‘पाकिट’ नाकारणारी मी एकटी नव्हते, हेही तितकेच खरे!
पडघम - माध्यमनामा
भक्ती चपळगावकर
  • लालू प्रसाद यादव यांचं एक संग्रहित छायाचित्र
  • Fri , 10 May 2019
  • पडघम माध्यमनामा टीव्ही पत्रकारिता TV Journalism वृत्तवाहिन्या News Chanels भक्ती चपळगावकर ‌Bhakti Chapalgaonkar लालू प्रसाद यादव Lalu Prasad Yadav

आपल्या आजुबाजूला सतत काही तरी घडत असते, पण त्या घटनेत वाचकाला किंवा प्रेक्षकाला रस असेलच असे नाही, किंवा त्या घटनेचा परिणाम दूरगामी असेलच असे नाही. त्यामुळे प्रत्येक घटना बातमी बनू शकत नाही. कोणती घटना बातमी बनते यासाठी काही निकष आहेत, उदाहरणार्थ, या घटनेचा परिणाम कुणावर आणि किती प्रमाणात होणार आहे, ही घटना वाचक किंवा प्रेक्षकाचे वास्तव्य आहे, त्याच्या किती जवळ किंवा दूर झाली आहे, या घटनेत माणुसकी दर्शवणारी काही वेगळी गोष्ट आहे का, यात काही आर्थिक घोटाळा आहे का... इत्यादी इत्यादी. प्रत्येक पत्रकार शिकाऊ असताना त्याच्या किंवा तिच्याकडून हे निकष घोटले जातात. बातमी निवडताना या निकषांचा फार उपयोग होतो. या सर्वसाधारण निकषांबरोबरच एक मोठा निकष असतो, तो पत्रकारितेच्या प्रशिक्षणादरम्यान शिकवला जात नाही. तो निकष म्हणजे ज्या माध्यम संस्थेत, वर्तमानपत्रात, वृत्तवाहिनीत, वेबसाईटसाठी तुम्ही काम करत असाल त्याच्या मालकांचे संपादकीय धोरण.

१९९९ साली मी टीव्ही पत्रकार झाले. त्यापूर्वी वर्तमानपत्रात काम केले होते, पण बातमीदारी केली नव्हती. वृत्तवाहिनीसाठी काम करायला सुरुवात केल्यानंतरच्या पहिल्या नोकरीत स्वतःला बातमी शोधावी लागली नाही फारशी. तशी त्या वाहिनीची पद्धतच नव्हती. बातमीसाठी कुठे जायचे आहे, हे संपादकांनी सांगायचे आणि तिथे गेल्यानंतर काहीतरी वेगळा कंगोरा शोधायचा असा मार्ग अवलंबला. पण जेव्हा पुढे एका राष्ट्रीय वाहिनीत कामाला सुरुवात केली, त्यावेळी स्वतः बातमी शोधून त्याची कल्पना वरिष्ठांना द्यायची आणि त्यांच्या संमतीनंतर बातमी कव्हर करायला जायचे, असे कामाचे स्वरूप होते.

यापूर्वी मला रोज मंत्रालयात जायची सवय होती. तिथे सगळ्या विभागात फिरायचे. प्रसिद्धी अधिकाऱ्यांना भेटायचे, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री वगैरेंच्या सचिवांना भेटायचे. त्यांच्याकडे काही ना काही बातम्या मिळायच्या. नव्या नोकरीच्या ठिकाणी माझ्या वरिष्ठांनी सुनावले, ‘‘आता सरकारी बातम्या बंद कर. आपण सरकारच्या हाताखाली काम करत नाही. बाहेर फिर, लक्ष ठेव, वेगळी काही बातमी मिळाली तर त्याबद्दल नोट तयार कर. नंतर मी संमती देईन.”

माझ्यासाठी हा फार मोठा बदल होता. यामुळेच मी स्वतः विचार करायला शिकले. जे प्रशिक्षण पत्रकारितेच्या वर्गात मिळाले होते, त्याचा प्रत्यक्ष वापर करायची संधी मिळाली. टीव्ही पत्रकार मान्य करणार नाहीत कदाचित, पण बऱ्याच वेळा त्यांचा मुख्य स्त्रोत असतो वर्तमानपत्रे. वर्तमानपत्रात एखादी छोटी बातमी येते, ज्याचे महत्त्व त्या पत्रकाराला कळत नाही, पण या बातमीत किती दम आहे, हे एखाद्या दुसऱ्या पत्रकाराला, मग तो दुसऱ्या वर्तमानपत्रात काम करणारा असो वा एखाद्या वृत्तवाहिनीत, त्याला किंवा तिला त्या घटनेचे महत्त्व कळते आणि त्या बातमीचा शोध घेण्यासाठी तो बाहेर पडतो. त्याचबरोबर प्रेस कॉन्फरन्सची आमंत्रणे असतात, इतर टीव्ही चॅनल्सवर प्रसारित होणाऱ्या बातम्या असतात...

थोडक्यात चहूकडे बातम्याच बातम्या असतात, आपल्याला फक्त एखादी बातमी पकडायची असते. पण या सगळ्या बातम्या सार्वजनिक माहितीच्या असतात. तुम्हाला वेगळी बातमी करायची असेल तर चांगले स्त्रोत किंवा सोर्सेस बनवावे लागतात. ते एका रात्रीत बनत नाहीत. इतर बातम्या कव्हर करताना त्यांची ओळख होते. कोण पुढे बातमी द्यायला उपयोगी पडेल आणि कोण नाही हे ओळखण्याचे कसब अंगी हवे. मला मुळात कामाची आवड होती. माणसांची गप्पा मारण्याचा नाद आहे. त्यांच्या सुख-दुःखात सहभागी होण्याचा स्वभाव आहे. हळूहळू माझा जनसंपर्क वाढला आणि मला बातम्या मिळू लागल्या.

.............................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/4808/Surely-Your-Joking-Mr-Feynman

.............................................................................................................................................

एखाद्या सार्वजनिक कार्यक्रमात चांगली बातमी शोधून काढायची असेल त्यासाठी एक कानमंत्र म्हणजे कार्यक्रम सुरू व्हायच्या आधी आणि नंतर थांबा. बातमी मिळणार. अशी बातमी मिळेल जी इतरांपेक्षा वेगळी असेल. अनेक उदाहरणे देता येतील, पण एक गंमतशीर उदाहरण सांगते. औरंगाबादला निवडणुकीनिमित्त लालू प्रसाद यादवांची रॅली होती. त्यांच्याबरोबर पत्रकारांचा एक ताफा होता. मला सांगण्यात आले होते, त्यांच्या बरोबर आलेला आमच्या वाहिनीचा पत्रकार त्यांचा अगदी खास आहे, तुला फारसे काम नाही. त्यामुळे सभेची बातमी तो फाईल करणार, मला फारसे काम नव्हते. दिल्लीहून, बिहारहून आलेली पत्रकार मंडळी, त्यांचे जोरजोरात बोलणे, राजेशाही वागणे सुरू होते. ही मंडळी एकमेकांबरोबर थांबत. मी मुंबईहून आले होते. औरंगाबादला आई-वडलांचे घर असल्याने हॉटेलमध्ये राहण्याचा प्रश्न नव्हता. त्यामुळे फारशी कुणाशी ओळख नव्हती. कॅमेरामनला घेऊन एकटी सभेच्या ठिकाणी पोचले.

सभा जरा उशिराच सुरू झाली. रात्री दहानंतर लाऊडस्पीकरचा वापर करायचा नाही, हा नियम नुकताच लागू करण्यात आला होता. रात्रीचे दहा वाजले तरी लालूंनी भाषण थांबवले नाही. काँग्रेसचे उमेदवार राजेंद्र दर्डांच्या प्रचारासाठी त्यांची सभा होती. दर्डा अस्वस्थ झाले, त्यांनी लालूंना चिठ्ठी पाठवली. लालूंनी ती फेकून दिली आणि भाषण सुरूच ठेवले. सभा संपली आणि सगळे मार्गस्थ झाले. लालूंबरोबर पत्रकारांचा ताफाही खानपानासाठी रवाना झाला. एवढ्या मोठ्या नेत्याने रात्री दहानंतर पाचेक मिनिटे भाषण सुरू ठेवले, ही बातमी काही कुणाला महत्त्वाची वाटली नाही.

माझ्या सवयीनुसार मी थांबले आणि नंतर व्यासपीठापाशी चक्कर मारली. तिथे दोन माणसे काहीतरी कुजबूज करत होती. चेहऱ्यावरून आणि पेहरावावरून ना तर राजकीय पक्ष कार्यकर्ते वाटत होते, ना तर बंदोबस्तासाठी आलेले पोलीस. माझ्या लक्षात आले, हे निवडणूक आयोगाचे कर्मचारी असणार! खात्री झाल्यावर मी त्यांना विचारले, लालूंनी नियम मोडलाय, तक्रार दाखल करणार का? त्यांनी दुजोरा दिला आणि मी बातमी ब्रेक केली. त्यानंतर ते जवळच्या पोलीस चौकीत गेले. तोपर्यंत बातमी मोठी झाली होती. देशभर पसरली होती. लालूंच्या पार्टीत सहभागी झालेले माझे व्यवसाय बंधू चडफडत पोलीस स्टेशनला आले. त्या सगळ्यांना मी कामाला लावले होते.

दुसऱ्या दिवशी लालूंनी पत्रकार परिषद घेतली. आता प्रश्न तू विचारायचेस, असे वरिष्ठांनी सांगितले होते. आल्या आल्या लालूंनीच विचारले, माझ्याविरुद्ध बातमी कोणी दिली. मी हळूच ‘मी दिली’ असे म्हटल्यावर त्यांनी बघितले आणि पत्रकार परिषद सुरू केली. नंतर भेटायला बोलावले आणि ‘बातमी का दिली?’ असे विचारले. मी त्यांना म्हटले, ‘बातमी तुमच्याबद्दल देणार नाही तर मग कोणाबद्दल देणार? तुम्ही नियम मोडलात म्हणून तर बातमी बनली.’ माझे उत्तर ऐकल्यावर ते मनापासून हसले, म्हणाले, ‘हां, ये बात बराबर है.’

पुढे पत्रकारिता शिकवताना ‘embedded journalism’ या विषयावर विद्यार्थ्यांबरोबर खूप चर्चा केली. ही संज्ञा साधारणपणे युद्ध पत्रकारिता करणारे पत्रकार आणि सैन्य यांच्यात कसे जवळचे संबंध असतात आणि त्याचा परिणाम बातमीदारीवर कसा होतो, या विषयी आहे. पण राजकारणी, सेलिब्रिटीज, उद्योगपती यांच्या बरोबर मैत्री करणाऱ्या पत्रकारांच्या बातमीदारीवरही फार खोल परिणाम होत असतो. माझे सगळ्याच पक्षाच्या नेत्यांबरोबर सौहार्दपूर्ण संबंध होते. राजकारणाला भ्रष्टाचाराची कीड लागली आहे. त्यामुळे भ्रष्ट राजकारणी जसे दिसले, त्याचबरोबर सामाजिक प्रश्नांची जाण असलेले नेतेही दिसले. रोज भेटत असल्यामुळे एक अनौपचारिक मैत्री अनेकांबरोबर झाली. पण हे सगळे आपल्यामागे असलेल्या बॅनरमुळे आहे याची खात्री होती. याच दरम्यान मी लग्न केले. माझा साथीदार व्यवसाय आणि खाजगी आयुष्य अतिशय वेगळे ठेवले पाहिजे आणि जी मैत्री फक्त व्यवसायामुळे होते, ती तेवढ्यापुरतीच असली पाहिजे या ठाम मताचा आहे. त्याचाही माझ्यावर प्रभाव पडला आणि कधीही बातमी करताना कोणाशी असलेली मैत्री आडवी आली नाही.

एकदा एक गंमत झाली. एका राजकीय पक्षाच्या कार्यालयात प्रेस कॉन्फरन्स होती. ती पार पडल्यावर आम्ही कार्यालयाबाहेर गप्पा मारत बसलो होतो. तेवढ्यात प्रदेशाध्यक्षांचे खाजगी सचिव मला बोलवायला आले. एका बातमीसंदर्भात चर्चा करायची आहे, असे सांगून त्यांनी मला पुन्हा आत बोलावले. तिथे गेल्यानंतर त्यांनी एक पाकीट सरकवले. आत काही कागद असतील अशा भाबड्या समजुतीत मी ते उघडले तर आत नोटांचे बंडल. माझ्या स्वभावाप्रमाणे मी जोरात ओरडले- ‘तुमची हिंमत कशी झाली?’ वगैरे बोलून ते पाकिट फेकून बाहेर पडले. बाहेर माझे व्यवसायबंधू उभे होते. त्यांना सांगितले- ‘हे आत पाकिटं वाटताहेत. जाऊ नका.’ त्यावर माझ्या एका मित्राने मला बाजूला घेऊन सांगितले, ‘तुला नको आहे ना, मग तू नको घेऊस. इतरांसाठी प्रॉब्लेम करू नकोस.’ मी हताश झाले आणि ऑफिसला निघून आले.

अर्थात पाकीट नाकारणारी मी एकटी नव्हते हेही तितकेच खरे. नंतर पुढे मला कळले की, माझा एक दुसरा मित्र कित्येक वर्षं माझ्या आणि माझ्या काही मैत्रिणींच्या नावाने एका राजकीय नेत्याकडून नियमित पैसे घेत होता. त्या मुलींना डायरेक्ट पैसे मागायला लाज वाटते, तुम्ही माझ्याकडे पैसे द्या, मी त्यांना पोचवीन असे त्याने सांगितले होते. हे मला कळले आणि मी त्याच्याशी बोलणे सोडून दिले. पुढे दोनेक वर्षांनंतर त्याने माझी माफी मागितली आणि ‘घरी परिस्थिती खराब आहे, पगार मिळत नाही म्हणून मी असे करतो. आता तुझे नाव वापरणार नाही’ असे तो म्हणाला.

माझ्या वरिष्ठांना मी हे सांगितल्यावर ते हसले. म्हणाले, पैसे वाटणाऱ्याला खरेखोटे ठाऊक असते. ते वाटतात कारण लोक घेतात. जे घेत नाहीत त्यांची कल्पना त्यांना लगेच आलेली असते. पण तू याचा बाऊ केलास तर लोक फटकून वागतात. सगळ्या प्रकारच्या लोकांशी मैत्री कर. आपण स्वतः स्वच्छ राहून लोकांशी चांगले संबंध ठेवू शकतो. तसेच झाले. ‘उडदामाजी काळेगोरे’ या न्यायाने सगळ्या प्रकारच्या लोकांशी मैत्री झाली. काही चांगली बातमी असेल तर मला मिळत गेली. अनेक वरिष्ठ पत्रकार, विशेषतः वर्तमानपत्रांत काम करणारे दिग्गज प्रश्न विचारताना मी भारावून जात असे. त्यांचे निरीक्षण करत असे. त्यांची प्रश्न विचारायची पद्धत समजून घ्यायचा प्रयत्न करत असे. त्यातल्या अनेकांचे पत्रकारितेतले कौशल्या वाखाणण्यासारखे होते. सुरुवातीला मोठ्या नेत्यांसमोर वाटणारी बूज हळूहळू कमी झाली. हवे ते प्रश्न विचारण्याची धिटाई आली.

त्याच काळात ऑफिसमध्ये बसलेल्या उपसंपादकांची आमच्या कामात लुडबुड सुरू झाली. महाराष्ट्राचे राजकारण न करणारी विशी-पंचविशीतली मुले आपल्या अर्धवट ज्ञानावर कोणते प्रश्न विचारले पाहिजेत याची यादी देऊ लागले. त्यामुळे स्वतः बातमी शोधणे जवळपास बंद झाले. इथपर्यंत तरी ठीक होते, पण पुढे महाराष्ट्राचे राजकारण निवडणुकांपुरते मर्यादित झाल्यामुळे माझ्यासारखे अनेक पत्रकार ‘ह्युमन इंटरेस्ट स्टोरीज’कडे वळले!  

.............................................................................................................................................

‘मी टीव्ही पत्रकारिता का सोडली?’ या मालिकेतील इतर लेख वाचण्यासाठी लेखिकेच्या नावावर क्लिक करावे.

.............................................................................................................................................

लेखिका भक्ती चपळगावकर मुक्त पत्रकार आहेत.

bhaktic3@hotmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा