तुम्ही अडीच महिने चॅनल बघणं बंद नाही का करू शकत?
पडघम - माध्यमनामा
रवीश कुमार
  • प्रातिनिधिक चित्र
  • Fri , 01 March 2019
  • पडघम माध्यमनामा टीव्ही चॅनेल्स TV Channels वृत्तवाहिन्या News Channels रविशकुमार Ravish kumar

स्वैर अनुवाद : मेधा कुळकर्णी

आपलं नागरिकत्व सांभाळायचं असेल, लोकशाही व्यवस्थेत जबाबदार नागरिक म्हणून भूमिका निभवायची असेल तर, न्यूज चॅनल्स बघणं बंद करा. कुटुंबातल्या मुलांना जातपंथधर्मभेदाभेदापासून दूर ठेवायचं असेल तर, चॅनल्स बघणं थांबवा. भारतातली पत्रकारिता वाचवायची असेल तर, न्यूज चॅनल्स पाहणं बंद करा. अगदी, मलाही बघणं बंद करा. पण न्यूज चॅनल्स बघणं बंदच करा. न्यूज चॅनल्स बघणं हे स्वतःचंच पतन बघणं आहे.

मी हे आधीपासूनच सांगत आलोय. आणि जाणतो की, या वेड्या नशेतून बाहेर येणं तितकं सोपं नाही. तरी, आवाहन करतो की, येते अडीच महिने तरी, न्यूज चॅनल्स बघणं थांबवा. आत्ता, तुम्ही चॅनल्सवर जे बघतात ते सणकी, उन्मादी आहे. भारत-पाकिस्तान तणाव नसतो तेव्हा, ही चॅनल्स मंदिराचा विषय काढून ताण निर्माण करतात. मंदिराचा विषय नसतो तेव्हा, ‘पद्मावती’सारख्या चित्रपटाचा विषय घेतात. चित्रपटाचा विषय नसतो तेव्हा कैरानाबद्दलच्या असत्यकथांतून हिंदू-मुस्लिमांत तणाव तयार करतात. काहीच नसतं तेव्हा, फेक सर्व्हेंवर तासन तास निरर्थक कार्यक्रम करत राहातात.

तुम्हाला कळतंय का, की हे सगळं का चाललंय? न्यूज चॅनल्समध्ये कुठे तुम्ही स्वतः म्हणजे, पब्लिक, सामान्य लोक दिसतात का तुम्हाला? या चॅनल्समधून तुम्हा लोकांना हाकलून दिलं गेलं आहे. ही लक्षात न येण्याजोगी छोटी गोष्ट नाही. लोक त्रासलेले आहेत. एका चॅनलवरून दुसर्‍या चॅनलवर ते भटकत राहतात. त्यांच्यासाठी चॅनल्सवर अवकाशच शिल्लक राहिलेला नाही. युवकांच्या अनेकानेक समस्यांना तिथं जागा नाही. मात्र, चॅनल्स स्वतःचा मुद्दा त्यांच्या माथी मारून त्यांना मूर्ख बनवत आहेत. चॅनल्सकडे तसले मुद्दे कुठून येतात, हे तुम्हाला समजलं पाहिजे. ही चॅनल्स आता जेव्हा काही करतात, काहीही करतात, ते एक तणाव निर्माण करण्यासाठी. तणाव, एका नेत्यासाठी मार्ग प्रशस्त करून देणारा. नेत्याचं नाव आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी.

...............................................................................................................................................................

या पुस्तकांच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://tinyurl.com/y3g5mf7t

...............................................................................................................................................................

न्यूज चॅनल्स, सरकार, बीजेपी आणि मोदी हे सारं एकमेकांत विलीन झालं आहे. इतकं की, पत्रकारिता आणि प्रोपगंडा यातला फरक कळणंच मुश्कील. तुम्हाला एक नेता प्रिय असणं, हे स्वाभाविक आणि बव्हंशी गरजेचंही. पण, तुमच्या नेत्यावरच्या प्रेमाचा फायदा घेऊन या चॅनल्सद्वारे जे केलं जातंय ते धोक्याचं आहे.

सरकार आणि मोदी यांच्या भक्तीच्या नावाखाली प्रोपगंडा करणं हा, खरं तर त्यांच्या समर्थकांचाही अपमान आहे. उपलब्ध पर्यायांतून, मिळालेल्या माहितीतून ज्या समर्थकानं एक निवड केली आहे, त्याला मूर्खच समजण्यासारखं आहे. कारण, भाजपच्या जबाबदार समर्थकांनाही खर्‍या माहितीची गरज असतेच. तेव्हा, ही न्यूज चॅनल्स फक्त सामान्य नागरिकांचा नाही, तर भाजपसमर्थकांचाही अपमान करत आहेत.

मी भाजप समर्थकांनाही आवाहन करतो की, तुम्ही ही चॅनल्स बघू नये. भारतीय लोकशाहीचा घात करण्यात सामील होऊ नका. सांगा बरं, या चॅनल्सविना तुम्ही नरेंद्र मोदींचं समर्थन करू शकत नाही का? त्यांचं समर्थन करण्यासाठी पत्रकारितेच्या अवनतीचंही समर्थन करण्याची गरज आहे का? तसं करत असाल तर, तुम्ही इमानदार राजकीय समर्थक आहात, असं म्हणता येणार नाही. श्रेष्ठ पत्रकारितेच्या निकषांसह मोदीजींचं समर्थन करणं अशक्यच होऊन गेलंय का? भाजप समर्थकहो, तुम्ही भाजपची निवड केली होती, या चॅनल्सची नाही. मीडियाचं पतन म्हणजे राजनीतीचंही पतन. एका चांगल्या समर्थकाचंही अवरोहण.

न्यूज चॅनल्स तुमच्या नागरिकत्वावर हल्ला करत आहेत. लोकशाही रचनेत नागरिक हवेतल्या हवेत तयार होत नसतात. एखाद्या भौगोलिक प्रदेशात जन्माला आल्यानं कुणी नागरिक बनत नसतं. योग्य माहिती मिळणं आणि प्रश्न उपस्थित करता येणं हे नागरिकत्वासाठी अनिवार्य असतं. या न्यूज चॅनल्सकडे हे दोन्ही नाही. पंतप्रधानांनी या पत्रकारितापतनाचं पालकत्वच घेतलंय जणू. त्यांच्यावरच्या भक्तीपायी या चॅनल्सनी स्वतःला जोकर बनवून ठेवलंय. आणि तुम्हालाही उल्लू बनवत आहेत. तुम्ही उल्लू बनणं हे, लोकशाहीचा अस्त होणं आहे.

भारत-पाकिस्तान तणावाच्या निमित्तानं या चॅनल्सना राष्ट्रभक्त होण्याची संधी मिळाली. देशाविषयी भक्ती असती तर, यांनी लोकशाहीचा आधारस्तंभ असलेल्या पत्रकारितेचे उत्तम मानदंड घडवले असते. चॅनल्सकडून ज्या प्रकारचा हिन्दुस्तान आपल्यावर लादला जातोय, तो आपला देश नाही. तो एक नकली देश आहे. देशावर प्रेम याचा अर्थ आपण आपापलं प्रत्येक काम उच्च आदर्श आणि मूल्य ठेवून करणं. पण ही चॅनल्स तुमच्यातल्या स्वाभाविक देशप्रेमाचा प्रवाह अडवून तुमचा कृत्रिम रोबो करू बघतायत.

खोटी माहिती देणार्‍या सवंग विश्लेषण करणार्‍या चॅनल्सनी एक सक्षम विरोधी पक्ष होण्याची सगळी शक्यता संपवून टाकली आहे. वृत्तपत्रांचीही तीच स्थिती आहे. हिंदी वृत्तपत्रांनी तर वाचकांच्या हत्येची सुपारीच घेतली आहे, असं दिसतं. वृत्तपत्रांची पानंदेखील नीट पहा. वृत्तपत्रं घरी पोचवणार्‍याला सांगा की, आता निवडणुकीनंतरच पेपर टाकायला ये. 

आपके भीतर अगर सरकार का विपक्ष न बने तो, आप सरकार का समर्थक भी नहीं बन सकते।

जाणतेपणी समर्थन करणं आणि नशेचं इंजक्शन टोचून घेऊन समर्थन देणं यात फरक आहे. पहिल्या प्रकारच्या समर्थनात स्वाभिमान आणि दुसर्‍या प्रकारात अपमान. तुम्ही अपमानित होऊन ही न्यूज चॅनल्स बघणं सुरू ठेवणार का? आणि या चॅनल्सद्वारे सरकारला समर्थन देणार का?

मला माहीत आहे की, माझं हे सांगणं कोट्यवधी लोकांपर्यंत पोचणार नाही आणि ते न्यूज चॅनल्स बघणंही सोडणार नाहीत. तरीही, मला तुम्हाला जागं करावंसं वाटतंय, सांगावंसं वाटतंय की अशीच चॅनलीय पत्रकारिता सुरू राहिली तर, भारतातल्या लोकशाहीचं भविष्य सुंदर नसेल. न्यूज चॅनल्स तयार करत असलेला, हा चुकीची आणि मर्यादित माहिती बाळगणारा समाज माहितीची निकड असलेल्या, प्रश्न विचारू बघणार्‍या लोकांचा पराभव करून टाकणार आहे. माहिती आणि प्रश्नाविना लोकशाही नाही. आणि अशा लोकशाहीत नागरिकाला जागा नाही. 

सत्य आणि तथ्य समजण्याच्या शक्यता मावळत आहेत. राजकीय पक्षांच्या परिघाबाहेरच्या मुद्द्यांसाठी जागाच उरलेली नाही. कितीतरी मुद्दे चर्चा होण्याच्या प्रतीक्षेत आहेत. या चॅनल्सचं साम्राज्य ही लोकांची हार. या चॅनल्सची जीत म्हणजे एका परीनं लोकांची गुलामी. यांच्या प्रभावापासून  कुणाची सहज सुटका नाही. तुम्ही दर्शक आहात. एका नेत्याच्या समर्थनार्थ पत्रकारितेच्या भ्रष्टतेचं समर्थन करू नका. फक्त अडीच महिने कळ काढा. न्यूज चॅनल्स बघणं खरंच बंद करा.

............................................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

............................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

............................................................................................................................................................

Post Comment

????? ???????

Sun , 03 March 2019

तुमच्या डोक्यात फक्त विरोध आहे, तुम्ही भारताचे पंतप्रधान सोडून पाकिस्तानच्या पंतप्रधानांची वाहवा करता. तुमच्या बुद्धीची करावी तेवढी कीव कमीच वाटते. सुधार व्यक्तीचा द्वेष करताना देश विरोधी शक्तींना पाठिंबा देऊ नका


RAJESH MOHITE

Sat , 02 March 2019

मी तर केलाय कधीचा बंद फक्त लोकसत्ता वाचतो


Gamma Pailvan

Sat , 02 March 2019

काय हो रवीशकुमार, सगळ्या माध्यमवेश्या मोदींना जार मानून नाचू लागल्यावर तुम्हाला नैतिकतेचे उमाळे आले वाटतं. अन्यथा तुम्ही त्याच वेश्यांच्या कामविभ्रमांच्या कौतुकात निमग्न असता म्हंटलं. आपला नम्र, -गामा पैलवान


Sourabh suryawanshi

Fri , 01 March 2019

स्वतःहून मला पण पाहणं बंध करा म्हणण्याला खरच धाडस लागतं.


Prashant

Fri , 01 March 2019

good