सरसंघचालक मोहन भागवत गोळवलकर, देवरस यांच्या पंक्तीत जाऊन बसतात की काय?
पडघम - देशकारण
अमित इंदुरकर
  • राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत
  • Thu , 27 September 2018
  • पडघम देशकारण राष्ट्रीय स्वयंसेवक संघ RSS मोहन भागवत Mohan Bhagwat

नुकतीच नवी दिल्ली येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली ‘भविष्य का भारत’ या विषयावरील तीन दिवसीय व्याख्यानमाला पार पडली. ४४ वर्षांपूर्वी म्हणजे १९७४ ला असाच कार्यक्रम संघाचे तत्कालीन सरसंघचालक मधुकर देवरस यांच्या मार्गदर्शनाखाली पुण्यात पार पडला होता.

दिल्लीतील कार्यक्रमात मोहन भागवत यांनी काही महत्त्वाचे मुद्दे मांडले. ते मांडताना जणू काही संघाने आपल्या मूळ विचारधारेत बदल केला आहे, अशा प्रकारचा कांगावा केला. विशेष म्हणजे नरेंद्र मोदींची घटती लोकप्रियता व उंबरठ्यावर असणारी २०१९ ची लोकसभा निवडणूक ध्यानात घेऊन ही सभा आयोजित करण्यात आली होती. या कार्यक्रमात अनेक सिनेकलावंत, राज्यसभा खासदार, लेखक, विचारवंत, अर्थतज्ज्ञ व संघाचे स्वयंसेवक उपस्थित होते (संघ विचारधारेचे विरोधक असणाऱ्या लोकांनादेखील निमंत्रण होते). प्रसिद्धीपासून स्वतःला दूर ठेवणाऱ्या संघाने या वेळेस मात्र या कार्यक्रमाची प्रसारमाध्यमे व समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी केली.

कार्यक्रमात मोहन भागवत यांनी मांडलेले विचार हे संघातील स्वयंसेवकांनी आत्मसात करावे, याकरिता होते की संघाचा वैचारिकदृष्ट्या द्वेष बाळगणाऱ्या लोकांनी त्यांच्या मनातील संघद्वेष काढून घ्यावा याकरिता होते, असा प्रश्न पडतो. कारण मोहन भागवतांनी कधी नव्हे ती, काँग्रेसची प्रशंसा करून भारताच्या स्वातंत्र्यात काँग्रेसचे मोठे योगदान आहे असे सांगितले. मात्र त्यावेळेस डॉ. हेडगेवारदेखील काँग्रेसमध्ये होते हे सांगायला ते विसरले नाहीत. याचा अर्थ संघाचे संस्थापक डॉ. हेडगेवार यांचे स्वातंत्र्य आंदोलनात योगदान होते, हे पटवून देण्यासाठी त्यांनी काँग्रेसच्या योगदानाबद्दल प्रशंसा केली.

परंतु संघाचे स्वयंसेवक असलेले व भारतीय जनता पक्षात काम करणारे नेते व प्रवक्ते तसेच संघ विचारसरणीवर चालणारे स्वयंसेवक प्रचार-प्रसार माध्यमांमध्ये ओरडून सांगतात की, काँग्रेसचे देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात योगदान नाही. मोहन भागवतांच्या उपदेशाचा काय परिणाम या संघ नेत्यांवर पडतो, हे पाहण्यासारखे असेल.

...............................................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

...............................................................................................................................................................

‘मुस्लिमांशिवाय हिंदुत्व अपूर्ण आहे’ असे सांगणारे मोहन भागवत त्यांचीच राजकीय शाखा असलेल्या भारतीय जनता पक्षातील नेते व प्रवक्त्यांना हा उपदेश देऊन त्याचे पालन करायला का लावत नाहीत? भाजपचे (उदा.  संबित पात्रा) व संघाचे अनेक प्रवक्ते माध्यमांवर मुस्लिमविरोधी वक्तव्ये करून त्यांना पाकिस्तानात जाण्याचा सल्ला देतात.

भागवत लगेच तिसऱ्या दिवशी राम मंदिराच्या मुद्द्यावर बोलताना म्हणाले की, विवादित जागेवर राम मंदिर व्हायला पाहिजे. हे प्रकरण न्यायप्रविष्ट असताना त्यावर असे वक्तव्य करून मुस्लिमांच्या धार्मिक भावना दुखावण्याचा प्रयत्न भागवत करताना दिसतात.

व्याख्यानमालेच्या समारोपाच्या दिवशी भागवत यांना गोळवलकरलिखित ‘बंच ऑफ थॉट’मध्ये मुस्लिमांना शत्रू म्हणून संबोधण्यात आलेल्या वाक्यावर प्रश्न विचारण्यात आला, तेव्हा त्यांनी त्या पुस्तकातील विचार हे कालबाह्य झालेले आहेत, त्यातील विचार संयुक्तिक नाहीत असे म्हणत त्या पुस्तकाला तिलांजली दिली आणि गोळवलकरांच्या विचार व वक्तव्याचे ‘गुरुजी : व्हिजन अँड मिशन’ हे संकलन प्रकाशित केले आहे. त्यात असले वाक्य नाही म्हणत त्या वाक्याला संघात थारा नाही असा सूर आवळला. पण मुस्लिम द्वेष पसरवणारे पुस्तक व त्यातील विचारांबाबत संघ व संघस्वयंसेवकांना सांगणार नाही किंवा त्यातील उपदेशांचे पालन करायला लावणार नाही, असे अधिकृतरित्या जाहीर केले नाही.

गोळवलकरांच्या पुस्तकाला (विचारांना नव्हे) तिलांजली देण्याचा हा पहिलाच प्रसंग नाही. यापूर्वीही २००६ मध्ये गोळवलकरांनी १९३९ मध्ये लिहिलेल्या ‘We or Our Nationhood Defined’ या पुस्तकाचा - जी. डी. सावरकरांनी लिहिलेल्या ‘राष्ट्रमीमांसा’ या पुस्तकाची अनुवादित संक्षिप्त आवृत्ती आहे असे सांगून - अस्वीकार केला. (गांधीहत्येचा हत्यारा नथुराम गोडसेचा संघाशी काही संबंध नाही असादेखील संघाकडून दावा केला जातो, मात्र नथुराम गोडसेचा नातू सात्यकी सावरकर मात्र म्हणतो की, गोडसे शेवटपर्यंत संघाचा स्वयंसेवक होता.) परंतु त्यातील विचार मात्र स्वयंसेवकांच्या मनात कायम घर करून आहेत.

संघाला कलाटणी देणाऱ्या तत्कालीन सरसंघचालक माधव गोळवलकर यांच्या विचारांशी संघ खरोखरच फारकत देत आहे का, हे येणाऱ्या काळात त्यांच्याच स्वयंसेवकांच्या आचार व विचारातून दिसून येईलच. संघाला वैचारिक कलाटणी देणारे गोळवलकर आणि सार्वजनिक व राजकीय क्षेत्रात संघाचा दबदबा निर्माण करणारे देवरस यांच्या पंक्तीत मोहन भागवत जाऊन बसतात का, याकडे आता सर्वांचेच लक्ष असेल.

.............................................................................................................................................

लेखक अमित इंदुरकर राज्यशास्त्र, पत्रकारिता या विषयांचे अभ्यासक आहेत.

mr.amitindurkar@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख