्यावेळी जी अवस्था ओढावते, तशी अवस्था येऊ नये, याची काळजी घ्यावी लागेल.

भव्य असा १३४ वर्षांचा इतिहास काँग्रेसला लाभलेला आहे. कुटुंबाच्या बाहेर पडण्याची कठोर पावले आता उचलावी लागतील. त्यातच काँग्रेसच्या पुनरुज्जीवनाची बीजे आहेत.

मराठी अनुवाद - सतीश देशपांडे

.............................................................................................................................................

हा मूळ इंग्रजी लेख ‘आउटलुक’ साप्ताहिकाच्या पोर्टलवर २४ मे २०१९ रोजी प्रकाशित झाला आहे. मूळ लेखासाठी पहा -

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख