खऱ्याखोट्याची शहानिशा करण्याची विचारशक्ती गमावून बसलेला समाज हा कोणत्याही देशासाठी आशादायक असू शकत नाही!
पडघम - देशकारण
निमा पाटील
  • प्रातिनिधिक छायाचित्र
  • Wed , 15 August 2018
  • पडघम देशकारण फेक न्यूज Fake News राहुल गांधी Rahul Gandhi नरेंद्र मोदी Narendra Modi उमर खालिद Umar Khalid भाजप ‌BJP हिंदुत्ववादी Hindutvadi अर्णब गोस्वामी Arnab Goswami रविश कुमार Ravish Kumar

देशभरात, विशेषतः राजधानी दिल्लीमध्ये स्वातंत्र्य दिनाची जोरदार तयारी सुरू असतानाच, सोमवारी दिल्लीमधल्या कॉन्स्टिट्यूशन क्लबमधून एक धक्कादायक बातमी आली. जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील विद्यार्थी नेता उमर खालिद याच्यावर अज्ञात हल्लेखोराने गोळीबार केला. विशेष म्हणजे हा परिसर हाय सिक्युरिटी झोनमध्ये मोडतो. संसद, राष्ट्रपती भवन अशा सुरक्षेच्या दृष्टीने सर्वांत महत्त्वाच्या इमारतींपासून जवळच कॉन्स्टिट्यूशन क्लब आहे. तिथे कोणीही बंदूक घेऊन वावरू शकतो, एका विद्यार्थी नेत्यावर गोळीबार करू शकतो आणि पोलिसांच्या हाती न सापडता निसटू शकतो हे चित्रच भयानक आहे.

या हल्ल्यातून उमर थोडक्यात बचावला; पण त्यातून एक गोष्ट लख्खपणे स्पष्ट झाली. गेल्या दोन वर्षांपासून हिंदुत्ववादी संघटनांनी पद्धतशीरपणे जेएनयू, तिथे रुजलेली डावी विचारसरणी आणि कन्हैया कुमार, उमर खालिद, शहेला रशीद अशा विद्यार्थी नेत्यांविरोधात सातत्याने विखारी प्रचार केला आहे. त्याला कोणती फळे आली आहेत, हे या एका घटनेने अधोरेखित केले.

उमरवर हल्ला करणारा हिंदुत्ववादीच होता की नाही हे तपास पूर्ण झाल्याशिवाय कोणी सांगू शकणार नाही. तसे असेल तर याकडे गंभीर राजकीय षडयंत्र म्हणून पाहिले जाईल. ज्या सहजपणे तो हाय सिक्युरिटी झोनमध्ये बंदूक घेऊन प्रवेश करू शकला, त्यावरून त्याचे लागेबांधे मजबूत असण्याचीही शक्यता आहे. पण तो कोणत्याही राजकीय संघटनेशी संबंधित नसेल आणि केवळ एक सामान्य तरुण असेल, आणि उमरविरोधातील विखारी प्रचारामुळे त्याला देशद्रोही समजून त्याला धडा शिकवायला आला असेल तर या घटनेचे गांभीर्य कैकपटीने वाढते. खऱ्याखोट्याची शहानिशा करण्याची विचारशक्ती गमावून बसलेला समाज हा कोणत्याही देशासाठी आशादायक असू शकत नाही.

वास्तविक विखारी राजकीय प्रचार या देशाला नवीन नाही. थेट स्वातंत्र्यकाळापासून राष्ट्रीय नेत्यांची बदनामी करण्यासाठी ‘कुजबूज तंत्रा’चा वापर करण्यात आला आहे. त्या कुजबूज तंत्रामध्ये आणि आताच्या विखारी प्रचारामध्ये काय फरक आहे? याचे उत्तर दोन शब्दांमध्ये देता येईल, ‘फेक न्यूज’. आधीच्या ‘कुजबूज तंत्रा’ला मीडियाची, म्हणजेच तेव्हा वर्तमानपत्रांची आणि मासिकांची साथ जवळपास नव्हती. आणि आता विखारी प्रचाराच्या दिमतीला शेकडो वेबसाईट्स, काही मीडिया हाऊस, काही प्रतिष्ठीत पत्रकार आहेत. विशेष म्हणजे या ‘फेक न्यूज’मधून कधीही सत्ताधारी भाजपचे नुकसान होत नाही, तर केवळ विरोधकांचे प्रतिमाहनन केले जाते.

काँग्रेस पक्ष, राहुल गांधी, सोनिया गांधी, शशी थरूर, मायावती, ममता बॅनर्जी, फारुक अब्दुल्ला आणि उमर अब्दुल्ला, लालू प्रसाद यादव, अखिलेश यादव या नेत्यांना जाणीवपूर्वक लक्ष्य केले जाते. नितीश कुमार हे भाजपबरोबर आहेत की विरोधात त्यानुसार त्यांचे नाव या यादीत नसते किंवा असते. न्यूज सेन्स, वाचन, माहिती, आवाका, इ. कमी पडत असल्यामुळे ‘चुकून’ खोट्याला खरे मानूनच या वाहिन्यांवर ‘फेक न्यूज’ चालवल्या जातात असे अगदी वादासाठी उदारपणे गृहीत धरले तरी, यातली एकही न्यूज केंद्रातल्या सत्ताधाऱ्यांविरोधात कशी नसते?

अगदी शालेय मूलसुद्धा याचे उत्तर देऊ शकेल – कारण या फेक न्यूज भाजपसाठीच तयार करण्यात आलेल्या असतात, आणि भाजपच्या फायद्यासाठीच त्या चालवल्या जातात. पोस्टकार्ड न्यूज, मायनेशन, ओपइंडिया या आणि अशा वेबसाईट्सवर सातत्याने भाजपविरोधकांविरोधात खोटा मजकूर प्रसिद्ध होत असतो आणि लगोलग भाजपच्या आयटी सेलकडून तो व्हायरल केला जातो. भाजपच्या आयटी सेलच्या कारस्थानी करामती पत्रकार स्वाती चतुर्वदी यांनी ‘आय अॅम अ ट्रोल’ या पुस्तकात अगदी सोदाहरण, सखोल स्पष्ट केल्या आहेत, त्यामुळे त्याची इथे अधिक चर्चा करत नाही. कॉन्स्टिट्यूशन क्लबबाहेर गोळीबार झाला तेव्हा उमर तिथे हजरच नव्हता अशा बातम्या या वेबसाईटनी एका पत्रकाराच्या दाव्याची शहानिशा न करता प्रसिद्ध केल्या आणि भाजपच्या सायबर सेनेने त्याचा आयताच प्रसारही केला. इतकेच नाही तर तिथल्या भाजपच्या खासदार मीनाक्षी लेखी यांनीही “कोणीतरी हवेत गोळीबार केला आणि उमरचा जयजयकार केला” असे बिनदिक्कतपणे सांगितले. त्यांच्या या दाव्याची तिथे उपस्थित असलेल्या कोणीही पुष्टी केली नाही, पण लेखी यांना त्याची फिकीर नाही.

याचा अर्थ देशातील सर्वच प्रसारमाध्यमे आणि पत्रकार भाजपच्या वळचणीला गेले आहेत असे समजता कामा नये. त्यासाठी काही विशेष माध्यमवीरांची नियुक्ती करण्यात आली आहे. ‘फेक न्यूज’मुळे आपली विश्वासार्हता खालावत आहे, याबद्दलही हे माध्यमवीर बेपर्वा असतात, पत्रकाराचा आत्मा असलेल्या विश्वासार्हतेबद्दल असे बेपर्वा होणे त्यांना कसे काय परवडू शकते, असा प्रश्न कोणत्याही सर्वसामान्य, प्रामाणिकपणे काम करणाऱ्या व्यावसायिक किंवा मुक्त पत्रकाराला पडू शकतो.

उमर खालिदला प्राईम टाईमच्या चर्चेसाठी बोलावून, ‘तू देशद्रोही आहेस, हे तुला आतापर्यंत कोणी ऐकवले नसेल, पण मी ऐकवतो’, असे एखाद्या वीरपुरुषाच्या थाटात हातवारे करत ऐकवणारे अर्णब गोस्वामी हे पत्रकारितेच्या कोणत्या व्याख्येमध्ये बसतात? ‘टुकडे टुकडे गँग’, ‘देश के गद्दार’ अशा शेलक्या बदनामीकारक शब्दांमध्ये या तरुण विद्यार्थ्यांचा उद्धार केला जातो. तेही न्यायालयात त्यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल करायला खुद्द केंद्र सरकारच चालढकल करत असताना. ज्या तरुणांवर आरोप सिद्ध होणे दूरच, ते न्यायालयासमोर ठेवलेलेही नाहीत असे आरोप सिद्ध झाल्याचा आव आणून, सत्याकडे सपशेल दुर्लक्ष करत बातम्यांसदृश कार्यक्रम चालवले जातात. केवळ आरोपपत्र दाखल केले नाही म्हणून या विद्यार्थ्यांना देशद्रोही ठरवता कामा नये इतकाच हा मुद्दा नाही.

न्यायवैद्यक तपासणीनंतर हा व्हिडिओ बनावट होता, त्यामध्ये ‘पाकिस्तान झिंदाबाद, हिंदुस्तान मुर्दाबाद’ या घोषणा नंतर टाकण्यात आल्या होत्या. कदाचित हे रान पेटवणाऱ्या अभाविपच्या नेत्यांनी किंवा मीडिया हाऊसमधल्या व्हिडिओ एडिटिंगच्या टेबलावरच हे काम झाले असावे अशी शक्यता आहे. अशा वेळी बाहेरून ‘झिंदाबाद, मुर्दाबाद’ या घोषणा रेकॉर्ड करून त्या व्हिडिओमध्ये टाकणाऱ्यांनाच ‘देशद्रोही’ म्हणणार का? पण तो पुढचा मुद्दा आहे. सतत दोन वर्षे एकाच मुद्द्यावर ‘फेक न्यूज’ चालवण्याचे उदाहरण विरळा असेल. जेएनयूच्या विद्यार्थी नेत्यांविरोधात ‘फेक न्यूज’च्या वापराला उमर खालिदवरील परवाच्या हल्ल्यामुळे पुन्हा उजळणी मिळाली. पण हे एकच उदाहरण नाही. अशी अनेक उदाहरणे आहेत.

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची नाचक्की करण्यामध्ये भाजपचे ट्रोल्स महत्त्वाची भूमिका बजावत असतातच. पण या कामात काही पत्रकारही मागे नाहीत. गेल्या महिन्यात, ११ जुलैला राहुल गांधी यांनी काही मोजक्या मुस्लीम विचारवंतांची भेट घेतली. निवडणुकीआधी समाजाच्या निरनिराळ्या घटकांशी संवाद वाढवण्याच्या पक्षाच्या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून ही भेट आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये प्राध्यापक, वकील, समाजशास्त्रज्ञ, इतिहासतज्ज्ञ अशा विविध क्षेत्रांमधील नामवंतांचा समावेश होता. या भेटीची बातमी देताना ‘इन्कलाब’ या उर्दू दैनिकाने ‘काँग्रेस हा मुस्लिमांचा पक्ष आहे’ असे विधान राहुल गांधी यांनी केल्याचा दावा केला. प्रत्यक्षात राहुल गांधी असे काही म्हणाले नव्हते असे या बैठकीला उपस्थित असलेल्या काही विचारवंतांनी स्पष्ट केले.

एस. इरफान हबीब यांच्यासारख्या वरिष्ठ इतिहासतज्ज्ञाने ट्विट करून ही बातमी खोटी असल्याचे स्पष्ट केले. ‘काँग्रेस हा मुस्लिमांचा पक्ष आहे असे भाजप म्हणत असेल तर ठीक आहे. काँग्रेस हा मुस्लिमांचा पक्ष आहे कारण मुस्लीम दुर्बळ आहेत, आणि काँग्रेस पक्ष दुर्बळांसोबत आहे,’ असे विधान राहुल गांधी यांनी या बैठकीत केल्याचे नंतर समोर आले. तोपर्यंत भाजपच्या नेत्यांनी या खोट्या बातमीचा आधार घेऊन यथेच्छ टीका करून घेतली होती. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदीच त्यामध्ये आघाडीवर होते.

दोनच दिवसांनी आझमगडमध्ये एका कार्यक्रमात ‘काँग्रेस पक्ष मुस्लीम महिलांसाठीसुद्धा आहे की केवळ मुस्लीम पुरुषांसाठी हे राहुल गांधींनी स्पष्ट करावे’ असे खोडसाळ आव्हान मोदींनी देऊन टाकले. राफेल लढाऊ विमानांच्या खरेदीमध्ये घोटाळा झाल्याच्या आरोपांनी सरकार बेजार होत असताना, त्याकडे लक्ष न देणाऱ्या संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनीही ‘राहुल गांधी हे एकाच वेळी मुस्लीमधार्जिणे आणि जानवेधारी कसे काय असू शकतात? त्यांच्या या भूमिकेमुळे लोकांच्या धार्मिक भावना दुखावतात’ असा टीकेचा सूर लावला. काही दिवसांनी राहुल गांधी यांनी एक ट्विट करून आरोप फेटाळला. पण भाजपचे काम झाले होते. राहुल यांचाच खोडसाळपणे एडिट केलेला ‘इधर से आलू डालेंगे, उधर से सोना निकलेगा’ हा व्हिडिओदेखील भाजपचे नेते वारंवार वापरत असतात. प्रत्यक्षात या वाक्याआधी ‘मोदी कहते हैं’ असे शब्द आहेत ते अर्थातच कापले आहेत.

नोटबंदी हे असेच एक ठळक उदाहरण आहे. ८ नोव्हेंबर २०१६ रोजी रात्री पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ५०० आणि १०००च्या नोटा ‘कागज के टुकडे’ असल्याचे सांगत त्या रद्द केल्या. त्याऐवजी नवीन ५०० आणि २०००च्या नोटा छापण्यात आल्या. काळ्या पैशांवरील सर्जिकल स्ट्राईक म्हणून म्हणून नोटबंदीचे कौतुक सुरू असताना, मग २०००ची नोट कशाला अशी शंका स्वाभाविकपणे उपस्थित झाली. त्याला उत्तर देण्यासाठी काही पत्रकार पुढे सरसावले. या २०००च्या नोटेमध्ये एक जीपीएस चीप असून, या नोटांचा माग थेट सॅटेलाईटद्वारे काढता येईल. त्यामुळे २०००च्या नोटांचा साठा करता येणार नाही, आणि परिणामी काळ्या पैशाला आळा बसेल असे छातीठोकपणे सांगणाऱ्या पत्रकारांचे नंतर हसे झाले. अशा ‘फेक न्यूज’मुळे आपली बदनामी होईल, विश्वासार्हतेला धक्का बसेल असे ही बातमी कॅमेरासमोर देणाऱ्या एकाही पत्रकाराला वाटले नसेल का? पण तशा बातम्या काही वाहिन्यांवर, सुदैवाने सर्व वाहिन्यांवर नाही, देण्यात आल्या. ही फेक न्यूज कोणत्याही अंगाने सरकारच्या निर्णयाची समीक्षा करणारी नव्हती, होते ते केवळ ओतप्रोत कौतुक. २०००च्या नोटेत जीपीएस चीप आहे, असे छातीठोकपणे सांगणारे एस. गुरुमुर्ती आता रिझर्व्ह बँकेच्या संचालकपदी विराजमान झाले आहेत, हा भीषण विनोदही अलिकडेच घडला. 

‘फेक न्यूज’मुळे केवळ उमरवर हल्ला होण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली किंवा नोटबंदीसारख्या आर्थिकदृष्ट्या आतबट्ट्या निर्णयाचे समर्थन करण्यात आले, किंवा विरोधकांची बदनामी करण्यात आली असे नाही तर त्यातून दंगली घडवण्याचेही प्रयत्न झाले. यासाठी फेसबुक, व्हॉट्सअॅप ग्रुपचा वापर केला जातो. मार्च महिन्यामध्ये पश्चिम बंगालमधल्या आसनसोल या ठिकाणी धार्मिक दंगल झाली होती. त्याचे काही व्हिडिओ व्हायरल झाले. त्या व्हिडिओंचा वापर बिहारमधल्या भागलपूरमध्ये आणि उत्तर प्रदेशात मुझफ्फरनगर या ठिकाणी भावना भडकावण्यासाठी करण्यात आला. हे व्हिडिओ सोशल मीडियावर स्वतःला नरेंद्र मोदी आणि योगी आदित्यनाथ यांचे समर्थक म्हणवणारे अनेकजण हिरिरीने पुढे पाठवत असतात. अर्थातच कोणतीही शहानिशा न करता. राजकीय नेत्यांकडून या प्रवृत्ती सामान्य व्यक्तिकडे यायला वेळ लागला नाही.

व्हॉट्सअॅपवर आलेली प्रत्येक गोष्ट खरी आहे असे मानणाऱ्या सर्वसामान्य लोकांना वेठीला धरून त्यांच्याकडूनच हत्या करवण्यात आल्या. त्रिपुरा, उत्तर प्रदेश, बिहार, महाराष्ट्र अशा अनेक राज्यांमध्ये लहान मुले पळवणारी टोळी आल्याचे मेसेज व्हॉट्सअॅपवर फिरत होते. त्यामुळे अनोळखी व्यक्तीला किंवा व्यक्तींना त्या टोळीचा भाग मानून जमावाने मारहाण करून जीवे मारल्याच्या डझनभर घटना घडल्या आणि त्यामध्ये किमान २७ जणांचा बळी गेला. यामध्ये भाजपचा हात असल्याचा कोणीही आरोप केलेला नाही. पण अशा गुन्ह्यांना पोषक असे अविश्वास आणि द्वेषाचे वातावरण निर्माण करण्यात नक्कीच भाजप आणि संघपरिवाराचा मोठा वाटा आहे. या घटनांमुळे देशात दहशतीचे वातावरण निर्माण झाले, परदेशी माध्यमांनी भारतातील कायदा आणि सुरक्षा व्यवस्थेचे तीनतेरा वाजल्याचे जाहीर केले, अखेर सर्वोच्च न्यायालयाने दखल घेतल्यानंतर सोशल मीडियाद्वारे केंद्र सरकारला ‘फेक न्यूज’विरोधात पावले उचलावी लागली.

वास्तविक पाहता, खोटे बोलू नये, त्याचे तात्कालिक फायदे आणि दीर्घकालीन तोटे असतात, असे आपल्या पूर्वजांनी सांगितलेले आहे. स्वतःला या देशातील प्राचीन हिंदू (वैदिक) संस्कृतीचे रक्षक म्हणवणाऱ्या भाजपला ‘सत्यमेव जयते’ या मुंडक उपनिषदामधील वचनाचा वारंवार विसर कसा काय पडतो हा प्रश्नच आहे.

‘इफ यू कान्ट कन्व्हिन्स देम, कन्फ्युज देम’ असं एक इंग्रजी वचन आहे. ‘फेक न्यूज’ हे त्याचे प्रात्यक्षिक आहे. आज भाजप राजकीय फायद्यासाठी सर्रास फेक न्यूजचा वापर करत आहे, पण त्याचे दुष्परिणाम संपूर्ण समाजाला भोगायला लागणार आहेत. एखाद्या राजकीय नेत्याने, विचारवंताने, लेखकाने, तज्ज्ञाने आयुष्यभर मेहनत घेऊन स्वतःची प्रतिमा निर्माण केलेली असते. खोट्या बातम्यांच्या आधारे त्यांचे प्रतिमाहनन करणे नैतिकदृष्ट्या योग्य सोडाच, राजकीयदृष्ट्याही शहाणपणाचे नाही. अविश्वासाच्या वातावरणात नागरिक सूज्ञ राजकीय निर्णय घेण्यास सक्षम नसतात. त्याने अंतिम नुकसान समाजाचे, परिणामी देशाचेच होणार आहे. या सर्व खेळात सध्याच्या घडीला बळीचा बकरा बनलेल्या मीडियासमोर येणारा काळ मोठा बिकट असणार आहे. पुढच्या निवडणुकीत समजा विरोधक सत्तेवर आले तर, या मीडियाला सत्ताधाऱ्यांना त्यांच्या चुकांबद्दल खरेच जाब विचारता येईल का?

