‘थोडी थोडी पिया ना करो’... दारूची कुठलीच ‘सुरक्षित लेवल’ नाही!
पडघम - देशकारण
पराग मगर व डॉ. सागर भालके
  • प्रातिनिधिक छायाचित्र
  • Mon , 05 November 2018
  • पडघम देशकारण दारू Alcohol लँसेट Lancet

दारू ही शरीरासाठी घातक असल्याचे आपण नेहमीच ऐकतो, वाचतो. पण नियंत्रित प्रमाणात दारूची मात्रा घेतल्याने हृदयरोग, मधुमेह यांसारख्या रोगावर अल्प प्रमाणात फायदा होत असल्याचेही आतापर्यंतच्या काही अध्ययनांमध्ये आढळून आले आहे. त्यामुळे ‘थोडी थोडी पिया करो’ असा एक मतप्रवाह जगात चांगलाच प्रचलित आहे. पण ‘ग्लोबल बर्डन ऑफ डीसीस स्टडी – २०१६’ या मद्यपानाशी संबंधित आतापर्यंतच्या सर्वांत मोठ्या जागतिक संशोधनात दारू प्यायल्याने कुठलाच फायदा होत नसून दूरगामी नुकसानच जास्त होत असल्याचे तथ्य समोर ठेवून ‘थोडी थोडी...’ हा मुद्दाच पूर्णतः खोडून काढला आहे. विशेष म्हणजे दारूची कुठलीच ‘सुरक्षित लेवल’ नाही, असे ठामपणे या संशोधनात मांडण्यात आले आहे.

मद्यपान आणि त्यामुळे निर्माण होणारा तणाव यातील वास्तविकता, सहसंबंध आणि वस्तुस्थिती मोजण्यासाठी त्याचबरोबर जागतिक व्याधी रोग, दारूमुळे झालेले मृत्यू, सोबतच दारूमुळे अपघात होऊन आलेल्या अपंगत्वाने जुळवून घेतलेले आयुष्य (DALY- Disability Adjusted Life Year) यावर १९९० ते २०१६ या काळात १९५ देश आणि प्रांतांमध्ये करण्यात आलेल्या तब्बल ५९२ संशोधनांचा आधार घेत ‘ग्लोबल बर्डन ऑफ डीसीस स्टडी – २०१६’ हा शोधनिबंध तयार करण्यात आला आहे. १५ ते ९५ आणि त्याही पुढच्या वयोगटात तब्बल २८० लाख मद्यपींचा या संशोधनात अभ्यास करण्यात आला. हे संशोधन नुकतेच ‘लँसेट’ या जगप्रसिद्ध वैद्यकीय मासिकात प्रसिद्ध झाले आहे. त्यातील आकडेवारी थक्क करणारी आहे. दारूवरील प्रतिबंधाबाबत कुठलेली धोरण नसलेल्या किंवा धोरण असूनही ती योग्य प्रकारे राबवल्या जात नसलेल्या देशांना हे संशोधन विचार करायला लावणारे आहे.

जगात आतापर्यंत झालेल्या अनेक संशोधनांमध्ये दारूमुळे शरीरावर होणारे दुष्परिणाम दाखवण्यात आले आहे. जागातिक आरोग्य संस्थेनेही ‘इंजुरीज अँड रिस्क फॅक्टर्स स्टडी’मध्ये दारूमुळे होणारे दुष्परिणाम अधोरेखित केले आहे. या समग्र अध्ययनांचाही आढावा घेत मागील संशोधनांचा केवळ अभ्यासच नाही तर यातील मर्यादांवर बोट ठेवून त्या दूर करण्याचा प्रयत्नही प्रस्तुत संशोधनात करण्यात आला आहे. पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या देशांत दारूचे प्रमाण जास्त आढळते. याचा अर्थ त्या देशातील लोक जास्त दारू पितात असा न होता पर्यटकांच्या पिण्यामुळे हा आकडा वाढलेला असतो. त्यामुळे ‘टुरिस्ट कन्जम्प्शन बायस’ टाळण्यासाठी ‘वर्ल्ड टुरीस्ट ऑर्गनायझेशन’ (WTO) ची आकडेवारीही तापासली आहे. ‘ग्लोबल बर्डन ऑफ डीसीस’वर ‘मेटा’ विश्लेषण (अनेक संशोधनाचा अभ्यास करून केलेले संशोधन) प्रकारातील आतापर्यंत हे जगातील सर्वांत मोठे संशोधन आहे. परिणामी या निष्कर्षांकडे सहज डोळेझाक करणे जगाला शक्य नाही.

.............................................................................................................................................

अधिक माहितीसाठी पहा -

https://tinyurl.com/yajwg4nj

.............................................................................................................................................

मद्यसेवनाचा प्रादेशिक, राष्ट्रीय आणि जागतिक कल

अध्ययनानुसार जगात २४० कोटी लोक हे नियमित मद्यपान करतात. (आजघडीला जगाची लोकसंख्या ही ७६० कोटी आहे. त्यावरून दारू पिणाऱ्यांचा टक्का किती मोठा आहे याची कल्पना येते.)  यात १५० कोटी पुरुष तर ९० कोटी महिला आहेत. Socio-demographic Index (SDI) म्हणजेच सामाजिक जनसांखिकीय निर्देशांकाचा मद्यपानावर बराच प्रभाव असल्याचे हे अध्ययन सांगते. एसडीआय (SDI) जास्त असणाऱ्या देशांमध्ये म्हणजेच विकसित देशांत ७२ टक्के स्त्रिया तर ८३ टक्के पुरुष दारू पितात. तर एसडीआय (SDI) कमी असणाऱ्या देशांमध्ये म्हणजेच विकसनशील देशांमध्ये हे प्रमाण स्त्रियांमध्ये ८.९ आणि पुरुषांमध्ये २० टक्के आहे. सोप्या शब्दांत सांगायचे झाल्यास विकसित देशांत स्त्रिया पुरुषांच्या बरोबरीनेच मद्यसेवन करतात. तुलनेत विकसनशील देशात पुरुषांच्या तुलनेत स्त्रिया कमी मद्यपान करतात.

दारूचा मृत्यू आणि  रोगांशी सहसंबंध

दारूचा मृत्यू आणि रोगांशी फार जवळचा संबंध असल्याचे अध्ययनात समोर आले आहे. अकाली मृत्यू आणि अपंगत्वासाठी जबाबदार असलेल्या कारणांमध्ये दारू सातव्या स्थानावर आहे. २०१६ मध्ये २८ लाख लोकांच्या मृत्यूचे मुख्य कारण हे मद्यपान होते. जगातील १५ ते ४९ वयोगटातील १० टक्के लोक हे केवळ दारूमुळे मरण पावले. यात १२.२ टक्के पुरुष तर ३.८ टक्के स्त्रिया होत्या. दारूमुळे अपंगत्व येऊन जीवन व्यतीत करीत असलेल्यांची आकडेवारीही या अध्ययनात देण्यात आली आहे. (दारूमुळे आलेल्या अपंगत्वासह जीवन व्यतीत करणाऱ्यांचा समावेश DALY- Disability Adjusted Life Year यात केला जातो.) जगात ८.९ टक्के पुरुष आणि २.३ टक्के महिला दारूमुळे आलेल्या अपंगत्वासह जीवन जगत आहेत. १५ ते ४९ वयोगटात दारूमुळे क्षयरोग होऊन १.४ टक्के, रस्ता अपघात होऊन १.२ टक्के आणि स्वतःला इजा (आत्महत्या) करून १.१ टक्के लोकांनी स्वतःचे मरण ओढवून घेतले आहे.

५० च्या वरच्या वयात दारूमुळे स्त्रियांना कॅन्सरचा धोका जास्त असल्याचे हे अध्ययन सांगते. २०१६ मध्ये या वयोगटात २७ टक्के महिला तर १८.९ टक्के पुरुष कॅन्सरने दगावले आहेत. त्याचबरोबर विकसित देशांमध्ये दारूमुळे कॅन्सर होऊन मृत्यू होणाऱ्यांचे प्रमाण लक्षणीय आहे, तर विकसनशील देशांमध्ये क्षयरोग, सोरायसिस आणि यकृताचे आजार यामुळे जास्त प्रमाणात मृत्यू होतात. या संपूर्ण अध्ययनात पुरुषांचे दारू पिण्याचे प्रमाण हे स्त्रियांच्या तुलनेत जास्तच असल्याचे आढळून आले आहे. परिणामी पुरुषांच्या आरोग्यावर दारूचा होणारा विपरित परिणाम हा तिपटीने जास्त आहे. त्यामुळे दारूची ‘लेवल’ शून्यावर आणणे, हा दारूमुळे होणारे दुष्परिणाम रोखण्याचा सोपा मार्ग असल्याचे अध्ययनाअंती सांगण्यात आले आहे.

.............................................................................................................................................

अधिक माहितीसाठी क्लिक करा -

https://tinyurl.com/yaj8ppqa

.............................................................................................................................................

५९२ अध्ययनांचे ‘मेटा’ विश्लेषण केल्यावर ‘ग्लोबल बर्डन ऑफ डीसेस स्टडी – २०१६’ हे अध्ययन मांडण्यात आले. आतापर्यतच्या काही अध्ययनात दारूची लहानशी मात्रा घेतल्याने काही आजारांवर फायदा होत असल्याचे निष्कर्ष मांडण्यात आले होते. त्यामुळे थोडीशी दारू घेतल्याने ती शरीरासाठी कशी चांगली असते, याचाच जगभर प्रचार झाला. अल्प प्रमाणात दारू पिण्याचे काय काय फायदे होतात, हे ‘व्हॉट्सअॅप विद्यापीठातून’ आता सर्वांपर्यंत पोहोचले आहेतच. पण एक आजार तात्पुरता काहीसा कमी करणारी दारूची छोटीशी मात्रा इतर चार आजार वाढवत असल्याची बाब आतापर्यंतच्या अनेक अध्ययनातून सुटली होती. अशा अध्ययनांच्या मर्यादा अधोरेखित करत दारूचा वाईटच परिणाम शरीरावर होत असल्याचे या अध्ययनात पुरावे आणि निष्कर्षांच्या आधारावर मांडण्यात आले आहे.

दारूवरील नियंत्रणासाठी विकसित देशांमध्ये ठोस असे धोरण नाही. दारूवर सरसकट बंदी शक्य नसल्यामुळे अशा देशांमध्ये दारूची नियंत्रित मात्रा ठरवून देण्यात आली आहे जी बहुधा पाळलीच जात नाही. उदा. अमेरिकेत आठवड्याला १९६ ग्राम, तर ब्रिटनमध्ये आठवड्याला ११२ ग्राम दारूची मात्रा ठरवून देण्यात आली आहे. रशियाची नियंत्रित मात्रा ही जगात सर्वाधिक असल्याचे सांगण्यात येते. रशियात १९८० च्या दशकात घडलेल्या मृत्यूदर संकटाचा दाखला या संशोधनात देण्यात आला आहे. १९८० च्या दशकात रशियात १५ ते ५५ वयोगटातील ७५ टक्के पुरुष हे केवळ दारूमुळे मरण पावले होते. त्यामुळे प्रत्येक देशाने दारू नियंत्रण धोरण राबवण्याची आवश्यकता अध्ययनात सांगितली आहे.

भारतासारख्या विकसनशील देशात लोकसंख्येच्या तुलनेत दारू पिण्याचे प्रमाण हे विकसित देशांच्या तुलनेत कमी आहे. पण स्वस्तातली भेसळयुक्त दारू पिण्याचे प्रमाण ग्रामीण आणि निमशहरी भागात जास्त असल्याने दारूमुळे होणारे मृत्यू व इतर आजार भारतात लक्षणीय आहे. दारूबंदीचे नियमही पायदळी तुडवले जातात. त्यामुळे विकसनशील देशांनी दारू नियंत्रण धोरणाची अंमलबजावणी आजपासूनच काटेकोरपणे केल्यास दारूमुळे होणारे दुष्परिणाम वेळीच रोखता येणार आहे. ही धोक्याची घंटा भारताने वेळीच ओळखणेही तेवढेच गरजेचे आहे.    

.............................................................................................................................................

‘लँसेट’ या जगप्रसिद्ध मासिकातला मूळ इंग्रजी लेख वाचण्यासाठी क्लिक करा -

https://www.thelancet.com/journals/lancet/article/PIIS0140-6736(18)31310-2/fulltext

.............................................................................................................................................

लेखकद्वय पराग मगर व डॉ. सागर भालके ‘सर्च’मध्ये व्यसनमुक्तीसाठी काम करणाऱ्या मुक्तिपथ अभियानात कार्यरत आहेत.  

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................