मौलाना अबुल कलाम आझाद : हिंदू-मुस्लीम ऐक्याचे पुरस्कर्ते
पडघम - देशकारण
कलीम अजीम
  • मौलाना अबुल कलाम आझाद (११ नोव्हेंबर १८८८ - २२ फेब्रुवारी १९५८)
  • Fri , 22 February 2019
  • पडघम देशकारण मौलाना अब्दुल कलाम आझाद Maulana Abul Kalam Azad

२०१४चा भाजप सरकारचा सत्ताकाळ हा धार्मिक ध्रुवीकरणासोबत ‘राष्ट्रवादी मीडिया ट्रायल’चा काळ म्हणून गणला जाईल. गेल्या साडेचार वर्षांत भारतीय संस्कृतीची बहुसांस्कृतिक सहिष्णू रचना आणि तिच्या मूल्यव्यवस्थेला धक्का पोहचवण्यात आला. भारतीय समाजमन कधी नव्हे ते यावेळी मोठ्या प्रमाणात कलुषित करण्यात आलं आहे. हजारो वर्षांपासून गुण्यागोविंदानं राहणारा हा समाज अचानक एकमेकांकडे वैरी म्हणून एकमेकांकडे पाहत आहे.

बहुसंख्याक असलेल्या समाजगटाकडून अल्पसंख्य मुस्लिमांना केवळ धर्म अलग आहे म्हणून वेगळेपणाची वागणूक दिली जात आहे. गेल्या काही वर्षांपासून त्यांचं दिसणं, राहणं, खाणं, उपासना पद्धती, प्रार्थनास्थळं डोळ्यात खुपू लागली आहेत. अशा धर्मवादी वातावरणात हजारो वर्षांपासून चालत आलेल्या ‘मिश्र संस्कृती’चा धागा पुन्हा एकदा विनण्याची गरज निर्माण झाली आहे. तथाकथित धर्मवादी संघटनांचा विखारी उन्माद रोखण्यासाठी भारतातील बहुसांस्कृतिक वैभव असलेला ‘गंगा-जमनी संस्कृती’ प्रवाह नव्यानं रुजवण्याची गरज आहे.

स्वतंत्र भारताच्या शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्राला नवी दिशा देणाऱ्यांमध्ये मौलाना आझाद यांचा समावेश होता. मौलानांचं राहणीमान व आचार-विचार आदर्श होते. भारताला ‘दारुल अमन’ म्हणजे ‘जागतिक शांततेची भूमी’ बनवण्याचं स्वप्न पाहणाऱ्या आझादांचा आज स्मरण दिन. ऑटोमन मक्केत खलिफा म्हणून जन्माला आलेला हा नागरिक स्वतंत्र भारताचा पहिला शिक्षणमंत्री होता. त्यांनी भारताला एकविसाव्या शतकापर्यंत घेऊन जाणारी शिक्षण व्यवस्था निर्माण केली. संगीत, नाटक, कला व साहित्य अकादमी स्थापन करून भारताच्या सांस्कृतिक वैभवात कमालीची भर टाकली. या संस्था स्थापनेतून ‘मौलाना’ म्हणवणाऱ्या आझादांची दूरदृष्टी किती व्यापक होती हे लक्षात येते.

धर्म, समाज आणि हिंदू-मुस्लिम एकतेच्या क्षेत्रात मौलाना आझादांनी उल्लेखनीय कार्य केलं आहे. ‘राष्ट्रीय एकात्मता’ हा त्यांच्या जिव्हाळ्याचा विषय होता. हिंदू-मुस्लिम एकतेवरील त्यांचं एक उदधृत वारंवार सांगितलं जातं. किंबहुना त्याशिवाय त्यांच्यावरील कुठलाही लेख पूर्ण होत नाही. मार्च १९४० मध्ये काँग्रेसच्या रामगढच्या एका अधिवेशनात दिलेल्या भाषणात आझाद म्हणतात, “स्वराज्य आणि हिंदू-मुस्लिम एकता या दोहोंपैकी एकाची निवड करायची झाल्यास मी हिंदू-मुस्लिम ऐक्याची निवड करेन. कारण स्वराज प्राप्त करण्यास विलंब झाला तर माझ्या देशाचं नुकसान होईल, पण हिंदू-मुस्लिम ऐक्य साध्य झालं नाही तर सबंध मानवजातीचं नुकसान होईल आणि ते मी कदापि सहन करू शकणार नाही.’’

मौलाना आझाद यांनी हयातभर हिंदू-मुस्लिम ऐक्याचा पुढाकार केला. असगरअली इंजिनीअर यांनी ‘इस्लाम अँड मॉडर्न एज’ या पत्रिकेत मौलाना आझादांवर एक छान लेख लिहिला आहे. या लेखात इंजिनीअर यांनी आझादांच्या ‘वहादत ए दीन’ या संकल्पनेवर भाष्य केलं आहे. ‘वहादत ए दीन’ म्हणजे ‘धार्मिक सहिष्णुता’. याचा उहापोह करताना इंजिनिअर लिहितात, ‘मौलाना आझादांनी कुरआनच्या दृष्टिकोनातून हिंदुझम, जैनिझम, ख्रिश्चनिटी, बौद्धिझम,  जुडोझम आणि झोराष्ट्रीनिझम समजून घेतले. या धर्मांवर त्या अनुषंगानं भाष्य करत युक्तीवाद केला.’ इंजिनिअर पुढे म्हणतात, ‘स्वातंत्र्यप्राप्तीच्या संघर्षामध्ये यशस्वी होण्यासाठी त्यांना इतर धार्मिक आस्था असणाऱ्या सहकाऱ्यांशी विशेषत: हिंदूंशी सहकारात्मक भूमिका घ्यावी लागली. त्यातूनच एका बाजूला हिंदू-मुस्लिम ऐक्य तर दुसऱ्या बाजूला सर्व धर्माची एकता- ‘वहादत ए दीन’वर त्यांनी भर दिला. स्वत:च्या या संघर्षातून त्यांनी धार्मिक एकतेची संकल्पना मांडली.’

मौलानांनी इंग्रजी भाषेचा व त्यातील धर्मग्रंथाचा सखोल अभ्यास केला होता. आझाद धर्मपंडित असले तरी ते आधुनिक होते. मौलाना आझादांवर मौलाना शिबली नोमानी, अल्ताफ हुसेन हाली, मौलाना हुसेन नदवी यांच्या विचारांचा मोठा प्रभाव होता. वयाच्या अकराव्या-बाराव्या वर्षी त्यांनी लिखाण सुरू केलं. सर सय्यद अहमद खान यांचे विचार वाचून आपणही हिंदू-मुस्लिम ऐक्यासाठी वृत्तपत्र सुरू करावं असं त्यांना वाटलं. सोळाव्या वर्षी त्यांनी एका वृत्तपत्राचं संपादन केलं. ब्रिटिशांनी त्यावर जप्ती आणल्यानंतर त्यांनी १९१२ साली कलकत्त्याहून स्वत:चं ‘अल हिलाल’ हे अनियतकालिक सुरू केलं. यातून त्यांनी क्रांतिकारी विचार समाजात मांडला. स्वातंत्र्य आंदोलनात या वृत्तपत्राचं महत्त्वाचं योगदान होतं. आपल्या लेखणीतून त्यांनी वारंवार ब्रिटिशांवर हल्ला चढवला.

‘अल हिलाल’मधून ते ‘कुरआन’चं भाषांतर व त्यावरील भाष्य प्रामुख्यानं छापत असत. इंग्रज सत्तेवरचा संताप आणि त्या सत्तेनं देशातील जनतेची व विशेषत: मुस्लिमांच्या संपत्तीची केलेली लूट यावर ते सातत्यानं लिखाण करत. यासह मुस्लिमांच्या अवगुणांवरही त्यांनी वारंवार प्रहार केला. पत्रकारितेच्या माध्यमातून मुस्लिम समुदायांमध्ये हिंदू-मुस्लिम एकतेचा विचार रुजवला. आपल्या लेखणीतून त्यांनी मुस्लिमांत राष्ट्रवाद प्रसवणं व सामाजिक सुधारणांवर भर दिला.

हा काळ भारतात दोन धर्म समाजात दुही निर्माण करण्याचा होता, ‘मुस्लिम लीग’नं धर्माच्या नावावर भारतातील मुस्लिमांना विभक्त केलं होतं. स्वातंत्र्यलढ्यात अधिकार व हक्काची भाषा लीगमुळे सुरू झाली होती. ‘आपण हिंदूंपेक्षा वेगळे आहोत’ हा विचार ‘मुस्लिम लीग’नं पदोपदी मांडला. अनेक मुस्लिम स्वातंत्र्य योद्धे व विद्वान लीगच्या विखारी प्रचाराला बळी पडले. परिणामी हिंदू-मुस्लिमांमध्ये फुटीचं राजकारण जन्मास आलं. अशा वेळी मौलानांनी दोन समाजाला जोडणारा विचार मांडला.

दुर्दैव असं की तत्कालीन जमातवादी शक्तींनी हाच ‘इस्लामी राष्ट्रवाद' म्हणून प्रचारित केला. मौलानांचा खरा विचार रुजला नसल्यानं मुस्लिम समाजात अलिप्ततावाद बोकाळला. ‘आपण इतरांपेक्षा वेगळे आहोत’ ही संकल्पना वारंवार माथी मारली जात आहे. धार्मिक उलेमांनी सोयीचा विचार घेऊन तो प्रसवला. आज अनेक इस्लामी विद्वानांना आझादांचे विचार धोकादायक वाटतात, अनेक इस्लामी धर्मपंडित मौलानांना अनुउल्लेखानं मारतात.

आजच्या बदलत्या राजकीय व सामाजिक परिस्थितीत इस्लामी व अन्य धर्मपंडितांनी घेतलेली भूमिका संशयास्पद आहे. राष्ट्रवाद, सामाजिक ऐक्य यापेक्षा धर्म त्यांना महत्त्वाचा वाटतो. आज धर्मवाद्यांमुळे दोन समाजात दुफळी निर्माण झाली आहे, अशा परिस्थितीत मौलाना आझादांचे धार्मिक सहिष्णुतेचे विचार आणि सामाजिक ऐक्याचे प्रयत्न, यांचा प्रचार-प्रसार करणं क्रमप्राप्त ठरतं.

.............................................................................................................................................

लेखक कलीम अजीम 'सत्याग्रही विचारधारा' मासिकाचे कार्यकारी संपादक आहेत.

kalimazim2@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

Post Comment

Gamma Pailvan

Tue , 26 February 2019

कलीम अजीम, मौलाना अबुल कलम आझाद India Wins Freedom मध्ये लिहितात : >> “as a Muslim, I for one am not prepared for a moment to give up my right to treat the whole of India as my domain and share in the shaping of its political and economic life. To me it seems a sure sign of cowardice to give up what is my patrimony and content myself with a mere fragment of it.” About possible consequences of the partition, he says if India was divided into two states, “there would remain three and half crores of Muslims scattered in small minorities all over the land. With 17 per cent in UP, 12 per cent in Bihar and 9 per cent in Madras, they will be weaker than they are today in the Hindu majority provinces. They have had their homelands in these regions for almost a thousand years and built up well known centres of Muslim culture and civilisation there.” >> आता यावरनं स्पष्टं दिसतं की आझाद साहेबांना फाळणीमुळे मुस्लिम उर्वरित हिंदू भारतात अल्पसंख्य होतील अशी भीती वाटून राहिलीये. म्हणजे हा माणूस अखंड भारतवादी नसून अखंड मुस्लिमवादी आहे. या माणसाचे तुम्ही जे गोडवे गायलेत त्यावरनं उपरोधाने ( ironically) म्हणता येतं की हिंदू-मुस्लिम ऐक्यापेक्षा त्यांनी मुस्लिम-मुस्लिम ऐक्यावर भर द्यायला हवा होता. थोडक्यात काय, तर आज भारतापेक्षा पाकिस्तानला आझाद साहेबांच्या विचारांची गरज आहे. याला म्हणतात नियतीचा सूड. आपला नम्र, -गामा पैलवान तळटीप : मुस्लीम व हिंदू शांततेने एकत्र राहिले असते तर देशाची फाळणी झाली नसती. शिवाय ते हजारो वर्षांचं वगैरे सोडा बरंका. इस्लाम मुळी फक्त १४०० वर्षं जुना आहे. भारतात इस्लामचा जाणवण्याजोगा प्रभाव पडला तो इ.स. १००० नंतर. म्हणजे भारतापुरतं म्हणायचं झालं तर गेले हजारेक वर्षं हिंदू मुस्लिमांसोबत राहताहेत. हजार वर्षं म्हणजे शेकडो वर्षं, हजारो नव्हे.