काव प्लॅन - कुरुक्षेत्र कराची
ग्रंथनामा - झलक
रवि आमले
  • ‘रॉ : भारतीय गुप्तचरसंस्थेची गूढगाथा’ या पुस्तकाचे मुखपृष्ठ
  • Sat , 12 January 2019
  • ग्रंथनामा Granthnama झलक रॉ RAW रवि आमले Ravi Amale

दै. सकाळच्या मुंबई आवृत्तीचे निवासी संपादक रवि आमले यांचं ‘रॉ : भारतीय गुप्तचरसंस्थेची गूढगाथा’ हे पुस्तक नुकतंच मनोविकास प्रकाशनातर्फे प्रकाशित झालं आहे. भारतीय गुप्तचर संस्था- RAWचा संक्षिप्त इतिहास या पुस्तकात मांडला आहे. त्यातील एका प्रकरणाचा हा संपादित भाग.

.............................................................................................................................................

१.

भाषा हे अतिशय धारदार शस्त्र आहे. बहुभाषिक समाजात तर ते जपूनच वापरावे लागते. अन्यथा, त्यातून अस्मितांचे प्रश्न उभे राहतात. ते नीट सोडविले नाहीत, तर त्यातून हिंसक चळवळी फोफावतात. आपण हे भारतात खलिस्तानवादी चळवळीत पाहिले. त्यातील एक प्रमुख मुद्दा होता भाषेच्या लिपीचा. आपण हे श्रीलंकेत पाहिले. तेथे वाद होता तमिळ विरुद्ध सिंहली असा. ‘लिबरेशन टायगर्स ऑफ तमिळ इलम’ (एलटीटीई)च्या उदयामागे जी काही कारणे होती, त्यात तमिळ भाषिक अस्मितेवरील आघात हेही एक कारण होते. सिंधुदेश चळवळीचा जन्मही भाषिक मुद्द्यातून झाला.

फाळणीनंतर उत्तर प्रदेश, हैदराबाद येथील अनेक मुस्लिमांनी रस्ता धरला तो पाकिस्तानातील सिंध प्रांताचा. हे मुहाजिर. म्हणजे निर्वासित. ते उर्दू भाषिक होते. एकतर ही पाकिस्तानची अधिकृत भाषा आणि दुसरीकडे सिंध प्रांतात ती भाषा बोलणाऱ्या मुहाजिरांची मोठी संख्या. यात सिंधी भाषा गुदमरू लागली. समाजजीवनावर ऊर्दू भाषा थोपविण्याचे प्रयत्न सुरू झाल्यानंतर त्याची तीव्र प्रतिक्रिया प्रथमतः उमटली ती सिंधी बुद्धिजीवी आणि विचारवंतांमध्ये. जी. एम. सैद हे त्यांतीलच एक. ते धर्मपंथाने सुफी आणि विचारांनी थिऑसॉफिस्ट. इब्राहिम जोयो या शिक्षकाच्या साह्याने त्यांनी सिंधी भाषिक आणि सांस्कृतिक अस्मितेची मांडणी करण्यास सुरुवात केली. त्यातून आकारास आला सिंधी राष्ट्रवाद. त्याचा पुरस्कार करण्यासाठी त्यांनी ‘जिये सिंध कौमी महझ’ ही राजकीय संघटना उभारली. तिला उभारी आली ती बांगलादेशाच्या निर्मितीने. तेथील भाषिक, सांस्कृतिक आंदोलनापासून स्फूर्ती घेऊन १९७२ मध्ये सैद यांनी पहिल्यांदा पाकिस्तानपासून आझादीची, स्वतंत्र सिंधुदेशाची मागणी केली. त्यांच्या एका पुस्तकाचे नाव आहे – ‘हीन्यार पाकिस्तान खेय टूट्टन खाप्पेय’ – ‘आता पाकिस्तानचे तुकडे झालेच पाहिजेत’. यातून एक गोष्ट स्पष्ट होते. ती म्हणजे १६ डिसेंबर १९७१ रोजी लंडनमधील चेरिंग क्रॉस हॉटेलमधील ती गुप्त बैठक फोल ठरली नव्हती. बांगलादेशी नेते अब्दुस समद आझाद यांनी पाकिस्तानचे तुकडे करण्याचा डाव त्या बैठकीत मांडला होता. त्या वेळी तेथे उपस्थित असलेल्या नेत्यांमध्ये जी. एम. सैद यांचा एक प्रतिनिधीही होता. रॉने विणलेल्या जाळ्याच्या गाठी अशा अचानक कुठे तरी दिसून येतात.    

ही पंजाबी-मुहाजिरांपासून आझादीची, स्वतंत्र देशाची मागणी जोर धरणार तोच पाकिस्तानच्या राजकीय शिखरावर झुल्फिकार अली भुट्टो यांची प्रस्थापना झाली. तेही सिंधी. एक सिंधी व्यक्तीच पाकिस्तानची पंतप्रधान झाली म्हटल्यावर अस्मितेच्या चळवळीचा जोरच ओसरला. परंतु पुढच्या काही वर्षांतच परिस्थिती पालटली. सिंधी भुट्टोंना पंजाबी जन. झिया यांनी फासावर चढविले आणि पुन्हा एकदा सिंधु राष्ट्रवादाचा आवाज मोठा होऊ लागला. कराची हे सिंधचे केंद्रस्थान. दरम्यानच्या काळात तेथे परराज्यांतील परभाषिकांचे वर्चस्व वाढू लागले होते. मुहाजिरांप्रमाणेच आता तेथे खैबर पख्तुन्ख्वामधून मोठ्या प्रमाणावर पंजाब्यांचे स्थलांतर होत होते. त्या विरोधात जिये सिंध चळवळीने आक्रमक पवित्रा घेतला.

याच काळात रॉने पाकिस्तानातील स्वतंत्रतावाद्यांशी संपर्क वाढविल्याचे दिसते. सिंधी चळवळीचे नेते गुपचूप भारतात येऊन जात असत. ते सोपे नव्हते. पाकिस्तानी आयएसआयची त्यांच्यावर नजर असे. परंतु रॉचे एजंट त्यांच्या जाण्या-येण्याची ‘व्यवस्था’ करीत. येथे ते इंदिरा गांधी, काव तसेच रॉचे तेव्हाचे प्रमुख गॅरी सक्सेना यांना भेटत.

याच काळात पाकिस्तानच्या अंतर्गत परिस्थितीसमोर हळुहळू बिकट आव्हाने उभी राहू लागली होती. कराचीतील कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात आली होती. त्यामागचा ‘परकी हात’ लपून राहणे शक्य नव्हते. त्याला शह देण्यासाठी आयएसआय आणि जनरल झिया यांनी एक राजकीय खेळी केली. अल्ताफ हुसेन हे ‘ऑल इंडिया मुहाजीर स्टुडन्ट ऑर्गनायझेशन’ या लढाऊ विद्यार्थी संघटनेचे नेते. ते तेव्हा लंडनमध्ये राहात होते. त्यांना पाकिस्तानात आणण्यात आले आणि त्यांच्या संघटनेचे रूपांतर ‘मोहिजीर कौमी मुव्हमेन्ट’ (एमक्यूएम) या संघटनेत करण्यात आले. ही १९८४ मधील घटना. पाहता पाहता या संघटनेने कराचीवर कब्जा केला. कराचीतील गल्लोगल्ली संघटनेच्या शाखा तयार झाल्या. खंडणीखोरी, हाणामारी, ‘गद्दारां’चे खून हा राजकीय कार्यक्रम झाला. अल्ताफ हुसेन ‘मुहाजीर हृदयसम्राट’ बनले. त्यांच्या बोटाच्या एका इशाऱ्यासरशी ‘कराची बंद’ होऊ लागली. त्यांच्या विचारांचे सोने लुटण्यासाठी, त्याचे धडाकेबाज भाषण ऐकण्यासाठी लाखोंची गर्दी होऊ लागली. या संघटनेचा प्रभाव एवढा होता, की सिंधमधील जवळ जवळ प्रत्येक पक्षाला असे वाटत होते, की आपला खात्मा करण्यासाठीच झिया यांनी एमक्यूएमचे भूत उभे केले आहे. यात गंमत अशी, की स्वतः जन. झिया हे पाकिस्तानाचे पुरते इस्लामीकरण करीत असताना, अल्ताफ हुसेन यांचा पक्ष मात्र डावी राजकीय विचारधारा घेऊन उभा राहिला होता. त्यामुळे त्याचे पाकिस्तानातील मुख्य राजकीय प्रवाहाशी पटणे शक्यच नव्हते. रॉने त्याचा फायदा घेतला नसता तरच नवल. आज पाकिस्तानात अल्ताफ हुसेन याची ओळख आहे ती रॉचा एजंट आणि देशाचा गद्दार अशीच. याला प्रामुख्याने कारणीभूत आहे १९९२चा ‘जिनापूर प्लॅन’.

सिंध प्रांतात एकीकडे स्वतंत्र सिंधुदेशची मागणी होत होती. सिंधु राष्ट्रवाद्यांच्या दहशतवादी संघटना उदयाला आल्या होत्या. त्याचवेळी मुहाजीर हे सिंधपासून स्वातंत्र्याची – स्वतंत्र मुहाजीर सुभ्याची - मागणी करीत होते. सिंधला पाकिस्तानपासून आझादी हवी होती आणि मुहाजीरांना सिंधपासून असे हे त्रांगडे होते. त्यातून सिंधी विरुद्ध मुहाजीर अशा दंगली होत होत्या. बॉम्बस्फोट, गोळीबार होत होते. एकमेकांच्या कार्यकर्त्यांचे हत्यासत्र सुरू होते. सिंधमधील राजकारण अक्षरशः सडले होते. १९८८ मध्ये बेनझीर भुट्टो यांची पाकिस्तान पीपल्स पार्टी सत्तेवर आली. पाकिस्तानला पहिल्या महिला पंतप्रधान लाभल्या. या सरकारला एमक्यूएमचा पाठिंबा होता. त्या दोन पक्षांचा ५९ कलमी करार झाला होता. पण सत्तेवर येताच बेनझीर यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. त्या सिंधी म्हणून त्या मुहाजीरांच्या भल्याकडे लक्ष देत नाहीत, अशी भावना मुहाजीरांमध्ये निर्माण झाली आणि त्यातून पीपीपी आणि एमक्यूएम यांच्या विद्यार्थी संघटनांमध्ये संघर्ष निर्माण झाला. कराची आणि हैदराबाद ही दोन्ही शहरे पेटली. अखेर मे १९९० मध्ये बेनझीर यांनी त्या दोन्ही शहरांतील दंगली काबूत आणण्यासाठी लष्कराला पाचारण केले. त्यानंतर ऑगस्टमध्ये बेनझीर यांचीच सत्ता गेली. अध्यक्ष गुलाम इसाक खान यांनी त्यांचे सरकार बरखास्त केले आणि नवाझ शरीफ यांची पंतप्रधान म्हणून कारकिर्द सुरू झाली. अल्ताफ हुसेन यांनी मुहाजीरांच्या प्रश्नांवरून शरीफ यांनाही विरोध सुरू केला. आता शरीफ यांच्यासाठी अल्ताफ हुसेन यांना लगाम घालणे गरजेचे झाले होते. याचे एक कारण म्हणजे अल्ताफ हुसेन यांचे बेभरवशाचे राजकारण, त्यांच्या पक्षाच्या हिंसक कारवाया, वेळोवेळी ते पुकारत असलेले ‘बंद’. यामुळे कराची बंदरातील उलाढालीवर झालेला परिणाम. कराचीतील अशांततेमुळे, बंदरातील मुहाजीरांच्या सततच्या संपांमुळे अनेक आंतरराष्ट्रीय जहाज कंपन्यांनी कराची बंदराकडे पाठ फिरवली होती. अखेर शरीफ यांनी १९९२ मध्ये कराची ‘एमक्यूएम’मुक्त करण्यासाठी लष्कर आणि आयएसआयच्या मदतीने मोहीम आखली. तिचे सांकेतिक नाव होते ‘ऑपरेशन क्लिनअप’. या मोहिमेचे तत्कालिक कारण ठरली ती जिनापूर योजना.

सिंधमधून कराची फोडायची आणि वेगळे जिनापूर राज्य स्थापन करायचे असा डाव एमक्यूएमने आखला होता. त्या प्रस्तावित राज्याचा नकाशाही तयार करण्यात आला होता. नेमका तो नकाशाच पाकिस्तानी लष्कराच्या हातास लागला. तो सापडला एमक्यूएमच्या कार्यालयात. देशाचे तुकडे करण्याचे, सिंधमधून कराची वेगळी करण्याचे हे कारस्थान उघड होताच केवळ सिंधमध्येच नव्हे, तर संपूर्ण पाकिस्तानात संतापाची लाट उसळली. आणि त्या पार्श्वभूमीवर शरीफ यांनी कराची ‘एमक्यूएम’मुक्त करण्यासाठी तेथे लष्कर आणि आयएसआयचे गुप्तचर पाठविले. पण त्याच्या एक महिना आधीच अल्ताफ हुसेन यांनी पाकिस्तानातून पलायन केले होते. २१ डिसेंबर १९९१ रोजी त्यांच्या हत्येचा प्रयत्न झाला होता. त्यामुळे त्यांनी पाकिस्तान सोडले आणि लंडनमध्ये राजकीय आश्रय घेतला.

या जिनापूर योजनेमुळे आणि नंतर ते पळून गेल्याने त्यांच्या ‘गद्दारी’वर जणू शिक्कामोर्तबच झाले. पण वास्तव याहून वेगळे होते. जिनापूर योजना नावाची चीजच अस्तित्वात नव्हती. एमक्यूएमने जिनापूर राज्याचा कोणताही नकाशा तयार केलेला नव्हता. ते सगळे लष्कराचे षडयंत्र होते. लष्करानेच तसा बनावट नकाशा तयार करून तो एमक्यूएमच्या नावावर खपविला होता. हे सगळे उघडकीस आले ते त्यानंतर तब्बल १८ वर्षांनी. त्या षड्यंत्रात सहभागी असलेले ब्रिगेडियर इमतियाझ अहमद ऊर्फ बिल्ला आणि जनरल नासीर अहमद खान या दोन अधिकाऱ्यांनी त्यांच्या निवृत्तीनंतर, २४ ऑगस्ट २००९ रोजी हा गौप्यस्फोट केला.

पण याचा अर्थ अल्ताफ हुसेन हे पाकिस्तानविरोधात कारवाया करीत नव्हते का? सर्वांत महत्त्वाचे म्हणजे ते रॉचे एजंट नव्हते का?  असतील तर त्यांना रॉने कधी गळाशी लावले होते?

या प्रश्नांची उत्तरे आपल्याला मिळतात, ती लंडनमधील मुत्तहिदा (पूर्वीची मुहाजीर) कौमी मुव्हमेन्टचा एक वरिष्ठ कार्यकर्ता तारिक मीर याने लंडन पोलिसांना दिलेल्या जबानीतून.

२.

अल्ताफ हुसेन यांनी ब्रिटनमध्ये राजकीय आश्रय घेतला असला, तरी ते तेथून कराचीवर राज्य करीत होते. लंडनच्या वायव्येस असलेल्या एजवेअरमध्ये त्यांनी पक्षाचे मुख्यालय स्थापन केले होते. याच कार्यालयावर २०१२च्या डिसेंबर महिन्यात लंडन पोलिसांनी छापा टाकला होता. आरोप होता मनी लाँडरिंगचा – अवैध मार्गाने मिळविलेले काळे धन पांढरे केल्याचा. या नंतर जून २०१३ मध्ये अल्ताफ यांच्या निवासस्थानावरही पोलिसांनी छापा टाकला. त्यावेळी त्यांच्या घरातून चार लाख पौंड एवढी रक्कम जप्त करण्यात आली. त्या प्रकरणी ३ जून २०१४ रोजी त्यांना अटकही करण्यात आली होती. काही तासांत जामिनावर ते सुटले. परंतु तोवर इकडे कराचीमध्ये हलकल्लोळ माजला होता. एमक्यूएमच्या समर्थकांनी ते शहर बंद पाडले होते. या आरोपातून पुढे न्यायालयाने त्यांना मुक्त केले. परंतु त्या चौकशीदरम्यान तारीक मीर या कार्यकर्त्याकडून पोलिसांच्या हाती जी माहिती लागली, ती धक्कादायक होती. ती माहिती होती एमक्यूएम आणि रॉ यांच्यातील संबंधांची. गुप्तहेर संस्थांची कामाची रीतही यातून उघड होते.

३० मे २०१२ रोजी, म्हणजे एमक्यूएमच्या कार्यालयावरील छाप्यानंतर पाच महिन्यांनी एजवेअर पोलिस ठाण्यात मीर यांची जबानी नोंदवून घेण्यात आली. त्यात त्यांनी सांगितले. –

हुसेन (मि. एच) यांना भारताकडून पैसे मिळत असत. साधारणतः १९९४ मध्ये हे पैसे मिळण्यास सुरूवात झाली. ही रक्कमही कमी नव्हती. दरवर्षी आठ लाख पौंड एवढा निधी दिला जात होता. तोही रोकड स्वरूपात. सुरूवातीला ते पैसे कुरिअरने ब्रिटनमध्ये पाठविले जात. पण नंतर ब्रिटनमध्ये रोकड आणण्यावर एक लाखाची मर्यादा घालण्यात आली. तेव्हा मग ते वेगळ्या मार्गाने, तेथील व्यावसायिकांच्या माध्यमातून पोचते केले जात. कधी ते बँक खात्यात ट्रान्स्फर केले जात. हे पैसे हवाल्याच्या मार्गानेही पाठविले जात असत असे मीर सांगतात. (या जबानीच्या अधिकृत कागदपत्रांत या ठिकाणी एक छोटीशी गंमत पाहायला मिळते. जबानी घेणा-या अधिका-याला बहुधा हवाला म्हणजे काय हे नेमके माहीत नसावे. गोंधळ उडाल्याचे दिसते त्याचा, की हवाला हे व्यक्तीचे नाव आहे की आणखी कशाचे? त्यामुळे ‘द मनी वूड आयदर बी ट्रान्सफर्ड टू मि. एच बाय हवाला’ या वाक्यातील हवाला या शब्दापुढे त्याने कंसात प्रश्नचिन्ह नोंदवून ठेवले आहे.)

मीर यांच्या म्हणण्यानुसार, रॉने १९९४ साली लंडनमध्ये एमक्यूएमशी संपर्क साधला. त्यानंतर मग एमक्यूएमचे प्रतिनिधी आणि रॉचे गुप्तचर यांच्या युरोपातील विविध शहरांत बैठका होऊ लागल्या. त्याची खबर कोणाला लागू नये यासाठी खास काळजी घेण्यात येत असे. मीर सांगतात –

‘‘ज्या ठिकाणी भेटायचे ठरले असेल, तेथे आम्ही कधीही थेट जात नसू. उदाहरणार्थ आम्ही रोमला जायचो, ते फ्रँकफर्टमार्गे. त्या बैठकीची तारीख आणि स्थळ नेहमीच भारतीय व्यक्ती ठरवीत असे. फक्त दोन दिवस आधी आम्हांला ती कळविण्यात यायची. मग त्यांनी व्यवस्था केल्यानुसार आम्ही एखाद्या पंचतारांकित हॉटेला भेटायचो.

‘‘ही पहिली भेट बहुधा रोममध्ये झाली किंवा व्हिएन्नामध्ये. तिला अन्वर आणि हुसेन उपस्थित होते. तीन-चार वेळा आमची मिटिंग झाली. त्यातील एक नक्कीच रोममध्ये झाली, एक व्हिएन्नात, एक झुरिकमध्ये, एक ऑस्ट्रियातील साल्सबर्ग या लहानशा शहरात आणि एक प्रागमध्ये.

“या भेटी नेहमी भारतीय व्यक्तींना वाटे तेव्हाच होत असत. बैठकीचा उद्देश एकमेकांची जान-पहचान व्हावी हा होता. मला वाटते, त्यांची नावे खरी नव्हती. त्यांनी त्यांची नावे, ओळख किंवा पद कधीच सांगितले नाही. मला वाटते, ते रॉचे लोक होते. त्यातील एका ज्येष्ठ व्यक्तीची पोहोच थेट पंतप्रधानांपर्यंत होती. आम्ही त्यांच्याकडून किती पैसे मागितले ते मला आठवत नाही. पण मला वाटते, ते सुमारे १५ लाख अमेरिकी डॉलर असावेत. त्यांनी किती दिले ते मला माहीत नाही. ते पैसे हुसेन यांच्याकडे गेले.’’

भारताकडून हे पैसे का दिले जात असत? या प्रश्नावर मीर म्हणतात - ‘‘भारत सरकार आम्हांला निधी देत होते, कारण आम्हांला पाठिंबा देणे हे चांगले असल्याचे त्यांना वाटत होते...’’ पण या पैशांच्या बदल्यात त्यांनी आमच्याकडून कधीही कसलीही अपेक्षा केली नाही, असे सांगता-सांगता मीर म्हणतात - ‘‘त्यांना त्या बदल्यात आम्ही काय देऊ शकत होतो याची मला कल्पना नाही. आम्ही सरकारमध्ये होतो तेव्हाही आमच्याकडे कसलेही अधिकार नव्हते. मी जेव्हा त्या भारतीय व्यक्तीला भेटायचो, तेव्हा त्याने कधीही आम्ही त्यांच्यासाठी काय करू शकतो हे सांगितल्याचे माझ्या ऐकिवात नाही... बहुधा मला वाटते, प्रशिक्षण दिले जात होते – शस्त्रास्त्रे चालविण्याचे प्रशिक्षण. एमक्यूएमची स्थापना झाली, तेव्हा त्यांनी प्रशिक्षण दिले होते.’’

या सगळ्या बैठका आणि आर्थिक व्यवहाराची कल्पना फक्त चार जणांना होती. त्यातील एक स्वतः हुसेन, दुसरे मीर, तिसरे डॉ. एफ म्हणून कोणी आणि चौथे होते मुहम्मद अन्वर. हे एमक्यूएमच्या लंडन कार्यालयातील दुसऱ्या क्रमांकाचे प्रभावशाली नेते होते.

तारिक मीर यांचे हे सारे दावे एमक्यूएमच्या वरिष्ठ नेत्यांनी फेटाळून लावले आहेत. भारत सरकार ते मान्य करण्याची शून्य शक्यता आहे. तेव्हा ते दावे खरे की खोटे या वादात न पडता, त्यांतून उघड होणाऱ्या गोष्टी पाहाव्यात हेच बरे. मीर यांच्या या जबानीतून अनेक बाबी स्पष्ट होतात. एक तर एमक्यूएम आणि रॉ यांचे संबंध होते. एमक्यूएमच्या माध्यमातून रॉ कराचीतील वातावरण सतत स्फोटक ठेवण्यात यशस्वी झाली होती आणि त्याचा परिणाम पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेवरही होत होता. मीर सांगतात, की १९९४ मध्ये रॉच्या अधिकाऱ्यांनी पहिल्यांदा या पक्षाशी संपर्क साधला. या काळात भारतात पंतप्रधानपदी होते पी. व्ही. नरसिंह राव. परंतु मीर यांना हे केवळ लंडनमधील संपर्काबाबत म्हणायचे आहे असे दिसते. कारण पुढे तेच या आधी रॉने एमक्यूएमच्या कार्यकर्त्यांना प्रशिक्षण दिल्याची माहिती देतात. याला २०१६ मध्ये दुजोरा दिला तो कराचीचे माजी महापौर मुस्तफा कमाल यांनी. त्यांच्या म्हणण्यानुसार, ‘एमक्यूएम भारताकडून गेल्या २० वर्षांपासून निधी घेत असल्याची माहिती पक्षाच्या सर्व वरिष्ठ नेत्यांना होती.’ कमाल यांचा हा दावा महत्त्वपूर्ण ठरतो कारण तेही एमक्यूएमचे एक वरिष्ठ नेते होते. या सगळ्यातून आणखी एक विचित्र बाब समोर येते. ती म्हणजे रॉ एमक्यूएमला पैसे पुरवित होती, प्रशिक्षण देत होती, त्याच काळात सिंधी नेत्यांशीही संधान बांधून होती.

३.

सिंध प्रांतात अल्ताफ हुसेन यांच्याप्रमाणेच आणखी एका बंडखोर नेत्याला रॉने सहकार्याचा हात दिला होता. अल्ताफ हुसेन हा काहीही झाले तरी एक राजकीय नेता होता. हा बंडखोर राजकीय घराण्यातला होता, पण होता मात्र दहशतवादी. त्याच्यावरच्या एका पुस्तकाचे नावच मुळी ‘द टेररिस्ट प्रिन्स’ - दहशतवादी राजपुत्र - असे आहे. त्याचे नाव मुर्तझा भुट्टो. भारताचे कट्टर शत्रू झुल्फिकार अली भुट्टो यांचा हा थोरला मुलगा…

.............................................................................................................................................

"रॉ : भारतीय गुप्तचरसंस्थेची गूढगाथा"  - या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/4716/RAW---Bharatiya-Guptcharsansthechi-Gudhgatha

.............................................................................................................................................

लेखक रवि आमले दै. सकाळच्या मुंबई आवृत्तीचे निवासी संपादक आहेत.

ravi.amale@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘बहिष्कृतां’च्या घरचे अन्न ‘बहिष्कृतां’प्रमाणेच उपेक्षिले गेले. त्यामुळे ‘ब्राह्मणेतर खाद्यसंस्कृती चळवळी’ने आपली ‘देशी’ बाजू जगापुढे मांडायला सुरुवात केलीय...

स्वच्छता व शुद्धता या दोहोंना अस्पृश्यतेचा मोठा संदर्भ आहे. ज्यांना शिवायचे नाही ते अस्पृश्य. त्यांनी जवळ यायचे नाही की, शेजार करायचा नाही, हा ब्राह्मण व सवर्ण यांचा नियम. घाणीची कामं ज्यांना वर्णाश्रम धर्माप्रमाणे करायला लावली, त्यांना घाण समजून अस्पृश्य ठरवण्यात आले. साहजिकच ही माणसं कशी जगतात, काय खातात-पितात, काय विचार करतात, याची जाणीवच वरच्या तिन्ही वर्णांना म्हणजेच सवर्ण जातींना नव्हती.......

किणीकरांना सगळी दर्शने कळत होती आणि अजून महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती काव्यात उतरवता येत होती. आणि अजून मोठी गोष्ट म्हणजे ते काव्य चार ओळींपुरते सुटसुटीत ठेवता येत होते

किणीकरांवर मानवेंद्रनाथ रॉय ह्यांच्या विचारसरणीचा मोठा प्रभाव होता. त्यांच्या नावावरूनच त्यांनी स्वतःला ‘रॉय’ हे नाव घेतले होते. रॉय यांनी 'रॅडिकल ह्यूमॅनिझम’चा पुरस्कार केला. त्या काळच्या महाराष्ट्रात अनेक नेत्यांवर, लेखकांवर आणि विचारवंतांवर रॉय ह्यांचा प्रभाव पडला होता. रॉय ह्यांनी क्रांतीचा मार्ग नाकारला असला, तरी त्या काळी तरुण असलेल्या किणीकरांना मनात कुठेतरी क्रांतीचे आकर्षण वाटले असणार.......

म्हटले तर हा ग्रामीण राजकारण उलगडून सांगण्याचा खटाटोप आहे अन् म्हटले तर शेतकऱ्यांना लुबाडणाऱ्या व्यवस्थेला पर्याय उभे करणाऱ्या पुढच्या पिढीतील शेतकरी तरुणांचा संघर्ष आहे

ही केवळ भानुदासराव पाटील, विक्रम शिंदेचीच कथा नाही, तर आबासाहेब जाधव, दिनकरराव पाटील यांच्यासारख्या लोकशाही प्रक्रियेने उदयास आलेल्या नव्या सरंजामदारांचीही गोष्ट आहे. आर्थिक संसाधनांच्या बळावर वाट्टेल तेवढा पैसा मोजून निवडणुका जिंकणारे, मतदारांचा कौल फिरवणारे आबासाहेब, दिनकरराव केवळ हैबतपुरातच नव्हे, महाराष्ट्रात सगळ्याच मतदारसंघांत दिसून येतात, पण.......

या पुस्तकातल्या ‘बिटविन द लाईन्स’ नीट वाचल्या, तर आजच्या मराठी पत्रकारितेची ‘अवनत’ अवस्था आणि तिची ‘ऱ्हासपरंपरा’ नेमकी कुठून सुरू झाली, हे लख्खपणे समजते!

आपल्या गुणी-अवगुणी सहकाऱ्यांकडून उत्तम ते काढून घेण्यापासून, समाजातल्या व्यक्ती-संस्था यांचं योगदान नेमकेपणानं अधोरेखित करण्यापर्यंत बर्दापूरकरांचा सर्वत्र संचार राहिला. त्यामुळे त्यांच्या पत्रकारितेला सत्त्व, नैतिक बळ आणि गांभीर्याची झळाळती झालर लाभत राहिली. आजच्या मराठी पत्रकारितेच्या संदर्भात त्या झालरीचा ‘थर्मामीटर’ म्हणून वापर केला, तर जे ‘तापमान’ कळतं, ते काळजी करावं, असंच आहे.......

लोकशाहीबद्दल आस्था किंवा काळजी व्यक्त करणं, ही काही लोकांचीच जबाबदारी आहे, हा समज खोडून काढायचा तर कामच केलं पाहिजे. ‘लोकशाही गप्पा’ हे त्या व्यापक कामाच्या गरजेतून आलेलं छोटंसं काम आहे

पुरेशी मेहनत करून आणि संवादाच्या सर्व शक्यता खुल्या ठेवून लोकांशी बोललं गेलं, तर प्रत्येकाच्याच आकलनात वाढ होते. आणि हळूहळू भूजलाची पातळी उंचवावी, तसं लोकशाहीबद्दलचं भान सखोल होण्याची शक्यता निर्माण होते. आपल्या भोवतीच्या गदारोळातून एकमेकांचा हात धरून, एका सजग आणि जिवंत लोकशाहीच्या मुक्कामापर्यंत मैदान मारणं आपल्याला सहज शक्य आहे. त्यासाठी एकमेकांना शुभेच्छा देणं एवढं तरी आपण करूच शकतो. ते मनःपूर्वक करू या!.......