कोलंबिया : ‘पेटला तर पेटू दे, खेटला तर खेटू दे’वाल्यांचा देश!
पडघम - सांस्कृतिक
श्रीकांत आगवणे
  • बोगोटा विद्यापीठातल्या हिरवळीवर पहुडलेलं प्रेमी युगुल
  • Sun , 18 December 2016
  • सांस्कृतिक Colombia Bogotá श्रीकांत आगवणे Shrikant Agawane आर्टिस्ट इन रेसिडेन्स Artist in residence

...आख्खा दुसरा दिवस गादीत तळमळत, स्वतःला शिव्या देतोय, कोसतोय. काहीच महिन्यांपूर्वीच्या जर्मनीतल्या रहिवासाच्या सुरस न रम्य आठवणी अजून पुसट न झाल्याने सतत तुलना करू करून होणारा त्रास  आणि आणखी आणखी चिडचीड... आता भूक लागेल, बाहेर जावे लागेल...अंधार...पाऊस सुरु झालाय...  पासपोर्ट बरोबर घ्यावा  की न घ्यावा? छोटा स्वीस नाईफ हातातच असू द्यावा का? या तयारीत शाकाहारी जेवण कुठे मिळेल हा सर्वांत बिन महत्त्वाचा प्रश्न आणि पैसे (लुटलो गेलो नाही तर) किती? हा त्यानंतरचा.

कोलंबियाची राजधानी असलेल्या बोगोटा विमानतळावरून येतानाच, भर दिवसा जे काही घरामागच्या रस्त्यावर दिसलं त्यावरून तरी माझी बाहेर निघण्याची हिंमतच नव्हती. सिनेमात दाखवतात तसे गुंड, त्यांचे सुजलेले डोळे, कालच्या भांडणाच्या ओल्या जखमा, जोडीला  बीभस्त रस ओसंडून वाहू देणाऱ्या उभयलिंगी, स्त्रीलिंगी वारांगना... क्षणात रौद्र, क्षणात भयानक... आणि मी कारुण्य रसात चिंब! अशा परिस्थितीत दोन महिने? आज तर फक्त दुसरा दिवस आहे... कुठून बुद्धी झाली या देशात आर्टिस्ट इन रेसिडेन्सला प्रपोजल पाठवायची!

आपण भारतीय (उपखंडातले) तसे सगळे हुशारच, चुकूनही वेगळ्या वाटेवर न जाणारे, न जाऊ देणारे... त्याचमुळे युरोपात हटकून सायकल ट्रॅकवर चालणारे भारतीयांचे जत्थे जगाच्या ह्या भागात (दक्षिण अमेरिकेत) विरळ. मला दोन महिन्यांत एक भारतीय आणि दोन पाकिस्तानी - तेही अनुक्रमे अमेरिकन आणि ब्रिटिश पासपोर्टवर भेटले आणि त्यांना त्यांच्या पाच-सहा महिन्यांत दिसलेला मी एकटा भारतीय. का बरं? लांबच्या प्रवासाची महाग विमान तिकिटं की, तब्बल अफवा वाटतील अशा बकाल कायदा सुव्यवस्थेच्या (खऱ्याखुर्या) गोष्टी, की आपल्या भूगोलाची पानं युरोप-अमेरिकेनंतरच संपतात?

आधी सहा तास विमान, मग पंधरा तासांचा थांबा आणि परत चौदा तासाच्या सलग प्रवासानंतर विमानतून उतरताच, मला घ्यायला आलेल्या मुलाबरोबर मी बोगोटा फिरण्याचा निर्णय घेतला... त्यानिमित्ताने शहर बघून होईल आणि जेटलॅगही टळेल असे एका दगडात दोन पक्षी, पण मलाच त्या दगडाची जोरात ठेच लागली. अज्ञानातलं सुख मी माझ्या हातानं घालवून बसलो, आता भोगा आपल्या कर्माची फळं!

छे! विमानातून दिसलेलं ते निळंभोर आकाश, क्षितिजाच्या काठाला दिसणारे ते डोंगर... ‘युरोचं नाणं नाही ना, मग नाही मिळणार ट्रॉली,’ असा भाव ठेवणाऱ्या मख्ख मशीनऐवजी, ‘सुट्टे पैसे नाहीत का? मग फुकट ट्रॉली न्या!’ म्हणणारा हसतमुख कोलंबियन कर्मचारी... तुमचा लोकल फोन न मागता फुकट वायफाय, भाषा येत नसतानाही  तुमच्याशी बोलणारी, हसणारी विमानतळावरची कोलंबियन माणसं... हे सारं सारं विरून गेलं, आणि राहिली ती माझी भीती... मी भौतिक वस्तूंच्या किती आसक्तीत आहे, ते दाखवून देणारी. मोजून ५० तासांत जर्मन व्हिसा मिळालेल्या 'मी'चं गर्वहरण कॉन्सुलेटनं केलंच होतं. तिसऱ्या दुनियेतल्या व्हिसासाठी दोन महिने! कोलंबियन कॉन्सुलेटच्या कारभारावरून मला कोलंबियाची थोडी कल्पना आली होती. माणसाने किती ढिसाळ असावा याला काही मर्यादा? इन्व्हिटेशन लेटर १०० डीपीआयवर स्कॅन नाही हे सांगायला २१ दिवस, ते निळ्या शाईच्या पेनानेच सही केलेलं हवं याला परत सात दिवस... फॉर्म ऑनलाईन आहे, पण व्हिसा फी बँकेत भरायची आणि त्याची स्लिप पोस्टानं पाठवायची अशी 'सोय', अकाउंट नंबर फोनवर सांगणाऱ्या कॉन्सुलेटची... भारतातली वेबसाइट फक्त स्पॅनिशमध्येच असणार यात काय आश्चर्य? इकडे कॉन्सुलेट आणि तिकडे मला बोलावणारं विद्यापीठ... याला झाका त्याला उघडा. पण तरीही मला या देशात, या खंडात परत का जावंसं वाटेल... कारण मोकळं  आकाश, मोकळा अवकाश आणि मोकळा होणारा श्वास!

कोलंबिया आणि जवळपास सारे दक्षिण अमेरिकी देश तसे दिसायला, वागायला भारताची चुलत भावंडं. त्यामुळे मी अजून आई-वडिलांसोबत का राहतो हे सांगायला तोंड वाजवायला लागलं नाही. एकत्र कुंटुंबकबिला, ‘लेडीज-बायका हिकडं!’ असं आपल्यासारखच!

असं असूनही कोलंबिया वैयक्तिक स्वातंत्र्याबाबतीत फारच पुढारलेला देश आहे. किती? तर बायकांचा नटण्याचा सोस, अंगभर टॅटू आणि मोठ्या गळ्याचा ड्रेसपुढे युरोप, पण काकूबाई वाटेल एवढा. आफ्रिकी देश पण असेच मोकळेढाकळे  आहेत, पण त्याला एक दुखरी बाजू आहे, युरोप-अमेरिकेमधल्या व्यक्तिस्वातंत्र्याला 'मी माझा' अशी तुसडेपणाची किनार आहे.

मी Artist in residency साठी बोगोटात गेलो, अर्बन स्टडिज, फिल्म विभाग यांच्याशी माझं काम निगडित होतं. त्यामुळे जास्तीत जास्त भटकंती करणं, लोकांशी बोलणं आणि त्याचबरोबर विद्यपीठात फेऱ्या मारणं हाच माझा दिनक्रम होता. बोगोटाचं राष्ट्रीय विद्यापीठ तिकडच्या करदात्या लोकावर चालतं म्हणजे पूर्ण सरकारी! प्रचंड मोठी, विस्तीर्ण. त्यामुळे दुपारच्या वेळी जेवण देणारे बरेच लोक बाहेरून येतात आणि स्टॉल ठेवतात. बरेचसे स्टॉल तरुण मुलं चालवतात. मोकळ्या विस्तीर्ण मैदानात काही जण सर्कशीतल्या खेळाची प्रॅक्टिस करतात, खेळ दाखवतात. त्यांच्याकडे (आपल्या खास भारतीय) आर्थिक, सामाजिक चश्म्यातून पाहताना मला आश्चर्य वाटलं. 'आमच्या मुलींना ही असली बाहेरची मुलं येऊन नादी लावतात' असं काही तिथं ऐकू आलं नाही. इथोपियन ऑर्थोडॉक्स चर्चमधल्या कट्टर शाकाहारी मुलांचा स्टॉल हा आर्जेन्टिनियन मुलीच्या बीफबर्गर स्टॉलच्या शेजारीच! मोकळ्या मैदानात  लोक तंबू ठोकून पिकनिक करतात. काहीजण कुत्री, मांजर, ससे, गाई, घोडे घेऊन फिरतात... आपल्याकडे टागोर, पंडित नेहरू यांच्या व्यापक दृष्टीकृपेनं मोठ-मोठी कॅम्पस असलेली विद्यापीठं आहेत. शांतिनिकेतन गावाचाच भाग असतं, IIT गुवाहाटीत ब्रह्मपुत्र घुसतो, तर IIT मुंबईत चित्ते, मगरी, सांड, माकडं वस्तीला असतात... पण फक्त प्राणीच दिसतात, पण बाहेरचे सामान्य लोक नाही.

विद्यापीठातला एकमेव चौक हा 'चे (गव्हेरा) चौक' म्हणून ओळखला जातो. त्याच्या मोठ्या ग्राफिटी शेजारी 'त्यांचा' ‘सफदर हाश्मी’ असतो. हा Jaime Garzon आपल्या दादू इंदुरीकर, जसपाल भट्टीसारखा सरकारची यथेच्छ खिल्ली उडवणाऱ्यांच्या समृद्ध परंपरेतला प्रहसनकार, पण उजव्या पक्षाने त्याचा ‘हाश्मी’ केल्यावर तो आता सगळ्या ग्राफिटीमध्ये चे आणि फिडेलच्या बरोबरीने दिसतो. कधी कधी हा fashion accessories बनलेला 'चे', डाव्या विद्यार्थ्यांकडून रातोरात मुजवला जातो...तो परत जागृतही होतो. याच चौकात सरकारविरोधी घोषणा होतात, मोठ्ठाली बॅनर्स लागतात... मी तिथं असताना कोलंबियाच्या No विरुद्ध Si (Yes)चा प्रयोग विद्यापीठात विनासायास नित्यनियमाने रोज वाजत गाजत पार पडायचा. राष्ट्रपतींना या यज्ञात न चुकता नमन व्हायचं... त्यांच्या शांततेच्या नोबेल प्राईसचं. ( Juan Manuel Santos या कोलंबियाच्या राष्ट्रपतींना २०१६ सालच्या नोबेल शांतता पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं!) त्यानंतर कौतुक होतं का देव जाणे, कारण त्यांचं स्वतःचं app नव्हतं. JNU, FTII, JU, HU...  चुकूनही आठवू नये. "व्यवस्थेला विरोध तरुण विद्यार्थी नाही करणार, तर कोण करणार?" ही विद्यापीठाच्या डीनची साधी भूमिका.

मुली-मुलं, मुली-मुली आणि मुलं-मुलं एकत्र शिकतात, हसतात, खिदळतात, मोकळ्या गवतावर प्रेम करतात... उगाच 'ओल्या बांबूचे फटके मिळतील' असे फलक नाही, कोणी बिनकामाचे संस्कृतीरक्षक नाही, नैतिकतेचा आव नाही. बीफ हेच मुख्य अन्न  असल्याने गोरक्षकही नाहीत. फक्त सेक्स करण्यासाठीच म्हणून अधिकृत हॉटेल्स आहेत. ‘पेटला तर पेटू दे की, खेटला तर खेटू दे ...’ असा एकंदर सगळ्यांचा सूर. या सुरांनी भारलेल्या मोकळ्या आकाशखाली आपल्या भारतीय कोतेपणाची शरम वाटावी. आपण किती मानवी श्रम, आयुष्यं वाया घालवतो यापायी?

विद्यापीठाचाच भाग असलेल्या कलादालनात एक 'आवाज कले'चं प्रदर्शन. खोली पूर्ण काळोखी. पाय पसरून बसायला/झोपायला म्हणून ठेवलेल्या बीनबॅग्स आणि त्याचा योग्य उपयोग करून घेणारे प्रेमी. तरीही इथल्या खोलीच्या शिपायाकडे असलेल्या टॉर्चला इतरांना त्रास होऊ नये म्हणून झडपा! आपल्याकडे याचा विचार करून पहा. एक तर आवाजी कला नाही, असली तर अंधार नाही, असला तर बसायची सोय नाही, राहा उभे पाय मोडत... "ही काय थेरं करायची जागा आहे?" असा दरडावणारा किंवा त्याचा गैरफायदा घेणारा शिपाई. आठवा पुणे विद्यापीठातले मुजोर शिपाई, जाधवपूर विद्यापीठाचे कुलगुरू, हॉटेल्सवर धाडी घालणारे मालाड पोलीस किंवा जेएनयूतले कंडोम मोजणारे आमदार. काय होईल जास्तीत जास्त? अनौरस मुलं? ती तर आहेतच पुष्कळ! जिथं जेवायला मिळायची मारामार असलेल्या, दोन हजाराच्यावर पैसे मिळायची सोय नसलेल्या देशाला कशाला या संस्कृती रक्षणाच्या उचापती? काय फायदा आहे या साऱ्या नैतिक पोलीसगिरीचा? यामुळे एटीएमच्या लायनीत नंबर लवकर लागतो की चायनाला धडकी भरते? का म्हणून आपण स्वतःला, आपल्या पोरांना चोरून प्रेम करायला भाग पाडतो? मुतताना लपवा, चोरून पादा आणि चोरूनच मिठ्या मारा... असा चोर-पोलिसचा खेळ आपण आणखी किती दिवस खेळणार?

बोगोटातल्या मुली मेकअप करतात, उत्तान कपडे घालतात ते आकर्षक वाटण्यासाठीच, पण म्हणून सहजपणे चाकू, बंदुका बाळगणाऱ्या तिथल्या मुलांना रात्री फिरणारी एकटी-दुकटी मुलगी बापाचा माल वाटत नाही. तिथं बलात्कारापेक्षा चोरी होण्याचीच खात्री. आपल्याकडे काय होईल? दोन्हीही होईल, तेही चाकू न बाळगता आणि वर तिचा खूनही होईल.

आपल्यापेक्षा कमी आहे, पण गरिबी आहे. व्हेनेझुएलामधून आलेल्या वेश्या आहेत. उतू जाईल इतका गांजा आहे, दारू आहे, कोकेन आहे, हेरॉईन आहे, माफिया आहे, चोऱ्यामाऱ्या आहेत, पोलीस भ्रष्ट आहेत, काळाबाजार आहे, बेकारी आहे, कॉर्पोरेटचा मुजोरपणा आहे, चर्चचा मूर्खपणा आहे, आई-बापाची तीच ती काळजी आहे, ट्राफिक जॅम आहे, जंगलात राहून सरकारशी युद्ध करणारे लेफ्टिस्ट आहेत, मोठाल्या मॉलच्या बाहेर आशाळभूतपणे पाहणारे भिकारी आहेत, इंग्लिश न येणारे आहेत, अमेरिकेची आस आहे... हा देश कितीतरी आपल्यासारखाच आहे, पण तरीही टीचभर जागा असलेल्या या देशात आपल्यापेक्षा जास्त खुलं आकाश आहे. इथं मनात भीती न ठेवता मुलींना फिरायची मोकळीक आहे. त्यांच्या उघड्या शरीरावर नजर न जाणारे पुरुष आहेत. या देशाला ५,००० वर्षांच्या इतिहासाचं गळू नसल्याने मुलींना बिनधास्तपणे जन्म घेण्याची परंपरा आहे. इथं खुल्लमखुल्ला प्रेम करणारे आणि त्यांच्याकडे निकोप/निर्लेप नजरेनं पाहणारे आहेत.

जिवंत माणसांना संस्कृती, नीतिमत्ता, देशभक्तीच्या नावाखाली गुदमरवून आपण काय मिळवतो? कधी तरी आपल्यापुरता हिशोब मांडावा! नाहीतर मग, ‘व्वाव, इंडिया’, म्हणून हरेक कोलंबियन माणसाकडून मिळणाऱ्या प्रेमाचा, कौतुकाचा आपण निर्लज्जपणे स्वीकार करायला मोकळे आहोतच!

लेखक मुक्त फिल्ममेकर आहेत.

mydharavi@gmail.com

Post Comment

Aasavari Ghotikar

Tue , 27 December 2016

सुंदर !!