आयोजक संस्थेने व महामंडळाने झुंडशाहीपुढे व दबावापुढे जो लोटांगण घालण्याचा भिरूपणा दाखवला, त्यामुळे मी प्रक्षुब्ध आहे!
पडघम - साहित्य संमेलन विशेष
लक्ष्मीकांत देशमुख
  • लक्ष्मीकांत देशमुख
  • Sat , 12 January 2019
  • पडघम साहित्य संमेलन Sahitya Sanmelan नयनतारा सहगल Nayantara Sahgal अरुणा ढेरे Aruna Dhere

९२व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला कालपासून यवतमाळमध्ये सुरुवात झाली आहे. या संमेलनाची रविवारी संध्याकाळी सांगता होईल. काल संध्याकाळी या संमेलनाचा उदघाटन सोहळा झाला. इंग्रजीतील ज्येष्ठ लेखिका नयनतारा सहगल यांचं निमंत्रण रद्द करण्यावरून मावळते संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी साहित्य महामंडळ आणि आयोजक संस्था यांना आपल्या भाषणात चांगलंच सुनावलं. मावळते संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांचं समारोपाचं भाषण...

.............................................................................................................................................

सर्व प्रथम मी विदर्भ आणि यवतमाळच्या पवित्र भूमीस वंदन करतो. या भागाचे समाजसुधारक संत गाडगेबाबा, ज्यांनी कीर्तनातून समाज प्रबोधन केले त्यांना आणि ज्यानी ‘ग्रामगीते’च्या द्वारे ग्रामीण विकास आणि समाज जीवनाचे तत्त्वज्ञान समजावून सांगितले, त्या संत तुकडोजी महाराजांना वंदन करतो. वणीचे थोर स्वातंत्र्यसेनानी बापूजी अणे यांनाही मी नमन करतो. मुख्यमंत्री असले तरी खरेखुरे शेतकरी नेते असलेले कै. वसंतराव नाईक आणि सुधाकर नाईक यांना वंदन करतो. जवाहरलाल दर्डा यांचे स्मरण करतो. यापूर्वी रवतमाळ येथे भरलेल्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष ग. दि. माडगूळकर होते. त्यांचे हे जन्मशताब्दी वर्ष आहे, त्यांच्या पवित्र स्मृतीस मी अभिवादन करतो तसेच यवतमाळचे सुपूत्र डॉ. व्ही. व्ही. कोलते, जे भोपाळ संमेलनाचे अध्यक्ष होते. त्यांचेही मी स्मरण करतो व अभिवादन करतो .

आणि सर्वांत महत्त्वाचे नयनतारा सहगल ज्या या संमेलनाचे उद्घाटन करणार होत्या, त्यांच्या साहित्यकर्तृत्वास आणि निर्भीड विचारास सलाम करतो. आणि माझ्या भाषणास सुरुवात करतो.

रसिक हो, आज यवतमाळ जिल्ह्यात व महाराष्ट्राच्या १५१ तालुक्यांत दुष्काळाचे फार मोठे संकट उभे राहिले आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग अडचणीत आला आहे. यवतमाळ जिल्ह्यात फार मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. काळ्या मातीवर प्रेम करणारा आणि निसर्गाशी एकरूप होऊन समाधानानं जगणारा शेतकरी लहरी हवामान, वाढते जागतिक तापमान, सरकारी धोरणे यामुळे हतबल झाला आहे. जगण्यासाठी पुरेसे उत्पन्न, शेतमालाला उचित भाव मिळत नसल्यामुळे तो आत्महत्या करायला मजबूर होत आहे. हे आपल्या शेतकारी विरोधी कुरूप नीतीचे उदाहरण आहे. यावर मात करायची असेल व शेतकऱ्यांना सावरायचे असेल तर स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसीप्रमाणे एमएसपीच्या दीडपट भाव दिला पाहिजे, या मागणीसाठी शेतकरीवर्ग संप करीत आहे, मोर्चे काढीत आहे. या मागणीला मी एक शेतीप्रश्नाचा छोटा अभ्यासक व लेखक म्हणून पाठिंबा देतो. ‘शेती प्रश्न : काल, आज व उद्या’ या विषरावर मी या वर्षी अनेक ठिकाणी बोललो आहे आणि शेतीप्रश्नाची गुंतागुंत उलगडून दाखवली आहे.

पण शेतकरी वर्गानं हे लक्षात ठेवलं पाहिजे की, जरी अंधार असला, तरी सकाळ होत असतेच. महात्मा फुले ते डॉ. पंजाबराव देशमुखांनी ज्यासाठी काम केलं ते कुळवाड्याचं - रयतेचं राज्य एक दिवस जरूर येणार आहे. निसर्गकवी ना. धों. महानोर म्हणतात, त्याप्रमाणे आत्महत्या हा त्यावरचा मार्ग नाही आणि उत्तरही नाही. महानोर ‘कुणब्याच्या सुंदर शेतीवाडीसाठी’ या कवितेतून जोगवा मागत आहेत आणि शेतकरी बांधवांना सांगत आहेत,

‘माणसानं माणसाला पारखं व्हावं       

असे बेचिराख दुष्काळ आले वारंवार

दुष्काळ नवा नाही या भारत वर्षात

कधीच कोणी गेले नाही

त्या काळोखी रस्त्यांनी

काळोखी रस्त्याचा मार्ग

बाबांनो, कधीच आपला नाही.’

आज आपण या साहित्यसंमेलनाच्या निमित्तानं दुष्काळाशी सामना करणाऱ्या शेतकरी बांधव व भगिनींना हेच सांगू या की, तुम्ही आत्महत्येच्या काळोख्या, अंधारलेल्या मार्गाने जाऊ नका. तुम्ही लढा, संघर्ष करा - सत्ताधाऱ्यांना जाब विचारा व आपलं हक्काचं मागणं - आज एकच आहे स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी - त्या प्राप्त करून घ्या. तुमच्या या लढ्यात आम्ही तुमच्या सोबत आहोत. तुमच्या दु:खांना, वेदनेला शब्दरूप देऊ. तुमचा आवाज होऊन.

आता काही वेळातच साहित्य संमेलनाची सूत्रं नूतन अध्यक्षा डॉ. अरुणा ढेरे यांच्याकडे हे समारोपाचं भाषण संपताच मी सुपूर्द करणार आहे. त्या माझ्या समकालीन लेखिका आहेत, म्हणून मोठ्या आनंदानं अध्यक्षपदाची सूत्रं त्यांच्या हाती सुपूर्द करीत आहे. त्यांना अध्यक्षपदाच्या कारदिर्कीसाठी सुयश चिंतितो.

आज या संमेलनावर जे बहिष्काराचे सावट आहे, त्याची गडद छाया मी यवतमाळला काल आल्यापासून अनुभवत आहे, त्याची क्षणोक्षणी जाणीव होत आहे. त्यामुळे मी उदास आहे, चिंतित आहे आणि प्रक्षुब्धही आहे.

कारण उघड आहे. यवतमाळच्या आयोजक संस्थेने व महामंडळ - जे सध्या नागपूरला आहे, त्यांचे अध्यक्ष त्यांनी उद्घाटक म्हणून भारताच्या आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या लेखिका व अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या निर्भीड पुरस्कार करणाऱ्या कार्यकर्त्या नयनतारा सहगल यांना उद्घाटक म्हणून आधी निमंत्रण देऊन मग ते मागे घेतल्याचा जो अगोचरपणा आणि झुंडशाहीपुढे व दबावापुढे लोटांगण घालण्याचा जो भिरूपणा दाखवला, त्यामुळे मी उदास आहे, चिंतीत आहे आणि त्याहून जास्त प्रक्षुब्ध आहे.

मी उदास यासाठी आहे की, या प्रकरणात महाराष्ट्राच्या उदारमतवादी, सुसंस्कृत व सहिष्णुपरंपरेचा अपमान झाला व त्याचा एक वेगळा - वाईट - अनुदार या अर्थाने देशभर संदेश गेला. त्यामुळे या महाराष्ट्राचा अभिमान असणारा व पुरोगामी - उदारमतवादी साहित्य परंपरेचा पाईक - भोई असणारा एक लेखक - कलावंत म्हणून मी उदास आहे. देशभर माझे मित्र पसरले आहेत, ते मला लेखक म्हणून मानतात-ओळखतात, त्यांच्यापुढे मी कोणत्या मुखाने जाऊ. ‘अरे भाई, ये महाराष्ट्र में क्या हो रहा है?’ असं मला विचारलं तर त्यांना काय सांगावं या प्रश्नानं मी संत्रस्त व उदास आहे.

मी चिंतित आहे ते यासाठी की, मराठी साहित्य संमेलनाची शतकातून जास्त असलेली देदीप्यमान व इतर भाषिकांना हेवा वाटावा अशी परंपरा. १९९५ साली झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटक हिंदीचे प्रसिद्ध कवी अशोक वाजपेयी होते. संमेलन पाहून, मराठी रसिकांचा प्रतिसाद पाहून ते भारावून गेले होते. नंतर सातत्याने वेळोवेळी अनेक कार्यक्रमात ते साहित्य संमेलनाचा गौरवाने उल्लेख करायचे. त्या वेळी तेथे आमच्या निमंत्रणावरून आलेले पंजाबी कवी सुरजित सिंग माथर व उर्दू कवी- समीक्षक साहित्य आजही परभणीच्या साहित्य संमेलनाच्या आठवणी काढतात. उद्घाटक म्हणून भारतातील नामवंत साहित्यिक बोलवून त्याचे विचार ऐकण्याची एक दीर्घ परंपरा महामंडळाने विकसित केली आहे. त्याला परभणी संमेलनाचा आयोजक म्हणून माझाही हातभार लागला आहे. हीच परंपरा यवतमाळने नयनतारा सहगल यांना उद्घाटक म्हणून निमंत्रित केले, तेव्हा मला ही परंपरा चालू राहिल्याचा आनंद वाटला. पुन्हा नयनतारा सहगल यांची काही इंग्रजी पुस्तके वाचल्यामुळे त्यांची साहित्यिक उंची व महती मला माहीत आहे. गतवर्षी बडोद्याच्या संमेलनात मी जो साहित्यिक-कलावंतांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा पुरस्कार स्पष्ट शब्दांत केला होता, त्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी गेली पन्नास वर्षे नयनतारा लढत आहेत.

१९७५ची आणीबाणी, १९८४चे दिल्लीतील शिखांचे हत्याकांड यावर त्यांनी धीटपणे आवाज उठवलेला होता. आणि अलीकडे २०१६ मध्ये विचारवंत सर्वश्री डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉम्रेड गोविंद पानसरे व प्रा. कलबुर्गी यांच्या हत्येचा-खुनाचा निषेध म्हणून आणि घरी गोमांस ठेवले म्हणून दादरी उत्तर प्रदेशचा अशफाक यांचा जमावानं झुंडीचं रूप धारण करून ठेचून केलेल्या हत्येने व्यथित व क्षोभीत होऊन केलेल्या हत्येचा निषेध म्हणून साहित्य अकादमी पुरस्कार त्यांनी सर्वप्रथम केला होता. त्या कलावंत - लेखकाचा धीरोदत्त असा तेजस्वी व नैतिक आवाज आहेत. त्या बाणेदारपणे कराडच्या साहित्य संमेलनात आणीबाणीबाबत भाष्य करणाऱ्या आपल्या दुर्गाताई भागवत यांच्या सहोदर भगिनी शोभतात. नयनतारा सहगल यवतमाळला आल्या असत्या, तर मी त्यांच्या चेहऱ्यात व आवाजाच्या कणखरपणात दुर्गाताई भागवतांना हुडकलं असतं, व त्यांना ते संमेलनात कल्पनेनं का होईना पण मी अनुभवलं असतं. पण आपण करंटेपणा केला. नयनतारा सहगल यांना दिलेले निमंत्रण मागे घेतले. त्यांचे चिंतनशील पण परखड विचार मराठी रसिकांना ऐकता आले असते, पण त्याला ते संयोजन समिती व महामंडळाच्या करंटेपणामुळे व अवसानघातकीपणामुळे मुकलो, म्हणून मी चिंतित आहे.

चिंता आहे ती या देशाची व महाराष्ट्र राज्याची सहिष्णुपरंपरा कुठे लोप पावली याची. सहगल यांचे भाषण आता सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. त्यात त्यांनी देशातील सध्याचा नूर व हिंसेच्या वातावरणाबाबत चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी असेही म्हटले आहे की -

“सर्वसमावेशकता हा आपल्या जीवनाचा एक भाग राहिलेला आहे आणि ही प्राचीन बहुसांस्कृतिक सामाजिक व्यवस्था, जिचे नाव भारत आहे, ती म्हणजे आपले सर्वांत मोठे यश आहे. आज मात्र धार्मिक विविधता निपटून टाकून आपल्याला एकाच धार्मिक व सांस्कृतिक ओळखीमध्ये कोंबू पाहणाऱ्या धोरणामुळे आपली हीच एकता धोक्यात आली आहे. हिंदू नसलेल्या आपल्या कोट्यवधी देशबंधूंचे आणि स्त्रियांचे घटनात्मक अधिकार काढून घेऊन त्यांना आक्रमक, बाहेरचे आणि शत्रू ठरवू पाहत आहे.

स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशाची जडणघडण करणाऱ्या आपल्या पूर्वसूरींनी देशाकरता धार्मिक ओळख नाकारली होती आणि भारताला एक निधर्मी लोकशाही प्रजासत्ताक देश घोषित करण्याचा सुज्ञपणा दाखवला होता. याचा अर्थ ते धर्मविरोधी होते असे नव्हे, तर आपल्यासारख्या विविध धर्म असलेल्या आणि धार्मिक प्रवृत्तीच्या देशाला केवळ निधर्मी राज्यव्यवस्थाच एक सर्वसमावेशक तटस्थ छत्रछाया देऊ शकेल आणि तिच्यात प्रत्येक भारतीयाला त्याच्या व तिच्या श्रद्धेनुसार जगण्याचा व ईश्वरभक्ती करण्याचा अधिकार असेल, हे त्यांनी जाणले होते.

हा निर्णय ज्यात घेतला गेला- त्या संविधान सभेत बहुसंख्य सदस्य हिंदू होते व तरीही त्यांनी अशी एक राज्यघटना तयार केली, जिच्या प्रस्तावनेत सर्व भारतीयांना स्वातंत्र्य, समता आणि बंधुभावयुक्त जीवनाची हमी देण्यात आली होती. हा उच्च आदर्श घटनेचे शिल्पकार आणि ज्याच्या आग्रहातून जातिव्यवस्थेविरुद्ध एक क्रांती सुरू झाली, ती थोर मराठी विभूती डॉ. बाबासाहेब आंबेडकर, यांच्या प्रेरणेतून निर्माण झाला होता. आज तोच उच्च आदेश बाजूला सारण्यात आला आहे. अल्पसंख्याक आणि हिंदू राष्ट्राच्या उद्दिष्टांना पाठिंबा न देणारे लोक रस्त्यावरून मोकाट फिरणाऱ्या दुराग्रही लोकांचे लक्ष ठरत आहेत...”

रसिक मित्रहो, मी मुद्दामच नयनतारा सहगल यांच्या, त्यांनी तयार केलेल्या उद्घाटकीय भाषणाचा काही भाग वाचून दाखवला. त्यांची ही मते नवीन नाहीत, त्यांनी ती अनेक संमेलनातून वेळोवेळी मांडली आहेत. ती समजा, यवतमाळला मांडली असती तर काही आभाळ कोसळणार नव्हते, की राजकीय भूकंप होणार नव्हता. पण त्यांचे हे लिखित भाषण यवतमाळला आले, त्याचा मराठी अनुवाद झाला आणि आयोजकांना ते पटले नसावे किंवा राजकीय दृष्टीने अडचणीचे वाटले असावे, म्हणून माझे निमंत्रण कदाचित मागे घेतले असावे अशी शंका नयनतारा सहगल यांनी मुलाखत देताना चॅनेल्सवर उपस्थित केली आहे. ती आपण निराधार मानायची का? का त्यांनी संमेलन उधळले जाऊ नये, म्हणून निमंत्रण मागे घेतले, असा जो खुलासा केला आहे तो मान्य करायचा? आज संमेलनाचे कार्याध्यक्ष व महामंडळाचे अध्यक्ष एकमेकांकडे बोट करीत आहेत व निमंत्रण मागे घेण्यात मी नाही तर ते आहेत, असा परस्परांना बोल लावत आहेत. हा सारा पोरखेळ आहे व त्यामुळे रसिकजन ते मान्य करतील असं त्यांना जे वाटतंय, तो भ्रम आहे. येथे जमलेला रसिक वर्ग सुजाण आहे, तो सारं जाणतो. त्याला तुम्ही दोन्ही संस्था बालबुद्धीचे समजून जे विचित्र व अतर्क्य खुलासे करीत आहात, त्याची शिसारी येते. काही क्षणानंतर माझे अध्यक्षपद नूतन अध्यक्षांना सूत्रे दिल्यानंतर संपणार आहे, तरी या क्षणी मी बडोद्याच्या संमेलनाध्यक्ष म्हणून या वर्षीचा अखिल भारतीर मराठी साहित्यमंडळाचा पदसिद्ध सदस्य आहे, त्यामुळे माझी मान शरमेनं खाली गेली आहे. महामंडळाची व साहित्य संमेलनाची प्रतिष्ठा धुळीस मिळवण्याचे अपकृत्य आपणाकडून घडले आहे, त्याचा भाग म्हणून त्या पापाचा धनी झालो आहे, त्यामुळे सचिंत आहे.

नयनतारा सहगल यांच्या उद्घाटक पदावरून काही वाद निर्माण झाले. प्रथम हक्क समितीचा त्यांना त्या इंग्रजीत लिहिणाऱ्या लेखिका आहेत, म्हणून विरोध झाला. मग ‘मनसे’मार्फत स्थानिक पातळीवर विरोध झाला व संमेलन उधळून लावण्याची भाषा केली गेली. पण पक्षप्रवक्ते अनिल शिदोरे व मग ‘मनसे’ प्रमुख राज ठाकरे यांनी पत्रक काढून नरनतारा सहगल यांना विरोध नसल्याचे जाहीर केले. तरीही हे निमित्त पुढे करून सहगल यांचे निमंत्रण का व कशामुळे मागे घेतले, या प्रश्नाचे उत्तर मिळालेले नाही. कदाचित आयोजक व महामंडळाचे अध्यक्ष ते कधीच उघड करणार नाहीत. त्यामुळे नयनतारा सहगल यांची राजकीय दडपणाची शंका साधार आहे, असं म्हणायला जागा आहे. पण त्याचे पडद्यामागचे सूत्रधार कोण आहेत, कोणत्या पक्ष वा प्रवाहाचे आहेत, हे मला माहीत नाही. कारण असहिष्णुता ही काही एका पक्षाची मिरासदारी नाही, सर्वच पक्ष कमी-जास्त प्रमाणात असहिष्णु व टीका न सहन करणारे झाले आहेत. विशेषत: कलावंत व बुद्धिमंतांची प्रामाणिक व परवड टीका सहन होत नाही. नयनतारा सहगल यांची टीकाही कदाचित काही जणांना सहन होणारी नसावी, असा अर्थ काढला तर मी चुकतोय काय?

लोकशाहीचा debate and dissent- चर्चा व मतभेद - विरोधी मत हा तर आत्मा आहे. वॉल्टेअरनं लोकशाहीची जी व्याख्या केली आहे, त्यानुसार जरी मला तुमचे / इतरांचे मत मान्य नसले तरी ते तुम्ही / इतरांनी मांडण्याचे तुमचे स्वातंत्र्य व अधिकार मला मान्य असला पाहिजे व प्रसंगी तुम्ही ते मांडावे म्हणून मला माझे प्राण पणास लावावे लागले तरी मी ते लावले पाहिजेत...’ ही वॉल्टेअरची लोकशाहीची उच्चतम कल्पना आजच्या विपरीत असहिष्णु व ‘राजापेक्षा अधिक राजनिष्ठा असणाऱ्या पक्ष कार्यकर्त्यांच्या झुंडीत परावर्तीत झाले त्या जमान्यात अव्यवहारी व हास्यास्पद ठरली आहे. पण भारत हा संविधानिक लोकशाही असणारा देश आहे व इथे संविधानाने आपणा सर्वांना - हिंदू, मुसलमान, शिख, ख्रिश्चन धर्मियांना, स्त्री-पुरुषांना, अनुसूचित जाती-जमाती आणि बहुजनांना विचार, भाषण व एकूणच अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे मूलभूत - अपरिवर्तनीय अधिकार दिले आहेत, पण महामंडळ व आयोजक संस्थेने नयनतारा सहगल या थोर विदुषीचा हा अधिकार नाकारून घटनेच्या तत्त्वज्ञानाशी विसंगत व्यवहार केला आहे. त्यामुळे यजमानावर टीका करायची नसते, हा शिष्टाचार बाजूस ठेवत मी माझ्याकडे जितकी शब्दप्रभुता आहे, ती वापरून त्याच्या निषेध करीत आहे. कारण तुम्ही त्यांना बोलवून परत येऊ नका, म्हणून कुठे सभ्यतेचा शिष्टाचार पाळला आहे?

आणि मी प्रक्षुब्ध पण आहे, कारण या निमित्ताने साहित्य व्यवहाराची नैतिकता आणि लेखक-कलावंतांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे व्यापक प्रश्न उपस्थित होतात. त्याचा संकोच व अधिक्षेप होत आहे, म्हणून मी प्रक्षुब्ध आहे.

प्रथम साहित्य व्यवहाराची नैतिकता. न्यायमूर्ती रानडे यांनी सुरू केलेले व अनेक थोर माणसांमुळे लेखक- प्रकाशक व रसिकांचे सर्वमान्य असे साहित्य महामंडळ बनले व त्याचा वार्षिक स्वरूपाचा शारदोत्सव म्हणजे वार्षिक साहित्य संमेलन होय! येथे साहित्य चर्चा होते, अध्यक्षीय भाषणातून  साहित्य व समाज चिंतन होते वेळप्रसंगी ठाम भूमिका घेऊन उदबोधन केलं जातं. त्यासाठी वैचारिक मोकळेपणा लागतो, अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य लागते. जे आजवर काही दोन-चार अपवाद वगळता महामंडळाने व साहित्य संमेलनाने दिले आहे. त्या महत्त्वाच्या साहित्य व्यवहाराची नैतिकतेला आज काळिमा फासला गेला आहे, असे मला स्पष्टपणे निक्षून सांगायचे आहे.

दुसरा प्रश्न अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा. इथे नयनतारा सहगल यांचे निमंत्रण रद्द करून त्यांना बोलू दिले जाणार नाही, अशी व्यवस्था झाली. मागच्या आठवड्यात मुस्लिम मराठी साहित्य संमेलनात वशारत अहमद यांना ते अहमदीया या इस्लामनं काफीर ठरवलेल्या पंथाचे आहेत म्हणून बोलू दिलं नाही. हिंदी कलावंत नसिरुद्दीन शहा यांनाही अजमेर लिटरेचर फेस्टिव्हलला त्यांनी देशात असहिष्णुता वाढतेय म्हणून जे विधान केले होते, त्याला तीव्र विरोध झाला म्हणून जाता आले नाही. या तीनही घटना असहिष्णुता दाखवतात. आणि कलावंतांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या संकोच करतात. इतर संमेलने जाऊ द्यात, पण मराठी साहित्य संमेलनाला न्यायमूर्ती रानडे यांनी जी उदारमतवादाची परंपरा बहाल केली आहे, ती विसरून नयनतारा सहगल यांनी यवतमाळला न येऊ देणे महामंडळाला शोभणारे नाही. इथे महामंडळ व आयोजक संस्था चुकल्या वा दडपणाला बळी पडून भिरूता दाखवली.

आता या प्रकाराने हानी तर झाली आहे, ती या संमेलनात भरून येणार नाही. मात्र या प्रकारानं मराठी साहित्य जगतानं एक धडा शिकला पाहिजे तो हा की, साहित्य संमेलन भरवण्यासाठी स्थानिक धनिकांचा - ते त्यांचा आर्थिक मिंधेपणा यापुढे कोणत्याही परिस्थितीत पत्करायचा नाही. त्यासाठी स्मृतीशेष गंगाधर पानतावणे ‘अस्मितादर्श’ मेळावेवजा संमेलने भरवायची, त्याचा आदर्श घेतला पाहिजे व संमेलनात सर्वांनी स्वखर्चाने व मानधनाविना यावे असा पायंडा पाडून एक संमेलन पुढील काही महिन्यात घेऊन प्रयोग करून पाहावा. आणि पुढील संमेलन हे असेच भरवावे. स्थानिक पातळीवर फक्त आयोजन करावे, बाकी खर्च टाळावा, किंवा महामंडळाचा कोष संपन्न करून करावा. यामुळे या वेळी जो प्रकार घडला तो महामंडळास यापुढे टाळता येईल.

शेवटी मला हे सांगायचे आहे की, साहित्य व कला यांना सकस निर्मितीसाठी वैचारिक मोकळेपणा व अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे निर्भेळ - निरंकुश वातावरण लागते, ते आज भारतात दुर्दैवाने पुरेशा प्रमाणात नाही. ते देण्याची जबाबदारी जशी सरकारची आहे, तशीच ती नागरी संस्थांची - सिव्हिल सोसायटीची पण आहे. अखिल भारतीय साहित्य महामंडळ ही अशीच एक स्वायत्त नागरी संस्था आहे, तिच्या चारही घटक संस्था लोकचळवळ व सहभागातून मराठी भाषा, साहित्य व संस्कृतीच्या संवधर्नासाठी निर्माण झालेल्या आहेत. त्यांना देदिप्यमान असा इतिहास आहे, त्याचा आपण विसर पडू देता कामा नये. त्यासाठी अखंड सावधानता आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा संकोच करणारी घटना महाराष्ट्रात कुठेही घडली तरी धावून जाणे व प्रभावी आवाज उठवणे महामंडळाने सातत्याने केले पाहिजे अलीकडे दिनकर मनवरच्या कवितेबाबत, वादाबाबत महामंडळ मूक राहिले. वशारत अहमद - ज्यांनी मुस्लिम मराठी साहित्य चळवळ उभी केली, त्यांना पुण्यात बोलू दिले नाही, तेव्हा मराठी साहित्य परिषद चूप राहिली. हे असे होता कामा नये. म्हातारी मेल्याचं दु:ख नाही, पण काळ सोकावता कामा नये, या तत्त्वाने आज जे घडले ते का घडले याचे सखोल आत्मचिंतन करून पुन्हा असा लाजिरवाणा प्रकार होणार नाही, याची दक्षता आपण साऱ्यांनी घेतली पाहिजे. मी आयोजक संस्था व महामंडळाचे अध्यक्ष यांना हे प्रांजळपणे सांगतो की, आपले हे वर्तन योग्य नव्हते. आपण अशा प्रसंगी धैर्य दाखवायला हवे होते. असो. यापुढे महामंडळ कमी पडणार नाही, अशी मी अपेक्षा करतो.

मी शेवटी पुन्हा एकदा नूतन अध्यक्ष डॉ. अरुणा ढेरे यांचे अभिनंदन करतो आणि आनंदाने त्यांना अध्यक्षपदाची सूत्रे देतो. या अभिवचनासाठी, तुम्ही जी काही कामे मराठीसाठी हाती घ्याल त्यात मी आपणासोबत असेन व माझी अपूर्ण कामे तुम्ही पूर्ण कराल अशी अपेक्षा बाळगतो.

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

Post Comment

Gamma Pailvan

Tue , 15 January 2019

आयल्ला, कसला चिकना फोटु लावलाय सरांचा. मथळ्यामंदी 'प्रक्षुब्ध' आन फोटुमंदी दिलखेचक अदा! सर एकदम ठेवणीतले वाटतात (ठेवलेले नव्हे, ठेवणीतले. नीट वाचा.). बरं ते जावदे. हा अशोक वाजपेयी म्हणजे १९८४ च्या डिसेंबरात भोपाळ वायुकांडात २५००० लोकं मेल्यावर लगेच तिथे 'वर्ल्ड पोयेट्री फेस्टिव्हल' आयोजित करणाराच ना? एव्हढ्या मोठ्या आपत्तीनंतर हा फेस्टिव्हल साजरा करणे कितपत योग्य असा औचित्याचा मुद्दा काही पत्रकारांनी उपस्थित केला. तेव्हा हा म्हणतो कसा की 'मुर्दो के साथरचनाकार नही मरता.' एव्हढा माज आला कुठून या अशोक वाजपेयीला? नेहरूगांधींची चापलुशी करूनंच ना? हे म्हणे संवेदनाशील साहित्यिक. हे काय शिकवणार ते कळलं आम्हांस. बाकी, सहगल यांचे निमंत्रण का व कशामुळे मागे घेतले, त्यासंबंधी माझा तर्क सांगतो. त्याचं काय आहे की नेहरू-गांधी कुटुंबियांत अनेक उघड व छुपी थोतांडे वसलेली आहेत. नयनतारा महोदया आल्या असत्या तर ही गुपितं मोठ्या चवीनं चघळली गेली असती. मग साहित्य संमेलनास विचारतोय कोण! लग्नाला अमिताभला बोलावला की नवरानवरीचं अभिनंदन करायला लोकं विसरून जातात, अगदी तस्संच समजा. -गामा पैलवान