ट्रम्प यांच्या मग्रुरीचा प्रवास व्यापार महायुद्धाच्या दिशेने...
पडघम - विदेशनामा
शैलेंद्र देवळाणकर
  • अमेरिका आणि चीन यांच्यात व्यापार युद्ध
  • Mon , 23 July 2018
  • पडघम विदेशनामा डोनाल्ड ट्रम्प Donald Trump अमेरिका America यूएस US चीन China क्षी जिनपिंग Xi Jinping चीन-अमेरिका व्यापार युद्ध China-U.S. Trade War

अमेरिका आणि चीन यांच्यामध्ये सध्या व्यापार युद्धाचा भडका उडाला आहे. हे व्यापार युद्ध दोन देशांपुरते मर्यादित असल्याचे भासत असले तरी ते एका व्यापक महायुद्धाचे स्वरूप घेऊ शकते. याचे कारण या युद्धात आता युरोपियन समूह, मेक्सिको आणि कॅनडा यांसारखे देश उतरले आहेत. भारतही अप्रत्यक्षपणे या युद्धात सामील झालेला आहे. भविष्यात याची व्यापकता वाढणार आहे. या पार्श्वभूमीवर हे व्यापारयुद्ध नेमके काय आहे, त्याचा जागतिक अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होणार आहे, हे समजून घेणे औचित्याचे ठरेल.

अमेरिकेने चीनकडून आयात करण्यात येणाऱ्या ३४ अब्ज डॉलर्सच्या उत्पादनांवर २५ टक्के अतिरिक्त आयात कर लागू केला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी ही सुरुवात आहे असे जाहीर केले आहे. कदाचित पुढील काही दिवसांत अमेरिका आणखी १६ अब्ज डॉलरच्या आयातीवर अतिरिक्त आयात शुल्क (बॉर्डर टॅक्स) लावण्याची शक्यता आहे. थोडक्यात एकूण ५० अब्ज डॉलर्सच्या आयातीवर अमेरिकेकडून अतिरिक्त सीमा आयात शुल्क आकारले जाणार आहे. अमेरिकेच्या या कृतीला चीननेही लगेचच प्रत्युत्तर दिले आहे. चीननेही ‘जशास तसे’ उक्तीनुसार अमेरिकेकडून ज्या वस्तू आयात केल्या जातात, त्यावर अतिरिक्त शुल्क आकारण्यास सुरुवात केली आहे.

अमेरिका साधारणतः चीनकडून ५०० अब्ज डॉलर्सची आयात दरवर्षी करते. भविष्यात या सर्व वस्तूंवर कर लावला जाण्याची शक्यता आहे. अमेरिकेने हा करवाढीचा निर्णय १९७४ च्या कायद्याचा आधार घेत घेतला आहे. १९७४ मध्ये अमेरिकेने ‘व्यापार कायदा’ मंजूर केला. या कायद्यामध्ये असणाऱ्या कलम ३०१ या कलमाला ‘सुपर ३०१’ असे म्हटले जाते. या करकलमानुसार एखाद्या देशाबरोबर अमेरिकेचा व्यापार सुरु असेल आणि तो देश अनफेअर ट्रेड प्रॅक्टिस अथवा अवैध व्यापार पद्धती अवलंबत असेल तसेच बौद्धिक संपत्ती कायद्याचे उल्लंघन करत असेल तर अमेरिकेच्या कार्यकारी प्रमुखाला म्हणजेच राष्ट्राध्यक्षाला त्या देशाविरुद्ध कारवाई करण्याचा अधिकार देण्यात आला आहे. या कलमाअतंर्गतच अमेरिकेने चीनविरोधातील कारवाई केली आहे.

इतिहासात डोकावल्यास फार पूर्वी अमेरिकेने जपानविरोधात अशी कारवाई केली होती. अमेरिका जपानकडून ३०० दशलक्ष डॉलर्सचे सेमी कंडक्टर्स आयात करत होता. त्यावर अमेरिका २० टक्के जकात आकारत होता. जपानने जेव्हा हा आयात कर कमी करण्याची मागणी केली, तेव्हा अमेरिकेने त्याबदल्यात अमेरिकेत तयार होणाऱ्या सेमीकंडक्टर्ससाठी जपानचे दरवाजे संपूर्णपणाने खुले करा, त्यावर कर लावू नका अशी सौदेबाजी केली. जपानने ही मागणी मान्य केली. हीच कार्यपद्धती अमेरिका आता चीनच्या बाबतीत वापरत आहे.

अमेरिका आणि चीन या दोन्ही देशांचा एकूण व्यापार हा सुमारे ८०० अब्ज डॉलरच्या घरात आहे. या व्यापारामध्ये फार मोठ्या प्रमाणात व्यापारी असमतोल आहे. त्यामध्ये अमेरिका तोट्यात आणि चीन फायद्यात आहे. ४०० अब्ज डॉलर्सचे चीनचे कर्ज अमेरिकेला चुकवायचे आहे. चीनच्या अवैध व्यापार पद्धती, चीनचा जास्त आयात कर, तसेच तेथील बाजारपेठेत न मिळणारी जागा व संधी यामुळे अमेरिकेने चीनी उत्पादनांवर आयात कर वाढवल्याचे ट्रम्प यांनी सांगितले आहे. याबदल्यात अमेरिकेच्या उत्पादनांना मोठ्या प्रमाणावर चीनची बाजारपेठ उपलब्ध करून देण्यात यावी अशी अमेरिकेची मागणी आहे.

भारताने ज्याप्रमाणे ‘मेक इन इंडिया’च्या या प्रकल्पांतर्गत परदेशी गुंतवणूक करणाऱ्या कंपन्यांना काही काळानंतर भारताला तंत्रज्ञान हस्तांतराची अट घातली आहे. त्यानुसार सदर उत्पादने काही काळानंतर भारतातच बनवली जावीत, हा यामागचा उद्देश आहे. अशाच प्रकारे चीननेही ‘मेक इन चायना’ असा प्रकल्प हाती घेतला आहे. या प्रकल्पानुसार चीनला २०१२५ पर्यंत प्रत्येक उत्पादन हे ‘मेक इन चायना’ बनवायचे आहे. उदाहरणार्थ, एखादी अमेरिकन कंपनी चीनमध्ये गुंतवणूक करत असेल तर तिने २०२५ पर्यंत त्यातील तंत्रज्ञानाचे हस्तांतरण चीनला करावे अशी चीनची अट आहे. त्यातून आणखी काही वर्षांनी ते उत्पादन १०० टक्के ‘मेक इन चायना’ असेल.

ही गोष्ट अमेरिकेला रुचलेली नाही. त्यावर आक्षेप घेत अमेरिकेने चीनमधील आपली गुंतवणूक कमी करण्याचे सुतोवाच केले आहे. म्हणूनच ट्रम्प यांनी अशा प्रकारचे अतिरिक्त कर आकारण्यास सुरुवात केली आहे.

अशा प्रकारचे कर आकारण्यास सुरुवात केल्यानंतर ते सहजासहजी मागे घेता येत नाहीत. याचे कारण म्हणजे १९८० च्या दशकात युरोप आणि अमेरिकेमध्ये अशाच प्रकारचे व्यापार युद्ध झाले होते. त्या काळामध्ये युरोप अमेरिकेला ट्रक्सचा पुरवठा करत होता. तर अमेरिकेतील शेतीउत्पादने युरोपात जात होती. पण त्यावर कर आकारण्यात येत होते. त्यामुळे अमेरिकेने युरोपकडून घेतल्या जाणाऱ्या ट्रकवरील आयात शुल्क वाढवले होते. आजही या वाढीव दरानेच व्याजआकारणी होतआहे. ते शुल्क कमी करता आलेले नाही. त्यामुळे या व्यापारयुद्धाचे परिणाम हे दीर्घकाळ राहणार आहेत.

आयात शुल्क वाढवले की, वस्तू आपोआपच महाग होतात. अमेरिकेकडून ‘बफेलो मीट’ हे चीनला मोठ्या प्रमाणात निर्यात केले जाते. तिथल्या हॉटेलांमध्ये विकले जाते. आता चीनने त्यावरील आयात शुल्क वाढवून ३० टक्के केले आहे. साहजिकच या पदार्थांचे भाव ३० टक्क्यांनी वाढणार आहेत. त्याची झळ सामान्य ग्राहकाला बसणार असून त्याची विकत घेण्याची क्षमता कमी होणार आहे. त्यामुळे आयात शुल्क वाढल्यास महागाईचा भडका उडू शकतो. दुसरीकडे आयात शुल्क वाढीच्या माध्यमातून सुरू असलेल्या या व्यापारयुद्धामुळे दोन्ही देशांमधील गुंतवणूकदार कंपन्या परस्पर देशांत गुंतवणूक करणार नाहीत. त्यामुळे गुंतवणुकीवर याचा प्रतिकूल परिणाम होणार आहे.

याखेरीज वितरण व्यवस्थेलाही (सप्लाय चेन) याचा फटका बसणार आहे. आयात शुल्क वाढीमुळे ही सप्लाय चेन विस्कळीत होणार आहे. याचाच अर्थ, मोठ्या कंपन्यांना लागणारा कच्चा माल, सुटे भाग अथवा अन्य साहित्य यांचा पुरवठा करणार्‍या छोट्या कंपन्यांना याची झळ बसणार आहे. या छोट्या कंपन्या जगभर विखुरलेल्या आहेत. भारतातही त्या आहेत. त्यामुळे हे व्यापारयुद्ध व्यापक परिणामकारक ठरणार आहे.

१९९४ पूर्वी अशा स्वरूपाचा दंड अमेरिकेकडून घेतला जात होता; तथापि १९९५ ला जागतिक व्यापार संघटना अस्तित्त्वात आली. त्यानंतर यासंदर्भात काही नियम बनवण्यात आले. त्यानुसार जागतिक पातळीवर कोणताही देश अचानक दुसऱ्या देशासंदर्भात कर वाढवू शकत नाही. असे केल्यास जागतिक व्यापार संघटनेकडे ते सोडवण्यासाठीची यंत्रणा आहे. तक्रार निवारण मंच उपलब्ध आहे. या संदर्भात राष्ट्रे तक्रार करू शकतात. आताही ट्रम्प यांनी चीनच्या आयातीवर अचानक कर वाढवल्यानंतर जागतिक व्यापार संघटनेने जागतिक आर्थिक यंत्रणा, नियम विकसित केले आहेत; पण अमेरिका त्याला थेट केराची टोपली दाखवत आहे. त्यामुळे जागतिक अर्थव्यवस्था विस्कळीत होणार आहे. अमेरिकेने एकतर्फी निर्णय घेण्यास सुरुवात केल्यास जागतिक आर्थिक यंत्रणेला धक्का लागून ती विस्कळीत होणार आहे. पण अमेरिकेला याची फिकीर नाही. किंबहुना, डोनाल्ड ट्रम्प हे आगामी काळात जागतिक व्यापार संघटनेतून बाहेर पडण्याच्या प्रयत्नात आहेत.

गेल्या काही महिन्यांत त्यांनी युनेस्को, मानवाधिकार आयोग, ट्रान्स पॅसेफिक पार्टनरशिप, इराणसोबतचा अणुकरार आदी अनेक करारांमधून माघार घेतली आहे. आता त्यांचे पुढचे लक्ष्य विश्व व्यापार संघटना आहे. त्यामुळे चीनने किंवा इतर देशांनी जागतिक व्यापार संघटनेकडे अमेरिकेविरुद्ध तक्रार केली, तर डोनाल्ड ट्रम्प हे जागतिक व्यापार संघटनेतून माघार घेण्याची धमकी देण्याची शक्यता आहे. कारण ट्रम्प जागतिक सामरिक यंत्रणेलाच नव्हे तर आर्थिक यंत्रणेलाही बिनधास्तपणाने धक्का देताहेत. परिणामी, हे व्यापार युद्ध भविष्यात भडकण्याची चिन्हे आहेत.

डोनाल्ड ट्रम्प यांची सुरुवातीपासूनचीच एकूण धोरणे व्यावसायिक आहेत. ते स्वतः उद्योगपती आहेत. त्यांना अमेरिकेच्या आर्थिक हितसंबंधांशिवाय दुसरे काहीच दिसत नाही. त्यांच्या मते अमेरिकेचे तोट्यात जाण्याचे कारण अमेरिका इतर देशांकडून आयात शुल्क न लावता किंवा कमी शुल्कात आयात करते; परंतु इतर देश अमेरिकेच्या वस्तूंवर मोठे आयात शुल्क आकारतात. यापूर्वी असे कधीच घडत नव्हते असे त्यांचे म्हणणे आहे. वास्तविक ते केवळ कारणे शोधत आहेत. त्यांना ‘अमेरिका फर्स्ट’ हे धोरण पुढे न्यायचे आहे.

तथापि, या सर्व व्यापारयुद्धात सामान्य जनतेचे नुकसान आणि हाल होणार आहेत. त्यातून भारतीय कंपन्यांचीही सुटका होणार नाही. कारण भारतीय कंपन्याही मोठ्या प्रमाणावर अमेरिकेला कच्चा माल पुरवत आहेत. भारत – अमेरिका यांच्यातील व्यापार २० अब्ज डॉलर्सच्या घरात आहे. आज चीनबाबत जी भूमिका अमेरिका घेत आहे तीच उद्या भारताबाबत घेतली जाऊ शकते. त्यामुळे सर्वच देशांनी अमेरिकेची एकाधिकारशाही मोडून काढण्यासाठी सामूहिक आवाज उठवला पाहिजे. या सर्व व्यापार युद्धाचा परिणाम छोट्या राष्ट्रांवर होणार आहे. त्यांचे नुकसान होणार आहे. वितरण व्यवस्था विस्कळीत झाल्याने जागतिक अर्थव्यवस्थेवर त्याचा परिणाम होणार आहे. थोडक्यात, या व्यापार युद्धाचे दूरगामी परिणाम होणार असल्याने तत्काळ आणि गांभीर्याने कारवाई केली पाहिजे.

अमेरिकेची एक मागणी अशीही आहे की, चीनने आणि भारताने इराणकडून तेल उत्पादने, भूगर्भ वायू आयात करणे बंद करावे. ही आयात अमेरिकेकडून करावी. तसेच सौरऊर्जेचे तंत्रज्ञान, उपकरणेही अमेरिकेकडून आयात करावी. थोडक्यात या संघर्षाचा प्रवास आता व्यापार महायुद्धाकडे होताना दिसतो आहे.

.............................................................................................................................................

लेखक शैलेंद्र देवळाणकर आंतरराष्ट्रीय राजकारणाचे अभ्यासक आहेत.

skdeolankar@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

Post Comment

vishal pawar

Mon , 23 July 2018