वाचलीच पाहिजेत अशी २५ पुस्तकं
ग्रंथनामा - बुक ऑफ द वीक
राम जगताप
  • पुस्तकांची मुखपृष्ठे
  • Fri , 19 October 2018
  • ग्रंथनामा Granthnama बुक ऑफ द वीक Book Of the Week राम जगताप Ram Jagtap

वाचण्यासारखी खूप पुस्तकं असतात. अभिजात, सर्वश्रेष्ठ, सर्वोत्तम पुस्तकांच्या याद्या, साहित्याच्या वाङ्मय प्रकारानुसार त्यातील उत्कृष्ठ पुस्तकांच्या पुष्कळ याद्या यापूर्वी मराठीमध्ये केल्या गेल्या आहेत. यापुढेही केल्या जातील. ही तशाच याद्यांपैकी एक छोटीशी यादी. प्रत्येक मराठी माणसानं वाचलीच पाहिजेत अशा पुस्तकांची ही यादी.

............................................................................................................................................

१) भारतीय संविधान (अधिकृत प्रत)

आपल्या देशाचा ‘धर्म’ नेमका काय आहे आणि देशातल्या प्रत्येक नागरिकाचा धर्म कसा असायला हवा, हे जाणून घेण्यासाठी देशाची राज्यघटना वाचणं अपरिहार्यच!

२) स्त्रीपुरुषतुलना - ताराबाई शिंदे

हे छोटंसं पुस्तकं भारतातील स्त्रीवादी मांडणीचा ‘एन्सायक्लोपीडिया’ आहे. एकोणिसाव्या शतकात स्त्रीवादी मांडणी करणारं, काळाच्या अत्यंत पुढे असलेलं हे पुस्तक प्रत्येक भारतीय स्त्री-पुरुषानं वाचलंच पाहिजे.

३) स्मृतिचित्रे - लक्ष्मीबाई टिळक

एका सामान्य स्त्रीच्या संसारातील साध्यासुध्या, कडू-गोड, आंबट-तुरट आठवणींची, संगती-विसंगतींनी भरलेली, पण प्राजंळपणे, सूक्ष्मपणे आणि विनोदबुद्धीनं सांगितलेली ही असामान्य आणि अद्वितीय कलाकृती आहे.

४) झेंडुची फुले - केशवकुमार

‘विडंबन’ या विषयावरचं मराठीतलं एकमेव श्रेष्ठ पुस्तक आहे. यानंतर एकाही पुस्तकाचं नाव घेता येत नाही.

५) आगरकर वाङ्मय (खंड १ ते ३)- संपा. दि. य. देशपांडे व नातू

आगरकर वाचल्याशिवाय बुद्धिवाद म्हणजे काय आणि विचारकलह म्हणजे काय, हे समजून घेता येत नाही.

६) दिवाकरांच्या नाट्यछटा

‘नाट्यछटा’ हा वाङ्मयप्रकार मराठीमध्ये फक्त दिवाकरांनीच लिहिला आणि तोही उत्तम प्रकारे. त्यामुळे तो जाणून घेतलाच पाहिजे.

७) युगान्त - इरावती कर्वे

महाभारताकडे कसं पाहावं आणि महाभारत कसं वाचावं याचे वस्तुपाठ जाणून घेण्यासाठी हे पुस्तक वाचलं पाहिजे.

......................................................................................................................................................

अधिक माहितीसाठी क्लिक करा - 

https://tinyurl.com/y86lc3fq

......................................................................................................................................................

८) निवडक ठणठणपाळ - जयवंत दळवी

मराठीतलं सर्वाधिक काळ चाललेलं सदर आणि मराठी साहित्यिकांची निर्भेळपणे टिंगलटवाळी करणारं हे सदाबहार पुस्तक आहे.

९) गावगाडा - त्रिंबक नारायण आत्रे

महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील बारा बलुतेदार व्यवस्थेचं समाजशास्त्रीय रीतीनं चित्रण करणारं हे पुस्तक. आत्रे यांच्या करड्या नजरेतून ग्रामीण भागाचा कुठलाच भाग आणि विषय सुटलेला नाही.

१०) साता उत्तराची कहाणी - ग. प्र. प्रधान

समाजवादी, साम्यवादी, रॉयवादी, पत्री सरकार, आंबेडकरवादी, हिंदुत्ववादी आणि गांधीवादी अशा सात विचारसरणींची १९४० ते ८० या काळातली वैचारिक चर्चा ललित अंगानं करणारं आणि त्यासाठी पत्रं, आठवणी, गप्पा आणि फ्लॅशबॅक असा तंत्रांचा वापर करणारं हे पुस्तक राजकीय भान समृद्ध करतं.

११) बहिणाबाईची गाणी

जगण्याचं तत्त्वज्ञान इतक्या सोप्या आणि नेमक्या शब्दांत तत्त्वज्ञानाच्या कुठल्याही पुस्तकात सापडणार नाही.

१२) निवडक म. श्री. माटे (खंड १ व २)

विचार असाही करायचा असतो आणि खरं तर असाच करायचा असतो, याचं ‘तारतम्य’ माटेंच्या या निवडक लेखनातून ठसठशीतपणे दृग्गोचर होतं.

१३) वाचू आनंदे (बालगट व कुमारगट) - संपा. माधुरी पुरंदरे

बालवयीन आणि कुमारवयीन मुलांचं भावविश्व आणि जाणिवा समृद्ध करणारा हा पुस्तकसंच (मुलं आणि पालकांसाठीही) प्रत्येकानं वाचला पाहिजे, संग्रही ठेवला पाहिजे.

१४) जागर - नरहर कुरुंदकर

‘विचार कसा करावा?’ हा कुरुंदकरांच्या एकंदर लेखनाचाच गाभा आहे. ‘जागर’मध्ये तो अधिक तीव्रपणे समोर येतो आणि आपलं विचारविश्व बदलून टाकतो.

१५) रामनगरी - राम नगरकर

स्वत:कडे अतिशय तटस्थपणे पाहत स्वत:च्या बावळटपणाची, चुकांची खिल्ली यात लेखकानं ज्या खिळाडूवृत्तीनं उडवली आहे, तशी मराठीतल्या इतर आत्मचरित्रांमध्ये क्वचितच दिसते. मराठी आत्मचरित्रांमध्ये इतका प्रांजळ नितळपणा क्वचितच दिसतो.

१६) कथा आणि कथेमागची कथा (खंड १ व २) - राजन खान

एक आघाडीचा सर्जनशील कथाकार (आणि कादंबरीकारही) आपल्या कथा लिहिताना काय काय पूर्वतयारी करतो, त्याविषयी कसकसा विचार करतो, त्याला विषय कसे सुचतात, तो ते कसे फुलवतो, अशा वाचकांना पडणाऱ्या प्रश्नांची उत्तरं देणारं हे मराठीतलं अभिनव पुस्तक आहे.

१७) मी कसा झालो- आचार्य अत्रे

अत्रे यांचं अष्टपैलू व्यक्तिमत्त्व, त्यांची भाषा, वाक्यरचना आणि विचारसौंदर्य जाणून घेण्यासाठी हे पुस्तक लेखन करू इच्छिणाऱ्या प्रत्येकानं वाचलेच पाहिजे.

१८) भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास - इतिहासाचार्य वि. का. राजवाडे

आजच्या निर्बंधपूर्ण शरीरसंबंधांच्या काळात एकेकाळी भारतात विवाहाचे आणि शरीससंबंधांचे कोणकोणते मार्ग होते, याचा इतिहास यात वाचायला मिळतो.

१९) सारांश - अरुण टिकेकर

आजच्या सामाजिक अनारोग्याची कारणं आणि त्यावरील उपाय या पुस्तकातील सात निबंधांतून जाणून घेता येतात.

२०) तुकारामदर्शन - डॉ. सदानंद मोरे

तुकाराम आधुनिक काळात कुठे कुठे आणि कसेकसे सापडतात, त्याचं या पुस्तकातलं विविधांगी दर्शन थक्क करणारं आहे. तुकाराममहाराज महाराष्ट्राचं जगणं किती व्यापून राहिले आहेत, त्याची यातून प्रचीती येते.

.............................................................................................................................................

अधिक माहितीसाठी पहा -

https://www.booksnama.com/client/book_list_by_category

.............................................................................................................................................

