भाजपचा वजीर ‘सेफ’ झाल्यानंतर पटावरील बेदखल खेळाडू!
पडघम - राज्यकारण
प्रशांत शिंदे
  • प्रातिनिधिक चित्र
  • Tue , 30 April 2019
  • पडघम राज्यकारण भाजप BJP शिवसेना Shivsena देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis काँग्रेस Congres राष्ट्रवादी काँग्रेस NCP प्रकाश आंबेडकर Prakash Ambedkar राज ठाकरे Raj Thackeray

लोकसभा निवडणुकीची महाराष्ट्रातील मतदानाची चौथी फेरी काल पार पडली आणि एका परीने जनतेची राजकीय गोंधळातून सुटका झाली. दोन महिन्यांपासून राजकीय पक्षांची प्रचाराची रणधुमाळी चालू होती. या काळात प्रचारसभेत गुंतलेल्या माध्यमांना दुष्काळाने होरपळणाऱ्या लोकांचे चटके दिसले नाहीत. रोज रात्री लोकांना आयपीएलनामक अफूची गोळी दिल्याने तेही निपचित पडून राहिले. असो.

या लोकसभा निवडणुकीत सुरुवातीला युतीविरुद्ध आघाडी असा सामना रंगणार असे चित्र होते. लोकांना निवडणूक खूप नीरस वाटत होती. मात्र बहुजन वंचित आघाडी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने खऱ्या अर्थाने निवडणुकीत रंगत आणली. राज ठाकरे यांनी देशात प्रचाराचा नवा पायंडा रुजवला.

काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला विरोधी पक्षाची भूमिका समजण्यात पाच वर्षे गेली. बहुजन वंचित आघाडीच्या उदयाने लोकांना एक नवी आशा वाटली. परंतु अ‍ॅड. प्रकाश आंबेडकरांना बेरजेचे गणित करताना विरोधक कोण हे ठरवता आले नाही. त्यांना जास्त उमेदवार निवडून येण्यापेक्षा ते उभे केल्याचेच अधिक समाधान असल्याचे दिसत होते.

भाजपला ही निवडणूक एकतर्फी वाटत होती. आघाडीच्या नेत्यांनी बंड केल्याने पक्षश्रेष्ठी हैराण होते. अशा वेळी राज ठाकरे निवडणूक न लढवता नरेंद्र मोदी यांच्या सरकार विरोधात प्रचारात उतरल्याने विरोधकांना बळ मिळाले. त्यांच्या भाषणातील मुद्दे सामान्य जनतेच्या मनाला भिडत होते. येत्या विधानसभा निवडणुकीत मनसेचे भाजप-सेना युतीला मोठे आव्हान असणार आहे. पाच वर्षांतील तळ्यात-मळ्यात भूमिकेमुळे सेनेविषयी जनतेत विश्वास राहिला नाही. उद्धव ठाकरे यांनी सेनेचे मुखपत्र दै. ‘सामना’ आणि सभांतून मोदी–शहा यांच्यावर चिखलफेक करण्याची एकही संधी सोडली नव्हती. मात्र लोकसभेच्या निवडणुका जाहीर होताच भाजप-सेना गळ्यात गळे घालून प्रचाराला लागले. हा धूर्तपणा न ओळखण्याइतकी जनता खुळी नाही.

देशपातळीवर राहुल गांधी यांच्या नेतृत्वात प्रगल्भता जाणवत आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली गुजरात, कर्नाटक, मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला चांगले यश मिळाले होते. त्यामुळे राष्ट्रीय पातळीवर काँग्रेसविषयी चांगले वातावरण तयार झाले आहे. महाराष्ट्रातील काँग्रेस मात्र अजूनही दरबारी नेत्यांच्या दावणीतून बाहेर आली नाही. पक्ष आणि विचारधारेला या दरबारी नेत्यांनी पायदळी तुडवले. या निवडणुकीत घरातील सत्ता वाचवण्यासाठी कोणापुढेही लोटांगण घेण्याची त्यांची तयारी दिसली. राज्यातील काँग्रेसच्या जागा भाजपच्या पाच वर्षांतील नाकर्तेपणामुळे वाढणार आहेत.

भाजपकडे २०१४ प्रमाणे एकतर्फी विजयश्री खेचून आणणारे नेतृत्व नाही. महाराष्ट्रात नरेंद्र मोदी यांच्या भाषणाच्या वेळी लोक अर्ध्यावर सभा सोडून गेल्याचे चित्र पाहायला मिळाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप नाहीत, मात्र त्यांच्या मंत्रिमंडळातील नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानंतर त्यांची चौकशी न करता फडणवीसांनी क्लिनचिट दिल्या आहेत. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीत ‘तत्त्वत: शब्द घालून त्यांची दिशाभूल केली. रिक्त जागांवर ७२ हजारपदांची मेगाभरती मराठा आरक्षणाच्या आडून रोखून धरली. राज्यातील शेतकरी आत्महत्याही त्यांना रोखता आलेल्या नाहीत.

.............................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/4795/Spasht-Bolayacha-Tar

.............................................................................................................................................

काँग्रेसपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्ष संघटन चांगले आहे. महाराष्ट्रात काँग्रेसपेक्षा राष्ट्रवादीला जास्त जागा मिळतील असा अंदाज आहे. राष्ट्रवादीत नेत्यांना वानवा नाही. परंतु आघाडी सरकारच्या काळात काँग्रेसपेक्षा अधिक राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप झालेले आहेत. या आरोपाचा वापर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ढालीप्रमाणे केला आहे. त्यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांची अवस्था ‘ना आडात, ना विहिरीत’ अशी केली होती. राज्यात शरद पवारांनी वयाच्या पंच्याहत्तरीनंतरही त्याच उत्साहाने सभा घेतल्या. नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील प्रत्येक सभेत पवारांवर टीका केली. पवार लोकसभेच्या निकालानंतर भाजपच्या सत्ता स्थापनेत सगळ्यात मोठा अडसर ठरणार आहेत. देशातील सर्व विरोधकांना एका छताखाली आणण्याची कला फक्त पवारांमध्येच आहे.

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत स्व. गोपीनाथराव मुंडे यांनी राज्यात महायुतीची मोट बांधली होती. रासपचे महादेव जानकर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी, शिवसंग्रामचे विनायक मेटे, रिपब्लिकन ऑफ इंडियाचे रामदास आठवले यांना सोबत घेऊन परिवर्तन घडवून आणले होते. मुंडे यांच्या अकाली निधनानंतर मागील पाच वर्षांत पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. या पाच वर्षांत मुख्यमंत्री फडणवीस यांनी घटक पक्षांची हेळसांड केली. मंत्रीमंडळ विस्तार व महामंडळाच्या नियुक्त्या रोखून साडेचार वर्षे शिवसेनेसह घटक पक्षांना आशेवर झुलवत ठेवले.

फडणवीस आणि भाजप जातीय ध्रुवीकरण करण्यात यशस्वी ठरले आहेत. मराठा, धनगर, दलित आणि मुस्लिम समाज भाजपवर नाराज असल्याचे चित्र होते. मराठा समाजाने आरक्षणासाठी ५८ मोर्चे काढले. त्यामुळे सरकार विरोधात जनक्षोभ निर्माण होईल असा अंदाज व्यक्त होत होता. परंतु हा जनक्षोभ क्षमवण्यासाठी सरकारने अरबी समुद्रातील शिवस्मारकाचे कार्ड वापरले. दुसरे म्हणजे आंदोलनाचा परिणाम भाजपच्या मतपेटीवर झालेला नाही. भाजपला स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत यश मिळाले. मराठा क्रांती मोर्च्यांनंतर मराठा समाजाचे नेतृत्व विभागले गेले. त्यामुळे मराठा मतासाठी भाजपला विनायक मेटेची गरज नव्हती. त्यांनी बीडमध्ये भाजप विरोधात बंड केल्यानंतर त्यांचे विश्वासू राजेंद्र मस्के यांना भाजपने पक्षात प्रवेश देऊन त्यांची कोंडी केली.

धनगर समाजाचा एसटी (ST)मध्ये समावेश करण्याचे आश्वासन भाजपने पूर्ण केले नाही. सोलापूर विद्यापीठाला राजमाता अहिल्याबाई होळकर यांचे नाव देऊन त्यांची बोळवण केली. २०१४ला भाजपने महादेव जानकर यांना बळ देऊन धनगर समाजाची मते मिळवली होती. त्यामुळे आता महादेव जानकर यांच्या विरोधात धनगर समाजामध्ये नाराजी दिसून येते. यावेळी भाजपला महादेव जानकर नको होते. त्यासाठी भाजपने राम शिंदे आणि विकास महात्मे यांना प्रचारात फिरवले. बारामती मतदारसंघातून महादेव जानकर दुसऱ्यांदा निवडणूक लढवण्यास इच्छुक होते. मात्र मुख्यमंत्र्यांनी महादेव जानकर यांच्याऐवजी रासपचे आमदार राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल यांना उमेदवारी दिली. भाजपने एकाच दगडात दोन पक्षी टिपले. महादेव जानकर यांना पंकजा मुंडे यांची जवळीक महागात पडल्याचे दिसते. पंकजा मुंडे ज्या सभेला असतील त्या सभेच्या व्यासपीठावर महादेव जानकर दिसतात.

अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी ३७ पैकी ७ उमेदवार धनगर समाजाचे दिले आहेत. त्यामुळे भाजपवर नाराज धनगर मतदार काँग्रेस-राष्ट्रवादीकडे न जाता ‘बवंआ’कडे वळले आहेत. स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टी युतीमधून बाहेर पडले. राज्यात आणि देश पातळीवर अनेक आंदोलने केल्यामुळे त्यांचा आजही जनाधार टिकून आहे. राजू शेट्टी यांना शह देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी सदाभाऊ खोत यांना भाजपमध्ये सामील करून घेतले. मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण राणे समितीमुळे मिळाले होते. त्यामुळे राज्यातील मराठा समाज राणे यांच्यासोबत होता. भाजपने राणे यांना मंत्रिमंडळात स्थान देण्याचे आश्वासन देऊन काँग्रेसमध्ये बंड करायला लावले. मात्र बंडानंतर भाजप प्रवेश नाकारला.

स्व. गोपीनाथ मुंडे यांनी रिपाइंचे रामदास आठवले यांना युतीमध्ये मानाचे स्थान दिले होते. या निवडणुकीत रामदास आठवले यांची अवस्था मोठी दयनीय झाली. ते एका जागेसाठी गयावया करताना दिसले. मुख्यमंत्री फडणवीसांनी त्यांच्या मागणीकडे ढुंकूनही पाहिले नाही. देशात दलित व मुस्लीम समाजावर गोरक्षकांनी हल्ले केले. कोरेगाव भीमा प्रकरणानंतर मुख्यमंत्र्यांनी घेतलेली भूमिका लोकांना रुचली नव्हती. मुस्लीम व दलित समाज भाजपला मतदान करणार नाही, याची जाणीव मुख्यमंत्र्यांना होती. परंतु हे मतदार काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मतांमध्ये अधिकची भर घालणार नाहीत, याचीदेखील खबरदारी घ्यायला हवी होती. राज्यात अ‍ॅड. आंबेडकरांना अनुकूल वातावरण तयार झाले होते. हा मतदार आघाडीकडे न जाता अ‍ॅड. आंबेडकरांकडे वळला होता. त्यामुळे भाजपमध्ये रामदास आठवले यांचे महत्त्व शून्य झाले.

राज्यात एकही उमेदवार उभा न करता राज ठाकरेंनी दहा जाहीर सभा घेतल्या आहेत. त्यांच्या सभेचा परिणाम भाजप-सेनेच्या मतांवर होणार. या निवडणुकीत ‘बवंआ’ला मिळणारी मते महत्त्वाची आहेत. अ‍ॅड. आंबेडकरांनी ४८ पैकी ३७ ठिकाणी उमेदवार दिल्यामुळे काँग्रेसला अकोला, सोलापूर, सांगली, माढा, औरंगाबाद या मतदारसंघात नुकसान होणार आहे. अ‍ॅड. आंबेडकर आणि राज ठाकरे यांचे लक्ष विधानसभा निवडणुकीवर आहे.

२०१४ साली भाजपने महादेव जानकर, राजू शेट्टी, विनायक मेटे आणि रामदास आठवले यांचा वापर बुद्धिबळातील प्याद्याप्रमाणे केला होता. भाजपचा वजीर सेफ झाल्यानंतर या खेळाडूंना पाटावरून बेदखल केले होते. त्याची पुनरावृत्ती अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर आणि राज ठाकरे यांच्या बाबतीत होऊ नये म्हणजे झाले!

.............................................................................................................................................

लेखक प्रशांत शिंदे पत्रकारितेचं शिक्षण घेत आहेत.

shindeprashant798@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘जातवास्तव’ स्वीकारल्याशिवाय सत्ता आणि संसाधनांचा जातीय ‘असमतोल’ दूर करता येणार नाही. उमेदवारांची नावे जातीसकट जाहीर करणे, हा एक ‘सकारात्मक प्रयोग’ आहे

महायुतीच्या ३८ उमेदवारांपैकी १९ मराठा आहेत. विशेष म्हणजे हे सगळे श्रीमंत मराठे आहेत. महाविकास आघाडीच्या ३९ उमेदवारांपैकी २४ मराठा आहेत. वंचित बहुजन आघाडीच्या ३२ उमेदवारांपैकी ५ अनुसूचित जाती, १३ ओबीसी आणि ४ मराठा आहेत. यावरून एक गोष्ट लक्षात येते की, मविआ असो वा महायुती एका विशिष्ट समाजाकडेच सत्ताबळ झुकलेले दिसते. मात्र वंबआने उमेदवारी देताना जात समतोल पाळलेला दिसतो.......