झुंडशाहीच्या बळावर कोणी भयभीत करत असेल, तर आपण नमतं घेऊन टीकेचे धनी होणार का?
पडघम - साहित्य संमेलन विशेष
अरुणा ढेरे
  • अरुणा ढेरे
  • Sat , 12 January 2019
  • पडघम साहित्य संमेलन Sahitya Sanmelan नयनतारा सहगल Nayantara Sahgal अरुणा ढेरे Aruna Dhere

९२व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला कालपासून यवतमाळमध्ये सुरुवात झाली आहे. या संमेलनाची रविवारी संध्याकाळी सांगता होईल. काल संध्याकाळी या संमेलनाचा उदघाटन सोहळा झाला. इंग्रजीतील ज्येष्ठ लेखिका नयनतारा सहगल यांचं निमंत्रण रद्द करण्यावरून संमेलनाध्यक्ष अरुणा ढेरे यांनी आयोजक संस्थेला आपल्या भाषणात सुरुवातीला चांगलंच सुनावलं. त्यांच्या भाषणाचा हा संपादित अंश...

.............................................................................................................................................

अगदी असाधारण अशा परिस्थितीत या व्यासपीठावर मी कमालीच्या संकोचानं पण सानंद कृतज्ञतेनं भरलेल्या अवस्थेत उभी आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाला साजेसं काम आपापल्या वाङ्मयक्षेत्रात करून या पीठावर उभं राहण्याचा योग्य अधिकार मिळवणारे अनेक पूर्वाध्यक्ष - अगदी संमेलनाच्या प्रारंभकाळापासूनचे मोठे पूर्वाध्यक्ष मन:चक्षूंना दिसताहेत आणि या, नव्हे कोणत्याच सार्वजनिक पदा-पीठांचा विचार मनात न आणता, अपार्थिव ज्ञानानंदामागे अपरिहार्यपणे असणारं सगळं भलंबुरं लौकिक जीवन साधेपणानं स्वीकारणं आणि काम करत राहणं हीच ज्यांची स्वाभाविक वृत्ती होती, ते माझे संस्कृतिसंशोधक वडील तर माझ्यासाठी माझ्यामागेच उभे आहेत.

स्वत:च्या संशोधकीय लेखनासाठी संघर्ष करण्याची वेळ आली, तेव्हा त्यांनी संघर्ष केलाच. सार्वजनिक क्षेत्रात उतरून एकट्यानं केला. अंध भक्तांशी केला. स्थितिप्रिय ऱ्हस्वदृष्टीच्या परंपरानिष्ठांशी केला आणि गरज पडली तेव्हा शासनासमोरही ताठ उभं राहून केला. वैचारिक तर केलाच पण न्यायालयीनही केला.

प्रबळ ज्ञाननिष्ठा हेच त्यांचं बळ होतं आणि आपलं संशोधन समाजाच्या, बहुजनांच्या हितासाठीच असलेलं, अंतिमत: विधायक संशोधन आहे असा त्यांचा आंतरिक विश्वास होता.

वाङ्मयपरंपरेतल्या तशा आणि त्यांच्यासह सगळ्या ज्ञाननिष्ठ अशा थोरल्या वाडवडलांचं आपल्यावर असलेलं ऋण फेडण्याची जबाबदारी तुम्ही माझ्यावर दिली आहे. शिवाय आणखीही काही ऋणं आहेत. श्री. ना. पेंडसे, नरहर कुरुंदकर, दि. के. बेडेकर, चिं. वि. जोशी, बा. भ. बोरकर, मंगेश पाडगावकर, त्र्यं. वि. सरदेशमुख, इरावतीबाई कर्वे, सरोजिनी वैद्य, अरुण कोलटकर, दि. पु. चित्रे, नामदेव ढसाळांसह कितीतरी, जे अनेक कारणांनी या व्यासपीठापासून दूर राहिले, या साहित्यकार-विचारवंतांना त्या पदाची इच्छा होती की नाही, हा प्रश्न वेगळा; पण त्यांच्याकडे ते पद सन्मानपूर्वक जावं अशी परिस्थिती आपण निर्माण करू शकलो नाही, हेही तितकंच खरं. त्यांच्याविषयीची आपल्या मनातली आदरभावना आणि त्यांचा या प्रकारे गौरव करता न आल्याची खंत प्रकट करण्याचा अनुक्त आग्रह तुम्ही मला केला आहे आणि इंदिराबाईंची क्षमा मागण्याची संधी दिली आहे.

म्हणून एक प्रकारे, धार्मिक परिभाषेतली संकल्पना पूर्ण निधर्मी अर्थानं वापरून मी असं म्हणते आहे की, वाङ्मयक्षेत्रातल्या ऋणमोचन तीर्थावर मी आज उभी आहे आणि तुमच्या वतीनं माझी शाब्दिक कृती हा पूर्वऋणांतून मुक्त होण्याचा विधी आहे.

हे संमेलन यवतमाळसारख्या दुष्काळी भागात भरतं आहे. शेतीचा आणि पाण्याचा प्रश्न महाराष्ट्राच्या अनेक भागांत आहे आणि तो आजकालचा नाही. गेल्या अनेक वर्षांच्या दु:स्थितीचा तो टोकाला गेलेला परिणाम आहे. त्या परिस्थितीची जाणीव मनात ठेवून संमेलन साधेपणानं व्हावं अशी इच्छा पुण्याच्या पहिल्याच सत्कारप्रसंगी मी व्यक्त केली होती. श्रीमंती असेलच तर ती सहानुभावाची असावी, विचारांची असावी, रसिकतेची आणि विवेकाची असावी असंही मी तेव्हा म्हणाले होते. संमेलनाला येणाऱ्या वाङ्मयप्रेमींची वाढती संख्या पाहता आयोजनाचा किमान खर्चही बराच असतो, हे लक्षात घेऊन संबंधित संस्थांनीही संमेलन शक्य तितकं साधं पण नेटकं, आनंददायी करण्याचा प्रयत्न चालवला आहे.

यवतमाळला स्वत:ची अशी वाङ्मयीन ओळखही आहे आणि पृथ्वीगीर गोसावींसारख्या पत्रकारांनी, बापूजी अणे यांच्यासारख्या लोकनायकांनी आणि य. खु. देशपांड्यांसारख्या संशोधकांनी ती निर्माण केली आहे.

इथं आणखी दोन आनंदयोगांविषयीही मला सांगायचं आहे. यवतमाळला १९७३मध्ये झालेल्या ४९व्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष गदिमा होते. आज पुन्हा गदिमांच्या जन्मशताब्दी वर्षात यवतमाळला हे संमेलन होत असताना मराठी भावगीतांची परंपरा समृद्ध करणाऱ्या गदिमांविषयीचं ऋण मनात वागवीत मी इथं उभी आहे आणि हा मराठी श्रवणपरंपरेच्या, गीतपरंपरेच्या समृद्धीचा गौरव आहे अशी माझी भावना आहे.

दुसरा योगही विशेष आहे. या संमेलनाची स्थानिक निमंत्रक संस्था ही वि.भि. कोलत्यांच्या - भाऊसाहेब कोलत्यांच्या नावानं ओळखली जाणारी संस्था आहे. वा. वि. मिराशी काय किंवा भाऊसाहेब कोलते काय, विदर्भभूमीवर कार्यरत झालेल्या यांच्यासारख्या संशोधकांनी मध्ययुगीन महाराष्ट्राचा सांस्कृतिक इतिहास साक्षेपानं धांडोळला आहे.

आपण सर्वच जण हे जाणतो आहो की, या वेळची संमेलनाध्यक्षाची निवड ही एक ऐतिहासिक घटना आहे. या घटनादुरुस्तीचं स्वागत आपण इतक्या मन:पूर्वक केलं आहे, की महाराष्ट्रातल्या, बृहन्महाराष्ट्रातल्या आणि परदेशातल्याही मराठी वाचकांना आणि रसिकांना झालेला आनंद अभूतपूर्वच असल्याचं मी गेल्या दोन-अडीच महिन्यांच्या काळात भरभरून अनुभवलं आहे. मी या आनंदाचं केवळ निमित्त आहे, पण वाचणाऱ्या समाजाच्या सगळ्या थरांमधून आणि सगळ्या माध्यमांमधून सहजस्फूर्तपणे व्यक्त झालेल्या या आनंदाचं श्रेय घटनादुरुस्तीसाठी झटणाऱ्या, त्यासाठी आग्रह धरणाऱ्या आणि ती प्रत्यक्षात आणणाऱ्या जुन्या-नव्या सर्वांचं आहे. आता ही प्रक्रिया आणखी पारदर्शक, प्रतिष्ठित, निर्विवाद, न्याय्य आणि औचित्यपूर्ण करण्यासाठी जे जे करावं लागेल, ते ते करण्याची-घडवण्याची दक्षताही घेतली जावी, अशीही समाजाची अपेक्षा आहे.

एक मोठी जबाबदारी घेऊन आपण इथं जमलो आहोत. आपण सगळेच - लिहिणारे, वाचणारे, प्रकाशित करणारे, ग्रंथविक्री करणारे - आपण सगळेच इथं आलो आहोत ते साहित्याविषयीच्या मन:पूर्वक प्रेमानं, शब्दांवरच्या जिवंत विश्वासानं आणि त्यांच्याविषयीच्या निष्ठेनं.

साहित्य हा एक उत्सव असतो खरा, पण अनेक कारणांनी आपण त्या आनंदोत्सवाचं स्वरूप गढूळ होऊ दिलं. आपलं दुर्लक्ष, आपला भाबडेपणा, आपली मर्यादित समज, आपलं लहानलहान मोहांना आणि वाङ्मयीन राजकारणाला सहज बळी पडणं, या सगळ्या आणि इतर अनेक कारणांनी हा उत्सव आपण भ्रष्ट होऊ दिला. त्यामुळे साहित्याच्या जगातल्या सगळ्या लहानथोरांनी एकत्र येणं, नव्या-जुन्या लिहित्या-वाचत्यांना प्रत्यक्ष संवाद करता येणं आणि त्यानिमित्तानं कला-साहित्य-संस्कृती आणि समाज यांच्यासंबंधीचं विचारमंथन होणं, प्रश्न ऐरणीवर आणणं, उपायांची चर्चा जाणत्यांनी केलेली ऐकणं आणि परतताना आपण काल होतो त्यापेक्षा आज थोडे आणखी जाणते, आणखी समृद्ध झालो आहोत, असा अनुभव घेऊन परतणं हे घडण्यापासून संमेलन क्रमानं लांब जात राहिलं.

या वेळी एक मोठी संधी आपल्याला मिळाली आहे, ती हा उत्सव पुन्हा निर्मळ करण्याची संधी आहे. सुरुवात आहे ही, पण बदल एका रात्रीत होत नाही. आणि सगळे अपेक्षित सकारात्मक बदल तर दीर्घकाळ होत राहतात. ते चिकाटीनंच करावे लागतात.

हे संमेलन न्यायमूर्ती महादेव गोविंद रानड्यांनी प्रवर्तित केलेलं संमेलन आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यांना द्रष्टे - प्रॉफेट असं म्हटलं आहे, त्या रानड्यांनी समाजसुधारणेचा विचार विवेकी विद्रोहानं पुढे नेला आणि समाजाला विकासमार्गाने चालवण्यासाठी ज्या ज्या संस्था आवश्यक त्या त्या संस्था निर्माण करण्याचा यशस्वी प्रयत्नही केला. औद्योगिक परिषद असो, रेशमाची, रंगांची किंवा तांब्यापितळ्याची गिरणी असो, रे म्युझियम असो, नेटिव्ह जनरल लायब्ररी असो, पूना मर्कंटाइल बँक असो, मराठी ग्रंथोत्तेजक मंडळी आणि वसंत व्याख्यानमाला असो की, फीमेल हायस्कूल असो - समाजाला चहूबाजूंनी वर उचलून बळकट करण्याचा उद्योग रानड्यांनी अत्यंत चिकाटीनं केला, कमालीची निंदा सोसून केला. विधायक कामं हळूहळूच समाजात रुजतात, एका रात्रीत तसे बदल घडत नाहीत हे लक्षात घेऊन केला.

देशी वृत्तपत्रांनी सरकारनं चालवलेली गळचेपी थांबावी यासाठी ते प्रयत्नशील राहिले आणि ग्रंथकारांनी एकत्र येऊन साहित्य आणि समाजासाठी ग्रंथनिर्मितीला चालना द्यावी, यासाठी त्यांनी साहित्य संमेलनाला प्रारंभ केला. रानडे नेमस्त होते. समाजाला बरोबर घेऊन चालणारे - चालवणारे होते. त्यांचं मोठेपण गर्जना करणारं नव्हतं. त्यांचा सुधारणावादी विचार झेंडे नाचवणारा नव्हता.

या व्यासपीठावर उभं राहताना मला रानड्यांच्या कर्तृत्वाची आठवण करून देणाऱ्यांना मला सांगायचं आहे की, रानड्यांचे विचार आणि काळाला घडवण्यातलं त्यांचं असाधारण कर्तृत्व यांचं फार अचूक मूल्यमापन जे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केलं आणि स्वत:ला ‘रानडे स्कूलचा विद्यार्थी’ म्हणवणाऱ्या माझ्या वडलांनी त्यांच्या संशोधनदृष्टीच्या संदर्भात केलं, तेच माझ्या परीनं समजून घेत मी पुढे आले आहे आणि रानड्यांविषयीचं, आगरकरांविषयीचं, किंबहुना एकोणिसाव्या शतकातल्या सुधारणावादाविषयीचं जे जे लेखन माझ्या कुवतीप्रमाणे मी आजपर्यंत केलं आहे, ते ‘जाज्ज्वल्य हवेत तुमचे विचार, भाषा नको’ या रानडेप्रणित अभिव्यक्तीमार्गानं जातच करत आले आहे.

हे अध्यक्षपद म्हणजे सन्मान नव्हे, जबाबदारी आहे म्हणून मी स्वीकारलं आहे आणि तुम्ही, इथं जमलेले सगळेच जणही या वेळच्या संमेलनाला केवळ उत्सवी आनंद म्हणून नव्हे तर अशी जबाबदारीची जाणीव ठेवून आलेला आहात याची मला खात्री आहे.

साहित्य ही आपल्यासाठी एक ठेव आहे आणि आज कधी नव्हे ती ही ठेव तिच्या प्रेरक शक्तींसकट सांभाळण्याची जोखीम तुमच्यामाझ्यावर आली आहे. आजवर आपण इतक्या गांभीर्यानं कधी साहित्याकडे बघितलं नसेल. आपल्या साहित्यकार, लेखक आणि साहित्यप्रेमी वाचक या भूमिकांचा फारसा विचारही आपण केला नसेल; पण आज तो करण्याची वेळ आली आहे. निरनिराळ्या काळात अशा वेळा येऊन गेल्याही असतील, आणि आपण ती आव्हानं स्वीकारण्यात कमीही पडलो असू; पण आता जुन्या चुका आठवून हताश होणं किंवा जुन्या पराभवांच्या आठवणीनं दुबळं होणं दूर ठेवायला हवं.

आपण माणसं आहो. साहित्यामधल्या शक्तीला आपण नीट ओळखलं नाही. आपल्या हातून तिची अवहेलना झाली, तर आता त्या गोष्टीची भरपाई करण्याची वेळ आली आहे. केवळ मराठीच नव्हे तर जगभरातलं साहित्य आणि केवळ आजचंच नव्हे तर संस्कृतीच्या जन्माआधीपासून आदिमांनी जन्माला घातलेलं मौखिक साहित्य हा आमचा वारसा आहे, आमचं संचित आहे आणि त्याचा गौरव करणारा एक लहानसा मेळा म्हणजे आमचं साहित्य संमेलन आहे.

कोणीही यावं आणि वाङ्मयबाह्य कारणांसाठी किंवा वाङ्मयीन राजकारणासाठी हे संमेलन वेठीला धरावं असं आता आपण होऊ देता कामा नये. दर वर्षी कोणत्या ना कोणत्या अत्यंत गौण, क्षुद्र, कित्येकदा लाजिरवाण्या कारणांनी संमेलनं ही वादाचा विषय झाली. भल्या वाचकांनी, निर्मळ साहित्यप्रेमींनी आणि वृत्तीगांभीर्यानं लेखन करणाऱ्यांनी संमेलनाच्या या स्वरूपाबद्दल चिंता व्यक्त केली. काहींनी या अमंगळ वातावरणापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आणि संमेलनाचं स्वरूप नकोशा वाटणाऱ्या अनेक गोष्टींनी विकृत होत राहिलं.

आपल्यासारखे अनेक जण हळहळत राहिले, खंतावत राहिले, पण संमेलनाला येत राहिले. कारण आपल्यापैकी अनेकांसाठी ही पंढरीची वारी आहे. पण ‘भले तरी देऊ कासेची लंगोटी, नाठाळाचे माथी हाणू काठी’ हे विठुभक्तांचं ब्रीद आपण विसरून गेलो. म्हणून संमेलनाला वेठीला धरणाऱ्या, संमेलनाला भ्रष्ट करणाऱ्या आणि साहित्याचं मूल्य शून्यवत करणाऱ्या अनेक बाबींचे आपण बळी ठरलो.

आपण सामान्य माणसं आहोत हे खरं, पण आपल्याला काय हवं आणि काय नको हे समजण्याची बुद्धी प्रत्येक माणसाकडे असते. आपल्याला साहित्यावरचं राजकारणाचं आक्रमण नको आहे आणि साहित्यजगातलं राजकारणही नको आहे. असं जर असेल तर या दोन्ही गोष्टी स्पष्टपणे झुगारून देण्याची वेळ आली आहे असं समजा. काय चांगलं आणि काय वाईट, काय हितकारक आणि काय हानिकारक याचा विवेक करण्याची वेळ आपल्या व्यक्तिजीवनात अनेकदा येते, तशी समूहजीवनातही येते. आणि इतिहासात अशा अनेक वेळा आल्याही आहेत की, अगदी आणीबाणीच्या प्रसंगी समाजानं आपला विवेक जागा ठेवला आहे. अनपेक्षितपणे आपली शहाणीव प्रकट केली आहे. सुसंस्कृतपणे प्रकट केली आहे.

तशी आपली शहाणीव, आपला विवेक जागा ठेवण्याची ही वेळ आहे. आपलं साहित्यप्रेम प्रगल्भ जाणिवांसकट व्यक्त करण्याची ही वेळ आहे. हे आवाहन आणि काळाचा हा इशाराही आज सर्वांसाठी आहे. व्यासपीठावर उपस्थित सर्वांसाठी आहे. संमेलनाच्या आयोजकांसाठी आहे, संमेलनाच्या अध्यक्षांसाठी - माझ्यासाठी आहे, साहित्यसंस्थांसाठी आणि लेखक-वाचकांसाठी, साहित्यप्रेमींसाठी आणि समाजमाध्यमांसाठीही आहे.

आदरणीय नयनतारा सहगल इथं येणार होत्या. वयाची नव्वदी पार केल्यानंतरही केवळ महाराष्ट्रातल्या या निमंत्रणाचा आदर करण्यासाठी त्या इथं येणार होत्या. त्या भारतीय पातळीवरच्या महत्त्वाच्या लेखिका आहेत आणि वाङ्मयव्यवहारात अत्यंत सजगतेनं वावरणाऱ्या, नागरिक म्हणून आणि लेखक म्हणून स्वातंत्र्याचं मोल जाणणार्‍या, आपल्या अनुभवसिद्ध मतांचा आग्रही पुरस्कार करणाऱ्या आणि त्यासाठी ताठ कण्यानं उभ्या राहिलेल्या लेखिका आहेत; पण तेवढ्याच महत्त्वाची आणि आनंदाची गोष्ट म्हणजे मराठी मातीशी त्यांचं मौलिक नातं आहे आणि ते ज्ञानवंतांच्या घराण्यातून पुढे आलेलं नातं आहे.

त्यांचे चुलत आजोबा शंकर पांडुरंग पंडित हे गेल्या शतकातले मान्यवर वेदाभ्यासक. कोकणातल्या एका आडगावी जन्मलेले. शिष्यवृत्यांवर शिकलेले. इंग्रजी आणि लॅटिनसह संस्कृतवर उत्तम प्रभुत्व असणारे. त्या काळातले दक्षिणा फेलो, ओरिएन्टल ट्रान्सलेटर, डिस्ट्रिक्ट डेप्युटी कलेक्टर, पोरबंदरचे अ‍ॅडमिनिस्ट्रेटर. त्यांचं सर्वात महत्त्वाचं काम म्हणजे त्यांनी ऋग्वेदाचं केलेलं मराठी आणि इंग्रजी, सटीक भाषांतर. अथर्ववेदाचाही उत्तम अभ्यास त्यांनी केला होता. शिवाय विष्णुशास्त्री पंडितांनी संपादित केलेली तुकारामगाथा त्यांनी पुन:संशोधित करून पाठभेद चिकित्सेसह प्रसिद्ध केली. या शंकर पांडुरंगांचा वारसा त्यांच्या वंशजांनी पुढे नेला. त्यांची मुलगी क्षमा राव हीसुद्धा उत्तम संस्कृतज्ञ होती. त्यांचे त्या काळातल्या नियतकालिकांमधून प्रसिद्ध झालेले लेख आणि फोटोही मी पाहिले आहेत. एका ओरिएन्टल काँग्रेसचा सगळा वृत्तान्त त्यांनी थेट पद्यमय संस्कृतात लिहून प्रसिद्ध केला आहे. ती लहानशी पुस्तिकाही आज आमच्या संग्रहात आहे.

