मोदी तर आले, आता पुढे काय? पुढे आहे तो संघर्ष...
पडघम - देशकारण
विसोबा खेचर
  • नरेंद्र मोदी
  • Fri , 24 May 2019
  • पडघम देशकारण नरेंद्र मोदी Narendra Modi अमित शहा Amit Shah भाजप BJP संघ RSS

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सत्ता पुन्हा येणार नाही, असे वाटणारे लोक काही या देशात कमी नव्हते. समाजमाध्यमांतून अनेकांना ते भेटलेही असतील. त्यांच्या स्वप्ने पाहण्याच्या शक्तीला सलाम करण्याखेरीज आपण काय करू शकतो? परंतु भारतीय राजकारणाचा ज्यांचा किंचितही अभ्यास आहे, अशा कोणालाही मोदींच्या पुनरागमनाबद्दल शंका नव्हती. किंबहुना २०१४च्या निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर लागलीच मोदींची पुढचीही टर्म नक्की झाल्याचे मत (प्रस्तुत लेखकासह) अनेकांनी व्यक्त केले होते. प्रश्न होता, तो मोदींच्या मताधिक्याचा. भाजपच्या जागा कमी होतील की जास्त याचा.

त्या कमी झाल्या म्हणजे मोदी यांच्या एकाधिकारशाही पद्धतीच्या कारभाराला वेसण लागेल, घटकपक्षांचा अंकुश त्यांच्यावर राहील आणि ते पुन्हा एखादे नोटाबंदीसारखे अतिरेकी कृत्य करू धजावणार नाहीत, असे अनेकांना वाटत होते. पण त्या सगळ्याच आशा-मनिषा पाण्यात गेल्या आहेत. मोदी अधिक मतटक्केवारी घेऊन सत्तेवर आले आहेत. त्यामुळे येथील भाजप विरोधकांच्या पोटात गोळा आला आहे, की आता काय होईल?

अधिक जागा, त्याही एकट्याच्या नावावर, एकट्याने केलेल्या मेहनतीच्या, प्रचाराच्या, भाषणांच्या जोरावर म्हटल्यावर कोणाही व्यक्तीचा अहम् गगनला भिडेल. मोदींमध्ये हा अहम्‌ ठासून भरल्याचे एक अंधभक्तांशिवाय सर्वांनाच दिसते. तशात या देशातील विविध घटनात्मक संस्थांनी आपले स्वातंत्र्य, घटनादत्त सार्वभौमत्व ‘पीएमओ’पायी वाहिलेले. ज्यांनी अंकुश ठेवायचा तेच स्वतः हुजरे बनलेले. अशी निरंकुश सत्ता हाती असल्यानंतर काय काय होऊ शकेल, याच्या नुसत्या कल्पनेनेही विरोधकांच्या अंगावर शहारे येत असतील. ते भय अनाठायी नाही.

यावर मोदी समर्थक असे म्हणू शकतात, की मोदी हे फकीर आहेत. त्यांना पैसे नकोत. ते भोलेनाथाचे भक्त आहेत. कधीही गुहेत जाऊन बसू शकतात. त्यांना सत्ता नको. ते तर देशभक्त आहेत. निकालानंतरच्या भाषणाचा शेवट त्यांनी ‘वंदे-वंदे-वंदे’ असा गजर करून केला. एखाद्याच्या अंगात यावे तसे ते ‘वंदे-वंदे’ म्हणत होते. त्यावरून ते किती देशभक्त आहेत हे प्रकट होते. तेव्हा ते काही असे करणार नाहीत. सत्ता राबवतील ती जनतेच्या भल्यासाठीच. त्यातील जे भ्रष्ट आहेत, देशद्रोही आहेत, लोकविरोधी आहेत, त्यांनी मोदींना घाबरावे. तर हा जो भक्तसंप्रदायी भाबडेपणा आहे, त्याचे कोणीही काहीही करू शकत नाही. त्याला प्रतिवाद नाहीच. मोदी सत्तेचा वापर कसा करतील याहून अधिक भय आहे ते या भक्त संप्रदायाचे.

...............................................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/4874/Deshbhakt-ani-andhbhakt

...............................................................................................................................................................

आता भाजपच्या उमेदवारांना मतदान करणारे सारेच भक्त नाहीत हे खरे. पण ज्यांनी-ज्यांनी समजून-उमजून मोदींच्या भाजपला मतदान केले आहे, ते सारेच अतिरेकी राष्ट्रवाद आणि धर्मवाद या संकल्पनांनी भारावलेले आहेत, हे विसरता कामा नये. त्यातील अनेकांच्या घरात कदाचित आजही पाकिस्तान, अफगाणिस्तानसह अखंड हिंदुस्थानचा नकाशा लावलेला असेल. त्यातील अनेकांसाठी नथुराम गोडसे हेच खरे ‘देशभक्त’ असतील आणि हे सर्वजण व्हॉट्सअॅप विद्यापीठाचे स्नातक असतील. मोदींची - मागच्यापेक्षा अधिक ताकदीने मिळालेली - सत्ता ही अशांसाठी उन्माद-व्हायग्रा ठरणार आहे.

पाकिस्तानप्रती कमालीचा द्वेष, दलित-मुस्लीम यांच्याविषयीची तिरस्कार भावना, महिलांबाबतचा सनातनी दृष्टिकोन, सेक्युलॅरिझम-उदारमतवाद-वैचारिक आधुनिकता या तत्त्वांविषयीची घृणा आणि त्याच वेळी पाश्चात्य जगताविषयी तिरस्कारयुक्त आकर्षण, ही या भक्तमंडळीची वैशिष्ट्ये. महात्मा गांधी-नेहरू यांच्याविषयी या भक्तांच्या मनात घृणा आहे ती याच वैशिष्ट्यांमुळे. राज्यघटना ही त्यांना आपली वाटत नाही, ती त्यांच्या मनातील याच भावनांमुळे. ही सगळी उलट बाजूने पाहिली, तर मुस्लीम तालिबानींचीच वैशिष्ट्ये आहेत. जगातील सर्व अतिरेकी धर्मवादी सारखेच असतात, हे येथेही दिसून येते.

या अशा लोकांच्या झुंडींना जेव्हा सत्तेचा आसरा मिळतो, तेव्हा काय होते याची झलक आपण इराणमध्ये, अफगाणिस्तानमध्ये, पाकिस्तानमध्ये पाहिली आहे. मोदीसत्ताकाच्या मागील खंडात ती आपल्याकडेही दिसली. मोदी हे आपल्यामुळे निवडून आले आहेत, हे या भक्तांच्या टोळ्यांना माहिती आहे आणि त्याची कल्पना मोदींनाही आहे. त्यामुळेच कालपर्यंत ज्या टोळ्यांना फ्रिंज वा परिघावरच्या असे म्हटले जायचे, त्यांना केंद्रस्थानी आणण्यास मोदी-शहा आणि मंडळींच्या सरकारने साह्यच केले. आजवर ते छुप्या पद्धतीने, जगाची लाज मनी धरून चाललेले होते. या निवडणुकीत भाजप या बाबतीत खुलेआम ‘प्रज्ञा’वंत बनला.

बहुसंख्याकांचा जमातवाद हा अत्यंत धोकादायक असतो. आजवर तो बाटलीत बंद होता. त्यावर सुसंस्कृत समाजाचे दडपण होते. पण मतांच्या बेगमीसाठी ती बाटली खुली करण्यात आली. हिंदुराष्ट्राचे, राममंदिराचे, कलम-३७० रद्द करण्याचे आमिष दाखवून त्या अतिरेकी धर्मवादी राक्षसाला बाटलीबाहेर काढण्यात आले. आता तो आपली स्वप्ने पूर्ण करण्याची मागणी मोदी सरकारकडे केल्याशिवाय राहणार नाही. ती न केल्यास ही मंडळी काय हैदोसदुल्ला घालतील, हे सांगता येत नाही. विचारी जनांसाठी काळजीची बाब आहे, ती ही.

यात आशेचे एकच निरंजन लुकलुकते आहे, ते म्हणजे या हिंदुस्थानी संस्कृतीची ताकद. या देशावर आजवर कमी आक्रमणे झालेली नाहीत. एका हातात तलवार आणि दुसऱ्या हातात कुराण घेऊन मुस्लीम आक्रमकांच्या फौजा तुटून पडल्या होत्या या देशावर. चार-पाचशे वर्षांचा इतिहास आहे तो. या काळात त्यांची आसेतुहिमाचल साम्राज्ये उभी राहिली. परंतु म्हणून हा संपूर्ण देश त्यांना काफिरमुक्त - मूर्तिपूजकमुक्त - नाही करता आला. ते होऊ शकले नाही याचे कारण येथील लोकांनी त्यांच्याशी मैदानावर तलवारींनी लढाया केल्या म्हणून नव्हे, तर येथील मातीत रुजलेल्या संस्कृतीमुळे. त्या संस्कृतीची ताकद अशी की, अनेक मुस्लीम राज्यकर्ते होऊन गेले हिंदुस्थानात. त्यातील काही तर कमालीचे धर्मांध आणि क्रूर होते, पण तरीही येथील मंदिरे आणि माणसे टिकून राहिली. असे सामर्थ्य असलेल्या संस्कृतीला अतिरेकी धर्मवाद उद्ध्वस्त करील अशी शक्यता कमीच. पण ते काम आपोआप होत नसते. त्यासाठी उरलेल्या पन्नास टक्क्यांना मोठा संघर्ष करावा लागणार आहे, हे नक्की. एका धर्मातील अतिरेकी हे दुसऱ्या धर्मातील अतिरेक्यांना जन्म देत असतात. या न्यायाने येथील अतिरेकी झुंडींची संख्या वाढतच जाणार आहे. तेव्हा हा संघर्ष जसा हिंदूंतील अतिरेकी धर्मवाद्यांशी असेल, तसाच तो अन्य धर्मियांतील अतिरेक्यांशीही करावा लागणार आहे. अतिरेकी धर्मवादाचे विरेचन करू शकेल तर तो संघर्षच.

मोदीसत्ताकाच्या या नव्या खंडाकडे या काहीशा सकारात्मक पद्धतीनेही पाहता येईल, की त्याने ही संघर्षाची संधी दिलेली आहे. एरवी मोदींचा कमी जागांनी विजय झाला असता, त्यांच्यावर घटकपक्षांचे दडपण असते, तर ते हतबलतेचा सूर लावू शकले असते. मग मोदींना आणखी पाच वर्षे द्या, मग बघा असे म्हटले गेले असते. आता ती संधी त्यांना नाही.

मोदीसत्ताकाच्या या खंडात विरोधीपक्षांचे अवकाश भरून काढावे लागणार आहे ते सामान्य नागरिकांनाच, जाणत्या जनांनाच. मोदी तर आले, आता पुढे काय, या प्रश्नाचे उत्तर आहे ते हेच. पुढे आहे तो संघर्ष... विचारी जनांनी करावयाचा संघर्ष.

.............................................................................................................................................

लेखक विसोबा खेचर मुक्त पत्रकार व ब्लॉगर आहेत.

editor@aksharnama.com 

............................................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

............................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

............................................................................................................................................................

Post Comment

Gamma Pailvan

Sun , 26 May 2019

विसोबा खेचर, 'नमोभक्तांना पाकिस्तानप्रती कमालीचा द्वेष आहे', हे तुमचं मत वाचून लई हसलो. रविवार सकाळची सुरुवात मस्त झाली. त्याचं काय आहे की तुमच्या मते नमोभक्त फडतूस आहेत, बरोबर? पाकिस्तानी पब्लिक आपापपसांत इतका द्वेष बाळगून आहेत की फडतूस नमोभक्तांच्या द्वेषाची गरजंच काय मुळातून ? असा विनोदी प्रश्न उपस्थित होतो. उत्तर शोधा बघू ! आपला नम्र, -गामा पैलवान


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा