दहशतवादी सनातनला कोण वाचवतंय?
पडघम - देशकारण
निखिल वागळे
  • ‘इंडिया टुडे’च्या स्टिंग ऑपरेशनचं एक छायाचित्र
  • Thu , 11 October 2018
  • सडेतोड निखिल वागळे Nikhil Wagle सनातन प्रभात Sanatan Prabhat भाजप BJP संघ RSS

सनातन संस्था पुन्हा एकदा चर्चेत आहे.

या आठवड्यात ‘इंडिया टुडे’ या टीव्ही चॅनेलनं सनातनच्या दोन साधकांवर स्टिंग ऑपरेशन केलं. त्यात त्यांनी आपल्या गुन्हेगारी कृत्यांचा कबुलीजबाब दिला. हे दोन्ही साधक ठाणे आणि नवी मुंबईत सनातननं घडवलेल्या बॉम्बस्फोटात सामील होते. त्यांना अटकही झाली होती. पण पुराव्याअभावी ते सुटले.

आता ‘इंडिया टुडे’च्या पत्रकारांनी सहा-सात महिने मेहनत करून त्यांना बोलतं केलं. तेव्हा यातल्या एकानं आपण नवी मुंबईत बॉम्ब पेरल्याचं सांगितलं, तर दुसऱ्यानं आपल्याकडे जिलेटीन, डिटेनेटर्स हे बॉम्ब बनवण्याचं साहित्य आणि पिस्तुलं असल्याची कबुली दिली. आपण हे सगळं पोलिसांना देऊ केलं होतं, पण त्यांनी घेतलं नाही, अशी धक्कादायक माहिती त्यानं दिली.

हे स्टिंग ऑपरेशन महत्त्वाचं आहे. आजवर सनातनवर दहशतवादाचे आरोप झाले आहेत. नालासोपाराऱ्यात अलिकडेच वैभव राऊत या साधकाच्या घरी बॉम्ब फॅक्टरी आणि शस्त्रास्त्रं सापडली आहेत. मडगाव, ठाणे, नवी मुंबई, पनवेलच्या बॉम्बस्फोटात सनातनवाले पकडले गेले आहेत. दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी, गौरी लंकेश या चारही हत्यांमध्ये सनातन आणि त्यांच्याशी संबंधित संघटनांच्या सदस्यांची चौकशी चालू आहे. पण ‘इंडिया टुडे’च्या स्टिंगमध्ये पहिल्यांदाच सनातनच्या साधकांनी कबुली दिली आहे. त्या आधारे पोलीस कारवाई करू शकतात.

पण अशी कारवाई होईल का हा खरा प्रश्न आहे. महाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री दिपक केसरकर यांनी, ‘हा नवा पुरावा आहे. आम्ही त्याची दखल घेऊ’ असं म्हटलं आहे. पण माओवाद्यांच्या प्रश्नावर तावातावानं बोलणारे आमचे मुख्यमंत्री मौन बाळगून आहेत. हुरियत किंवा पीएफआयवर त्वरित कारवाईचं आश्वासन देणारे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यावर प्रतिक्रिया द्यायला कचरताहेत. सिमी किंवा झाकीर नाईकवर सरकारनं ज्या त्वरेनं कारवाई केली, ती तत्परता सनातनबाबत दिसत नाही.

या स्टिंगच्या दुसऱ्या भागात पाटील या गोव्यातल्या पोलीस अधिकाऱ्यानं या राजकीय हस्तक्षेपाची कबुली दिली आहे. त्यांनी मडगाव बॉम्बस्फोटानंतर सनातनचा सखोल तपास करून बंदी घालण्याची शिफारस केली होती. पण ती बासनात गुंडाळून ठेवण्यात आली. गोव्यातल्या महाराष्ट्रवादी गोमांतक पक्षाचे दोन नेते सुदिन आणि दीपक ढवळीकर सनातनचे कायम समर्थक राहिले आहेत. यापैकी सुदिन ढवळीकर आजही पर्रिकर यांच्या मंत्रिमंडळात आहेत. त्यांच्या पत्नी सनातनच्या क्रियाशील साधक आहेत. ढवळीकर यांनी सनातनच्या पोलीस तपासात अडथळे आणल्याचा आरोप वारंवार झाला आहे.

...............................................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

...............................................................................................................................................................

सनातनचा मुख्य आश्रम गोव्यात रामनाथी इथं आहे. तिथल्या स्थानिक रहिवाशांनी या आश्रमाबद्दल अनेकदा तक्रार करूनही काही उपयोग झालेला नाही. या आश्रमात काही आक्षेपार्ह गोष्टी चालतात असा आरोप आहे. पण पोलीस आत जाऊन धडपणे तपासणी करू शकत नाहीत, एवढा दबाव त्यांच्यावर आहे. गोवा-कर्नाटकजवळच्या जंगलात सनातनतर्फे शस्त्रास्त्र प्रशिक्षण दिलं जातं, अशा बातम्या मीडियानं छायाचित्रासह प्रसिद्ध केल्या आहेत. तरी कोणतीही कारवाई झालेली नाही.

महाराष्ट्र एटीएसनं सनातनविरुद्ध आपला पहिला गुप्त अहवाल २०११ मध्ये सरकारला दिला, तेव्हा एटीएसचे प्रमुख राकेश मारिया होते आणि राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण. त्यांनी हा अहवाल बंदीची शिफारस करून केंद्र सरकारकडे पाठवला. पण गृहमंत्री पी. चिदंबरम आणि नंतर सुशीलकुमार शिंदे यांनी त्यावर कोणतीही कारवाई केली नाही. त्यानंतर मोदी सरकारच्या काळात आणखी दोन अहवाल राज्य सरकारनं पाठवले, पण फाईल पुढे सरकलीच नाही!

आणि कशी सरकणार? मोदी आणि भाजपवाल्यांना सनातन आपली मित्र संघटना वाटते आहे. २०१३ साली गोव्यात भाजपचं अधिवेशन होत असताना सनातनच्या फोंडा आश्रमात हिंदू जनजागृती समितीचं अधिवेशन भरलं होतं. ही समिती हे हिंसक हिंदुत्ववादी संघटनांचं संयुक्त व्यासपीठ आहे. नरेंद्र मोदींनी या संमेलनाला शुभेच्छा पाठवल्या तर होत्याच, पण काही भाजप नेतेही तिथं हजर होते.

गंमत म्हणजे हे सनातनवाले भाजप किंवा रा.स्व. संघाला आपला मित्र मानत नाहीत. सनातन, राम सेने किंवा अभिनव भारत यांच्या दृष्टीनं संघ परिवार हा पुचाट हिंदुत्ववादी आहे. हेमंत करकरे जेव्हा कर्नल पुरोहित आणि अभिनव भारतचा तपास करत होते, तेव्हा त्यांच्या हाती धक्कादायक माहिती आली होती. या अतिरेक्यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हत्येचा कट केला होता, जो यशस्वी झाला नाही. करकरे यांनी ही गोष्ट भागवत आणि अडवाणी यांनी भेटून सांगितली होती. या मंडळींच्या जहाल हिंदूराष्ट्रात संघाला स्थान नाही. तरीही भाजपवाले यांना वाचवण्याचा प्रयत्न करतात.

मोदी आणि फडणवीस सरकारमध्ये सहभागी असलेल्या शिवसेनेनं कायम या हिंदुत्ववादी अतिरेक्यांना पाठिंबा दिला आहे. परवा ‘इंडिया टुडे’वर हे स्टिंग ऑपरेशन चालू असताना सेनेचे खासदार संजय राऊत सनातनचे वकील संजीव पुनाळेकर यांचा सत्कार करत होते. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनीही या सनातनी मंडळींच्या दुष्कृत्यांवर कायम पांघरुण घातलं आहे.

या स्टिंगवरची सनातनची प्रतिक्रिया अपेक्षेप्रमाणेच आहे. कबुलीजबाब देणारे साधक आता संघटनेत नाहीत, त्यांच्या वैयक्तिक कृत्यांसाठी सनातनला जबाबदार कसं धरता येईल, असा प्रतिप्रश्न सनातनच्या प्रवक्त्यांनी केला. हाच युक्तीवाद नथुरामच्या काळापासून केला जातो आहे! गुन्हा घडल्यावर हात झटकण्याचा हा उद्योग आहे. सनातननं हे स्टिंग करणाऱ्या पत्रकारांचे फोटो आपल्या वेबसाईटवर टाकून ते दहशतवादी असल्याचा प्रचार केला. तसं पत्र पोलिसांना दिलं.

ही युक्ती सनातन नेहमी वापरतं. पत्रकारांचे किंवा विरोधकांचे फोटो किंवा फोन नंबर्स ते आपल्या ‘सनातन प्रभात’ या मुखपत्रात छापतात आणि आपल्या अनुयायांना चिथावणी देतात. दाभोलकर-पानसरे यांच्या खुनापूर्वी त्यांचे फोटो आपल्या वेबसाईटवर टाकून त्यावर फुल्ली मारण्याचा विकृतपणा सनातननं केला होता. खरं तर पोलिसांनी अशा मुखपत्रावर किंवा वेबसाईटवर त्वरित कारवाई केली पाहिजे. पण याबाबतीत त्यांनी कायम मठ्ठपणात दाखवला आहे.

तपास अधिकाऱ्यांवर दबाव आणण्याचंही सनातनचं एक तंत्र आहे. आधी पत्रकार परिषद घेऊन अशा अधिकाऱ्यांवर आरोप करायचे, मग बोगस केसेसचा ससेमिरा त्यांच्या पाठी लावायचा. अधिकारी दबावाला बळी पडला की, तपास ढेपाळतो. याच दबावामुळे अनेक पोलीस ठाण्यात सनातनला व्हीआयपीसारखी वागणूक मिळते.

सनातनवर जर खरोखर कारवाई करायची तर त्यांचा ‘हाफीज सईद’ असलेल्या जयंत बालाजी आठवलेच्या मुसक्या बांधायला हव्यात. समाजात दहशत पसरवण्याचे धंदे करतात म्हणून त्यांच्या आश्रमांना टाळं ठोकलं पाहिजे. मध्यंतरी अन्न आणि औषध प्रशासनानं सनातनच्या पनवेल आश्रमावर धाड टाकून आक्षेपार्ह ड्रग्ज जप्त केली. त्याची दखल एटीएसनं आपल्या तपासात घेतल्याचं दिसत नाही. ती केस स्वतंत्रपणे चालू आहे.

शेवटी एकच. सर्व दहशतवाद्यांना एकच नियम लागला पाहिजे. त्यात धार्मिक भेदाभेद होता कामा नयेत. सनातन ही आध्यात्मिक संस्था नाही, हा एक खुनशी पंथ आहे, हे आपण जितक्या लवकर मान्य करू तेवढं बरं होईल. नाही तर उद्या कुणाचा खून होईल सांगता येणार नाही. सनातनची टार्गेट्सची यादी मोठी आहे.

............................................................................................................................................

लेखक निखिल वागळे ‘महानगर’ या दैनिकाचे आणि ‘IBN लोकमत’ या वृत्तवाहिनीचे माजी संपादक आहेत.

nikhil.wagle23@gmail.com

.............................................................................................................................................

लेखातील मते लेखकाची वैयक्तिक असून त्याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतीलच असे नाही.

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................