रवीश कुमारने ‘गोदी मीडिया’ असे नामकरण केलेला मीडिया आज गमावलेली विश्वासार्हता उद्या कशी परत मिळवणार आहे? उद्याचे राजकीय वातावरण कसे असेल? खोट्या बातम्यांच्या आधारे विरोधकांची बदनामी करणाऱ्या आजच्या पंतप्रधानांनी उद्या विरोधात बसल्यावर खरोखर गंभीर आणि महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केले तर नागरिक त्यावर विश्वास ठेवायला तयार होतील का?

सध्या दिसणारे चित्र असे आहे की, ‘फेक न्यूज’ नावाचे आजचे हे घातक शस्त्र उद्याचा नाश करणार आहे आणि त्याला आळा घालण्यासाठी काही मूठभर विचारी लोक, संस्था करत असलेले प्रयत्न वगळता बहुतांश नागरिक हातावर हात धरून मूक प्रेक्षक झाले आहेत. कोणत्याही विचारी नागरिकाला हतबल करणारे हे चित्र आहे. स्वतंत्र भारतामध्ये ‘भूखमरी से आझादी’ मागणाऱ्या विद्यार्थ्यांना पाकिस्तानी हस्तक ठरवण्यात आले. आता नागरिकांनीच ‘फेक न्यूज से आझादी’च्या घोषणा देण्याची गरज आहे.

.............................................................................................................................................

लेखिका निमा पाटील या मुक्त-पत्रकार आहेत.

nima_patil@hotmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

जर्मनीत २० हजार हत्तींचा कळप सोडण्याची धमकी एका देशाने दिली आहे, ही ‘हेडलाईन’ जगभरच्या प्रसारमाध्यमांमध्ये गाजतेय सध्या…

अफ्रिका खंडातील बोत्सवाना हा मुळात गरीब देश आहे. त्यातच एवढे हत्ती म्हणजे दुष्काळात तेरावा महिना. शेतांमध्ये येऊन हत्ती मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान करत असल्याने शेतकरी वैतागले आहेत. याची दखल बोत्सवानाचे अध्यक्ष मोक्ग्वेत्सी मेस्सी यांनी घेतली आहे. त्यामुळेच त्यांनी संतापून एक मोठी घोषणा केली आहे. ती म्हणजे तब्बल २० हजार हत्तींचा कळप थेट जर्मनीमध्ये पाठवण्याची. अनेक माध्यमांमध्ये ही ‘हेडलाईन’ गाजते आहे.......

महाराष्ट्राच्या राजकारणाचा हा ‘खेळखंडोबा’ असाच चालू राहू द्यायचा की, त्यावर ‘अक्सिर इलाज’ करायचा, याचा निर्णय घेण्याची एकमेव ‘निर्णायक’ वेळ आलेली आहे…

जनतेला आश्वासनांच्या, ‘फेक न्यूज’च्या आणि प्रस्थापित मीडिया व सोशल मीडियाद्वारे भ्रमित करूनही सत्ता मिळवता येते, राखता येते, हे गेल्या दहा वर्षांत भाजपने दाखवून दिले आहे. पूर्वी सत्ता राजकीय नेत्यांना भ्रष्ट करते, असे म्हटले जायचे, हल्ली सत्ता भ्रष्ट राजकीय नेत्यांना ‘अभय’ वरदान देण्याचा आणि एकाधिकारशाही प्रवृत्तीच्या राजकारण्यांना ‘सर्वशक्तिमान’ होण्याचा ‘सोपान’ ठरू लागली आहे.......