‘अन्वयार्थ’ हे ऑनलाईन मराठी मासिक तटस्थ, विश्लेषणात्मक भूमिका घेणारं, येत्या काळाचं निष्पक्षपाती, निर्भीड ‘मुखपत्र’ असेल!
पडघम - माध्यमनामा
विवेक कुलकर्णी
  • ‘अन्वयार्थ’ या ऑनलाईन मराठी मासिकाचं बोधचिन्ह
  • Wed , 16 January 2019
  • पडघम माध्यमनामा Madhyamnama विवेक कुलकर्णी Vivek Kulkarni देवेंद्र शिरुरकर Devendra Shirurkar अन्वयार्थ Anvayarth ऑनलाईन मराठी मासिक Online Marathi Magzine

या महिन्यापासून ‘अन्वयार्थ’ हे ऑनलाईन मराठी मासिकाची सुरू होत आहे. विवेक कुलकर्णी आणि देवेंद्र शिरुरकर हे लातूरस्थित दोन तरुण लेखक हे मासिक सुरू करत आहेत. लवकरच या मासिकाचा पहिला अंक ऑनलाईन वाचकांसाठी विनामूल्य उपलब्ध होईल. तूर्तास या मासिकामागची या संपादकांची ही भूमिका...

.............................................................................................................................................

अभिव्यक्तीचं एक सशक्त माध्यम म्हणून मराठीत नियतकालिकांची परंपरा आहे. तसंच दैनंदिन घडामोडीचा धावता वेग म्हणून दररोज ताज्या बातम्यांची भूक भागवणारी वृत्तपत्रं वा दैनिकं सक्रिय आहेत. या घडामोडींबाबत थोडीशी उसंत घेऊन भाष्य करणारी, खोलात शिरून त्याबाबत सविस्तर माहिती देणारी, त्या घटितांचा बऱ्या-वाईटांचा साधकबाधक विचार करून त्यावर विवेचक भाष्य करणारी साप्ताहिकं आणि मासिकं यांचाही एक स्वतंत्र वाचक वर्ग आहे. ‘किर्लोस्कर’, ‘स्त्री’, ‘मनोहर’, ‘मौज’, ‘सत्यकथा’, ‘माणूस’, ‘अस्मितादर्श’ अशा ख्यातनाम नियतकालिकांनी मराठी वाचकांची अभिरुची घडवण्यात मोलाचा वाटा उचलला आहे.

काळानुरूप बदलत्या अर्थकारणात व माहिती तंत्रज्ञानाच्या आविष्करणामुळे या माध्यमातही बरंच परिवर्तन घडून आलं आहे. अगदी वृत्तपत्रांचं व सकाळच्या पहिल्या चहाचं समीकरण बदलून जावं, असा हा तंत्रज्ञानाचा आविष्कार आहे. मुद्रित आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या जोडीला समाजमाध्यमाची लोकप्रियता नाकारता येणार नाही. आपल्या सभोवती जे-जे काही घडतंय, त्याबाबत आपल्या प्रत्येकाला काहीतरी वाटत असतं. असा प्रत्येक जण आता समाजमाध्यमांवर व्यक्त होत आहे. किमानपक्षी त्याबाबत त्याची प्रतिक्रिया तरी उमटताना दिसतेय. अमुक एखादी गोष्ट आपल्याला आवडली, हे सांगण्याचं हक्काचं ठिकाण या समाजमाध्यमांनी उपलब्ध करून दिलं आहे. तरीही या व्यक्त होण्यात सम्यकपणा, त्रयस्थता  कमीच आहे. आक्रस्ताळं, अवाजवी ते अनावश्यक शेरेबाजी असं त्याचं स्वरूप झालेलं दिसतंय. समाजमाध्यम हाताळणाऱ्यांची संख्या वाढतेय, पण त्या प्रमाणात अभ्यासू, तटस्थ, विश्लेषणात्मक लेखनाची कमतरता जाणवतेय, हेही तितकंच खरं.

इतकी वृत्तपत्रं, साप्ताहिकं व मासिकं असताना पुन्हा आणखी एका मासिकाचा- ‘अन्वयार्थ’चा हेतू काय? आणि तेसुद्धा ऑनलाईन? याचं उत्तर आजच्या परिस्थितीत शोधावं लागेल. एकविसावं शतक उलटून अठरा वर्षं पूर्ण झालीत. भारताच्या आर्थिक उदारीकरणाला सुरुवात होऊन २५हून वर्षं लोटलीत. जगातल्या प्रत्येक घटकासोबत आपण सोबत असावयास हवं, असं समस्त भारतीयांना वाटतंय. त्यासाठी जे जे काही करता येईल, ते ते करायची त्यांची तयारी आहे. बदलाचा रेटा मोठा व जोरकस आहे. तसंच जुनी राजकीय प्रणाली जाऊन नवी राज्यव्यवस्था येत्या काळात अजून बरीच वर्षं राहणार असं दिसतंय. विद्यमान सरकारच्या उण्यापुऱ्या पाच वर्षांच्या काळात जगण्यातली सर्व समीकरणं बदलली आहेत. विचारांच्या प्रवाहात बदल घडला आहे. दृष्टिकोन बदलले आहेत. कधी नव्हे ते आपण कोण आहोत, हे ठासून सांगण्याची गरज पडतेय. सोबतच तंत्रज्ञानाच्या रेट्यामुळे संस्कृती व समाज यांच्यात विचित्र सरमिसळ झालीय. एकाच वेळी भीषण सामाजिक दरी ते समृद्ध जीवनशैली असा टोकाचा विरोधाभास बघायला मिळतोय.

.............................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

या सर्व बदलाच्या पार्श्वभूमीवर आपण कुठे आहोत याचा विचार टीम ‘अन्वयार्थ’ करत होती. आपण कुणाची बाजू घ्यायची? कोणत्या विचारसरणीला आत्मसात करावं? की जे जे होतंय ते फक्त बघत राहावं? बघ्याची भूमिका घेतली तर आपण कोणत्या वर्गात जाऊ हाही विचार मनात येऊन गेला. जर बघ्याचीच भूमिका घ्यायची असेल तर निव्वळ घडणाऱ्या घटनांचे मूक साक्षीदार न होता साक्षेपी साक्षीदार व्हावं असं वाटतं.

कारण एकविसाव्या शतकात आपण जगत असलो तरी आपले मूलभूत प्रश्न सुटण्याऐवजी अधिकच क्लिष्ट व गुंतागुतींचे होत चाललेत हे दिसून येतंय. एकीकडे हजारो वर्षांची परंपरा असणारा व जगातील सर्वांत जुनी संस्कृती असं अभिमानानं म्हणवून घेणाऱ्या या समाजात एकविसाव्या शतकात अस्मितेचं टोकदार प्रदर्शन दिसून येतं. आधुनिक होता होता पारंपरिक मूल्यांना कवटाळून बसणाऱ्या या समाजाची जी दिशा असेल, तिचं सहप्रवासी व्हावं हा हेतू ‘अन्वयार्थ’ सुरू करण्यामागे आहे.

स्थानिक पातळीवरचा विचार केला तर नवव्या शतकात राष्ट्रकुटांची राजधानी असणारं लातूर शहर आज एकविसाव्या शतकातल्या भारतासोबत स्वतःला जुळवू पाहतंय. बदल घडवतंय. देशासोबत जगाच्या बरोबरीनं स्वतःला अपडेट ठेवतंय. इथला तरुण उच्च शिक्षण घेऊन परदेशस्थ नागरिक होण्यात धन्यता मानतोय, तर दुसरीकडे सुशिक्षित तरुणी पुरुषप्रधान व्यवस्थेचं प्रतीक असणाऱ्या ‘वटपौर्णिमेचा’ सण आनंदानं साजरा करतायत. त्यामुळे लातूरच्या प्रगतीबरोबरच ‘अन्वयार्थ’चं स्वरूप ग्लोकल राहणार आहे. लोकल ते ग्लोबल असा त्याचा आवाका राहिल.

वृत्तपत्रं, मासिकं वा अन्य माध्यमांचा विचार करता या सर्व प्रवाहात कुठल्याही विचारसरणीचा पगडा बसू न देता विविध विषयांचा उहापोह ‘अन्वयार्थ’ला अपेक्षित आहे. साहित्य, कला, संस्कृती आदींसह सर्व चालू घडामोडीबाबत आजच्या वाचकांना नेमकं काय वाटतं? त्यांची अभिव्यक्ती आपापल्या दृष्टिकोनासह व्हायला हवी. एखाद्या ठराविक विचारसरणीला वा विशिष्ट विषयाला वाहिलेली माध्यमं वाचकांना ज्ञात आहेत. ‘अन्वयार्थ’ हे असं मुक्त व्यासपीठ आहे, जिथं सर्व विचारसरणीचे लोक आपापल्या निश्चित भूमिका मुक्तपणे पण विधायकपणे मांडू शकतील. सर्व राजकीय पक्षाचे लोक इथं त्यांचे विचार किंवा विकास संकल्पना मांडू शकतील. केवळ कोणाच्या प्रभावाखाली, आकसापोटी, विरोधासाठी विरोध म्हणून ‘अन्वयार्थ’ कधीही भूमिका घेणार नाही. माध्यमांच्या मर्यादांचं भान राखत, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मान राखत आजूबाजूच्या घडामोडींचा सत्यान्वेषी वेध घेण्याचा प्रयत्न ‘अन्वयार्थ’ करत राहील. कोणताही पूर्वग्रहदूषित दृष्टिकोन न ठेवता साक्षेपी विवेचन, भाष्य केलं जाईल. उच्चतम व्यावसायिक नीतिमत्ता बाळगत एक सक्षम, निष्पक्ष माध्यम म्हणून सक्रिय होताना सर्व क्षेत्रातील प्रागतिक विचार, विकासाचे प्रयत्न मराठवाड्यातही व्हायला हवेत, हा मुख्य हेतू ‘अन्वयार्थ’चा असेल.

या बाबींचा विचार करताना बदलत्या काळाचा विचार करून हे नियतकालिक डिजिटल स्वरूपातच सुरू करण्याचं अन्वयार्थच्या टीमनं पक्कं केलं. कारण एकविसावं शतक हे डिजिटल युग असेल. येत्या काही वर्षांत छापील गोष्टी संग्रहालयातच पाहायला मिळतील. भविष्याची चुणूक दाखवणाऱ्या ‘मायनॉरिटी रिपोर्ट’ या हॉलिवुड सिनेमात प्रसारमाध्यमं ही डिजिटल स्वरूपातील दाखवली आहेत, तसंच काहीसं येत्या वीस-पंचवीस वर्षात होईल असा टीमचा कयास आहे. कारण नियतकालिकं काळाच्या सोबत समांतरपणे मार्गक्रमणा करत असतात ना की त्याच्या विरुद्ध. त्यामुळे उर्वरित शतक जर डिजिटलच राहणार असेल त्याच्याकडे पाठ फिरवून पारंपरिक स्वरूपातच आपण हे चालवायला हवं, हा अट्टाहास आमची शहामृगी वृत्ती दाखवेल. त्यामुळे तटस्थ, विश्लेषणात्मक भूमिका घेणारं हे मासिक येत्या काळाचं निष्पक्षपाती, निर्भीड ‘मुखपत्र’ असेल.

.............................................................................................................................................

लेखक विवेक कुलकर्णी ‘अन्वयार्थ’ या मासिकाचे एक संपादक आहेत.

genius_v@hotmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

Post Comment

Milind Kolatkar

Tue , 22 January 2019

त्ये संकेतस्थळाचं कोणी सांगल काय? का त्येच्यावर येगळा लेख एइल? लय दिस झालं...


Gamma Pailvan

Sun , 20 January 2019

Vividh Vachak, बायका आणि पुरुष वेगवेगळ्या कारणासाठी लग्न करतात हे ऐकलं असेल तुम्ही. पुरुष जात्याच बहुगामी असतात तर बायका एकगामी. म्हणून वटसावित्री बायकांसाठी सांगितलं आहे. असो. तुम्ही फेमिनिस्ट पक्के स्त्रीद्वेष्टे आहात. बायका बायकांसारख्या वागायल लागल्या की तुमची तळपायाची आग मस्तकाला जाते. बायकांना पुरुषांसारखं वागायला लावून त्यांचं आंतरिक समाधान हिरावून घेणे हे तुम्हां फेमिनाझींचं लक्ष्य आहे. त्यासाठी 'तुम्ही काळानुसार बदलायला हवं' वगैरे मुलामा देताहात. इतकी शतकं वटसावित्रीच्या व्रताचा काडीमात्र दुष्परिणाम नसतांना तुम्हांस ते का खटकतं ? तुमची उद्दिष्टं संशयास्पद आहेत. तेव्हा हिंदूंच्या सणाला दुसरी बाजूही असू शकते, एव्हढा बोध पुरेसा आहे. आपला नम्र, -गामा पैलवान


Vividh Vachak

Sun , 20 January 2019

गामा पैलवान, जरी असे समजले की बायका या कायमच आपल्यापेक्षा श्रीमंत माणसाशी लग्न करतात, तरी सावित्रीचे व्रत कसे काय लागू पडते? आता सल्ले ऐकण्याच्याच मूडमध्ये आहात तर हा एक आणखी सल्ला: जरा स्त्रीद्वेष कमी करून थोडे काळानुसार चला. गूगल कंपनीत असेच काहीसे बरळल्यामुळे एकाची नोकरी गेली वगैरे वाहते वारे आपण पाहत असालच, त्यापासून काही बोध घ्या. स्त्रिया शिकत आहेत, कमावत्या होत आहेत आणि उत्तरोत्तर त्यांना "gold digging" करायची गरज कमी कमी होते आहे. आणि, ही परिस्थिती जर खरंच असेल तर पुरुषांनी अगदी हे व्रत करावेच, म्हणजे अश्या स्त्रियांची नजर त्यांच्याकडे जाणार नाही (कारण पुरुष बावळट दिसतो हा आपलाच अभिप्राय). असो. खरेतर वायफट थिल्लर वाद घालण्यासाठी हा फोरम नाही म्हणून आपल्या यानंतरच्या पोस्टवर भाष्य करू इच्छित नाही . म्हणतात ना -- "agree to disagree" -- तस म्हणा हवं तर.


Gamma Pailvan

Sat , 19 January 2019

Vividh Vachak, तुमची शोधक बुद्धीची आणि झापडे काढण्याची कल्पना लई आवडली. म्हणून काढलीच मी झापडं. मग दिसलं की बायका स्वभावत:च अनुलोमा म्हणजे हायपरग्यामस ( = https://en.wikipedia.org/wiki/Hypergamy ) असतात. मग वटसावित्रीचं व्रत एकांगी वाटंत नाही. पुरुषांनी असंच काहीसं व्रत केलं तर बावळटपणा पदरी येईल. बाकी, झाडाला सूत गुंडाळल्याने पर्यावरणाची कसलीही हानी होत नसते. बघा, तुमचा सल्ला ऐकला आणि मी शहाणा झालो. असेच छानछान सल्ले देत जा. आपला नम्र, -गामा पैलवान


Milind Kolatkar

Fri , 18 January 2019

ते संकेतस्थळ मिळेल का? हुडकल. पण 'अन्वयार्थ' फारच सर्वत्र उपयोगात असलेला शब्द असल्याने घावल न्हाय! धन्यवाद.


Vividh Vachak

Fri , 18 January 2019

गामा पैलवान, जरा शोधक बुद्धीने आणि झापडे काढून पहिले तर उत्तर स्वतःच शोधता येईल. कुठलीही एकांगी प्रथा ही वाईटच. वटसावित्री हे पुरुषप्रधान संस्कृतीचे प्रतीक यासाठी, की केवळ स्त्रियाच नवर्यासाठी प्रार्थना करतात, नवरे बायकांसाठी नाही. यात बायकांचे पतीवरचे अवलंबित्व गृहीत धरण्यात आले आहे. पुन्हा हेही सांगावे लागेल की, मूळ सावित्रीची कथा बिलकुल परावलंबी बाईची नाही, पण आजचे व्रत हे मूळ कथेचे केलेले विकृतीकरण आहे. जर आपल्याला ही परंपरा उदात्त वाटत असेल तर पुरुषांनीही वटसावित्रीचे व्रत आणि उपास-पूजा करायला सुरुवात करावी - पण झाडाला हानी ना पोचवता. मग ह्या प्रथेवर होणारी टीका बंद होईल. प्रचलित प्रथेमुळे बायकांचाच नव्हे, सर्व समाजाचा तोटा होतो. कारण, जेव्हा समाजातली पन्नास टक्के लोकसंख्या ही स्वतःला कुठल्याही निसर्गदत्त फरकामुळे (इथे स्त्रीत्व अपेक्षित आहे), कमी मानते किंवा दबावाखाली राहते तेव्हा त्यातून कुणाचाच फायदा नसतो. हे मी एक सुशिक्षित, परंपराप्रेमी पण आधुनिक, हिंदू व्यक्ती म्हणून सांगत आहे. दुसरा तोटा म्हणजे समस्त वडाच्या झाडांची जी हानी ह्या निमित्ताने होते ती तर पर्यावरणाला मारकच आहे.


Gamma Pailvan

Wed , 16 January 2019

काय हो विवेक कुलकर्णी, वटसावित्री हे पुरुषप्रधान संस्कृतीचं प्रतीक कसं काय बुवा? आणि जरी असलं तरी त्यामुळे बायकांचा काही तोटा होतो का? यावर विश्लेषण अपेक्षित आहे. आपला नम्र, -गामा पैलवान