सश्रद्ध तत्त्ववाद्यांच्या कूळधर्माचा मी. पण माझ्या श्रद्धा या माझ्याच आहेत.
पडघम - साहित्यिक
निकोलस बर्दिएव्ह
  • निकोलस बर्दिएव्ह, ‘द बिगिनींग अँड द एण्ड’चं मुखपृष्ठ आणि त्र्यं.वि. सरदेशमुख
  • Mon , 18 March 2019
  • पडघम साहित्यिक निकोलस बर्दिएव्ह Nikolai Berdyaev द बिगिनींग अँड द एण्ड The Beginning of the End त्र्यं.वि. सरदेशमुख T. V. Sardeshmukh

रशियन तत्त्ववेत्ता निकोलस बर्दिएव्ह याच्याबद्दल त्र्यं.वि. सरदेशमुख यांना फार सख्यत्व वाटे. त्यांच्या साहित्यात बर्दिएव्हच्या विचारांचे उल्लेख अनेकवार येतात. ‘अधिभौतिक मार्गावरचे अध्यात्म’ हा त्यांना जोडणारा धागा होता.

‘द बिगिनींग अँड द एण्ड’ हे बर्दिएव्हचे शेवटचे पुस्तक इंग्रजीत त्याच्या मृत्यूनंतर १९५२ साली प्रकाशित झाले. (हे पुस्तक रशियनमध्ये १९४१ साली प्रकाशित झाले आहे.) त्यात त्याने सुरुवातीला (preface) आपले भूमिकारूपी मनोगत मांडले आहे. त्याचा हा अनुवाद. शेवटच्या काळात ज्या अर्ध्या वा कच्च्या टिपणांवर काम करायचे आहे त्याची एक यादी सरदेशमुखांनी केली होती. त्यानुसार मी टिपणे शोधत होतो. त्यातला हा अनुवाद त्यांच्या एम.ए.च्या अध्यापनार्थ लिहिलेल्या संदर्भ डायरीत सापडला. तो अर्थात कच्चा आहे. त्यावर काम करण्याची सवड त्यांना मिळाली नाही. त्यातल्या काही संकल्पनांना नेमका मराठी प्रतिशब्द शोधणे वा घडवणे हे बहुदा करायचे असावे.

बर्दिएव्हचे आयुष्यही नाट्यमय आहे. विद्यार्थी दशेत झारशाहीविरोधात मार्क्सवादी चळवळीत भाग, त्याचे त्याने लावलेले अर्थ सांप्रदायिक (मार्क्सवादी अर्थाने) नव्हते म्हणून त्यांची नाराजी, राजेशाहीनेही कम्युनिस्ट चळवळीत सहभाग म्हणून खटला भरल्याने त्याला तीन वर्षं हद्दपारीची शिक्षा झाली. परतल्यावर अध्यात्माकडे ओढा निर्माण झाल्याने मॉस्कोतील रशियन ऑर्थोडॉक्स चर्चशी त्याचा संबंध आला. तिथंही संप्रदायविरोधी ठरल्यानं त्यांनीही १९१४ साली खटला दाखल केला, पण १९१७ मध्ये क्रांतीनंतर तो रद्दबातल झाला. सरदेशमुखांचीही संप्रदायी आणि पुरोगामी, दोन्ही गटांकडून उपेक्षा झाली तरी जिब्रानपासून तुकाराम-रामदास-बर्दिएव्हपर्यंत अनेकांशी असलेल्या मानसिक सख्यत्वातून ते ऊर्जा मिळवत राहिले.

बर्दिएव्हचे हे मनोगत वाचताना त्यामुळे जाणवत राहते की, प्रत्यक्षाप्रत्यक्षपणे यात त्यांना आपलेच प्रतिबिंब दिसले असावे...

बर्दिएव्हचाचा आज १४५ वा जन्मदिवस. सरदेशमुख जन्मशताब्दीनिमित्ताने त्यांचे कृतज्ञ स्मरण...

- नीतीन वैद्य

.............................................................................................................................................

The beginning and the end - Nicolas Berdyaev

Harper and Brothers publishers

New York, 1952

Translated from the Russian - R. M. French.

Dec.1941 : Paris Clamart

माझी एकंदरीने Metaphysical भूमिका कोणती ते या पुस्तकात मी सांगू पाहत आहे. Metaphysical चा पारंपरिक वा पढिक अर्थ वाचकांनी मनात आणू नये. दस्तयेव्हस्की, किर्केगार्ड, नीत्शे, पास्कल बोहेमी, सेंट ऑगस्टाईन यासारख्या लेखकांच्या सत्वदर्शनात जी अस्तित्ववादी आध्यात्मिकता (वा पारमार्थिकता) - existential metaphysics - (Eschatology : doctrine of death, judgement, heaven + hell देहान्तसंदर्भ तत्वचिंतन) अनुस्यूत दिसते, ती मला अभिप्रेत आहे. तिला eschatological metaphysics  संबोधणे मला अधिक पसंत आहे.

I want to survey all problems in the light of eschatology, in the light which streams from the end.

माझी विचार करण्याची पद्धत खंडरूप (fragmentary) व म्हणींप्रमाणे मिताक्षरी (aphoristic) आहे. माझा विचार प्रामुख्याने एका केंद्राभोवती फिरतो. त्याविषयी माझ्या विरोधकांत आणि चाहत्यांतही सारखेच गैरसमज आहेत. अर्थात मीच त्याला जबाबदार आहे. कारण आजवर माझा सर्वसाधारण दृष्टिकोन कोणता ते मी स्पष्ट केलेले नाही.

माझ्या तात्त्विक चिंतनाला शास्त्रीय रूप नाही. ते तार्किक नाही. माझ्या अंतःप्रेरणा जीवनाचा मागोवा घेतात. माझ्या चिंतनाला पायाभूत आहे तो आध्यात्मिक अनुभव (spiritual experience). स्वातंत्र्याची उत्कट लालसा हीच त्याची शक्ती. माझे विवेचन पूर्वोत्तर पक्षमांडणीचा, बुद्धिवादाचा अवलंब करीत नाही. सत्यापाशी येऊन पोचण्याची त्यात खटपट असत नाही, तर सत्यापासून मी वाटचालीस निघत असतो.

ज्यांचे विचार शास्त्रीय रूप घेतात अशा तत्त्ववेत्त्यांपैकी काण्टपासून मी पुष्कळ काही घेतले आहे, पण काण्टचे आध्यात्मिक विचार विवरून पाहण्याची माझी रीत सर्वांसारखी नाही. बोहेमी व दस्तयेव्हस्की यांचा मी आध्यात्मिक समस्यांच्या उकलासंबंधी अधिक ऋणी आहे. प्राचीनांमधल्या हेरॉक्लिट्सविषयी मला अत्यंत जवळीक वाटते.

I could describe my book as an essay in the eschatological and metaphysical interpretations of the end of the world, of the end of history.

Eschatology कडे आजवर धर्मशास्त्राची फार महत्त्वाचा भाग नसलेली एक कर्मठ विचारधारा म्हणून पाहिले गेले आहे.

माझे पुस्तक समयानुरूप चिंतन नसेलही. आपल्या काळातल्या महासंकटांनी चेतवलेला तो एक आध्यात्मिक अनुभव आहे. त्यातल्या कल्पना वर्तमानातील कल्पनांशी विरोधी असून त्यांचा मोहरा गतशतकांकडे वळलेला दिसेल.

I have very little sympathy with an age which is characterized by the prevailing influence of the masses, quantities and technological sciences and by the dominance of politics over the life of spirit.

एका भयावह कालावधीत मी हे पुस्तक लिहिले आहे. माझ्या कल्पनेपेक्षा ते खूपच लहान झाले आहे. कितीतरी गोष्टी विस्ताराने विवरून मांडायच्या राहिल्या आहेत. निर्वाणीची संकटे उद्भवतील आणि माझे पुस्तक शेवटास जाण्यास बाधा आणतील असे मला भय वाटत होते.

या पुस्तकाद्वारे समाजसंयोजनाच्या अंकित असलेल्या आणि समाजसंयोजनात गढलेल्या सर्वसाधारण मनाला आवाहन केलेले नाही. तसे केल्याने वस्तूप्रतिष्ठापन (objectification) होईल असे मला वाटते. प्रभुत्ववादी मूलगामी पद्धतीचा मी विचारवंत आहे, हे मी जाणतो (I recognize the fact that as a thinker I belong to aristocratically radical type) नीत्शेच्या जातीचा. विचार व त्यातून येणारी उमज, मूल्यांविषयीचा सारासार निर्णय ही सीधेपणाने व स्वाभाविकतेने घेता यावीत… गोष्टी मूलभूत स्वरूपात स्विकाराव्यात, हिशेबी तडजोड होऊ नये व माझ्या मतांना कुठेही मुरड पडू नये अशी माझी मनोमन इच्छा आहे.

इतके असूनही सांस्कृतिकदृष्ट्या उच्चवर्गीय समजणाऱ्यांच्या गर्वाढ्यतेविषयी व विलगपणाविषयी माझ्या मनात नेहमीच एक नकारात्म प्रतिक्रिया असते.

लोकसमुदायाचे व्यवस्थापन करण्याचे मार्ग कोणते ते माझ्या दृष्टीच्या टप्प्यात आलेले नाहीत. म्हणून त्यांचा निर्देश मी करीत नाही. तो करणारे किंवा करावयास उत्सुक असणारे पुष्कळजण आहेत, त्यात माझी भर नको.

जगाचे आणि माणसाचे आजघडीला जे काही होत आहे त्याच्या अर्थाशी झोंबू पाहणारे त्यामानाने अल्पसंख्य आहेत. त्यांच्याशी मी स्वतःला जोडू पाहतो. माझा विचार कोणत्याही प्रकारे अमूर्त नाही. मानसिक क्रांतीशी तो संबंधित आहे. वेगळ्या शब्दांत म्हणायचे तर वस्तूप्रतिष्ठापनेच्या, सत्तेच्या जोखडातून मनाला मुक्त करण्याशी ते संबंधित आहे. मनाच्या एकुण संरचनेत परिवर्तन झाल्याखेरीज प्राणभूत परिवर्तने मानवी जीवनात येणार नाहीत. जाणिवेविषयीचा चुकीचा दृष्टीकोनच माणसाच्या गुलामगिरीचे उगमस्थान आहे.

या पुस्तकातील आध्यात्मिक विचारसूत्रांच्या मुळाशी जगावर अधिराज्य गाजवणाऱ्या अशिवाची आणि त्याने केलेल्या माणसाच्या दुर्दैवी अवस्थेची एक तीव्र जाणीव आहे.

माझ्या बुद्धीला जगताची एकात्मता (world harmony) मानुष व्यक्तिमत्त्व चिरडून टाकणारी व आभासात्मक वाटते म्हणून माझा विचार वस्तुनिष्ठ व्यवस्थापनाविरुद्ध  बंड करून उठतो. वस्तुनिष्ठ जगताचा अंतःशोध घेण्याच्या कोणत्याही प्रकाराला विरोध करणाऱ्या कर्मठ सोवळेपणाविरुद्ध माझे मन बंड करते. गरज विरुद्ध आत्मा अशी ही लढाई आहे. इतके असले तरी निराशावाद्यांच्या किंवा केवळ निषेधवाद्यांच्या कुंपणात मला ढकलून देणे चुकीचे ठरेल. सश्रद्ध तत्त्ववाद्यांच्या कूळधर्माचा मी. पण माझ्या श्रद्धा या माझ्याच आहेत. बाकी म्हणाल तर जे जे अत्यंत व्यामिश्र आणि समस्यात्मक ते ते नितांत गहनस्तरावर अत्यंत शुद्ध निर्मळाशी संमीलित होते, अशी माझी धारणा आहे

Paris - Clamart

डिसेंबर १९४१

१३.१२.१९८८.

.............................................................................................................................................

The beginning and the end

Chapter 1 ( P 3-51 )

१. काण्टचे अतिभौतिक विवरण व त्याची समीक्षा. दोन जगे : दृश्य आणि निखळ-वस्तू, निसर्ग आणि स्वातंत्र्य. काण्ट, प्लॅटो, जर्मन साक्षात्कारवाद, काण्टनंतरचा अतिभौतिक आदर्शवाद.

२. काण्टपासून निघून हेगेल ते नित्शेपर्यंतचा जर्मन आदर्शवादाचा विरोधविकास.

३. एकोणिसाव्या शतकात फ्रेंच तत्त्वज्ञानात अनुस्यूत असलेली स्वातंत्र्य-समस्या. रशियन तत्त्वज्ञानात्मक व धार्मिक विचाराचे विषय.

४. ज्ञानानुभवाचे (Cognition) भावनिक तीव्र- संवेदन-स्वरूप. आध्यात्मिक अनुभवाचे प्रतीक म्हणून अस्तित्ववादी अतिभौतिकता.

५. सत्य - किफायतशीर, घातक आणि संरक्षक. सत्ये आणि सत्य. सत्याची कसोटी.

१७.१२.१९८८

सोलापूर .

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................