आपला देश हळूहळू ‘विध्वंसा’च्या मार्गावर जात आहे का?
पडघम - देशकारण
गणेश चांदजकर
  • डावीकडील बेगुसरायमधील पीडित, उजवीकडे वरच्या बाजूला मध्यप्रदेशमधील तर खालच्या बाजूला नवी दिल्लीतील पीडित
  • Tue , 28 May 2019
  • पडघम देशकारण नरेंद्र मोदी Narendra Modi भाजप BJP हिंदुत्व Hindutv हिंदुत्ववादी Hindutvavadi

२३ मे रोजी १७व्या लोकसभा निवडणुकांचे निकाल लागले. त्यात भारतीय जनता पक्ष आणि मोदींना प्रचंड बहुमत मिळाले. एकट्या भाजपच्या पदरात तब्ब्ल ३०३ जागा मतदारांनी टाकल्या. बहुदा नेहरू आणि इंदिराजीनंतर मोदींनाच सलग दुसऱ्यांदा निर्विवाद बहुमताचे सरकार स्थापन करण्याची संधी मिळाली असेल. या निर्विवाद यशाबद्दल नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा अभिनंदनास पात्र आहेतच. पण काँग्रेसदेखील या नामुष्कीजनक पराभवातून उभी राहील आणि एक सक्षम विरोधी पक्ष म्हणून आगामी पाच वर्षे काम करेल, एवढीच एक भारतीय मतदार या नात्याने अपेक्षा वाटते. 

नोव्हेंबर २०१८ मध्ये राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड या तीन राज्यात काँग्रेस सरकारे आल्यानंतर भाजपला येणारी निवडणूक सोपी नक्कीच नसेल, अशी परिस्थिती निर्माण झाली होती. भाजप नेतृत्वालाही याची जाणीव झाल्यांनतर एनडीएतील शिवसेना व इतर मित्रपक्षांच्या बिनबोभाट नाकदुऱ्या काढण्यात आल्या. पंतप्रधान मोदी आणि अमित शहांनी संपूर्ण निवडणूक प्रखर राष्ट्रवाद, उग्र हिंदुत्व आणि बहुसंख्याकांकडे झालेले तथाकथित दुर्लक्ष या विषयावर जिंकली, असेच म्हणावे लागेल. त्याला जोड मिळाली ती मोदींनी पाच वर्षांतील शासकीय योजनांचं केलेलं ब्रँडिंग आणि मजबूत संघटना यांची.

तर दुसऱ्या बाजूला विरोधी पक्ष नोटबंदी, जीएसटीमुळे व्यापाऱ्यांमधील नाराजी, वाढलेली बेरोजगारी हे महत्त्वाचे मुद्दे हिरिरीने मांडण्यात सपशेल अपयशी ठरला, हेही वास्तव नाकारता येणार नाही.

आता ही कारणमीमांसा अशीच पुढील पाच वर्षेदेखील चालूच राहील, पण भारताला लागू पडलेली ही बहुमताची मात्र या राष्ट्राला कोणती दिशा देणारी असेल याची चुणूक काही दिवसांतच दिसायला लागलेली आहे. लोकसभा निवडणुकीमधील भाजपचा दिग्विजयी रथ म्हणजे देशातील बहुसंख्याक धर्मांधांची मक्तेदारी, हा चुकीचा समज तथाकथित कट्टरतावादी हिंदूंना झालेला दिसतो आहे. हे हिंदू राष्ट्र नाही आणि असणारही नाही, हे या उपटसुंभांना थेट पंतप्रधान मोदींनी सांगायची वेळ आलेली आहे.  तसे ते कधी सांगतील? सांगतील की नाही?

.............................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/4772/Mahilanvishayiche-Kayade

.............................................................................................................................................

याला प्रमाण म्हणजे मध्य प्रदेशातील सिवनी येथे एका मुस्लीम जोडप्याला गोमांस असल्याच्या संशयावरून बेदम मारहाण करण्यात आली. इतकेच नव्हे तर त्या पुरुषाला त्याच्या पत्नीला चपलेने मारहाण करण्यास भाग पाडण्यात आले. वर या सर्व प्रकारचे चित्रण करून व्हायरल करण्यात आले. 

दुसरी घटना आहे बिहारच्या बेगुसराय येथील. तिथे एका फेरीवाल्यावर तो फक्त मुस्लीम असल्याकारणाने गोळीबार करण्यात आला. त्याला पाकिस्तानात जाण्याचे सांगण्यात आले.

यात भर म्हणजे देशाची राजधानी दिल्लीजवळील गुरुग्राममध्ये चार-पाच अज्ञातांनी एक अल्पसंख्याक युवकास ‘येथे टोपी घालण्यास बंदी आहे’ असे बजावून त्याच्याकडून बळजबरीने ‘भारत माता की जय’, ‘जय श्री राम’च्या घोषणा वदवून घेतल्या. त्याला मारहाणही करण्यात आल्याचे वृत्त आहे. 

वरील घटनांकडे एक भारतीय नागरिक म्हणून पाहताना ही चिंता वाटते की, बहुतांश सहिष्णू असलेला या देशातील हिंदू समाज या घटनांवर फारशी कुठलीही प्रतिक्रिया देताना दिसत नाही. जे कोणी लेखक, पत्रकार, विचारवंत हे मांडतात त्यांना तर सरळसरळ ‘हिंदूविरोधी’च ठरवले जात आहे. बहुसंख्याकांना भ्रमित करून आपला भाजप-संघप्रणीत हिंदू राष्ट्राचा अजेंडा रेटून नेण्याचा जो प्रकार आज राजरोस चालू आहे, तो खूप चिंताजनक आहे.

हे सगळे पाहून वाटते की, आपला देश हळूहळू ‘विध्वंसा’च्या मार्गावर जात आहे का? वरील तिन्ही घटनांमध्ये एक गोष्ट समान आहे. ती म्हणजे तिन्ही घटनांमध्ये अल्पसंख्याकांवरच हे हल्ले झालेले आहेत. दिल्लीत अरविंद केजरीवाल यांचे सरकार आहे, मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसचे सरकार आहे आणि बिहारमध्ये नीतीशकुमार-भाजप यांचे सरकार आहे. त्यामुळे त्या त्या राज्यातील सरकारांची ‘लॉ अँड ऑर्डर’ची जबाबदारी आहे, असा ठरलेला युक्तिवाद यांवर काहींकडून केला जातो. पण या तिन्ही घटनांमधील हल्लेखोर हे हिंदू राष्ट्राचे, भाजप-संघप्रणीत हिंदुत्वाचे पाठीराखे आहेत, हे लक्षात घ्यावे लागेल.

लोकांनी मोदींना पर्यायाने भाजपला दुसरी संधी ही केवळ ‘विकास’ या एकाच मुद्द्यावर दिलेली दिसते. याचा अर्थ काय घ्यायचा आणि देशाला पुढे कुठे न्यायचे, हा निर्णय आता फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी ठरवू शकतात.

देश अमृतमहोत्सवी वर्षाकडे वाटचाल करत असताना आपली लोकशाही अधिक प्रगल्भ व्हायला हवी की, तिची अधोगती, हे आपणच ठरवणार आहोत. गांधी-नेहरू-सरदार पटेल यांच्यापासून ते इंदिरा-वाजपेयींपर्यंत अनेकांनी या देशाला एकसंध राखले. त्यांनी राखलेले या देशाचे एकसंधपण, विविधतेतील एकता, थोडक्यात ‘आयडिया ऑफ इंडिया’ची संकल्पनाच धोक्यात येऊ लागली आहे.

२००२ साली तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी एक मंत्र दिला होता – ‘आप राजधर्म का पालन करें!’ मोदी सरकार, त्यांचा पक्ष भाजप, त्यांची मातृसंघटना राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि त्यांचे पाठीराखे, हा मंत्र पाळतील? की असेच देशाला नेत राहतील?

.............................................................................................................................................

लेखक गणेश चांदजकर ब्लॉगर आहेत.

chandajkar3@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

Post Comment

Nikkhiel paropate

Wed , 29 May 2019

सध्याच्या भाजपा वाचाळ विरांच्या statements वरुन तर अस वाटत राजधर्मचा पालन तर जाउ द्या.. अस सांगणाऱ्या त्या नेत्याल्याच हे पागल ठरवतील !!!!


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा