२०१९च्या निवडणुकीत मीही हरलो आहे का?
पडघम - देशकारण
रवीश कुमार
  • रवीश कुमार
  • Mon , 27 May 2019
  • पडघम देशकारण रवीश कुमार Ravish Kumar नरेंद्र मोदी Narendra Modi काँग्रेस Congress भाजप BJP संघ RSS

२३ मे रोजी निवडणूक निकाल जाहीर होत होते, तेव्हा माझ्या व्हॉटसअॅपवर तीन प्रकारचे मॅसेज येत होते. सुरुवातीला दोन प्रकारच्या मॅसेजविषयी सांगतो आणि शेवटी तिसऱ्या प्रकारच्या मॅसेजविषयी. कितीतरी मॅसेज अशा प्रकारचे होते की, आज पाहू या की, रवीश कुमारला झटका बसतो की नाही? त्याचा चेहरा कोमजतो की नाही? एकानं लिहिलं की, तो रवीश कुमारला अगतिक होताना पाहू इच्छितो, बुडून मरून जाताना पाहू इच्छितो, पंक्चर झालेला पाहू इच्छितो. कुणीतरी विचारलं की, बर्नोलची ट्युब आहे, की पाठवून देऊ? कुणी लिहिलं की, तुमच्या चेहऱ्याचं छायाचित्र पाठवा, आम्हाला पाहायची इच्छा आहे. मी सगळ्यांना विजयाच्या शुभेच्छा दिल्या. शिवाय लाइव्ह कव्हरेज करताना या प्रकारच्या मॅसेजचाही उल्लेख केला आणि स्वत:वर हसलो!

दुसऱ्या प्रकारच्या मॅसेजमध्ये हे लिहिलं होतं की, आजपासून तुम्ही नोकरीची समस्या, शेतकऱ्यांचं दु:ख आणि पाण्याची समस्या दाखवणं बंद करा. ही जनता याच लायकीची आहे. बोलणं बंद करा. तुम्हाला वाटत नाही का, की तुम्ही रिजेक्ट झाला आहात? तुम्हाला विचार करायला हवा की, तुमची पत्रकारिता मोदींना का हरवू शकली नाही. मी कुणाविषयी पूर्वग्रह बाळगत नाही. एकवेळ बकरी पाळा पण पूर्वग्रह पाळू नका, यावरही मी लिहिलेलं आहे.

२०१९चा जनादेश माझ्याविरुद्ध कसा गेला? मी गेली पाच वर्षं जे लिहिलं, बोललो ते कसोटीला लागलं होतं? ज्या लाखो लोकांचं दु:ख आम्ही दाखवलं ते चुकीचं होतं? मला माहीत होतं की, तरुण, शेतकरी आणि बँकांमध्ये गुलामासारखं काम करणारे लोक भाजपचे समर्थक आहेत. तेही कधी माझ्याशी खोटं बोलले नाहीत. सर्वांनी सुरुवातीला किंवा नंतर कबूल केलं होतं की, ते नरेंद्र मोदींचे समर्थक आहेत. पण त्यामुळे मी त्यांच्या समस्या दाखवणं बंद केलं नाही. उलट त्यांची समस्या वास्तव असल्यामुळेच दाखवली. आज एक खासदार म्हणू शकत नाही की, त्यानं ५० हजारांपेक्षा जास्त लोकांना नोकरीचं नियुक्तीपत्र दिलंय. माझ्या ‘नोकरी सीरिज’मुळे दिल्लीपासून बिहारपर्यंतच्या अनेक लोकांना नियुक्तीपत्रं मिळाली आहेत. अनेक परीक्षांचे निकाल जाहीर झाले. त्यातील अनेकांनी शिव्या दिल्याबद्दल नियुक्तीपत्रं मिळाल्यावर माझी माफी मागितली. त्याची माझ्याकडे शेकडो पत्रं आणि मॅसेजेसचे स्क्रीनशॉट आहेत. त्यातील एकही जण हा पुरावा देऊ शकणार नाही की, मी कधी नरेंद्र मोदी यांना मत देऊ नका असं त्यांना सांगितलं होतं. हे जरूर सांगितलं होतं की, मत विचार करून द्या. मत दिल्यावर नागरिक व्हा!

मला मोदी समर्थकांकडून अगतिक केल्यानंतरही ही ५० हजार नियुक्तीपत्रं मी अभिमानानं छातीवर एखाद्या बिल्ल्यासारखी मिरवेन. कारण ते मला नाही, तर त्या मोदी समर्थकांना अगतिक करतील, ज्यांना आपल्या समस्यांसाठी माझ्याशी संपर्क केला होता. ‘नोकरी सीरिज’च्या दबावामुळेच प्रचंड बहुमतात असलेल्या मोदी सरकारला रेल्वेमध्ये लाखो नोकऱ्या द्याव्या लागल्या. कारण तो मुद्दा मी उचलून धरला होता. तुम्ही पाहू शकता की, संपूर्ण पाच वर्षांत रेल्वेतील किती रिक्त जागा जाहीर झाल्या आणि शेवटच्या वर्षांत किती जाहीर झाल्या? ही मागणी ‘गोदी मीडिया’ करत होता की, रवीश कुमार करत होता? ‘प्राइम टाइम’मध्ये मी ‘रेल्वे सीरिज’द्वारा दाखवलं की, स्वतंत्रता सेनानी एक्सप्रेससारख्या ट्रेन काही काळासाठी वेळेवर चालवायला मोदींचा विरोध होता? बिहारमधील महाविद्यालयांमध्ये तीन वर्षांच्या बीएच्या पदवीसाठी पाच-पाच वर्षं अडकलेल्या तरुणांविषयी बोलण्याला मोदींचा विरोध होता.

...............................................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/4874/Deshbhakt-ani-andhbhakt

...............................................................................................................................................................

या पाच वर्षांत माझं लेखन करोडो लोकांनी वाचलं आणि हजारोंच्या संख्येनं ऐकलं, टीव्हीवर पाहिलं. बाहेर भेटल्यावर अनेकांनी मला मिठी मारली, प्रेम दिलं. त्यात नरेंद्र मोदींचे समर्थक होते, संघाचे लोक होते आणि विरोधी पक्षाचेही लोक होते. भाजपचेही लोक होते, पण ते चूपचाप धन्यवाद देत होते. मला एक गोष्ट समजून चुकली, मोदींचा समर्थक असो की विरोधक तो ‘गोदी मीडिया’ आणि पत्रकारिता यामध्ये फरक करतो. कारण ‘गोदी मीडिया’चे अँकर्स मोदींच्या लोकप्रियतेच्या आडून माझ्या हल्ला करतात. त्यामुळे मोदींचे समर्थक शांत राहतात. भारतासारख्या देशात इमानदार आणि नैतिक होण्याचा सामाजिक आणि संस्थागत साचा नाही. इथं इमानदार असण्याची लढाई एकट्याची असते आणि हरण्याचीही. लोक विचारतात की, कुठे गेले सत्यवादी रवीश कुमार? कुठे गेले पत्रकारितेविषयी बोलणारे रवीश कुमार? माझ्यात उणीवा आहेत. मी आदर्श नाही. कधीही दावा केला नाही. पण जेव्हा तुम्ही बोलत असता, पत्रकारितेचं मोल सांगत असता, त्याविषयीच तर मी किंवा माझ्यासारखे अनेक पत्रकार सांगतात.

मला माहीत होतं की, मी माझ्या पेशाची हरणारी लढाई लढत आहे. एवढी मोठी सत्ता आणि कॉर्पोरेट भांडवलाच्या विरोधात लढण्याची ताकद फक्त म. गांधींमध्ये होती. पण मी जेव्हा पाहिलं की, माझ्यासारखे अनेक पत्रकार कमी पैशात पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहेत, तेव्हा वाटलं की आपण आणखी काम केलं पाहिजे. मी मोदींच्या विरोधासाठी रोज सकाळी इंग्रजीतून अनुवाद करून लिहीत नव्हतो. तर यासाठी लिहीत होतो की, वाचकांनी सजग व्हावं. त्यासाठी मी माझे अनेक तास घालवले. मी पूर्णपणे जाणून होतो की, हे मी एकटा फार काळ करू शकणार नाही. मोदी विरोधाची सणक नव्हती, तर आपल्या पेशाविषयी जरा जास्त प्रेम होतं. त्यामुळे मी स्वत:ला पणाला लावलं होतं. आपल्या पेशावर प्रश्न उपस्थित करण्याचं आव्हान होतं. स्वत:चा रोजगार घालवून बसण्याची फिकीर होती. तरीही काही वेळ करून पाहिलं. अशा प्रकाराचा एक ताण असतो, आव्हान असतं. मात्र जे शिकायला मिळतं ते दुर्मीळ असतं. पाकिटवाले प्रश्न विचारून मी मोदी समर्थकांआड तर लपू शकतो, पण तुम्हा वाचक-प्रेक्षकांसमोर येऊ शकत नाही.

मी जातीयतेच्या विरोधात सर्वांच्यामध्ये येऊन बोललो. आजही बोलेन. तुमच्यामध्ये धार्मिक आणि जातीय पूर्वग्रह बसलेले आहेत. तुम्ही मशीन होत चालला आहात. मी पुन्हा सांगतो की, धार्मिक आणि जातीय पूर्वग्रहांनी भरलेली सांप्रदायिकता तुम्हाला एक दिवस मानवी बॉम्ब बनवून टाकेल.  स्टुडिओमध्ये नाचणाऱ्या अँकर्सना पाहून तुम्हालाही वाटत असेल की, ही पत्रकारिता नाही. बँकांमध्ये गुलामांसारखं काम करणाऱ्या शेकडो महिलांनी गर्भ पडण्यापासून भयापासून ते शौचालयाच्या भयापर्यंतची पत्रं मी मोदींना विरोध करावा म्हणून लिहिली होती? मी मोदींचा अजेंडा चालवला नाही. ते माझं काम नव्हतं. जर तुमची माझ्याकडून तीच अपेक्षा असेल तरी मी पुन्हा हेच सांगेन की, तुम्ही एकदा नाही, शंभर वेळा विचार करा!

नक्कीच पत्रकारितेमध्येही ‘पूर्वायुष्यातील गुन्ह्यांच्या आठवणी’ आहेत. ज्यांना मोदी वेळी-अवेळी जागवत असतात. पण ते हे विसरतात की, त्यांच्या वेळच्या पत्रकारितेचं मॉडेल ‘पूर्वायुष्यातील गुन्ह्यांच्या आठवणीं’वरच आधारलेलं आहे. मी हे मानायला तयार नाही की, पत्रकारिता हरली आहे. एकवेळ पत्रकारिता संपेल, पण ती वेगळी गोष्ट आहे. जर पत्रकारिताच शिल्लक राहिलेली नसेल तर तुम्ही पत्रकारितेसाठी माझ्याकडे का पाहत आहात? तुम्ही पत्रकारितेच्या समूळ नाशाचा संकल्प केला आहे का? मी जेव्हा माझ्याविषयी बोलतो, तेव्हा त्यात ते सारे पत्रकार येतात, जे संघर्ष करत आहेत. पत्रकारिता संस्थांच्या अनैतिक बळामुळे संपली आहे हे नक्की. तिचा बचाव एकटीदुकटी व्यक्ती करू शकत नाही. अशा परिस्थितीत आमच्यासारखे लोक काय करू शकणार! तरीही याकडे केवळ मोदींचा विरोध याच चष्म्यातून पाहणं बरोबर ठरणार नाही. हा आपल्या पेशातल्या ऱ्हासाचा जास्त विरोध आहे, हे मोदी समर्थकांनी समजून घेतलं पाहिजे. मोदींचं समर्थन वेगळं आणि चांगल्या पत्रकारितेचं समर्थन वेगळं. मोदी समर्थकांनाही मी आवाहन करेन की, त्यांनी ‘गोदी मीडिया’ चॅनल बंद करावीत, वर्तमानपत्रं वाचणं बंद करावं. त्याशिवायही मोदींचं समर्थन करता येणं शक्य आहे.

दरम्यान २३ मे रोजी आलेलं तुफान निघून गेलंय, पण हवा अजून जोरात आहे. नरेंद्र मोदींनी भारतीय जनतेच्या हृदयावर-मनावर एकछत्री राज कायम ठेवलं आहे. २०१४मध्ये त्यांना मन:पूर्वक मतं मिळाली होती, २०१९मध्ये तनमनानं मतं मिळाली आहेत. शरीरावर आलेल्या अनेक समस्यांना झेलत लोकांनी त्यांना मन:पूर्वक मतं दिली आहेत. त्यांचा हा विजय उदारमनानं स्वीकारायला हवा. मीही स्वीकारतो. लोकांना ठोकरून तुम्ही लोकशाहीवादी होऊ शकत नाही. त्या आनंदात भविष्यातील आव्हानं पाहिली जाऊ शकतात. पण ती पाहण्यासाठी तुम्हाला लोकांमध्ये सामील व्हावं लागेल. हे समजून घेण्यासाठीही लोकांमध्ये सामील व्हावं लागेल की, अशी कुठली गोष्ट आहे जी लोकांना मोदी बनवते. लोकांनी मोदी होणं म्हणजे आपल्या नेत्याशी एकरूप होणं, तादात्म्य पावणं. याला अंधभक्ती म्हणता येईल, पण याकडे भक्तीच्या श्रेष्ठ अवस्थेच्या रूपातही पाहिलं जायला हवं. मोदींसाठी लोकांनी मोदी होणं, त्या श्रेष्ठ अवस्थेचं प्रतीक आहे. ‘घर-घर मोदी’ऐवजी तुम्ही ‘जन-जन मोदी’ असंही म्हणू शकता.

मी नेहमी म्हणतो की, २०१४नंतर या देशाचा भूतकाळ आणि भविष्य समजून घेण्याचा संदर्भबिंदू बदलला आहे. निकालाच्या आधीच पंतप्रधान मोदी ‘नव्या भारता’विषयी बोलत होते. तो ‘नवा भारत’ त्यांच्या विचारदृष्टीचा भारत बनला आहे. प्रत्येक जनादेशामध्ये अंदाज आणि शक्यता असतात. त्यापासून मुक्त असा कुठलाच जनादेश नसतो. जनतेनं अनेक शक्यतांमधून एक शक्यता निवडून दिली असेल, तर त्याचा अर्थ असा आहे की, त्यामध्ये या शक्यतांचा सामना करण्याचं पुरेसं धाडस आहे. तो भयभीत झालेला नाही. हा जनादेश भयातून आलेला नाही आणि या जनादेशामुळे भयभीत होण्याचंही कारण नाही. ऐतिहासिक कारणांमुळे लोकांमध्ये अनेक संदर्भबिंदू उजागर होत आहेत. दशकांपर्यंत त्यांनी त्याचा असंतोष प्रकट केला होता. नंतर ते आपल्या या अदलाबदलाच्या असंतोषाला कंटाळले. त्यांनी ते विचार थांबवले, जिथं पूर्वतिहातील अनैतिकतेवर प्रश्नचिन्ह लागलेलं होतं. जनता पूर्वतिहासातील असंतोषाच्या आठवणींतून बाहेर आलेली नाही. यावेळी असंतोषाच्या त्या आठवणींना विचारधारेच्या नावावर प्रकट करून ‘नवा भारत’ असं सांगितलं जात आहे.

मी नेहमीच सांगितलंय की, नरेंद्र मोदींना तोच सक्षम पर्याय असेल, ज्याच्याकडे नैतिक ताकद असेल. तुम्ही माझ्या लेखांमध्ये नैतिक बळ पाहू शकाल. नरेंद्र मोदींच्या पक्षात अनैतिक शक्ती आणि संसाधनांचं विपुल भांडार आहे. पण जनता त्याकडे ‘पूर्वायुष्यातील गुन्ह्यांच्या आठवणीं’च्या गुण-दोषाप्रमाणे पाहते, स्वीकारते. नरेंद्र मोदी त्या ‘‘पूर्वायुष्यातील गुन्ह्यांच्या आठवणीं’ना जिवंतही ठेवतात. तुम्हाला दिसेल की, ते प्रत्येक क्षणी त्याला अधोरेखित करत असतात. जनतेला ‘पूर्वायुष्याच्या वर्तमान’ ठेवतात. जनतेला माहीत आहे की, विरोधी पक्षांमध्ये त्या अनैतिक शक्ती आहेत, तशा मोदींकडे आहेत. विरोधी पक्षांना वाटलं की, जनता दोन समान अनैतिक शक्तींमधून त्यांना निवडेल. त्यामुळे त्यानं उरल्यासुरल्या अनैतिक शक्तींचा आधार घेतला. नरेंद्र मोदींनी त्या अनैतिक शक्तींनाही कमकुवत आणि उदध्वस्त केलं. परिणामी विरोधी पक्षांचे नेते भाजपकडे जाऊ लागले. विरोधी पक्ष मनुष्यबळ आणि आर्थिक स्त्रोत यांबाबतीत उणा पडू लागला. दोघांचा आधार अनैतिक शक्तीच होता. पण या परिस्थितीनं विरोधी पक्षांसाठी निवडणुकीपेक्षा आपल्या राजकीय आणि वैचारिक पुनर्जीवनाची चिंता करण्याचा नवा पर्याय निर्माण केला. पण ते त्यांनी केलं नाही.

विरोधी पक्षांनी पूर्वायुष्यातील असंतोषाच्या कारणांसाठी माफी मागायला हवी होती. नवा विश्वास द्यायला हवा होता की, आता असं होणार नाही. त्यासाठी सोसाट्याच्या वाऱ्यात अनवाणी चालायला हवं होतं. पण त्यानं ते केलं नाही. २०१४नंतर चार वर्षं घरी बसून राहिले. जनतेमध्ये गेले नाहीत. त्यांच्या समस्यांविषयी स्वत:च्या स्वार्थापोटी बोलले आणि घरी जाऊन बसले. २०१९ उजाडल्यावर त्यांनी उरल्यासुरल्या अनैतिक समीकरणाच्या आधारे महाकाय अनैतिक शक्तींशी टक्कर देण्याची आकांक्षा बाळगली. विरोधकांना समजायला हवं होतं की, वेगवेगळ्या राहुट्या असलेल्या राजकीय पक्षांची प्रासंगिकता संपलेली आहे. समाजवादी पार्टी, बहुजन समाज पार्टी, राष्ट्रीय जनता दल यांच्या माध्यमातून लोकशाहीत जे सामाजिक संतुलन निर्माण झालं होतं, त्याची आज कुठलेली भूमिका राहिलेली नाही.

या पक्षांनी समाजातल्या मागास आणि वंचित घटकांना सत्ताचक्रामध्ये फिरवून वरती आणण्याचं ऐतिहासिक काम नक्कीच केलेलं आहे. पण या क्रमात ते दुसऱ्या मागास आणि वंचित घटकांना विसरून गेले. या पक्षांत त्यांचं प्रतिनिधित्व इतर पक्षांप्रमाणेच नगण्य झालं. आता या पक्षांची प्रासंगितकताच राहिली नाही, त्यामुळे त्यांच्या समाप्तेचंही धाडस करायला हवं. भारतीय जनता आता नवा विचार आणि नव्या पक्षाचं स्वागत करेल, तोपर्यंत ती नरेंद्र मोदींच्या विचारावर चालेल!

समाज आणि राजकारणाचं हिंदूकरण झालं आहे. मी हे मानायला तयार नाही की, हे कायमस्वरूपी झालं आहे. ज्या प्रकारे बहुजन शक्तींची आगेकूच कायमस्वरूपाची नव्हती, त्याचप्रकारे हेही नाही. हे एक इतिहास-चक्र आहे. जसं मायावती सवर्णांच्या समर्थनामुळे मुख्यमंत्री झाल्या होत्या, त्याच प्रकारे संघ आज बहुजनांच्या समर्थनावर हिंदू राष्ट्र तयार करत आहे. जे सवर्ण होते, ते आपल्या जातीचं भांडवल घेऊन कधी सपा, बसपा आणि राजद यांच्या व्यासपीठावर आपला आधार शोधत होते. जेव्हा तिथं त्यांची आबादी वाढली, तेव्हा उरलेला बहुजन सर्वांसाठी असलेल्या व्यासपीठांवर गेला.

बहुजन राजकारणानं कधी जातींविरुद्ध राजकीय अभियान चालवलं. जातींच्या संयोजनाचं राजकारणं होतं, तेव्हा संघानंही त्या प्रकारचं राजकारण उभं केलं. प्रादेशिक पक्षांनी नंतर विकासाचं राजकारण केलं आणि काही कामही केलं हे नक्की, पण ते राष्ट्रीय पातळीवर आपल्या भूमिकांसाठी हाय-वे तयार करण्यापुरतेच सीमित राहिले. चंद्रभान प्रसाद यांचं एक वाक्य आठवतं. ते म्हणत – ‘मायावती आर्थिक मुद्द्यांवर का बोलत नाही? परराष्ट्र धोरणावर का बोलत नाही?’ साऱ्याच प्रादेशिक पक्षांची ही अवस्था आहे. ते प्रादेशिक राजकारण करतात, पण देशाचं राजकारण करू शकत नाहीत.

बहुजनांच्या रूपानं वर आलेल्या राजकीय पक्षांनी आपल्या विचारधारेचं पुस्तक कधीच फेकून दिलंय. त्यांच्याकडे आंबेडकरांसारखी सर्वाधिक तर्कनिष्ट व्यक्ती आहे, पण आता आंबेडकर प्रतीक आणि अहंकाराचं कारण झाले आहेत. छोटे-छोटे गट चालवण्याचे कारण झाले आहेत. आमचे मित्र राकेश पासवान म्हणतात की, दलित राजकारणाच्या नावावर आता पक्षांचे राष्ट्रीय अध्यक्षच होता येतं, राष्ट्रीय राजकारण करता येत नाही. कारण बहुजनांचं गांधीवादासारखं एक दुकान झालं आहे. यातली एकही व्यक्ती विचारधारेच्या जोरावर राष्ट्रीय पातळीवर राजकीय पर्याय निर्माण करू शकलेली नाही. ती पक्ष तयार करत नाही, आपल्या हितासाठी संघटन बनवते. आपल्या जातीचं दुकान घेऊन एका पक्षातून दुसऱ्या पक्षात ये-जा करत राहते. त्याच्यात अहंकार निर्माण झालाय. ती बसपा किंवा इतर बहुजन पक्षांच्या दोषांवर मौन बाळगते.

माझ्यासारख्या लिहिणाऱ्याला जातीच्या आधारावर मोडीत काढण्याचा प्रकार या अहंकाराचाच होता. मी माझ्या बांधीलकीपासून ढळलो नाही. पण बांधीलकीचं दुकान चालवणारे आंबेडकरांचा वापर हत्यारासारखा करायला लागले. ते लोकांना आदेश देऊ लागले की, कुणी काय लिहिलं पाहिजे. भाजपचे समर्थक ज्या प्रकारे राष्ट्रवादाचं सर्टीफिकेट वाटतात, तसंच काही आंबेडकरवादीही सर्टीफिकेट वाटू लागले आहेत. आपल्याला आता समजून घेतलं पाहिजे की, बहुजन पक्षात कुणीही कांशीराम नाही. त्यांना बांधीलकीशी काही देणंघेणं राहिलेलं नाही. ती वैचारीक बांधीलकी होती. आता आपल्याकडे प्रकाश आंबेडकर आहेत, जे बाबासाहेबांच्या नावावर मर्यादित स्वरूपाचं राजकारण करत आहेत. हेच लोहियांचंही झालं होतं. ज्यांची आंबेडकरांशी बांधीलकी आहे, त्यांची स्थिती गांधींशी बांधीलकी मानणाऱ्या गांधीवाद्यांसारखीच आहे. दोघंही किनाऱ्यावर राहण्यासाठी धडपडतात. पर्याय एकजूट नाही, ते सामिलीकरण आहे, पुनर्जीवन आहे. ते फक्त पुढच्या निवडणुकीसाठी नाही तर भारताच्या पर्यायी भविष्यासाठी आहे.

.............................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/4795/Spasht-Bolayacha-Tar

.............................................................................................................................................

तुमच्या लक्षात आलं असेल की, मी गेल्या पाच वर्षांत या पक्षांवर खूप कमी लिहिलं आहे. डाव्यांविषयी तर अजिबात लिहिलेलं नाही. मी मानतो की, डावी विचारधारा आजही प्रासंगिक आहे, पण त्यांचा पक्ष आणि त्या पक्षांत काम करणारं राजकीय मनुष्यबळ प्रासंगिक राहिलेलं नाही. त्यांची भूमिका संपलेली आहे. ते सडत आहेत. त्यांच्याकडे फक्त कार्यालयं उरली आहेत. काम करण्यासाठी काही राहिलेलं नाही. डावे लोक तक्रार करतात की, तुमच्या कार्यक्रमात डावे नसतात. कारण पक्षाच्या रूपात त्यांची भूमिका संपलेली आहे. महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांचं आंदोलन उभं करण्याचं काम बीजू कृष्णन यांच्यासारख्यांनी केलं होतं. ती त्या विचारधारेची उपयुक्तता होती. कुठल्याही पक्षाची नव्हती. पक्षांना तोडण्याची वेळ आलेली आहे. नव्या विचार करण्याची वेळ आलेली आहे. मी विविध पक्षांचा समर्थक आहे, पण उपयुक्ततेशिवाय ती विविधता काही कामाची नाही. हेच काँग्रेसलाही लागू होतं. भाजप कार्यकर्त्यांमध्ये तुम्हाला भाजप दिसतो. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये तुम्हाला काँग्रेस सोडून इतर सर्व काही दिसतं. काँग्रेसनं निवडणूक लढवणं सोडून द्यायला हवं किंवा त्या जीवन-मरणाच्या प्रश्नासारख्या लढवणं सोडून द्यायला हवं. काँग्रेसनं ‘काँग्रेस’ व्हायला हवं.

काँग्रेस नेहरूंचा बचाव करू शकली नाही. ती पटेल यांच्यापासून बोस यांच्यापर्यंतचा बचाव करू शकली नाही. स्वातंत्र्याच्या लढाईतील विविधता आणि एकतेशी जोडलेल्या ‘पूर्वायुष्यातील आठवणीं’ना जिवंत करू शकली नाही. म. गांधींच्या विचारांना उभं करू शकली नाही. आज तुम्ही भाजपच्या एका सामान्य कार्यकर्त्याजवळ दीनदयाळ उपाध्याय यांच्याविषयी वाईटसाईट बोलून पहा, तो तुम्हाला शंभर गोष्टी ऐकवेल. गेल्या पाच वर्षांत काँग्रेस नेहरूंच्या संदर्भात एक समांतर विश्लेषण निर्माण करू शकली नाही. मी या आघाडीवर काँग्रेसला ढासळतानाच पाहिलं आहे. राजकारण विचारधारेच्या जमिनीवर उभं राहतं, नेत्याच्या शक्यतेवर नाही. आता एकच मार्ग शिल्लक राहिला आहे. भारतातल्या वेगवेगळ्या राजकीय पक्षांमध्ये उरलेल्या मनुष्यबळानं आपला पक्ष सोडून कुठल्यातरी एका पक्षात यायला हवं, जिथं विचारांचा पुनर्जन्म होईल, नैतिक बळाचं सृजन होईन आणि मनुष्यबळाचं हस्तांतरणही. हे मी २०१४मध्ये लोकांना सांगितलं होतं. नंतर स्वत:चंच हसू आलं की, मी असा कोण लागून गेलोय हे सांगायला. आज त्याविषयी लिहीत आहे.

यानंतरही विरोधी पक्षांविषयी सहानुभूती का राहिली? प्रत्यक्षात त्यांच्या पक्षांना कमीच दाखवलं आणि त्यावर लिहिलं-बोललो. कारण २०१४नंतर प्रत्येक स्तरावर नरेंद्र मोदीच प्रमुख झाले होते. फक्त सरकारच्या पातळीवर नाही, सांस्कृतिकपासून धार्मिक पातळीपर्यंत मोदींशिवाय काहीच दिसलं नाही आणि नव्हतंही. जेव्हा भारतातील ९९ टक्के मीडिया लोकशाही पायदळी तुडवू लागला, तेव्हा मी त्यात एक संतुलन निर्माण करण्याचा प्रयत्न केला. असहमती आणि विरोधकांच्या प्रत्येक आवाजाचा सन्मान केला. त्यांची खिल्ली उडवली नाही. हे मी विरोधकांसाठी करत नव्हतो, तर भारतीय लोकशाहीला शरमिंदं होण्यापासून वाचवण्याचा प्रयत्न करत होतो. मला एवढा ताण घेण्याची गरज नव्हती, कारण तो काही माझा एकट्याचा प्रश्न नव्हता. पण नंतर वाटलं की, प्रत्येक नागरिकामध्ये आणि लोकशाहीमध्ये विरोधी विचार नसेल तर सगळं काही पोखरलं जाईल. माझ्या या विचारात भारताच्या भल्याचा विचार होता.

नरेंद्र मोदी प्रचंड बहुमतानं निवडून आले आहेत. माध्यमांचा जय झालेला नाही. प्रत्येक विजयात एक पराजय असतो. या विजयात माध्यमांचा पराभव झाला आहे. त्यानं लोकशाहीच्या मर्यादांचं पालन केलं नाही. आज ‘गोदी मीडिया’चे लोक मोदींना मिळालेलं बहुमत हे स्वत:चं यश म्हणून सांगत आहेत. खरं तर त्यांच्याकडे केवळ मोदी उरले आहेत, पत्रकारिता उरलेली नाही. पत्रकारितेचा धर्म संपला आहे. कदाचित भारतीय जनतेनंच पत्रकारितेला बाद केलंय. त्यानं हाच जनादेश दिलाय की, आम्हाला मोदी हवेत, पत्रकारिता नको. यानंतरही माझा त्याच मोदी समर्थकांवर भरवसा आहे. ते मोदी आणि माध्यमांच्या भूमिकेतला फरक समजून घेऊ शकतात. कदाचित त्यांनाच असा भारत नकोय की, जिथं जनतेचे प्रतिनिधी असलेले पत्रकार आपला पेशा सोडून नेत्याच्या पायांवर लोटांगण घालताना दिसतील. मला हे चांगलं वाटलं की, अनेक मोदी समर्थकांनी मला लिहिलं की, आम्ही तुमच्याशी सहमत नाही, पण तुमच्या पत्रकारितेवर निरुत्तर आहोत. तुम्ही तुमचं काम करत रहा. या समर्थकांच्या माझ्यावरील भरवशाबद्दल आभार. माझे अनेक सहकारी निवडणुकीचं कव्हरेज करण्यासाठी देशाच्या वेगवेगळ्या भागात गेले, तेव्हा त्यांना सांगितलं गेलं की, मोदी फॅन तुमचं वाचतात, लिहितात. संघाचे लोकही मी काय लिहिलंय ते एकदा पाहतात. मला माहीत आहे की, मी राहिलो नाही तर त्यांना माझी उणीव भासेल.

दोन वर्षांपूर्वी दिल्लीत राहणाऱ्या ऐंशी वर्षांच्या एका आजोबांनी मला छोटीशी गीता पाठवली होती. सोबत मोठं पत्र लिहिलं होतं आणि माझ्यासाठी दीर्घायुष्य चिंतिलं होतं. आग्रह केला होता की, ही छोटी गीता मी कायम सोबत ठेवावी. मी त्यांचं ऐकलं. ती आपल्या बॅगेत ठेवली. जेव्हा लोकांनी मला सांगितलं की, तुम्ही आता सुरक्षित नाही आहात, स्वत:ची काळजी घ्या. तेव्हा ही गीता चाळत होतो. त्यात एक श्लोक आहे – ‘अथ चेत्त्वमिमं धर्म्यं संग्रामं न करिष्यसि, तत: स्वधर्मं कीर्ति च हित्वा पापमवाप्स्यसि।।’

लोभ असू द्या. मला अगतिक करून तुम्हाला काय मिळेल? तुमच्याच स्वाभिमानाला तडे जातील की, या महान भारतात तुम्ही एका पत्रकाराला साथ देऊ शकला नाहीत. माझ्यासारख्यांनी तुम्हाला या अपराधी भावनेमधून मुक्त होण्याची संधी दिलीय. ही अपराधी भावना तुमच्यावर तितकीच प्रभावी ठरेल, जशी विरोधकांसाठी त्यांच्या पूर्वायुष्यातील अनैतिकता. त्यामुळे तुम्ही मला सक्षम करा. माझ्यासारख्यांच्या सोबत उभे रहा. तुम्ही मोदींना मजबूत केलं. तुमचा हाही धर्म आहे की, तुम्ही पत्रकारितेलाही मजबूत करा. माझ्याकडे जगण्याचा दुसरा पर्याय नाही. असता तर कदाचित हा पेशा सोडूनही दिला असता. त्याचं कारण मी हरलो आहे हे नसून मी आता थकलो आहे. काही नवीन करू इच्छितो. पण जोपर्यंत आहे, तोपर्यंत तरी माझं काम करत राहणार. कारण जनतेनं मला हरवलेलं नाही, मोदींना जिंकून दिलं आहे. पंतप्रधान मोदींना शुभेच्छा!

...............................................................................................................................................................

स्वैर अनुवाद - टीम अक्षरनामा. 

...............................................................................................................................................................

रवीश कुमार यांचा मूळ हिंदी लेख एनडीटीव्हीच्या बेवसाईटवर प्रकाशित झाला आहे. तो पाहण्यासाठी क्लिक करा -

...............................................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

............................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

............................................................................................................................................................

Post Comment

Ram Jagtap

Tue , 28 May 2019

@ Manoj Sankhe - तुम्ही दाखवलेल्या चुका मान्य आहेत. त्याबद्दल आपले मनापासून आभार. त्या दुरुस्त्या लगेच करतो आहोत. अजून काही खटकणाऱ्या बाबी असतील तर नक्की कळवाव्यात. आपले पुनश्च मनापासून आभार!


manoj sankhe

Tue , 28 May 2019

माफ करा, योगेश भागवतकर, परंतु आपल्याला या अनुवादामधे मूळ लेखक वाचल्याची अनुभूती येत असल्यास आपण आपला विचार परत तपासून पाहाणे अत्यंत गरजेचे आहे. आपल्याला खालील उदाहरणे अचूक अनुवादाची वाटत असल्यास आपले व अक्षरनामा टीमचे देवच भले करेल- १) 'त्यातील अनेकांनी नियुक्तीपत्रं मिळाल्यावर शिव्या दिल्याबद्दल माझी माफी मागितली'- याचा अर्थ नियुक्तीपत्रं मिळाल्यावर शिव्या दिल्या, असा होतो आहे. रवीश कुमार यांनी असे म्हटले आहे का? २) 'आज तुम्ही भाजपच्या एका सामान्य कार्यकर्त्याजवळ दीनदयाळ उपाध्याय यांच्याविषयी चुकीचं मत व्यक्त करा, तो तुम्हाला शंभर गोष्टी ऐकवेल.'- यात रवीश कुमार यांनी 'गलत टिप्पणी' अशा भाषेचा वापर केला आहे, त्याचा अनुवाद 'चुकीचं मत' असा करणे म्हणजे अर्थाचा अनर्थ आहे, मालक. गलत टिप्पणी या शब्दप्रयोगाचा इथला अर्थ वाईटसाईट बोलणे असा होतो. ३) 'हे समजून घेण्यासाठीही सामील व्हावं लागेल की, अशी कुठली गोष्ट आहे जी लोकांना मोदी बनवते'- अशा वाक्यांचा अर्थ भागवतकर साहेबांनी स्पष्ट करून सांगावा. जनतेत सामील व्हावे, असे रवीश कुमार यांनी हिंदीतील प्रस्तुत परिच्छेदामध्ये म्हटले आहे. मराठी लेखामधे अशी अनेक वाक्ये निरर्थक ठरली आहे. इतका चुकीचा अनुवाद गेल्या काही काळात वाचायला मिळाला नव्हता, त्यामुळे मनोरंजन केल्याबद्दल टीम अक्षरनामा व योगेश भागवतकर यांचे शतशः धन्यवाद.


Yogesh bhagwatkar

Mon , 27 May 2019

रविश कुमार यांचं मूळ लिखाण वाचण्यात जी मजा येते ती सहसा अनुवाद केलेल्या मध्ये सहसा येत नाही . पण टीम अक्षरणाम ने खरोखरच उत्तम अनुवाद केलाय अनुवाद वाचत असताना आपण मूळ लेखकालाच वाचतोय अशी अनुभूती येणे महत्वाचे असते ते साधलं गेलंय ...अक्षरणामा टीम चे मनःपूर्वक धन्यवाद


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘जातवास्तव’ स्वीकारल्याशिवाय सत्ता आणि संसाधनांचा जातीय ‘असमतोल’ दूर करता येणार नाही. उमेदवारांची नावे जातीसकट जाहीर करणे, हा एक ‘सकारात्मक प्रयोग’ आहे

महायुतीच्या ३८ उमेदवारांपैकी १९ मराठा आहेत. विशेष म्हणजे हे सगळे श्रीमंत मराठे आहेत. महाविकास आघाडीच्या ३९ उमेदवारांपैकी २४ मराठा आहेत. वंचित बहुजन आघाडीच्या ३२ उमेदवारांपैकी ५ अनुसूचित जाती, १३ ओबीसी आणि ४ मराठा आहेत. यावरून एक गोष्ट लक्षात येते की, मविआ असो वा महायुती एका विशिष्ट समाजाकडेच सत्ताबळ झुकलेले दिसते. मात्र वंबआने उमेदवारी देताना जात समतोल पाळलेला दिसतो.......

स्वयंपाकघरात टांगलेल्या कॅलेंडरवरच्या चित्राइतकीच थरारकता वा जाहिरातीतून एखादं उत्साहवर्धक पेय विकणार्‍या म्हातार्‍या अमिताभ बच्चनइतकीच विश्वासार्हता, दहा वर्षं राष्ट्रीय व्यासपीठावर वावरलेल्या मोदींच्या व्यक्तिमत्त्वामध्ये उरली आहे...

प्रचारसभांमधून दिसणारे पंतप्रधान दमले-भागलेले, निष्प्रभ झालेले आहेत. प्रमाणापलीकडे वापरलेली छबी, अतिरिक्त भलामण आणि अतिश्रम, यांमुळे त्यांची ‘रया’ गेल्यासारखी वाटते. एखाद्या ‘टी-ट्वेंटी’ सामन्यात जसप्रीत बूमराला वीसच्या वीस षटकं गोलंदाजी करायला लावावी, तसं काहीसं हे झालेलं आहे. आक्रसत गेलेला मोदींचा ‘भक्तपंथ’ टिकून असला, तरी ‘करिष्मा’ उर्फ ‘जादू’ मात्र चाकोरीबद्ध झालेली आहे.......

भाजपच्या ७६ पानी ‘जाहीरनाम्या’त पंतप्रधान नरेंद्र मोदींची तब्बल ५३ छायाचित्रं आहेत. त्यामुळे हा जाहीरनामा आहे की, मोदींचा ‘छायाचित्र अल्बम’ आहे, असा प्रश्न पडतो

काँग्रेसच्या ४८ पानी जाहीरनाम्यात राहुल गांधींची फक्त पाच छायाचित्रं आहेत. त्यातली तीन काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासोबत आहेत. याउलट भाजपच्या जाहीरनाम्याच्या मुखपृष्ठावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीमागे बळंच हसताहेत अशा स्वरूपाचं भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचं छायाचित्र आहे. त्यातली ‘बिटवीन द लाईन’ खूप सूचक आणि स्पष्टता सूचित करणारी आहे.......

जर्मनीत २० हजार हत्तींचा कळप सोडण्याची धमकी एका देशाने दिली आहे, ही ‘हेडलाईन’ जगभरच्या प्रसारमाध्यमांमध्ये गाजतेय सध्या…

अफ्रिका खंडातील बोत्सवाना हा मुळात गरीब देश आहे. त्यातच एवढे हत्ती म्हणजे दुष्काळात तेरावा महिना. शेतांमध्ये येऊन हत्ती मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान करत असल्याने शेतकरी वैतागले आहेत. याची दखल बोत्सवानाचे अध्यक्ष मोक्ग्वेत्सी मेस्सी यांनी घेतली आहे. त्यामुळेच त्यांनी संतापून एक मोठी घोषणा केली आहे. ती म्हणजे तब्बल २० हजार हत्तींचा कळप थेट जर्मनीमध्ये पाठवण्याची. अनेक माध्यमांमध्ये ही ‘हेडलाईन’ गाजते आहे.......