विश्वविक्रमी जकार्ता एशियाड २०१८ खिशात, आता लक्ष्य टोकियो ऑलिंपिक!
पडघम - क्रीडानामा
अनिकेत वाणी
  • जकार्ता एशियाड २०१८मध्ये भारतीय संघ
  • Tue , 04 September 2018
  • पडघम क्रीडानामा आशियाई क्रीडा स्पर्धा Asian Games टोकियो ऑलिंपिक Tokyo Olympic

२०२० टोकियो ऑलिंपिकची रंगीत तालीम असणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने आतापर्यंतच्या एकूण सर्व आशियाई क्रीडा स्पर्धांपेक्षा सर्वांत जास्त पदकं मिळवत ऐतिहासिक कामगिरी केली. याच वर्षी एप्रिल महिन्यात ‘गोल्ड-कोस्ट’ ऑस्ट्रेलियामध्ये पार पडलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतानं ६३ पदकं मिळवत उत्तम कामगिरी केली होती. एक प्रकारे आम्ही टोकियो ऑलिंपिकसाठी तयार आहोत, हे दाखवून दिलं आहे. तोच फॉर्म भारतानं १८ व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत एकूण ६९ पदकं मिळवत पुढे सुरू ठेवला.

१९६२ नंतर व्हिएतनामबरोबर सयुंक्तरित्या इंडोनेशियाला आशियाई क्रीडा स्पर्धेचं आयोजन करण्याचा मान मिळाला, पण ऐनवेळी व्हिएतनामने अनपेक्षित अशी माघार घेतली. शेवटी इंडोनेशियानं पुढाकार घेत ‘जकार्ता’ आणि ‘पालेमबंग’ या दोन शहरांत खेळाचं आयोजन केलं.

एकूण १८ दिवस सुरू असलेल्या जकार्ता एशियाडमध्ये ४० क्रीडा प्रकारात नव्यानं समावेश झालेल्या अफगाणिस्तानसह ४५ देशांनी सहभाग घेतला होता. १५ सुवर्ण, २४ रौप्य आणि ३० कांस्य अशी एकूण ६९ पदकं जिंकत भारतानं २०१० सालच्या गुआनझोउ एशियाडमधील ६५ पदकांचा विक्रम मोडत सर्वोत्तम कामगिरीची नोंद केली आणि पदकतालिकेत आठवं स्थान प्राप्त केलं.

१९८२ साली झालेल्या दिल्ली आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतानं ५८ पदकं जिंकली होती, ती भारताची दुसऱ्या क्रमांकाची कामगिरी होती. त्या एशियाडमध्ये सर्वाधिक १९ रौप्यपदकं जिंकली होती. तो विक्रमही भारतानं यंदाच्या आशियाई स्पर्धेत २४ पदकं जिंकत मोडीत काढत मागे टाकला. तसंच १९५१च्या १५ सुवर्ण पदकांच्या विक्रमाची बरोबरी २०१८ च्या एशियाडमध्ये साधली. २०१४ च्या इन्चॅान एशियाडच्या तुलनेत भारतानं एकूण ११ पदकं अधिक पटकावली.

