‘रामा’ला सोडून मोदींना ‘कृष्ण’ का आठवला असेल?
पडघम - देशकारण
प्रज्वला तट्टे
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा
  • Thu , 23 May 2019
  • पडघम देशकारण नरेंद्र मोदी Narendra Modi अमित शहा Amit Shah भाजप BJP संघ RSS

भाजपची भोपाळ येथून लोकसभेची निवडणूक लढवणारी, मालेगाव बॉम्बस्फोटातली आरोपी प्रज्ञा सिंग-ठाकूर हिने नथुराम गोडसेला ‘देशभक्त’ म्हटल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मी तिला कधी माफ करू शकणार नाही’ असे म्हटले. तोवर उत्तरेतल्या ज्या मतदारसंघांमध्ये प्रज्ञाचा उपयोग करून हिंदुत्ववादी मतं एकवटायची होती, तिथल्या निवडणुका आटोपल्या होत्या. आणि आता साध्वी ऋतुंभराच्या मार्गे साध्वी प्रज्ञानेही अडगळीत जायला हरकत नव्हती. पण याच विधानाला जोडून मोदींनी उच्चारलेले दुसरे विधान होते - ‘देशाला गांधी आणि कृष्णाच्याच मार्गे जावे लागेल.’ ‘रामा’ला सोडून मोदींना ‘कृष्ण’ का आठवला असेल? यावर प्रसारमाध्यमांनीही फारशी चर्चा केलेली दिसत नाही.

पण मोदींनी ‘कृष्णनीती’च कशी स्वीकारावी आणि ‘भ्रष्टाचारी काँग्रेस’ला कसा धडा शिकवावा, अशा आशयाची एक पोस्ट व्हॉटसअॅपवरून नेमकी याच काळात फिरवली गेली. तिचा संपादित आशय पुढीलप्रमाणे –

“जोपर्यंत भाजपा वाजपेयींच्या पुरोगामी धोरणावर व प्रभू श्रीरामाच्या सहिष्णू धोरणावर विश्वास ठेवून चालत होती, तोपर्यंत भाजपाला कधीही संपूर्ण बहुमत मिळवता आले नाही. काळाची गरज ओळखून मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामांच्या तत्त्वाने चालणाऱ्या भाजपाला मोदी आणि शाह कर्मयोगी प्रभू श्रीकृष्णांच्या मार्गावर घेऊन आले. कारण श्रीकृष्ण अधर्मींना संपवताना कोणतीही भीडभाड ठेवत नाहीत... छळ करणाऱ्याला छळाने, कपटी असेल तर कपटाने आणि दांभिक असेल तर दांभिकतेने… देशद्रोही, धर्मद्रोही संपवणे हेच श्रीकृष्णांचे एकमेव उद्दिष्ट होते.

त्यामुळेच ते अर्जुनाला मोहमाया सोडून केवळ कर्म करण्याची शिकवण देतात.

...ही वेळ नैतिकतेचे पोवाडे गात बसण्याची नाही, बाह्य तसेच देशांतर्गत देशद्रोही शक्तींना जशास तसे उत्तर द्यायचे असेल तर सत्ता राखल्याशिवाय पर्याय नाही... मग त्यासाठी साम-दाम-दंड-भेद यांपैकी गरज पडेल त्या गोष्टीचा वापर करण्यालाही पर्याय उरत नाही. सत्तेशिवाय शहाणपण चालत नसते. त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांनी उद्दिष्ट स्पष्ट ठेवणे गरजेचे आहे.

कर्णाचा अंत करताना त्याचा केविलवाणा चेहरा व डोळ्यातून येणारे अश्रू बघत बसलो तर त्याचा वध केला जाऊ शकत नाही. कर्णाच्या रथाचे चाक जेव्हा गाळात अडकून पडले होते, तेव्हा प्रभू श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितले होते- ‘पार्था, तू बघत काय बसला आहेस? बाण चालव आणि या अधर्मीचा अंत कर.’

नैतिकता-नैतिकता खेळण्याचे दिवस कधीच सरलेत... कारण समोर उभे ठाकलेले शत्रू नैतिकतेच्या लायकीचेच नाही. या नतद्रष्टांचे समूळ उच्चाटन हाच एकमेव पर्याय. आज सुदैवाने आपल्याला श्रीकृष्ण आणि अर्जुन नरेंद्र मोदी आणि अमित शहांच्या रूपात मिळाले आहेत, हे लक्षात घ्या. देश सुरक्षित करण्यासाठी त्यांना साथ द्या.”

आजपर्यंत अनेकदा अनुभवाला आलं आहे की, संघपरिवारातल्याचा कार्यकर्त्यांकडून आणि समर्थकांकडून जे कथन ऐकायला मिळतं, ते लगेच किंवा काही काळानंतर भाजपमधल्या आमदार-खासदार-मंत्री इतकंच नाही तर खुद्द मोदींकडूनही ऐकायला मिळतं. पुरोगाम्यांमध्ये एखाद्या विषयावर व्यक्तीगणिक वेगवेगळी मतं असतात, तसं काही संघपरिवार आणि भाजप समर्थकांचं होत नाही. सर्वांचं एकमत असतं. याचा अर्थ आज, २३ मे ला भाजप आणि एनडीएला पूर्ण बहुमत मिळालं नाही, तर मोदींना सत्तेत राहण्यासाठी जो काय घोडेबाजार करावा लागेल, इतर पक्षांची फोडाफोडी करावी लागेल, लोकशाहीचे संकेत पायदळी तुडवत सत्तेत टिकून राहावे लागेल, त्याच्यासाठी ‘कृष्णनीती’चाच आधार घ्यावा लागणार! तेव्हा ‘सत्यवचनी’, ‘मर्यादा पुरुषोत्तम’ राम कामी पडणार नाही. या निवडणुकीपूर्वी राममंदिराच्या मुद्द्याचा वापर करून काही उपयोग होत नाही, हे परिवाराला लक्षात आलेच आहे. साध्वी ऋतुंभरासारखा आता रामही अडगळीत जाणार!