२१) दगडावरची पेरणी - सय्यदभाई

तोंडी तलाकच्या विरोधात हमीद दलवाई यांच्या प्रेरणेतून आणि स्वत:च्या बहिणीच्या अनुभवातून गेली ३५-४० वर्षं मोहीम चालवणाऱ्या एका जिद्दीच्या कार्यकर्त्याचं हे कार्यकथन आहे.

२२) गांधींनंतरचा भारत - रामचंद्र गुहा, अनु. शारदा साठे

भारताच्या स्वातंत्र्यानंतरचा इतिहास अतिशय नेमकेपणानं, तटस्थपणे आणि रंजकपणे सांगणारं हे पुस्तक भारतीय राजकारण समजून घेण्यासाठी आवर्जून वाचायला हवं.

२३) शाळा - मिलिंद बोकील

पौगंडावस्थेतून प्रत्येक जण जातो. त्यामुळे त्या प्रत्येकाच्या मनात एक ‘शाळा’ असते. कधीतरी शाळेत गेलेल्या आणि कधीही न गेलेल्या असा सर्वांची ही कादंबरी आहे.

२४) नक्षलवादाचे आव्हान - देवेंद्र गावंडे

नक्षलवादी चळवळीचे इतकं जवळून, इतकं सत्य आणि वास्तव चित्रण करणारं हे पुस्तक वाचल्यावर सदसद्विवेदबुद्धी असलेली कुठलीही व्यक्ती नक्षलवादाच्या रोमँटिसिझममध्ये अडकणार नाही.

२५) अरेबियन नाईट्स (खंड १ ते १६)- रीचर्ड बर्टन, अनु. गौरी देशपांडे

माणसांच्या चांगूलपणाच्या, दांभिकतेच्या, नैतिक-अनैतिकतेच्या, वासना-आकांक्षेच्या, असूया-मत्सर-द्वेष आणि सद्भावनेच्या इतक्या धमाल आणि रंजक गोष्टी केवळ याच पुस्तकात वाचायला मिळतात.

.............................................................................................................................................

पूर्वप्रसिद्धी - दै. सकाळ, मुंबई आवृत्ती, १५ ऑक्टोबर २०१८

............................................................................................................................................

लेखक राम जगताप ‘अक्षरनामा’चे संपादक आहेत.

editor@aksharnama.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

Post Comment

Chintu M

Sun , 21 October 2018

पुल देशपांडे यांचे एकही पुस्तक जगतापजींना वाचनीय वाटत नाही का ? माझ्या मते पुल देशपांडे यांना वगळून मराठी साहित्याचा विचारही करता येणार नाही.


real india

Sun , 21 October 2018

thank you


santosh singe

Fri , 19 October 2018

सर, आपण वारंवार तीच यादी देता असे दिसते. आपल्याच नावाने ही यादी लोकप्रभेच्या अंकात वाचली होती, आता या वर्षी सकाळ, परत अक्षरनामा. आपण या यादीनंतरची पुस्तके वाचत नाही का?


Makarand Kulkarni

Fri , 19 October 2018

सर ही पुस्तके एकत्रित थोड्या सवलतीत मिळतील का


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘बहिष्कृतां’च्या घरचे अन्न ‘बहिष्कृतां’प्रमाणेच उपेक्षिले गेले. त्यामुळे ‘ब्राह्मणेतर खाद्यसंस्कृती चळवळी’ने आपली ‘देशी’ बाजू जगापुढे मांडायला सुरुवात केलीय...

स्वच्छता व शुद्धता या दोहोंना अस्पृश्यतेचा मोठा संदर्भ आहे. ज्यांना शिवायचे नाही ते अस्पृश्य. त्यांनी जवळ यायचे नाही की, शेजार करायचा नाही, हा ब्राह्मण व सवर्ण यांचा नियम. घाणीची कामं ज्यांना वर्णाश्रम धर्माप्रमाणे करायला लावली, त्यांना घाण समजून अस्पृश्य ठरवण्यात आले. साहजिकच ही माणसं कशी जगतात, काय खातात-पितात, काय विचार करतात, याची जाणीवच वरच्या तिन्ही वर्णांना म्हणजेच सवर्ण जातींना नव्हती.......

किणीकरांना सगळी दर्शने कळत होती आणि अजून महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती काव्यात उतरवता येत होती. आणि अजून मोठी गोष्ट म्हणजे ते काव्य चार ओळींपुरते सुटसुटीत ठेवता येत होते

किणीकरांवर मानवेंद्रनाथ रॉय ह्यांच्या विचारसरणीचा मोठा प्रभाव होता. त्यांच्या नावावरूनच त्यांनी स्वतःला ‘रॉय’ हे नाव घेतले होते. रॉय यांनी 'रॅडिकल ह्यूमॅनिझम’चा पुरस्कार केला. त्या काळच्या महाराष्ट्रात अनेक नेत्यांवर, लेखकांवर आणि विचारवंतांवर रॉय ह्यांचा प्रभाव पडला होता. रॉय ह्यांनी क्रांतीचा मार्ग नाकारला असला, तरी त्या काळी तरुण असलेल्या किणीकरांना मनात कुठेतरी क्रांतीचे आकर्षण वाटले असणार.......

म्हटले तर हा ग्रामीण राजकारण उलगडून सांगण्याचा खटाटोप आहे अन् म्हटले तर शेतकऱ्यांना लुबाडणाऱ्या व्यवस्थेला पर्याय उभे करणाऱ्या पुढच्या पिढीतील शेतकरी तरुणांचा संघर्ष आहे

ही केवळ भानुदासराव पाटील, विक्रम शिंदेचीच कथा नाही, तर आबासाहेब जाधव, दिनकरराव पाटील यांच्यासारख्या लोकशाही प्रक्रियेने उदयास आलेल्या नव्या सरंजामदारांचीही गोष्ट आहे. आर्थिक संसाधनांच्या बळावर वाट्टेल तेवढा पैसा मोजून निवडणुका जिंकणारे, मतदारांचा कौल फिरवणारे आबासाहेब, दिनकरराव केवळ हैबतपुरातच नव्हे, महाराष्ट्रात सगळ्याच मतदारसंघांत दिसून येतात, पण.......

या पुस्तकातल्या ‘बिटविन द लाईन्स’ नीट वाचल्या, तर आजच्या मराठी पत्रकारितेची ‘अवनत’ अवस्था आणि तिची ‘ऱ्हासपरंपरा’ नेमकी कुठून सुरू झाली, हे लख्खपणे समजते!

आपल्या गुणी-अवगुणी सहकाऱ्यांकडून उत्तम ते काढून घेण्यापासून, समाजातल्या व्यक्ती-संस्था यांचं योगदान नेमकेपणानं अधोरेखित करण्यापर्यंत बर्दापूरकरांचा सर्वत्र संचार राहिला. त्यामुळे त्यांच्या पत्रकारितेला सत्त्व, नैतिक बळ आणि गांभीर्याची झळाळती झालर लाभत राहिली. आजच्या मराठी पत्रकारितेच्या संदर्भात त्या झालरीचा ‘थर्मामीटर’ म्हणून वापर केला, तर जे ‘तापमान’ कळतं, ते काळजी करावं, असंच आहे.......

लोकशाहीबद्दल आस्था किंवा काळजी व्यक्त करणं, ही काही लोकांचीच जबाबदारी आहे, हा समज खोडून काढायचा तर कामच केलं पाहिजे. ‘लोकशाही गप्पा’ हे त्या व्यापक कामाच्या गरजेतून आलेलं छोटंसं काम आहे

पुरेशी मेहनत करून आणि संवादाच्या सर्व शक्यता खुल्या ठेवून लोकांशी बोललं गेलं, तर प्रत्येकाच्याच आकलनात वाढ होते. आणि हळूहळू भूजलाची पातळी उंचवावी, तसं लोकशाहीबद्दलचं भान सखोल होण्याची शक्यता निर्माण होते. आपल्या भोवतीच्या गदारोळातून एकमेकांचा हात धरून, एका सजग आणि जिवंत लोकशाहीच्या मुक्कामापर्यंत मैदान मारणं आपल्याला सहज शक्य आहे. त्यासाठी एकमेकांना शुभेच्छा देणं एवढं तरी आपण करूच शकतो. ते मनःपूर्वक करू या!.......