रणजित सीताराम पंडित हे शंकर पांडुरंग यांचे पुतणे. नेहरू घराण्यातल्या विजयालक्ष्मीशी त्यांचा विवाह झाला. आणि नयनतारा या त्यांच्या कन्या. म्हणजे ही पंडित नेहरूंची भाची. स्वातंत्र्य चळवळीत तुरुंगवास भोगणाऱ्या आणि तुरुंगात असतानाच बाराव्या शतकातल्या काश्मीरच्या कवी कल्हणाची ‘राजतरंगिणी’ इंग्रजीत अनुवादित करणाऱ्या रणजित पंडितांचा अनुवंश त्या रक्तात वागवणाऱ्या आहेत. प्रशांत तळणीकरांबरोबर मी मराठीत अनुवादलेल्या ‘राजतरंगिणी’ला त्यांनी अगदी लहानसं मनोगतही जोडलं आहे.

संमेलनांमधला गेल्या काही वर्षांचा एक सुंदर प्रघात म्हणजे मराठीखेरीज इतर भाषांमध्ये कसदार लेखन करणार्‍या एखाद्या साहित्यकाराला संमेलनाच्या उद्घाटनासाठी निमंत्रित करणं. महादेवी वर्मांपासून गिरीश कर्नाडांपर्यंतचे अनेक श्रेष्ठ साहित्यकार त्यासाठी निमंत्रित केले गेले. सर्व भारतीय भाषांमधलं सगळं उत्तम साहित्य - मग ते (केंद्रिय साहित्य अकादमीनं स्वीकारलेल्या इंग्रजी या भाषेसकट) कोणत्याही भाषेतलं असो, ते आपल्याला महत्त्वाचं वाटतं, गौरवास्पद वाटतं; किंबहुना भारतीयच काय पण जगातल्या कोणत्याही भाषेतलं साहित्य - ते जर तुमच्या-माझ्या सुखदु:खांचा शब्द असेल, माणसाची माणूस म्हणून प्रतिष्ठा राखणारा शब्द असेल, तर तो शब्द, ते साहित्य आम्हाला आमचं, आमच्या जिव्हाळ्याचं वाटतं. आणि आपण त्या साहित्याच्या हातात आपला हात देतो. आपल्याला आनंद आणि थोडा अभिमानही वाटला पाहिजे की स्थलकालाच्या, जाति-धर्म-वंशाच्या आणि भाषांच्याही सीमा ओलांडून जाणाऱ्या सगळ्या उत्तम साहित्यासाठी मराठीनं स्वागताची दारं उघडून धरली आहेत. या! या आणि भाषेपलीकडे जाणाऱ्या साहित्याच्या प्राणशक्तीचा आमच्याबरोबर सन्मान करा.

नयनतारा सहगल यांना याच कारणानं आपण आमंत्रित केलं होतं. अखिल भारतीय मराठी माणसांच्या वतीनं त्यांना आमंत्रण दिलं होतं; पण अत्यंत अनुचित पद्धतीनं आपण त्यांना पाठवलेलं आमंत्रणच रद्द केलं. ही अतिशय नामुष्कीची आणि निषेध करण्याची गोष्ट आहे यात शंका नाही.

आपल्या घरातल्या एखाद्या मंगलकार्याची पत्रिका घेऊन एखाद्या मान्यवराकडे किंवा एखाद्या प्रतिष्ठित नातलगाकडे जाऊन, निमंत्रण पत्रिका देऊन, ‘अगत्य येण्याचे करावे’ असं म्हणून त्याला बोलवावं आणि नंतर पुन्हा त्याला आपणच येऊ नका असं कळवावं, ही त्याच्यासाठी अपमानजनक आणि आपल्यासाठी लाजीरवाणीच गोष्ट आहे.

संयोजकांकडून ती गंभीर चूक घडली आहे यात शंकाच नाही. संमेलन हे सध्याच्या परिस्थितीत, सतत साहित्यबाह्य शक्तींच्या ताब्यात जाण्याचा धोका स्पष्ट असताना ती जोखीम पुरेशा समजशक्तीनं उचलली गेलीच पाहिजे, ही काळाची गरज संयोजकांना ओळखता आली नाही.

झुंडशाहीच्या बळावर कोणी जर आपल्याला भयभीत करत असेल, तर आपण केवळ नमतं घेऊन टीकेचे धनी होण्याचा मार्ग स्वीकारणार का? पण तसं घडल्यामुळे यात केवळ संयोजन समिती नव्हे, केवळ साहित्य संमेलन नव्हे तर सगळ्या मराठी साहित्यप्रेमींच्याच माना खाली जाताहेत याची गंभीर जाणीव आपल्याला असायला हवी.

शिवाय या धमक्या बळाच्या जोरावर का होईना पण कोणत्याही विधायक गोष्टीचा आग्रह धरणाऱ्या नव्हेत. साहित्याशी किंवा भाषेच्या जाणत्या प्रेमाशी ज्यांचा सुतराम संबंध नाही अशा कोणा समूहानं दिलेल्या धमक्यांपुढे वाकणं ही शोभनीय गोष्ट नव्हे.

दूर डेहराडूनवरून प्रवास करत वयाच्या त्र्याण्णवव्या वर्षी नयनतारा इथं येणार होत्या. खुल्या मंडपात, संमेलनाच्या गर्दीत त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न मोठा होता, म्हणून हा निर्णय संयोजकांनी घेतला. त्यातली स्वाभाविकता समजून घेतली तरी परिस्थितीची मागणी त्याहून मोठ्या निर्णयाची होती हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे.

नयनतारांचं साहित्य मराठी वाचकांना फारसं परिचित नाही. साहित्यकार म्हणून त्यांची निर्मिती वाचकांसमोर बहुधा आलेली नाही. त्यांनी हाताळलेले लेखनप्रकार, त्यांचं अनुभवविश्‍व आणि भारतीय साहित्यजगतातलं त्यांचं स्थान या विषयीचा मराठी वाचकांना परिचय फारसा नाही. या निमित्ताने त्यांच्या साहित्याच्या अनुवादाचा विचार कदाचित पुढे गेला असता.

पण आज आपल्याला बहुधा त्यांचे विचार, तेही साधारणपणेच माहीत असतील. त्यांचं नियोजित भाषण आता आपल्यासमोर आलेलंच आहे आणि त्यांचे राजकीय विचार काही थोडे अपवाद वगळता वाचकांसमोर आता आले आहेत. संमेलनाला त्यांना निमंत्रित करताना जो हेतू मराठी माणसांच्या मनात होता त्याला त्या राजकीय विचारांचा रंग आता चढला आहे.

त्यांच्या तशा विचारांशी सहमत असणारे आणि नसणारे असे दोन्ही प्रकारचे वर्ग मराठी वाचकांमध्ये अद्याप तयार व्हायचे असतानाच त्यावरून एक लढाई इथं सुरू झाली.

त्यांनी यावं आणि अगदी मोकळेपणानं, निर्भयपणानं आपले विचार या व्यासपीठावरून मांडावेत. त्यांचं अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य अबाधित राखलं जावं, त्यांची मतं आपण जाणून घ्यावीत, ती आपल्याजवळच्या विवेकानं पारखावीत, स्वत:च्या मतांच्या मांडणीचं संपूर्ण स्वातंत्र्य त्यांना आहे, असलंच पाहिजे. आणि त्या मतांशी संपूर्ण सहमत होण्याचं, असहमत होण्याचं किंवा वेगवेगळ्या बाजूंनी त्यांच्या मतांचा विचार करत त्यांची मौलिकता तपासत जाण्याचं स्वातंत्र्य इथल्या वाचकांनाही आहेच अशा जाणिवेनं आपण या निमंत्रणाकडे पाहू शकलो नाही.

समाजात, साहित्यात किंबहुना विचारांमध्येही बहुविधतेची आवश्यकता आहे आणि ती संपुष्टात येता कामा नये, या त्यांच्या मूलभूत भूमिकेशी सहमत होतानाच अविभाज्यपणे जी राजकीय बाजू आहे, त्या बाजूच्या विश्लेषणाशी सहमत असणं किंवा नसणं ही चर्चेची आणि सहिष्णू विचारांची प्रक्रिया आहे आणि ती निरोगीपणे चालू राहणं सध्याच्या वातावरणात फार अवघड झालं आहे. पण ही गोष्ट या व्यासपीठावर त्यांच्या येण्यानंच घडून आली असती.

शेवटी हे व्यासपीठ परस्परांकडे पाठ फिरवण्यासाठी नाही, विशिष्ट भूमिकांचे आग्रही झेंडे फडकवण्याच्या आणि बऱ्याचशा भाबड्या, लहान जीवाच्या वाचकांना भडकवण्याच्याही जागा या नव्हेत; किंबहुना तसे प्रयत्न आपण यशस्वी होऊच देता कामा नयेत. हे व्यासपीठ संवादाचं आहे. मुख्यत: साहित्यावरच्या डोळस प्रेमाचं आहे. ते तसं नसेल, तर तसं त्याचं रूप आपण घडवलं पाहिजे आणि जबाबदारीनं टिकवलंही पाहिजे. असू आपण सामान्य माणसंच, पण आपण सुसंस्कृत आणि वाचणारी माणसं आहोत. स्वत:च्या शक्तीवर आपण विश्वास ठेवला पाहिजे आणि कोणत्याही - अगदी जात, धर्म, देश, डावं-उजवं - अशा विशिष्टाशी अविचाराने बांधले न जाता आपण समाजातला भलेपणा, प्रेम, माणुसकी टिकवू शकतो आणि तरीही समाजहिताचा विचार निग्रहानं पुढे नेऊ शकतो.

आज भोवती जे प्रचंड विपरीत घडतं आहे, त्याला जबाबदार कोण आहे? केवळ शासन नाही. तसं असतं तर स्वातंत्र्यानंतरच्या गेल्या साठ-सत्तर वर्षांच्या काळात वारंवार बदलत गेलेल्या सरकारांच्या आधिपत्याखाली कमीजास्त प्रमाण असेल पण वारंवार धार्मिक आणि जातीय अहंतांचे हिंसक उद्रेक झालेच नसते. केवळ राज्यकर्त्यांनी नव्हे तर कोणत्याही सार्वजनिक सत्तांनी विशिष्ट जातिधर्माच्या पाठीशी उभं राहणं हे केव्हाही स्वीकारणीय नाही आणि त्याचा निधर्मी लोकशाहीत आपण निषेध केला पाहिजे, कडवा विरोधही केला पाहिजे.

पण धर्माच्या नावानं, संस्कृती आणि परंपरांच्या नावानं झुंडशाही धुमाकूळ घालत असताना भारतीयत्वाच्या प्राणभूत संकल्पनांवरचं आपलं लक्ष विचलित करणारे आपापले छुपे राजकीय, सामाजिक, आर्थिक किंवा इतर समाजघातक उद्देश जर कोणी पुढे नेत असेल तर त्या प्रयत्नांचं अस्तित्व आणि स्वरूपही आपण ओळखलं पाहिजे.

हे सगळंच फार दुर्दैवी चित्र आहे. पण याला जबाबदारही आपणच आहोत. साध्यासाध्या, दैनंदिन व्यवहारातल्या गोष्टींमध्येही स्वार्थीपणानं न्याय आणि औदार्य झुगारून देतो आपण. जशास तसे म्हणत, अन्यायाला अन्यायाचं, सूडाला सूडाचं आणि अनैतिकतेला अनैतिक वागण्याचं उत्तर देतो आपण. एका झुंडीला दुसऱ्या झुंडीचं उत्तर देतो, एका देवळाला दुसऱ्या प्रार्थनामंदिराचं, एका जातीला दुसरीचं - लोकशाहीत आपली माणूस म्हणून निरोगी वाढ खुंटवणाऱ्या या गोष्टी आहेत हे ओळखणार की नाही आपण?

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

Post Comment

Gamma Pailvan

Tue , 15 January 2019

अरुणाताई, भाषण समयोचित आहे. नयनतारा महोदयांना बोलावण्याची कल्पना कोणत्या नामी डोसक्यातनं निघाली याचा धांडोळा घेतला जावा. हे डोसकं कापून मग अमेरिकेस पाठवायला हवं. तिथे फिलाडेल्फियात म्युटर म्युझियममध्ये अल्बर्ट आईनस्टाईन चा मेंदू जतन करून ठेवला होता. त्यासोबत हा नमुना देखील ठेवायला हवा. या नमुन्याला अक्कल नव्हती का की यवतमाळास विमानतळ नसतांना नयनतारा महोदया ९३ व्या वर्षी कुठल्या वाहनाने किती तास प्रवास करून येणार होत्या? शिवाय त्यांच्या सुरक्षेचं काय? हे सगळे प्रश्न आगोदर विचारले पाहिजेत ना? मूर्खाचा कारभार नुसता. या असल्या पढतमूर्खांसंगे तुम्हांस तब्बल एक वर्षं घालवायचं आहे. तेव्हा त्यांच्यापासनं सावधान. बस, तूर्तास इतकंच. आपला नम्र, -गामा पैलवान