आशियाई क्रीडा स्पर्धेच्या आतापर्यंतची इतिहासात अॅथेलेटिक्समध्ये सर्वाधिक १९ पदकं कमावण्याचा पराक्रम भारतीय क्रीडापटूंनी यंदा सिद्ध करून दाखवला. कारण एकूण ६९ पदकांपैकी अॅथेलेटिक्समधील पदकांचा सिंहाचा वाटा आहे. तूर ताजिंदेरपाल सिंगनं गोळाफेकमध्ये सुवर्णपदक मिळवत आशादायक सुरुवात केली. जॅविलीन थ्रो चँपियन नीरज चोप्रानं भारतीय ध्वजधारकाला शोभेल अशी कामगिरी करत ८८.०६ मीटर लांब भाला फेकत सुवर्ण पदकावर पहिल्यांदाच नाव कोरलं. भारताच्या धावपटूंनी अफलातून कामगिरी करत ८०० मीटर शर्यतीत मनजित सिंगनं, तर १५०० मीटरमध्ये जिन्सन जॉन्सननं सुवर्णधाव घेतली. अनुक्रमे जॉन्सनने सुवर्ण आणि रौप्य पदकाची लयलूट केली. वयाच्या ३१ व्या वर्षी मनजितनं ओ.एन.जी.सी. कंपनीतील नोकरी सोडून धावायला सुरुवात केली आणि आज त्याच्या कष्टाचं चीज झालं. तर तिकडे रिओ ऑलिंपिकनंतर अनेक महिने दुखापतीमुळे स्पर्धात्मक सरावापासून वंचित असलेल्या आय्यासामी धारूनचं पुरुषांच्या ४०० मीटर अडथळा शर्यतीत काही सेकंदाच्या फरकानं सुवर्णपदक हुकलं आणि त्याला रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं.

दुसरीकडे महिलांच्या १०० आणि २०० मीटर शर्यतीत द्युती चंदने वैयक्तिक दोन रौप्य पदकाची कमाई केली. याचीच प्रेरणा घेत पुढे ४००x१ रिले शर्यतीत नव्यानं सुरू झालेल्या मिश्र प्रकारात आणि पारंपरिक पुरुष गटात रौप्यपदक पटकावलं. तर याच प्रकारात कामगिरीचा आलेख उंचावत महिलांनी सुवर्णपदक मिळवलं. महम्मद अनास व हिमा दास यांनी अनुक्रमे पुरुष व महिला गटात ४०० मीटर धावण्याच्या शर्यतीत रौप्य पदकाला गवसणी घातली.

मात्र एकीकडे भारताच्याच गोविंदन लक्ष्मणला १० हजार मीटर धावण्याच्या शर्यतीतून अपात्र ठरवत त्याचं कांस्यपदक काढून घेण्यात आलं, तर दुसरीकडे महिलांच्या १५ हजार मी. धावण्याच्या शर्यतीत पलाकीस चित्रानं पहिल्यांदाच कांस्यपदकाची कमाई केली. भारताच्या २१ वर्षीय स्वप्नानं हेप्टॅथलॅानमध्ये ६,०२६ गुण मिळवत पहिल्यांदाच ऐतिहासिक सुवर्णपदक मिळवलं. रिक्षा चालकाची कन्या स्वप्ना बर्मननं गेली पाच वर्षं अतिशय संघर्ष करत अॅथेलेटिक्सची कारकीर्द घडवली. तिचे आई-वडील २०१३ पासून मोठ्या आजारपणामुळे अंथरुणाला खिळून बसले आहेत. त्यात परत तिच्या दोन्ही पायाला सहा बोटं आहेत. त्यामुळे तिला वेगळ्या मापाचा बूट लागतो म्हणून ती जुनेच बूट घालून खेळ खेळली. तिनं गतवर्षी भुवनेश्वरला झालेल्या आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक जिंकलं होतं. तसंच जागतिक स्पर्धेत भारताचं प्रतिनिधित्वही केलं होतं.

सहा वेगवेगळ्या खेळांनी मिळून तयार झालेल्या हेप्टॅथलॅान खेळ प्रकारात कारकीर्द घडवणं सोपं नाही. तसंच सुधा सिंग व नीना वाराकील यांनी रुपेरी यश मिळवत उल्लेखनीय अशी कामगिरी केली. जिद्द व चिकाटी असेल, तर पदकाच्या मार्गात वयाचा अडथळा येत नाही, हे ३२ वर्षीय सुधा सिंगनं तीन हजार मीटर स्टीपलचेस शर्यतीत ९ मिनिटं ४०.०३ सेकंदात शर्यत पूर्ण करत दाखवून दिलं. तिनं आतापर्यंत आशियाई अजिंक्यपद स्पर्धांमध्ये दोन वेळा सोनेरी यश संपादन केलं आहे. महिलांच्या लांब उडीत नीनानं ६.५१ मीटरपर्यंत उडी मारली व रौप्य पदक मिळवलं. तिनं गतवर्षी आशियाई अजिंक्यपद स्पर्धेतही रौप्यपदकाची कमाई केली होती. यंदाच्या राष्ट्रकुल स्पर्धेत तिला दहावा क्रमांक मिळाला होता. तर पुरुषांच्या गटात अर्पिंदर सिंगनं तिहेरी लांब उडीत १६.७७ मी. उडी घेत सुवर्णपदकाची किमया साधली.

एवढं यश मिळूनही हरियाणा आणि पंजाब या दोन राज्याच्या बक्षिसांच्या वादात राजकारणी मंडळींनी त्याची पर्यायानं त्यानं पटकावलेल्या पदकाची उपेक्षाच केली. मांडीच्या स्नायू आणि तळपायाच्या बोटाला दुखापत झालेली असतानाही थाळीफेकमध्ये भारताच्या सीमा पुनियानं नावलौकिकाला साजेशी कामगिरी करत भारताला एक कांस्यपदक मिळवून दिले. सीमाने तिच्या तिसऱ्या प्रयत्नात ६२.२६ मीटर अंतरावर थाळीफेक करत पदकाच्या आशा निर्माण केल्या. पण तिचे दूरवर थाली फेकण्याचे प्रयत्न तोकडे पडले. त्याच प्रकारात भारताची संदीपकुमारी केवळ ५४.६१ मीटरपर्यंत फेक करू शकली.

अलीकडच्या काही आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत भारतीय सातत्यानं चमकताना दिसत आहेत. किशोर, कुमार किंवा वरिष्ठ गटात भारतीय मल्ल पदकाला गवसणी घालताना दिसत आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेची सुरुवात लंडन ऑलिंपिक कांस्यपदक विजेता योगेश्वर दत्तचा पट्ट शिष्य बजरंग पुनियानं ६५ किलो वजनी गटात ‘बजरंग बली की जय’ म्हणत सुवर्णपदक पटकावलं, तर महिलांच्या ४९ किलो वजनी गटात विनेश फोगटनं कुस्तीच्या मॅटवर सुवर्णपदक पटकावत ‘दंगल’ गाजवली.

आतापर्यंतच्या आशियाई क्रीडा स्पर्धेच्या इतिहासातील पहिलं कुस्तीतील महिला गटातलं सुवर्णपदक विनेशनं मिळवलं. ‘दंगल गर्ल्स’ परिवारातील असूनदेखील विनेशनं स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. गेली दोन वर्षं बजरंग आणि विनेश दोघं आंतरराष्ट्रीय स्तरावर आब राखून आहेत. तसंच ६८ किलो वजनी गटात दिव्या काकरणनं तैवानच्या मल्लला हरवत कांस्यपदक पटकावलं. पण दुसरीकडे ऑलिंपिक विजेते सुशीलकुमार आणि साक्षी मलिक यांच्या पदरी मात्र निराशा आली. बॉक्सिंगमध्ये भारताला किमान ५ ते ६ पदकांची आशा असताना फक्त दोनच पदकं मिळाली. असं असलं तरी मागील आशियाई स्पर्धेतील पदकाचा रंग नवख्या अमित फंगलनं सुवर्ण करत मोठं यश संपादन केलं. त्यानं रिओ ऑलिंपिक विजेता उजबेकिस्तानचा मुष्टियोद्धा हसन बॉयवर अंतिम फेरीत मात केली. तसंच विकास कृष्णन जखमी झाल्यामुळे त्याला कांस्यपदकावर समाधान मानावं लागलं. या प्रकारातील महिला गटात एकही महिला मुष्टियोद्धा उपांत्य फेरी गाठू शकली नाही.

थरारक अंतिम लढतीची अपेक्षा असताना एकतर्फी निकाल घडावा हेच पी.व्ही.सिंधू आणि तई झू-सिंग यांच्यातील लढतीबाबत म्हणावं लागेल. जागतिक बॅडमिंटनमध्ये तईचा दर्जा खूपच वरचा आहे. त्यामुळे सिंधू, ओकुहारा, कॅरोलिन मरिन यांसारख्या खेळाडू तिला आव्हान देण्याचा प्रयत्न करतात; पण ते कोणालाच अजून जमलं नाही. त्यामुळे महिला बॅडमिंटन वैयक्तिक प्रकारात सिंधूचं एक रौप्य आणि सायनाचं एक कांस्यपदक यावरच भारताला समाधान मानावं लागलं. पुरुष गटात मात्र भारताचा एकेरी आणि दुहेरीमध्ये दारुण पराभव झाला. टेबल टेनिसमध्ये सांघिक प्रकारातील पुरुषांच्या गटात भारतीय संघानं कांस्यपदक निश्चित केलं होतं, मात्र उपांत्य फेरी जिंकून पदकाचा रंग बदलण्याची आशा फोल ठरली. तसंच वैयक्तिक मिश्र प्रकारात अचंता शरथ आणि मनिका बात्रा यांनी कांस्यपदक पटकावलं. पण मागील एशियाड च्या तुलनेत यावेळी कामगिरी आश्वासक राहिली.

टेनिसमधून जकार्ता एशियाडमध्ये “भारताला किमान पाच पदकांची अपेक्षा होती. पण प्रत्यक्षात भारताला तीनच पदकांवर संतुष्ट राहावं लागलं. अनुभवी लिएंडर पेसने ऐनवेळी माघार घेतल्यानं त्यात आणखी वाईटात वाईट म्हणजे रामकुमारला आलेलं अपयश, यामुळे पाच पदकांचं उद्दिष्ट गाठता आलं नाही,” असं मत भारताचे प्रशिक्षक झिशान अली यांनी व्यक्त केलं. यावेळी पुरुष दुहेरीत सुवर्ण, पुरुष एकेरी आणि महिला एकेरी कांस्यपदकं मिळाली. स्क्वॅाश या खेळ प्रकारात दीपिका पल्लीकल, जोश्ना चिनप्पा आणि सौरव घोषाल यांनी महिला व पुरुष एकेरीत आपापल्या गटात सर्वोत्तम खेळ करत कांस्यपदक पटकावलं. तशीच कामगिरी पुढे चालू ठेवत सांघिक पुरुष गटात कांस्य, तर तिकडे महिला गटानं बलाढ्य मलेशियाला हरवत रौप्यपदक मिळवलं.

तिरंदाजीत दीपिका कुमारी, अतानू दास यांसारख्या अनुभवी खेळाडूंकडून निराशाजनक कामगिरी होत असतानाच दुसरीकडे ताज्या दमाच्या रजत चौहान, किरार मुस्कान या नवीन खेळाडूंनी सांघिक कंपाऊंडमध्ये पुरुष व महिला गटात रौप्यपदक मिळवलं. आशियाई क्रीडा नेमबाजी स्पर्धेत पहिल्या सहा दिवसात नऊ पदकं जिंकत नेमबाजांनी अचूक लक्ष्यवेध साधला. ज्यात अनुभवी महाराष्ट्राची लेक राही सरनोबतबरोबरच पंधरा वर्षीय सौरभ चौधरी यांनी सुवर्णवेध साधला. भारतीय रोइंगपटूंनी पहिल्या दिवशीचं अपयश धुवून काढत दत्तू भोकनाळ आणि त्याच्या सहकाऱ्यांनी चौघांच्या स्कल प्रकारात सुवर्णपदक मिळवलं. तर लाईटवेट गटात अनुक्रमे सिंगल आणि डबल स्कल प्रकारात दुष्यंत, रोहित कुमार आणि भगवान सिंग यांनी कांस्यपदकाची कमाई केली.

प्रो कबड्डी लीगमुळे भारताच्या पारंपरिक असणाऱ्या कबड्डी खेळावरचं वर्चस्व या आशियाई क्रीडा स्पर्धेत खालसा झालं. सलग सात सुवर्णपदकांचा विक्रम तोडण्यात इराणला यश मिळालं. याचं प्रमुख कारण भारताचा अतिआत्मविश्वास नडला. त्यामुळे भारताच्या पुरुष गटाला कोरिया आणि इराणकडून तर महिला गटाला इराणकडून मानहानिकारक पराभवाला सामोरं जावं लागलं. अखेर अनुक्रमे पुरुष संघाला कांस्य तर महिला संघाला रौप्यपदकावर पोडियम फिनिश करावं लागलं. साखळी सामन्यात पुरुष व महिला हॅाकी संघानं अनुक्रमे ५६ व ३८ गोलचा धडाका करत आपली ताकद दाखवून दिली. मात्र उपांत्य फेरीत पोहोचल्यानंतर पुरुष हॅाकी संघाला दुबळ्या मलेशिया कडून पेनल्टी शूट ऑफमध्ये ६-७ अशी हार पत्करावी लागली. तर महिला हॅाकी संघानं उपांत्य फेरीत चीनची भिंत भेदत अंतिम फेरीत प्रवेश केला. पण अखेरच्या क्षणी गोल करण्याची संधी दवडत १-२ असा जपानकडून पराभव स्वीकारावा लागला. या सर्व मानहानिकारक पराभवामुळे थेट ऑलिंपिक प्रवेशाची संधी हुकली. त्यातल्या त्यात दिलासादायक गोष्ट म्हणजे भारतीय संघानं पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानला हरवत कांस्यपदक मिळवलं. हे दुधाची तहान ताकावर भागवल्यासारखं आहे!

वेटलिफ्टिंग आणि जलतरण याप्रकारातील पदकांची उणीव नव्यानं समाविष्ट झालेल्या खेळांनी भरून काढली. जसं की, ब्रिज या क्रीडाप्रकारात १ सुवर्ण आणि २ कांस्यपदकं, इक्वेस्ट्रियन (अश्वारोहण) मध्ये ३६ वर्षांनंतरची ऐतिहासिक २ रौप्यपदकं, कुराश खेळात ५२ किलो वजनी गटात १ रौप्य आणि १ कांस्यपदक मिळवलं. वुशू या खेळात ४ कांस्यपदकं तर सेपक टकरा यामधील रेगू खेळ प्रकारात १ कांस्यपदक पटकावलं. सेलिंग या क्रीडाप्रकारातील निवड चाचणीत सर्वोत्तम कामगिरी केल्यानंतरही प्रवेश नाकारला गेल्यानं न्यायालयीन लढाई लढावी लागली. त्यातूनच प्रेरणा घेत भारतानं विरोधांच्या लाटांवर आरूढ होत १ रौप्य, तर २ कांस्यपदकांची कमाई केली.

भारतासारख्या देशात दिवसेंदिवस क्रीडा-संस्कृती खऱ्या अर्थानं मुळापर्यंत जोपासली जाताना दिसते. हे लक्षणं मोठं आशादायक आहे.

.............................................................................................................................................

लेखक अनिकेत वाणी यांनी जर्नालिझम अँड मास कम्युनिकेशन ही पदवी पुणे विद्यापीठातून पूर्ण केली आहे.

anumyself01@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’चे अँड्राईड अॅप डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा -

 

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘जातवास्तव’ स्वीकारल्याशिवाय सत्ता आणि संसाधनांचा जातीय ‘असमतोल’ दूर करता येणार नाही. उमेदवारांची नावे जातीसकट जाहीर करणे, हा एक ‘सकारात्मक प्रयोग’ आहे

महायुतीच्या ३८ उमेदवारांपैकी १९ मराठा आहेत. विशेष म्हणजे हे सगळे श्रीमंत मराठे आहेत. महाविकास आघाडीच्या ३९ उमेदवारांपैकी २४ मराठा आहेत. वंचित बहुजन आघाडीच्या ३२ उमेदवारांपैकी ५ अनुसूचित जाती, १३ ओबीसी आणि ४ मराठा आहेत. यावरून एक गोष्ट लक्षात येते की, मविआ असो वा महायुती एका विशिष्ट समाजाकडेच सत्ताबळ झुकलेले दिसते. मात्र वंबआने उमेदवारी देताना जात समतोल पाळलेला दिसतो.......

स्वयंपाकघरात टांगलेल्या कॅलेंडरवरच्या चित्राइतकीच थरारकता वा जाहिरातीतून एखादं उत्साहवर्धक पेय विकणार्‍या म्हातार्‍या अमिताभ बच्चनइतकीच विश्वासार्हता, दहा वर्षं राष्ट्रीय व्यासपीठावर वावरलेल्या मोदींच्या व्यक्तिमत्त्वामध्ये उरली आहे...

प्रचारसभांमधून दिसणारे पंतप्रधान दमले-भागलेले, निष्प्रभ झालेले आहेत. प्रमाणापलीकडे वापरलेली छबी, अतिरिक्त भलामण आणि अतिश्रम, यांमुळे त्यांची ‘रया’ गेल्यासारखी वाटते. एखाद्या ‘टी-ट्वेंटी’ सामन्यात जसप्रीत बूमराला वीसच्या वीस षटकं गोलंदाजी करायला लावावी, तसं काहीसं हे झालेलं आहे. आक्रसत गेलेला मोदींचा ‘भक्तपंथ’ टिकून असला, तरी ‘करिष्मा’ उर्फ ‘जादू’ मात्र चाकोरीबद्ध झालेली आहे.......

भाजपच्या ७६ पानी ‘जाहीरनाम्या’त पंतप्रधान नरेंद्र मोदींची तब्बल ५३ छायाचित्रं आहेत. त्यामुळे हा जाहीरनामा आहे की, मोदींचा ‘छायाचित्र अल्बम’ आहे, असा प्रश्न पडतो

काँग्रेसच्या ४८ पानी जाहीरनाम्यात राहुल गांधींची फक्त पाच छायाचित्रं आहेत. त्यातली तीन काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासोबत आहेत. याउलट भाजपच्या जाहीरनाम्याच्या मुखपृष्ठावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीमागे बळंच हसताहेत अशा स्वरूपाचं भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचं छायाचित्र आहे. त्यातली ‘बिटवीन द लाईन’ खूप सूचक आणि स्पष्टता सूचित करणारी आहे.......

जर्मनीत २० हजार हत्तींचा कळप सोडण्याची धमकी एका देशाने दिली आहे, ही ‘हेडलाईन’ जगभरच्या प्रसारमाध्यमांमध्ये गाजतेय सध्या…

अफ्रिका खंडातील बोत्सवाना हा मुळात गरीब देश आहे. त्यातच एवढे हत्ती म्हणजे दुष्काळात तेरावा महिना. शेतांमध्ये येऊन हत्ती मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान करत असल्याने शेतकरी वैतागले आहेत. याची दखल बोत्सवानाचे अध्यक्ष मोक्ग्वेत्सी मेस्सी यांनी घेतली आहे. त्यामुळेच त्यांनी संतापून एक मोठी घोषणा केली आहे. ती म्हणजे तब्बल २० हजार हत्तींचा कळप थेट जर्मनीमध्ये पाठवण्याची. अनेक माध्यमांमध्ये ही ‘हेडलाईन’ गाजते आहे.......