...............................................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/4851/Paul-Allen---Idea-Man

...............................................................................................................................................................

मुद्दा आहे की, या कृष्णलीलांपुढे संघपरिवार टिकणार का? मोदींच्या एककल्ली कारभाराला कंटाळून भाजपमधल्या सुषमा स्वराज, अरुण जेटली आदींसारख्या वरिष्ठ नेत्यांनी निवडणूकच लढवली नाही. ज्यांना लढवायची होती, त्या सुमित्रा महाजन, मुरली मनोहर जोशी आणि अडवाणीसारख्यांना तिकीटच दिले गेले नाही. गुजरातमध्ये उदयोन्मुख अवस्थेत मोदी-शहा जोडीने तिथले जुने आणि वरिष्ठ नेतृत्व संपवले. हरेन पांड्यांचा मृत्यु झाला, संजय जोशी सीडी प्रकरणात सापडले, कांशीराम राणा यांना तिकीट दिले गेले नाही. गुजरातमध्ये भाजप मजबूत करण्यात ज्यांनी ज्यांनी कष्ट घेतले, ते सर्वच तिथल्या राजकीय पटलावरून हद्दपार केले गेले. तर आता ज्यांनी राष्ट्रीय पातळीवर भाजप वाढवला, जे प्रतिकूल परिस्थितीत पक्षासोबत राहिले त्यांना हद्दपार केले जात आहे.

या निवडणुकीत नितीन गडकरी आणि राजनाथ सिंह यांना हरवण्यासाठी मोदी-शहा यांनीच प्रयत्न केले असे नागपुरात बोलले जात आहे. संघ व भाजपमधले वरच्या फळीतले सर्व ब्राह्मण वर्चस्व मोदी-शहा यांनी संपवले आहे. त्यांना रोखण्याची कुवत सरसंघचालकांसहित इतर कोणाही संघाच्या वरिष्ठांमध्ये नाही.

संघाचे संकेत तोडत भय्याजी जोशी यांनी नुकतीच नितीन गडकरींची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली म्हणतात! गडकरींना पंतप्रधान करून भाजपची सत्ता कायम ठेवण्याची धडपड संघ करेल, पण तसे करणे संघाला जमेल की नाही याबाबत शंका आहे. कारण संघाला मोदी-शहा यांना वेसण घालण्याची कृती करायला जरा उशीरच झाला आहे. नाहीतर मोहन भागवतांच्या खुनाचा डाव रचणाऱ्या प्रज्ञा सिंग-ठाकूरला उमेदवारीच दिली गेली नसती.

आज मायावती पंतप्रधान होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. त्या भाजप किंवा काँग्रेसच्या पाठिंब्यावर पंतप्रधान झाल्या तरी मोदी-शहा यांच्या विरोधातले सर्व जुने खटले पुन्हा चालू होऊ शकतात. कारण आज जनतेतून तशी मागणी जोर धरत आहे.

ज्याची सत्ता त्याच्याकडे मुख्य धारेतली माध्यमे - वर्तमानपत्र आणि टीव्ही चॅनेल्स - वळतील. किंवा नाही जरी वळली तरी पर्यायी समाजमाध्यमांचा वापर करून सामान्य नागरिक भ्रष्टाचार विरोधातल्या लढ्यांना धार आणतील. त्यात मोदी-शहा जोडी दोषी सापडली तर ते संघाने गेल्या ७० वर्षांत जपलेली स्वतःची सोज्वळ प्रतिमा आणि ‘काँग्रेस तेवढी भ्रष्टाचारी’ या कथनाच्या विरोधात जाते. मुद्रा लोन, नोटबंदी, NPA, क्रूड ऑइलचे भाव कमी असताना पेट्रोलवरचा वाढवलेला टॅक्स, पुलवामा हल्ल्याच्या वेळचे गुप्तचर यंत्रणांचे अपयश या सर्वांची चौकशी मोदी पंतप्रधान नसले तरच नीट होऊ शकेल. ते होऊ नये म्हणून मोदींना कसेही करून सत्तेत राहायचे आहे... आणि त्यांचे करावे काय हे संघाला कळत नाही आहे.

या देशात गेल्या ७० वर्षांत लोकशाही बऱ्यापैकी मुरली आहे. ती संघ-मोदी-शहा यांनी घातलेले घाव पचवून २३ मे नंतरही नुसती जिवंत राहणार नाही, तर आणखी बहरेल, अशी आशा ठेवू या!

.............................................................................................................................................

लेखिका प्रज्वला तट्टे सामाजिक कार्यकर्त्या आहेत.

prajwalat2@rediffmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा